मित्रांनो भारत भ्रमंतीमध्ये आम्ही भारत देशातील प्रत्येक राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यातील संपूर्ण पर्यटन स्थळांची माहिती देत आहोत, आता आपण गुजरात मधील गीर सोमनाथ जिल्ह्यातील संपूर्ण पर्यटन स्थळे पाहणार आहोत.गीर सोमनाथ हा गुजरात मधील 33 जिल्ह्यांपैकी एक सुंदर व निसर्ग संपन्न जिल्हा आहे. हा जिल्हा जुनागढ जिल्ह्यातून 2013 मध्ये नवीन सात जिल्ह्यांपैकी एक म्हणून निर्माण करण्यात आला. सौराष्ट्र प्रदेशातील हा जिल्हा काठियावाड द्वीपकल्पाच्या दक्षिण कोपऱ्यावर असून या जिल्ह्याचे मुख्यालय वेरावळ या ठिकाणी आहे.Top 27 places to visit in Gir Somnath district
तसेच या जिल्ह्यात सहा तालुके असून दक्षिणेस अरबी समुद्र आहे. हा जिल्हा भारतामधील बारा ज्योतिर्लिंगांपैकी पहिले ज्योतिर्लिंग सोमनाथ मंदिर व गिर अभयारण्यामुळे अत्यंत प्रसिद्ध आहे. शेती उत्पादनामध्ये प्रामुख्याने या जिल्ह्यात शेंगदाणे, गहू, कापूस, आंबा आणि ऊस ही पिके घेतली जातात. उद्योग क्षेत्रात या जिल्ह्यात आदित्य बिर्ला नुवो लिमिटेड (इंडियन रेयॉन), गुजरात सिद्धी सिमेंट,अंबुजा सिमेंट, गुजरात हेवी केमिकल्स लिमिटेड या कंपन्या आहेत. याशिवाय या जिल्ह्यात खारवा समाजातील लोक मत्स्य व्यवसाय मोठ्या प्रमाणात करतात.
येथील व्हेरावळमध्ये मोठ्या प्रमाणात नौकानिर्मिती उद्योग असून G.I.D.C. परिसरात मोठ्या प्रमाणावर मासे प्रक्रिया कारखाने आहेत. व येथील उच्च दर्जाचे समुद्री पदार्थ अमेरिका, जपान, आग्नेय आशिया, खाडी देश आणि युरोपियन युनियन मध्ये निर्यात केले जातात. गीर सोमनाथ जिल्ह्यात अनेक ऐतिहासिक,सामाजिक, सांस्कृतिक व धार्मिक पर्यटन स्थळे आहेत.
Top 27 places to visit in Gir Somnath district
गिर सोमनाथ जिल्ह्यातील संपूर्ण पर्यटन स्थळे
1)Shree Somnath Jyotirlinga Temple-

सोमनाथ मंदिर हे गुजरात मधील गीर सोमनाथ जिल्ह्यातील प्रभास पाटण, वेरावळ या ठिकाणी समुद्राजवळ वसलेले एक पवित्र तीर्थक्षेत्र आहे. या मंदिराला सोमनाथ मंदिर किंवा देव पाटण असेही म्हणतात. हे मंदिर शिवशंकराच्या ‘बारा ज्योतिर्लिंगांपैकी’ एक असून या मंदिराची स्थापना चंद्रदेवाने केल्याचे सांगितले जाते.आणि हे मंदिर कपिला, हिरण व सरस्वती या तीन पवित्र नद्यांच्या संगमावर वसलेले आहे.
हे मंदिर हजारो वर्षांपासून अस्तित्वात असून या मंदिराची अनेकवेळा पुनर्बांधणी करण्यात आली आहे.सध्या हे मंदिर मारु-गुर्जर वास्तुकला शैलीमध्ये बांधलेले असून, त्यामध्ये गर्भगृह, सभामंडप,नृत्यमंडप 212 नक्षीकाम केलेल्या खांबांसह, दोन मंजिली इमारत आहे. व या मंदिराचे शिखर दीडशे फूट उंच आहे.ऋग्वेदामध्येही या मंदिराचा उल्लेख आढळतो. जगभरातून पर्यटक या मंदिराला भेट देतात.
2)Lakshminarayan Temple-

