मित्रांनो भारतभ्रमंती या वेबसाईटवर तुम्ही इंग्लिश, हिंदी आणि मराठी भाषेत, भारत देशातील प्रत्येक राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यातील संपूर्ण पर्यटन स्थळे पाहू शकता. आता तुम्ही पाहणार आहात केरळ राज्यातील कोल्लम जिल्ह्यातील संपूर्ण पर्यटन स्थळे. कोल्लम जिल्हा हा दक्षिण केरळमधील एक ऐतिहासिक, निसर्गसंपन्न, समृद्ध इतिहास, काजू उद्योग आणि नारळाच्या बागांसाठी प्रसिद्ध जिल्हा आहे. पूर्वी याला ‘क्विलोन’ नावाने ओळखले जायचे. या जिल्ह्यातील कोल्लम, करुनागप्पल्ली, कुन्नत्तूर, कोट्टारक्करा, पत्तनापुरम आणि पुनालूर हे 6 तालुके कोल्लम आणि पुनालूर या दोन महसूल विभागांमध्ये विभागलेले आहेत. तसेच या जिल्ह्याच्या पश्चिमेला अरबी समुद्र, पूर्वेला तामिळनाडू, उत्तरेला अलप्पुझा व पतनमथिट्टा आणि दक्षिणेला तिरुवनंतपुरम जिल्हा आहे. Top 25 places to visit in Kollam District
कोल्लम जिल्हा हा जागतिक स्तरावर काजू व्यापार आणि प्रक्रिया उद्योगाचे प्रमुख केंद्र असल्याने कोल्लमला ‘काजू व्यापाराचे केंद्र’ आणि ‘केरळच्या बॅकवॉटर्सचे प्रवेशद्वार’ म्हणून ओळखले जाते. तसेच येथे मत्स्यव्यवसाय आणि नारळाचे उत्पादन येथे मोठ्या प्रमाणावर होते. कोल्लम हे मलबार किनारपट्टीवरील सर्वात जुने बंदर असून प्राचीन काळापासून रोम, अरब आणि चीनसोबत व्यापारासाठी प्रसिद्ध होते. या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात राजवाडे, मंदिरे आणि निसर्ग संपन्न, ऐतिहासिक व सांस्कृतिक पर्यटन स्थळे आहेत.
Top 25 places to visit in Kollam District
कोल्लम जिल्ह्यातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
1)Kottarakkara Shree Mahaganapathi Temple-


कोट्टारक्करा श्री महागणपती मंदिर हे केरळच्या कोल्लम जिल्ह्यातील, कोट्टारक्कारा शहरातील प्राचीन आणि प्रसिद्ध मंदिर आहे. येथील (दक्षिणाभिमुख) मंदिर भगवान गणेशाला समर्पित असले, तरी मूळ (पूर्वाभिमुख) मंदिर भगवान शिवाचे आहे. या मंदिरातील श्री गणेशाची मूर्ती प्रसिद्ध शिल्पकार पेरुमथचन यांनी फणसाच्या झाडाच्या लाकडापासून कोरली होती असे सांगण्यात येते. हे मंदिर पूर्वी ‘किझक्केकरा शिव क्षेत्रम’ या नावाने ओळखले जात असे आणि केरळचा प्रसिद्ध शास्त्रीय नृत्यप्रकार ‘कथकली’ याचा उगम याच मंदिरात झाल्याचे मानले जाते. या मंदिरात पार्वती, भगवान अय्यप्पा, मुरुगन आणि नागराज यांच्याही मूर्ती आहेत. तसेच येथील श्री गणेशाला आवडणारा ‘उन्नियप्पम’ हा प्रसाद खूप प्रसिद्ध आहे. विनायक चतुर्थी व शिवरात्रीला भाविक या मंदिरात मोठ्या प्रमाणात येत असतात.
2)Amritapuri Ashram-



