भारतभ्रमंती या वेबसाईटवर, तुम्ही भारत देशातील प्रत्येक राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यातील संपूर्ण पर्यटन स्थळे पाहू शकता. आता तुम्ही पाहणार आहात महाराष्ट्र राज्यातील अहिल्यानगर जिल्ह्यातील संपूर्ण पर्यटन स्थळे.अहिल्यानगरचा भुईकोट किल्ला हा एकेकाळचा अभेद्य किल्ला होता. भारत स्वातंत्र्य होण्यापूर्वी पंडित जवाहरलाल नेहरू आणि इतर राष्ट्रवादी लोकांनी येथे निवास केला होता आज येथील काही खोल्या संग्रहालयात रूपांतरित केले आहेत. 1944 मध्ये ब्रिटिशांनी नेहरूंना या किल्ल्यात कैदेत ठेवले होते. पंडित नेहरूंनी ‘द डिस्कवरी ऑफ इंडिया’ हे पुस्तक याच ठिकाणी लिहिले. Top 32 places to visit in Ahilyanagar District
भारताच्या महाराष्ट्र राज्यातील अहिल्यानगर हा सर्वात मोठा जिल्हा आहे. आशिया खंडातील पहिला साखर कारखान्याची स्थापना प्रवरानगर मध्ये झाली होती. सर्वात जास्त साखर कारखाने या जिल्ह्यात आहेत आणि राहता तालुक्यातील शिर्डी येथील साईबाबांचे मंदिर याच जिल्ह्यामध्ये आहे.
Top 32 places to visit in Ahilyanagar District
अहिल्यानगर (अहमदनगर) जिल्ह्यातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
1) Shree Siddhivinayak Temple Siddhatek –



श्री सिध्दीविनायक मंदिर हेअष्टविनायकापैकी एक असलेला हा तिसरा गणपती अहिल्यानगर जिल्ह्यात आहे. हा सिद्धिविनायक स्वयंभू असून मूर्तीची उंची 3 फूट उंच व 2:5 फूट रुंद आहे. ही गजमुखीमूर्ती उत्तरेकडे तोंड करून आहे. गणपतीच्या दोन्ही बाजूला रिद्धी सिद्धी आहेत. मंदिराला एक प्रदक्षिणा घालण्यासाठी एक किलोमीटर चालावे लागते.
2)Bhandardara Hill Station –














भंडारदरा हे अहिल्यानगर जिल्ह्यातील, अकोले तालुक्यात प्रवरा नदीच्या काठावर, सह्याद्रीच्या पर्वत रांगांमधील एक अतिशय सुंदर आणि शांत हिल स्टेशन आहे. हे ठिकाण निसर्गसौंदर्य, धबधबे आणि ऐतिहासिक किल्ल्यांसाठी प्रसिद्ध आहे. येथे भंडारदरा (विल्सन) धरण हे प्रवरा नदीवर बांधलेले हे 1910 मधील मातीचे धरण आहे, जे 150 मीटर उंचीवर आहे. आणि याच्या जलाशयाला आर्थर लेक म्हणतात. याशिवाय येथे रंधा धबधबा, अगस्त्य ऋषी आश्रम, अंब्रेला फॉल,कळसूबाई शिखर, अमृतेश्वर मंदिर आणि रतनगड किल्ला ही अत्यंत सुंदर व निसर्गरम्य पर्यटन स्थळे आहेत. येथील हवामान थंड आणि आल्हाददायक वातावरणामुळे कॅम्पिंग आणि ट्रेकिंगसाठी उत्तम ठिकाण मानले जाते. तसेच येथे पावसाळ्याच्या आधी रात्रीच्या वेळी काजव्यांचा प्रकाश पाहण्यासाठी अनेक पर्यटक गर्दी करतात.
3)Randha waterfall –


रंधा धबधबा हा अहमदनगर मधील अकोला तालुक्यात आहे. दोनशे फूट दरीत कोसळणारा हा धबधबा प्रवरा नदीवर आहे. येथेच रतन गडातून प्रवरा नदी वाहते. पावसाळ्यात या धबधब्यावर प्रचंड गर्दी असते. या धबधब्याला लागूनच दुसरा काताळपूरचा धबधबा पण प्रेक्षणीय आहे.
4) Kalsubai shikhar-


कळसुबाई शिखर हे अहिल्या नगर जिल्ह्यातील प्रमुख पर्यटन स्थळ आहे. हे शिखर महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर असून याची उंची समुद्री सपाटीपासून1646 मीटर इतकी आहे. येथील कठीण कातळ असून त्यावर शिड्या लावल्या आहेत. ट्रेकिंग प्रेमी साठी हे एक उत्तम ठिकाण आहे. तीन ते चार तासात तुम्ही कळसुबाई शिखर सर करू शकता. भंडारदरा धरणापासून हे शिखर साधारणपणे दहा किलोमीटर अंतरावर आहे.
Visit our website: allindiajourney.com
5) Shree Amruteshwar temple –

