अरियालूर जिल्ह्यातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे- Top 18 places to visit in Ariyalur District

भारतभ्रमंती या वेबसाईटवर पहा भारत देशातील प्रत्येक राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यातील पर्यटन स्थळांमध्ये, तामिळनाडू राज्यातील अरियालूर जिल्ह्यातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे. अरियालूर हा भारताच्या तामिळनाडू राज्यातील एक महत्त्वाचा जिल्हा असून याचे मुख्यालय अरियालूर शहर आहे. हा जिल्हा सिमेंट उद्योग, पुरातन जीवाश्म आणि ऐतिहासिक गंगाईकोंडा चोलपुरम या युनेस्को जागतिक वारसा स्थळासाठी प्रसिद्ध आहे. या जिल्ह्याच्या उत्तरेला कडलूर, दक्षिणेला तंजावर, पश्चिमेला पेराम्बलूर आणि तिरुचिरापल्ली हे जिल्हे आहेत. तसेच या जिल्ह्याच्या उत्तरेकडून वेल्लार नदी आणि दक्षिणेकडून कोल्लीडम (कोलेरून) नदी वाहते. अरियालूर जिल्ह्याची स्थापना 19 नोव्हेंबर 2007 रोजी पेराम्बलूर जिल्ह्याचे विभाजन करून करण्यात आली. Top 18 places to visit in Ariyalur District

या जिल्ह्यात अरियालूर, सेंधुरई, उदयरपालयम आणि अंडीमडम हे 4 तालुके आहेत. अरियालूर जिल्ह्यात चुनखडीचे प्रचंड साठे आहेत. यामुळे येथे अनेक मोठे सिमेंट कारखाने आहेत. येथील जयकोंडम परिसरात लिग्नाइट (तपकिरी कोळसा) चे मोठे साठे आढळतात. येथील शेतीमध्ये मुख्यत्वे काजू, ऊस आणि भाताचे पीक घेतले जाते. अरियालूर हे जीवाश्मांसाठी जगभर प्रसिद्ध आहे. येथे महाकाय शंख, मासे आणि डायनासोरची अंडी व जीवाश्म सापडले आहेत. व ते जतन करण्यासाठी ‘कीलपळूर’ येथे एक ऑन-साइट म्युझियम आहे.

Table of Contents

Top 18 places to visit in Ariyalur District

अरियालूर जिल्ह्यातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे

1)Gangaikonda Cholapuram / Brihadisvara Temple-

 Top 18 places to visit in Ariyalur District

गंगाईकोंडा चोलपुरम मंदिर हे तामिळनाडू राज्याच्या अरियालूर जिल्ह्यात जयकोंडम जवळ वसलेले प्रसिद्ध शिवमंदिर आहे. या मंदिराला ‘बृहदीश्वर मंदिर’ किंवा ‘अरुल्मिगु पेरुवुदाय्यार मंदिर’ असेही म्हटले जाते. हे मंदिर युनेस्कोचे जागतिक वारसा स्थळ असून ते ‘ग्रेट लिविंग चोल टेम्पल्स’ चा एक महत्त्वाचा भाग आहे. या भव्य मंदिराचे निर्माण सम्राट राजा चोल यांचे पुत्र सम्राट राजेंद्र चोल यांनी इ.स. 1035 मध्ये केले होते. या मंदिराच्या गर्भगृहात 13 फूट उंच आणि 17 फूट व्यासाचे भव्य शिवलिंग आहे, आणि मंदिराचे मुख्य गोपूर अंदाजे 55 मीटर उंच असून 9 मजल्यांचे आहे.

तसेच या मंदिरात असलेल्या खास विहिरिला सिंह कुंडम किंवा चोल गंगम म्हणतात. या मंदिराच्या भिंतींवर चंदेसुर अनुग्रह मूर्ती, नर्तक, सरस्वती देवी, अर्धनारीश्वर आणि शिव-पार्वती यांच्या मूर्ती कोरलेल्या आहेत. आणि मंदिरासमोर एका विशाल नंदीची भव्य मूर्ती आहे. या मंदिराची आश्चर्यकारक रचना अशी आहे की सूर्यकिरणे थेट गर्भगृहातील शिवलिंगावर पडतात, हे मंदिर पर्यटनासाठी आणि अध्यात्मासाठी एक शांत व नयनरम्य ठिकाण आहे.