लक्ष्मी नारायण मंदिर हे गुजरात मधील गीर सोमनाथ जिल्ह्यातील त्रिवेणी तीर्थाच्या काठावर, सोमनाथ मंदिराजवळ वसलेले धार्मिक स्थळ आहे. हे मंदिर भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मी यांना समर्पित आहे. राजा साहिल वर्मा यांनी बांधलेले हे मंदिर गुंतागुंतीच्या कोरीवकामांनी सजवलेल्या 18 खांबांसाठी प्रसिद्ध आहे. तसेच येथील प्रत्येक खांबावर महाभारतातील कृष्णाशी संबंधित असलेला एक पवित्र संदेश पाहायला मिळतो.
हा मंदिर परिसर अत्यंत शांत, प्रसन्न व पवित्र आहे. या भव्य मंदिराची वास्तू रचना अत्यंत सुंदर आणि जटिल कोरीवकाम केलेली आहे. तसेच या मंदिराच्या मध्यभागी एक पिवळ्या रंगाचा भव्य गोपुरम बांधलेला आहे, दुरून पाहिल्यानंतर हा एक सुंदर दिवा वाटतो. याशिवाय या ठिकाणी भगवान गणेश आणि देवी दुर्गा यांची मंदिरे आहेत.
3)Suraj Mandir-

सूरज ( सूर्य) मंदिर हे गुजरात मधील गीर सोमनाथ जिल्ह्यातील त्रिवेणी घाटाजवळ सौर तेजाचे प्रतीक असलेले, ऐतिहासिक मंदिर आहे. हे मंदिर म्हणजे सोमनाथमधील एक लपलेले रत्नच आहे. हे सूर्य देवाचे मंदिर अत्यंत सुंदर वास्तूकला, गुंतागुंतीचे कोरीव काम व आध्यात्मिक महत्त्वासाठी ओळखले जाते. या मंदिरात सूर्य देव आणि छाया देवी हे मुख्य विग्रह असून असे सांगितले जाते की अज्ञातवासाच्या काळात पांडव येथे सूर्य देवाची प्रार्थना करत असत. या मंदिरातील भिंतींच्या बाजूंवर भगवान विष्णू, माता लक्ष्मी,
भगवान ब्रह्मा, माता सरस्वती, सीता माता आणि माता पार्वती यांच्या मूर्ती कोरलेल्या आहेत. व सिंह, हत्ती आणि इतर प्राण्यांची शिल्पे काढण्यात आले आहेत. तसेच या मंदिराजवळ एक सूर्यकुंड असून थोड्या अंतरावर हिंगलाज गुहा आहे. आणि मंदिराच्या मागे पांडवांची पाच गुहा आहेत. या मंदिरातील गर्भगृहात सकाळच्या सूर्याची पहिली किरणे येतात हे या मंदिराचे एक वैशिष्ट्यच आहे.त्रिवेणी संगम मंदिरापासून हे मंदिर 100 मीटर अंतरावर आहे.
4)Bhalka Teertha-

Visit our website: allindiajourney.com
भालका तीर्थ हे गुजरात मधील गीर सोमनाथ जिल्ह्यातील वेरावळ या ठिकाणचे पूजनीय आणि पवित्र तीर्थस्थळ आहे. आख्यायिकांनुसार, भगवान श्रीकृष्ण पिंपळाच्या झाडाखाली विश्रांती घेत असताना जरा नावाच्या एका शिकारीने त्यांचा पाय हरण समजून बाण मारला, ज्यामुळे त्यांना प्राणघातक दुखापत झाली.त्यामुळे हे ठिकाण श्रीकृष्णाने शेवटचा श्वास घेतल्याचे मानले जाते. भगवान श्रीकृष्णाची ही दिव्य लीला या मंदिरात सुंदर कोरीवकाम आणि शिल्पांमधून चित्रित केली आहे. हे स्थळ श्री कृष्ण निजधाम प्रस्थान लीला म्हणूनही ओळखले जाते.
आणि श्रीकृष्णाच्या सन्मानार्थ येथे तुळशीचे झाड लावण्यात आले आहे. हे भव्य कृष्णा मंदिर वाळूच्या दगडात बांधलेले असून येथील अंगणात वडाची झाडे आहेत. आणि मंदिरात अर्धवट झोपलेल्या स्थितीत श्रीकृष्णाची एक असामान्य मूर्ती आहे. तसेच या मंदिरात श्रीकृष्णाची बासरी वाजवतानाची अजून एक सुंदर मूर्ती आहे.भालका तीर्थ हे एक अत्यंत श्रद्धा आणि आध्यात्मिक महत्त्व असलेले ठिकाण आहे.
5)Dehotsarg Tirth-


