कच्छ जिल्ह्यातील संपूर्ण पर्यटन स्थळे-Top 34 places to visit in Kutch District

मित्रांनो भारतभ्रमंती ही अशी वेबसाईट आहे, जिथे तुम्हाला भारत देशातील प्रत्येक राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यातील संपूर्ण पर्यटन स्थळांची माहिती मिळणार आहे. आता तुम्ही पाहणार आहात गुजरात राज्यातील कच्छ जिल्ह्यातील संपूर्ण पर्यटन स्थळे.कच्छ हा गुजरात राज्यातील सर्वात मोठा जिल्हा आहे. आणि भुज हे जिल्ह्याचे मुख्यालय आहे. या जिल्ह्याचे क्षेत्रफळ 45,674 चौरस किलोमीटर असून हा जिल्हा पाकिस्तानच्या सीमेला लागून आहे. तसेच कच्छ जिल्हा हा विशाल वाळवंटी प्रदेशात व्यापलेला आहे. Top 34 places to visit in Kutch District

येथील मीठ परिसर , दलदली, वन्यजीव अभयारण्ये, जंगली गाढवांचे अभयारण्य आणि धोलावीरा (सिंधू संस्कृती स्थळ) यासाठी हा जिल्हा ओळखला जातो. या जिल्ह्यात कच्छ , सिंधी आणि गुजराती भाषा बोलल्या जातात. या जिल्ह्यात दहा तालुके आणि सहा नगरपालिका आहेत.तसेच या जिल्ह्याला पाकिस्तान, राजस्थान, बनासकांठा आणि पाटण जिल्हा, आग्नेयेला सुरेंद्रनगर जिल्हा, दक्षिणेला कच्छचे आखात आणि राजकोट जिल्हा आणि 406

किलोमीटर लांबीची सर्वाधिक किनारपट्टी असलेला अरबी समुद्र या प्रदेशाच्या सीमा आहेत.कच्छ जिल्हा हा हस्तकला,भरतकाम, चामड्याचे काम, मातीकाम, लाकूडकाम, बाटिक, बांधणी, विणकाम, रोगन,चांदीचे काम, माती-आरशाचे काम यासाठी देखील प्रसिद्ध आहे. आणि कच्छ जिल्हा ‘ऑफ द बीटन ट्रॅक’ साहसांसाठी जगप्रसिद्ध आहे.

Top 34 places to visit in Kutch District

कच्छ जिल्ह्यातील संपूर्ण पर्यटन स्थळे

1)Vijay Vilas Palace-

Top 34 places to visit in Kutch District


विजय विलास पॅलेस राजवाडा हा गुजरातच्या कच्छ जिल्ह्यातील एक ऐतिहासिक उन्हाळी राजवाडा आहे. हा राजवाडा मडवी शहरापासून सात किलोमीटर अंतरावर असून कच्छचे महाराव तिसरे यांच्या कारकिर्दीत सन 1929 मध्ये बांधला गेला. आणि त्यांचा मुलगा, युवराज श्री विजयराजजी यांच्या नावावरून विजय विलास पॅलेस असे नाव देण्यात आले.हा राजवाडा राजस्थानी आणि कच्छी वास्तुकला शैलीचा सुंदर संगम आहे. व लाल वाळूच्या दगडाने बांधला आहे.

या राजवाड्याच्या खांबांवर उंच घुमट, बाजूंना बंगाल घुमट, रंगीत काचेच्या खिडक्या, कोरीव दगडी ‘जली’, उत्कृष्ट नक्षीकाम, रंगीबेरंगी काचेचे काम, भित्तिचित्रे आणि संगमरवरी कारंजे आहेत. आणि या राजवाड्याच्या परिसरात एक खासगी समुद्रकिनारा आहे. त्यामुळे पर्यटकांसाठी हे शांत आणि रम्य विश्रांतीचे ठिकाण आहे. तसेच या राजवाड्यात अनेक बॉलिवूड चित्रपटांचे चित्रीकरण झाले आहे.या राजवाड्यात विजयराज यांच्या स्मरणार्थ छत्री बांधली आहे.

2)Great Rann Of Kutch-


कच्छचे महान रण हे पश्चिम गुजरातमधील कच्छ जिल्ह्यातील थार वाळवंटातील एक मीठ, खाऱ्या दलदलीचा प्रदेश आहे. हे महान रण पांढऱ्या खाऱ्या वाळवंटातील वाळूसाठी प्रसिद्ध आहे.व सुमारे 7500 किमी क्षेत्रफळाचे आहे, आणि जगातील सर्वात मोठ्या मीठ वाळवंटांपैकी एक म्हणून ओळखले जाते. या भागात कच्छी लोकांची वस्ती असून, हे ठिकाण गुजरात आणि पाकिस्तानमधील सिंध प्रांत यांच्यामध्ये आहे.कच्छच्या रण प्रदेशात फ्लेमिंगो आणि जंगली गाढवे,दंडगोलाकार मातीच्या झोपड्या असलेल्या आदिवासी वस्त्या,कच्छी भरतकाम,

चामड्याचे काम, मातीची भांडी, बेल मेटल क्राफ्ट आणि तज्ञ कुटुंबाच्या प्रसिद्ध रोगन चित्रकलेचे केंद्र आहे. तसेच छायाचित्रकार आणि निसर्गप्रेमींसाठी हे ठिकाण एक स्वर्ग आहे. गुजरात सरकार दरवर्षी डिसेंबर ते फेब्रुवारी या कालावधीत तीन महिने चालणारा ‘रण उत्सव’ आयोजित करते. त्यावेळी जगभरातून पर्यटक स्थानिक पदार्थांचा आस्वाद घेण्यासाठी आणि कच्छची संस्कृती पाहण्यासाठी येतात.

