भारतभ्रमंती या वेबसाईटवर पहा भारत देशातील प्रत्येक राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे. देवभूमी केरळ राज्यातील त्रिशूर जिल्ह्यातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे.त्रिशूर जिल्हा हा केरळमधील एक प्रमुख जिल्हा आहे. या जिल्ह्याची स्थापना 1 जुलै 1949 मध्ये झाली. त्रिशूर हे नाव ‘थिरू-शिवा-पेरूर’ या मल्याळम शब्दापासून आले आहे, ज्याचा अर्थ ‘भगवान शिवांचे पवित्र शहर’ असा होतो. हा जिल्हा अरबी समुद्राच्या किनाऱ्याजवळ आणि सह्याद्रीच्या कुशीत वसलेला असून ‘केरळची सांस्कृतिक राजधानी’ आणि ‘पूरामांची भूमी’ म्हणून ओळखला जातो. येथील ‘त्रिशूर पूरम’ हा सर्वात मोठा उत्सव एप्रिल किंवा मे महिन्यात वडक्कुमनाथन मंदिराच्या थेक्किन्काडू मैदानावर साजरा केला जातो. ज्यामध्ये सजवलेले हत्ती, पारंपरिक वाद्यवृंद आणि भव्य फटाक्यांची आतिषबाजी होते. या जिल्ह्याचे मुख्य प्रशासकीय केंद्र त्रिशूर शहर आहे. Top 25 places to visit in Thrissur District
18 व्या शतकात कोचीनचे महाराज शक्तन थंपुरान यांनी आधुनिक त्रिशूर शहराची रचना केली. आणि या शहराला व्यापार आणि संस्कृतीचे केंद्र बनवले. तसेच या जिल्ह्यात केरळ साहित्य अकादमी, केरळ संगीत नाटक अकादमी आणि केरळ ललिताकला अकादमी या प्रमुख संस्था आहेत. व चेरुथुरुथी येथील ‘केरळ कलामंडलम’ ही संस्था कथकली आणि मोहिनीआट्टम या पारंपरिक नृत्यप्रकारांच्या प्रशिक्षणासाठी जगप्रसिद्ध आहे. हा जिल्हा प्राचीन काळापासून हिंदू, ख्रिश्चन आणि इस्लाम धर्माचा संगम राहिला आहे. सेंट थॉमस यांनी पहिल्या ख्रिश्चन धर्माची पायाभरणी याच भागात केली, तसेच भारतातील पहिली मशीद ‘चेरामन जुमा मशीद’ याच जिल्ह्यात आहे. त्रिशूरला ‘केरळची सुवर्ण राजधानी’ म्हटले जाते, कारण केरळमधील 70% सोन्याचे दागिने येथेच तयार होतात.
Top 25 places to visit in Thrissur District
त्रिशूर जिल्ह्यातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
1) Vadakkunnathan Temple-


वडक्कुन्नाथन मंदिर हे केरळच्या त्रिशूर जिल्ह्याच्या मध्यावर असलेले एक अत्यंत प्राचीन आणि प्रसिद्ध शिवमंदिर आहे. या मंदिराला ‘दक्षिण कैलास’ असेही म्हणतात. हे मंदिर एका टेकडीवर 9 एकर हिरवळीच्या परिसरात आहे, आणि चारही बाजूंना भव्य प्रवेशद्वारे (गोपुरम) आहेत. तसेच मंदिराचे बांधकाम पूर्णपणे लाकूड, दगड आणि चुन्याच्या पारंपारिक वापरातून केले असून येथील भिंतींवर महाभारतातील प्रसंगांचे सुंदर भित्तिचित्र आहेत. तसेच या मंदिरातील भव्य पारंपारिक नाट्यगृहात प्राचीन काळापासून पारंपारिक नृत्य आणि कला सादर केल्या जातात. पौराणिक कथेनुसार, हे मंदिर भगवान विष्णूचे अवतार असलेल्या परशुरामाने बांधलेले पहिले मंदिर मानले जाते. 2015 मध्ये या मंदिराला UNESCO आशिया-पॅसिफिक ‘अवॉर्ड ऑफ एक्सलन्स’ देऊन गौरवण्यात आले आहे.
येथील सर्वात मोठे आश्चर्य किंवा चमत्कार म्हणजे येथील शिवलिंगावर शतकानुशतके फक्त ‘तूप’ अर्पण केले जाते. सततच्या अभिषेकामुळे येथे तुपाचा एक मोठा डोंगर तयार झाला आहे आणि इतकी उष्णता असूनही हे तूप कधीही वितळत नाही किंवा त्याला दुर्गंधी येत नाही. या मंदिर संकुलात भगवान शिव (वडक्कुन्नाथन), शंकरनारायण (शिव आणि विष्णूंचे एकत्रित रूप) आणि श्रीराम ही तीन महत्त्वाची मंदिरे आहेत. येथील ‘त्रिशूर पूरम’ हा केरळमधील सर्वात मोठा आणि भव्य उत्सव एप्रिल-मे महिन्यात या मंदिराभोवती असलेल्या ‘थेक्किन्काडू मैदानावर’ साजरा होतो. तसेच जुलै महिन्यात हत्तींना नैवेद्य भरवण्याचा मोठा सण आहे, आणि महाशिवरात्रीला या मंदिरात लाखो दिव्यांची रोषणाई केली जाते.
2) Guruvayur Sree Krishna temple-