2)Kaliyuga Varadaraja Perumal Temple,Kallankurichi –

कलियुग वरदराज पेरुमल मंदिर हे तामिळनाडू राज्याच्या अरियालूर जिल्ह्यातील, कल्लनकुरिची गावातील प्रसिद्ध जागृत देवस्थान आहे. हे मंदिर 250 वर्षे जुने असून भगवान विष्णू (पेरुमल) यांना समर्पित आहे.असे मानले जाते की, ‘मंगान’ (किंवा गोपालन पडैयाची) नावाच्या स्थानिक गावकऱ्याला स्वप्नात देवाचा दृष्टांत झाला आणि मिळालेल्या आदेशानुसार एका 12 फूट उंच लाकडी स्तंभाची (खांब) मुख्य दैवत म्हणून पूजा केली जाते. हा स्तंभ भगवान हनुमानाने धरलेला आहे असे मानले जाते. मंदिराचे बांधकाम विजयनगर आणि द्रविड शैलीत ग्रॅनाइट दगडांचा वापर करून करण्यात आले आहे. व मंदिरात एक सुंदर ‘दशावतार मंडपम’ आहे, जिथे भगवान विष्णूच्या 10 अवतारांची आकर्षक शिल्पे कोरलेली आहेत. तसेच या मंदिराच्या गर्भगृहाजवळ ‘महालींगमराम’ नावाचा एक पवित्र वृक्ष आहे, जो आजही हिरवागार आहे. दरवर्षी मार्च आणि एप्रिल महिन्यांत येथे 10 दिवसांचा मोठा उत्सव होतो. यामध्ये ‘थेरोत्तम’ हा भव्य रथ उत्सव पहाण्यासाठी लाखो भाविक येतात.

3)Karaivetti Bird Sanctuary-

करायवेटी पक्षी अभयारण्य हे तामिळनाडू राज्याच्या अरियालूर जिल्ह्यातील, निसर्गप्रेमी आणि पक्षी निरीक्षकांसाठी एक स्वर्गीय ठिकाण आहे. हे अभ्यारण्य सुमारे 454 हेक्टर परिसरामध्ये विस्तारलेले असून तामिळनाडूतील सर्वात मोठ्या गोड्या पाण्याचा तलावांपैकी एक आहे. या दलदलीच्या आणि पाणथळ क्षेत्राचे जागतिक महत्त्व लक्षात घेऊन 31 जानेवारी 2025 रोजी हे ठिकाण आंतरराष्ट्रीय ‘रामसर साईट’ म्हणून घोषित केले आहे. या सिंचन तलावाला मेट्टूर धरणातून आणि पावसातून पाणी मिळते. कराइवेट्टी अभ्यारण्य हे स्थलांतरित पक्ष्यांसाठी एक मुख्य केंद्र आहे. येथे पक्ष्यांच्या 188 पेक्षा जास्त प्रजातींची नोंद झाली आहे, हिवाळ्यात येथे जगभरातून हजारो पक्ष्यांचे मोठे कळप येतात. यामध्ये प्रामुख्याने बार-हेडेड गूज, पांढरे बगळे नॉर्दर्न पिनटेल आणि ऑस्प्रे यांसारखे पक्षी पाहायला मिळतात.

4)Field Fossil Museum –

जिवाश्म संग्रहालय हे तामिळनाडूच्या अरियालूर जिल्ह्यातील, वरणावासी येथील भारतातील एक प्रमुख आणि अद्वितीय संग्रहालय आहे. या भागात हजारो वर्षांपूर्वी समुद्र असल्यामुळे सागरी जीवांचे अवशेष मोठ्या प्रमाणावर आढळतात. हे संग्रहालय 120 एकरच्या ‘बॅडलँड्स’ म्हणजेच खडकाळ आणि घळींनी युक्त अशा नैसर्गिक भूप्रदेशात पसरलेले असून या संग्रहालयाची इमारत 5,200 चौरस फूट क्षेत्रावर भूमिगत आणि मेझानाइन स्तरावर बांधण्यात आली आहे. या संग्रहालयात प्री-कॅम्ब्रियन, जुरासिक आणि क्रिटेशियस कालखंडातील अतिशय दुर्मिळ जीवाश्म, खडक आणि खनिजे पाहायला मिळतात. तसेच येथे टायटॅनोसॉरस व डायनासोरचे कोट्यवधी वर्षे जुने जीवाश्म अंडे हे या संग्रहालयाचे प्रमुख आकर्षण आहे. याशिवाय येथे विविध समुद्री प्राण्यांचे 9 पेक्षा जास्त प्रकारचे जीवाश्म आणि प्राचीन लाकडांचे अवशेष जतन केले आहेत.