3)Aina Mahal-

ऐना महाल (आरशांचा राजवाडा) हा गुजरातमधील कच्छ जिल्ह्यातील भुज येथील प्राग महालाच्या शेजारी असलेला एक ऐतिहासिक राजवाडा आहे. हा महाल 18 व्या शतकात 1761 मध्ये राव लखपतजी यांनी बांधला होता. आणि या महालचे मुख्य वास्तुविशारद व डिझायनर राम सिंग मालम होते. हा राजवाडा युरोपियन शैलीत बांधला असून त्यामध्ये काच, आरसे आणि टाइल्सने सजवले आहे.

या राजवाड्यातील पहिल्या मजल्यावर प्रेक्षक हॉल, प्लेजर हॉल, द मिरर हॉल आणि स्टेट अपार्टमेंट्स आहेत, आणि दुसऱ्या मजल्यावर पूर्व-कक्ष, दरबार हॉल आणि विवाह हॉल आहे. सध्या या इमारतीचे संग्रहालयात रूपांतर करण्यात आले असून त्यामध्ये जुन्या कलाकृती, चित्रे, शस्त्रे, पालखी,घड्याळे, वस्तू, यांत्रिक खेळणी, चित्रे आणि ‘युरोपियनरी’ संग्रह आहे.

4)Dholavira –

Visit our website: allindiajourney.com


धोलावीरा हे गुजरात राज्यातील कच्छ जिल्ह्यातील भचौ तालुक्यातील खादिरबेट येथील एक अतिप्राचीन पुरातत्वीय स्थळ आहे. कच्छ वाळवंटी वन्यजीवन अभयारण्याचा भाग असलेल्या या ठिकाणी हडप्पा संस्कृतीचे अवशेष सापडले असून भारतीय इतिहासात या ठिकाणाला मोठे महत्त्व आहे. हे प्राचीन गाव 100 हेक्टरमध्ये पसरलेले असून येथे इ.स.पू. 2650 ते इ.स.पू. 2100 पर्यंत वस्ती होती. युनेस्को या संघटनेने धोलावीरा येथील हडप्पाकालीन प्राचीन अवशेषांचे महत्त्व लक्षात घेऊन,या ठिकाणाला जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित केले आहे. या ठिकाणी मातीच्या विटा आणि दगडांपासून बनवलेल्या इमारती चांगल्या स्थितीत आहेत.

येथील इमारतींची अद्भुत रचना पाहिल्यानंतर त्या वेळचे लोक वास्तूकलेमध्ये किती प्रगत होते याची प्रचिती येते. तसेच धोलावीरा हे एक व्यापारी केंद्र होते, कारण या शहरात मोती बनवण्याचा एक मोठा कारखाना आणि जीवाश्मांमध्ये तांबे भट्टीचे कारखाने सापडले आहेत. व मोठे जलाशय आणि धरण व पाच हजार वर्षांपूर्वीची पायऱ्यांची विहीर सापडली आहे. याशिवाय येथे मातीची भांडी, सिंधू लिपीची अक्षरे असलेला एक मोठा फलक, गोलाकार नाणे, छिद्र असलेली मातीची भांडी, शंखाच्या बांगड्या, छोटी पाणी पिण्याची भांडी, तांब्याच्या बांगड्या, वशिंड असलेल्या प्राण्यांच्या छोट्या मातीच्या मूर्ती अशा अनेक वस्तू सापडल्या आहेत.

5)Black Hill /Kala Dungar-


काळा डूंगर हे गुजरात राज्यातील कच्छ जिल्ह्यातील सर्वात उंच ठिकाण आहे. हे ठिकाण पाकिस्तानच्या सीमेजवळ असून येथे वरच्या बाजूला एक लष्करी चौकी आहे. या डोंगरावर 400 वर्षे जुने दत्तात्रेय मंदिर आहे.
या मंदिराबद्दल अशी आख्यायिका आहे की भगवान दत्तात्रेय या ठिकाणी आले असताना त्यांनी येथील भुकेल्या कोल्ह्यांना त्यांच्या शरीराने अन्न दिले होते, आणि ते सतत पुनर्जन्म घेत राहिले.

आजही, मंदिराचे पुजारी संध्याकाळच्या आरतीनंतर मंदिराजवळील एका विशिष्ट ठिकाणी कोल्ह्यांना प्रसाद देतात. तसेच येथील वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट म्हणजे,कालो डूंगर ही चुंबकीय टेकडी एक दृश्य भ्रम आहे जिथे वाहन गुरुत्वाकर्षणाला आव्हान देऊन उतारावरून वर जात असल्याचे दिसते.या टेकडीवरून कच्छच्या महान रणाचे विहंगम दृश्य दिसते.

6)Anjar-


अंजार हे गुजरातच्या कच्छ जिल्ह्यातील एक समृद्ध ऐतिहासिक व सांस्कृतिक शहर आहे. ऐतिहासिकदृष्ट्या वैविध्यपूर्ण असलेल्या या शहरात अनेक धार्मिक मंदिरे आहेत, त्यामध्ये माधवराई मंदिर, भरेश्वर महादेव मंदिर,अजयपाल मंदिर, पिंजोरा पीराचे पवित्र मंदिर, स्वामीनारायण मंदिर, आणि चौदाव्या शतकातील एका जोडप्याच्या सन्मानार्थ वडाच्या झाडाखाली बांधलेले जेसल-तोरल समाधी मंदिर यांचा समावेश आहे.

तसेच अंजार हे शहर सुंदर हस्तकला, वस्त्रनिर्मिती, प्रसिद्ध कच्छी भरतकाम आणि ब्लॉक-प्रिंटिंग कामासाठीही ओळखले जाते. 1819 आणि 2001 मध्ये झालेल्या भूकंपामध्ये या शहराचे बरेच नुकसान झाले. परंतु अंजारने नव्याने उभारी घेऊन पायाभूत सुविधांसह भक्कमपणे पुनर्बांधणी केली आहे.