गुरुवायूर श्रीकृष्ण मंदिर हे केरळच्या त्रिशूर जिल्ह्यातील पवित्र आणि प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आहे. या मंदिराला ‘भूलोका वैकुंठ’ (पृथ्वीवरील विष्णूचे निवासस्थान) आणि ‘दक्षिणेची द्वारका’ म्हणून ओळखले जाते. येथे भगवान विष्णूंची पूजा श्रीकृष्णाच्या बालरूपात (गुरुवायुरप्पन) केली जाते. या मंदिरातील महाविष्णूची मूर्ती चतुर्भुज आहे, ज्यांच्या हातामध्ये शंख, चक्र, गदा आणि कमळ आहे. आणि हा विग्रह एका अत्यंत दुर्मिळ ‘पाताळ अंजन’ (शालिग्राम) दगडापासून बनवला आहे. या प्राचीन मंदिरातील मुख्य गाभारा (श्रीकोविल) इ.स. 1638 मध्ये पुन्हा बांधण्यात आला. मंदिराची रचना पारंपारिक केरळ वास्तुकला शैलीमध्ये केली असून मंदिराच्या आवारात 70 फूट उंच सोन्याचा मुलामा असलेला ध्वजस्तंभ आणि 24 फूट उंच दीपस्तंभ आहे, ज्यावर हजारो तेलाचे दिवे लावले जातात. तसेच या मंदिराच्या उत्तर बाजूला असलेल्या पवित्र ‘रुद्रतीर्थम’ तलावात भाविक दर्शनापूर्वी स्नान करतात.
3)Athirappilly Waterfalls-



अथिरप्पिल्ली धबधबा हा केरळच्या त्रिशूर जिल्ह्यातील, केरळमधील सर्वात मोठा आणि प्रसिद्ध नैसर्गिक धबधबा आहे. या धबधब्याच्या अथांग रुंदीमुळे आणि भव्यतेमुळे याला “दक्षिण भारताचा नायगारा” म्हटले जाते. हा धबधबा पश्चिम घाटातील शोलेयार पर्वत रांगांमधून उगम पावणाऱ्या चालाकुडी नदीवर असून सुमारे 80 ते 82 फूट उंचीवरून खाली कोसळतो आणि त्याची कमाल रुंदी जवळपास 167 फूट आहे. येथील परिसर शोलेयार वनपरिक्षेत्राच्या घनदाट, निसर्गरम्य आणि हिरव्यागार जंगलांनी वेढलेला आहे. येथे हॉर्नबिल पक्ष्यांच्या दुर्मिळ प्रजाती पाहायला मिळतात. अथिरप्पिल्ली धबधबा हा चित्रपट निर्मात्यांचे आवडते ठिकाण आहे. ‘बाहुबली’ चित्रपटातील प्रसिद्ध धबधब्याचे दृश्य याच ठिकाणी चित्रित करण्यात आले होते. याशिवाय ‘रावण’, ‘दिल से’ आणि अनेक दक्षिण भारतीय चित्रपटांचे शूटिंग येथे झाले आहे.
4)Vilangan Kunnu Hills-




विलांगन कुन्नू हे केरळच्या त्रिशूर जिल्ह्यातील, अत्यंत निसर्गरम्य, हिरवेगार आणि असंख्य वनस्पती व जैवविविधतेने बहरलेले परिपूर्ण ठिकाण आहे. त्यामुळे या टेकडीला त्रिशूर शहराचे ‘ऑक्सिजन जार’ म्हणून ओळखले जाते. हे ठिकाण समुद्रसपाटीपासून सुमारे 80 मीटर उंचीवर असून या टेकडीच्या शिखरावरून संपूर्ण थ्रिसूर शहर आणि थ्रिसूर-पोन्नानी कोले वेटलँड्सचे (दलदलीचा प्रदेश) विहंगम व अप्रतिम दृश्य दिसते. पर्यटकांसाठी येथे चार व्ह्यूपॉइंट्स बनवण्यात आले आहेत. त्यामध्ये अशोकवनम (औषधी उद्यान), दोन्ही बाजूंनी मोठी झाडे असलेला 800 मीटरची सुंदर पायवाट, अम्युझमेंट पार्क आणि राइड्स आहेत. याशिवाय येथे लहान मुलांसाठी 13 पेक्षा जास्त रोमांचक राइड्स, पेडल बोट पूल आणि वॅगन व्हीलची सोय आहे. तसेच येथील सर्वात मोठे आकर्षण म्हणजे 16D थिएटर, ज्यामध्ये 180 अंश फिरणाऱ्या जागा आहेत. याद्वारे तुम्ही जागेवर बसूनच धबधबे, बर्फ आणि सुवासाचा थरारक अनुभव घेऊ शकता.
Visit our website: allindiajourney.com
5)Vazhachal Waterfalls-