अमृतपुरी आश्रम हा केरळच्या कोल्लम जिल्ह्यातील, वल्लीकावू, करुणागपल्लीजवळील प्रसिद्ध आध्यात्मिक गुरु माता अमृतानंदमयी देवी (अम्मा) यांचे मुख्य निवासस्थान आणि त्यांच्या जागतिक सेवा कार्याचे मुख्यालय आहे. 100 एकर परिसरात पसरलेला हा आश्रम अरबी समुद्र आणि केरळच्या बॅकवॉटरच्या मध्ये एका छोट्या बेटावर आहे. या आश्रमाची स्थापना 1981 मध्ये झाली असून, हे अम्मांचे जन्मस्थान आहे. येथे जगभरातील 3,000 पेक्षा जास्त साधक, संन्यासी आणि भक्त वास्तव्यास आहेत. हा आश्रम ‘माता अमृतानंदमयी मठ’ म्हणूनही ओळखला जातो. या आश्रमात अम्मा प्रत्येक भक्ताला प्रत्यक्ष भेटतात, त्यांच्या चिंता ऐकून घेतात, आणि त्यांच्या जीवनाला नवी दिशा देतात. तसेच हा आश्रम परिसर निसर्गरम्य आणि शांत असून येथे प्रसिद्ध अमृता विश्व विद्यापीठम् चे मुख्य कॅम्पस आहे.
3)Oachira Parabrahma Temple-



ओचिरा परब्रह्म मंदिर हे केरळच्या कोल्लम जिल्ह्यातील, एक अनोखे, प्राचीन तीर्थक्षेत्र आहे. हे मंदिर 36 एकर जागेत पसरलेले असून, ‘दक्षिण काशी’ म्हणून ओळखले जाते. येथे कोणतेही गर्भगृह, मूर्ती किंवा छताची रचना नाही तर येथे वटवृक्षाखाली परब्रह्म किंवा वैश्विक चेतनेची (निराकार सर्वोच्च शक्ती) पूजा केली जाते. येथे सर्व जाती धर्माच्या भाविकांना प्रवेश दिला जातो. दरवर्षी जून महिन्यात ओचिरा कलि हा उत्सव साजरा केला जातो त्यामध्ये ‘पदनिलम’ (चिखलातील) नकली युद्ध खेळले जाते. आणि डिसेंबर महिन्यात 12 दिवसांचा ‘बारा दिव्यांचा’ उत्सव साजरा होतो. याशिवाय येथे ओणमच्या 28 दिवसांनंतर (एडुप्पू काला)कापड आणि गवतापासून बनवलेल्या बैलांच्या मोठ्या प्रतिकृतींची मिरवणूक काढली जाते.
4)Ashtamudi Lake-





अष्टमुडी तलाव हा केरळच्या कोल्लम जिल्ह्यातील, एक विस्तीर्ण, निसर्गरम्य पर्यटन स्थळ आणि ‘केरळच्या बॅकवॉटरचे प्रवेशद्वार’ आहे. कोल्लम शहरातील हा तलाव 61.4 चौरस किमी क्षेत्रफळात पसरलेला असून वेंबनाड तलावांनंतर हा केरळमधील दुसरा सर्वात मोठा नयनरम्य बॅकवॉटर (खाऱ्या पाण्याचा) तलाव आहे. या तलावाच्या ‘आठ शाखा’ (अष्टमुडी) असल्यामुळे याला हे नाव मिळाले आहे. तसेच कल्लाडा नदीचे पाणी या तलावात मिसळते. या तलावाच्या पर्यावरणीय महत्त्वामुळे 2002 मध्ये याला ‘रामसरसाइट’ (जागतिक महत्त्वाचे पाणथळ क्षेत्र) म्हणून घोषित करण्यात आले. पर्यटक येथे हाऊसबोट सफर, निवांत निसर्ग, समृद्ध जैवविविधता आणि सांब्रानिकोडी येथील पाण्यातील बेटाचा आनंद घेतात.
Visit our website: allindiajourney.com
5)Palaruvi Waterfalls-



पलारुवी धबधबा हा केरळच्या कोल्लम जिल्ह्यातील, आर्यनकावू गावातील, निसर्गरम्य परिसरातील दुधाळ पांढऱ्या प्रवाहासाठी प्रसिद्ध धबधबा आहे.हा धबधबा 300 फूट उंचीवरून कोसळतो. व भारतातील 32 वा सर्वात उंच धबधबा मानला जातो. मल्याळम भाषेत ‘पलारुवी’ या शब्दाचा अर्थ ‘दुधाचा प्रवाह’ हा धबधबा वरून कोसळताना पांढरा शुभ्र प्रवाह दुधासारखा दिसतो, म्हणून याला ‘दुधाचा प्रवाह’ असेही म्हणतात. तसेच या धबधब्याचे पाणी अनेक औषधी वनस्पतींमधून वाहून येते, त्यामुळे या पाण्यात स्नान करणे आरोग्यासाठी फायदेशीर मानले जाते. हा धबधबा घनदाट उष्णकटिबंधीय जंगलात असून, अतिशय नयनरम्य पिकनिक स्पॉट आहे.
6)Shendurney Wildlife Sanctuary-