7)Wild Ass Sanctuary-


वन्य गाढव अभयारण्य हे गुजरातच्या कच्छ जिल्ह्यातील लिटिल रन ऑफ कच्छच्या परिसरात असलेले भारतातील वन्य गाढवांचे एकमेव निवासस्थान आहे.1973 मध्ये वन्य गाढवांच्या संरक्षणासाठी या अभयारण्याची स्थापना करण्यात आली. हे अभयारण्य 5000 चौरस किलोमीटर क्षेत्रात पसरलेले असून, या अभयारण्यात 3000 पेक्षा जास्त वन्य गाढवे आहेत. आणि हे ठिकाण घुडखर म्हणून ओळखले जाते.

वन्य गाढवांशिवाय या अभयारण्यात हरिण, कोल्हे, नीलगाय काळवीट, लांडगे, पट्टेदार तरस हे वन्यजीव आढळून येतात. तसेच या अभयारण्यात डेझर्ट व्हीटियर्स, लार्क, बुलबुल, इंडियन कोर्सर्स, स्टोनप्लोव्हर्स, बदके, हंस, आयबिस, स्पूनबिल्स, गॉडविट्स, स्टिंट्स, सँडपायपर्स, शँक्स, मूरहेन्स, सारस क्रेन, फ्लेमिंगो असे अनेक प्रकारचे 75000 पेक्षा जास्त पक्षी येतात. निसर्गप्रेमी आणि पक्षी प्रेमींसाठी हे एक उत्तम ठिकाण आहे.

8)Kutch Museum-

कच्छ संग्रहालय हे गुजरातच्या कच्छ जिल्ह्यातील भूज येथे हमीरसर तलावासमोर असलेले एक महत्त्वाचे जुने संग्रहालय आहे. या संग्रहालयाची स्थापना 1877 मध्ये महाराव खेंगाराजी यांनी केली होती. या संग्रहालयात जुनी नाणी, भरतकाम, चित्रे, शस्त्रे, वाद्ये, शिल्पकला आणि मौल्यवान धातूकाम पारंपरिक कपडे व इतर ऐतिहासिक वस्तूंचा संग्रह आहे, त्याचबरोबर विलुप्त झालेली कच्छी लिपी,

पहिल्या शतकातील क्षत्रप शिलालेखांचा मोठा संग्रह आहे. आणि या संग्रहालयाचा एक भाग आदिवासी संस्कृतींशी निगडित आहे. त्यामध्ये आदिवासी लोकांची प्राचीन कलाकृती, लोककला, हस्तकला यांची माहिती प्रदर्शित केली आहे. हे संग्रहालय पाहिल्यानंतर कच्छच्या समृद्ध इतिहासाची आणि संस्कृतीची माहिती मिळते.

9)Mandvi Beach-

मांडवी बीच हा गुजरातच्या कच्छ जिल्ह्याच्या दक्षिणेकडील टोकावरील सुंदर, स्वच्छ सोनेरी-तपकिरी वाळूचा एक समुद्रकिनारा आहे. या समुद्रकिनाऱ्यावर पर्यटक आराम,समुद्रात पोहण्याचा आनंद घेऊ शकतात. आणि घोडेस्वारी,पवनचक्क्या, केळी बोटींग व पॅरासेलिंग या साहसी खेळांचा अनुभव घेऊ शकतात.

या बीच परिसरात ‘विजय विलास पॅलेस’ आणि ’72 जिनालय’ ही ऐतिहासिक स्थळे आहेत. या शांत समुद्रकिनाऱ्यावर पर्यटकांसाठी स्वादिष्ट फूड आणि स्टॉल्स उपलब्ध आहेत. त्यामुळे या शांत व रमनीय मांडवी बीचवर पर्यटकांची नेहमीच गर्दी असते.

10)Gandhidham-

गांधीधाम हे गुजरात राज्याच्या कच्छ जिल्ह्यातील एक सुनियोजित शहर आणि नगरपालिका आहे. गांधीधाम हे शहर 1950 साली भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सिंध प्रांतामधून (आताच्या पाकिस्तानमधून) स्थलांतरित झालेल्या हिंदू निर्वासितांसाठी वसवले गेले. या शहराचे नाव भारताचे जनक महात्मा गांधी यांच्या नावावर ठेवण्यात आले आहे.

गांधीधाम हे शहर कच्छचे आर्थिक केंद्र असून गुजरात राज्यातील जलदगतीने विकसित होणारे शहर आहे. तसेच हे शहर परिषद, व्यवसाय आणि बैठकींसाठी एक लोकप्रिय ठिकाण आहे. व गांधीधाम हे गुजरातमधील सर्वाधिक लोकसंख्या असलेले आठव्या क्रमांकाचे शहर म्हणून ओळखले जाते.

11)Kutch Wildlife Sanctuary-

कच्छ वाळवंट वन्यजीव अभयारण्य हे गुजरात राज्याच्या कच्छ जिल्ह्यातील गुजरातमधील सर्वात मोठे अभयारण्य आणि हंगामी खारट वाळवंट आहे. प्रचंड मोठे क्षेत्रफळ असलेल्या या अभयारण्यात पाणपक्षी, विविध पक्ष्यांच्या प्रजातींचे आणि सस्तन प्राण्यांसाठी आश्रयस्थान आहे. या ठिकाणी हजारो फ्लेमिंगो पक्षी घरटे आणि प्रजनन करतात. याशिवाय या अभयारण्यात वन्य गाढवे, मांजरींच्या प्रजाती,

वाळवंटातील कोल्हे, वाळवंटातील झाडे, कोरडे गवताळ प्रदेश, खडकाळ आणि काटेरी झुडुपे आणि पाणथळ जागा पाहायला मिळतात. तसेच हे अभयारण्य मीठ दलदलीसाठी प्रसिद्ध आहे. हा प्रदेश स्थानिक आणि स्थलांतरित पक्षांनी भरलेला असल्यामुळे पक्षी निरीक्षकांसाठी हे एक स्वर्गीय ठिकाण आहे. हे अभयारण्य फेब्रुवारी 1986 मध्ये अभयारण्य म्हणून घोषित केले.

