रामनाथपुरम जिल्ह्यातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे- 27 places to visit in Ramanathapuram district

भारतभ्रमंती या वेबसाईटवर पहा भारत देशातील प्रत्येक राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यातील पर्यटन स्थळांमध्ये, तामिळनाडू राज्यातील रामनाथपुरम जिल्ह्यातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे. रामनाथपुरम जिल्हा हा भारताच्या तामिळनाडू राज्यातील आग्नेय भागातील किनारपट्टीचा जिल्हा आहे. या जिल्ह्याला ‘रामनाद’ किंवा ‘मुगवई’ या नावाने ओळखले जाते. जगप्रसिद्ध तीर्थक्षेत्र व पवित्र चार धामांपैकी एक असलेले ‘रामेश्वरम’ आणि भारत आणि श्रीलंकेला जोडणारा ऐतिहासिक ‘राम सेतू’ या जिल्ह्यात असल्यामुळे या क्षेत्राला विशेष धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व आहे. ब्रिटीश काळात 1910 मध्ये मदुराई आणि तिरुनेलवेलीच्या काही भागांना एकत्र करून या जिल्ह्याची स्थापना करण्यात आली होती. 27 places to visit in Ramanathapuram district

पूर्वी हा भाग ‘मरावार’ राजांच्या अधिपत्याखाली होता. या जिल्ह्याच्या पूर्वेस पाल्क सामुद्रधुनी, दक्षिणेस मन्नारचे आखात, उत्तरेस शिवगंगा जिल्हा, ईशान्येला पुदुक्कोट्टाई, पश्चिमेस थुथुकुडी आणि वायव्येस विरुधुनगर जिल्हा आहे. या जिल्ह्याला मोठी किनारपट्टी लाभली असून वैगई नदी या जिल्ह्यातून वाहते. आणि येथील मन्नारचे आखात सागरी जैवविविधतेसाठी प्रसिद्ध आहे. येथील प्रमुख भाषा तमिळ आहे. मिरची उत्पादनात हा जिल्हा अग्रेसर आहे व येथे प्रामुख्याने मासेमारी व्यवसाय केला जातो.

27 places to visit in Ramanathapuram district

रामनाथपुरम जिल्ह्यातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे

1)Ramanathaswamy / Rameswaram Temple-

27 places to visit in Ramanathapuram district

रामेश्वरम / श्री रामनाथस्वामी मंदिर हे तामिळनाडू राज्यातील रामनाथपुरम जिल्ह्यातील, अत्यंत पवित्र व जगप्रसिद्ध तीर्थक्षेत्र आहे. हे मंदिर भगवान शिव यांना समर्पित असून 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक आणि भारतातील पवित्र चार धामांपैकी दक्षिण धाम म्हणून ओळखले जाते. येथील श्री रामनाथस्वामी मंदिर हे बंगालच्या उपसागराच्या काठावर 15 एकर जागेवर पसरलेले आहे व भव्य राजगोपुरम् साठी प्रसिद्ध आहे. रावणाचा वध केल्यानंतर लंकेतून परतताना भगवान श्रीरामाने स्वतः वाळूचे शिवलिंग तयार करून येथे शिवाची पूजा केली होती. द्रविडीयन शैलीतील या मंदिरात जगातील सर्वात लांब प्रदक्षिणा मार्ग आहे. आणि भव्य गोपुरम आणि कोरीव खांब हे या मंदिराचे मुख्य आकर्षण आहे. येथील मुख्य मंदिरात प्रवेश करण्यापूर्वी 22 पवित्र कुंडांमध्ये स्नान करण्याची प्रथा आहे. या पाण्यात स्नान केल्याने सर्व पापे नष्ट होतात अशी भाविकांची श्रद्धा आहे.

2)Agni Theertham Beach-

अग्नी तीर्थम हे तामिळनाडू राज्यातील रामनाथपुरम जिल्ह्यातील, पवित्र तीर्थक्षेत्र आहे. हे तीर्थक्षेत्र रामनाथस्वामी मंदिर परिसराबाहेर समुद्राच्या किनाऱ्यावर आहे. संस्कृतमध्ये ‘अग्नी’ म्हणजे आग आणि ‘तीर्थम’ म्हणजे पवित्र पाणी. प्रभू श्रीरामांनी रावणाचा वध केल्यानंतर ब्रह्महत्येच्या दोषातून मुक्त होण्यासाठी येथे समुद्रात स्नान करून भगवान शिवाची पूजा केली होती, अशी आख्यायिका आहे. तसेच, माता सीतेने अग्निपरीक्षा दिल्यानंतर अग्नी देवाने येथेच स्वतःचे पापक्षालन केले, म्हणून या जागेला ‘अग्नी तीर्थम’ असे नाव पडले.या समुद्रात गंगा, यमुना, सरस्वती, गोदावरी आणि नर्मदा या पवित्र नद्यांचे अंश आहेत, म्हणून याला ‘पाच नद्यांचे तीर्थ’ म्हणूनही श्रद्धेने पाहिले जाते. भाविक मंदिरात जाण्यापूर्वी या पवित्र पाण्यात स्नान करतात. तसेच येथे पूर्वजांच्या आत्म्याच्या शांतीसाठी ‘पिंडदान’ आणि ‘तर्पण’ सारखे विधी केले जातात. अमावस्या आणि पौर्णिमेच्या दिवशी येथे स्नान करणे अत्यंत शुभ मानले जाते.