देहोत्सर्ग तीर्थ हे गुजरात मधील गीर सोमनाथ जिल्ह्यातील हिरण नदीच्या तीरावर असलेले पवित्र तीर्थक्षेत्र आहे.असे सांगितले जाते की भगवान श्रीकृष्णांनी याच ठिकाणी आपला शेवटचा श्वास घेतला आणि स्वर्गीय निवासासाठी आपले भौतिक रूप त्यागले होते. या ठिकाणी श्रीकृष्णांच्या स्मृती प्रित्यर्थ पिंपळाच्या झाडाखाली त्यांच्या पावलांचे ठसे स्थापित केले आहेत.
श्रीकृष्णांच्या अंतिम दिव्य यात्रेमुळे हे स्थान पवित्र तीर्थ झाले असून भक्तांसाठी एक प्रमुख तीर्थक्षेत्र आहे.श्रीकृष्णांच्या ही निजधाम प्रस्थानाची कथा महाभारत, श्रीमद्भागवत, विष्णुपुराण आणि अनेक ग्रंथांत वर्णन केलेली आहे.
6) Panch Pandav Gufa-

पंच पांडव गुफा हे गुजरात मधील गीर सोमनाथ जिल्ह्यातील सोमनाथ मंदिराजवळील एक ऐतिहासिक गुंफा मंदिर आहे. महाभारत काळातील हे गुफा मंदिर बाबा नारायणदास यांनी 1949 मध्ये स्थापन केले होते. हे मंदिर एका निसर्गरम्य टेकडीवर असून या मंदिरात शिव,राम,लक्ष्मण, देवी सीता, देवी दुर्गा आणि भगवान हनुमान या देवतांच्या प्रतिमा आहेत. असे सांगितले जाते की युधिष्ठिर, अर्जुन, भीम, नकुल आणि सहदेव या पाच पांडवांनी त्यांच्या वनवासाचा काळ या गुहेत घालवला होता. या ऐतिहासिक गुफा मंदिराला पर्यटक मोठ्या प्रमाणात भेट देतात.
7)Prabhas Patan Museum-

प्रभास पाटण संग्रहालय हे गुजरातमधील गीर सोमनाथ जिल्ह्यातील सोमनाथ मंदिराजवळील एक पुरातत्व संग्रहालय आहे. पाटण संग्रहालय हे 1951 पासून अस्तित्वात असून येथे जवळजवळ 3500 वस्तू तीन मुख्य गटांमध्ये विभागून प्रदर्शित केल्या आहेत.या संग्रहालयात जुने दगड, प्राचीन शिल्पे, विविध प्रकारचे शंख,तुटलेली भांडी आहेत. आणि इथे एका काचेच्या भांड्यात,अनेक नद्यांचे पवित्र पाणी आहे.
आणि भव्य खांब, व 11 व्या शतकातील भगवान अग्नि, उमा महेश्वर, भगवान विष्णू, पार्वती आणि नाट्य भैरव यांच्या प्रतिमा व येथे टास्मानिया आणि न्यूझीलंडच्या समुद्रातील पाण्याचा संग्रह आणि वेगवेगळ्या काळातील नाणी व संस्कृत आणि पर्शियन भाषेत लिहिलेले लेख आहेत. हे संग्रहालय गुजरातमधील सर्वात प्रसिद्ध संग्रहालयांपैकी एक आहे.
8)Shree Parshuram Temple-

श्री परशुराम मंदिर हे गुजरातमधील गीर सोमनाथ जिल्ह्यातील त्रिवेणी संगमाच्या काठी भगवान विष्णूच्या सहाव्या अवताराला समर्पित असलेले एक पवित्र तीर्थक्षेत्र आहे. हे मंदिर सोमनाथ परशुराम मंदिर म्हणूनही ओळखले जाते. या ठिकाणी भगवान सोमनाथांनी भगवान परशुरामांना आशीर्वाद देऊन त्यांना ‘क्षत्रियहत्य’ या शापातून मुक्त केले होते.
परशुराम हे एक ब्रह्मचारी योद्धा होते, आणि ते पृथ्वीवरील वाईट शक्तींचा नाश करण्यासाठी ओळखले जातात. या मंदिर संकुलात दोन प्राचीन कुंड,सभामंडप, एक गर्भगृह, हनुमान आणि गणेश यांची लहान मंदिरे आहेत.
9)Junagadh Gate-