Visit our website: allindiajourney.com

5)Thirumazhapadi Vaidyanathaswami Temple-

थिरुमझापाडी वैद्यनाथस्वामी मंदिर हे तामिळनाडूच्या अरियालूर जिल्ह्यातील, अत्यंत प्राचीन व स्वयंभू शिव मंदिर आहे. 2000 वर्ष जुने हे मंदिर कोल्लीडम नदीच्या किनाऱ्यावर वसलेले असून येथे भगवान शिवाची ‘वैद्यनाथस्वामी’ रूपात पूजा केली जाते. आणि शिवशक्तीच्या रूपात येथे देवी पार्वतीचे ‘सुंदरांबिकाई’ आणि ‘बाळांबिकाई’ अशी दोन स्वतंत्र मंदिरे आहेत. या मंदिराचे राजगोपुरम सात मजली असून दुसरे गोपुरम पाच मजली आहे. आणि मंदिरामध्ये 100 खांबांचा भव्य हॉल व सुंदर भित्तीचित्रे आहेत. तसेच मंदिराच्या आवारात ब्रह्मदेवाच्या मूर्तीसमोर 4 नंदी एकत्र बसलेले पाहायला मिळतात. हे मंदिर दरवर्षी तमिळ ‘पंगुनी’ महिन्यात (मार्च-एप्रिल) होणाऱ्या नंदीकेश्वरार थिरुकल्याणम (नंदीचा विवाह सोहळा) या उत्सवासाठी जगप्रसिद्ध आहे. तसेच या मंदिर परिसरात तमिळ संत तिरुवल्लुवर यांचा 750 किलो वजनाचा भव्य कांस्य पुतळा आहे.

6)Elakurichi-

इलाकुरीची हे तामिळनाडूच्या अरियालूर जिल्ह्यातील एक ख्रिश्चन बांधवांसाठी एक ऐतिहासिक आणि प्रसिद्ध तीर्थक्षेत्र म्हणून ओळखले जाणारे गाव आहे. हे गाव कावेरी नदीच्या सुपीक प्रदेशात असल्याने येथे हिरवीगार शेते आणि शांत, निसर्गरम्य वातावरण पाहायला मिळते. तसेच हे प्राचीन ठिकाण चमत्कारिक समजल्या जाणाऱ्या ‘अदैकला माथा’ कॅथोलिक चर्चसाठी प्रसिद्ध आहे. या प्राचीन चर्चची स्थापना 1711 मध्ये इटलीहून आलेले प्रसिद्ध कॅथोलिक मिशनरी कॉन्स्टान्झो बेस्ची (‘वीरमामुनिवर’) यांनी केली होती. त्यांनी या भागात ख्रिश्चन धर्माचा प्रसार केला. हे चर्च ‘अदैकला माथा’ म्हणजेच मदर्स मेरीला (व्हर्जिन मेरी) समर्पित आहे. वीरमामुनिवर यांनी मदर मेरीच्या आशीर्वादाने अरियालूरचे राजे ‘अरंगप्पा मळवरायर’ यांचा असाध्य आजार बरा केला होता. व राजाने कृतज्ञता म्हणून या चर्चला 175 एकर जमीन देणगी म्हणून दिली होती. या तीर्थक्षेत्राच्या पवित्र तलावाच्या मध्यभागी मदाम मेरीचा 53 फूट उंच पितळेचा भव्य पुतळा आहे.