Visit our website: allindiajourney.com

3)Kothanda Ramaswamy Temple-

कोदंडरामस्वामी मंदिर / कोठंडारामस्वामी मंदिर हे तामिळनाडू राज्यातील रामनाथपुरम जिल्ह्यातील, रामेश्वरम (पंबन) बेटावर वसलेले पवित्र धार्मिक तीर्थक्षेत्र आहे. येथे रामाने धनुष्य (कोदंडम) धारण केलेले आहे, त्यावरूनच या मंदिराला ‘कोदंडरामस्वामी’ हे नाव पडले. हे मंदिर 1000 वर्ष जुने असून या मंदिरात राम, लक्ष्मण, सीता, हनुमान आणि विभीषण यांच्या मूर्ती आहेत. येथे रावणाचा धाकटा भाऊ विभीषणाने राम आणि त्यांच्या वानरसेनेकडे आश्रय मागितला होता. व याच ठिकाणी श्रीरामाने विभीषणाला लंकेचा राजा म्हणून राज्याभिषेक केल्याचे सांगितले जाते. या मंदिराच्या भिंतींवर रामायणाची कथा सुंदर चित्रांतून रेखाटलेली असून येथील उल्लेखनीय गोष्ट म्हणजे 1964 च्या चक्रीवादळात धनुष्कोडी पूर्णपणे वाहून गेले, पण त्या आपत्तीतून हे मंदिर अबाधित राहिले. दरवर्षी तमिळ ‘आनी’ महिन्यात (जून ते जुलै दरम्यान) ‘विभीषण पट्टाभिषेकम’ या मंदिरातील सर्वात प्रसिद्ध उत्सव आहे.

4)Panchmukhi Hanuman Temple-

पंचमुखी हनुमान मंदिर हे तामिळनाडू राज्याच्या रामनाथपुरम जिल्ह्यातील, अत्यंत प्राचीन व धार्मिक तीर्थक्षेत्र आहे. येथे भगवान हनुमानाची पाच मुखी मूर्ती आहे, ज्यामध्ये मध्यभागी हनुमान आणि इतर बाजूंना नरसिंह, वराह, गरुड आणि हयग्रीव या देवतांचे चेहरे आहेत. या मंदिरातील भगवान हनुमानाचे हे रूप रावणाचा भाऊ अहिरावणाचा वध करण्यासाठी धारण केले होते अशी मान्यता आहे. तसेच या मंदिराचे सर्वात मोठे आकर्षण म्हणजे रामायणातील ‘राम सेतू’ बांधण्यासाठी वापरले जाणारे दगड हे दगड वजनाने अतिशय हलके असून आजही पाण्यावर तरंगतात. 1964 मधील धनुषकोडी येथील भीषण वादळानंतर, श्री राम आणि देवी सीता यांच्या मूळ मूर्ती या मंदिरात सुरक्षित स्थलांतरित करून स्थापित केल्या आहेत.

5)Ramar Padam, Idayanvayal, Pudukkottai-

रामर पदम् हे तामिळनाडू राज्याच्या रामनाथपुरम जिल्ह्यातील, अत्यंत पवित्र आणि धार्मिक स्थळ आहे. हे मंदिर रामेश्वरम बेटावरील सर्वात उंच ‘गंधमादन पर्वतम्’ या वालुकामय टेकडीवर वसलेले आहे. ‘रामर पदम्’ म्हणजे श्रीरामाच्या पावलांचा ठसा. या ठिकाणी एका चक्रावर प्रभू श्रीरामांच्या पायांचे ठसे (पादुका) उमटलेले आहेत, ज्यांची मंदिरात पूजा केली जाते. पौराणिक कथेनुसार, माता सीतेचा शोध घेत असताना प्रभू श्रीरामांनी याच पर्वतावर उभे राहून लंकेच्या दिशेने पाहणी केली होती आणि युद्धाची रणनीती आखली होती. तसेच माता सीतेचा शोध घेण्यासाठी श्री हनुमानाने याच टेकडीवरून लंकेच्या दिशेने मोठी झेप घेतली होती. या टेकडीवरून रामेश्वरम बेट, विस्तीर्ण हिंदी महासागर, बंगालचा उपसागर आणि धनुषकोडीचा परिसर अतिशय सुंदर दिसतो.

6)Jada Theertham-

जडा तीर्थम किंवा जटा तीर्थम, हे तामिळनाडू राज्याच्या रामनाथपुरम जिल्ह्यातील, अत्यंत पवित्र धार्मिक स्थळ आहे. येथील जडा तीर्थम हे रामेश्वरमपासून धनुषकोडीकडे जाणाऱ्या मार्गावरील एक शांत आणि पवित्र सरोवर आहे. पौराणिक कथेनुसार रावणाचा वध केल्यानंतर भगवान श्रीरामांनी रामेश्वरममध्ये शिवपूजा करण्यापूर्वी स्वतःचे जटा (केस) या तीर्थात धुतले होते आणि शुद्धीकरण केले होते, म्हणून याला ‘जडा तीर्थम’ (किंवा जटा तीर्थम) म्हणतात.