जुनागढ गेट हे गुजरातच्या गिर-सोमनाथ जिल्ह्यामध्ये असलेले एक प्राचीन दगडी प्रवेशद्वार आहे. या ऐतिहासिक प्रवेशद्वारावर छत्री आणि वाघ यांचे कोरीव काम केलेले आहे. हे गेट सोमनाथ मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ असून असे सांगितले जाते की याच दरवाज्यातून महमूद गझनवीने सोमनाथ मंदिरात प्रवेश करून लूट केली होती. प्रभास क्षेत्राच्या मंदिराजवळील हे ठिकाण गुजरातमधील भेट देण्यासाठी सर्वोत्तम ठिकाणांपैकी एक आहे .
10)Gita Mandir-

गीता मंदिर हे गुजरातच्या गिर-सोमनाथ जिल्ह्यामध्ये सोमनाथच्या मध्यभागी वसलेले एक मनमोहक आध्यात्मिक मंदिर आहे. हे मंदिर बिर्ला कुटुंबाने 1970 मध्ये बांधले असून ते बिर्ला मंदिर म्हणूनही ओळखले जाते. या मंदिरात 18 संगमरवरी खांबांवर पवित्र ग्रंथ भगवद्गीतेतील श्लोक कोरलेले आहेत. तसेच या मंदिरात भगवान श्रीकृष्णाचे जीवन आणि शिकवण देणारी चित्रे ,
व भगवान लक्ष्मी-नारायण आणि भगवान सीता-राम यांच्या मूर्ती आहेत.पौराणिक कथेनुसार, गीता मंदिर हे भगवान श्रीकृष्ण भालका तीर्थ ते त्रिवेणी तीर्थ पर्यंतच्या प्रवासाचे ठिकाण आहे. हे मंदिर आकाराने अगदी साधे असले तरी, त्याचे आध्यात्मिक महत्त्व खूप महान आहे.
11)Triveni Sangam-

त्रिवेणी संगम हा गुजरातच्या गीर सोमनाथ जिल्ह्यातील वेरावळ शहरात आहे. त्रिवेणी घाट हा हिरण, कपिला आणि सरस्वती या तीन पवित्र नद्यांचा संगम असलेले एक पवित्र स्थळ आहे. या नद्या पुढे जाऊन अरबी समुद्राला मिळतात. या त्रिवेणी संगमाचे महत्त्व हजारो वर्षांपूर्वीपासून असून हिंदू धर्मात अत्यंत पवित्र व महत्त्वाचे ठिकाण आहे. येथे स्नान केल्याने मोक्ष मिळतो असे मानले जाते. त्रिवेणी घाट परिसर शांत आणि वाहत्या पाण्याचा शांत वातावरण निर्माण करतो. देश विदेशातून या ठिकाणी भाविक प्रार्थना करण्यासाठी, व पूजा करण्यासाठी येतात.
12)Sasan Gir National Park-

सासन गिर राष्ट्रीय उद्यान हे गुजरातमधील गिर सोमनाथ जिल्ह्यांजवळ तलाला तालुक्यातील एक वन्यजीव अभयारण्य आणि राष्ट्रीय उद्यान आहे.हे अभयारण्य गीर राष्ट्रीय उद्यान म्हणूनही ओळखले जाते.हे राष्ट्रीय उद्यान भव्य आशियाई सिंहांचे एकमेव नैसर्गिक अधिवास असून, येथे सिंहांव्यतिरिक्त विविध प्रकारच्या पक्षीजीवनही आढळते. तसेच हे उद्यान आफ्रिकेबाहेर आशियाई सिंह पाहण्यासाठीचे एकमेव नैसर्गिक ठिकाण आहे.
हे अभयारण्य काठेवाड-गीर या वाळवंटी,शुष्क पानझडी जंगलांचा भाग असून या जंगलाला 1995 साली अभयारण्याचा दर्जा मिळाला. या अभयारण्याचे क्षेत्रफळ 1412 चौरस किमी असून, त्यापैकी 258 चौरस किमी राष्ट्रीय उद्यान व 1,153 चौ. किमी वन्यजीव अभयारण्य म्हणून संरक्षित आहे. हे अभयारण्य गुजरातच्या गिर सोमनाथ, जुनागढ आणि अमरेली जिल्ह्यांच्या काही भागांत पसरलेले आहे.
13)Sana Caves-