12)Bhuj-

भूज हे गुजरात राज्याच्या कच्छ जिल्ह्यातील एक आकर्षक पर्यटन स्थळ आहे. हे शहर 1510 मध्ये राव हमिरजी यांनी बांधले आणि नंतर 1549 मध्ये राव खेंगाराजी यांनी कच्छच्या समृद्ध संस्थानाची राजधानी राज्य बनले. या शहरात अद्भुत हस्तकला,बाजार आणि हवेल्या,कापड पर्यटन आणि विलक्षण सौंदर्य असलेले भव्य राजवाडे आहेत. तसेच या शहरात ऐना महल, घंटा टॉवर पराग महल, कच्छ संग्रहालय, हमीरसर तलाव.

शाही स्मारके, स्वामीनारायण मंदिर ही पर्यटन स्थळे आहेत. 2001 च्या भूकंपात या शहराचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. परंतु येथील काही ठिकाणी आजही चांगल्या सुस्थितीत आहेत. या शहराचे नाव भुजियो डुंगर टेकडीवरून पडले आहे.जगभरातील लाखो पर्यटक दरवर्षी या शहराला भेट देत असतात.

13)Smritivan Earthquake Memorial and Museum-

स्मृतिवन भूकंप स्मारक आणि संग्रहालय हे गुजरात राज्याच्या कच्छ जिल्ह्यातील भूज येथे असलेले 2001 च्या गुजरात भूकंपातील बळींना समर्पित एक स्मारक उद्यान आहे. आणि भुज येथील भुजियो टेकडीवरील संग्रहालय आहे. हे स्मारक उद्यान 470 एकर क्षेत्रात पसरलेले असून या उद्यानात 5,00,000 पेक्षा जास्त भूकंपग्रस्तांना समर्पित झाडे लावली आहेत.

या ठिकाणी 11,500 चौरस मीटर क्षेत्रफळावर असलेल्या संग्रहालयात सात ब्लॉक आहेत. आणि ब्लॉक्समध्ये पुनर्जन्म, पुनर्शोध, पुनर्संचयित, पुनर्बांधणी, पुनर्विचार, पुनरुज्जीवन आणि नूतनीकरण या सात थीम आहेत.या संग्रहालयात भूकंपग्रस्तांना श्रद्धांजली म्हणून मियावाकी वन, सौर ऊर्जा प्रकल्, सन पॉइंट व 12932 भूकंपग्रस्तांच्या नावांच्या फलकांनी सजवलेले पन्नास धरणे आणि जलाशय आहेत.

14)Prag Mahal-

प्राग महाल हा गुजरात राज्याच्या कच्छ जिल्ह्यातील ऐना महालाच्या शेजारी असलेला एक महाकाय,सुंदर महाल आहे. हा राजवाडा 1860 च्या दशकात महाराजा प्रागमलजी द्वितीय यांनी बांधला होता. हा महाल इटालियन गॉथिक शैलीत बांधलेला असून या महालाचे महान डिझायनर कर्नल हेन्री सेंट विल्किन्स हे होते. हा संपूर्ण राजवाडा इटालियन संगमरवरी आणि वाळूच्या दगडापासून बनवला आहे, व त्यामध्ये उत्कृष्ट पुतळ्यांसह भव्य दरबार हॉल आणि झुंबर आहेत. या राजवाड्याचा एक भाग संग्रहालयात रूपांतरित केला आहे.

व या ठिकाणी भारतातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात उंच घड्याळ टॉवर आहे, ज्यावरून भूजचे विहंगम दृश्य दिसते. तसेच या राजवाड्याचा एक भागात संग्रहालय आहे त्यामध्ये अनेक अवशेष आणि राजघराण्याचे वैयक्तिक संग्रह प्रदर्शित केले आहेत. 2010 च्या भूकंपामुळे प्राग महालाचे बरेच नुकसान झाले होते,परंतु त्याचे नंतर नूतनीकरण करण्यात आले. तसेच हिंदी चित्रपट ‘लगान’ चा काही भाग येथे चित्रित करण्यात आला आहे.

15)Mata Na Madh-

माता नो मध हे गुजरात राज्याच्या कच्छ जिल्ह्यातील लखपत तालुक्यात एक गाव आहे. लहान ओढ्याच्या दोन्ही काठांवर टेकड्यांनी वेढलेल्या या गावात आशापुरा मातेचे एक मंदिर आहे. हे मंदिर 14 व्या शतकात आजो आणि अनगोर या दोन कराड वाणींनी बांधले होते. ते राजा लाखो फुलानी यांच्या काळात मंत्री होते. या मंदिरातील आशापुरा मातेची लाल रंगाच्या दगडाची मूर्ती सहा फूट उंच आणि पायथ्याशी सहा फूट रुंद आहे.

1819 मध्ये झालेल्या भूकंपात या मंदिराचे नुकसान झाले होते, त्यानंतर 1823 मध्ये सुंदरजी शिवजी आणि मेहता वल्लभाजी यांनी मंदिराची पुनर्बांधणी केली. आशापुरा माता ही जडेजा शासकांची कुलदेवता व कच्छची संरक्षक देवता मानली जाते. नवरात्रीमध्ये या ठिकाणी हजारो भाविक देवीच्या दर्शनासाठी येत असतात.

16)Lakhpat Fort-

लखपत किल्ला हा गुजरात राज्याच्या कच्छ जिल्ह्यातील एक ऐतिहासिक किल्ला आहे. हा किल्ला पाकिस्तान सीमेजवळील कोरी खाडीच्या तोंडावर असून फतेह मुहम्मद यांनी या किल्ल्याची पुनर्बांधणी आणि विस्तार केला आहे. हा किल्ला कठीण तपकिरी दगडाने बांधलेला आहे. व येथे 7 किमी लांबीच्या भिंती आहेत. या किल्ल्याच्या बुरुजांवरून रण ऑफ कच्छचा अद्भुत नजारा दिसतो. लखपत शहर हे एकेकाळी सिंधू नदीच्या काठावर वसलेले प्राचीन बंदर, व्यापार केंद्र आणि गजबजलेले शहर होते.

