कन्नूर जिल्ह्यातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे- Top 25 places to visit in Kannur District

मित्रांनो भारतभ्रमंती या वेबसाईटवर तुम्ही इंग्लिश, हिंदी आणि मराठी भाषेत, भारत देशातील प्रत्येक राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यातील संपूर्ण पर्यटन स्थळे पाहू शकता. आता तुम्ही पाहणार आहात केरळ राज्यातील कन्नूर जिल्ह्यातील संपूर्ण पर्यटन स्थळे.कन्नूर जिल्हा हा केरळच्या मलबार किनारपट्टीवर अरबी समुद्र आणि पूर्वेस पश्चिम घाटावर वसलेला निसर्गसंपन्न, ऐतिहासिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या समृद्ध जिल्हा आहे. कन्नूर हे या जिल्ह्याचे प्रशासकीय मुख्यालय आणि प्रमुख बंदर आहे. या जिल्ह्यात स्थानिक देवस्थानांमध्ये विधीप्रधान थेय्याम नृत्य केले जाते. त्यामुळे कन्नूरला ‘थेय्यामची भूमी’ म्हटले जाते. तसेच प्राचीन काळात हे शहर अरब, ब्रिटिश आणि पर्शियन लोकांशी व्यापार करण्याचे मोठे केंद्र होते. Top 25 places to visit in Kannur District

या जिल्ह्यात कन्नूर, थलास्सेरी, तालीपरंबा इरित्ती आणि पाय्यानूर हे पाच तालुके असून येथील सेंट अँजेलो किल्ला, सुंदर समुद्रकिनारे, लोककला आणि संस्कृती,आशियातील सर्वात लांब मुझप्पिलंगगड बीच ही प्रमुख पर्यटन आकर्षणे आहेत. याशिवाय कन्नूर हे केरळमधील सर्वात मोठे ‘कॅन्नोर लुंगी’ आणि यंत्रमाग व हातमाग उत्पादक कापडांसाठी जगभरात प्रसिद्ध आहे. तसेच या जिल्ह्यात नारळ, रबर, काजू, काळी मिरी आणि आल्याची शेती मोठ्या प्रमाणावर केली जाते. कन्नूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात निसर्गसमृद्ध ऐतिहासिक व सांस्कृतिक पर्यटन स्थळे आहेत.

Top 25 places to visit in Kannur District

कन्नूर जिल्ह्यातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे

1)Parassinikadavu Sri Muthappan Temple-

Top 25 places to visit in Kannur District

परासिनीकाडवू श्री मुथप्पन मंदिर हे केरळच्या कन्नूर जिल्ह्यातील, वलपट्टनम नदीच्या काठावरील एक अनोखे आणि अद्वितीय तीर्थक्षेत्र आहे. येथील मुख्य देवता श्री मुथप्पन हे तिरुवप्पन (भगवान विष्णू) आणि वेल्लातोम (भगवान शिव) यांचे अवतार मानले जातात. तसेच हे मंदिर सर्व जाती धर्मातील लोकांसाठी खुले आहे. आणि येथे श्री मुथप्पन यांचे वाहन कुत्रा आहे त्यामुळे मंदिर परिसरात भटक्या कुत्र्यांना सन्मानाने वागवले जाते. येथे दररोज ‘मुथप्पन थेय्यम’ सादर केले जाते.ज्यात कलाकार मुथप्पनची भूमिका साकारतात आणि भक्तांच्या समस्या ऐकतात. येथील अद्वितीय गोष्ट म्हणजे या मंदिरात प्रसादात वाफवलेले काळे चणे, चहा ताडी, मासे आणि मांस अर्पण केले जाते व प्रसाद म्हणून वाटले जाते. दरवर्षी डिसेंबर मध्ये येथे ‘पुथारी तिरुवप्पाना’ हा उत्सव साजरा केला जातो.