शेंदुर्णी वन्यजीव अभयारण्य हे केरळच्या कोल्लम जिल्ह्यातील, तेनमला येथे पश्चिम घाटातील एक अत्यंत समृद्ध जैवविविधतेने नटलेले संरक्षित क्षेत्र आहे. याचे नाव चेंकुरिंजी’ या स्थानिक वृक्ष प्रजातीवरून पडले आहे. हे अभयारण्य 172 चौ.कि.मी. क्षेत्रफळात पसरलेले आहे. आणि अगस्त्यमाला बायोस्फीअर रिझर्व्हचा भाग आहे. या ठिकाणीउष्णकटिबंधीय सदाहरित जंगले आहेत. आणि येथे हत्ती, वाघ, बिबट्या, सांबर, रानडुक्कर, निलगिरी लंगूर आणि मलबार महाकाय खारी हे प्राणी आहेत व ग्रेट इंडियन हॉर्नबिल,मलबार पाईड, हॉर्नबिल अशा 200 पेक्षा जास्त पक्षांच्या प्रजाती आहेत. येथील विशेष आकर्षण म्हणजे येथे दुर्मिळ प्रजातितील लुप्तप्राय असा सिंहाच्या शेपटीचा मकाक आढळून येतो. तसेच या अभयारण्याच्या मध्यभागी तेनमला धरणाच्या जलाशयाचा भाग असलेला एक कृत्रिम तलाव आहे. पर्यटकांसाठी येथे इको-टूरिझम प्रकल्प, ट्रेकिंग, जंगल सफारी आणि बोटिंगची सोय आहे.
7)Jatayu Earth’s Center-


जटायू अर्थ्स सेंटर हे केरळच्या कोल्लम जिल्ह्यातील, चदयामंगलम येथील जगातील सर्वात मोठे पक्षी शिल्प असलेले अद्वितीय पर्यटन स्थळ आहे. हे नेचर/ रॉक-थीम पार्क 65 एकरांवर पसरलेले असून, रामायणातील जटायूच्या कथेवर आधारित आहे. येथील ‘जटायू’ पक्षाचे शिल्प 200 फूट लांब, 150 फूट रुंद आणि 70 फूट उंच आहे. व हे भव्य शिल्प प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक आणि शिल्पकार राजीव आंचल यांनी 10 वर्षांच्या अथक मेहनतीनंतर साकारले आहे. या ठिकाणी केबल कार (रोपवे), 6D थिएटर, रॉक क्लायंबिंग, रॅपलिंग, झिप-लाइनिंग, रायफल शूटिंग आणि पेंटबॉल असे वीस पेक्षा जास्त साहसी खेळ उपलब्ध आहेत. आणि शिल्पाच्या आत जटायूची कथा सांगणारे 6 डी थिएटर आहे. तसेच येथे पारंपारिक आयुर्वेदिक उपचार केंद्र आहे.
8)Thevally Palace-


थेवल्ली पॅलेस हा केरळच्या कोल्लम जिल्ह्यातील, अष्टमुडी तलावाच्या काठावर वसलेला एक ऐतिहासिक व लोकप्रिय राजवाडा आहे. हा राजवाडा 1811 ते 1819 मध्ये राणी गौरी पार्वती बायी यांच्या कारकिर्दीत लॅटेराइट दगड व चुन्याचा वापर करून बांधला गेला. हा महाल ब्रिटिश, डच आणि पोर्तुगीज वास्तुकलेचा सुंदर मिलाफ असून पूर्वी येथे त्रावणकोरच्या महाराजांचे निवासस्थान होते. तसेच या राजवाड्याच्या आवारात भगवान शास्ता (अय्यप्पा) यांचे मंदिर आहे. सध्या हा ऐतिहासिक पॅलेस कोल्लम जिल्ह्याचे एनसीसी ग्रुप मुख्यालय म्हणून वापरला जातो व पॅलेसचा परिसर पीडब्ल्यूडीच्या मालकीचा आहे.
9)Sasthamkotta Lake-