7)Villoondi Theertham-

विल्लूंडी तीर्थम हे तामिळनाडू राज्याच्या रामनाथपुरम जिल्ह्यातील, अत्यंत पवित्र धार्मिक स्थळ आहे. हे ठिकाण समुद्राच्या मध्यभागी असलेल्या गोड पाण्याच्या विहिरीसाठी प्रसिद्ध आहे. येथे चारी बाजूंनी समुद्राचे खारे पाणी असतानाही या विहिरीचे पाणी अत्यंत गोड आणि शुद्ध आहे. रावणवध करून देवी सीतेला लंकेतून परत आणल्यानंतर या ठिकाणी भगवान रामाने शिवलिंगाची स्थापना केली होती. त्यावेळी माता सीतेला तहान लागली असता, श्रीराम यांनी समुद्रात बाण मारला. त्यातून गोड पाण्याचा झरा निर्माण झाला. तमिळ भाषेत ‘विल्लू’ म्हणजे बाण आणि ‘ऊंडी’ म्हणजे छेदलेली जागा. या समुद्रातील विहिरीपर्यंत जाण्यासाठी 120 फुटांचा पादचारी पूल आहे. व जवळच ‘त्र्यंबकेश्वर’ नावाचे शिवमंदिर आहे.

8)Lakshmana Theertham-

लक्ष्मण तीर्थ हे तामिळनाडू राज्याच्या रामनाथपुरम जिल्ह्यातील, पवित्र धार्मिक स्थळ आहे. येथे भगवान श्रीरामांचे बंधू लक्ष्मण यांचे भव्य मंदिर आणि पवित्र तलाव आहे. पौराणिक कथेनुसार लंकेच्या युद्धात रावणाचा मुलगा इंद्रजित (मेघनाद) याचा वध केल्यानंतर, झालेल्या पापाच्या प्रायश्चित्तासाठी भगवान लक्ष्मणाने या ठिकाणी शिवलिंगाची स्थापना करून पूजा केली होती. आणि पूजा करण्यापूर्वी त्यांनी या कुंडात स्नान केले होते, त्यामुळे भाविकांची अशी श्रद्धा आहे की, येथे स्नान केल्याने सर्व पापे धुऊन निघतात. हे मंदिर द्राविड वास्तुकलेत बांधलेले असून मंदिराच्या भिंतींवर रामायणातील प्रसंग कोरलेले आहेत. येथील तलावाच्या मध्यभागी एक सुंदर मंडप आहे. ‘थाईपुसम’ उत्सवादरम्यान येथे तरंगत्या रथाची मोठी मिरवणूक काढली जाते.

9)Devipattinam navagraha temple-

देवीपट्टीनम नवग्रह मंदिर हे तामिळनाडू राज्याच्या रामनाथपुरम जिल्ह्यातील, बंगालच्या उपसागरात वसलेले पवित्र धार्मिक स्थळ आहे. बंगालच्या उपसागरात (समुद्रात) वसलेले हे मंदिर ‘नवबाशनम’ किंवा ‘नवग्रह मंदिर’ म्हणूनही ओळखले जाते. येथे नऊ ग्रहांची पूजा केली जाते. प्रभू श्रीरामाने श्रीलंकेवर विजय मिळवण्यासाठी येथे नवग्रहांची स्थापना केली होती. येथे असणाऱ्या नवग्रहांच्या मूर्ती या ‘नवा पाषाण’ (नऊ विशेष औषधी घटकांनी बनवलेले दगड) आहेत. तसेच महिषासुर मर्दिनी देवी (उलागनायकी अम्मान) हिने या ठिकाणी महिषासुर राक्षसाचा वध केला होता, अशीही अख्यायिका आहे. समुद्रातील पाण्याच्या पातळीनुसार हे नवग्रह स्तंभ दिसतात. पितृ दोष निवारण आणि नवग्रह दोष किंवा शनी, राहू-केतूचे दोष आहेत, ते भाविक येथे दर्शनासाठी येतात.

10)Sri Adhi Jagannatha Perumal Temple-

श्री आदि जगन्नाथ पेरुमल / दर्भशयनम् मंदिर हे तामिळनाडू राज्याच्या रामनाथपुरम जिल्ह्यातील, भगवान विष्णूच्या 108 दिव्य देशम (पवित्र धाम) पैकी एक धार्मिक स्थळ आहे. प्रभू रामाने लंकेवर आक्रमण करण्यापूर्वी समुद्राचा मार्ग मिळवण्यासाठी दर्भाच्या (कुशा) गवतावर शयन करून तपश्चर्या केली होती, म्हणून या गावाला ‘तिरुप्पुल्लाणी’ आणि मंदिराला ‘दर्भशयनम्’ असे नाव पडले आहे. या विशाल मंदिर संकुलात तीन मंदिरे आहेत त्यामध्ये आदि जगन्नाथ पेरुमाळ, दर्भशयन रामर – येथे प्रभू रामचंद्रांची दर्भाच्या गवतावर शयन (झोपलेल्या) मुद्रेतील भव्य मूर्ती आहे. आणि पट्टाभिरामम् येथे श्रीराम, सीतामाता आणि लक्ष्मण यांच्या उभ्या मूर्ती येथे आहेत. या मंदिराच्या आवारात अनेक वर्ष जुने पिंपळाचे झाड आहे, जेथे विष्णूने ऋषींना दर्शन दिले होते.