2)St. Angelo Fort/Kannur Fort-

सेंट अँजेलो किल्ला किंवा कन्नूर किल्ला हा केरळच्या कन्नूर जिल्ह्यातील,अरबी समुद्राच्या किनाऱ्यावर वसलेला एक ऐतिहासिक आणि भव्य किल्ला आहे.हा त्रिकोणी लॅटराईट किल्ला असून जांभा दगडांपासून बनलेला आहे. किल्ल्यात मोठे बुरुज, खंदक, भूमिगत तुरुंग आणि गुप्त बोगदे आहेत. या ऐतिहासिक किल्ल्याचा ताबा मिळवण्यासाठी अनेक युद्धे झाली आहेत. 1663मध्ये, हा किल्ला डच लोकांच्या ताब्यात होता आणि नंतर त्यांनी तो कन्नूरच्या अली राजाला विकला. या किल्ल्यावर ऑईल लॅम्प दीपगृहाचे अवशेष आहेत.आणि किल्ल्यावरून ‘मप्पिलाखाडी’ हे नैसर्गिक मासेमारी बंदर आणि धर्मडम बेटाचे सुंदर दृश्य दिसते. सध्या हा किल्ला ‘भारतीय पुरातत्व सर्वेक्षण’ च्या देखरेखीखाली एक संरक्षित स्मारक आहे.

Visit our website: allindiajourney.com

3)Arakkal Kettu Palace & Museum-

अरक्कल केट्टू राजवाडा हा केरळच्या कन्नूर जिल्ह्यातील, आयक्कारा या किनारपट्टीवरील गावात मुस्लिम अरक्कल राजघराण्याचे राजेशाही निवासस्थान आहे. या घराण्याने कन्नूर आणि लक्षद्वीप बेटांवर अनेक शतके राज्य केले. हा राजवाडा 200 वर्षे जुना असून पुरातत्व विभागाने संरक्षित स्मारक म्हणून गणला आहे.हा राजवाडा केरळ शैलीत बांधलेला आहे व त्याला उतरते छप्पर आणि लाकडी कोरीव काम आहे. येथे राजवाडा, मशिदी आणि प्रशासकीय इमारती आहेत.2005 मध्ये या राजवाड्याच्या ‘दरबार हॉल’चे रूपांतर केलेल्या संग्रहालयात वाद्य, राजेशाही दागिने, चांदी आणि कांस्य भांडी, शस्त्रे, तलवारी, कट्यार, जुने टेलिफोन, दुर्बीण, फर्निचर आणि पवित्र कुराणाच्या शाही प्रती ठेवण्यात आले आहेत.

4)Rajarajeshwara Temple-

राजराजेश्वर मंदिर हे केरळच्या कन्नूर जिल्ह्यातील,तालीपरंबा येथील केरळमधील 108 प्राचीन व पवित्र शिवमंदिरांपैकी एक आहे. या मंदिरात भगवान शिव यांना श्री राजराजेश्वर, पेरुमथ्रिकोविलाप्पन, पेरुम-चेल्लूरप्पन आणि थंपुराण पेरुमथ्रिकोविलाप्पन असे म्हणतात. या मंदिराची स्थापना भगवान परशुरामांनी केल्याचे सांगितले जाते. हे मंदिर केरळच्या पारंपरिक शैलीत बांधलेले असून मंदिराच्या गर्भगृहावर तांब्याच्या पत्र्यांचे दोन थरांचे पिरॅमिड छप्पर आहे आणि शिखराचे वजन 90 टन आहे. केरळमधील इतर मंदिरांप्रमाणे या मंदिरात ही ध्वजस्तंभ (कोडी मारम) नाही. आणि महिलांना या मंदिरात रात्रीची ‘अथाज पूजा’ झाल्यानंतरच मुख्य मंदिरात प्रवेश मिळतो. तसेच येथे शिवाला बेलपत्राऐवजी विष्णू पूजेची पद्धतिची तुळशीची पाने अर्पण केली जातात.