सस्थमकोट्टा तलाव हा केरळच्या कोल्लम जिल्ह्यातील, राज्यातील सर्वात मोठा गोड्या पाण्याचा तलाव आहे. व ‘तलावांची राणी’ म्हणून ओळखला जातो. या तलावाच्या तिन्ही बाजूला टेकड्या असून याचे क्षेत्रफळ 375 हेक्टर आहे. निसर्गरम्य टेकड्यांनी व घनदाट हिरवळीने वेढलेल्या या तलावात विविध प्रकारचे जलचर आणि पक्षी पाहायला मिळतात. हा तलाव कोल्लम जिल्ह्यातील लोकांसाठी पिण्याच्या पाण्याचा मुख्य स्रोत असून येथील पाण्यात पाण्यात आढळणारे ‘कॅव्होरोस लार्वा’ हे बॅक्टेरिया नष्ट करतात, ज्यामुळे येथील पाणी पिण्यासाठी योग्य मानले जाते. हा तलाव पर्यटकांसाठी निसर्गरम्य आणि शांत ठिकाण असून पर्यटक येथे बोटिंगचा आनंद घेऊ शकतात.
10)Kollam Beach –



कोल्लम बीच हा केरळ राज्यातील कोल्लम शहरातील विलोभनीय समुद्रकिनारा आहे. ज्याला महात्मा गांधी बीच’ म्हणूनही ओळखले जाते. अरबी समुद्राच्या किनाऱ्यावरील हा बीच सोनेरी वाळू, नारळाची झाडे आणि निळ्याशार पाण्यासाठी प्रसिद्ध आहे. व केरळमधील हे पहिले ‘बीच वेडिंग डेस्टिनेशन’ म्हणून ओळखले जाते. या बीचला लागूनच महात्मा गांधी पार्क हे सुंदर उद्यान, 10 मीटर उंच जलपरीचा पुतळा (सेल्फी पॉइंट), मरीन एक्वैरियम (छोटे समुद्री संग्रहालय), चिनी मासेमारीची जाळी आणि जवळच ऐतिहासिक थंगासेरी लाइटहाऊस आहे. पर्यटक येथे सूर्यास्त पाहणे, पोहणे, आणि केरळी सीफूडचा आनंद घेऊ शकतात.
11)Kottukkal Cave Temple-


कोट्टुक्कल गुहा मंदिर हे केरळच्या कोल्लम जिल्ह्यातील, आंचल जवळील कोट्टुक्कल गावात, एका अवाढव्य अखंड खडकात कोरलेले शिव मंदिर आहे. याला मल्याळममध्ये ‘काल्त्रिकोविल’ म्हणूनही ओळखले जाते. हे मंदिर इसवी सन 6 व्या ते 8 व्या शतकादरम्यान बांधले असून दुरून पाहिल्यास झोपलेल्या हत्तीसारखे दिसते. येथे दोन असमान आकाराच्या पूर्वेकडे तोंड करून गुहा आहेत. गुहांच्या मध्ये भगवान गणपतीची मूर्ती आहे. आणि मुख्य गर्भगृहात शिवलिंग आणि नंदी आहेत, तर दुसऱ्या भागात भगवान हनुमान यांची मूर्ती आहे. याशिवाय या मंदिर परिसरात एक विहीर आहे जिचे पाणी कधीही आटत नाही असे सांगितले जाते. दरवर्षी महाशिवरात्रीला येथे मोठा उत्सव साजरा केला जातो.
12)Tangasseri Lighthouse-

थांगसेरी लाइटहाऊस हे केरळच्या कोल्लम जिल्ह्यातील, अरबी समुद्राच्या किनाऱ्यावरील एक ऐतिहासिक दीपगृह आहे. हे लाइटहाऊस सुमारे 41 मीटर उंच असून केरळमधील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात उंच दीपगृह आहे. या दीपगृहाचे बांधकाम ब्रिटीश काळात 1902 मध्ये पूर्ण झाले. त्यावेळी ते ‘डच क्विलोन’ किंवा ‘गोल्ड व्हिलेज’ म्हणूनही ओळखले जात असे. या दंडगोलाकार टॉवरवर लाल आणि पांढऱ्या रंगाचे तिरके पट्टे आहेत, व दीपगृहाच्या वर जाण्यासाठी 200 पायऱ्यांचा सर्पिल जिना आहे. या टॉवर वरून कोल्लम शहर, नारळाची झाडे आणि अरबी समुद्राचे विहंगम दृश्य दिसते. या दीपगृहाच्या जवळपास थंगासेरी फोर्ट आहे.
13)Paravur Lake-