11)Dhanushkodi-

धनुषकोडी हे तामिळनाडू राज्याच्या रामनाथपुरम जिल्ह्यातील, पांबन बेटाच्या आग्नेय टोकाला वसलेले एक अद्वितीय आणि ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाचे ठिकाण आहे. हे ठिकाण ‘भारताचा शेवटचा रस्ता’ म्हणून ओळखले जाते. रामायणात या ठिकाणाचा विशेष उल्लेख आहे. भगवान रामाने लंकेला जाण्यासाठी याच ठिकाणाहून ‘रामसेतू’ बांधण्यास सुरुवात केली होती. ‘धनुषकोडी’ या नावाचा अर्थ ‘धनुष्याचा शेवट’ असा होतो. 22 डिसेंबर 1964 रोजी आलेल्या महाभयंकर चक्रीवादळामुळे हे शहर पूर्णपणे उद्ध्वस्त झाले आणि तेव्हापासून हे ठिकाण ‘भूत शहर’ म्हणून ओळखले जाते. आजही येथे उद्ध्वस्त झालेल्या रेल्वे स्थानक, चर्च आणि इतर इमारतींचे अवशेष पर्यटकांना पाहता येतात. धनुषकोडी हे रामेश्वरमपासून साधारणपणे 20 किलोमीटर अंतरावर आहे.

12)Shri Pagampiriyal Temple –

श्री पगमपिरियल मंदिर हे तामिळनाडूच्या रामनाथपुरम जिल्ह्यातील तिरुवेट्टीयूर येथील प्रसिद्ध आणि प्राचीन मंदिर आहे. हे मंदिर प्रामुख्याने कर्करोग आणि इतर असाध्य आजारांपासून मुक्ती मिळवून देणारे एक महत्त्वाचे श्रद्धास्थान मानले जाते. या मंदिरात असणाऱ्या मातेला “मरुथुवाचि अम्मन” असेही संबोधले जाते. असे मानले जाते की माता भक्तांचे सर्व आजार दूर करते. भगवान विष्णूने रावणाचा वध केल्यामुळे लागलेल्या ब्रह्महत्या दोषातून मुक्त होण्यासाठी येथे शिव आणि शक्तीची पूजा केली होती. या मंदिरात भगवान शिव ‘पझम पुत्त्रू नाथर’ किंवा ‘वल्मीकनाथर’ या नावाने स्वयंभू लिंग स्वरूपात विराजमान आहेत.अंबाळ (देवी): देवी पार्वती येथे ‘बागम्पिरियाळ’ या नावाने पूजली जाते, ज्याचा अर्थ ‘कधीही शंकरापासून वेगळी न होणारी’ असा आहे. तिला प्रेमाने ‘मरुथुवची अम्मन’ (डॉक्टर देवी) म्हटले जाते. या मंदिरात भाविक गुरुवारच्या रात्री मंदिरात संपूर्ण रात्र थांबून, दुसऱ्या दिवशी सकाळी मंदिरा समोर असलेल्या वासुकी तीर्थात (तलाव) पवित्र स्नान करतात.

13)Mangalanatha Swamy Temple, Uthirakosamangai-

मंगलनाथ स्वामी मंदिर हे तामिळनाडूच्या रामनाथपुरम जिल्ह्यातील, उथिराकोसमंगाई गावातील प्राचीन शिव मंदिर आहे. 3000 वर्षे जुने हे मंदिर सुमारे 20 एकर परिसरामध्ये पसरलेले असून, यात भव्य द्रविड वास्तुकला आहे. व मंदिराला 7 मजली मुख्य राजगोपुरम (प्रवेशद्वार) आहे. येथे शिवाने पार्वतीला वेदांची रहस्ये सांगितल्याची आख्यायिका आहे. येथील शिवलिंग हे स्वयंभू असून या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे येथील 6 फूट उंच नटराजाची मूर्ती, पूर्णपणे एकाच मौल्यवान पाचू धातूपासून कोरलेली आहे. आणि या मूर्तीवर वर्षभर चंदनाचा लेप लावलेला असतो. या मंदिराच्या खांबांवर ‘याली’ (सिंह आणि हत्तीचे मिश्रण असलेला पौराणिक प्राणी) च्या भव्य मूर्ती कोरलेल्या आहेत. या मूर्तींच्या तोंडात एक दगडी चेंडू आहे. हा चेंडू तोंडात फिरवता येतो, पण तो बाहेर काढता येत नाही, जे प्राचीन भारतीय शिल्पकलेचे उत्कृष्ट उदाहरण आहे. मंदिर परिसरात सहस्र लिंगम हॉलमध्ये 1,008 छोटे शिवलिंग स्थापित केलेले आहेत. दरवर्षी जानेवारी महिन्यात “अरुद्र दर्शन’ हा मोठा उत्सव या मंदिरात साजरा होतो.

14)Erwadi Dargah, Keelakarai-

एरवाडी दर्गा हा तामिळनाडूच्या रामनाथपुरम जिल्ह्यातील प्रसिद्ध इस्लामिक तीर्थक्षेत्र आहे. हे ठिकाण कीलाकराई तालुक्यात समुद्रकिनाऱ्याजवळ वसलेले असून हा दर्गा 12 व्या शतकातील सुफी संत हजरत कुतुब सुलतान सय्यद इब्राहिम शहीद बादशहा यांचे पवित्र समाधी स्थळ आहे. या दर्ग्यातील माती मदिनाच्या पवित्र मातीने मिश्रित आहे, ज्यामुळे या ठिकाणाला आध्यात्मिक महत्त्व आहे. तसेच हा दर्गा तामिळनाडूतील धार्मिक एकात्मतेचे प्रतीक आहे. येथे मुस्लिम, हिंदू, ख्रिश्चन आणि इतर सर्व धर्मांचे लाखो भाविक दर्शनासाठी येतात. या दर्ग्यात मानसिक आजार, नैराश्य किंवा वाईट शक्तींचा त्रास असलेले लोक येथे मोठ्या संख्येने बरे होण्याच्या श्रद्धेने येतात. दर्गा परिसरात 250 फूट उंच भव्य मिनार आहे, व ‘संतानकुडू उरूस उत्सव’ हा दर्ग्याचा सर्वात मोठा वार्षिक उत्सव आहे, जो इस्लामिक महिन्यातील ‘धू अल-किदाह’ मध्ये साजरा केला जातो.