5)Shree Peralassery Subramanya Temple-

श्री पेरलसेरी सुब्रमण्यम मंदिर हे केरळच्या कन्नूर जिल्ह्यातील, एक अत्यंत प्रसिद्ध आणि प्राचीन तीर्थक्षेत्र आहे. येथे सुब्रमण्यम स्वामींची नाग स्वरूपात पूजा केली जाते. आख्यायिकेनुसार, रावणाशी युद्ध करण्यासाठी लंकेला जाताना भगवान राम आणि लक्ष्मण या ठिकाणी थांबले होते. भगवान सुब्रमण्यम यांच्या अस्तित्वाची प्रचिती आल्याने त्यांनी येथे मूर्तीची स्थापना करण्याचा निर्णय घेतला. आणि हनुमानाने मूर्ती आणण्यास उशीर केल्यामुळे, श्रीरामांनी त्यांच्या हातातील सुवर्ण कडे (पेरुवाला) येथे प्रतिष्ठापित केले, तेव्हापासून या जागेला ‘पेरुवलसेरी’ असे नाव पडले. या मंदिराचे मुख्य आकर्षण म्हणजे येथील भव्य मंदिर तलाव, हा केरळमधील सर्वात मोठा चारही बाजूंनी असंख्य पायऱ्यांचा तलाव आहे. तसेच येथे नाग देवतांना कोंबडीची अंडी, दूध, पिवळा तांदूळ आणि पाणी अर्पण करण्याची अनोखी प्रथा आहे. दरवर्षी डिसेंबर महिन्यात येथे ‘कोडीएट्टम’ उत्सव साजरा केला जातो.

6)Muzhappilangad Drive-In Beach-

मुझप्पिलंगड ड्राईव्ह-इन बीच हा केरळच्या कन्नूर जिल्ह्यातील, आशियातील सर्वात लांब आणि जगातील सर्वोत्तम ड्राईव्ह-इन बीचेसपैकी एक समुद्रकिनारा आहे. हा समुद्रकिनारा नैसर्गिक काळ्या खडकांनी संरक्षित असून, पोहण्यासाठी आणि वॉटर स्पोर्ट्ससाठी एक सुरक्षित ठिकाण आहे. या ठिकाणी तुम्ही समुद्राच्या लाटांच्या जवळ तुमची गाडी किंवा कार 4 कि.मी. पर्यंत चालवू शकता.बीबीसी ऑटो’ने या बीचचा समावेश जगातील गाडी चालवण्यासाठी 6 सर्वोत्तम समुद्रकिनाऱ्यांमध्ये केला आहे. पर्यटक भरती नसल्यावर या बीस वरून धर्माडम बेटावर चालत जातात. याशिवाय येथे पॅरासेलिंग, पॅराग्लायडिंग आणि वॉटर स्पोर्ट्सची सुविधा उपलब्ध आहे.

7)Dharmadam Island-

धर्माडम आयलंड हे केरळच्या कन्नूर जिल्ह्यातील,थलासेरी जवळील एक लहान बेट आहे. हे 2 हेक्टर क्षेत्रावर पसरलेले एक खाजगी बेट असून ‘पचथुरुथ’ किंवा हिरवे बेट म्हणूनही ओळखले जाते. लॅटरिटिक खडकांच्या प्रक्षेपणामुळे बनलेल्या बेटावर दाट नारळाची झाडे, एका बाजूला अरबी समुद्र व तीन बाजूंना नद्यांनी (अंजारकंडी आणि थलासेरी) वेढलेले आहे. पूर्वी हे ठिकाण बौद्ध धर्माचे केंद्र होते आणि ‘धर्मपट्टणम’ म्हणून ओळखले जात होते. पूर्वी हे बेट खाजगी मालकीचे होते, परंतु 1998 मध्ये केरळ सरकारने ते ताब्यात घेतले. हे निर्जन बेट निसर्ग प्रेमी आणि पर्यकांसाठी एक उत्तम पिकनिक स्पॉट असून धर्मदम समुद्रकिनाऱ्यापासून 100 मीटर अंतरावर आहे.

8)Payyambalam Beach-

पय्यंबलम बीच हा केरळच्या कन्नूर जिल्ह्यातील, चार किलोमीटरपर्यंत पसरलेला सुंदर समुद्रकिनारा आहे. येथील सोनेरी वाळू, नारळाची झाडे आणि अरबी समुद्राच्या फेसाळणाऱ्या लाटांमुळे हे पर्यटकांचे आवडते ठिकाण आहे. येथील प्रमुख आकर्षण म्हणजे या बीचवर प्रसिद्ध शिल्पकार कनयी कुन्हीरामन यांनी साकारलेले ‘माता आणि बालकाचे’ (Mother and Child) भव्य शिल्प आहे. पर्यटक या शांत समुद्रकिनाऱ्यावर पोहणे, सर्फिंग, कयाकिंग आणि पॅरासेलिंग अशा जलक्रीडांचा आनंद घेऊ शकतात. तसेच मुलांसाठी येथे गार्डन आणि पार्क उपलब्ध आहे. मणिरत्नम यांचा प्रसिद्ध चित्रपट ‘अलैपायुथे’ व अनेक चित्रपटांचे चित्रीकरण या बीचवर झाले आहे.