सना लेणी ही गुजरातमधील गिर सोमनाथ जिल्ह्यातील उना तालुक्यातील वेरावळमधील सोमनाथ मंदिराजवळ असलेल्या प्रसिद्ध बौद्ध लेणी आहेत. या लेण्यांना प्रभास पाटण बौद्ध लेणी असेही म्हटले जाते.या लेण्या 7व्या शतकातील असून एका टेकडीवर कोरलेल्या आहेत. या लेण्यांमध्ये बौद्ध आणि जैन संस्कृतीचे अवशेष पाहायला मिळतात व या लेण्यांमध्ये बौद्ध स्मारके आणि अनेक जैन देव-देवतांच्या मूर्तीं आहे. वेरावलपासून 7 किलोमीटर अंतरावर या बौद्ध लेण्या आहेत.
14)Devaliya Safari Park-

देवलिया सफारी पार्क हे गुजरातमधील गिर सोमनाथ जिल्ह्यातील सासन गिर गावापासून बारा किलोमीटर अंतरावरील सफारी पार्क आहे. हा सफारी पार्क गिर इंटरप्रिटेशन झोन असून हे ठिकाण फक्त देवालिया म्हणून ओळखले जाते. या ठिकाणी 4.12चौरस किमीचे गिर वन्यजीवांचे एक छोटेसे क्षेत्र असलेले कुंपण कंपाऊंड आहे. या ठिकाणी तुम्हाला निश्चितपणे सिंह आणि बिबट्या दिसतात.
याशिवाय कोल्हे, ससा, वन गाई,मुंगूस आणि काळवीट ही दिसू शकतात. येथे तीन सफारी मार्ग आहेत. देवलिया सफारी पार्कच्या स्वागत क्षेत्रातून वन विभागाच्या मिनी सफारी बसेस धावतात. याशिवाय येथे सिंह सदन कॅम्पसमधील इको-गाइडसह सफारी जिप्सी घेता येते.
15) Shri Bhidbhanjan Mahadev Mandir-

श्री भिडभंजन महादेव मंदिर हे गुजरात मधील गीर सोमनाथ जिल्ह्यातील त्रिवेणी संगमावर समुद्रकिनाऱ्यावर वसलेले प्राचीन व पवित्र शिवमंदिर आहे. हे मंदिर पूज्य आचार्य श्री भाव बृहस्पती यांनी बांधले असून या ठिकाणी ‘शिवाच्या शशिभूषण रूपा’चे आणि ‘गणेशाच्या भिडभंजन रूपा’चे पूजन केले जाते. या मंदिराच्या आवारात हर्षित माता मंदिर आहे.
व या मंदिराजवळ समुद्रकिनारी दोन मोठे शिवलिंग आहेत, जी बाण गंगा म्हणून ओळखली जातात.आध्यात्मिक लोकांसाठी हे एक शांत ठिकाण असून, येथे येणाऱ्या भाविकांच्या मनोकामना पूर्ण होतात अशी भाविकांची श्रद्धा आहे.
16)Kamnath Mahadev Temple-

कमनाथ महादेव मंदिर हे गुजरात मधील गीर सोमनाथ जिल्ह्यातील त्रिवेणी संगमाच्या जवळ असलेले पवित्र तीर्थस्थळ आहे. हे मंदिर संकुल राजा मयूरध्वज यांनी बांधले असून हे मंदिर सुमारे 200 वर्षे जुने आहे. या मंदिराजवळ पंचपांडव गुहा व आदि शंकराचार्य नावाची एक गुहा आहे. या मंदिराबद्दल अशी आख्यायिका सांगितली जाते की,
भगवान शिवांनी आपला तिसरा डोळा उघडून कामदेवाला भस्म केले आणि त्यामुळे त्यांना येथे “कामनाथ” असे नाव मिळाले. या मंदिराची वास्तूरचना अद्वितीय असून मंदिर परिसर अत्यंत निसर्गरम्य शांत आहे. हे मंदिर एक भव्य संकुल आहे, व येथे एक तलाव आणि स्विमिंग पूल आहे.
17)Somnath Beach-