15)Ramalinga Vilasam Palace-

रामलिंग विलास राजवाडा हा तामिळनाडूच्या रामनाथपुरम जिल्ह्यातील, ऐतिहासिक राजवाडा आहे. हा राजवाडा ‘सेतुपती’ राजांचे निवासस्थान आहे. सुमारे इ.स. 1674 ते 1710 दरम्यान रामनाडचे प्रसिद्ध राजे किझवान सेतुपती यांनी हा राजवाडा बांधला होता. या राजवाड्याची वास्तुकला द्रविड आणि इंडो-सारसेनिक शैलीचा मिलाफ आहे व राजवाड्याचे मुख्य आकर्षण म्हणजे येथील भिंती आणि छतांवर नैसर्गिक रंगांचा वापर करून कोरलेली दुर्मिळ भित्तिचित्रे आहेत. या चित्रांमध्ये रामायण, भागवत पुराण यांमधील प्रसंग, सेतुपती राजांचे जीवन, तंजावरच्या मराठा राजांसोबत झालेली युद्धे यांचे अतिशय सुंदर चित्रण आढळते. सध्या हा राजवाडा तामीळनाडू सरकारच्या पुरातत्व विभागाच्या अंतर्गत संरक्षित आहे. व राजवाड्याच्या एका भागात रामलिंग विलासम संग्रहालय आहे. ज्यामध्ये सेतुपती राजांची जुनी तैलचित्रे, प्राचीन शस्त्रे, प्राचीन वस्तू, तलवारी आणि ढाली आहेत. व या राजवाड्याला लागूनच राजांचे कुलदैवत असलेले प्रसिद्ध राजराजेश्वरी मंदिर आहे.

16)Pamban Bridge-

पांबन पूल हा तामिळनाडूच्या रामनाथपुरम जिल्ह्यातील, रामेश्वरम बेटाशी जोडणारा एक ऐतिहासिक आणि अभियांत्रिकीचा अद्भूत चमत्कार आहे. मन्नारचे आखात आणि पाल्कची सामुद्रधुनी यांवर बांधलेला हा पूल देशातील पहिला सागरी सेतू म्हणून ओळखला जातो. हा पूल 1914 मध्ये ब्रिटीश काळात सुरू करण्यात आला होता. समुद्रामधून मोठी जहाजे आणि नौका जाण्यासाठी उघडणारा रेल्वे कात्री पूल, हा पूल मधोमध मॅन्युअली दोन्ही बाजूंना 90 अंशाच्या कोनात वर उघडला जायचा. सध्या हा पूल गंज लागल्यामुळे आणि सुरक्षेच्या कारणास्तव डिसेंबर 2022 पासून या जुन्या पुलावरील रेल्वे वाहतूक कायमची बंद करण्यात आली आहे. आणि जुन्या पुलाला समांतर असा आधुनिक तंत्रज्ञानाने नवीन रेल्वे पूल उभारण्यात आला असून, 6 एप्रिल 2025 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते त्याचे उद्घाटन करण्यात आले.

17)Dr. A P J Abdul Kalam Memorial –

तामिळनाडूच्या रामनाथपुरम जिल्ह्यातील, रामेश्वरम येथील ‘पेईकारुंबू’ येथे भारताचे 11 वे राष्ट्रपती आणि ‘मिसाईल मॅन’ डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या स्मृतीप्रित्यर्थ भव्य स्मारक उभारले आहे. अब्दुल कलाम हे तामिळनाडूच्या रामेश्वरम येथे वाढले होते, आणि 15 ऑक्टोबर 1931 ते 27 जुलै 2015 मध्ये भारतीय एरोस्पेस शास्त्रज्ञ होते. हे स्मारक भारतीय आणि मुघल स्थापत्यकलेचा एक उत्कृष्ट नमुना आहे. स्मारकाचे मुख्य प्रवेशद्वार दिल्लीच्या ‘इंडिया गेट’सारखे दिसते. आणि स्मारकाच्या मध्यभागी राष्ट्रपती भवनासारखा एक भव्य घुमट आहे, ज्यामध्ये डॉ. कलामांचा वीणा वाजवतानाचा ब्राँझचा पुतळा बसवण्यात आला आहे. या स्मारकामध्ये चार प्रदर्शन हॉल आहेत, जिथे भारताची क्षेपणास्त्रे, रॉकेट्सच्या प्रतिकृती आणि डॉ. कलामांच्या जीवनप्रवासाची चित्रे मांडण्यात आली आहेत. व स्मारकाच्या आवारात 45 फूट उंच ‘अग्नी’ क्षेपणास्त्राची प्रतिकृती उभारण्यात आली आहे.