परावूर तलाव हा केरळच्या कोल्लम जिल्ह्यातील,एक नयनरम्य बॅकवॉटर तलाव आहे. हा तलाव 6.62 किमी क्षेत्रावर पसरलेला असून इथिक्कारा नदीचा शेवटचा टप्पा आणि अरबी समुद्राशी जोडलेला आहे. हे ठिकाण एक अत्यंत सुंदर आणि शांत पर्यटन स्थळ असून ‘परावूर कायल’ म्हणूनही ओळखले जाते. येथील खारफुटीची जंगले तलावाच्या भोवती असलेली नारळ आणि पामची झाडे पर्यकांसाठी एक उत्तम आकर्षण आहे. तुम्ही येथे नौकाविहार, मँग्रोव्ह जंगलांमधून कयाकिंग, हाऊसबोट राईड पक्षिनिरीक्षण आणि फोटोग्राफीचा आनंद घेऊ शकता. या तलावाच्या जवळच पोझिक्कारा बीच आणि प्रसिद्ध पुतिंगल देवी मंदिर आहे.
14)Puttingal Devi Temple-


पुतिंगल देवी मंदिर हे केरळच्या कोल्लम जिल्ह्यातील, पारावूर येथील देवी भगवतीचे लोकप्रिय मंदिर आहे. मल्याळम भाषेत ‘पुट्टू’ म्हणजे “मुंग्यांचे वारूळ’, असे सांगितले जाते की या वारुळाच्या ठिकाणी देवीचे अस्तित्व जाणवले त्यामुळे येथे मंदिराची स्थापना केली. हे मंदिर दोनशे वर्षे जुने असून येथे ‘मीनाभरणी’ महोत्सव आणि त्यातील शोभेच्या दारूकामासाठी प्रसिद्ध आहे. तसेच या मंदिरात सात दिवस चालणारा उत्सव आणि ‘अश्वथी विळक्कू’ हा मुख्य सोहळा असतो. त्यावेळी भव्य फटाक्यांची आतषबाजी आणि कथकली, अश्वथी विलाक्कू आणि मरमेडुप्पु सारखी पारंपारिक कला सादर केली जाते. दरवर्षी येथे लाखो भाविक देवीच्या दर्शनासाठी येतात.
15)St. Thomas Fort-

सेंट थॉमस फोर्ट किंवा टांगसेरी किल्ला हा केरळच्या कोल्लम जिल्ह्यातील, तंगासेरी गावच्या अरबी समुद्रकिनाऱ्यावरील एक ऐतिहासिक किनारी किल्ला आहे. 1519 मध्ये पोर्तुगीज गव्हर्नर अफोंसो डी अल्बुकर्क याने मसाला व्यापाराच्या संरक्षणासाठी हा किल्ला बांधला होता. नंतर 1661 मध्ये हा किल्ला डचांच्या ताब्यात गेल्यानंतर ‘डच मलबार’ची राजधानी बनला. आणि 1795 मध्ये ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने हा किल्ला ताब्यात घेतला.’तंगासेरी’ या शब्दाचा मल्याळममध्ये ‘सोन्याचे गाव’ असा अर्थ होतो, पूर्वी येथे सोन्याच्या नाण्यांद्वारे व्यापार चालत असे. सध्या या भव्य किल्ल्याचे फक्त अवशेष शिल्लक असून हा किल्ला भारतीय पुरातत्व सर्वेक्षण (ASI) विभागाच्या नियंत्रणाखाली आहे.
16)Munroe Island-