वाझाचल धबधबा हा केरळच्या त्रिशूर जिल्ह्यातील, चालकुडी नदीवर वसलेला शांत आणि नयनरम्य धबधबा आहे. अथिरापिल्ली धबधब्यापासून हा धबधबा 5 किमी अंतरावर शोलेयर वनपरिक्षेत्राच्या परिसरात आहे. हा धबधबा 300 फुटांपेक्षा जास्त लांब असलेल्या खडकाळ उतारावरून वेगाने नागमोडी वाहत जातो. येथील परिसर घनदाट जंगल, चित्तथरारक नैसर्गिक सौंदर्य आणि जैवविविधतेने वेढलेला असून पक्षीप्रेमींसाठी नंदनवन आहे. येथे दुर्मिळ प्रजातीचे पक्षी आणि वनस्पती व हॉर्नबिल (धनेश) पक्ष्यांच्या चार दुर्मिळ प्रजाती पाहायला मिळतात. तसेच या धबधब्याच्या बाजूला एक सुंदर उद्यान आहे, जिथे अनेक प्रकारच्या दुर्मिळ औषधी वनस्पती पाहायला मिळतात.
6)Thrissur Zoo & Museum-



त्रिशूर प्राणिसंग्रहालय आणि राज्य संग्रहालय हे केरळच्या त्रिशूर जिल्ह्यातील, चेम्बुक्कावू येथील जुने प्राणिसंग्रहाय आहे. 1885 मध्ये स्थापन झालेले हे उद्यान सुमारे 13.5 एकर परिसरात पसरलेले असून या प्राणिसंग्रहालयातील प्राण्यांना आता पुथूर येथील नवनिर्मित आंतरराष्ट्रीय दर्जाच्या ‘थ्रिसूर झूलॉजिकल पार्क’ मध्ये स्थलांतरित केले जात आहे. या प्राणिसंग्रहालयात वाघ, सिंह, बिबट्या, अस्वल, आफ्रिकन ग्रे पोपट, पाणघोडे, उंट आणि दुर्मिळ सिंह-पुच्छ मकाक आणि 50 पेक्षा जास्त प्रजातींचे वन्यजीव पाहायला मिळतात. याशिवाय येथील सर्प उद्यानात किंग कोब्रा, अजगर, फुरसे आणि मगरींचे वास्तव्य आहे. तसेच या संग्रहालयात विविध प्राण्यांचे सांगाडे, जीवाश्म आणि टॅक्सीडमी नमुने ठेवण्यात आले आहेत. आणि येथील कला संग्रहालयात पारंपारिक लाकडी कोरीव काम, धातूची शिल्पे, प्राचीन दागिने, कथकलीच्या मूर्ती आणि प्राचीन समया यांचा अप्रतिम संग्रह आहे. व सुंदर झाडांनी वेढलेल्या या परिसरात पर्यटकांसाठी एक आधुनिक 3 डी थिएटर आहे.
7)Charpa Waterfalls-


चरपा धबधबा हा केरळच्या त्रिशूर जिल्ह्यातील, चालकुडी नदीच्या खोऱ्यात नैसर्गिक आणि नयनरम्य परिसरात वसलेला एक आकर्षक धबधबा आहे. हा धबधबा ‘अथिरप्पिल्ली’ आणि ‘वाझाचल’ या दोन प्रसिद्ध धबधब्यांच्या अगदी मध्ये थेट मुख्य हायवेच्या बाजूलाच आहे. व साधारण 70 फूट उंचीवरून खाली खडकाळ भागावर कोसळतो. हा धबधबा मुख्य हायवेच्या बाजूला असल्यामुळे गाडीतून जाता-जाताही याचे विहंगम दृश्य दिसते. पावसाळ्यात हा धबधबा प्रचंड वेगाने वाहतो. त्यावेळी धबधब्याचे पाणी थेट तेथून जाणाऱ्या गाड्यांवर पाण्याचा फवारा उडतो. पर्यटकांसाठी हा एक अद्भुत अनुभव असतो. येथील परिसर पश्चिम घाटातील शोलायार जंगल रांगांनी वेढलेला असून येथे घनदाट झाडी आणि शांत व निसर्गरम्य वातावरण पाहायला मिळते.
8)Shakthan Thampuran Palace-




शाकथन थंपुरण राजवाडा हा केरळच्या त्रिशूर जिल्ह्यातील, ऐतिहासिक आणि सांस्कृतिक राजवाडा आहे. या राजवाड्याला पूर्वी ‘वडक्केचिरा कोव्हिलकम’ किंवा ‘वडक्केकारा पॅलेस’ म्हणून ओळखले जात होते. 1795 मध्ये राजा राम वर्मा शक्तन थंपुरान यांनी या दोन मजली राजवाड्याची केरळ आणि डच शैलीत पुनर्बांधणी केली. केरळ सरकारच्या पुरातत्व विभागाने 2005 मध्ये या वास्तूचे एका भव्य संग्रहालयात रूपांतर केले आहे. या संग्रहालयात कोची राजवंश आणि पाषाण युगातील अनेक दुर्मिळ वस्तू आहेत. त्यामध्ये कांस्य गॅलरी, शिल्पकला गॅलरी, नाणेशास्त्र गॅलरी, शिलालेख गॅलरी यांचा समावेश आहे. तसेच येथे राजांच्या काळातील शस्त्रे, भांडी आणि हडप्पा संस्कृतीशी संबंधित अवशेष आहेत. तसेच या राजवाड्याच्या परिसरातच राजा शक्तन थंपुरान, झामोरीन राजा आणि कोचीच्या एका शासकाची समाधी व सापांची पूजा करण्यासाठी बांधलेले प्राचीन आणि पवित्र सर्प उद्यान आहे. आणि राजवाड्याच्या दक्षिण भागात केरळमधील दुर्मिळ आणि स्थानिक वनौषधी व वनस्पतींचे एक सुंदर उद्यान आहे.
9)Bible Tower-