सोमनाथ समुद्र किनारा, हा गुजरात राज्यातील गिर सोमनाथ जिल्ह्यातील सोमनाथ शहरामध्ये असलेला सुंदर समुद्रकिनारा आहे.हा किनारा थेट अरबी समुद्राला लागून आहे. सोमनाथ मंदिराच्या दर्शनासाठी आलेले पर्यटक या किनाऱ्याचा आनंद घेतल्याशिवाय जात नाहीत. या समुद्रकिनाऱ्यावरचे पाणी स्वच्छ आणि पारदर्शक आहे.
परंतु या बीचवर समुद्राच्या जोरदार लाटा येत असल्यामुळे येथे आंघोळ किंवा पोहणे शक्य नाही. तुम्ही येथे पाण्यात उभं राहून समुद्राच्या थंडगार लाटांचा आनंद घेऊ शकता. तसेच येथे अनेक हॉटेल्स येथे उपलब्ध आहेत. या बीचवर पर्यटकांची नेहमी गर्दी पाहायला मिळते.
18)Prachi Tirth-

प्राची तीर्थ हे गुजरातमधील गिर सोमनाथ जिल्ह्यातील सरस्वती नदीच्या काठावर वसलेले एक महत्त्वाचे धार्मिक आणि ऐतिहासिक ठिकाण आहे. सोमनाथ मंदिरापासून सुमारे 20 किलोमीटर अंतरावर असलेले हे तीर्थस्थान गुजरातची काशी म्हणूनही ओळखले जाते. येथे असलेल्या प्राचीन पिंपळाच्या झाडाला पाच प्रदक्षिणा घातल्यानंतर पूर्वजांना तृप्ती मिळते, असे मांनले जाते.
“शंभर वेळा काशी, एकदा प्राची” अशी म्हण या तीर्थाबद्दल प्रचलित आहे. या परिसरात जलकुंडाच्या आत भगवान विष्णूंचे एक प्राचीन मंदिर आहे. तसेच या तिर्थाबद्दल असेही सांगितले जाते की, युधिष्ठिराने कुरुक्षेत्राच्या युद्धात मृत झालेल्या कौरवांचे तर्पण येथेच केले होते.व भगवान श्रीकृष्णाने आपल्या पूर्वजांसाठी येथे विधी केले होते.
19)Veneshwar Mahadev Temple-


वेनेश्वर महादेव मंदिर हे गुजरातमधील गिर सोमनाथ जिल्ह्यातील सोमनाथ ट्रस्ट धर्मशाळेच्या समोर असलेले सर्वात प्राचीन मंदिर आहे. या मंदिराच्या नावामागे एक महत्त्वाचा इतिहास आहे. 1025 मध्ये महमूद गझनीने सोमनाथवर आक्रमण केले होते परंतु तो अयशस्वी झाला तेव्हा त्याने राज्याची राजकुमारी वेणी हिचे अपहरण करण्याचा कट रचला.
राजकुमारी वेणी ही शिवभक्त होती तीने स्वतःला वाचवण्यासाठी, भगवान शिवाची प्रार्थना केली आणि संरक्षण मागितले, त्यावेळी लिंगाचे दोन भाग झाले आणि वेणी शिवलिंगात समाविष्ट झाली आणि वेणीला मोक्ष मिळाला. त्यावेळी केसांचा एक तुकडा शिल्लक राहिला होता, म्हणून या ठिकाणी भगवान शिव वेणीश्र्वर म्हणून पूजले जातात.
20)Harihar Van-

हरिहर वन हे गुजरातमधील गिर सोमनाथ जिल्ह्यातील सोमनाथ मंदिराजवळ असलेले एक सांस्कृतिक वन आहे. ही सुंदर बाग( वन) 1.6 हेक्टर क्षेत्रफळावर विस्तारलेले असून येथे अनेक संकल्पना साकार करण्यात आल्या आहेत, त्यामध्ये पंचवल्कल वन, शिव पंचायतन वन, हरि शंकारी वन, सप्तऋषी वन, रुद्राक्ष वन, ज्योतिर्लिंग वन, गोलोक धाम वन आणि हरिहर वन. यांचा समावेश आहे.हिरवळीने आणि उंच झाडांच्या छताने वेढलेले हे वन पर्यटकांसाठी एक आदर्श ठिकाण आहे.
21)Shree Somnath Museum-