7)Kodandaramaswamy Temple, Ariyalur-

कोदंडरमा स्वामी मंदिर हे तामिळनाडूच्या अरियालूर जिल्ह्यातील, एक अत्यंत प्राचीन वैष्णव मंदिर आहे. हे मंदिर साधारण 1500 वर्षे जुने असून मंदिराचे आराध्य दैवत भगवान विष्णू (श्रीनिवास पेरुमाळ / व्यंकटेश पेरुमाळ) आहे व त्यांचे तोंड पूर्वेकडे आहे. आणि मंदिराच्या आवारात भगवान श्रीराम, माता सीता आणि लक्ष्मण यांचे स्वतंत्र गर्भगृह आहे. यामुळे या मंदिराला ‘कोदंडरमा स्वामी मंदिर’ म्हणून ओळखले जाते. या मंदिराची उभारणी पल्लव राजघराण्याच्या काळातील मानली जाते. व चोल राजांच्या काळात या मंदिराचा जिर्णोद्धार करण्यात आला. मंदिराच्या प्रवेशद्वारावर 6 मजली भव्य राजगोपुरम असून मंदिराला मोठी तटबंदी आहे. तसेच येथील दशावतार मंडपाच्या दोन्ही बाजूंना 6 फुटांपेक्षा जास्त उंचीचे, भगवान विष्णूंच्या दशावतारांचे सुंदर नक्षीकाम केलेले खांब आणि मूर्ती आहेत. व भगवान नरसिंहांची चार वेगळी रूपे (लक्ष्मी नरसिंह, योग नरसिंह, हिरण्यवध नरसिंह आणि प्रल्हाद नरसिंह) ही शिल्प कोरलेली आहेत.

8)Udayarpalayam Palace-

उदयरपालयम पॅलेस हा तामिळनाडूच्या अरियालूर जिल्ह्यातील, एक अत्यंत देखणा आणि ऐतिहासिक राजवाडा आहे. हा राजवाडा दक्षिण भारतीय धर्मनिरपेक्ष वास्तुकलेचा उत्कृष्ट नमुना असून 600 वर्षांपूर्वी विजयनगर साम्राज्याच्या काळात आणि त्यानंतर उदयरपालयम प्रदेशावर राज्य करणाऱ्या स्थानिक जमीनदारांनी बांधला होता. हा राजवाडा एकूण 32 एकर परिसरात असून, मुख्य इमारत 5 एकर जागेवर आहे. हा राजवाडा दिसायला मदुराईच्या प्रसिद्ध ‘तिरुमलाई नायककर महाल’ सारखाच वाटतो, मात्र आकार आणि उंचीने थोडा लहान आहे. आणि राजवाड्यात सुमारे 60 पेक्षा जास्त खोल्या आणि भव्य हॉल आहेत, ज्यामध्ये: लक्ष्मी विलासम:, कृष्ण विलासम:, विवाह मंडप: आहे. तसेच या वास्तू मधील लाकडी आणि दगडी खांबांवरील कोरीव काम अत्यंत समृद्ध आणि आकर्षक आहे. सध्या हा राजवाडा काहीसा जीर्ण अवस्थेत आहे, परंतु आजही जमीनदारांचे वंशज या परिसरात वास्तव्यास आहेत. या राजवाड्याच्या जवळच 1400 वर्षे जुने ‘श्री पायरनीश्वरर मंदिर’ आहे.

9)Shree Payaraneeswarar Temple-

श्री पयारणेश्वर मंदिर हे तमिळनाडूच्या अरियालूर जिल्ह्यातील उदयारपालम येथील 1400 वर्षे जुने प्राचीन शिवमंदिर आहे. भगवान शंकराला तमिळमध्ये ‘पयारणेश्वर’ किंवा ‘पयारणेनाधर’ आणि संस्कृतमध्ये ‘मुरकबूरीश्वरार’ म्हटले जाते. येथील देवीचे नाव तमिळमध्ये ‘नारूमलार पूंगुझल नायगी’ आणि संस्कृतमध्ये ‘शकुंतलंबिगै’ आहे. आणि येथील गणपतीला ‘विल वलैथा पिल्लयार’ म्हणतात. मंदिराच्या आवारात मध्यभागी मंडप असलेले एक विशाल मंदिर तलाव आहे. प्राचीन कथेनुसार, एका व्यापाऱ्याने मिरी घेऊन जात असताना त्याने मिरीऐवजी कडधान्य (तमिळमध्ये ‘पायर’) असल्याचे खोटे सांगितले. पुढे गेल्यावर त्याची सर्व मिरी खरोखरच कडधान्यात बदलली. ही शिवाचीच शिक्षा आहे हे समजल्यावर त्याने येथे येऊन क्षमा मागितली आणि प्रार्थना केली, तेव्हा शिवाने पुन्हा त्या कडधान्याचे मिरीत रूपांतर केले. या ‘पायर’ (कडधान्य) शब्दावरूनच देवाचे नाव ‘पयारणेश्वर’ पडले.