बायबल टॉवर हा केरळच्या त्रिशूर शहराच्या मध्यभागी असलेला आशियातील सर्वात उंच चर्च टॉवर पैकी एक आहे. व प्रसिद्ध ऐतिहासिक आणि धार्मिक स्तंभ आहे. हा टॉवर थ्रिसूरमधील प्रसिद्ध ‘अवर लेडी ऑफ डॉलर्स बॅसिलिका’ या चर्चचा एक भाग असून या टॉवरचे उद्घाटन 7 जानेवारी 2007 रोजी करण्यात आले. रेव्हरंड डॉ. पेड्रो लोपेझ क्विंटाना यांनी हा टॉवर ‘जागतिक शांततेसाठी’ समर्पित केला होता. हा टॉवर पूर्णपणे भूकंप-प्रतिरोधक असून याची उंची 260 फूट आहे. व टॉवरच्या वरच्या टोकावर मोठा लाल रंगाचा क्रॉस बसवण्यात आला आहे. या टॉवरमध्ये येशू ख्रिस्ताच्या बालपणीच्या प्रसंगांचे सुंदर लाकडी कोरीव काम पाहायला मिळते. तसेच येथे स्टेंड ग्लास, काष्ठशिल्प, भित्तीचित्रे, म्युरल पेंटिंग्स, क्ले टाईल्स आणि पितळाचे कोरीव काम केले आहे. आणि वेगवेगळ्या भाषांमधील बायबलचा संग्रह असलेले संग्रहालय देखील आहे. पर्यटकांना या टॉवरवर जाण्यासाठी लिफ्टची सुविधा उपलब्ध आहे.
10)Paramekkavu Bagavathi Temple-


परमेक्कावू भगवती मंदिर हे केरळच्या त्रिशूर जिल्ह्यातील,भगवती (देवी वैष्णवी) चे सर्वात मोठे मंदिर आहे. हे मंदिर सुमारे 1000 वर्षे जुने असून मंदिराचे गोपुरम (प्रवेशद्वार) पारंपरिक केरळ शैलीतील लाल आणि पांढऱ्या रंगाचे आहे. मुख्य गर्भगृहाव्यतिरिक्त, मंदिरात सोनेरी मुलामा दिलेला ध्वजस्तंभ आणि दीपस्तंभ आहे. दक्षिण भारतातील सर्वात मोठा आणि भव्य उत्सव असलेल्या ‘त्रिशूर पूरम’ मध्ये या मंदिराची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते. या उत्सवादरम्यान परमेक्कावू मंदिरातून 15 सजवलेल्या हत्तींची भव्य मिरवणूक आणि पारंपारिक वाद्यांचा ‘इलांजी थरा मेलम’ हा सोहळा पाहण्यासाठी जगभरातून लाखो पर्यटक येतात.
11)Vadakkechira Lake-


वडक्केचिरा तलाव हा केरळच्या त्रिशूर जिल्ह्यातील, एक ऐतिहासिक आणि प्रसिद्ध तलाव आहे. या तलावाची निर्मिती कोचीनचे तत्कालीन राजे शक्तन थंपुरन यांनी 18 व्या शतकाच्या उत्तरार्धात 1805 मध्ये केली होती. राजा शक्तन थंपुरन यांनी त्रिशूर शहरात जलसंधारण आणि सिंचनासाठी चार प्रमुख तलाव बांधले होते, त्यापैकीच वडक्केचिरा हा एक महत्त्वाचा तलाव आहे. या तलावाचा उपयोग पिण्याच्या पाण्यासाठी आणि शेतीसाठी केला जात असे. सध्या हा तलाव पर्यटकांचे आकर्षणाचे ठिकाण असून येथे हिरवेगार बगीचे, पक्षी निरीक्षण, चालण्यासाठी वॉकवे आणि पारंपरिक केरळी पद्धतीचे मंडप बांधण्यात आले आहेत. तसेच या तलावात पॅडल बोटिंगची सुविधा उपलब्ध आहे. संध्याकाळच्या वेळी येथे आकर्षक कारंजे आणि रोषणाई केली जाते.
12)Cheppara Rock Garden-