श्री सोमनाथ संग्रहालय हे गुजरातमधील गिर सोमनाथ जिल्ह्यातील प्रभास पाटन येथे सोमनाथ मंदिराजवळ वसलेले एक संग्रहालय आहे. या संग्रहालयात मातीची भांडी, प्राचीन नाणी, शिलालेख, जुनी शिल्पे, आणि मंदिराचे अवशेष यांचा समावेश असलेल्या विविध वस्तूंचा संग्रह आहे. या कलाकृती पाहताना पर्यटकांना प्राचीन संस्कृती, धार्मिक श्रद्धा इतिहास,वास्तुकलेची झलक आणि त्या काळातील स्थापत्य कलाकृतींची माहिती मिळते. तसेच या संग्रहालयात ठेवलेल्या वस्तू अत्यंत बारकाईने प्रदर्शित केल्या आहेत. या संग्रहालयाबाहेर पर्यटकांसाठी स्मृतिचिन्हांची दुकाने आहेत.
22)Baan Stambh-

बाणस्तंभ हे गुजरातमधील गिर सोमनाथ जिल्ह्यातील सोमनाथ मंदिराच्या आवारात असलेला एक प्राचीन आणि रहस्यमय स्तंभ आहे. हा स्तंभ सहाव्या शतकातील म्हणजे सुमारे 1500वर्षे जुना असून, स्तंभाच्या टोकाला समुद्राच्या दिशेकडे बाण लावलेला आहे.आणि या स्तंभावर संस्कृतमध्ये “आसमुद्रांत दक्षिण ध्रुव पर्यंत अबाधित ज्योर्तिमार्ग” असे कोरलेले आहे,
याचा अर्थ असा होतो की या बिंदूपासून दक्षिण ध्रुवापर्यंत एक अखंड मार्ग आहे, ज्यात कोणताही भूभाग किंवा अडथळा नाही. या स्तंभाचा उल्लेख जुन्या ग्रंथातही आढळतो, यावरून त्या काळातील लोकांचे खगोलशास्त्राचे ज्ञान दिसून येते. हा स्तंभ दक्षिण ध्रुवापर्यंतच्या भूभागाची अचूक माहिती दर्शवतो.
23) Kankai Mata Temple-

कनकाई माता मंदिर हे गुजरातमधील गीर राष्ट्रीय उद्यानाच्या जंगलात कनकाई मातीचे प्रसिद्ध आणि पवित्र मंदिर आहे. हे मंदिर गिर राष्ट्रीय उद्यान आणि वन्यजीव अभयारण्याच्या घनदाट अरण्यात असून तेथे प्रवेश करण्यासाठी वन विभागाची परवानगी घ्यावी लागते. कनकाई माता ही काही गुजराती कुटुंबांची कुलदेवी आहे, त्यामुळे ते नियमितपणे मंदिराला भेट देतात. येथील मंदिर परिसर अत्यंत निसर्गरम्य, आध्यात्मिक व मंत्रमुग्ध करणारा आहे.सासन गिर अभयारण्यपासून हे ठिकाण 25 किलोमीटर अंतरावर आहे.
24)Jamjir Waterfall-

जामजीर धबधबा, गुजरातमधील गिर सोमनाथ जिल्ह्यात गिर जंगलातील शिंगोडा नदीवर वसलेला, एक नेत्रदीपक निसर्गाचा चमत्कार असलेला धबधबा आहे. हा एकमेव असा धबधबा आहे जो वर्षभर हिरवाईने नटलेला असतो. तसेच या धबधब्याजवळ जामदग्नी आश्रम आहे, जिथे आपण स्वतः स्वयंपाक करून खाऊ शकतो.हा धबधबा परिसर अत्यंत सुंदर व दाट हिरवाई आणि निसर्गरम्य दृश्यांनी वेढलेला आहे. पावसाळ्यात तर या धबधब्याचे सौंदर्य अधिकच खुलून येते.पर्यटकांना निसर्गाच्या सान्निध्यात वेळ घालवण्यासाठी हे एक उत्तम ठिकाण आहे.
25) Shri Ram Mandir-