परंतु इ.स. 1819 मध्ये झालेल्या विनाशकारी भूकंपानंतर सिंधू नदीचा प्रवाह बदलला आणि त्यामुळे लखपत शहराचा ऱ्हास झाला. सध्या लखपत हे एक “भुतांचे शहर” म्हणून ओळखले जाते. कारण या तटबंदीच्या आत ओस पडलेल्या वाड्या, जुनी भग्न मंदिरे, हवेल्या , जुनी मशिदी, गुरुद्वारा आणि अत्यंत सुंदर नक्षीकाम असलेल्या इमारतींचे अवशेष पाहायला मिळतात.

17)Narayan Sarovar-

नारायण सरोवर हे गुजरात राज्याच्या कच्छ जिल्ह्यातील लखपत तालुक्यातील भगवान विष्णूंचे अवतार भगवान नारायण यांचे पवित्र धार्मिक तीर्थक्षेत्र आहे. हा तलाव पाच तलावांचे एकत्रितपणे पंच-सरोवर आहे. त्यामध्ये मानसरोवर, बिंदू सरोवर, नारायण सरोवर, पंपा सरोवर आणि पुष्कर सरोवर यांचा समूह आहे. त्यामुळे हे ठिकाण एक पवित्र तीर्थस्थळ मानले जाते. या तीर्थस्थळाबद्दल अशी आख्यायिका सांगितली जाते की,भगवान विष्णूच्या पायाने येथील

जमिनीला स्पर्श केला आणि तेथून पाण्याचा प्रवाह निर्माण झाला आणि त्यातून हे तलाव तयार झाले. 1981 मध्ये, या सरोवरा भोवतीचा परिसर नारायण सरोवर अभयारण्य म्हणून घोषित करण्यात आला. या तलावाभोवती महाराज देशलजींच्या राणीने बांधलेली श्री त्रिकामरायजी, रणछोरायजी, लक्ष्मीजी, लक्ष्मीनारायण, गोवर्धननाथजी, द्वारकानाथ आणि आदिनारायण अशी अनेक मंदिरे आहेत.

18) 72 Jinalaya-

72 जिनालय हे गुजरात राज्याच्या कच्छ जिल्ह्यातील मांडवीपासून 11 किमी अंतरावर, कोडय गावाजवळ असलेले एक जैन तीर्थक्षेत्र आहे. हे सुंदर मंदिर 80 एकर जागेत पसरलेले आहे.आणि भगवान महावीरांच्या 72 देऱ्यांचे विशाल मंदिर संकुलआहे. हे पवित्र तीर्थक्षेत्र जैन धर्मियांसाठी खूप महत्वाचे स्थान आहे.

हे अष्टकोनी आकाराचे ठिकाण 1982 मध्ये गुणसागर सुरीश्वरजी महाराजांच्या स्मृतिप्रीत्यर्थ बांधण्यात आले होते. हे तीर्थक्षेत्र ‘बौतेर जिनालय’ आणि ‘आदिश्वर बौतेर जिनालय महातीर्थ’ म्हणूनही ओळखले जाते. पर्यटक या अध्यात्मिक ठिकाणाला मोठा प्रमाणात भेट देतात.

19)Shree Koteshvar Mahadev Temple-

श्री कोटेश्वर महादेव मंदिर हे गुजरात राज्याच्या कच्छ जिल्ह्यातील कोटेश्वर गावात असलेले प्राचीन शिव मंदिर आहे. हे मंदिर नर्मदा नदी आणि अरबी समुद्राच्या संगमाजवळ स्थित असून भगवान शिव आणि रावण यांच्याशी संबंधित असलेल्या आख्यायिकेसाठी प्रसिद्ध आहे.त्यामध्ये रामाने दिलेल्या शिवलिंगाची चुकीने येथे स्थापना केली होती असे मानले जाते.

आणि या मंदिराला रामायणातही स्थान आहे. येथील मूळ मंदिर नष्ट झाले असले तरी, स्थानिक कच्छी लोकांनी आधुनिक मंदिराचे नूतनीकरण केले आहे. या मंदिरातून पाकिस्तानमधील कराचीतील दिव्यांची चमक रात्री स्पष्ट दिसते. नारायण सरोवरापासून हे मंदिर दोन किलोमीटर अंतरावर आहे.

20)Bhadreshwar Jain Temple-

भद्रेश्वर जैन मंदिर हे गुजरात राज्याच्या कच्छ जिल्ह्यातील मुंद्रा तालुक्यातील भद्रेश्वर गावात असलेले एक धार्मिक जैन तीर्थक्षेत्र आहे. हे सर्वात जुने जैन मंदिर असून येथील भद्रेश्वरची स्थापना राजा सिद्धसेनच्या काळात इ.स.पूर्व 516 मध्ये झाली असल्याचे सांगितले जाते.हे अध्यात्मिक मंदिर 72 जिनालय’ म्हणूनही ओळखले जाते. भद्रेश्वर मध्ये इ.स.पूर्व 500 मधील मूळ पार्श्वनाथ मूर्ती आहे.

आणि हे ठिकाण जैन मंदिरे, मशिदी आणि इतर ऐतिहासिक स्थळांसाठी प्रसिद्ध आहे. भद्रेश्वर येथे जैन मंदिराव्यतिरिक्त, इस्लामिक रचनेतील, 12 व्या शतकातील दोन मशिदी आहेत. या मंदिरात सुंदर संगमरवरी मूर्तीसह मंदिराची वास्तूकला अत्यंत सुंदर, कलात्मक व गुंतागुंतीच्या कोरीव कामासाठी प्रसिद्ध आहे.

21)Great Indian Bustard Sanctuary-

ग्रेट इंडियन बस्टर्ड अभयारण्य हे गुजरातच्या कच्छ जिल्ह्यातील नलिया तालुक्यातील जखौ गावातील पक्षी निरीक्षकांसाठी एक आनंददायी ठिकाण आहे. हे अभयारण्य 2 चौरस किलोमीटर क्षेत्रफळात असून 1992 मध्ये गुजरात सरकारने ग्रेट इंडियन बस्टर्डचे संरक्षण करण्यासाठी हे अभयारण्य म्हणून घोषित केले. हे अभयारण्य लाला-परिजन अभयारण्य म्हणूनही ओळखले जाते.

