भारतभ्रमंती या वेबसाईटवर पहा भारत देशातील प्रत्येक राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यातील पर्यटन स्थळांमध्ये, तामिळनाडू राज्यातील चेंगलपट्टू जिल्ह्यातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे.चेंगलपट्टू जिल्हा हा भारताच्या तामिळनाडू राज्यातील 38 जिल्ह्यांपैकी एक महत्त्वाचा जिल्हा आहे. 29 नोव्हेंबर 2019 रोजी कांचीपुरम जिल्ह्याचे विभाजन करून या नवीन जिल्ह्याची निर्मिती करण्यात आली. या जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र चेंगलपट्टू शहर आहे. या जिल्ह्याच्या उत्तरेस चेन्नई जिल्हा, पश्चिमेस कांचीपुरम आणि तिरुवनमलाई जिल्हा, तर दक्षिणेस विलुपुरम जिल्हा आहे. तसेच या जिल्ह्याला बंगालच्या उपसागराची 57 किमी लांबीची किनारपट्टी लाभली आहे. येथील पलार ही जिल्ह्यातील प्रमुख नदी असून येथे तामिळनाडूतील दुसरे सर्वात मोठे, 2,400 एकरवर पसरलेले ‘मधुरांतकम तलाव’ आहे. 25 places to visit in Chengalpattu District
या जिल्ह्यात चेंगलपट्टू, तांबरम, पल्लवरम, वंडलूर, श्रीपेरुंबुदूर जवळील तिरुपोरूर, तिरुकळुकुंद्रम, मदुरांतकम आणि चेय्यूर हे तालुके आहेत. ‘चेंगलपट्टू’ हे नाव येथील तलावांमध्ये मोठ्या प्रमाणात उमरणाऱ्या कमळाच्या फुलांवरून पडले आहे. चेंगलपट्टू हा तामिळनाडूतील अत्यंत वेगाने विकसित होणारा औद्योगिक जिल्हा असून येथे आयटी हब, ऑटोमोबाईल (मोटार वाहन) निर्मिती आणि अनेक मोठ्या बहुराष्ट्रीय आयटी कंपन्यांची कार्यालये आहेत. येथील महाबलीपुरम हे पर्यटन स्थळ जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित आहे.
25 places to visit in Chengalpattu District
चेंगलपट्टू जिल्ह्यातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
1)Mahabalipuram /Mamallapuram-








महाबलीपुरम / ममल्लापुरम हे तामिळनाडूच्या चेंगलपट्टू जिल्ह्यातील, बंगालच्या उपसागराच्या किनाऱ्यावर वसलेले एक ऐतिहासिक शहर आहे. हे शहर प्राचीन दगडी नक्षीकाम, समृद्ध संस्कृती, गुहा आणि भव्य मंदिरांसाठी जगभर प्रसिद्ध आहे. येथील ऐतिहासिक महत्त्व आणि अप्रतिम वास्तुकलेमुळे 1984 मध्ये युनेस्कोने या स्मारकांना जागतिक वारसा स्थळाचा दर्जा दिला. महाबलीपुरममधील स्मारके एकाच अखंड खडकातून कोरलेली आहेत, जी द्रविड स्थापत्यकलेचा उत्कृष्ट नमुना आहेत. येथील ग्रॅनाइटच्या दगडांनी बनवलेले भव्य किनारा मंदिर समुद्राच्या काठावर असून भगवान शिव आणि विष्णू यांना समर्पित आहे. त्यानंतर ‘पंच रथ’ हे महाभारतातील पाच पांडव आणि द्रौपदीच्या नावावरून ओळखली जाणारी ही 5 रथांसारखी मंदिरे एकाच मोठ्या खडकातून कोरलेली आहेत.
आणि ‘अर्जुनाचे प्रायश्चित्त’/ गंगेचे अवतरण हे खडकावर कोरलेले हे जगातील सर्वात मोठ्या खुल्या नक्षीकामांपैकी एक आहे. तसेच कृष्णाचा बटर बॉल हा एक निसर्गाचा चमत्कार आहे. एका तीव्र उतारावर एक अवाढव्य नैसर्गिक गोलाकार खडक शतकानुशतके एकाच जागी स्थिर उभा आहे. येथील गुहा मंदिरांमध्ये वराह गुहा आणि महिषासूरमर्दिनी गुहा ही प्राचीन दगडी मंदिरे पल्लव कलेची साक्ष देतात. स्मारकांसोबतच येथील विस्तीर्ण सोनेरी वाळूचे समुद्रकिनारे पर्यटकांचे आकर्षण आहे. दरवर्षी डिसेंबर-जानेवारी मध्ये येथे प्रसिद्ध भारतीय शास्त्रीय नृत्यांचा महोत्सव आयोजित केला जातो.
2)Sadras Dutch Fort-


