मित्रांनो भारतभ्रमंती या वेबसाईटवर तुम्ही इंग्लिश, हिंदी आणि मराठी भाषेत, भारत देशातील प्रत्येक राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यातील संपूर्ण पर्यटन स्थळे पाहू शकता. आता तुम्ही पाहणार आहात केरळ राज्यातील पलक्कड जिल्ह्यातील संपूर्ण पर्यटन स्थळे.पलक्कड (पूर्वीचा पलक्कट्टुसेरी) जिल्हा हा दक्षिण भारतातील केरळ राज्याच्या मध्यभागी असलेला एक प्रमुख जिल्हा असून, तो ‘केरळचे धान्य कोठार’ आणि ‘केरळचे प्रवेशद्वार’ म्हणून ओळखला जातो. पश्चिम घाटाच्या कुशीत वसलेल्या या जिल्ह्याची स्थापना 1 जानेवारी 1957 रोजी झाली. या जिल्ह्यातील पश्चिमेकडील घाट आणि ‘पलक्कड गॅप’ मुळे तामिळनाडूला थेट जोडला जातो. या जिल्ह्यात पलक्कड, चित्तूर, आलथूर, मन्नारक्काड, ओट्टाप्पालम,पट्टाम्बी आणि अट्टाप्पाडी हे सात तालुके असून भरतपुझा, कल्पथी, कन्नडी, गायत्री आणि थुथा या नद्या वाहतात. Top 25 places to visit in Palakkad District
पलक्कडला विपुल नैसर्गिक सौंदर्याचे वरदान आहे, त्यामध्ये हिरवीगार जंगले, समृद्ध कृषी, कोसळणारे धबधबे, प्राचीन मंदिरे, चर्च, पलक्कड किल्ला, मशिदी, उत्सव, निसर्गरम्य दृश्ये आणि मिश्र संस्कृतीसाठी प्रसिद्ध आहे. तसेच या जिल्ह्यात सायलेंट व्हॅली राष्ट्रीय उद्यान, परम्बीकुलम व्याघ्र प्रकल्प आणि मलमपुझा धरण अशी अनेक निसर्गरम्य पर्यटन स्थळे आहेत. या जिल्ह्यात भातशेती नारळ, सुपारी आणि केळीचे मोठ्या प्रमाणात उत्पादन होत असल्याने याला ‘केरळचे धान्य कोठार’ म्हणतात.
Top 25 places to visit in Palakkad District
पलक्कड जिल्ह्यातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
1)Shree Visalakshi Sametha Shree Viswanathaswamy Temple –




श्री विशालाक्षी समेता श्री विश्वनाथ स्वामी मंदिर हे केरळच्या पलक्कड जिल्ह्यातील, कल्पथी नदीच्या काठी वसलेले, देवी पार्वती आणि भगवान शिव यांचे प्राचीन मंदिर आहे. हे मंदिर 15 व्या शतकातील अत्यंत प्रसिद्ध शिव मंदिर आहे, जे ‘दक्षिण काशी’ म्हणूनही ओळखले जाते. हे मंदिर 1425 मध्ये पलक्कडचे तत्कालीन राजा ‘इत्ती कोम्बी अचन’ यांनी बांधले होते. या मंदिराची वास्तुकला अत्यंत सुंदर आणि तमिळ ब्राह्मण अग्रहारम संस्कृतीचे उत्तम उदाहरण आहे. दरवर्षी ‘कल्पथी रथोत्सव’ हा येथील सर्वात प्रसिद्ध उत्सव नोव्हेंबर महिन्यात 7 दिवस साजरा केला जातो. आणि उत्सवाच्या शेवटी हजारो भाविक मोठ्या लाकडी रथांना ओढतात.
2)Silent Valley National Park-