अमृतेश्वर महादेव मंदिर हे अहमदनगर (अहिल्यानगर) जिल्ह्यातील अकोले तालुक्यात रतनवाडी गावी असलेले एक अत्यंत प्राचीन आणि सुंदर शिव मंदिर आहे. हे मंदिर 1200 वर्ष जुने असून प्रवरा नदीच्या उगमस्थळी आणि रतनगडाच्या पायथ्याशी आहे. राजा झंज याने 9 ते 12 व्या शतकात बांधलेल्या 12 शिवालयांपैकी हे एक प्रमुख मंदिर आहे. हे मंदिर प्रसिद्ध हेमाडपंती शैलीत बांधलेले असून काळ्या पाषाणावरील नक्षीकाम प्रेक्षणीय आहे. मंदिराच्या खांबांवर आणि भिंतींवर पौराणिक कथा सांगणारी सुंदर शिल्पे कोरलेली आहेत. हे मंदिर पश्चिममुखी असून त्याचे शिखर ‘भूमजी’ प्रकारचे आहे. आणि मंदिराच्या गाभाऱ्यात शिवलिंग आहे. व तिथे एक पाण्याचा झरा असून पावसाळ्यात तो पाण्याने भरतो. या मंदिराजवळ झांझा राजाने बांधलेली ‘पुष्करणी’ नावाची एक पाण्याचे कुंड आहे.विशेष म्हणजे पावसाळ्यात या मंदिरातील शिवलिंग पूर्ण पाण्यात जाते. मंदिराच्या बाजूला जुन्या बांधणीतील एक विहीर आहे. या मंदिरात जाण्यासाठी रतनवाडीतील बोटीने प्रवास करावा लागतो.
6)Shri Datta temple Devgadh-



श्री दत्त मंदिर हे देवगड येथील किशन गिरी महाराज यांनी स्थापन केलेले शनिशिंगणापूर पासून 41 किलोमीटर अंतरावर आहे.नेवासा पासून 9 किलोमीटर अंतरावर आहे. स्वच्छता आणि शांततेसाठी हे मंदिर लोकप्रिय आहे. तीन मुखी दत्ताची मूर्ती असलेल्या या मंदिरात देहभान विसरून जाते. आषाढी एकादशीला या मंदिरातून पंढरपूरला पालखी जाते. महाराष्ट्रातील असंख्य भाविक येथे दर्शनाला येतात.
7)Shree Saibaba Temple Shirdi-


श्री साईबाबा मंदिर हे राहता तालुक्यातील आंतरराष्ट्रीय तीर्थक्षेत्र बनले आहे. सर्व जाती धर्माचे लोक येथे दर्शनासाठी येत असतात. गुरुस्थान,द्वारकामाई साईबाबांनी प्रज्वलित केलेली धोनी आणि ते बसत असलेली शिळा अशा अनेक खुणा साईबाबांच्या वास्तव्याच्या शिर्डी मध्ये दिसतात. येथे दररोज लाखोंच्या संख्येने भाविक येतात. आणि महाप्रसाद घेतात.
8)Nevasa-





अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासा हे एक गाव आहे. याच ठिकाणी संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी हा ग्रंथ लिहिला. ज्या खांबाला टेकून त्यांनी ज्ञानेश्वरी लिहिली तो खांब आज ही आपणास पाहावयास मिळतो. या खांबाचे नित्यनेमाने रोज पूजा केली जाते.तसेच समुद्रमंथनाच्या वेळी अमृत वाचवण्यासाठी भगवान विष्णू ने मोहिनी रूप घेतले होते त्या मोहिनी रूप विष्णूचे स्त्री वेशातील एकमेव मंदिर या नेवासे गावी आहे. या मंदिरात प्रत्येक वर्षी तीन वेळा यात्रा भरतात.
9)Chand Bibi Mahal/ Salabat KhanTomb-

अहिल्यानगर जिल्ह्यातील, ऐतिहासिक वैभवातील एक महत्त्वपूर्ण वास्तू म्हणजे ‘सलाबत खानचा मकबरा’, जो ‘चांदबीबी महाल’ या नावानेही ओळखला जातो. हा मकबरा निजामशाहीचा वजीर सलाबत खान याने 16 व्या शतकात स्वतःसाठी बांधलेला तीन मजली अष्टकोनी दगडी वास्तू आहे. या टेकडीवरून संपूर्ण अहमदनगर शहराचे दृश्य दिसते.अहिल्यानगर जिल्ह्यातील चांदबिबी मकबरा अहमदनगर पासून फक्त 13 किलोमीटर अंतरावर हा मकबरा आहे. चांदबिबी ही विजापूरची राणी होती. स्थानिक लोकांनी त्यांच्या शौर्याचा सन्मान करून चांद बीबी हे नाव ठेवले ही इमारत 70 फूट उंच असून गॅलरी वीस फूट रुंद आहे.
10)Shani Shingnapur-