10)Choleeswarar Temple-

चोलीश्वरर मंदिर हे तामिळनाडूच्या अरियालूर जिल्ह्यातील उदयर्पलायम तालुक्यात विक्रमंगलम गावातील अत्यंत प्राचीन शिव मंदिर आहे. या मंदिरात भगवान शिव ‘श्री चोलीश्वरर’ (किंवा सोझिसवरार) या लिंग रूपात विराजमान असून त्यांना ‘राजेंद्र चोलीश्वरर’ असेही संबोधले जाते. येथील देवी पार्वती ‘श्री पूरण चंद्र कलांबिका’ या नावाने स्वतंत्र दर्शन देतात. 11 व्या शतकाच्या सुरुवातीला, महान चोल सम्राट राजेंद्र चोल प्रथम यांच्या काळात हे मंदिर बांधले गेले असल्याचे मानले जाते. मंदिराच्या भिंतींवर आणि चोल काळातील अनेक प्राचीन शिलालेख आहेत. विक्रमंगलम या गावात चोळ काळातील सुंदर जैन आणि बुद्ध शिल्पे जतन करून ठेवलेली आहेत.

11)Gangajadeshwar temple-

गंगाजडेश्वरर मंदिर हे तामिळनाडूच्या अरियालूर जिल्ह्यातील, उदयमपालयम तालुक्यात गोविंदपुथूर गावातील अत्यंत पवित्र शिव मंदिर आहे. हे मंदिर 7 व्या शतकापासून अस्तित्वात असल्याचे सांगितले जाते. पल्लव राजे महेंद्रवर्मा यांच्या काळात होऊन गेलेले प्रसिद्ध तामिळ संत अप्पर आणि संबंदर यांनी आपल्या ‘तेवारम’ या पवित्र ग्रंथातील भजनांमध्ये या मंदिराचे आणि देवतेचे गुणगान केले आहे. हे मंदिर द्रविडीयन वास्तुकलेचा एक उत्कृष्ट नमुना असून मंदिराच्या दगडी भिंतींवर आणि खांबांवर कोरलेली चोल काळातील शिल्पे अतिशय सुंदर आहेत. यामध्ये भगवान शिवाचे विविध रूप आणि माता दुर्गा यांची सिंहावर बसलेली मूर्ती आहे. तसेच येथील मंदिर परिसर अत्यंत शांत आणि आध्यात्मिक असून येथे चोल, पांड्य आणि विजयनगर साम्राज्यातील प्राचीन शिलालेख आणि चोल काळातील उत्कृष्ट कांस्यमूर्ती आहेत.

12)Arulmigu Subramaniyaswamy Temple-

अरुल्मिगु सुब्रमण्य स्वामी मंदिर हे तमिळनाडूच्या अरियालूर जिल्ह्यातील पोय्यूर गावातील प्राचीन मंदिर आहे. हे मंदिर भगवान शिव आणि पार्वती यांचे पुत्र भगवान कार्तिकेय ( मुरुगन किंवा सुब्रमण्य स्वामी) यांना समर्पित आहे. या मंदिरात भगवान सुब्रमण्य स्वामी (भगवान मुरुगन) हे पोय्यूर आणि आसपासच्या गावांमधील भाविकांचे मुख्य श्रद्धास्थान आहे. भगवान सुब्रमण्य स्वामी येथे भक्तांचे संकट दूर करणारे आणि त्यांचे रक्षण करणारे देवता म्हणून पूजले जातात. तमिळ परंपरेनुसार येथे स्कंद षष्ठी, थाईपुसम आणि पंगुनी उथिरम हे सण मोठ्या उत्साहात साजरे केले जातात.

13)Jayankondam Varatharaja Perumal Temple-

जयकोंडम वरदराजा पेरुमल मंदिर हे तामिळनाडूच्या अरियलूर जिल्ह्यातील जयकोंडम तालुक्यातील भगवान विष्णू (वरदराजा पेरुमल) चे मंदिर आहे. या मंदिरात वरदराजा पेरुमल यांची सुंदर मूर्ती विराजमान असून या भव्य मंदिराची निर्मिती 9 व्या शतकात चोल राजघराण्याने केली होती. तसेच या मंदिराचे भव्य गोपुरम आहे, ज्यावर हिंदू पौराणिक कथांमधील देवांच्या सुंदर कोरीव मूर्ती कोरलेल्या आहेत. आणि मंदिराच्या आवारात सुंदर कोरीव खांब असलेले मंडप आहे. मंदिर परिसरात एक पवित्र पाण्याचा तलाव (पुष्करिणी) आहे, ज्याच्या पाण्याला अत्यंत पवित्र मानले जाते.