9)Thalassery Fort-

थलसेरी / तेल्लीचेरी किल्ला हा केरळच्या कन्नूर जिल्ह्यातील, तेल्लीचेरी येथील एक ऐतिहासिक किल्ला आहे. या किल्ल्याची निर्मिती ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने 1708 मध्ये केली होती. हा किल्ला ‘लॅटराइट’ ब्लॉक्स वापरून बांधला असून पूर्वी हा किल्ला व्यापार केंद्रासाठी आणि समृद्ध मसाले (मिरी, वेलची),डोंगराळ उत्पादने साठवण्यासाठी कोठार म्हणून वापरला जात असे. नंतर ब्रिटिशांनी 1776 मध्ये या किल्ल्याचे प्रशासकीय आणि लष्करी केंद्र बनवले. हा किल्ला समुद्राच्या कडेला एका खडकावर असून येथून अरबी समुद्राचे विहंगम दृश्य पहायला मिळते. तसेच या किल्ल्याच्या आवारात एक जुने दीपगृह, गुप्त बोगदे आणि जमिनीखालील खोल्या आहेत. सध्या हा किल्ला भारतीय पुरातत्व विभागाच्या देखरेखीखाली आहे.

10)Paithalmala-

पैथलमाला हे केरळच्या कन्नूर जिल्ह्यातील एक मोहक आणि निसर्गरम्य हिल स्टेशन आहे. हे कन्नूरमधले सर्वात उंच शिखर असून समुद्रसपाटीपासून याची उंची सुमारे 1,372मीटर आहे. हे शिखर कुर्ग जंगलांच्या शेजारी पश्चिम घाटात वसलेले आहे. पर्यटकांना या शिखरावर जाण्यासाठी घनदाट जंगले आणि गवताळ प्रदेशातून 6 किमी ट्रेकिंग करावे लागते. येथील शिखरावर असलेल्या वॉच टॉवरवरून कुर्गचे जंगल आणि कन्नूरच्या प्रदेशाचे विहंगम दृश्य दिसते. पश्चिम घाटातील हे ठिकाण हिरवाई, ट्रेकिंग ट्रेल्स आणि निसर्ग सौंदर्यासाठी प्रसिद्ध आहे. तसेच या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जैवविविधता,दुर्मिळ वनस्पती, वृक्ष आणि फुलपाखरांच्या 100 पेक्षा जास्त प्रजाती व आदिवासी राजा ‘वैथलकोन’ याच्या राजवाड्याचे अवशेषही पाहायला मिळतात.

11)Aralam Wildlife Sanctuary-

अरलम वन्यजीव अभयारण्य हे केरळच्या कन्नूर जिल्ह्यातील, केरळच्या उत्तरेकडील निसर्गप्रेमी आणि वन्यजीव शौकिनांसाठी नंदनवन आहे. हे अभयारण्य 55 चौरस किलोमीटर परिसरात पसरलेले असून याची स्थापना 1984 मध्ये झाली. अरलम हे फुलपाखरांसाठी प्रसिद्ध असून या अभयारण्याला फुलपाखरांचे नंदनवन म्हटले जाते. जुलै 2025 मध्ये या ठिकाणाचे ‘अरलम बटरफ्लाय अभयारण्य’ असे नामकरण करण्यात आले आहे. येथे 250 पेक्षा जास्त प्रजातींची फुलपाखरे आढळतात. याशिवाय येथे विविध प्रकारच्या वनस्पती आणि प्राण्यांमध्ये बिबट्या, सांबर हरीण, रानडुक्कर, मोठी खार, आणि लंगूर आहेत. आणि 150 पेक्षा जास्त पक्ष्यांच्या प्रजाती आहेत, या सदाहरित जंगलामध्ये कट्टी बेट्टा हे सर्वात उंच शिखर व मीनमुट्टी धबधबा आहे. तसेच या अभयारण्याच्या जवळ असलेल्या ‘सेंट्रल स्टेट फार्म’ मध्ये नारळाच्या बियांचे उत्पादन करणारे मोठे केंद्र आहे.