चेप्पारा रॉक गार्डन हे केरळच्या त्रिशूर जिल्ह्यातील, अत्यंत सुंदर आणि निसर्गरम्य पर्यटन स्थळ आहे. चेप्पारा हे 1 किलोमीटर परिसरामध्ये पसरलेले एक विस्तीर्ण आणि भव्य खडकाळ भाग आहे. या खडकाच्या माथ्यावरून आजूबाजूची घनदाट जंगले, हिरवळ आणि वडक्कनचेरी शहराचा विहंगम नजरा दिसतो. आणि येथील सूर्यास्ताचे दृश्य अत्यंत नयनरम्य असते. या खडकावर प्राचीन काळातील महापाषाण युगीन अवशेष आणि दगडी लेणी पाहायला मिळतात. असे सांगितले जाते की, प्राचीन काळी ऋषी-मुनी येथे ध्यानधारणा करत असत. येथे नेहमीच अतिशय वेगवान आणि थंड वारे वाहत असतात, ज्यामुळे पर्यटकांचा थकवा क्षणात दूर होतो.
13)Cheraman Juma Mosque-

चेरामन जुमा मशीद ही केरळच्या त्रिशूर जिल्ह्यातील, कोडुंगल्लूर येथील मेथला गावातील, भारतातील पहिली आणि सर्वात जुनी मशीद मानली जाते. ही मशीद इ.स. 629 CE मध्ये प्रेषित मोहम्मद यांच्या जीवनकाळात बांधली गेली असे मानले जाते. व मलिक बिन दिनार यांनी या मशिदीची स्थापना केली होती. या मशिदीमध्ये एक हजार वर्षांहून अधिक जुना तेलाचा दिवा आहे, जो सतत जळत असतो. सर्व धर्मांचे लोक या दिव्यासाठी तेल अर्पण करतात. ही मशीद धार्मिक सौहार्दाचे प्रतीक असून येथे बिगर-मुस्लिम बांधवांनाही प्रवेश दिला जातो. तसेच मशीद परिसरात केरळमधील इस्लामचा इतिहास दर्शवणारे एक सुंदर संग्रहालय आहे.
14)Triprayar Sree Rama Temple-


त्रिप्रयार श्री रामास्वामी मंदिर हे केरळच्या त्रिशूर जिल्ह्यातील, तीव्रा (पुरयार) नदीच्या काठावर वसलेले प्राचीन आणि पवित्र मंदिर आहे. या मंदिरात भगवान श्रीराम आहेत, ज्यांना ‘त्रिप्रयारप्पन’ किंवा ‘त्रिप्रयार थेवर’ असेही म्हटले जाते. या मंदिरात भगवान हनुमानाची मूर्ती नाही, परंतु ते ‘नमस्कार मंडपम’ मध्ये अदृश्य रूपात विराजमान आहेत अशी भक्तांची अतूट श्रद्धा आहे. हे मंदिर केरळच्या पारंपारिक वास्तुकलेचे उत्कृष्ट उदाहरण असून मंदिराचे मुख्य गर्भगृह गोलाकार आहे व त्याचे छप्पर तांब्याच्या पत्र्यांनी बनवलेले आहे. आणि गर्भगृहाच्या भिंतींवर रामायणातील प्रसंगांची सुंदर भित्तिचित्रे आहेत. या मंदिरासमोरील नदीतील माशांना नैवेद्य (खाऊ) देणे हा येथील प्रमुख विधी आहे. डिसेंबर महिन्यात येणारी एकादशी येथे मोठ्या थाटामाटात साजरी केली जाते. हे मंदिर रामायणातील चार भावांच्या (राम, लक्ष्मण, भरत आणि शत्रुघ्न) ‘नलंबलम’) या चार मंदिरांच्या पवित्र यात्रेतील प्रमुख स्थान आहे.
15)Punnathur Kotta Elephant Sanctuary-


पुन्नात्तूर कोट्टा हत्ती अभयारण्य हे केरळच्या त्रिशूर जिल्ह्यातील, गुरुवायूर श्रीकृष्ण मंदिरापासून सुमारे 3 किमी अंतरावर असलेले, भारतातील सर्वात मोठ्या पाळीव हत्तींच्या देखभालीचे केंद्र आहे. ज्याला ‘आनाकोट्टा’ किंवा हत्तींचा किल्ला असेही म्हणतात. ही जागा पूर्वी पुन्नात्तूर राजांचा राजवाडा होती. 1975 मध्ये गुरुवायूर मंदिर प्रशासनाने ही 11.5 एकर जागा हत्तींच्या निवासासाठी ताब्यात घेतली. येथे 60 पेक्षा जास्त हत्ती भाविकांनी गुरुवायूरच्या श्रीकृष्ण देवाला अर्पण म्हणून दिलेले आहेत. या परिसरात 500 वर्षे जुना पारंपरिक ‘नालुकेट्टू’ राजवाडा आहे, जिथे आता हत्तींच्या माहुतांना (पापण) प्रशिक्षण दिले जाते. तसेच येथे भगवान शिव आणि भगवतीचे एक छोटे मंदिरही आहे. दरवर्षी येथे ‘गजपूजा’ आणि ‘आनायूट्टू’ (हत्तींना भव्य मेजवानी देणे) हे विधी मोठ्या उत्साहात पार पडतात.
16)Kerala Kalamandalam-