अहमदनगर पासून 30 किलोमीटर अंतरावर असलेले नेवासा तालुक्यातील सोनाई गावापासून थोड्या अंतरावर शनिशिंगणापूर हे तीर्थस्थान आहे. येथे शनि देवांची स्वयंभू पाषाणातील मूर्ती आहे. आणि येथील आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे या गावातील दरवाजांना कुलूप लावले जात नाही. शनि देवांचे एवढे महात्म्य आहे की इथे कधीही चोरी होत नाही.
11)Kot Bagh Nizam / Ahmednagar Fort-


‘कोट बाग निजाम’ म्हणजे आजचा प्रसिद्ध अहिल्यानगर जिल्ह्यातील, भुईकोट किल्ला होय. कोट बाग ही अहमदनगर किल्ल्याच्या सभोवताली पसरलेली एक ऐतिहासिक बाग आहे. ही बाग अहमद निझाम शाह उर्फ मलिक अहमद यांनी 1499 साली बहामनी राजांवरील विजयाच्या स्मरणार्थ बांधली होती. हा किल्ला इसवी सन 1490 मध्ये अहमद निजाम शहा ने बांधला. पुढील काळात म्हणजे मराठ्यांच्या आणि इंग्रजांच्या काळात हा किल्ला खूप महत्वपूर्ण ठरला. पंडित जवाहरलाल नेहरूंनी “डिस्कवरी ऑफ इंडिया” हे पुस्तक इथेच लिहिले. हा किल्ला आजही मजबूत अवस्थेत आहे. आणि गडप्रेमींसाठी आकर्षक ठिकाण आहे. या किल्ल्याला निजामशाहीच्या काळात ‘बाग निजाम’ किंवा ‘कोट बाग निजाम’ या नावाने ओळखले जात असे.
12)Rehekuri Blackbuck Sanctuary –


रेहकुरी काळवीट अभयारण्य हे भारतातील काही मोजक्या अभयारण्यातील एक आहे. येथील अभयारण्यात विविध प्रकारचे प्राणी, पक्षी आणि काळविटाच्या दुर्मिळ जाती पहावयास मिळतात. हे ठिकाण निसर्गप्रेमींसाठी स्वर्गापेक्षा कमी नाही. अहिल्यानगर मधील या अभयारण्याला अवश्य भेट द्या.
13)Harishchandragadh Fort-




हरिश्चंद्रगड हा महाराष्ट्रातील महत्त्वपूर्ण किल्ला आहे. अहमदनगर जिल्ह्यातील हा सर्वात उंच किल्ला आहे. हा किल्ला गिरीदुर्ग प्रकारात येत असून या गडाची उंची 4000 फूट इतकी आहे. हरिश्चंद्र गडाचा इतिहास हा साडेतीन हजार वर्ष जुना सांगितला जातो. हरिचंद्र गडावर प्राचीन लेणे आहेत. हरिश्चंद्रगडावर शालिवाहन काळातील शिव मंदिर आहे.या मंदिरामध्ये काही गुफा आहेत. या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे मंदिराच्या उत्तरेकडे केदारेश्वराचे गुफा मंदिर आहे. येथे पाच फूट उंच शिवलिंग असून शिवलिंग पर्यंत जाण्यासाठी कमरेपर्यंत थंडगार पाण्यातून जावे लागते. लिंगा भोवती चार खांब चार खांब असून तीन खांब तुटलेल्या अवस्थेत आहेत. एकच खांब शाबूत आहे.असे म्हटले जाते की हा खांब तुटला तर कली युगाचा अंत होईल. आणि संपूर्ण सृष्टी नष्ट पावेल. हरिश्चंद्रगडावरील आकर्षण म्हणजे कोकणकडा हा कडा 3000 फूट उंच असून बाहेरून गोलाकार आकाराचा आहे.
14)Sandhan Valley-