14)Shri Karkodeswarar, Kamarasavalli-

श्री कार्कोटेश्वरर मंदिर (श्री सुंदरेश्वर मंदिर) हे तमिलनाडुच्या अरियालूर जिल्ह्यातील प्राचीन शिव मंदिर आहे. चोल राजवंशाच्या काळातील हे मंदिर अप्रतिम वास्तुकलेसाठी आणि धार्मिक महत्त्वासाठी प्रसिद्ध आहे. या मंदिरात भगवान शिव ( सुंदरेश्वरर किंवा कार्कोटेश्वरर) आणि माता पार्वती (देवी बालांबिका)म्हणून पूजले जाते. हे मंदिर 10 व्या शतकात चोल राजे यांच्या काळात बांधले गेले. मंदिराच्या भिंतींवर सुंदर चोल, होयसळ राजांच्या काळातील 41 पेक्षा जास्त शिलालेख आढळतात. आणि पौराणिक कथेनुसार, सर्पांचा राजा ‘कार्कोटक’ याने येथे भगवान सुंदरेश्वराची कठोर तपश्चर्या करून शापातून मुक्ती मिळवली होती. त्यामुळे या मंदिराला ‘कार्कोटेश्वरर मंदिर’ हे नाव पडले. येथे पूजा केल्याने कालसर्प दोष आणि राहू-केतू दोषांपासून मुक्ती मिळते, अशी भाविकांची श्रद्धा आहे.

15)Maligai Medu-

मालिकाई मेडू / मगलीमेडू हे तामिळनाडूच्या अरियालूर जिल्ह्यातील गंगाईकोंडा चोलापुरमजवळील महत्त्वाचे चोलकालीन ऐतिहासिक आणि पुरातत्व उत्खनन स्थळ आहे. चोल राजा राजेंद्र चोल प्रथम याने उत्तर भारतातील विजयानंतर ‘गंगाईकोंडा चोलपुरम’ ही राजधानी वसवली होती. मालिकाई मेडू’ या तामिळ शब्दाचा अर्थच ‘राजवाड्याचा ढिगारा’ असा होतो, शिलालेखांनुसार, जेथे एकेकाळी भव्य चोल राजवाडे अस्तित्वात होते. नंतरच्या काळात परकीय आक्रमणांमध्ये ते नष्ट झाले. तामिळनाडू राज्य पुरातत्व विभागाने या ठिकाणी 1980 च्या दशकापासून सुरू केलेल्या उत्खननात अनेक महत्त्वपूर्ण गोष्टी समोर आल्या आहेत. त्यामध्ये चोलकालीन भव्य राजवाड्याच्या विटांच्या भिंती आणि प्राचीन सांडपाण्याची व्यवस्था, 1000 वर्षांपेक्षा जुने छताचे नळके, तांबे आणि सोन्याच्या बांगड्या, मातीची भांडी, हस्तिदंतावरील कोरीव काम आणि जुनी नाणी सापडली आहेत.

16)Keezhayur Twin Temples, Pazhuvur-

दुहेरी मंदिरे ही तामिळनाडूच्या अरियालूर जिल्ह्यातील, कीझैयुर येथील, 9 व्या शतकातील चोल काळातील स्थापत्यकलेचा एक उत्कृष्ट नमुना असलेली प्राचीन शिव मंदिर आहेत. स्थानिक भाषेत ‘इरट्टै कोइल’ (दुहेरी मंदिरे) म्हणून ओळखले जाणारे हे मंदिर संकुल इ.स. 884 मध्ये चोल सम्राट आदित्य प्रथम याच्या कारकिर्दीत बांधले गेले. आणि हे मंदिर प्रसिद्ध तंजावरच्या बृहदीश्वर मंदिरापेक्षाही जुने आहे. या मंदिरांची निर्मिती मध्ययुगीन चोल साम्राज्याचे मांडलिक राजे पळुवेड्डरैयर घराण्यातील राजे कुमारन कंदन आणि कुमारन मरवन यांनी केली होती. या मंदिर परिसराला ‘अवनि गंधर्व ईश्वरम’ या नावाने ओळखले जात होते. या पश्चिमाभिमुख मंदिर परिसरामध्ये महादेवाचे दोन स्वतंत्र गर्भगृह (मंदिरे) शेजारी-शेजारी आहेत, म्हणून यांना ‘जुळी मंदिरे म्हटले जाते. सध्या हे मंदिर भारतीय पुरातत्व सर्वेक्षण अंतर्गत संरक्षित स्मारक आहे.