18)Ram Sethu Bridge-

राम सेतू ज्याला ॲडम्स ब्रिज किंवा नल सेतू असेही म्हणतात. हा पूल तामिळनाडू राज्याच्या रामनाथपुरम जिल्ह्यातील रामेश्वरम (पंबन) बेटापासून ते श्रीलंकेच्या मन्नार बेटापर्यंत पसरलेली चुनखडीच्या खडकांची आणि वाळूच्या टेकड्यांची एक 48 किलोमीटर लांब साखळी आहे. वाल्मिकी रामायणात सांगितल्याप्रमाणे भगवान श्रीरामांनी सीतामातेला रावणाच्या तावडीतून सोडवण्यासाठी लंकेवर स्वारी करताना, वानर सेनेच्या मदतीने हा पूल बांधला होता. नल आणि नील यांनी या पुलाची रचना केली होती. 1480 मध्ये झालेल्या एका भीषण चक्रीवादळामुळे हा पूल पाण्याखाली गेला. सध्या हा सेतू समुद्रसपाटीपासून 3 ते 30 फूट खाली आहे. वैज्ञानिक आणि उपग्रहांच्या छायाचित्रांनुसार, ही वाळूचे पट्टे आणि चुनखडीच्या बेटांची नैसर्गिक साखळी आहे, जी 7,000 ते 18,000 वर्षे जुनी असल्याचे संशोधनातून समोर आले आहे.

19)Ariyaman Beach-

अरियामन बीच हा तामिळनाडूच्या रामनाथपुरम जिल्ह्यातील,अत्यंत शांत, स्वच्छ आणि निसर्गरम्य समुद्रकिनारा आहे. रामेश्वरमच्या पवित्र मंदिरांचे दर्शन घेतल्यानंतर विश्रांती आणि मनोरंजनासाठी हे एक उत्तम ठिकाण असून या समुद्रकिनाऱ्याला ‘खुशी बीच’ या नावानेही ओळखले जाते. हा किनारा पाल्क बे च्या बाजूला असल्याने येथील समुद्र अतिशय शांत असतो आणि लाटांचा वेग खूप कमी असतो. त्यामुळे पर्यटकांना येथे पोहण्याचा सुरक्षित आनंद घेता येतो. हा समुद्रकिनारा 2 किलोमीटर लांब पसरलेला आहे. येथील पांढरी-सोनेरी वाळू, सुरूची झाडे आणि स्वच्छ पाणी पर्यटकांना आकर्षित करते. पर्यटकांसाठी येथे विंड सर्फिंग, वॉटर स्कूटर, पॅरासेलिंग, वॉच टॉवर आणि स्पीड बोटिंगची सुविधा आहे. आणि लहान मुलांसाठी चिल्ड्रन्स पार्कही आहे.

20)Karangadu Mangrove Forest-

करंगाडू खारफुटी जंगल हे तामिळनाडूच्या रामनाथपुरम जिल्ह्यातील, रामेश्वरम जवळील निसर्गरम्य इको-टूरिझम केंद्र आहे. हे जंगल घनदाट हिरवीगार झाडी, शांत जलमार्ग आणि समृद्ध सागरी परिसंस्थेसाठी प्रसिद्ध असून मन्नारच्या आखाताच्या सागरी राष्ट्रीय उद्यानाचा एक भाग आहे. येथील खारफुटीची झाडे समुद्राच्या खाऱ्या पाण्यात वाढतात, जी किनारपट्टीचे वादळांपासून रक्षण करतात आणि अनेक दुर्मिळ जलचरांचे आश्रयस्थान आहेत. करंगाडू इथून निघणाऱ्या बोटी पर्यटकांना विस्तीर्ण खारफुटीच्या जंगलातून आणि शांत निळ्या पाण्यातून फिरवतात. तसेच हे ठिकाण पक्षीप्रेमींसाठी नंदनवन आहे. येथे किंगफिशर, सँडपायपर आणि इतर अनेक स्थलांतरित पक्षी आढळतात.

21)Krusadai Island-

कुरुसडाई बेट हे तामिळनाडूच्या रामनाथपुरम जिल्ह्यातील पंबन (रामेश्वरम) जवळ, मन्नारच्या आखातात असलेले एक अत्यंत सुंदर आणि जैवविविधतेने बहरलेले बेट आहे. या बेटाला समुद्री जीवसृष्टीच्या समृद्धतेमुळे ‘बायोलॉजिस्ट्स पॅराडाईज’ (जीवशास्त्रज्ञांचा स्वर्ग) असे म्हटले जाते. हे बेट मन्नारच्या आखातातील 21 बेटांच्या समूहाचा एक भाग असून ते पूर्णपणे संरक्षित क्षेत्र आहे. येथे दुर्मिळ समुद्री गाई, डॉल्फिन्स, विविध प्रकारच्या रंगीबेरंगी मासे, समुद्री काकडी आणि स्टारफिश मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतात. तसेच हे बेट जिवंत आणि अद्वितीय प्रवाळ खडकांसाठी प्रसिद्ध आहे. पृथ्वीवरील सर्वात मौल्यवान असणारे जिवंत सागरी जीवाश्म या बेटावर आढळतात. हिवाळ्यात येथे अनेक परदेशी स्थलांतरित पक्षी येतात, ज्यामुळे पक्षी निरीक्षणासाठी हे उत्तम ठिकाण आहे.