मुनरो बेट हे केरळच्या कोल्लम जिल्ह्यातील, अष्टमुडी तलाव आणि कल्लाडा नदीच्या संगमावर वसलेले आठ छोट्या बेटांचा समूह आहे. आणि निसर्गप्रेमींसाठी हे बेट ‘छुपे रत्न’ आहे. या बेटाचे नाव ब्रिटीश रेसिडेंट कर्नल जॉन मुनरो यांच्या सन्मानार्थ देण्यात आले असून हे बेट ‘भारताचे व्हेनिस’ म्हणूनही ओळखले जाते. पर्यटक येथे छोट्या बोटीतून फिरताना येथील गावातील जीवन जवळून पाहू शकतात. त्यामध्ये नारळाच्या काथ्यापासून दोर बनवणे, ताडी, मासेमारी आणि कोळंबी पालन यांसारखे स्थानिक व्यवसाय पाहता येतात. तसेच येथे अनेक स्थलांतरित पक्षी, कॅनॉल क्रूझ, खारफुटीची जंगले, शांत बॅकवॉटर, नारळाच्या झाडांच्या रांगा पाहायला मिळतात. आणि येथील आकर्षण म्हणजे प्रसिद्ध कल्लाडा बोट रेस जी ओणम सणादरम्यान आयोजित केली जाते.
17)Thenmala Ecotourism-




थेनमला हे केरळच्या कोल्लम जिल्ह्यातील, पश्चिम घाटात वसलेले, भारतातील पहिले नियोजित इको-टूरिझम केंद्र आहे. हे निसर्गरम्य शहर हिरवळ, विविध वनस्पती, प्राणी व विविध साहसी उपक्रमांसाठी प्रसिद्ध आहे. मल्याळम भाषेत “थेनमाला” चे भाषांतर ‘हनी हिल’ असे केले आहे. येथे तीन मुख्य विभाग आहेत. सांस्कृतिक विभागमध्ये केरळचा सांस्कृतिक वारसा दर्शवणारे ॲम्फीथिएटर आणि ‘चिलंका’ म्युझिकल डान्सिंग फाउंटन आहे. साहसी विभागमध्ये माउंटेन बायकिंग, रॉक क्लायंबिंग, रिव्हर क्रॉसिंग, बर्मा ब्रिज आणि फ्लाइंग फॉक्स हे खेळ आहेत. आणि येथील विश्रांती विभागात शिल्प उद्यान आणि निसर्ग मार्ग आहेत. याशिवाय येथे बटरफ्लाय सफारी पार्क, थेनमाला धरण बोटींग, हरणांचे पुनर्वसन केंद्र, नक्षत्रवनम ही आकर्षाने आहेत.
18)Aryankavu Ayyappa/ Shastha Temple-


श्री धर्मशास्ता मंदिर हे केरळच्या कोल्लम जिल्ह्यातील,अरियंकावू येथील भगवान अय्यप्पांना समर्पित असलेल्या पाच प्रमुख (पंच शास्ता)मंदिरांपैकी एक आहे. हे मंदिर जमिनीच्या पातळीपासून 35 फूट खाली बांधलेले आहे. या मंदिरात भगवान अय्यप्पांना एका किशोर वयाच्या रूपात पूजले जाते व त्यांना ‘तिरु आर्यन’ असेही म्हटले जाते.परशुरामाने या मंदिराची स्थापना केली असल्याचे मानले जाते. येथील डिसेंबर महिन्यातील “तिरु कल्याणम’ हा सर्वात महत्त्वाचा उत्सव आहे त्यामध्ये भगवान अय्यप्पा आणि पुष्कला देवीने विवाह केला होता. सबरीमाला मंदिराप्रमाणेच, या मंदिरातही गाभाऱ्यापर्यंत पोहोचण्यासाठी 18 पवित्र पायऱ्या आहेत आणि 10 ते 50 वयोगटातील महिलांना प्रवेश निषिद्ध आहे.
19)Kallada Boat Race-