केरळ कलामंडलम ही केरळच्या त्रिशूर जिल्ह्यातील,केरळमधील पारंपरिक आणि शास्त्रीय कलांचे जतन व संवर्धन करणारी एक जागतिक दर्जाची संस्था आहे. ही संस्था चेरुथुरुथी गावात भरतपुझा (नीला) नदीच्या काठावर वसलेली असून या संस्थेची स्थापना 1930 मध्ये प्रसिद्ध कवी वल्लाथोल नारायणन मेनन आणि त्यांचे सहकारी मनक्कुलम मुकुंद राजा यांनी केली होती. भारत सरकारने 2006 मध्ये या संस्थेला कला आणि संस्कृतीसाठी ‘डीम्ड युनिव्हर्सिटी’ (अभिमत विद्यापीठ) चा दर्जा दिला आहे. आणि विद्यापीठ अनुदान आयोगाने (UGC) या संस्थेला ‘अ’ श्रेणीचा दर्जा दिला आहे. येथे शास्त्रीय नृत्यामध्ये कथकली, मोहिनीअट्टम, कुडियाट्टम, थुल्लाल, कुचीपुडी आणि भरतनाट्यम, व संगीत आणि वाद्यामध्ये चेंदा, मद्दलम, मिझावू (तालवाद्ये) आणि कर्नाटकी शास्त्रीय संगीत यांसारख्या विविध नृत्य आणि वाद्यकलांचे प्रशिक्षण दिले जाते.
17)Peechi Dam & Peechi-Vazhani Wildlife Sanctuary-




पीची धरण आणि पीची-वाझानी वन्यजीव अभयारण्य हे केरळच्या त्रिशूर जिल्ह्यातील लोकप्रिय आणि निसर्गरम्य पर्यटन स्थळ आहे. येथील 3,200 एकरांवर पसरलेले ‘पीची धरण’ हे 1957 मध्ये मनाली नदीवर बांधण्यात आले असून त्रिशूर आणि आसपासच्या गावाच्या पिण्याच्या पाण्याची गरजा भागवण्यासाठी व सिंचन प्रकल्प म्हणून सुरू करण्यात आले होते. या धरणाजवळ सुंदर वनस्पती उद्यान, कारंजे आणि लहान मुलांसाठी खेळण्याचे पार्क आहे. येथील पीची-वाझानी वन्यजीव अभयारण्य हे 125 चौरस किलोमीटर क्षेत्रावर पसरलेलेची असून याची स्थापना 1958 मध्ये झाली आहे. या अभयारण्यातील सर्वोच्च शिखर ‘पोनमुडी’ हे ट्रेकिंगसाठी प्रसिद्ध आहे. आणि येथे उष्णकटिबंधीय सदाहरित व पानझडी जंगले आढळतात. आणि प्राण्यांमध्ये आशियाई हत्ती, बिबट्या, वाघ, रानगवे सांबर, ठिपकेदार हरिण आणि विविध प्रकारच्या 240 पेक्षा जास्त पक्ष्यांच्या प्रजाती व 50 पेक्षा जास्त दुर्मिळ ऑर्किड व औषधी वनस्पती आढळतात. पीची धरणाच्या जलाशयात पर्यटकांसाठी बोटिंग उपलब्ध आहे. आणि धरणाजवळील वॉचटावरवरून संपूर्ण जलाशय आणि आजूबाजूच्या हिरव्यागार टेकड्यांचे नयनरम्य विहंगम दृश्य पाहता येते.
18)Marine World, Public Aquarium –



मरीन वर्ल्ड पब्लिक अॅक्वेरियम हे केरळच्या त्रिशूर जिल्ह्यातील,चावक्काड जवळील पांचवडी बीचवर 4 एकर परिसरात पसरलेले सर्वात मोठे पब्लिक अॅक्वेरियम आहे. येथे अंडरवॉटर टनेल -काचेच्या पारदर्शक बोगद्यातून चालताना तुम्हाला शार्क, स्टिंगरे आणि इतर समुद्री जीव पोहताना दिसतात. येथे विविध 300 पेक्षा जास्त प्रजातींचे मासे आणि समुद्री जीव आहेत. यामध्ये अरापाइमा, पिरान्हा, स्टिंगरे, शार्क, स्टारफिश, लॉबस्टर आणि कासव यांचा समावेश आहे. तसेच येथे जुन्या गाड्या आणि मोठ्या नळकाड्यांच्या आकारात तयार केलेले अॅक्वेरियम हे येथील वैशिष्ट्य आहे. आणि येथील काचेच्या पुलावरून चालताना खालील अथांग जलचरांचे विहंगम दृश्य दिसते. पर्यटकांना येथे स्टिंगरे सारख्या समुद्री जीवांना स्पर्श करण्याची संधी मिळते. याशिवाय येथे कृत्रिम रेनफॉरेस्ट, 16 डी सिनेमा, बर्ड्स पार्क आणि लहान मुलांसाठी चिल्ड्रन पार्क आहे.
19)Poomala Dam-