अहमदनगर जिल्ह्यातील सांदण व्हॅली हे एक महत्त्वाचे प्रेक्षणीय ठिकाण आहे. या सांदण व्हॅलीला सावल्यांची व्हॅली असे म्हटले जाते.अहमदनगर जिल्ह्यातील सांदन या गावातून दोन किलोमीटर नागमोडी वळण घेत जानारी व्हॅली म्हणजे सांदण व्हॅली होय. पावसाळा सोडला तर बाकी वर्षभर जगाच्या कानाकोपऱ्यातून पर्यटक येथे भेट देतात. सांदण व्हॅली ही आशिया खंडातील दुसऱ्या क्रमांकाची दरी आहे. ही दरी 200 ते 400 फूट खोल असून चार किलोमीटर पर्यंत लांबवर पसरली आहे.
15)Anand Dham-


हे एक जैन पवित्र तीर्थक्षेत्र आहे. येथे आनंद ऋषी चे विश्राम स्थान होते. 1992 साली आनंद ऋषींच्या मृत्यूनंतर त्यांच्या स्मरणार्थ हे ठिकाण बांधले गेले. या ठिकाणी पर्यटक जैन आणि हिंदी धर्माची पुस्तके पाहू शकतात. देशाच्या कानाकोपऱ्यातून पर्यटक येथे भेट देतात.हे स्मारक कमळाच्या आकाराचे आहे.आनंद ऋषीच्या समाधीच्या मागे ग्रंथालय व सह संग्रहालय आहे. सर्व पर्यटकांसाठी ते नेहमी खुले असते. आनंद ऋषीच्या अनेक वैयक्तिक व मौल्यवान वस्तू तसेच त्यांनी लिहिलेली पुस्तके या संग्रहालयात आहेत. हे संग्रहालय समाधी सारखेच भेट देण्याचे पवित्र स्थान आहे.
16)Ratangad fort-



अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील सामुद्र या गावाजवळ रतनगड किल्ला आहे. हा जिल्हा ठाणे जिल्ह्याचा सीमेवर असून सह्याद्री पर्वतामध्ये येतो. या किल्ल्याची समुद्रसपाटीपासूनची उंची 4300 फूट आहे.पुण्यापासून रतनगड चे अंतर 183 किलोमीटर आहे. रतनगड किल्ला जवळ अनेक पाहण्यासारखी प्रेक्षणीय स्थळे आहेत. किल्ल्याच्या उत्तर बाजूला आपल्या हाताच्या अंगठ्यासारखे जे शिखर दिसते त्याला रतनगड खुट्टा असे म्हणतात.
17)Arthur lake-

आर्थर तलाव हा अहमदनगर जिल्ह्यातील भंडारदरा गावाजवळ प्रवरा नदीवर बांधलेल्या विल्सन धरणाने हा तलाव तयार झालेला आहे. या तलावाला भंडारदरा तलाव किंवा आर्थर तलाव असेही म्हणतात.या धरणावर सिंचन प्रकल्प आणि जलविद्युत केंद्र उभारले आहेत. पर्यटकांसाठी हे एक विशेष आकर्षक ठिकाण आहे. निसर्गाने समृद्ध असलेल्या या ठिकाणाला एकदा अवश्य भेट द्या.
18)Bagh Rauza-


बागरोजा ही महाराष्ट्रातील अहमदनगर (अहिल्यानगर) जिल्ह्यातील, सीना नदीच्या काठी, सुडके माला परिसरातील ऐतिहासिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाची वास्तू आहे. ही वास्तू निजामशाही घराण्याचे संस्थापक अहमद निजाम शाह यांचा मकबरा आहे. अहमदनगर शहराची स्थापना करणारे अहमद निजाम शाह हे या वास्तूत चिरविश्रांती घेत आहेत. या इमारतीला “बागरोजा” किंवा तीर्थ उद्यान म्हटले जाते.बागरोजा ही एक घुमटाकृती इमारत आहे. याच्या भिंतींवर कुराणातील आयते कोरलेली असून, सुंदर नक्षीकाम केलेले आहे. आणि घुमटाच्या मध्यभागी एक झरोका आहे, ज्यातून दिवसा सूर्याची आणि रात्री चांदण्यांची किरणे थेट अहमद निजाम शाहच्या कबरीवर पडतात.
19)Ranjan Khalge(natural phenomena) Nighoj-



निघोजचे रांजणखळगे हे अहिल्यानगर जिल्ह्यातील, पारनेर तालुक्यातील निघोज गावात कुकडी नदीच्या नदीपात्रातील रांजणखळगे हे आशियातील सर्वात मोठे नैसर्गिक खड्डे आहेत. हे रांजणखळगे म्हणजे निसर्गाचा एक अद्भूत आविष्कार मानला जातो. हजारो वर्षांपासून कुकडी नदीच्या पात्रातील बेसाल्ट खडकावर पाण्याचा जोरदार प्रवाह आणि त्यासोबत वाहून येणारे दगड-गोटे यांच्या घर्षणामुळे हे गोलाकार खड्डे तयार झाले आहेत. याचा आकार रांजणासारखा असल्याने त्यांना ‘रांजणखळगे’ म्हणतात. येथील काही खळगे 100 फुटांपेक्षाही खोल असल्याचे सांगितले जाते. उन्हाळ्यात नदीचे पाणी कमी झाल्यावर हे अद्भूत दगडी शिल्प स्पष्टपणे दिसून येतात. या नदीकाठावरच मळगंगा देवीचे प्रसिद्ध मंदिर आणि नदीच्या पात्रावर एक लोखंडी झुलता पूल आहे.
20)Cavalry Tank Museum-