22)Chitrangudi Bird Sanctuary-

चित्रांगुडी पक्षी अभयारण्य हे तामिळनाडूच्या रामनाथपुरम जिल्ह्यातील मुदुकुलथूर तालुक्यातील समृद्ध पक्षी अभयारण्य आहे. हे अभयारण्य सुमारे 47.63 हेक्टर क्षेत्रात पसरलेले असून “चित्रगुडी कानमोली” (सिंचनाचा तलाव) म्हणून ओळखले जाते. आणि कांजिरंकुलम पक्षी अभयारण्याला लागूनच आहे. या पाणथळ जागेला 2021 मध्ये आंतरराष्ट्रीय ‘रामसर स्थळ’ म्हणून घोषित करण्यात आले आहे. तसेच ‘बर्डलाईफ इंटरनॅशनल’ द्वारे हे एक महत्त्वाचे पक्षी आणि जैवविविधता क्षेत्र म्हणून सूचीबद्ध आहे. हा परिसर प्रामुख्याने बाभळीच्या झाडांनी वेढलेला असल्यामुळे स्थलांतरित पक्ष्यांसाठी घरटी बनवण्याचे मुख्य ठिकाण आहेत. येथे करड्या रंगाचे ढोक, करकोचा, स्पॉट-बिल्ड पेलिकन, उघड्या चोचीचे करकोचे. काळा व पांढरा आयबिस आणि पाणकावळे मोठ्या संख्येने येतात. याशिवाय रामनाथपुरम जिल्ह्यात मेलाशेल्वनूर-कीलाशेल्वनूर पक्षी अभयारण्य, थीर्थगल पक्षी अभयारण्य, कांजिरंकुलम पक्षी अभयारण्य आणि सक्कराकोट्टई पक्षी अभयारण्य आहेत.

23)Valinokkam-

वलिनोक्कम हे तामिळनाडूच्या रामनाथपुरम जिल्ह्यातील, मन्नारच्या आखाताजवळ, कडलाडी तालुक्यात वसलेले एक सुंदर किनारी गाव आहे. हे ठिकाण निसर्गरम्य समुद्रकिनारा, मिठाचे मोठे उत्पादन आणि ऐतिहासिक धार्मिक स्थळांसाठी ओळखले जाते. येथील वलिनोक्कम बीच हा एक अत्यंत सुंदर, विस्तीर्ण आणि शांत समुद्रकिनारा आहे. या किनाऱ्यावरील पांढरी वाळू आणि निळे पाणी पर्यटकांना आकर्षित करते. तसेच वलिनोक्कम हे मिठाच्या उत्पादनासाठी तामिळनाडूत प्रसिद्ध आहे. तामिळनाडू सॉल्ट कॉर्पोरेशनने 1974 मध्ये येथून मोठ्या प्रमाणावर मिठाचे व्यावसायिक उत्पादन सुरू केले होते. येथील विस्तीर्ण मिठागरे पाहण्यासारखे असतात. याशिवाय वलिनोक्कम येथील ‘इम्रान उमाय्याह अल बदाविय्याह शहीद’ आणि ‘सुलतान अब्दुल कादिर’ हा दर्गा (स्थानिक लोकांमध्ये पीर मुहम्मद, नूर मुहम्मद वलीउल्लाह दर्गा म्हणून प्रसिद्ध) आहे. येथे सर्व धर्माचे लोक दर्शनासाठी येतात.

24)Keelakarai / Kilakarai-

कीळक्करई किंवा कीलाकराई हे तामिळनाडूच्या रामनाथपुरम जिल्ह्यातील, किनारपट्टीवरील शहर आहे. कीळक्करई हे प्राचीन काळापासून बंगालच्या उपसागराच्या किनाऱ्यावर वसलेले एक समृद्ध बंदर होते. हे शहर मन्नारच्या आखाताजवळ असल्याने पूर्वी येथील लोक प्रामुख्याने मोती काढणे, शंख गोळा करणे आणि सागरी व्यापार हे व्यवसाय करत होते. येथे बिलार पल्ली मशीद, जिंन मशीद, कीळक्करई किनारपट्टीवर प्राचीन दीपगृह आणि सदकतुल्लाह दर्गा आहे आणि जुम्मा मशीद हे कीळक्करईचे सर्वात मोठे वैशिष्ट्य आहे. इसवी सन 628 ते 630 च्या सुमारास येमेनी व्यापाऱ्यांनी बांधलेली ही मशीद भारतातील दुसरी आणि जगातील सर्वात जुन्या मशिदींपैकी एक मानली जाते. तसेच येथे शतकानुशतके अरबी व्यापारी, हिंदू आणि ख्रिश्चन समुदाय एकत्र राहत आल्यामुळे शहराला एक समृद्ध बहुसांस्कृतिक वारसा लाभला आहे. कीळक्करईचा किनारा लहान खाड्या आणि प्रवाळ बेटांनी वेढलेला असल्यामुळे हे शहर समुद्राच्या मोठ्या लाटांपासून सुरक्षित राहते.