श्री राम मंदिर हे गुजरातमधील श्री सोमनाथ ट्रस्टतर्फे विजया दशमीला सोमनाथ येथे एक भव्य राम मंदिर बांधण्यात आले आहे. सोमनाथमध्ये शिव आणि श्रीकृष्णाची अनेक मंदिरे आहेत,हे मंदिर त्रिवेणी संगमाजवळ असून या मंदिराचे मुख्य प्रवेशद्वार श्री रामाच्या धनुष्याच्या आकाराचे आहे. हे मंदिर सोमनाथ श्रीराम मंदिर या नावाने ओळखले जाते.
या राम मंदिराच्या बाल्कनीतून सोमनाथ मंदिर, सोमनाथ किनारा, त्रिवेणी संगम, परशुराम मंदिर, सूर्य मंदिर आणि गीता मंदिरे सहजपणे पाहायला मिळतात. तसेच येथील मंदिरात सभागृह, कीर्तन हॉल आणि तळमजल्यावर 250+ खुर्च्या असलेले नाट्यगृह ही आहे.
26)Daityasudan Temple-

दैत्यसूदन मंदिर हे गुजरातमधील गिर सोमनाथ जिल्ह्यातील प्रभास पाटण येथे एक प्राचीन विष्णू मंदिर आहे. हे मंदिर सोमनाथ मंदिराच्या अगदी जवळ असून या मंदिरात विष्णूची काळ्या दगडाची सुंदर रत्नासारखी खूप जुनी मूर्ती आहे. आणि विशेष म्हणजे या मंदिरात भगवान विष्णूना त्यांच्या ‘दैत्यसूदन’ अवतारात पूजले जाते. हे मंदिर पर्यटकांमध्ये जास्त परिचित नाही परंतु तुम्ही या मंदिरातील सुंदर मूर्ती पाहू शकता.
27)Kamleshwar Dam-

कमलेश्वर धरण हे गुजरातमधील गिर सोमनाथ जिल्ह्यातील विसावदर येथे घनदाट जंगलात, गिर राष्ट्रीय उद्यानात वसलेले आहे. हे धरण हिरेन नदीवर बांधलेले असून या धरणाला हिरण-1 धरण म्हणूनही ओळखले जाते. हे धरण आशियाई सिंहांचे निवासस्थान असलेल्या गिर राष्ट्रीय उद्यानात आहे. तसेच हे ठिकाण मगरी आणि विविध प्रकारच्या पक्ष्यांच्या प्रजातींसाठी प्रसिद्ध आहे.
याशिवाय येथील मगर प्रजनन केंद्र प्रसिद्ध आहे.या धरणावरून हिरेन नदीचे आणि येथील परिसराचे नयनरम्य व विहंगम दृश्य पर्यटकांना पाहायला मिळते. कमलेश्वर धरण हे गिरमधील सर्वात सुंदर, पाणीपुरवठ्याचा एक अत्यंत महत्त्वपूर्ण जलाशय असून हे ठिकाण गिरमधील पाहण्यासारख्या महत्त्वाच्या ठिकाणांपैकी एक आहे.
1) गुजरातच्या गिर सोमनाथ जिल्ह्यातील कमलेश्वर धरण कोणत्या ठिकाणी आहे ?
गुजरातच्या गिर सोमनाथ जिल्ह्यातील कमलेश्वर धरण हे विसावदर येथील जंगलात,गीर राष्ट्रीय उद्यानात आहे.
2) बारा ज्योतिर्लिंगा मध्ये गुजरात मधील सोमनाथ ज्योतिर्लिंग हे किती नंबरवर आहे?
बारा ज्योतिर्लिंगा मध्ये गुजरात मधील सोमनाथ ज्योतिर्लिंग हे पहिल्या नंबरवर आहे.
3) गीर सोमनाथ जिल्ह्यातील दैत्यसूदन मंदिर हे कोणत्या ठिकाणी आहे ?
गीर सोमनाथ जिल्ह्यातील दैत्यसूदन मंदिर हे प्रभास पाटण येथील प्राचीन विष्णू मंदिर आहे.