12)Madayipara-

मदयीपारा हे हे केरळच्या कन्नूर जिल्ह्यातील पझयांगडी येथील एक निसर्ग संपन्न हिरवीगार, जैवविविधतेने समृद्ध असलेले लॅटराइट टेकडी आहे. 700 एकर क्षेत्रात पसरलेले, मदयीपारा हे एक पर्यावरणीय स्वर्गच आहे. येथे दुर्मिळ फुलांच्या प्रजाती, 300 पेक्षा जास्त फुलांची रोपे, 500 वनस्पतींच्या प्रजाती आणि फुलपाखरांच्या दुर्मिळ जाती आहेत. येथे आढळणाऱ्या अद्वितीय वनस्पतींमध्ये मलबार रोटाला, पाईपवॉर्ट्स, तरंगणारे हृदय आणि जगातील सर्वात मोठे नेत्रदीपक अ‍ॅटलास फुलपाखरू आहे. पावसाळ्यानंतर येथे विविध रंगांच्या फुलांनी बहरलेल्या गालीच्यामुळे ते ‘ॲमस्टरडॅमच्या ट्यूलिप गार्डन’ सारखे दिसते. तसेच येथे पाझियांगडी मशिदीचे व प्राचीन किल्ल्याचे अवशेष पाहायला मिळतात. आणि प्रसिद्ध मडाई कावू मंदिर आणि वडुकुंडा शिव मंदिर आहे. येथील विशेष आकर्षण म्हणजे येथे आरशाच्या आकाराचे, ‘जूथक्कुलम’ (यहूदी टाकी) म्हणून ओळखले जाणारे तलाव आहे. आणि कडक उन्हाळ्यातही हा तलाव कधीही सुकत नाही.

13)Parassinikkadavu Snake Park-

परासिनिकडावू सर्प उद्यान हे केरळच्या कन्नूर जिल्ह्यातील,आशियातील प्रमुख सर्प संवर्धन केंद्रांपैकी एक आहे. या उद्यानाची स्थापना 1982 मध्ये सामाजिक कार्यकर्ते एम. व्ही. राघवन यांच्या नेतृत्वाखाली पप्पिनीसेरी येथील विषारी औषध उपचार केंद्र असलेल्या विशा चिकित्सा केंद्राने केली आहे. या उद्यानात विविध प्रकारचे साप, स्पेक्टॅकल्ड कोब्रा , किंग कोब्रा , रसेल वाइपर , क्रेट पिट वाइपर आणि अजगरांसह बिनविषारी सापांचा मोठा संग्रह आहे. सापांच्या संवर्धनासाठी समर्पित असलेल्या या उद्यानात लोकांच्या मनातील सापांची भीती कमी करण्यासाठी सापांचे जिवंत शो दाखवले जातात.येथे सर्पदंशावर प्रभावी उपचार दिले जातात.

14)Kelothu Puthiyapurayil Shree Vayanattukulavan Devasthanam-

श्री वयनाट्टुकुलवन देवस्थान हे केरळच्या कन्नूर जिल्ह्यातील, मयील जवळील मल्लाकोडी (कुट्टीचिरा) येथील उत्तर मलबारमधील एक महत्त्वाचे धार्मिक स्थळ आहे. येथील मुख्य देवता ‘वयनाट्टुकुलवन’ हे शिव स्वरूप मानले जाते. या मंदिरात दरवर्षी थैय्यम विधी साजरा केला जातो त्यामध्ये वयनाट्टुकुलवन थैय्यम,कंदनार केलन थैय्यम, पोट्टन थैय्यम, अग्नी थैय्यम,गुलिकन थैय्यम आणि कुदीवीरन थैय्यम साजरे केले जातात. हे देवस्थान ‘केलोथ पुथियापुरायिल’ कुटुंबाशी संबंधित असून सांस्कृतिक आणि धार्मिक परंपरेचे केंद्र आहे.

