मित्रांनो भारत भ्रमंतीमध्ये आपण भारत देशातील प्रत्येक राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील पर्यटन स्थळे पाहात आहोत, आता आपण पाहणार आहोत गुजरात राज्यातील भरूच जिल्ह्यातील संपूर्ण पर्यटन स्थळे, भरूच हे गुजरात राज्यातील पवित्र नर्मदा नदीच्या काठावर वसलेले एक प्राचीन शहर आहे. भारतातील हे दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात जुने शहर असून भरूचला ‘श्रीनगर’, ‘भृगुकच्छ’, ‘बरुगाझा’, ‘भरुआट्च’, अशा अनेक नावांनी ओळखले जात होते.भरूच जिल्ह्याचा उल्लेख मत्स्य पुराण, ब्रह्मांड पुराण, मार्कंडेय या हिंदू धर्मातील पौराणिक ग्रंथांमध्ये आढळतो.पहिल्या शतकात भरूच हे पश्चिम भारतातील सर्वात मोठे गजबजलेले बंदर होते. Top 25 places to visit in Bharuch District
ब्रिटिशांच्या काळात या बंदरावरून इराण, रोम, इजिप्त, अरबस्तान, चीन आणि श्रीलंका या देशांशी संपूर्ण आयात–निर्यात व्यापार चालत होता. सध्या भरूच जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावर उद्योगीकरण झाले असून येथे अनेक मोठ्या कंपन्यांचे कारखाने व कार्यालये आहेत. या जिल्ह्यात एकूण आठ तालुके आहेत.अंकलेश्वर हे भरूच जिल्ह्यामधील नर्मदा नदीकाठी वसलेले दुसरे मोठे शहर आहे व ते 1881 मध्ये बांधलेल्या ब्रिटिशकालीन पुलाद्वारे जोडले आहे.भरूच जिल्हा हा शेती आणि उद्योग धंदा मध्ये आघाडीवर असून शेती उत्पादनामध्ये या जिल्ह्यात कापूस, गहू, तांदूळ, आणि बाजरी ही प्रमुख पिके घेतली जातात .
व भाजीपाला, फळे आणि मसाल्यांची शेती केली जाते. या जिल्ह्यात अनेक रासायनिक, पेट्रोलियम, वस्त्रोद्योग आणि अभियांत्रिकी कंपन्या आहेत.भरूच जिल्ह्यातील दहेज हे एक मोठे औद्योगिक क्षेत्र आहे, या ठिकाणी अनेक मोठ्या कंपन्या आहेत. त्यामुळे भरूच जिल्ह्याला ‘औद्योगिक जिल्ह्याचा’ (industrial district) दर्जा मिळाला आहे. याशिवाय या जिल्ह्यात अनेक धार्मिक ऐतिहासिक सांस्कृतिक व नैसर्गिक पर्यटन स्थळे आहेत.
Top 25 places to visit in Bharuch District
भरूच जिल्ह्यातील संपूर्ण पर्यटन स्थळे-
1) Shree Nilkantheshwar Mahadev Mandir-

नीलकंठेश्वर महादेव मंदिर हे गुजरात राज्यातील भरूच जिल्ह्यातील नर्मदा नदीच्या काठावर असलेले एक पवित्र व जागृत धार्मिक स्थळ आहे. या मंदिराची वास्तुकाला पुरातन व गुजराती आणि राजस्थानी शैलींचे मिश्रण असलेली सुंदर आहे. ज्यामध्ये कोरीव काम, रंगीबेरंगी आकृतिबंध आणि भव्य घुमट आहेत. येथील मंदिर परिसर निसर्गसंपन्न, सुंदर,शांत व आध्यात्मिक आहे.
येथील मुख्य मंदिरात एक शिवलिंग आहे व मंदिराच्या भिंतीवर अनेक शिवमंत्र लिहिलेले आहेत. तसेच या मंदिराच्या समोर हनुमान मंदिर व बाजूला अजून एक शिव मंदिर आहे. श्रावण महिन्यात या मंदिरात वेगवेगळे उत्सव साजरे केले जातात. हे मंदिर भरूच जंक्शनपासून सात किलोमीटर अंतरावर आहे.
2)Shree Bhrugu Rishi Mandir-