या अभयारण्यात व्हाईट-नेप्ड टिट, स्पॉटेड अँड इंडियन सँडग्रूस, लावे, लार्क, श्राइक्स, कोर्सर्स, प्लोव्हर्स, स्टोलिक्झका बुशचॅट, फ्लेमिंगो, बगळे, एग्रेट्स, आणि वन्य प्राण्यांमध्ये लांडगा, कॅराकल, वाळवंटातील मांजर, पट्टेदार तरस, कोल्हा, मुंगूस, निळा बैल, चिंकारा, सरडा आणि विविध प्रकारचे साप आढळून येतात. हे अभयारण्य कच्छच्या रण आणि इतर वन्यजीव संरक्षित क्षेत्रांच्या जवळ असल्यामुळे विविध वन्यजीवांसाठी महत्त्वाचे आहे.

22)Siyot Caves-

सियोट लेणी ही गुजरातच्या कच्छ जिल्ह्यातील लखपत तालुक्यात असलेले एक महत्त्वाचे ऐतिहासिक आणि पुरातत्त्वीय स्थळ व प्राचीन बौद्ध लेण्यांचा समूह आहे.या प्राचीन लेण्या इ.स.च्या 1 ते 4 शतकांच्या दरम्यान बौद्ध अनुयायांनी दगडात कोरलेल्या लेण्या आहेत. आणि या लेण्या त्या काळातील कच्छ ते सिंध यांना जोडणारा एका प्राचीन व्यापारी मार्गावर आहेत व ब्राह्मी लिपीतील कोरीव कामामुळे त्यांचा संबंध मौर्य कालखंडाशी जोडला जातो.

या लेण्या काटेश्वर बौद्ध लेणी म्हणूनही ओळखल्या जातात.या लेण्यांची रचना आरंभीच्या गुंफा मंदिरांसारखी आहे. आणि या लेण्यांमध्ये प्राचीन बौद्ध भिक्षूंच्या जीवनशैली आणि साधना पद्धतींची झलक दिसून येते.कच्छच्या वाळवंटी प्रदेशातील चुनखडीच्या डोंगरपायथ्याशी वसलेल्या सियोट लेणी या पर्यटकांसाठी आकर्षणाचे ठिकाण आहे.

23)Roha Fort-

रोहा किल्ला हा गुजरातच्या कच्छ जिल्ह्यातील नखतराणा तालुक्यातील रोहा गावाच्या सीमेवर आहे. रोहा जागीरचे हे स्थान होते. हा किल्ला समुद्रसपाटीपासून 800 फूट उंचीवर असून 16 एकर क्षेत्रावर विस्तारलेला आहे. हा किल्ला कच्छ प्रदेशातील 52 किल्ल्यांपैकी एक असून ‘रोहा सुमारी’ म्हणूनही ओळखला जातो.रोहा किल्ला सध्या जीर्ण अवस्थेत असून

16 व्या शतकात ठाकोर नोगंजी यांनी बांधलेला हा किल्ला त्यावेळी अभेद्य म्हणून ओळखला जात होता.पर्यटक आजही या किल्ल्याचे दगडी कोरीवकाम, किल्ल्याच्या भिंती, पायऱ्यांच्या विहिरी आणि विविध प्रवेशद्वारांचे निरीक्षण करू शकतात. आणि या किल्ल्यावरून आजूबाजूच्या वाळवंटाचे विहंगम, सुंदर दृश्य, विविध वनस्पती आणि प्राणी पाहू शकतात.

24)Tera Fort-

तेरा किल्ला हा गुजरातच्या कच्छ जिल्ह्यातील एक ऐतिहासिक किल्ला आहे.कच्छ प्रदेशाच्या विशाल वाळवंटात वसलेला आणि बाराव्या शतकात बांधलेला तेरा किल्ला हा स्थापत्य वैभवासाठी प्रसिद्ध आहे. आणि त्या प्रदेशाच्या समृद्ध इतिहासाचे प्रतीक आहे. हा किल्ला भव्य वास्तुकलेसाठी प्रसिद्ध असून छोट्या टेकडीवर वसलेला आहे.

आज हा किल्ला जरी भगनावस्थेत गेला असला तरी किल्ल्याच्या भिंती, बुरुज आणि प्रवेशद्वारांचे अवशेष अजूनही थोड्याफार चांगल्या स्थितीत आहेत.हा किल्ला जडेजा घराण्याच्या काळापासून असल्याचे मानले जाते. या टेकडीवरील किल्ल्यावरून कच्छ प्रदेशाचे नयनरम्य विहंगम दृश्य आणि तेरा किल्ल्याचे अवशेष पाहायला मिळतात.

25)Road to Heaven-

स्वर्गाचा रस्ता (रोड टू हेवन) हे गुजरातच्या कच्छ जिल्ह्यातील खावडा ते धोलावीरा या पुरातत्वीय स्थळाकडे जाणारा एक 30 किलोमीटरचा निसर्गरम्य रस्ता आहे. हा रस्ता कच्छच्या विशाल पांढऱ्या वाळवंटातून जातो. आणि या रस्त्याच्या दोन्ही बाजूला विस्तीर्ण पांढरे मिठाचे मैदान आहे, त्यामुळे हे ठिकाण एक अविस्मरणीय दृश्य आणि अनोखा अनुभव देणारे आहे.

हा रस्ता भूजला 220 किलोमीटर अंतराने धोलावीराशी जोडतो आणि पर्यटकांमध्ये ‘रोड टू हेवन’ म्हणून प्रसिद्ध आहे. धोलावीराच्या ऐतिहासिक आणि पुरातत्वीय महत्त्वामुळे या रस्त्याला ‘स्वर्गाचा रस्ता’ असे संबोधले जाते.