15)Trichambaram Temple-

त्रिचंबरम मंदिर हे केरळच्या कन्नूर जिल्ह्यातील, तालिपरंबा येथील भगवान श्रीकृष्णाचे एक प्राचीन आणि प्रसिद्ध मंदिर आहे. हे मंदिर ‘उत्तर गुरुवायूर’ म्हणूनही ओळखले जाते. या मंदिरात कृष्ण कंसवधाच्या नंतरच्या ‘रौद्र’ रूपात बसलेल्या अवस्थेत विराजमान आहे. या मंदिराचा उल्लेख 11 व्या शतकातील ‘मुलिकावंशम’ काव्यात आहे. व मंदिराच्या भिंतींवर 16 व्या शतकातील सुंदर भित्तिचित्रे आणि लाकडी कोरीव काम पाहायला मिळते. येथील विशेष प्रथा म्हणजे मंदिराच्या आवारात हत्तींना बंदी आहे. या मंदिर परिसरात श्री गणपती, भगवान शिव, अय्यप्पा आणि येथील तलावाच्या मध्यभागी दुर्गा देवीचे मंदिर आहे. दरवर्षी मार्च महिन्यात 14 दिवस चालणारा वार्षिक उत्सव साजरा केला जातो त्यावेळी ‘तिदाम्पू नृत्यम’ हे पारंपारिक नृत्य सादर केले जाते.

16)Koovode Water Lily View Point –

कूवोड वॉटर लिली व्ह्यू पॉइंट हे केरळच्या कन्नूर जिल्ह्यातील, तालिपरंबा जवळील कूवोड गावातील एक अत्यंत सुंदर आणि निसर्गरम्य पर्यटन स्थळ आहे.येथे पाण्याचे मोठे तलाव आणि भातशेती असून त्यामध्ये हजारो गुलाबी आणि पांढऱ्या रंगाच्या ‘वॉटर लिली’ फुलतात. त्यामुळे हजारो पर्यटक हे दृश्य पाहण्यासाठी प्री-वेडिंग शूट आणि निसर्गफोटोग्राफी करण्यासाठी येथे येतात. तसेच पर्यटकांना येथे फुलांच्या मधून फिरण्यासाठी बोटींची सोय उपलब्ध आहे.

17)Kuppam River Boat Point-

कुप्पम रिव्हर बोट पॉइंट हे केरळच्या कन्नूर जिल्ह्यातील, तळीपरंबा जवळील शांत बॅकवॉटर्स आणि निसर्गरम्य पर्यटन स्थळ आहे. हे ठिकाण मलबार क्रूझ प्रकल्पाचा भाग असून येथे खारफुटीची जंगले, पक्षी निरीक्षण, नारळबागा, लहान बेटे आणि निसर्ग सौंदर्यासाठी प्रसिद्ध आहे. पर्यटकांसाठी येथे डे क्रूझ, हाऊसबोट आणि लहान बोटींमधून फिरण्याची सोय उपलब्ध आहे. तसेच येथील कुप्पम नदीवर ब्रिटीश शैलीत बांधलेला पाच कमानींचा सुंदर जुना पूल आहे. पक्षीप्रेमी आणि फोटोग्राफीसाठी हे एक उत्तम ठिकाण आहे.

18)Kannur Lighthouse-

कन्नूर दीपगृह हे केरळच्या कन्नूर जिल्ह्यातील,अरबी समुद्राच्या किनाऱ्यावर पय्यम्बलम बीचवर सी व्ह्यू पार्क आणि सरकारी अतिथीगृहाला लागून वसलेले एक ऐतिहासिक आणि महत्त्वाचे पर्यटन स्थळ आहे. 1903 मध्ये ब्रिटीशांनी हे दीपगृह बांधले होते. आणि सध्याचा 75 फूट उंच लाल आणि पांढऱ्या रंगाचा टॉवर 1976 मध्ये कार्यान्वित झाला. या दीपगृहाच्या वरच्या बाजूला जाण्यासाठी सर्पिल पायऱ्या आहेत. आणि तिथून अरबी समुद्र, बेबी बीच आणि संपूर्ण कन्नूर शहराचे विलोभनीय दृश्य दिसते. तसेच येथील दीपगृह संग्रहालयात जुन्या काळातील प्रकाश यंत्रणा, लेन्स आणि ऐतिहासिक वस्तू मांडल्या आहेत.