सायलेंट व्हॅली नॅशनल पार्क हे केरळच्या पलक्कड जिल्ह्यातील, निलगिरी पर्वतरांगांमध्ये जैवविविधतेने नटलेल्या उष्णकटिबंधीय वर्षावनांपैकी एक आहे. हे पार्क 89.52 चौरस किमी क्षेत्रात विस्तारलेले असून, स्थानिक भाषेत याला ‘सैरंध्रीवनम’ म्हणतात. 1847 मध्ये रॉबर्ट वेट या वनस्पतिशास्त्रज्ञाने या जागेचा शोध लावला होता. आणि 1984 मध्ये याला राष्ट्रीय उद्यान घोषित करण्यात आले. या राष्ट्रीय उद्यानात 1000 पेक्षा जास्त फुलांच्या आणि वनस्पतींच्या प्रजाती, आणि प्राण्यांच्या दुर्मिळ व लुप्तप्राय प्रजाती त्यामध्ये सिंहपुच्छ वानर आहे. याशिवाय येथे वाघ, बिबट्या, हत्ती, मलबार जायंट स्क्विरल आणि विविध प्रकारचे पक्षी आढळतात. हे उद्यान युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळाचा आणि निलगिरी बायोस्फीअर रिझर्व्हचा एक महत्त्वाचा भाग आहे.
3)Malampuzha Dam-




मलमपुझा धरण आणि उद्यान हे केरळच्या पलक्कड जिल्ह्यातील, मलमपुझा नदीवर बांधलेले सर्वात मोठे धरण आहे. दगड आणि मातीमध्ये बांधलेल्या या धरणाचे बांधकाम 1949 मध्ये सुरू होऊन ते 1955 मध्ये पूर्ण झाले. याचा उपयोग शेतीसाठी सिंचन आणि पलक्कड शहराला पिण्याचे पाणी पुरवण्यासाठी केला जातो. या धरण परिसरात मलमपुझा उद्यान हे कलाकार नेक चंद यांनी कचरा आणि टाकाऊ वस्तूंपासून ज्यामध्ये जुन्या बांगड्या, फरशा, बाटल्यानी तयार केलेले रॉक गार्डन आहे. तसेच या उद्यानात शिल्पकार कानाई कुन्हीरामन यांनी तयार केलेली ‘यक्षी’ (एक पौराणिक स्त्री पात्र) ही विशाल सिमेंटची मूर्ती, जपानी उद्यान, गुलाबाची बाग, फिश ॲक्वैरियम, टॉय ट्रेन आणि नौकाविहार आहे. आणि ‘पॅसेंजर रोपे वे’ आहे, जो धरणाचे आणि उद्यानाचे विहंगम दृश्य दाखवतो.
4)Shri Lakshminarayana Perumal Kshetram-



श्री लक्ष्मीनारायण पेरुमल क्षेत्र हे केरळच्या पलक्कड जिल्ह्यातील, भगवान विष्णूंना समर्पित एक प्राचीन व पवित्र मंदिर आहे. हे मंदिर जुन्या कल्पथी येथे प्राचीन अग्रहार गावात वसलेले आहे. या मंदिरात भगवान विष्णू देवी महालक्ष्मी सोबत लक्ष्मीनारायण म्हणून विराजमान आहेत. याशिवाय, येथे गणेश, अयप्पा आणि मुरुगा (सुब्रमण्यम) यांच्या मूर्तीही आहेत. 400 वर्षे जुने असलेले हे मंदिर पारंपारिक केरळ वास्तुकला शैलीत बांधलेले आहे आणि कल्पथी हे ठिकाण तामिळ ब्राह्मण संस्कृती आणि वेदाध्ययनासाठी प्रसिद्ध आहे. दरवर्षी येथे नोव्हेंबर महिन्यात ‘कल्पथी रथोत्सव’ हा 10 दिवसांचा सर्वात मोठा सण मानला जातो.
Visit our website: allindiajourney.com
5)Palakkad Fort (Tipu’s Fort)-