26)Kadiya Dhro-

कडिया ध्रो (कालिया ध्रो) हे गुजरातच्या कच्छ जिल्ह्यातील एक अत्यंत सुंदर नैसर्गिक पर्यटन स्थळ आहे. या ठिकाणी भाईड नदी व तिच्या सर्व लहान-मोठ्या उपनद्यांसह, एक विशाल रूप धारण करतात. आणि या पाषाणमय प्रदेशातून वाहतात. कडिया ध्रो ही एक नैसर्गिक खडकांची रचना आहे. जी वारा आणि पाण्याच्या प्रवाहामुळे आणि लाखो वर्षांच्या क्षरणामुळे येथे खडकांवर अप्रतिम नैसर्गिक शिल्पकला निर्माण झाली आहे.

ही रचना अमेरिकेतील ग्रँड कॅनियन नॅशनल पार्कसारखी भासते. 2021 साली न्यूयॉर्क टाइम्स ने कडिया ध्रोला जगातील भेट देण्याजोग्या 52 ठिकाणांपैकी एक म्हणून मान्यता दिली होती. त्यामुळे हे ठिकाण तिला ‘ग्रँड कॅन्यन ऑफ इंडिया’ किंवा ‘मिनी ग्रँड कॅन्यन ऑफ भुज’ म्हणून प्रसिद्ध आहे.

27)Hamirsar Lake-

हमीरसर तलाव हा गुजरातच्या कच्छ जिल्ह्यातील भूजच्या मध्यभागी असलेला एक मानवनिर्मित तलाव आहे. हा तलाव कच्छमधील जडेजा राजवंशाचे संस्थापक राव खेंगारजी प्रथम यांच्या कारकिर्दीत भुजच्या लोकांच्या पिण्याच्या आणि दैनंदिन गरजा भागवण्यासाठी राजांनी हा तलाव बांधला होता.

आणि हा तलाव जडेजा शासक राव हमीर यांच्या नावावर आहे.हमीरसार तलाव हा 450 वर्षे जुना आहे.व भुज शहराचे हृदय मानला जातो. या तलावाच्या जवळच्या परिसरात ऐना महाल,प्राग महाल, कच्छ संग्रहालय, रामकुंड स्टेपवेल,राम धुन मंदिर आणि स्वामीनारायण मंदिर ही ठिकाणे आहेत.

28)Shri Swaminarayan Mandir, Bhuj-


श्री स्वामीनारायण मंदिर हे गुजरातच्या कच्छ जिल्ह्यातील, भुजमधील एक धार्मिक, आध्यात्मिक मंदिर व पर्यटन स्थळ आहे. हे मंदिर नर-नारायण यांना समर्पित असून स्वामीनारायण संप्रदायाचे संस्थापक स्वामी स्वामीनारायण यांनी बांधले होते. या मंदिरातील नरनारायण देवाच्या मूर्तींची स्थापना भगवान श्री स्वामीनारायण यांनी स्वतः 15 मे 1879 रोजी केली होती.

आणि नंतर आचार्य श्री अयोध्याप्रसादजी महाराजांनी 6 मार्च 1867 रोजी हरिकृष्ण महाराजांची स्थापना केली होती. हे संगमरवरी मंदिर 35,000 चौरस फूट क्षेत्रफळात आहे व मंदिरात 7 शिखरे,एक मध्यवर्ती घुमट, 25 लहान घुमट,258 खांब आणि सुंदरपणे कोरलेले परिघ आहेत.

29)Rakshak Van-

रक्षक वन हे गुजरातच्या कच्छ जिल्ह्यातील शूर आणि धाडसी महिलांच्या नावावर ठेवण्यात आलेले वन आहे. सर्वत्र हिरवळ असलेले हे वन, विशाल निसर्गरम्य परिसरात विस्तारलेली एक बाग आहे. या धाडसी महिलांनी एका रात्रीत भूज विमानतळाची हवाई पट्टी पुन्हा बांधली होती. त्या महिलांची कहाणी 8 डिसेंबर 1971 ची आहे, तो काळ भारत-पाक युद्धाचा होता. जेव्हा पाकिस्तानने भूज प्रदेशावर 14 नेपाळी बॉम्ब टाकले आणि भूजमधील हवाई पट्टी पूर्णपणे उद्ध्वस्त केली तेव्हा,

अधिकाऱ्याने तातडीने निर्णय घेतला की, ती हवाई पट्टी स्थानिकाकडून बांधण्यात यावी,म्हणून माधपर गावातील स्थानिक महिला, ज्या रोजंदारीवर काम करत होत्या, त्यांना हवाई पट्टी बांधण्याचे काम देण्यात आले. आणि युद्धाच्या त्या भयानक परिस्थितीतही त्यांनी हे काम 72 तासांपेक्षा कमी वेळात पूर्ण केले. सायरन वाजल्यावर त्यांनी बंकरमध्ये आश्रय घेतला, आणि शत्रूच्या विमानापासून हवाई पट्टी गाईच्या शेणाने झाकून लपवली. त्यामुळे या महिला मिळणाऱ्या प्रत्येक आदराच्या पात्र आहेत.

30)Living and Learning Design Centre Crafts Museum-

लिव्हिंग अँड लर्निंग डिझाईन सेंटर (एलएलडीसी) हे गुजरातच्या कच्छ जिल्ह्यातील भूज येथील एक अद्वितीय संग्रहालय आणि शैक्षणिक केंद्र आहे. या ठिकाणी तीन नियोजित गॅलरी आहेत. त्यातील एका गॅलरीत अहिर, माघवाल, रबारी आणि इतर 42 निरनिराळ्या भरतकाम शैली प्रदर्शित केल्या आहेत. येथील केंद्रात भरतकाम, धातूकाम, विणकाम,चांदीचे काम, रोगन प्रिंटिंग, मातीकाम आणि लाकूड कोरीवकाम यासह विविध हस्तकला प्रदर्शित केल्या आहेत.