19)Shree Vaidyanatha Temple Kanhirangad-

श्री वैद्यनाथ मंदिर हे केरळच्या कन्नूर जिल्ह्यातील, तालीपरंबाजवळ कान्हिरंगड येथील टेकडीवर असलेले एक प्राचीन आणि पवित्र शिव मंदिर आहे. हे मंदिर केरळमधील 108 प्राचीन शिव मंदिरांपैकी एक असून येथे भगवान शंकराची ‘वैद्यनाथ’ (रोगांचे निवारण करणारा देव) या रूपात पूजा केली जाते. या मंदिराची रचना पारंपारिक केरळ शैलीत बांधलेले असून याची निर्मिती 11 व्या शतकात चोल राजा ‘शतसोमन’ यांनी केली होती. येथील शिवलिंग ‘स्वयंभू’ असून भाविक येथे त्वचा आणि डोळ्यांच्या आजारांवरील उपचारांसाठी ‘धारा’ आणि ‘क्षीरधारा’ हे विधी करतात. तसेच येथे महाशिवरात्री आणि जानेवारी महिन्यात ‘थिरुवाथिरा’ आणि ‘थैयम’ हे उत्सव मोठ्या उत्साहात साजरे केले जातात.

20)Ezharakund waterfall-

एझारकुंडू धबधबा हा केरळच्या कन्नूर जिल्ह्यातील, पैठलामाला खोऱ्यातील सात-स्तरीय नयनरम्य धबधबा आहे. मल्याळम भाषेत ‘एझाराकुडू’ म्हणजे ‘साडेसात कुंड’ हा धबधबा सात टप्प्यांतून खाली पडतो आणि प्रत्येक टप्प्यावर नैसर्गिक खडकाळ कुंड तयार झाले आहेत. या धबधब्यापर्यंत पोहोचण्यासाठी घनदाट झाडीतून आणि निसर्गरम्य परिसरातून 2 किमी अंतराचा ट्रेक करावा लागतो. येथील निसर्गरम्य परिसर आणि धबधब्याचे पाणी अत्यंत स्वच्छ आणि पारदर्शक आहे. पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी येथे रेलिंग्ज, लाईफ जॅकेट आणि गार्ड्सची सुविधा आहे.

21)Karakkund waterfall-

करक्कुंड धबधबा हा केरळच्या कन्नूर जिल्ह्यातील, पानापुझा येथील घनदाट जंगलात वसलेला शांत व अत्यंत निसर्गरम्य धबधबा आहे. हा धबधबा घनदाट झाडी आणि नैसर्गिक सौंदर्याने बहरलेलाआहे. येथील धबधब्याचे पाणी दगडी पायऱ्यांसारख्या उतारावरून खाली पडते, त्यावेळी हे दृश्य पहाणे खूप विलोभनीय असते. पर्यटक येथे पोहण्याचा व नैसर्गिक ‘फिश स्पा’चा आनंद घेऊ शकतात. हा धबधबा तालीपरंबा पासून 12 किमी आणि पय्यानूर पासून 20 किमी अंतरावर आहे.

22)Odathil Palli / Mosque-

ओडथिल मशीद ही केरळच्या कन्नूर जिल्ह्यातील, थलास्सेरी येथील एक ऐतिहासिक आणि प्रसिद्ध मशीद आहे. ही मशीद सुमारे 200 वर्षांपूर्वी, 1806 मध्ये ‘की’ कुटुंबातील श्रीमंत व्यापारी मूसा काक्का यांनी बांधली होती. मूसा काक्का यांनी डच ईस्ट इंडिया कंपनीकडून ऊसाचे शेत विकत घेऊन ही मशीद बांधली होती, म्हणून याला ‘ओडथिल पल्ली’ (बागेतील मशीद) असे नाव पडले. ही मशीद पारंपारिक केरळ शैलीतील वास्तुकलेचा एक उत्कृष्ट नमुना असून या मशिदीला घुमट किंवा मिनार नाहीत. मशिदीच्या बांधकामात सुंदर कोरीव काम केलेल्या सागवानी लाकडाचा मोठ्या प्रमाणावर वापर केला आहे. व मशिदीचे छत तांब्याच्या पत्र्यांचे आहे आणि त्यावर सोन्याचे कलश आहेत.