पूमला धरण हे केरळच्या त्रिशूर जिल्ह्यातील, पुझक्कल ब्लॉक अंतर्गत मुलंकुन्नाथुकावू पंचायतीमध्ये किल्लान्नूर गावातील महत्वाचे धरण व निसर्गरम्य पर्यटन स्थळ आहे. हे धरण समुद्रसपाटीपासून साधारण 94.50 मीटर उंचीवर, डोंगरांच्या मध्ये वसलेले एक लहान आणि शांत धरण असून लोकप्रिय इको-टुरिझम केंद्र आहे. माती आणि दगडने बांधलेले हे धरण पश्चिम घाटाच्या कुशीत, हिरव्यागार टेकड्या आणि घनदाट वनराईने वेढलेले आहे. या धरणाच्या बाजूला एक सुंदर बाग विकसित करण्यात आली आहे. व येथे पर्यटकांसाठी 600 मीटर लांबीचा चालण्याचा मार्ग बनवला आहे. या जलाशयात तुम्ही बोटिंग चा आनंद घेऊ शकता. तसेच येथे लहान मुलांसाठी खेळण्याची जागा, घोडेस्वारी आणि ट्रेकिंगची सोय आहे.
20)Snehatheeram Beach-

स्नेहाथीराम बीच हा केरळच्या त्रिशूर जिल्ह्यातील, थालीकुलम गावात अरबी समुद्राच्या किनाऱ्यावर वसलेला एक अत्यंत शांत आणि नयनरम्य समुद्रकिनारा आहे. मल्याळम भाषेत ‘स्नेहाथीरम’ या शब्दाचा अर्थ “प्रेमाचा किनारा” असा होतो. हा बीच खूप स्वच्छ, शांत आणि गर्दी नसलेला आहे. व किनार्यावर नारळाच्या बागा आहेत. केरळ सरकारच्या पर्यटन विभागातर्फे 2010 मध्ये या किनाऱ्याला ‘सर्वोत्कृष्ट बीच टुरिझम डेस्टिनेशन’ म्हणून गौरवण्यात आले होते. येथील सोनेरी वाळू, पांढरे स्वच्छ पाणी आणि संध्याकाळचा दिसणारा विहंगम सूर्यास्त पर्यटकांना आकर्षित करतो. या किनाऱ्यालगतच लहान मुलांसाठी एक सुंदर पार्क बनवले आहे, व येथे एक मोठे सागरी मत्स्यालय आणि फिरण्यासाठी टाइल्स बसवलेला सुंदर वॉकवे आहे.
21)Vaidyaratnam Ayurveda Museum-

वैद्यरत्नम आयुर्वेद संग्रहालय हे केरळच्या त्रिशूर जिल्ह्यातील ओल्लूरजवळील थाईक्कट्टुसेरी येथील भारताचे पहिले आयुर्वेद संग्रहालय आहे. भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांनी 28 डिसेंबर 2013 रोजी या संग्रहालयाचे उद्घाटन केले होते. हे संग्रहालय ‘वैद्यरत्नम औषधशाळा’ समूहाचा एक भाग असून, त्याचे संस्थापक श्री. ई. टी. नीलकंठन मूस यांच्या जन्मशताब्दी स्मृतीप्रित्यर्थ हे उभारण्यात आले आहे. तसेच संग्रहालयाच्या समोर आयुर्वेदाचे देव भगवान धन्वंतरी यांचे मोठे शिल्प आहे. हे एक डिजिटल थिएटर आहे, जिथे ऑडिओ-व्हिज्युअल शो आणि सादरीकरणाद्वारे आयुर्वेदाची ओळख करून दिली जाते. यामध्ये पौराणिक, अष्टवैद्यांनी वापरलेले जुने दुर्मिळ ग्रंथ, वैदिक काळापासून ते मध्ययुगापर्यंतच्या आयुर्वेदाचा इतिहास सांगितला आहे. आणि या संग्रहालयाच्या परिसरात 300 पेक्षा जास्त प्रकारच्या दुर्मिळ औषधी वनस्पतींची बाग आहे.
22)Koodalmanikyam Temple, Irinjalakuda-

कूडलमणिक्यम मंदिर हे केरळच्या त्रिशूर जिल्ह्यातील, इरिंजलकुडा येथील प्राचीन मंदिर आहे. हे मंदिर प्रभू श्रीरामांचे बंधू ‘भरत’ यांना समर्पित असून येथे मुख्य मूर्ती भगवान विष्णूची असली तरी, येथे ‘भरत’ यांची पूजा केली जाते. आणि देवाला “संगमेश्वर” (संगमाचा देव) असेही म्हणतात. हे मंदिर केरळमधील नलंबलम (चार भावंडांची मंदिरे) या प्रसिद्ध यात्रेचा एक भाग आहे, जिथे राम, भरत, लक्ष्मण आणि शत्रुघ्न यांच्या मंदिरांना भेट दिली जाते. मल्याळम महिन्यातील ‘कार्किडकम’ (जुलै-ऑगस्ट) मध्ये या चारही मंदिरांचे एकाच दिवसात दर्शन घेणे अत्यंत शुभ मानले जाते.
23)Mammiyur Mahadeva Temple-