कॅव्हलरी टँक संग्रहालय हे अहिल्यानगर जिल्ह्यातील, आशियातील एकमेव आणि जगातील दुसरे लष्करी संग्रहालय आहे. भारतीय लष्कराच्या आर्मर्ड कॉर्प्स सेंटर आणि स्कूलद्वारे फेब्रुवारी 19954 मध्ये हे संग्रहालय स्थापित करण्यात आले. या संग्रहालयात दारुगोळा, शस्त्रे, 40 पेक्षा जास्त देशांतील सुमारे 50 विंटेज आर्मर्ड लढाऊ रणगाडे प्रदर्शनासाठी ठेवण्यात आले आहेत. येथे पहिल्या महायुद्धापासून ते 1971 च्या भारत-पाकिस्तान युद्धापर्यंत वापरले गेलेले विविध देशातील बख्तरबंद रणगाडे पाहायला मिळतात. आणि 1914 मधील रोल्स-रॉयस सिल्व्हर घोस्ट आर्मर्ड कार हे या संग्रहालयातील सर्वात जुने आणि विशेष आकर्षण आहे.
21)Faria Bagh Palace-


फरिया बाग पॅलेस किंवा फराहबक्ष महाल हा अहिल्यानगर जिल्ह्यातील,निजामशाही काळातील एक ऐतिहासिक अष्टकोनी राजवाडा आहे. या महालाचे बांधकाम निजामशाहीचा संस्थापक अहमद निजाम शाह यांनी आपला मुलगा बुरहान शाह याच्या स्मृतीप्रित्यर्थ 1583 बांधला होता. हा अष्टकोनी आकाराचा जल-महाल चौरसाकृती तलावाच्या मध्यभागी उंच चौथऱ्यावर बांधलेला असून महालापर्यंत जाण्यासाठी 90 मीटर लांबीचा दगडी पूल आहे. आणि त्याच्या मध्यभागी सुमारे 30 फूट उंच घुमट असलेला मोठा हॉल आहे. या महालाच्या आत कारंजी होती, ज्यासाठी खापरी नळाने पाणी आणले जायचे. तलावातील विशिष्ट रचनेमुळे कडक उन्हाळ्यातही हा महाल थंड राहायचा. अहिल्यानगर शहराच्या मोरुदनागर/भिंगार भागातील हा महाल सध्या पडक्या अवस्थेत असून, याच्या देखभालीची जबाबदारी लष्कराकडे (कॅव्हलरी टँक म्युझियमजवळ) आहे. आणि येथील बागेत ‘लकड महल’ नावाचा एक महाल आहे. भारत सरकारने या महालाला 1909 मध्ये महाराष्ट्रातील राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित केले आहे.
22)Meherabad-


मेहेरबाद हे महाराष्ट्र राज्याच्या अहिल्यानगर जिल्ह्यातील, अरणगाव येथील एक वैश्विक आध्यात्मिक केंद्र आणि तीर्थक्षेत्र आहे. मेहेर बाबांनी 1923 मध्ये येथे आपल्या आश्रमाची स्थापना केली होती. मेहेराबाद टेकडीवर आध्यात्मिक गुरु मेहेर बाबांचे समाधी मंदिर असून 31 जानेवारी 1969 रोजी त्यांच्या निधनानंतर येथेच त्यांचे दफन करण्यात आले होते. मेहेर बाबानी जात, धर्म आणि पंथाच्या पलीकडे असलेल्या शांततेचा आणि प्रेमाचा संदेश सर्व जनतेला दिला. तसेच मेहेर बाबांनी त्यांच्या जीवनातील शेवटची 44 वर्षे मौन पाळले होते आणि खुणांच्या साहाय्याने संवाद साधला होता. या ठिकाणाला भेट देण्यासाठी जगभरातून, अमेरिका, रशिया आणि युरोपमधून हजारो भाविक येतात. दरवर्षी 31 जानेवारी रोजी मेहेर बाबांच्या पुण्यतिथीनिमित्त ‘अमरतिथी’ हा मोठा उत्सव साजरा केला जातो. हे ठिकाण अत्यंत शांत, निसर्गरम्य आणि आध्यात्मिक असून येथे ग्रंथालय आणि मेहेर बाबांच्या जीवनावर आधारित म्युझियम आहे.
23)Shree Vridheshwar Mahadev Mandir-