कल्लाडा बोट रेस हे केरळच्या कोल्लम जिल्ह्यातील, मुनरो आयलंड येथे कल्लाडा नदीवर, ओणमनंतर आयोजित केली जाणारी एक वार्षिक नौका शर्यत आहे.या शर्यतीचा मार्ग पुथिरापारम्बु ते करुथ्राकाडवू नेट्टयम असा सुमारे 1,400 मीटर लांबीचा असून हा सोहळा ऑक्टोबर महिन्यात पार पडतो. आणि याला केरळमधील बोट रेस हंगामाचा ‘ग्रँड फिनाले’ मानले जाते.या स्पर्धेत ‘चुंदन वल्लम’ (साप बोट) सोबतच इरुट्टुकुथी आणि वेप्पम अशा विविध प्रकारच्या बोटी सहभागी होतात. कल्लाडा नदीच्या पात्रात ही शर्यत आयोजित केली जाते, ही स्पर्धा चॅम्पियन्स बोट लीग (CBL) चा एक भाग असून याला आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळख मिळाली आहे. निसर्गरम्य मुनरो बेटावरून ही शर्यत पाहण्यासाठी लाखो पर्यटक उपस्थित राहतात.
20)British Palace-

ब्रिटिश बंगला/ रेसिडेन्सी/ गव्हर्नमेंट गेस्ट हाऊस, हे केरळच्या कोल्लम जिल्ह्यातील, आश्रमम येथील दुमजली ऐतिहासिक वास्तू आहे. हा बंगला अष्टमुडी तलावाच्या काठी असून याचे निर्माण 1819 मध्ये कर्नल जॉन मुनरो यांनी केले होते. ब्रिटीश काळात हा बंगला त्रावणकोरमधील ब्रिटीश रेसिडेंटचे अधिकृत निवासस्थान म्हणून वापरला जात असे. ही दुमजली इमारत युरोपियन, भारतीय आणि टस्कन वास्तुशैलींचे एक उत्कृष्ट मिश्रण आहे. या इमारतीच्या वरच्या बाजूला एक मुकुट असून त्यावर सिंह बसलेला आहे आणि त्यावर “Dieu et mon Droit” (देव आणि माझा अधिकार) हे ब्रीदवाक्य कोरलेले आहे. या बंगल्याच्या परिसरात ‘एडवर्ड रोझ गार्डन’ हे सुंदर उद्यान असून सध्या या इमारतीचे रूपांतर शासकीय विश्रामगृहात करण्यात आले आहे.
21)Cheena Kottaram/ China Palace-


चेना कोट्टाराम किंवा चिनी राजवाडा हा केरळच्या कोल्लम जिल्ह्यातील, एक ऐतिहासिक विश्रामगृह आहे. 1904 मध्ये त्रावणकोरचे राजे श्री मूळम थिरुनल राम वर्मा यांच्यासाठी बांधली होती. ही एक मजली सात खोल्यांची इमारत इंडो-सॅरेसेनिक युरोपियन आणि मोरीश स्थापत्यशैलीचे उत्तम उदाहरण आहे. ही इमारत जुन्या चिनी घरांसारखी दिसत असल्याने स्थानिक लोक याला ‘चेना कोट्टाराम’ (चिनी महाल) म्हणतात. सध्या ही जागा कोल्लम रेल्वे स्थानकाजवळ आहे व रेल्वेच्या स्टोअररूम म्हणून वापरली जाते.
22) Pathanapuram,manchalloor sreekrishna swami temple-

पथानापुरम हे केरळच्या कोल्लम जिल्ह्यातील,रबर आणि मसाल्यांच्या लागवडीसाठी प्रसिद्ध तालुका आहे. पश्चिम घाटातील पर्वतरांगांमध्ये वसलेले हे एक सुंदर शहर असून येथे अनेक मंदिरे आहेत. त्यामुळे येथे अनेक देशी व विदेशी पर्यटक येतात. पठाणापुरम येथील श्रीकृष्ण स्वामी मंदिर हे मंचल्लूर स्थित एक धार्मिक स्थळ आहे. येथे भगवान श्रीकृष्णाची ‘श्रीकृष्ण स्वामी’ या रूपात पूजा केली जाते. व गणपती, लक्ष्मी देवी आणि नागदेवतांचीही पूजा केली जाते. हे मंदिर दरवर्षी रोहिणी थिरुनल महोत्सव, पोंगाला महोत्सव, अष्टमी रोहिणी असे धार्मिक उत्सव मोठ्या उत्साहात साजरे करते.
23)Karimbinpuzha Shiva Temple-