पलक्कड किल्ला (पालघाट किल्ला) हा केरळच्या पलक्कड शहराच्या मध्यभागी असलेला एक प्रमुख ऐतिहासिक किल्ला आहे. हा किल्ला 1766 मध्ये म्हैसूरचा शासक हैदर अलीने बांधला होता. आणि हैदर अलीचा मुलगा टिपू सुलतान याने या किल्ल्याचा लष्करी तळ म्हणून वापर केला, म्हणून याला ‘टिपूचा किल्ला’ असेही म्हणतात. हा किल्ला मजबूत तटबंदी आणि खंदकाने वेढलेला आहे आणि किल्ल्याच्या परिसरात एक खुले सभागृह, लहान मुलांचे उद्यान आणि कोट्टा मैदान आहे. सध्या हा किल्ला भारतीय पुरातत्व सर्वेक्षणाद्वारे संरक्षित असून किल्ल्याच्या आत एक लहान मारुती मंदिर आणि पुरातत्व संग्रहालय आहे.
6)Parambikulam Tiger Reserve-




परंबीकुलम व्याघ्र प्रकल्प हा केरळच्या पलक्कड जिल्ह्यातील, चित्तूर तालुक्यात, अनमलाई आणि नेल्लीमपथी टेकड्यांमध्ये वसलेले निसर्गप्रेमी आणि वन्यजीव प्रेमींसाठी एक अनमोल ठेवा आहे. हा व्याघ्र प्रकल्प केरळच्या पलक्कड, तामिळनाडू आणि त्रिशूर जिल्ह्यांमध्ये पसरलेला असून याचा विस्तार 643.66 चौरस किलोमीटर आहे. या व्याघ्र प्रकल्पात वाघ, हत्ती, बिबट्या, गवा, नीलगिरी मार्टन यांसारखे प्राणी व विविध पक्ष्यांच्या प्रजाती येथे पाहता येतात.आणि जागतिक स्तरावर प्रसिद्ध असलेल्या (कन्नीमारा सागवान) वृक्षासाठी ओळखला जातो. या अभयारण्याला 2010 मध्ये अधिकृतपणे ‘व्याघ्र प्रकल्प’चा दर्जा देण्यात आला. पर्यटकांना येथे जंगल सफारी, ट्रेकिंग, कॅम्पिंग आणि ट्री-हाऊस या सुविधा आहेत.
7) Nelliyampathy Hills, Seethargundu Viewpoint-




नेल्लीयमपथी टेकड्या आणि सीतारकुंडू व्ह्यूपॉइंट हे केरळच्या पलक्कड जिल्ह्यातील, कॉफी वेलची आणि चहाच्या विस्तीर्ण मळ्यांनी वेढलेले एक प्रमुख निसर्गरम्य नंदनवन आहे. आणि हे ठिकाण ‘उटी’ म्हणूनही ओळखले जाते. येथे घनदाट जंगले, 100 फूट उंचीचा धबधबा आणि खोल दरीचा अद्भुत नजारा पाहायला मिळतो. आणि येथील ‘सीतारकुंडू’ म्हणजे ‘सीतेचा खडक’ अशी आख्यायिका आहे की, वनवास कालावधीत प्रभू राम, लक्ष्मण आणि सीता माता येथे थांबले होते. आणि या व्ह्यूपॉइंटपर्यंत पोहोचण्यासाठी चहाच्या मळ्यांमधून सुमारे 1 किमी चालत जावे लागते. तसेच येथील कड्यावरून कोल्लेन्गोड गावाचे आणि हिरव्यागार दऱ्यांचे अप्रतिम दृश्य दिसते.
8)Dhoni Hills & Waterfall-




धोनी हिल्स आणि धोनी धबधबा हे केरळच्या पलक्कड जिल्ह्यातील, निसर्गप्रेमी आणि ट्रेकर्ससाठी एक अत्यंत सुंदर, निसर्गरम्य पर्यटन स्थळ आहे. पश्चिम घाटाच्या कुशीत असलेले हे ठिकाण घनदाट जंगले आणि शांत वातावरणासाठी ओळखले जाते. या धबधब्यापर्यंत पोहोचण्यासाठी घनदाट जंगलातून 3 तासांचा ट्रेक करावा लागतो. हा धबधबा मलमपुझा धरणाच्या परिसरात येतो आणि सप्टेंबर ते जानेवारी या काळात भेट देण्यासाठी उत्तम आहे. आणि हा परिसर राखीव वनक्षेत्र असल्याने वन विभागाची परवानगी आवश्यक असते.
9)Kollengode Palace-