व कारागीर आणि अभ्यागतांसाठी कार्यशाळा आणि प्रशिक्षण कार्यक्रम दिले जातात. कच्छच्या हस्तकला वारशाचे जतन, आणि प्रोत्साहन देण्यासाठी या संग्रहालयाची स्थापना 2016 मध्ये सृजन ट्रस्टने केली.संग्रहालयाव्यतिरिक्त, या संकुलात एक गॅलरी, एक ग्रंथालय आणि तीन हस्तकला स्टुडिओ आहेत.

31)Gandhi samadhi-

गांधी समाधी हे गुजरातच्या कच्छ जिल्ह्यातील आदिपूर येथील एक ऐतिहासिक ठिकाण आहे. या ठिकाणी गांधीजींच्या अस्थींची समाधी असून, गांधीजींच्या निधनानंतर त्यांच्या अस्थींचे विसर्जन ज्या त्रिवेणी संगमावर करण्यात आले होते, तिथे ही समाधी बांधण्यात आली आहे. गांधीजींचे मुख्य समाधी स्थळ नवी दिल्लीतील राजघाट येथे आहे, परंतु आदिपूर येथील समाधी गांधीजींच्या अस्थींच्या सन्मानार्थ,

आणि गांधीजींना आदरांजली वाहण्यासाठी व त्यांच्या स्मृती जतन करण्यासाठी हे स्थळ निर्माण केले आहे. देशाचे पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी गांधी समाधीला भेट दिली होती. आणि पंतप्रधान मोरारजी देसाई, लालकृष्ण अडवाणी, केशुभाई पटेल आणि इतर अनेक राजकीय नेत्यांनी येथे येऊन महात्मा गांधीजींना श्रद्धांजली वाहिली आहे.

32)Shantinath Jain temple, Kothara-

शांतीनाथ जैन मंदिर हे गुजरातमधील कच्छ जिल्ह्यातील कोठारा गावातील जैन धर्माच्या अनुयायांसाठी एक महत्त्वाचे तीर्थस्थान आहे. या मंदिराचे बांधकाम सभराई गावातील सलात नाथू यांच्या देखरेखीखाली केले आहे. व या मंदिराच्या बांधकामासाठी त्यावेळेस 40,000 एवढा महागडा खर्च झाला होता, आणि अर्धा खर्च शाह वेलजी मालू यांनी केला होता. आणि या मंदिराचे बांधकाम 1861 मध्ये पूर्ण झाले.

हे मंदिर भगवान शांतिनाथ, म्हणजेच 16 वे तीर्थंकर, यांना समर्पित असून शांतिनाथ भगवानांची मूर्ती आचार्य रत्नसागरसुरी यांच्या हस्ते प्रतिष्ठापित करण्यात आली आहे. हे मंदिर ‘कल्याण टंक’ या नावाने ही ओळखले जाते, हे नाव पालीताना मंदिरांवर प्रसिद्ध काव्य लिहिलेल्या कवि केशवजी नायक यांच्या नावावरून ठेवले आहे.

33)Chhari Dhand Bird Sanctuary –

छारी धांड पक्षी अभयारण्य हे गुजरातच्या कच्छ जिल्ह्यातील नख्तरन तालुक्यात फुले गावाजवळील एक हंगामी पाणथळ जागा आहे. हे ठिकाण कच्छमधील 227 चौरस किलोमीटरपेक्षा जास्त क्षेत्रफळ असलेले सर्वात मोठ्या खाऱ्या पाणथळ जागा आहे. या ठिकाणी हिवाळ्यात स्थानिक आणि स्थलांतरीत पक्ष्यांच्या 350 पेक्षा जास्त प्रजाती आढळून येतात.

याशिवाय येथे डाल्मेशियन पेलिकन, हुबारा बस्टार्ड, ग्रेटर फ्लेमिंगो, इंडियन स्किमर आणि रॅप्टरच्या अशा अनेक प्रजाती पाहायला मिळतात. कच्छच्या रणमधील गवताळ प्रदेशात वसलेले हे ठिकाण विविध पक्ष्यांचे नैसर्गिक निवासस्थान आहे.

34)Trimandir, Bhuj-

त्रिमंदिर हे गुजरातच्या कच्छ जिल्ह्यातील भुज येथे असलेले एक अध्यात्मिक मंदिर आहे. या मंदिराची स्थापना ज्ञानपुरुष दादा भगवान (परमपूज्य दादाश्री) यांनी केली असून या मंदिर संकुलाचे एकूण क्षेत्रफळ 22,266 चौरस फूट आहे. हे मंदिर सर्व धर्म एकतेचे प्रतीक आहे.

आणि या मंदिरात जैन, शैव आणि वैष्णव धर्मातील देवता व इतर धर्मांतील देव-देवतांच्या मूर्ती एकाच व्यासपीठावर स्थापित केल्या आहेत. व मंदिराच्या मध्यभागी भगवान श्री सीमंधर स्वामींची 151 इंच उंचीची संगमरवरी मूर्ती आहे. या मंदिर संकुलाचे एकूण क्षेत्रफळ 22,266 चौरस फूट आहे.

Visit the travel blog

1) कच्छमधील प्रमुख पर्यटन स्थळे कोणती आहेत?

कच्छमध्ये पांढरे रण, भुज, मांडवी, धोलाविरा, काळा डुंगर, नारायण सरोवर, आणि हस्तकला गावे ही प्रमुख पर्यटन स्थळे आहेत.

2) कच्छ जिल्ह्यातील स्वर्गाचा रस्ता (रोड टू हेवन) हा किती किलोमीटर अंतराचा आहे?

कच्छ जिल्ह्यातील स्वर्गाचा रस्ता (रोड टू हेवन) हा खावडा ते धोलावीरा या पुरातत्वीय स्थळाकडे जाणारा 30 किलोमीटरचा निसर्गरम्य रस्ता आहे.

3)कच्छ जिल्ह्यातील ग्रेट इंडियन बस्टर्ड अभयारण्य हे कोणत्या तालुक्यात आहे ?

कच्छ जिल्ह्यातील ग्रेट इंडियन बस्टर्ड अभयारण्य हे नलिया तालुक्यात आहे .

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
Scroll to Top