सदरास डच किल्ला हा तामिळनाडू राज्यातील चेंगलपट्टू जिल्ह्यातील कल्पक्कमजवळील कोरोमंडल किनाऱ्यावर वसलेला एक ऐतिहासिक व व्यापारी किल्ला आहे. या ठिकाणाचे प्राचीन नाव ‘सदुरंगपट्टिनम’ असे होते. ब्रिटीश काळात त्याचे इंग्रजीकरण होऊन ‘सदरास’ हे नाव पडले. 1648 च्या सुमारास डच ईस्ट इंडिया कंपनीने येथे आपली व्यापारी वसाहत स्थापन केली. डच लोकांनी येथे येण्यापूर्वीच हा परिसर उत्कृष्ट मलमल कापड , मोती आणि खाद्यतेलाच्या व्यापारासाठी प्रसिद्ध होता.
या किल्ल्याच्या आवारात डच कालीन एक प्रचंड मोठे धान्य कोठार, किल्ल्यामध्ये हत्तींना प्रशिक्षण देण्याची जागा, घोड्यांचे तबेले आणि प्रवेशद्वाराजवळ जुन्या डच तोफा पाहायला मिळतात. तसेच किल्ल्यातील डच स्मशानभूमीतील थडग्यांवर डच भाषेतील कोरीव लेख आणि राजचिन्हे आजही स्पष्टपणे वाचता येतात. या किल्ल्याच्या नैऋत्य बुरुजाखाली दारूगोळा साठवण्यासाठी बांधलेली गुप्त तळघरे, भुयार आणि एक जुनी तुरुंगाची कोठडी उत्खननात सापडली आहे. सध्या हा किल्ला भारतीय पुरातत्व सर्वेक्षण (ASI) विभागाच्या राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित केला आहे.
3)Arignar Anna Zoological Park/ Vandalur Zoo-


अरिग्नार अण्णा प्राणीशास्त्र उद्यान/ वंडलूर प्राणीसंग्रहालय हे तामिळनाडूच्या चेंगलपट्टू जिल्ह्यातील, भारतातील पहिले सार्वजनिक आणि सर्वात मोठे प्राणीसंग्रहालय आहे. 1,490 एकर क्षेत्रात पसरलेले हे उद्यान दक्षिण आशियातील सर्वात मोठ्या प्राणीसंग्रहालयांपैकी एक असून या उद्यानाची स्थापना 1855 मध्ये एडवर्ड ग्रीन बालफोर यांनी चेन्नई सेंट्रल रेल्वे स्टेशनजवळ केली होती. नंतर हे उद्यान 1979 मध्ये वंडलूर राखीव जंगलात स्थलांतरित करण्यात आले. या उद्यानात 178 पेक्षा जास्त प्रजातींचे 2,300 पेक्षा जास्त प्राणी वास्तव्यास आहेत. पर्यटकांसाठी येथे पांढरा वाघ, आशियाई सिंह, बंगाल टायगर, बिबट्या आणि हत्ती हे मुख्य आकर्षण आहेत.
तसेच या उद्यानात सस्तन प्राणी, 60 पेक्षा जास्त पक्ष्यांच्या प्रजाती, सरपटणारे प्राणी, फुलपाखरू घर, निशाचर प्राण्यांचे घर आणि जलचर असे स्वतंत्र विभाग आहेत. पर्यटकांसाठी येथे ‘लायन सफारी’ आणि ‘डियर सफारी’ उपलब्ध असून हे उद्यान खूप मोठे असल्याने वृद्ध आणि मुलांसाठी उद्यानात फिरण्यासाठी बॅटरीवर चालणाऱ्या गाड्यांची सोय केली आहे. या उद्यानाला वन्यजीव संरक्षणातील उत्कृष्ट कामगिरीसाठी ‘इंदिरा गांधी पर्यावरण पुरस्कार’ मिळाला आहे.
4)Vedanthangal Bird Sanctuary-


वेदान्थंगल पक्षी अभयारण्य हे तामिळनाडूच्या चेंगलपट्टू जिल्ह्यातील, मदुरंतकम तालुक्यातील पक्ष्यांसाठी नंदनवन असलेले, अत्यंत प्रसिद्ध आणि ऐतिहासिक जलपक्षी अभयारण्य आहे. ब्रिटिश सरकारने 1936 मध्ये याला अभयारण्य म्हणून घोषित केले. आणि या दलदलीच्या व पाणथळ जागेचे आंतरराष्ट्रीय महत्त्व लक्षात घेऊन 2022 मध्ये याला ‘रामसर संरक्षित स्थळ’ म्हणून घोषित करण्यात आले आहे. तमिळ भाषेत ‘वेदान्थंगल’ चा अर्थ ‘शिकार्याचे गाव’ असा होतो, कारण प्राचीन काळी हा जमीनदारांचा शिकारीचा आवडता परिसर होता. हे अभयारण्य सुमारे 30 हेक्टर क्षेत्रावर पसरलेले असून येथे एक मोठा तलाव आहे, त्यात ‘बॅरिंग्टोनिया’ प्रजातीची झाडे पाण्यामध्ये अर्धवट बुडलेली आहेत. ही झाडे पक्ष्यांना घरटी बांधण्यासाठी आणि प्रजननासाठी नैसर्गिक आधार देतात. दरवर्षी हिवाळ्यात येथे जगभरातून 40,000 पेक्षा जास्त विविध प्रजातीचे प्रवासी पक्षी येतात.
Visit our website: allindiajourney.com
5)Madras Crocodile Bank Trust and Centre-