श्री वृद्धेश्वर महादेव मंदिर हे अहिल्यानगर जिल्ह्यातील, पाथर्डी तालुक्यात, घाटशिरस गावाजवळ, निसर्गरम्य परिसरात खोल दरीत वसलेले प्राचीन शिव मंदिर आहे. हे मंदिर हेमाडपंथी शैलीत बांधलेले असून गर्भगिरी डोंगररांगांच्या कुशीत वसलेले आहे. व नाथ संप्रदायाचे आद्य शक्तीपीठ मानले जाते. येथील शिवलिंग स्वयंभू असून या मंदिराच्या तिन्ही बाजुला डोंगर व आयुर्वेदिक वनस्पती आहेत. असे सांगितले जाते की महादेवांनी येथे वृद्धाचे रूप घेऊन प्रसाद ग्रहण केला होता, तेव्हापासून या स्थानाला ‘वृद्धेश्वर’ वा ‘म्हातारदेव’ असे नाव पडले. हे मंदिर लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असून दर सोमवारी येथे दर्शनासाठी मोठ्या संख्येने भाविक येतात. नवनाथ भक्तीसार ग्रंथात या स्थानाचा उल्लेख आहे. मच्छिंद्रनाथ आणि नवनाथांनी येथे वास्तव्य व तपश्चर्या केली होती. आख्यायिकेनुसार, गोरक्षनाथांनी सुवर्ण मंत्राचा वापर करून हा गर्भगिरी डोंगर सोन्याचा केला होता, जो नंतर कुबेराला अर्पण करण्यात आला.
24)Siddheshwar,Devi & Vishnu temple –


सिद्धेश्वर, देवी आणि विष्णु मंदिर हे अहिल्यानगर जिल्ह्यातील,प्रवारा आणि गोदावरी नद्यांच्या संगमावर स्थित केयेगाव टोका येथील अत्यंत प्राचीन आणि पवित्र मंदिर समूह आहे. येथे मुख्यत्वे सिद्धेश्वर महादेव, विष्णू आणि देवी (गजरादेवी) यांची तीन स्वतंत्र मंदिरे एकाच तटबंदीच्या आत आहेत. प्रवरा आणि गोदावरी नद्यांच्या संगमावर हे मंदिर असल्याने येथे भव्य,प्रशस्त दगडी घाट बांधलेले आहेत. आणि या मंदिराच्या भिंतींवर रामायण, महाभारत आणि पुराणातील विविध प्रसंगांची सुंदर शिल्पे कोरलेली आहेत. हे मंदिर हेमाडपंती आणि पेशवेकालीन स्थापत्य शैलीचा उत्कृष्ट नमुना आहे. काळ्या पाषाणात केलेले कोरीव काम आणि मजबूत दगडी तटबंदी हे या मंदिराचे मुख्य वैशिष्ट्य आहे. महाशिवरात्रीला येथे मोठी गर्दी होते. येथून जवळच घटेश्वर, मुक्तेश्वर आणि रामेश्वर ही प्राचीन मंदिरे आहेत.
25)Dhokeshwar Cave Temple-



ढोकेश्वर गुहा मंदिर हे अहिल्यानगर जिल्ह्यातील, पारनेर तालुक्यात टाकळी ढोकेश्वर येथील 6-7 व्या शतकातील पांडवकालीन, खडकात कोरलेले एक प्राचीन शैव लेणे आहे. डोंगराच्या पोटात कोरलेले हे गुहा मंदिर (लेणी) असून, यात भव्य सभागृह, प्रदक्षिणा मार्ग आणि गाभारा आहे. या मंदिरात गणेश, तांडव नृत्य करणारा शंकर, द्वारपाल आणि सप्तमातृका यांची सुंदर शिल्पे कोरलेली आहेत. हे पांडवकालीन मंदिर नैसर्गिक पाणी साठवण्याच्या पद्धती, सुंदर कोरीवकाम आणि शांत परिसरासाठी प्रसिद्ध आहे. मंदिराच्या बाहेर पाणी साठवण्याची प्राचीन व्यवस्था आहे, ज्याला ‘सीता न्हाणी’ असेही म्हणतात. या मंदिराला पुरातत्व खात्याने संरक्षित स्मारक म्हणून घोषित केले आहे.श्रावण महिन्यातील सोमवार आणि महाशिवरात्रीला येथे मोठी यात्रा भरते.
26)Shri vishal ganapati temple –