17)Sundareswarar Temple, Mela Pazhuvur-

श्री मीनाक्षी सुंदरेश्वर मंदिर हे तामिळनाडूच्या अरियालूर जिल्ह्यातील, मेला पझुवूर येथील प्राचीन शिवमंदिर आहे. हे मंदिर 10 व्या शतकात मध्ययुगीन चोल राजांचे मांडलिक असलेल्या पझुवेतरायर राजांनी बांधले होते. चोल काळात या स्थानाला ‘मन्नुपेरम् पझुवूर’ म्हटले जायचे. या मंदिरात भगवान शिव असून त्यांना श्री सुंदरेश्वरर म्हटले जाते. महादेवांसोबत येथे माता पार्वती श्री मीनाक्षी देवीच्या रूपात विराजमान आहेत. देवीचे स्वतंत्र मंदीर असून ते दक्षिण दिशेला तोंड करून आहे. शिलालेखांमध्ये या मंदिराचा उल्लेख ‘पहैविदै ईश्वर गृहम’ असा आढळतो. हे मंदिर मुख्य जमिनीच्या 3 फूट खोल भागात वसलेले असून मंदिराच्या प्रवेशद्वारावर 3 मजली राजगोपुरम आणि दोन द्वारपाल आहेत. तसेच मंदिराच्या प्रांगनामध्ये एक पवित्र विहीर (तीर्थम) आणि बिल्व वृक्ष आहे.

18)Theerkapureeswarar temple, Sennivanam-

श्री तीर्थापुरीश्वरर मंदिर हे तामिळनाडूच्या अरियालूर जिल्ह्यातील, सेंदुरई तालुक्यात सेन्नीवनम या गावातील प्राचीन शिवमंदिर आहे. हे मंदिर चोल राजवंशाच्या काळात बांधले गेले असून 1000 वर्षांपेक्षा जास्त जुने आहे. या मंदिरामध्ये भगवान शिव हे ‘श्री तीर्थापुरीश्वरर स्वामी’ आणि माता पार्वती ‘स्वर्णाम्बिगाई अम्बल’ रूपात विराजमान आहेत. येथे सर्वात जास्त विवाह पार पाडले जातात अशी भाविकांची श्रद्धा आहे. या मंदिराच्या परिसरात ‘पेरियायी कुळम’ आणि ‘चिन्नायी कुळम’ नावाची पवित्र तळी (कुंडे) आहेत. आख्यायिकेनुसार प्राचीन काळी एका राजाने या परिसरातील पावन पाण्याच्या स्रोताने स्नान करून स्वतःचे रोग बरे केले होते. त्यानंतर त्याने या ठिकाणी हे शिवालय उभारले आणि देवाला ‘तीर्थापुरीश्वरर’ असे नाव दिले, जे काळाच्या ओघात ‘दीर्घापुरीश्वरर’ झाले.

Visit the travel blog

1)तामिळनाडूच्या अरियालूर जिल्ह्यातील कीझैयुर येथील ‘दुहेरी मंदिरे’ कोणत्या चोल सम्राटाच्या कारकिर्दीत बांधली गेली होती?

‘दुहेरी मंदिरे’ ही इ.स. 884 मध्ये चोल सम्राट आदित्य प्रथम याच्या कारकिर्दीत बांधली गेली होती.

2)तामिळनाडूच्या अरियालूर जिल्ह्यातील ‘मालिकाई मेडू’ या चोलकालीन ऐतिहासिक स्थळाच्या नावाचा अर्थ काय आहे?

‘मालिकाई मेडू’ या तामिळ शब्दाचा अर्थ ‘राजवाड्याचा ढिगारा’ असा होतो, हे ठिकाण ‘गंगाईकोंडा चोलापुरम’ या राजधानीच्या राजवाड्याशी संबंधित आहे.

3)तामिळनाडूच्या अरियालूर जिल्ह्यातील श्री तीर्थापुरीश्वरर मंदिर कोणत्या काळातील स्थापत्यकलेचा उत्कृष्ट नमुना आहे?

श्री तीर्थापुरीश्वरर मंदिर हे चोल कालीन स्थापत्य कलेचे उत्कृष्ट प्राचीन शिवमंदिर आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
Scroll to Top