मद्रास क्रोकोडाइल बँक ट्रस्ट हे तामिळनाडूच्या चेंगलपट्टू जिल्ह्यातील मामल्लापुरम (महाबलीपुरम) जवळील ईस्ट कोस्ट रोडवरील प्रसिद्ध सरपटणारे प्राणीसंग्रहालय आणि संशोधन केंद्र आहे. हे केंद्र मगरींच्या संवर्धनासाठी बनवले असून या क्रोकोडाइल बँकेची स्थापना 1976 रोजी करण्यात आली. प्रसिद्ध निसर्गवादी आणि सर्पतज्ज्ञ रोम्युलस व्हिटेकर आणि झाई व्हिटेकर यांनी मगरींच्या प्रजाती वाचवण्यासाठी या संस्थेची सुरुवात केली होती. या संवर्धन केंद्रात जगभरातील मगरींच्या 15 पेक्षा जास्त प्रजाती आणि इतर 33 सरपटणाऱ्या प्राण्यांच्या (कासव, साप, सरडे) प्रजाती पाहायला मिळतात. तसेच येथे मगरींशिवाय किंग कोब्रा आणि इतर सापांवर संशोधन केले जाते, व विष काढण्याचे केंद्र चालवले जाते. पर्यटकांसाठी येथे ‘नाईट सफारी’, ‘झूकीपर फॉर अ डे’ आणि विविध माहितीपूर्ण कार्यशाळांचे आयोजन केले जाते.
6)Covelong / Kovalam Beach –


कोवलॉन्ग / कोवलम बीच हा तामिळनाडूतील चेंगलपट्टू जिल्ह्यातील एक अत्यंत प्रसिद्ध, निसर्गरम्य आणि शांत समुद्रकिनारा आहे. हे ठिकाण महाबलीपुरमच्या मार्गावर ईस्ट कोस्ट रोड जवळील एक सुंदर मासेमारी गाव आणि पर्यटन स्थळ म्हणून ओळखले जाते. 1720 च्या सुमारास कर्नाटकचे नवाब सआदत अली यांच्या काळात हे एक प्रमुख बंदर शहर म्हणून विकसित करण्यात आले होते. येथे फ्रेंच आणि ब्रिटीश सत्तांनी काही काळ राज्य केले. 1721 मध्ये बेल्जियन लोकांनी बांधलेला ऐतिहासिक किल्ला आज एक प्रसिद्ध लक्झरी रिसॉर्ट बनला आहे. या समुद्रकिनाऱ्याला पर्यावरणपूरक, स्वच्छ, आणि सुरक्षित मानकांसाठी प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय ‘ब्लू फ्लॅग’ प्रमाणपत्र मिळाले आहे. कोवलॉन्ग हे भारतातील पहिले सर्फिंग गाव म्हणून ओळखले जाते. येथे अनेक सर्फिंग स्कूल्स असून पर्यटक विंडसर्फिंग, जेट स्कीइंग आणि बोटिंगचा आनंद घेऊ शकतात. तसेच या समुद्रकिनाऱ्याजवळ 1770 मध्ये बांधलेले प्राचीन कॅथोलिक चर्च (अवर लेडी ऑफ माउंट कार्मेल), एक प्रसिद्ध दर्गा आणि मंदिर आहे.
7)Muttukadu Boat House-



मुत्तुकाडू बोट हाऊस हे तामिळनाडूच्या चेंगलपट्टू जिल्ह्यातील ईस्ट कोस्ट रोडवर वसलेले प्रसिद्ध आणि लोकप्रिय पर्यटन स्थळ आहे. हे ठिकाण चेन्नई शहराच्या मध्यभागापासून 36 किलोमीटर अंतरावर आहे. बंगालच्या उपसागराच्या आकर्षक खाडीच्या संथ पाण्यावर हे बोट हाऊस विकसित करण्यात आले असून, त्याचे व्यवस्थापन तामिळनाडू पर्यटन विकास महामंडळाद्वारे केले जाते. येथे पर्यटकांसाठी वेगवान बोट, वल्ह्याची बोट, मोटर बोट आणि पाण्याचा थरार अनुभवण्यासाठी वॉटर स्कूटर उपलब्ध आहेत. तसेच येथील बांबू बोट हाऊसमध्ये पर्यटकांसाठी एक सुंदर विश्रामगृह आणि खाण्यापिण्यासाठी उपहारगृहाची सोय आहे. बोटिंग करताना येथे पाण्याच्या आजूबाजूला विविध प्रकारचे स्थानिक आणि स्थलांतरित पक्षी पाहायला मिळतात.
8)Thirukalukundram Vedagiriswarar Temple-


थिरुकाळुकुंद्रम वेदगिरीश्वरर मंदिर हे तामिळनाडूच्या चेंगलपट्टू जिल्ह्यातील, प्राचीन शिव मंदिर आहे. या मंदिराला’पक्षितीर्थम’ किंवा ‘दक्षिण कैलास’ असेही म्हणतात. येथील 500 फूट टेकडीवरील मुख्य मंदिरात भगवान शिव ‘वेदगिरीश्वरर’ (स्वयंभू लिंग) रूपात विराजमान आहेत. आणि येथे जाण्यासाठी 565 पायऱ्या चढून जावे लागते. आणि टेकडीच्या पायथ्याशी ‘भक्तवत्शलेश्वरार मंदिरात’ भगवान शिव आणि माता पार्वतीचे ‘थिरिपुरसुंदरी अम्मन’ रूप पूजले जाते. या मंदिराला चार विशाल गोपुरम आहेत.
तमिळ भाषेत ‘थिरु’ म्हणजे पवित्र, ‘कझुगु’ म्हणजे गरुड/गिधाड आणि ‘कुंद्रम’ म्हणजे टेकडी. म्हणजेच ‘पवित्र गरुडांची टेकडी’. पौराणिक कथेनुसार, शापित ऋषींनी गरुडाचे रूप घेऊन येथे तपश्चर्या केली होती. आणि मंदिराच्या पुजाऱ्यांकडून नैवेद्य खात असत. त्यामुळे याला ‘काझुगु कोइल’ ( गरुड टेम्पल) म्हणतात.या टेकडीवरील शिव मंदिराच्या गाभाऱ्यासमोर नंदीची मूर्ती नाही, हे या मंदिराचे मोठे वैशिष्ट्य आहे. येथील ‘संगु तीर्थम’ या मंदिराच्या पवित्र तलावातून दर 12 वर्षांनी एकदा ‘नैसर्गिक शंख’ पाण्याच्या वर येतो, जो मंदिरात सुरक्षित ठेवला जातो.
9)Arulmigu Kandaswamy Temple, Thiruporur-