श्री विशाल गणपती मंदिर हे अहिल्यानगर जिल्ह्यातील, माळीवाडा भागातील जागृत ग्रामदैवत आणि नवसाला पावणारा गणपती म्हणून प्रसिद्ध आहे. या मंदिरात गणपतीची उजव्या सोंडेची 11.5 फूट उंच व 7 फूट रुंद भव्य मूर्ती आहे. या मंदिरात कोणतेही शुभकार्य, या गणपतीपासूनच सुरू करण्याची परंपरा आहे. आणि आठशे वर्षांपासून गणेशमूर्ती अस्तित्वात असल्याचे पुरावे मोडी लिपीत आहेत. येथील गणेशोत्सव मिरवणुकीत या मूर्तीला पहिला मान असतो. या मंदिराचे पुजारी नाथपंथीय असून, याठिकाणी पूर्वापार चालत आलेली पूजा परंपरा आजही पाळली जाते. येथे गणेशोत्सव, गणेश जयंती, गुरुपौर्णिमा आणि सावत महाराज जयंती मोठया उत्साहात साजरे केले जातात.
27)Umbrella Falls-

अम्ब्रेला फॉल हा अहिल्यानगर जिल्ह्यातील, निसर्गरम्य लोकप्रिय पर्यटन स्थळ आहे. हा धबधबा अहमदनगर जिल्ह्यातील भंडारदरा येथील विल्सन धरणावर (प्रवरा नदी) आहे. हा नैसर्गिक धबधबा नाही, जेव्हा भंडारदरा धरणाचे दरवाजे उघडले जातात किंवा धरण ओसंडून वाहते, तेव्हा हा धबधबा कार्यान्वित होतो. या धबधब्याची उंची 45 मीटर असून हा धबधबा एका मोठ्या अर्धवर्तुळाकार खडकावरून खाली पडतो. कोसळणाऱ्या पाण्याचा आकार छत्रीसारखा दिसत असल्याने याला ‘अम्ब्रेला फॉल’ असे म्हणतात. येथे ‘राम तेरी गंगा मैली’, ‘कटी पतंग’ आणि ‘देऊळ’ अशा अनेक प्रसिद्ध चित्रपटांचे चित्रीकरण या परिसरात झाले आहे. या धबधब्याच्या जवळपास आर्थर लेक, रंधा धबधबा, आणि कळसुबाई शिखर ही प्रेक्षणीय ठिकाणी आहेत.
28)Rahi Rakhumai Vitthal Temple & Bhuikot Fort-





विठ्ठल राही रखुमाई मंदिर आणि पळशी गावचा भुईकोट किल्ला (गढी) हे अहिल्यानगर जिल्ह्यातील, पारनेर तालुक्यातील पळशी येथील ऐतिहासिक आणि धार्मिक ठिकाण आहे. येथील विठ्ठल मंदिर (प्रति पंढरपूर) हे 250 वर्षांपूर्वीचे प्राचीन मंदिर आहे. होळकरांचे दिवाण रामजी कांबळे-पळशीकर यांनी बांधलेल्या या मंदिरात राही, रुक्मिणी आणि विठ्ठलाची मूर्ती आहे. हे दुर्मिळ मंदिर भुईकोटाच्या बाहेर दक्षिण दरवाजाच्या जवळच आहे. या मंदिराचे बांधकाम पेशवेकालीन असून अत्यंत सुंदर दगडी कोरीवकाम, भक्कम तटबंदी आणि बुरुज असलेले आहे. दरवर्षी आषाढी एकादशीला येथे मोठी यात्रा भरते. या विठ्ठल मंदिरा जवळच पळशी गावचा भुईकोट किल्ला (गढी)आहे. जो होळकरांचे दिवाण रामाजी यादव कांबळे-पळशीकर यांनी उभारलेला ऐतिहासिक वारसा आहे. 1797 मध्ये बांधलेल्या या किल्ल्यात पळशीकरांचा सुंदर लाकडी नक्षीकाम केलेला वाडा, तटबंदी, महादेवाचे मंदिर आणि एक ऐतिहासिक बारव आहे.
29)Kharda Fort-


खर्डा किल्ला हा अहिल्यानगर जिल्ह्यातील, जामखेड तालुक्यात असलेला एक ऐतिहासिक भुईकोट किल्ला आहे. हा किल्ला शिवपट्टण किंवा सुलतानगड म्हणून हे ओळखला जातो. या किल्ल्याचे बांधकाम 1745 मध्ये सरदार निंबाळकर यांनी केले होते. 11 मार्च 1795 रोजी मराठ्यांनी निजामावर येथे ऐतिहासिक विजय मिळवला होता. हा किल्ला चौकोनी आकाराचा असून 3 एकर परिसरात विस्तारलेला आहे. किल्ल्याला मजबूत तटबंदी आणि बुरूज आहेत व किल्ल्याचे मुख्य प्रवेशद्वार उत्तराभिमुख आहे. या किल्ल्याच्या आत एक बांधीव बारव (विहीर) आहे, जी 100 फूट खोल आहे. आणि आतमध्ये एक जुनी मशीद व वाड्याचे अवशेष पाहायला मिळतात. तसेच या गावामध्ये 12 ज्योतिर्लिंगांची मंदिरे आणि सरदार निंबाळकर यांचा ऐतिहासिक वाडा आहे.
30)Shree Mohata Devi Temple-