कोल्लेनगोड पॅलेस हा केरळच्या पलक्कड जिल्ह्यातील, कोलेनगोडे येथील अन्नामलाई पर्वताच्या पायथ्याशी असलेला ऐतिहासिक राजवाडा आहे. हा राजवाडा 1904 मध्ये कोल्लेनगोडचे राजा वासुदेव राजा यांनी आपल्या मुलीसाठी बांधला होता. हा राजवाडा पारंपारिक केरळ वास्तुकला आणि पाश्चात्य युरोपियन शैलीचा एक उत्कृष्ट नमुना असून यामध्ये लाकडी कोरीव काम, प्रशस्त व्हरांडे आणि नक्षीदार खांब आहेत. आणि हा पॅलेस ‘कलारी कोविलकम’ म्हणूनही ओळखला जातो. सध्या हा पॅलेस लक्झरी आयुर्वेदिक औषधे आणि योग शिक्षणासाठी रूपांतरित करण्यात आले आहे.
10)Jainmedu Jain Temple-

जैनमेडू जैन मंदिर (श्री दिगंबर जैन लाल मंदिर) हे केरळच्या पलक्कड जिल्ह्यातील, कल्पथी नदीच्या दक्षिणेकडील तीरावर वसलेले, जैनांसाठी एक महत्त्वाचे तीर्थक्षेत्र आहे.भगवान चंद्रप्रभा यांचे हे जैन मंदिर 15 व्या शतकातील एक ऐतिहासिक आणि शांततापूर्ण तीर्थक्षेत्र आहे. हे मंदिर 32 फूट लांब व 20 फूट रुंद ग्रेनाइट पाषाणापासून बनवलेले असून, येथे तीर्थंकर व यक्षिणींच्या सुंदर मूर्ती आहेत. 500 वर्षांपूर्वी कर्नाटक येथील हिऱ्यांच्या व्यापाऱ्यांनी ‘इंचाना सतुर’ यांनी हे मंदिर बांधले होते. आणि प्रसिद्ध मल्याळम कवी कुमारनासन यांनी त्यांचे सुप्रसिद्ध महाकाव्य ‘वीणापुवू’ याच परिसरातील एका जैन घरात वास्तव्यास असताना लिहिले होते.
11)Meenvallam Waterfalls-



मीनवल्लम धबधबा हा केरळच्या पलक्कड जिल्ह्यातील, थुप्पानाडू नदीवर कल्लाडीकोडन टेकड्यांमधून उगम पावलेला चित्तथरारक व नयनरम्य धबधबा आहे. हा 5 स्तरांचा धबधबा सुमारे 45 मीटर उंचीवरून कोसळतो. आणि त्याच्या नयनरम्य पायऱ्या व घनदाट जंगलासाठी ओळखला जातो. तसेच या नेत्रदीपक धबधबा परिसरात जंगले, सायलेंट व्हॅली राष्ट्रीय उद्यान व पलक्कड जिल्हा पंचायतीने उभारलेला 3 मेगावॅट क्षमतेचा मीनवल्लम लघू जलविद्युत प्रकल्प आहे.
12)Ottapalam-






ओट्टापलम हे केरळच्या पलक्कड जिल्ह्यातील भरतपुझा नदीच्या काठावर वसलेले एक निसर्गरम्य, ऐतिहासिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या समृद्ध शहर आहे. या शहरात अनेक मल्याळम चित्रपटांचे शूटिंग झाल्यामुळे याला ‘केरळचे चित्रपट गाव’ आणि असंख्य प्राचीन मंदिरे आहेत म्हणून ‘मंदिराचे गाव’ असेही म्हटले जाते तसेच येथील ‘वरिक्कसेरी माना’ हा जुना वाडा अनेक प्रसिद्ध चित्रपटांमध्ये दाखवण्यात आला आहे.आणि ओट्टापलम हे कथकली व कुडियाट्टम या शास्त्रीय कलांचे केंद्र आहे. येथील ‘चिनक्काथूर पूरम’ हा उत्सव हत्तींच्या मिरवणुकीसाठी प्रसिद्ध आहे. तसेच ओट्टापलम जवळ अनंगनमाला इको-टूरिझम, ब्रिटिश पूल, ऐतिहासिक मंदिरे आणि चुळानूर मोर अभयारण्य ही प्रसिद्ध पर्यटन स्थळे आहेत.
13)Sree Chinakkathoor Bhagavathi Temple-