अरुल्मिगु कंधस्वामी मंदिर हे तामिळनाडूच्या चेंगलपट्टू जिल्ह्यातील, महाबलीपुरम रस्त्यावर थिरुपोरूर येथील भगवान मुरुगन (कार्तिकेय) यांचे प्रसिद्ध आणि प्राचीन मंदिर आहे. आख्यायिकेनुसार भगवान मुरुगन यांनी तीन वेगवेगळ्या ठिकाणी असुरांशी युद्ध केले होते व थिरुपोरूर येथे आकाशात त्यांनी ‘तारुकासूर’ नावाच्या राक्षसाचा वध केला होता. म्हणून या जागेला थिरुपोरूर (पवित्र युद्धभूमी) किंवा ‘समरापुरी’ असे म्हटले जाते. हे मंदिर 10 व्या शतकात पल्लव राजांनी बांधले होते. पुढे 17 व्या शतकात चिदंबर स्वामिगल नावाच्या मुरुगन भक्ताने या मंदिराचा जीर्णोद्धार केला. या मंदिरातील भगवान मुरुगन (कंधस्वामी) यांची मुख्य मूर्ती स्वयंभू असून येथे मुरुगन त्यांच्या दोन्ही पत्नी – वल्ली आणि देवयानी यांच्यासोबत उभे आहेत. हे मंदिर दक्षिण भारतीय द्रविड वास्तुकलेचा एक उत्कृष्ट नमुना असून मंदिराला 5 मजली भव्य राजगोपुरम आहे. आणि मंदिराच्या बाहेर ‘सरवण पोइगाई’ किंवा थिरुकुलम नावाचे एक मोठे आणि पवित्र पाण्याचे तळे आहे. दरवर्षी या मंदिरात स्कंद षष्ठी, थाई पूसम आणि ‘सूरसंहारम’ उत्सव मोठ्या उत्साहात साजरे केले जातात.
10)Nithya Kalyana Perumal Temple, Thiruvidanthai-


नित्य कल्याण पेरुमल मंदिर हे तामिळनाडूच्या चेंगलपट्टू जिल्ह्यातील, थिरुविदान्धाई येथील भगवान विष्णूच्या वराह अवताराला समर्पित असलेले प्राचीन आणि प्रसिद्ध मंदिर आहे. द्राविड स्थापत्यशैलीचे उत्तम नमुना असलेले, 1300 वर्षे जुने हे मंदिर भगवान विष्णूच्या 108 दिव्य देसम पैकी एक असून मंदिरात भगवान विष्णूंचे मुख्य रूप ‘आदि वराह पेरुमल’ (उभ्या मुद्रेतील वराह अवतार) आहे. त्यांच्या डाव्या मांडीवर त्यांची पत्नी ‘कोमलवल्ली थायर’ (लक्ष्मी माता) विराजमान आहेत. आख्यायिकेनुसार कालव महर्षींच्या 360 कन्यांशी विवाह करण्यासाठी भगवान विष्णूंनी दररोज एका कन्येशी याप्रमाणे संपूर्ण वर्षभर विवाह केला. म्हणूनच येथील उत्सव मूर्तीला ‘नित्य कल्याण पेरुमल’ (दररोज विवाह करणारे देव) असे म्हटले जाते. हे मंदिर विवाह जुळण्यात येणारे अडथळे दूर करण्यासाठी विशेष प्रसिद्ध असून ज्यांचे लग्न जमत नाही, ते भाविक येथे येऊन देवाला दोन हार अर्पण करतात.
11)Kolavai Lake & Palar River View Point-



कोलावई तलाव आणि पालाड नदी व्ह्यू पॉइंट हे तामिळनाडूच्या चेंगलपट्टू जिल्ह्यातील अतिशय सुंदर आणि लोकप्रिय निसर्गरम्य पर्यटन स्थळ आहेत. कोलावई तलाव हा चेंगलपट्टू जिल्ह्यातील दुसरा सर्वात मोठा आणि बारमाही गोड्या पाण्याचा तलाव आहे. या तलावाच्या एका बाजूला पसरलेल्या हिरव्यागार टेकड्या आणि दुसरीकडे अथांग पाणी यामुळे येथील सूर्योदय आणि सूर्यास्ताचे दृश्य अतिशय नयनरम्य दिसते. येथे नौकाविहार, निरीक्षण टॉवर आणि पक्षीनिरीक्षणाची सोय आहे. तसेच येथील पालाड पुलाजळील पालाड नदीच्या विशाल पात्राचे, नयनरम्य नदीकिनाऱ्याचे आणि आजूबाजूच्या ग्रामीण भागाचे विहंगम दृश्य दिसते. संध्याकाळच्या वेळी मावळत्या सूर्याचा प्रकाश अनुभवण्यासाठी व फोटो काढण्यासाठी स्थानिक आणि पर्यटक येथे गर्दी करतात.
12)DakshinaChitra Heritage Museum-