23)Palakkayam Thattu-

पलक्कयम थट्टू हे केरळच्या कन्नूर जिल्ह्यातील, नडुविल येथील, पश्चिम घाटातील एक सुंदर, लोकप्रिय हिल स्टेशन आहे. हे ठिकाण समुद्रसपाटीपासून सुमारे 3,500 फूट उंचीवर आहे, येथून पर्यटकांना हिरवेगार डोंगर, धुक्याने व्यापलेल्या दऱ्या आणि शांत वातावरण व सभोवतालच्या नयनरम्य निसर्गाचे विहंगम दृश्य दिसते. रात्रीच्या वेळी या टेकडीचे टोक हजारो लहान दिव्यांनी उजळून निघते ते दृश्य पाहण्यासारखे असते. पर्यटक येथे सूर्योदय/सूर्यास्त, ट्रेकिंग, कॅम्पिंग, झिप-लाइनिंग, रॉक क्लायंबिंग, गन शूटिंग आणि धनुर्विद्या यासारख्या साहसी उपक्रमांचा रोमांचक अनुभव घेऊ शकतात.

24)Kalarivathukkal Bhagavathi Temple-

कलारीवाथुक्कल भगवती मंदिर हे केरळच्या कन्नूर जिल्ह्यातील, वलापट्टनम नदीकाठी वसलेले प्राचीन आणि जागृत तीर्थक्षेत्र आहे. या मंदिरात देवी भद्रकालीचे उग्र रूप पुजले जाते. आणि या देवीला प्राचीन मार्शल आर्ट ‘कलरिप्पयट्टू’ची माता मानले जाते. या मातेचे नाव ‘कलारी वातिल्कल’ (कलारीच्या दारापाशी) या शब्दावरून ‘कलारीवाथुक्कल’ हे नाव पडले आहे. 1000 पेक्षा जास्त जुने हे मंदिर चिरक्कल राजघराण्याचे कौटुंबिक मंदिर आहे. भद्रकाली माते सोबतच येथे भगवान शिव, सप्तमातृका आणि गणपती यांचीही छोटी मंदिरे आहेत. दरवर्षी ‘कलारीवाथुक्कल’ हा भगवतीचा थैय्यम येथे साजरा केला जातो.

25)Gundert Bungalow-

गुंडर्ट बंगला हा केरळच्या कन्नूर जिल्ह्यातील, थलासेरी येथील कुय्याली नदीच्या काठी वसलेले एक ऐतिहासिक वारसा स्थळ आणि सांस्कृतिक केंद्र आहे. हा बंगला 19 व्या शतकात प्रसिद्ध जर्मन मिशनरी, विद्वान आणि भाषाशास्त्रज्ञ डॉ. हर्मन गुंडर्ट यांचे निवासस्थान होते. ते येथे 20 वर्षे येथे राहिले व पहिला मल्याळम शब्दकोश व पहिले मल्याळम वृत्तपत्र तयार केले. हा बंगला पारंपारिक केरळ शैलीत बांधलेला असून त्याला रुंद व्हरांडे, मोठे लाकडी दरवाजे, खिडक्या आणि कौलारू छत आहे. सध्या या बंगल्याचे रूपांतर एका वारसा संग्रहालयात केले असून येथे हर्मन गुंडर्ट यांच्या जीवनाशी संबंधित वस्तू आणि हस्तलिखिते आहेत.तसेच या बंगल्याच्या जवळच गुंडर्ट मेमोरियल चर्च आहे.

Visit the travel blog

1)कन्नूर जिल्ह्यातील राजा राजेश्वर मंदिराचा इतिहास काय आहे?

कन्नूर जिल्ह्यातील राजा राजेश्वर मंदिर हे परशुरामांनी बांधलेल्या केरळमधील 108 प्राचीन शिवमंदिरांपैकी एक आहे व कुंडाच्या शिलालेखानुसार, या कुंडाचे नूतनीकरण 1524 मध्ये सतसोम राजाने केले होते.


2) केरळच्या कन्नूर जिल्ह्यामध्ये कोणती नदी वाहते?

केरळच्या कन्नूर जिल्ह्यामध्ये ‘वलपट्टणम’ ही सर्वात लांब 110 किमी लांबीची नदी वाहते.


3 )कन्नूरपासून श्री वैद्यनाथ मंदिर किती अंतरावर आहे?

श्री वैद्यनाथ मंदिर हे कन्नूर शहराच्या उत्तरेस 28 किमी अंतरावर, कान्हिरंगड येथे एका टेकडीवर आणि केरळमधील 108 प्राचीन शिव मंदिरांपैकी एक आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
Scroll to Top