श्री चिनक्कथूर भगवती मंदिर हे केरळच्या पलक्कड जिल्ह्यातील,ओट्टापलम जवळ पलापुरम येथील प्राचीन आणि प्रसिद्ध मंदिर आहे. हे मंदिर देवी भगवती ला समर्पित असून या परिसरात दोन मुख्य मंदिरे आहेत – ‘मेले कावू’ (वरचे मंदिर) आणि ‘तळे कावू’ (खालचे मंदिर). तसेच दरवर्षी या मंदिरात ‘चिनक्कथूर पूरम’ हा सर्वात मोठा उत्सव फेब्रुवारी महिन्यात असतो. त्यावेळी 25 ते 30 सजवलेल्या हत्तींची भव्य मिरवणूक काढली जाते. या उत्सवाचे आणखी आकर्षण म्हणजे ‘कुथिरा वेला’ त्यामध्ये लाकूड आणि कापडापासून बनवलेल्या महाकाय घोड्यांच्या प्रतिकृतींची मिरवणूक काढली जाते. तसेच येथे तट्टिनमेल कूथु हा एक पारंपारिक नृत्याचा प्रकार उंच व्यासपीठावर सादर केला जातो. व थोलपावाकूथू (सावली बाहुली नाट्य)या प्राचीन कलेद्वारे व्यासपीठावर रामायणातील कथा सादर केल्या जातात.
14)Ananganmala Eco-Tourism-




अनंगनमाला इको-टुरिझम हे केरळच्या पलक्कड जिल्ह्यातील, ओट्टापलम जवळील पश्चिम घाटात वसलेले, निसर्गप्रेमींसाठी एक नंदनवन आहे. 2500 एकरात पसरलेल्या या ग्रॅनाइट डोंगरावर घनदाट जंगल, खडकाळ दऱ्या आणि औषधी वनस्पतींचा मोठा साठा आहे. पर्यटकांना येथे ट्रेकिंग, रॉक क्लाइंबिंग,हायकिंग निसर्गभ्रमणाचा आनंद घेता येतो. तसेच येथील डोंगरावरून भरतपुझा नदी घनदाट हिरवीगार जंगलं, अनेक प्रकारचे वन्यजीव आणि पलक्कडच्या मैदानी प्रदेशाचे विहंगम दृश्य दिसते.
15)Kava Viewpoint-




कावा व्ह्यूपॉईंट हे केरळच्या पलक्कड जिल्ह्यातील, मलमपुझा धरणाच्या मागे असलेले एक निसर्गरम्य पर्यटन स्थळ आहे. हे ठिकाण पश्चिम घाटाच्या टेकड्यांनी वेढलेले असून, सूर्यास्त, ट्रेकिंग आणि मान्सूनच्या पावसाचा आनंद घेण्यासाठी प्रसिद्ध आहे. कावा हे ठिकाण केरळमधील ‘पावसाचे प्रवेशद्वार’ म्हणून ओळखले जाते, कारण मान्सूनचे पहिले ढग याच परिसरात तयार होतात असे मानले जाते. तसेच हे ठिकाण तिन्ही बाजूंनी पाण्याने वेढलेले भासते त्यामुळे ‘कावा आयलंड’ असेही म्हटले जाते. फोटोग्राफी आणि निसर्गप्रेमींसाठी हे उत्तम ठिकाण असून येथे अनेक मल्याळम चित्रपटांचे चित्रीकरण झाले आहे.
16)Shri Randu Moorthy Temple-