दक्षिणचित्र वारसा संग्रहालय हे तामिळनाडूच्या चेंगलपट्टू जिल्ह्यातील, मुत्तुकाडू येथे, दक्षिण भारतातील कला, वास्तुकला, जीवनशैली आणि हस्तकलेचे सादरीकरण करणारे एक प्रसिद्ध खुल्या हवेतील संग्रहालय आहे.’मद्रास क्राफ्ट फाउंडेशन’ या संस्थेमार्फत 1996 मध्ये हे संग्रहालय लोकांसाठी खुले करण्यात आले. हे फक्त प्राचीन वस्तू ठेवण्याचे संग्रहालय नसून एक संपूर्ण गाव आहे. येथे दक्षिण भारतातील राज्यांची (तामिळनाडू, केरळ, कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि तेलंगणा) पारंपरिक कला, वास्तुकला, पारंपरिक घरे, जीवनशैली आणि हस्तशिल्प जवळून अनुभवता येते. येथील वैशिष्ट्य म्हणजे तुम्हाला येथे विविध राज्यांमधील चेट्टिनाड शैलीतील भव्य हवेली, केरळची लाकडी घरे आणि विणकरांची पारंपरिक घरे पाहायला मिळतात. पर्यटक येथे स्वतः मातीची भांडी बनवण्याचा किंवा इतर हस्तकला शिकण्याचा आनंद घेऊ शकतात. याशिवाय येथे दक्षिण भारतीय पारंपरिक लोकनृत्ये आणि बाहुल्यांचे खेळ आयोजित केले जातात. पर्यटक येथे कारागिरांकडून बनवलेल्या हस्तकलेच्या वस्तू खरेदी करू शकतात.
13)Vallam Hill Cave Temples-


वल्लम टेकडी गुहा मंदिरे ही तामिळनाडूच्या चेंगलपट्टू जिल्ह्यातील, वल्लम गावातील छोट्या टेकडीवर, 1500 वर्षे जुने प्राचीन रॉक-कट (खडकात कोरलेले) मंदिरे आहेत. ही गुहा मंदिरे पल्लव राजवंश काळात 7 व्या शतकात राजा महेंद्रवर्मन याच्या राजवटीत डोंगराचा खडक कोरून तयार करण्यात आली होती. येथील गुहेच्या खांबांवर जुन्या तमिळ भाषेतील पल्लव काळातील सर्वात जुने शिलालेख आढळतात. या लहान टेकडीवर एकूण तीन रॉक-कट गुहा मंदिरे आहेत वरची गुहा वसंतेश्वरम शिव मंदिर, येथे त्यांना ‘वेदांतीश्वर’ या नावाने पूजले जाते आणि येथील देवीचे नाव ‘ज्ञानंबिकाई’ असून तिची मूर्ती पूर्व दिशेला तोंड करून आहे.
येथील खालच्या शिवगृहेत शिव लिंग आणि द्वारपालांची सुंदर कोरीव शिल्पे पाहायला मिळतात. तसेच येथील उत्तरी विष्णू गुहा मंदिर हे मंदिर भगवान विष्णू (करिवरदराज पेरुमल) यांना समर्पित असून येथे विष्णूंसोबत श्रीदेवी आणि भूदेवी यांच्या मूर्ती आहेत. येथील वैशिष्ट्य म्हणजे विनायक मूर्ती या ठिकाणी उभे राहून भगवान शिव, विनायक (गणपती), सुब्रमण्यम (मुरुगन) आणि अंबाळ यांचे दर्शन घेता येते. तामिळनाडू सरकारच्या पुरातत्व विभागाने या परिसराला संरक्षित ऐतिहासिक स्मारक म्हणून घोषित केले आहे.
14)Shri Maha Bhairavar Rudhra Alayam-




श्री महा भैरवर रुद्र आलयम हे तामिळनाडूच्या चेंगलपट्टू जिल्ह्यातील तिरुवाडीसोलम येथील ईचंकरणई गावातील प्रसिद्ध आणि अद्वितीय मंदिर आहे. हे मंदिर भगवान कालभैरवाला समर्पित असून या मंदिराचे गर्भगृह वर्तुळाकार आणि दोन स्तरांचे आहे. आणि विशेष म्हणजे या मंदिराच्या गर्भगृहाला दरवाजे नाहीत. या मंदिरातील मुख्य मूर्तीच्या मागे पायऱ्यांची अशी रचना केली आहे की, दर्शन घेऊन बाहेर पडताना कोणत्याही भक्ताला देवाकडे पाठ करून जावे लागत नाही. येथील मंदिर परिसर अतिशय स्वच्छ, शांत आणि सुंदर आहे. येथे विविध देवस्थानांच्या प्रतिकृती आणि इतर उप-मंदिरे आहेत. येथे दिवा किंवा कापूर लावण्यास मनाई आहे.
15)Gnanapureeswarar Temple-