करिंबिनपुझा शिव मंदिर हे केरळच्या कोल्लम जिल्ह्यातील, कुन्नथूर तालुक्यात,कल्लाडियार नदीच्या काठावर वसलेले एक अत्यंत प्राचीन आणि पवित्र तीर्थक्षेत्र आहे. हे मंदिर पूर्वी कोट्टारक्करा राजांच्या कुटुंबाच्या मालकीचे होते. सध्या याचे व्यवस्थापन त्रावणकोर देवस्वोम बोर्डाद्वारे केले जाते. येथील मंदिर परिसर अत्यंत निसर्गरम्य वातावरण भक्ती आणि अध्यात्मिक ध्यानधारणेसाठी महत्त्वपूर्ण मानला जातो. तसेच या मंदिराची वास्तूकला सुंदर पारंपारिक केरळ शैलीतील असून, त्यावर कोरीव काम केलेले आहे. या मंदिर परिसरात दुर्गा देवी (पांगोडे) आणि नेदियाविला देवी ही मंदिरे आहेत.
24)Mukhathala Sree Krishna Swamy Temple-



श्रीकृष्णस्वामी मंदिर हे केरळच्या कोल्लम जिल्ह्यातील, मुखथला येथील प्रसिद्ध आणि प्राचीन मंदिर आहे. हे ‘मुखथला मुरारी मंदिर’ म्हणूनही ओळखले जाते. या ठिकाणी भगवान श्रीकृष्णाने मुरासुराचा वध केला होता, त्यामुळे येथे भगवान विष्णूची ‘मुरारी’ रूपात पूजा केली जाते. ज्यामध्ये विष्णूची मूर्ती बाल कृष्णाच्या रूपात बासरी वाजवताना दाखवली आहे. हे मंदिर 3,000 वर्ष जुने असून सध्याची वास्तू 16 व्या शतकातील आहे. आख्यायिकेनुसार, येथे भगवान विष्णूने मुर राक्षसाचा वध केल्यावर त्याचे ‘मुख’ (चेहरा) आणि ‘थला’ (डोकं) या ठिकाणी पडले, म्हणून या गावाला ‘मुखथला’ असे नाव मिळाले. केरळमधील कोणतीही ‘उपदेवता’ नसलेले हे एक दुर्मिळ मंदिर आहे.
25)Rameswaram Mahadeva Temple-


रामेश्वरम महादेव मंदिर हे केरळच्या कोल्लम जिल्ह्यातील, प्राचीन शिवमंदिर आहे. हे मंदिर केरळमधील भगवान परशुरामांनी स्थापन केलेल्या 108 शिवमंदिरांपैकी एक असून शिवालया स्तोत्रममध्ये उल्लेख असलेल्या दोन रामेश्वरम मंदिरांपैकी हे एक आहे, तर दुसरे तिरुवनंतपुरममधील अमराविला येथे आहे. या मंदिरात भगवान शिवाला ‘रामेश्वरथप्पन’ या नावाने ओळखले जाते. व शिवलिंगाचे तोंड पश्चिमेकडे आहे. मंदिराचा मुख्य गाभारा आयताकृती असून मंदिर परिसरात उत्तर आणि पश्चिम बाजूला दोन लहान गोपुरे आहेत. व मंदिरासमोर तांब्याचा कलश आहे. 12 व्या शतकातील या मंदिरावर ‘पांडियन’ वास्तुकलेचा प्रभाव असून मंदिराच्या भिंतींवर 12 व्या ते 16 व्या शतकातील तमिळ शिलालेख आढळतात. आणि येथील कोरीव कामात ‘व्याल’ या पौराणिक प्राण्यांचे कोरीव काम अतिशय आकर्षक आहे.
1)अमृतापुरी आश्रम कशासाठी प्रसिद्ध आहे?
अमृतपुरी आश्रम हा मानवतावादी माता अमृतानंदमयी देवी यांचा मुख्य आश्रम आहे, जो अम्मा (आई) म्हणून ओळखला जातो.
2)अष्टमुडी तलाव म्हणजे काय?
केरळच्या कोल्लम जिल्ह्यातील, अष्टमुडी तलाव म्हणजे ऑक्टोपसप्रमाणे आठ बाजूंनी पसरलेला मोठा तलाव आहे.
3)कोल्लम जिल्ह्यातील मुनरो आयलंड कशासाठी प्रसिद्ध आहे?
मुनरो आयलंड हे अष्टमुडी तलावातील छोट्या बेटांचा समूह असून कॅनॉल क्रूझ आणि शांत वातावरणासाठी प्रसिद्ध आहे.