मम्मियूर महादेव मंदिर हे केरळच्या त्रिशूर जिल्ह्यातील, गुरुवायूर येथील अत्यंत पवित्र आणि प्रसिद्ध शिवमंदिर आहे. हे मंदिर केरळमधील 108 प्रसिद्ध शिवमंदिरांपैकी एक असून भाविकांच्या मते प्रसिद्ध गुरुवायूर श्री कृष्ण मंदिराला भेट देणाऱ्या प्रत्येक भक्ताची यात्रा मम्मियूर महादेवाचे दर्शन घेतल्याशिवाय पूर्ण होत नाही. या मंदिरात भगवान शिव हे ‘उमा महेश्वर’ या रूपात विराजमान आहेत. आणि मंदिर परिसरात भगवान विष्णूचेही एक स्वतंत्र मंदिर आहे व मंदिरात गणपती, सुब्रह्मण्य (कार्तिकेय), अय्यप्पन, महाकाली आणि सर्प देवता यांच्याही मूर्ती आहेत. हे मंदिर पारंपरिक केरळ वास्तुकलेचा उत्कृष्ट नमुना आहे. व मंदिराच्या भिंतींवर हिंदू पौराणिक कथांचे दर्शन घडवणारी अतिशय सुंदर भित्तिचित्रे आणि कोरीव काम पाहायला मिळते.
24)Sree Kurumba Bhagavathy Temple, Kodungalloor-



श्री कुरुंबा भगवती मंदिर (कोडुंगल्लूर देवी मंदिर) हे केरळच्या त्रिशूर जिल्ह्यातील कोडुंगल्लूर शहरातील प्राचीन आणि ऐतिहासिक मंदिर आहे. हे मंदिर देवी भद्रकालीला (महाकालीचे उग्र रूप) समर्पित असून, त्यांना स्थानिक पातळीवर ‘श्री कुरुंबा’ किंवा ‘कोडुंगल्लूर अम्मा’ (कोडुंगल्लूरची आई) म्हटले जाते. आणि हे मंदिर केरळमधील 64 भद्रकाली मंदिरांचे मुख्य केंद्र मानले जाते. हे मंदिर दहा एकर परिसरात विस्तारलेले असून या मंदिरातील गर्भगृहात देवी भद्रकालीची सुमारे 6 फूट उंच लाकडी मूर्ती आहे, जी फणसाच्या झाडाच्या लाकडापासून बनवली आहे. देवीचे तोंड उत्तरेकडे असून तिच्या आठ हातांत विविध शस्त्रे, घंटा आणि असुराचे मस्तक आहे. या मंदिरात भरणी उत्सव हा मार्च ते एप्रिल दरम्यान साजरा होतो. व थलापोळी उत्सव हा डिसेंबर ते जानेवारी महिन्यांत 4 दिवस चालणारा दुसरा मोठा सण आहे.
25)Payammal Sree Shathrugna Swamy Temple-


पायम्मल शत्रुघ्न स्वामी मंदिर हे केरळच्या त्रिशूर जिल्ह्यातील पायम्मल येथील भगवान रामाचे सर्वात लहान भाऊ ‘शत्रुघ्न’ यांना समर्पित असलेल्या मोजक्या मंदिरांपैकी एक आहे. हे मंदिर केरळमधील प्रसिद्ध ‘नलंबलम’ (चार मंदिरे) यात्रेचे अंतिम आणि चौथे प्रमुख तीर्थस्थान मानले जाते. येथे पूजनीय असलेले शत्रुघ्न हे भगवान विष्णूच्या सुदर्शन चक्राचे अवतार मानले जातात. नलंबलम यात्रेत, कार्किडकम (मल्याळम महिना, साधारणपणे जुलै-ऑगस्ट) या पवित्र महिन्यात या चारही मंदिरांना एका दिवसात भेट देण्याची परंपरा आहे. भक्तगण अनुक्रमे श्री रामाचे (त्रिप्रयार), श्री लक्ष्मणाचे (तिरुमुझिक्कलम), श्री भरताचे (कूडलमानिक्यम) आणि शेवटी श्री शत्रुघ्नाचे (पायम्मल) येथे दर्शन घेतात.
1)त्रिशूर संग्रहालय आणि प्राणीसंग्रहालय कधी सुरू झाले?
त्रिशूर प्राणिसंग्रहालय आणि संग्रहालय, 1885 मध्ये सुरू झाले.
2)त्रिशूर जिल्ह्यातील पुमला धरण कोणत्या ठिकाणी आहे?
पुमला धरण हे त्रिशूर येथील पुझक्कल ब्लॉक अंतर्गत मुलंकुन्नाथुकावू पंचायत येथील एक सिंचन धरण आणि पर्यटन स्थळ आहे.
3)पुन्नाथूर कोट्टा हत्ती अभयारण्य हे कोणत्या ठिकाणी आहे?
पुन्नाथूर कोट्टा हत्ती अभयारण्य हे गुरुयुरपासून 3 किमी अंतरावर, भारतातील सर्वात मोठे हत्ती अभयारण्य आहे.