ज्ञानपुरीश्वरर मंदिर हे तामिळनाडूच्या चेंगलपट्टू जिल्ह्यातील, तिरुवदिसूलम येथील प्राचीन शिव मंदिर आहे. हे मंदिर ‘श्री इदईसुरनाथर मंदिर’ म्हणूनही ओळखले जाते. शैव संप्रदायातील 276 पवित्र शिवक्षेत्रांपैकी हे 27 वे मंदिर आहे. भगवान शिव, यांना येथे श्री ज्ञानपुरीश्वरर किंवा इदईसुरनाथर म्हणून पूजले जाते. येथील मुख्य शिवलिंग हे स्वयंभू असून हिरव्या पाचू रत्नासारखे चमकणारे आहे. तर शिवांची अर्धांगिनी देवी गोवर्धन अंबिका यांचे येथे स्वतंत्र मंदिर आहे. हे मंदिर सातव्या शतकातील असून ते चोल आणि विजयनगर राजांच्या काळात बांधले गेले. मंदिराच्या भिंतींवर 15 ऐतिहासिक शिलालेख आढळतात. हे गाव दोन डोंगरांच्या आणि जंगलांच्या ‘मध्ये’ वसलेले असल्यामुळे याला मूळचे ‘तिरु इदईसुरम’ म्हटले जायचे, ज्याचे नंतर ‘तिरुवदिसूलम’ झाले.
16)Sri Vedagiriswarar Temple, Kumizhi-




श्री वेदगिरीश्वर मंदिर हे तामिळनाडूच्या चेंगलपट्टू जिल्ह्यातील, कुमिझी गावातील श्री त्रिपुंर सुंदरी समेत 1200 वर्षांपेक्षा जुने आणि पवित्र शिवमंदिर आहे. हे मंदिर निसर्गरम्य, घनदाट जंगलाच्या शांत वातावरणात असून मंदिर परिसर तीन बाजूंनी औषधी वनस्पतींनी समृद्ध असलेल्या टेकड्यांनी (डोंगरांनी) वेढलेला आहे. मंदिराच्या गर्भगृहात भगवान शिव ‘श्री वेदगिरीश्वरर’ (शिवलिंग रूपात) आणि त्यांच्या शेजारी माता पार्वती ‘श्री त्रिपुरा सुंदरी’ देवीच्या रूपात विराजमान आहेत. येथील मंदिराच्या पवित्र तलावाला ‘सरोनी तडागम’ असे म्हणतात. आजूबाजूच्या डोंगरांवरून औषधी वनस्पतींचा स्पर्श करून येणारे पाणी या तलावात जमा होते. लोकांची अशी श्रद्धा आहे की या पाण्यात स्नान केल्याने जुने आजार बरे होतात. मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारावर 18 फूट उंच विनायकाची मूर्ती आहे. या मंदिरात महाशिवरात्री, प्रदोष पूजा, विनायक चतुर्थी, नवरात्री आणि अय्यप्पा पूजा थाटामाटात साजरी केली जाते.
17)Sri Prasanna Venkatesa Perumal Temple, Thirumalai Vaiyavoor-




श्री प्रसन्न वेंकटेश पेरुमल मंदिर हे तामिळनाडूच्या चेंगलपट्टू जिल्ह्यातील, थिरुमलाई वैयावूर येथील एका टेकडीवर वसलेले प्राचीन आणि प्रसिद्ध वैष्णव मंदिर आहे. येथील पेरुमल (भगवान विष्णू) यांचे रूप हुबेहूब तिरुपती बालाजीसारखे असल्यामुळे या मंदिराला भाविक “दक्षिण तिरुपती” म्हणूनही ओळखतात. हे मंदिर 1,000 वर्षांपेक्षा जुने असून थोंडाईमान राजा यांनी या मंदिराची स्थापना केली होती. तसेच या मंदिरात भगवान आदि वराह स्वामी आहेत. त्यामुळे येथे मुख्य दर्शन घेण्यापूर्वी आदि वराहांचे दर्शन घेण्याची प्रथा आहे. या मंदिराच्या टेकडीच्या पायथ्याशी उड्डाण करणाऱ्या मुद्रेत श्री वीर अंजनेयार (हनुमान) यांचे एक स्वतंत्र मंदिर आणि वराह तीर्थ नावाचा एक पवित्र पाण्याचा तलाव आहे.
18)Srinivasa Perumal Temple, Semmancheri-



श्री श्रीनिवास पेरुमल मंदिर हे तामिळनाडूच्या चेंगलपट्टू जिल्ह्यातील, सेम्मनजेरी येथील, जुन्या महाबलीपुरम रोडवरील भगवान विष्णूंना समर्पित असलेले एक अत्यंत पवित्र आणि प्राचीन मंदिर आहे. हे मंदिर 1500 वर्षांपेक्षा जुने असून त्याचे बांधकाम पल्लव राजांच्या काळात झाले आहे. त्यानंतरच्या काळात नायक राजे आणि चेट्टियार समुदायाने या मंदिराचा जीर्णोद्धार केला. पौराणिक कथेनुसार, या भागात मोठा दुष्काळ पडला होता. तेव्हा पल्लव राजा नरसिंह पल्लव यांनी जनतेचे दुःख दूर करण्यासाठी भगवान श्रीनिवास पेरुमल यांची मनोभावे प्रार्थना केली. त्यांच्या प्रार्थनेवर प्रसन्न होऊन प्रभू श्रीनिवासांनी दर्शन दिले आणि या भागात मुसळधार पाऊस पाडला. त्यामुळे येथे नवसाला पावणारे देव म्हणून श्रीनिवासांची पूजा केली जाते. या मंदिरात भगवान विष्णूंचे रूप श्रीनिवास पेरुमल हे मुख्य देवता आहेत. आणि भगवान विष्णूंच्या सोबत त्यांची पत्नी देवी अलमेलू मंगाया (लक्ष्मी) यांचे स्वतंत्र आणि सुंदर गर्भगृह आहे. जे भाविक तिरुपतीला जाऊ शकत नाहीत, ते या मंदिरात येऊन आपला नवस पूर्ण करतात.
19)Mahishasura Mardhini Cave temple-