25)Kamuthi Fort-

कामुठी किल्ला हा तामिळनाडूच्या रामनाथपुरम जिल्ह्यातील, ऐतिहासिक वारसा असलेला किल्ला आहे. हा दगडी किल्ला 300 वर्षांपूर्वी रामनाथपुरमचे सेतुपती राजे ‘विजया रघुनाथ सेतुपती’ यांनी बांधला होता. पांचालंकुरिचीच्या पाडावानंतर हा किल्ला ईस्ट इंडिया कंपनीच्या (ब्रिटिश) ताब्यात गेला. या किल्ल्याची रचना फुलांच्या पाकळ्यांसारखी (वर्तुळाकार )असून याच्या भिंती आतल्या बाजूला वळलेल्या आणि बाहेरून पाकळ्यांसारख्या दिसतात. या किल्ल्याचा विस्तार सुमारे 600 मीटर परिसरात असून याच्या भिंती 20 फूट उंच आणि प्रचंड मोठ्या आहेत. किल्ल्याच्या भिंतींवर आजही युद्धादरम्यान झालेल्या गोळीबाराच्या खुणा पाहायला मिळतात. तसेच किल्ल्याभोवती सुमारे 6 फूट खोल खंदक आणि अर्धा किलोमीटर लांबीचा एक गुप्त भुयारी मार्ग आहे. या किल्ल्याच्या आत प्रसिद्ध कोटै मुनीस्वरार आणि करुप्पसामी यांची मंदिरे आणि एक पाण्याचा तलाव आहे. हा किल्ला सध्या तामिळनाडू सरकारच्या पुरातत्व विभागाद्वारे एक संरक्षित स्मारक आहे.

26)Dugong Conservation Reserve-

डुगोंग संवर्धन अभयारण्य हे तामिळनाडूच्या रामनाथपुरम, तंजावर आणि पुदुक्कोट्टई जिल्ह्यांच्या किनारपट्टीवर असलेल्या पाल्क बे भागात, भारतातील पहिले डुगोंग संवर्धन अभयारण्य आहे. हे अभयारण्य 448.34 चौरस किलोमीटर सागरी क्षेत्रात पसरलेले आहे. इंटरनॅशनल युनियन फॉर कन्झर्वेशन ऑफ नेचर ने 2025 मध्ये या संवर्धन क्षेत्राला जागतिक स्तरावर मान्यता दिली आहे. डुगोंग म्हणजे समुद्री गाय जी पूर्णपणे शाकाहारी असून एकमेव सागरी सस्तन प्राणी आहे. हे प्राणी प्रामुख्याने समुद्राच्या तळाशी असणारे सागरी गवत खाऊन जगतात. पाल्क बीच समुद्र उथळ आणि शांत आहे. येथे 12,250 हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रावर सागरी गवताची विस्तीर्ण कुरणे आहेत. त्यामुळे डुगोंग, समुद्री कासव, सी-हॉर्स आणि विविध प्रकारचे दुर्मिळ मासे यांचे रक्षण होते.

27)Gulf of Mannar Marine National Park-

मन्नार सागरी राष्ट्रीय उद्यान हे तामिळनाडूच्या रामनाथपुरम, आणि थुथुकुडी (तुतीकोरीन) जिल्ह्यांमध्ये पसरलेले मन्नार सागरी राष्ट्रीय उद्यान आणि सागरी जीवमंडल अभयारण्य आहे.या उद्यानाची स्थापना 1980 मध्ये झाली. मरीन नॅशनल पार्क हे भारतातील एक संरक्षित क्षेत्र असून त्यात 21 लहान बेटे व त्यांना लागून असलेले प्रवाळखडक यांचा समावेश आहे. हे थूथुकुडी ते धनुष्कोडी दरम्यान सुमारे 160 किमी पसरलेले आहे. या उद्यानाचा मुख्य भाग रामनाथपुरम जिल्ह्यातील मंडपम आणि रामेश्वरम जवळ येतो. येथे प्रवाळखडक, समुद्री गवत आणि खारफुटी असे तीन प्रमुख किनारी परिसंस्थाआढळतात. डुगोंग (समुद्री गाय) हा या उद्यानाचा प्रमुख सस्तन प्राणी आहे, तसेच येथे हिरवी कासवे व ऑलिव्ह रिडली कासवे आढळतात. प्रवाळखडकांच्या समृद्धीमुळे या भागाला ‘अंडरवॉटर ट्रॉपिकल रेनफॉरेस्ट’ असेही म्हटले जाते. पर्यटकांना येथे काचेच्या तळ असलेल्या बोटी चालवल्या जातात. यातून पर्यटक पाण्यात न उतरता सुंदर प्रवाळ आणि रंगीबेरंगी मासे पाहू शकतात. आणि मंडपम येथे सागरी संग्रहालयात सागरी जीवांबद्दलची रंजक माहिती मिळते.

Visit the travel blog

1)रामनाथपुरम जिल्ह्यातील,कोणते मंदिर धनुष्कोडीसाठी प्रसिद्ध आहे?

रामेश्वरम बेटाच्या दक्षिणेकडील टोकाला धनुष्कोडी म्हणतात. 1964 मध्ये आलेल्या चक्रीवादळात धनुष्कोडी पूर्णपणे वाहून गेले. पण येथील कोठंडरामस्वामी मंदिर मात्र सुरक्षित राहते.


2) रामेश्वरम मंदिरापासून पंचमुखी हनुमान मंदिर किती अंतरावर आहे?

पंचमुखी हनुमान मंदिर हे श्री रामनाथस्वामी मंदिरापासून 2 किमी अंतरावर आहे.


3) रामनाथपुरम जिल्ह्यातील उथिराकोसमंगाई मंदिर कोणत्या नावाने ओळखले जाते?

उथिराकोसमंगाई मंदिर हे मंगलनाथ स्वामी मंदिर म्हणून ओळखले जाते.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
Scroll to Top