श्री रांडू मूर्ती मंदिर हे केरळच्या पलक्कड जिल्ह्यातील,थिरुवलाथूर येथील शोकासिनी नदीच्या काठावर वसलेले, देवी अन्नपूर्णाश्वरी आणि महिषासुरमर्दिनी यांना समर्पित एक अत्यंत प्राचीन आणि प्रसिद्ध मंदिर आहे. या मंदिरातील अन्नपूर्णेश्वरीची (कीझकावू) मूर्ती ‘स्वयंभू’ मानली जाते. आणि महिषासुरमर्दिनीची (मेल्क्कावू) लाकडापासून बनवलेली 7 फूट उंच मूर्ती आहे. या मंदिराच्या बाहेरील दीप माळेकर 4000 दगडी दिवे लावले आहेत, जे रात्रीच्या वेळी पेटवल्यावर अप्रतिम दिसतात. दंतकथेनुसार, हे मंदिर देवांमार्फत किंवा गंधर्वांद्वारे एका रात्रीत बांधले जात होते, परंतु मानवांची चाहूल लागल्याने ते अपूर्ण राहिले. येथे ‘तुलाम’ हा ऑक्टोबर महिन्यातील नऊ दिवसांचा उत्सव हा मुख्य आहे.
17)Choolannur /Mayiladumpara Pea Fowl Sanctuary-


मायलादुमपारा अभयारण्य हे केरळच्या पलक्कड जिल्ह्यातील, चुलनूर गावातील केरळमधील एकमेव मोर पक्षी अभयारण्य आहे. आणि हे मायिलादुम्पारा म्हणूनही ओळखले जाते. ‘मायिलादुम्पारा’ या शब्दाचा अर्थ “मोर नाचतात तो खडक” असा होतो. हे अभयारण्य 500 हेक्टर परिसरात विस्तारलेले असून येथे विविध प्रजातीचे शेकडो मोर आणि 100 पेक्षा जास्त पक्ष्यांच्या प्रजाती, फुलपाखरे आणि औषधी वनस्पती आहेत. 1996 मध्ये स्थापित झालेले हे अभयारण्य प्रसिद्ध पक्षीशास्त्रज्ञ के.के. नीलकंठन यांच्या स्मृतीस समर्पित आहे. येथे निसर्ग आणि पक्षी निरीक्षणाची सोय आहे. जवळच ‘कुंचन स्मृतीवनम’ कुंचन नंबियार (प्रसिद्ध मल्याळम कवी) यांचे जन्मस्थान आहे.
18)Attappadi- Malleshwaran Mudi Temple & Peak –




अट्टापाडी येथील मल्लेश्वरम मुडी मंदिर व शिखर हे केरळच्या पलक्कड जिल्ह्यातील, मन्नारक्काड येथील केरळमधील एकमेव आदिवासी तालुका व केरळमधील सर्वात मोठ्या आदिवासी वस्त्यांपैकी एक आहे. भवानी नदीच्या काठावर वसलेले अट्टापाडी हे नैसर्गिक सौंदर्य, पश्चिमी घाट, इरुला, मुदुगा आणि कुरुंबा या आदिवासी जमाती, आणि मल्लेश्वरम (शिव) मंदिर व मल्लेश्वरन’ शिखराच्या पूजेसाठी प्रसिद्ध आहे. अट्टापडी वनक्षेत्रातील मल्लेश्वरन मुडी हे 1,664 मीटर उंचीचे पश्चिम घाटातील उंच शिखर असून आदिवासी जमाती ‘महान शिव लिंग’ म्हणून पूजतात. येथे वसलेले मल्लेश्वरम शिव मंदिर हे घनदाट जंगलात आहे व महाशिवरात्रीला येथे मोठा उत्सव साजरा केला जातो, त्यावेळी आदिवासी जमातीचे लोक शिखराच्या टोकावर जाऊन ज्योत (‘मल्लेश्वरन मुडी दीपम’) प्रज्वलित करतात, जी दुरूनही स्पष्टपणे दिसते.
19)Kanjirapuzha Dam-



कांजीरापुझा धरण हे केरळच्या पलक्कड जिल्ह्यातील, मन्नारक्कड येथील निसर्गरम्य पर्यटन स्थळ आणि महत्त्वाचा सिंचन प्रकल्प आहे. 1960 च्या दशकात कांजीरापुझा नदीवर, दगडी मातीचे बांधलेले हे धरण 9713 हेक्टरवर आहे. आणि हे धरण तीन बाजूंनी हिरव्यागार टेकड्यांनी वेढलेले असून, जलाशयाचा परिसर ‘वेट्टिलाचोला’ नावाच्या सदाहरित जंगलाने वेढलेला आहे. व या जलाशयात तीन छोटी बेटे आहेत. जी पर्यटकांचे लक्ष वेधून घेतात. तसेच या धरणाच्या पायथ्याशी एक सुंदर बाग आहे.
20)Vadakkanthara Thirupuraikkal Bhagavathy Temple-