महिषासुरमर्दिनी गुफा मंदिर / महिषासुरमर्दिनी मंडप किंवा यमपुरी हे तामिळनाडू राज्यातील चेंगलपट्टू जिल्ह्यातील महाबलीपुरम येथील ऐतिहासिक खडक कापून तयार केलेले अद्भूत गुफा मंदिर आहे. हे मंदिर सातव्या शतकाच्या उत्तरार्धातील पल्लव राजवटीच्या अद्भूत वास्तुकलेचे उत्कृष्ट उदाहरण असून ते युनेस्को जागतिक वारसा स्थळाचा एक भाग आहे. या गुफा मंदिराची निर्मिती पल्लव वंशाचे राजे नरसिंहवर्मन आणि महेंद्रवर्मन यांच्या काळात 7 व्या शतकात झाली आहे. या गुहेच्या भिंतींवर तीन सुंदर अशी शिल्पे कोरलेली आहेत. त्यामध्ये महिषासुरमर्दिनी शिल्प: दुसऱ्या बाजूला भगवान विष्णू हे आदिशेष सर्पावर योगनिद्रेत विश्राम करत असल्याचे सुंदर शिल्प आहे. आणि गुहेच्या मध्यवर्ती भागात भगवान शिव, माता पार्वती आणि कार्तिकेय यांचे शिल्प कोरलेले आहे, हे मंदिर एका ग्रॅनाइटच्या टेकडीवर, महाबलीपुरमच्या ऐतिहासिक दीपगृहाजवळ वसलेले असून या गुहेच्या वरच्या बाजूला ओलाक्कनेश्वर हे प्राचीन मंदिर आहे.
20)Alamparai Fort-




आलमपराई किल्ला हा तामिळनाडूच्या चेंगलपट्टू जिल्ह्यातील कडापक्कम गावानजीक, ईस्ट कोस्ट रोडवर समुद्रकिनाऱ्याजवळील ऐतिहासिक आणि निसर्गरम्य किल्ला आहे. या किल्ल्याची निर्मिती 17 व्या शतकात मुघल काळात झाली. या किल्ल्यात 100 मीटर लांबीचे जहाज बांधणी आणि थांबण्याचे ठिकाण थेट समुद्रात पसरलेले होते. येथून जरीचे कापड, मीठ आणि तूप यांसारख्या वस्तूंची युरोप आणि इतर देशांमध्ये मोठी निर्यात केली जात होती. हा किल्ला 15 एकर परिसरामध्ये पसरलेला असून त्याची निर्मिती प्रामुख्याने विटा आणि चुनखडी वापरून करण्यात आली आहे. सध्या हा किल्ला जिर्ण अवस्थेत असून या किल्ल्यावरून बंगालचा उपसागर आणि सभोवतालच्या खाडीचे विहंगम दृश्य दिसते.
21)Ganesha Ratha Temple-

गणेश रथ मंदिर हे तामिळनाडूच्या चेंगलपट्टू जिल्ह्यातील महाबलीपुरम (ममल्लापुरम) येथील ऐतिहासिक आणि प्रसिद्ध एकाश्म मंदिर आहे. या मंदिराची निर्मिती 7 व्या शतकात पल्लव राजा महेंद्रवर्मन प्रथम आणि नरसिंहवर्मन प्रथम (मामल्ल) यांच्या काळात झाली. उत्कृष्ट वास्तुकलेचा नमुना असलेले हे मंदिर 1984 पासून ते युनेस्को जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित केलेल्या स्मारकांच्या समूहाचा एक भाग आहे. महाबलीपुरममधील हे मंदिर गुलाबी ग्रॅनाइटच्या एकाच अखंड मोठ्या खडकातून कोरून काढलेले द्राविडी शैलीतील मंदिर आहे. गणेश रथ हा संपूर्णपणे पूर्ण झालेला उत्कृष्ट खडकात कोरलेला रथ आहे. हे मंदिर सुरुवातीला भगवान शिवाच्या पूजेसाठी बांधण्यात आले होते, 1880 मध्ये गावकऱ्यांनी येथे भगवान गणेशाची मूर्ती प्रस्थापित केली. तेव्हापासून याला ‘गणेश रथ’ म्हणून ओळखले जाते.
22)Madurantakam lake-

मदुरांतकम तलाव हा तामिळनाडूच्या चेंगलपट्टू जिल्ह्यातील, सर्वात मोठा कृत्रिम तलाव आहे. हा प्राचीन तलाव सुमारे 2,400 एकर क्षेत्रावर पसरलेला असून, चोल वंशाचे राजे उत्तम चोल यांनी या तलावाची निर्मिती केली होती. हा तलाव 1,000 वर्षांपेक्षा जास्त जुना आहे. व चेंगलपट्टू जिल्ह्यातील किलियार नदीच्या खोऱ्यात बांधण्यात आला आहे. या तलावाच्या काठावर प्रसिद्ध ‘एरी-काथा रामर मंदिर’ आहे. आणि तलावाच्या पाण्यावर 36 गावांमधील 2,800 एकरपेक्षा जास्त शेतजमीन पिकांसाठी अवलंबून आहे. तसेच या तलावामुळे आजूबाजूच्या परिसरातील भूजल पातळी टिकून राहण्यास मोठी मदत होते. हा तलाव निसर्गरम्य दृश्यांसाठी स्थानिक पर्यटकांमध्ये लोकप्रिय असून तलावाच्या जवळ वेदांथंगल पक्षी अभयारण्य आहे.
23)Adhiparasakthi Siddhar Peetam-