श्री मोहटा देवी मंदिर हे अहिल्यानगर जिल्ह्यातील, पाथर्डी तालुक्यात गर्भगिरी डोंगररांगेवर (मोहटागड) वसलेले एक जागृत स्वयंभू देवस्थान आहे. येथील श्री कुलस्वामिनी जगदंबा मोहटादेवी ही माहूरच्या रेणुका मातेचा अंशावतार मानली जाते. या मंदिरात मोहटा देवीची मूर्ती स्वयंभू असून ती दक्षिणमुखी आहे. हे भव्य मंदिर 10 एकर परिसरात पसरलेले असून अलीकडच्या काळात नवीन मंदिराची रचना श्रीयंत्राच्या आकाराची आहे. आणि ते राजस्थानातील जैसलमेर येथील पिवळ्या दगडांपासून बनवण्यात आले आहे. पौराणिक कथेनुसार, नवनाथांनी येथे महायज्ञ केला होता आणि त्यांच्या विनंतीवरून देवी येथे वास्तव्यास आली. मोहटा गावात आजही दुध, दही किंवा तूप विकले जात नाही, कारण ते सर्व देवीला अर्पण करण्याची जुनी परंपरा आहे.
31)Mallikarjun temple, Ghotan-


मल्लिकार्जुन मंदिर (जटाशंकर मंदिर) हे अहिल्यानगर जिल्ह्यातील, शेवगाव तालुक्यात घोटाण येथील 12 व्या-13 व्या शतकातील एक ऐतिहासिक यादवकालीन मंदिरे आहेत. येथील जैन मंदिरातील गाभार्यात शिवलिंग स्थापित आहे. स्थानिक लोक याला जटाशंकर मंदिर म्हणतात. या मंदिराची रचना गर्भगृह, अंतराळ, मंडप आणि मुखमंडप अशी आहे. या मंदिराचे एक वैशिष्ट्य म्हणजे येथील गर्भगृह हे सभामंडपापासून 15 फूट खोल असून ते दोन टप्प्यांत विभागलेले आहे. जैन मंदिराच्या अगदी जवळ 14 व्या शतकातील मल्लिकार्जुन महादेवाचे मंदिर आहे. पेशवे काळात त्याची दुरुस्ती करण्यात आली होती. हे ठिकाण ऐतिहासिक आणि नैसर्गिक सौंदर्यासाठीही ओळखले जाते.
32)Mula Dam –



मुळा धरण हे अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यात असलेले सर्वात मोठे धरण आहे. या धरणाच्या जलाशयाला ‘ज्ञानेश्वर सागर’ म्हणून ओळखले जाते. हे धरण सह्याद्रीतील आजोबा डोंगर रांगेत उगम पावलेल्या मुळा नदीवर बांधलेले मातीचे धरण असून या धरणाचे बांधकाम 1972 पूर्ण झाले. याची पाणी साठवण क्षमता 26 टीएमसी, भिंतीची लांबी: 2,856 मीटर तर उंची: 48.17 मीटर एवढी आहे. आणि या धरणाचे वैशिष्ट्य म्हणजे देशात पहिल्यांदा ‘जलविरोधी कॉंक्रीटचा पडदा’ या धरणाच्या पायात वापरून मजबुती देण्यात आली. या धरणाचा उपयोग अहिल्यानगर जिल्ह्यातील महात्मा फुले कृषी विद्यापीठ (राहुरी), नेवासा, शेवगाव आणि पाथर्डी या तालुक्यांतील शेतीसाठी व पिण्याच्या पाण्यासाठी केला जातो.धरणाच्या परिसरात निसर्गरम्य हिरवळ असून हे धरण जिल्ह्याची जीवनवाहिनी मानले जाते.
1)आनंद धाम हे कोणत्या साली बांधले ?
आनंद धाम हे १९९२ साली बांधले.
2)हरिश्चंद्र गडाची उंची किती आहे ?
हरिश्चंद्र गडाची उंची 4000 फूट आहे.
3)आर्थर तलाव कोणत्या धरणाने तयार झाला आहे?
आर्थर तलाव विल्सन धरणाने तयार झाला आहे.