वडक्कंठारा थिरुपुराइक्कल भगवती मंदिर हे केरळच्या पलक्कड जिल्ह्यातील, प्राचीन आणि प्रसिद्ध मंदिर आहे. हे मंदिर ‘कन्नगी अम्मान मंदिर’ म्हणूनही ओळखले जाते. केरळमधील हे असे एकमेव मंदिर आहे जिथे देवी कन्नगीची पूजा तिच्या पूर्ण मूर्ती स्वरूपात केली जाते. तमिळ महाकाव्य ‘सिलापथीकरम’नुसार, मदुराई शहर दहन केल्यानंतर कन्नगी पलक्कडमध्ये आली आणि येथे स्थायिक झाली अशी श्रद्धा आहे. या मंदिराचे बांधकाम पारंपारिक केरळ शैलीतील असून त्यावर उत्कृष्ट लाकडी कोरीव काम केलेले आहे. मंदिराचे एक खास वैशिष्ट्य म्हणजे वाईट शक्तींना दूर करण्यासाठी दररोज संध्याकाळी 6 वाजता येथे फटाक्यांची आतषबाजी केली जाते. तसेच येथे दर तीन वर्षांनी ‘वडक्कंठारा वलिया विलक्कू वेला’ हा मोठा उत्सव साजरा केला जातो.
21)Panniyur Sri Varahamurthy Temple-




पन्नियूर श्री वराहमूर्ती मंदिर हे केरळच्या पलक्कड जिल्ह्यातील, कुंबीडी येथील भगवान विष्णूच्या वराह अवताराला समर्पित असलेले प्राचीन मंदिर आहे. हे मंदिर 4,000 वर्षे जुने असून भगवान परशुरामाने केरळमध्ये स्थापन केलेले हे पहिले मंदिर आहे. येथे भगवान विष्णूंचा तिसरा अवतार ‘वराह’ (डुकराचे रूप) मुख्य रूपात आहे. आणि त्यांच्या डाव्या मांडीवर भूदेवी (पृथ्वी) विराजमान आहे.आख्यायिकेनुसार या मंदिराचे बांधकाम वास्तुविशारद पेरुन्थाचन यांनी स्वर्गातील मंदिरासारखे भव्य असावे अशी इच्छा होती. इंद्राला या भव्यतेचा हेवा वाटल्याने त्याने या बांधकामात हस्तक्षेप केला, ज्यामुळे हे मंदिर आजही अपूर्ण अवस्थेत आहे. मुख्य वराहमूर्ती मंदिराव्यतिरिक्त येथे गणपती, शिव, अय्यप्पा, दुर्गा देवी आणि सुब्रमण्यम यांची उप-मंदिरे आहेत.
22) Pattambi Nercha-


पट्टांबी नेरचा हा केरळच्या पलक्कड जिल्ह्यातील, पट्टांबी मशिदीत साजरा होणारा एक अत्यंत प्रसिद्ध आणि वैशिष्ट्यपूर्ण वार्षिक उत्सव आहे. मलबारचे मुस्लिम संत अलूर वालिया पुकुंजीकोया थांगल या सुफी संताच्या स्मृतीप्रित्यर्थ हा सण (फेब्रुवारीमध्ये) साजरा होतो. या उत्सवात सुमारे 100 पेक्षा जास्त सजवलेले हत्ती सहभागी होतात. आणि या मिरवणुकीत पंचवद्यम आणि थयंबका ही वाद्य, व डफ-मुट्टू आणि कोलकली या लोककला सादर केल्या जातात. आणि ही भव्य मिरवणूक शेवटी भरतपुझा नदीच्या काठी संपते.
23)Cherpulassery Shree Ayyappan Kavu Temple –