अरुल्मिगु अधिपराशक्ती सिद्धर पीठम हे तमिळनाडूच्या चेंगलपट्टू जिल्ह्यातील, मेलमारुवथुर येथील पवित्र मंदिर आहे. या स्थानाला ‘सिद्धर पीठम’ म्हटले जाते. येथे वेगवेगळ्या धर्मांतील 21 महान संत आणि सिद्धांनी जीव-समाधी घेतली आहे, असे मानले जाते. 1960 च्या दशकात येथे एक कडुनिंबाचे झाड होते. वादळात ते झाड पडल्यानंतर तिथे एक स्वयंभू मूर्ती सापडली. नंतर 1977 मध्ये येथे आदिपराशक्ती मातेची 3 फूट उंच आणि हजार पाकळ्यांच्या कमळावर बसलेली भव्य मूर्ती स्थापन करण्यात आली. या मंदिराचे आध्यात्मिक प्रमुख बंगारू आदिगालर होते. या पीठाचा मुख्य सिद्धांत “एक माता, एक मानवता” असा आहे. येथे जात, धर्म, पंथ किंवा लिंग असा कोणताही भेदभाव न करता सर्व मानव एक आहेत आणि देवी मातेची लेकरे आहेत, अशी शिकवण येथे दिली जाते. या मंदिरात दररोज सकाळी 11 वाजता भक्तांना मोफत अन्नदान केले जाते.
24)Sri Kailasanathar Temple, Parameswaramangala-


श्री कैलासनाथर मंदिर हे तामिळनाडूच्या चेंगलपट्टू जिल्ह्यातील परमेश्वरमंगलम येथे पलार नदीच्या एका बेटावर वसलेले प्रसिद्ध मंदिर आहे. या मंदिराला ‘आयलंड टेम्पल’ असेही म्हणतात. हे मंदिर साधारणपणे 9 व्या शतकात पल्लव राजा नृपतुंगवर्मन याच्या काळात बांधले गेले असून, येथे भगवान शिव ‘कैलासनाथर’ आणि माता पार्वती ‘देवी कनकांबिगाई’ रूपात विराजमान आहेत. पल्लव कालीन वास्तुकला, सिंह स्तंभ आणि ऐतिहासिक शिलालेख हे या मंदिराचे मुख्य आकर्षण आहे. एका पौराणिक कथेनुसार, माता पार्वतीने येथे गुडघ्यांच्या बळावर टेकडी चढून शंकराचा शोध घेतला होता, ज्याचे ठसे आजही खडकावर पाहायला मिळतात अशी भाविकांची श्रद्धा आहे. या नदी पात्रातून जाणाऱ्या पुलावरून चालत या मंदिरात जावे लागते, येथील निसर्गरम्य वातावरण पर्यटकांना आकर्षित करते. हे मंदिर चेन्नईपासून 80 किमी अंतरावर आहे.
25)Thiruvadisoolam, 108 Divyadesam Perumal Temple-





108 दिव्यदेसम पेरुमल मंदिर हे तामिळनाडूच्या चेंगलपट्टू जिल्ह्यातील, तिरुवडीसूलम येथील अत्यंत पवित्र मंदिर आहे. या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे संपूर्ण भारत आणि नेपाळमधील भगवान विष्णूंच्या 108 दिव्य देशम मंदिरांच्या हुबेहूब प्रतिकृती व मूर्ती येथे एकाच छताखाली दर्शनासाठी उपलब्ध आहेत. मूळ मंदिरांमध्ये भगवान विष्णू ज्या मुद्रेत आहेत, त्याच स्वरूपात येथील मूर्ती साकारण्यात आल्या आहेत. येथील मुख्य आराध्य दैवत श्री वारू वेंकटचालपथी पेरुमल असून, जे भक्त सर्व मंदिरांना भेट देऊ शकत नाहीत ते येथे एकाच ठिकाणी सर्व रूपे पाहू शकतात. या मंदिर परिसरात 51 फूट उंच देवी करुमारीअम्मन मूर्ती, महाभैरवर मंदिर आणि प्राचीन शिव मंदिर असल्याने येथे हरी-हर या दोन्हीचे दर्शन घडते.
1)महाबलीपुरम येथील महिषासुरमर्दिनी गुफा मंदिराची निर्मिती कोणत्या राजवटीत झाली?
महिषासुरमर्दिनी गुफा मंदिराची निर्मिती 7 व्या शतकात पल्लव राजवटीच्या काळात (राजे नरसिंहवर्मन आणि महेंद्रवर्मन यांच्या राजवटीत) झाली आहे.
2)तिरुवदिसूलम येथील ज्ञानपुरीश्वरर मंदिराचे मुख्य शिवलिंग कोणत्या वैशिष्ट्यासाठी प्रसिद्ध आहे?
ज्ञानपुरीश्वरर मंदिरातील मुख्य शिवलिंग हे स्वयंभू असून ते हिरव्या पाचू रत्नासारखे चमकणारे आहे.
3)महाबलीपुरम (ममल्लापुरम) येथील मुख्य ऐतिहासिक आकर्षणांची नावे काय आहेत?
महाबलीपुरम येथील आकर्षणामध्ये किनारा मंदिर, पंच रथ मंदिरे, कृष्णाचा बटर बॉल, गुहा मंदिरे, ‘वराह गुहा’ आणि ‘महिषासूरमर्दिनी गुहा’ यांचा समावेश आहे.