चेरुपुलासेरी श्री अय्यप्पन कावू मंदिर हे केरळच्या पलक्कड जिल्ह्यातील,प्राचीन आणि महत्त्वाचे धार्मिक स्थळ आहे. हे मंदिर बाराशे वर्षापेक्षा जुने असून ‘मलबारची सबरीमाला’ म्हणूनही ओळखले जाते. या मंदिरात भगवान अय्यप्पा हे पत्नी प्रभादेवी आणि पुत्र सत्यकासह विराजमान आहेत. हे मंदिर 108 शास्त्र मंदिरांपैकी एक असून, येथे मंडला पूजा आणि अरट्टू हे उत्सव साजरे केले जातात. पौराणिक माहितीनुसार नंबुदिरी ब्राह्मणाच्या भक्तीवर प्रसन्न होऊन देवाने त्यांच्या अंगणात एक दैवी शस्त्र (चुलिका) प्रकट झाले, जे नंतर स्वयंभू अय्यप्पा मूर्तीत रूपांतरित झाले.
24)Sri Ramapuram Vishnu Temple, Vadakkanthara-



श्री रामापुरम विष्णू मंदिर हे केरळच्या पलक्कड जिल्ह्यातील, वडक्कंठारा येथील कुन्नुपुरम भागातील भगवान विष्णू (श्रीराम) यांना समर्पित प्राचीन मंदिर आहे. हे मंदिर 600 वर्षे जुने असून येथे भगवान विष्णूंसोबतच धन्वंतरी मूर्ती, गणपती, ब्रह्मराक्षस आणि नागदेवतांच्या मूर्ती आहेत. स्थानिक कथेनुसार, श्रीरामाने आपल्या वनवासादरम्यान येथे विश्रांती घेतली होती, म्हणून या गावाला ‘रामापुरम’ हे नाव पडले. या मंदिराची वास्तूकला पारंपारिक केरळ शैलीतील आहे. व येथील परिसर अत्यंत शांत आणि आध्यात्मिक आहे.
25)Shree Emoor Bhagavathy Temple-




श्री एमूर भगवती मंदिर हे केरळच्या पलक्कड जिल्ह्यातील, कल्लेकुलंगरा येथील प्राचीन मंदिर आहे. या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे येथे देवीच्या मूर्तीऐवजी तिचे दोन वर केलेले हात पूजले जातात. हे भारतातील एकमेव मंदिर आहे जिथे देवीच्या हातांची पूजा केली जाते. या मातेचे मंदिर ‘हेमंबिका मंदिर’ किंवा ‘कैपथी अंबालम’ (हातांचे मंदिर) म्हणूनही ओळखले जाते. येथील मंदिर परिसर अत्यंत अध्यात्मिक असून येथे देवीची दिवसातून तीन रूपात पूजा केली जाते, सकाळी सरस्वती, दुपारी लक्ष्मी आणि संध्याकाळी दुर्गा.
1)परम्बीकुलम व्याघ्र प्रकल्प कशासाठी प्रसिद्ध आहे?
परम्बीकुलम व्याघ्र प्रकल्प हा प्राचीन वन्यजीव अभयारण्य, समृद्ध जैवविविधतेसाठी, घनदाट जंगलांसाठी आणि बंगाल वाघांसाठी प्रसिद्ध आहे.
2) कोल्लेंगोड-नेनमेनी पलक्कड कशासाठी प्रसिद्ध आहे?
कोल्लेंगोड-नेनमेनी परिसर हा नैसर्गिक सौंदर्य, कोल्लेंगोड पॅलेस, सीतारकुंडू व्ह्यूपॉइंट, अशा विहंगम दृश्यांसाठी प्रसिद्ध आहे.
3)केरळमधील एकमेव मोर पक्षी अभयारण्य कोणते आहे?
चूलन्नूर मोर पक्षी अभयारण्य हे दक्षिण भारतातील केरळ राज्यातील पलक्कड जिल्ह्यातील चुलनूर गावातील मोर पक्षी अभयारण्य आहे. जे मायिलादुम्पारा म्हणूनही ओळखले जाते.