श्री भृगुऋषी मंदिर हे गुजरात राज्यातील भरूच जिल्ह्यातील नर्मदा नदीच्या किनाऱ्यावर दांडिया बाजार परिसरात असलेले अत्यंत धार्मिक व पवित्र तीर्थक्षेत्र आहे. या ठिकाणी महर्षी भृगुऋषी यांचे मंदिर असून ते सात ऋषींच्या समूहातील होते, ज्याला भारतीय पुराणानुसार सप्तऋषी मंडळ म्हणतात. भृगुऋषी हे प्रजापतींपैकी एक होते. येथील मंदिराचे बांधकाम व कोरीव काम आश्चर्यकारक पद्धतीचे आहे. हे मंदिर मराठ्यांनी इ.स. 1675 ते इ.स. 1686 या कालखंडात म्हणजे सतराव्या शतकात बांधले आहे.
असे सांगितले जाते की श्री भृगुऋषी हे ब्रह्माचे पुत्र, भगवान शिवाचे भक्त आणि लक्ष्मी मातांचे पिता होते, व परशुरामाचे आजोबा होते. त्यांना शुक्राचार्य, जमदग्नी महर्षी आणि च्यवन महर्षी हे तीन पुत्र होते. भृगुऋषी हे महान ‘भृगु संहिता’ या ज्योतिषशास्त्रावरील ग्रंथाचे लेखक आहेत, व त्यांना ऋषी भार्गव म्हणूनही ओळखले जाते. हे मंदिर भाविकांची दृढ श्रद्धा असलेले मंदिर आहे.
Visit our website: allindiajourney.com
3)Gumandev Temple-

गुमानदेव मंदिर हे गुजरात राज्यातील भरूच जिल्ह्यातील झघडिया तालुक्याजवळ असलेले भगवान हनुमानाचे एक प्रसिद्ध धार्मिक स्थळ आहे. हे मंदिर 600 वर्षांपूर्वी बांधले असून या मंदिराबद्दल एक आख्यायिका सांगितली जाते की गुमानसिंह नावाच्या एका व्यापाऱ्याच्या हनुमानजींनी वाचवले होते त्याच्या नावावरून या मंदिराला हे नाव देण्यात आले आहे.
हे मंदिर म्हणजे भरूच, वडोदरा आणि सुरत जिल्ह्यातील भक्तांचे प्रमुख तीर्थक्षेत्रच आहे. हे मंदिर नर्मदा परिक्रमा मार्गावर आहे, व या ठिकाणी हनुमानाची स्वयंभू मूर्ती आहे. दरवर्षी श्रावणातील शनिवारी या ठिकाणी मोठी यात्रा भरते. त्यावेळी हजारो भाविक दर्शनासाठी येतात. तसेच या मंदिर परिसरात एक राम मंदिरही आहे.
4) Sasu-Vahu na Dera-/Shri Kavi Tirth-

सासू-बहू मंदिर हे गुजरात राज्यातील भरूच जिल्ह्यातील जामबुसर तालुक्यातील एक जैन मंदिर आहे. या ठिकाणाचे पूर्वीचे नाव कणकावती असे होते. हे मंदिर सासू आणि सून यांनी बांधले होते. या मंदिराबद्दल असे सांगितले जाते की सुनबाई चुकून दाराच्या चौकटीला लागल्यावर सासूबाईंनी टोमणा मारला. त्यामुळे सुनबाई वीराभाई यांनी माहेरावरून पैसे आणून, 52 सुंदर मूर्ती असलेले, देवाच्या निवासासारखे हे तेजस्वी मंदिर बांधले.
या ठिकाणी मुख्य मूर्ती ही भगवान धर्मनाथांची आहे. स्थानिक ठिकाणी आजही हे मंदिर ‘सासू–सून मंदिर’ म्हणून प्रसिद्ध आहे.दरवर्षी पौष महिन्यात सप्तमीला येथे जत्रा भरते.
5)Hathila Hanuman Mandir-

हठीला हनुमान मंदिर हे गुजरात राज्यातील भरूच जिल्ह्यातील नहियर गावापासून जवळ असलेले एक प्रसिद्ध धार्मिक स्थळ आहे. येथील मंदिर परिसर अत्यंत शांत व आध्यात्मिक आहे. तसेच येथील हनुमानावर भाविकांची अपार श्रद्धा आहे त्यामुळे गुजरात राज्यातील अनेक ठिकाणाहून येथे भाविक दर्शनाला येतात.
भारतीय नववर्ष काळात या ठिकाणी मोठी यात्रा भरते. या मंदिराच्या समोर श्रीरामाचे मंदिर आहे व पर्यटकांसाठी धर्मशाळा आहे.नहियर गावापासून हे ठिकाण एक किलोमीटर अंतरावर आहे.
6)Golden Bridge Bharuch-


गोल्डन ब्रिज हे गुजरात राज्यातील भरूच जिल्ह्यातील एक महत्त्वाचे ऐतिहासिक ठिकाण आहे. हा ब्रिज ‘नर्मदा ब्रिज’ म्हणूनही ओळखला जातो. हा पूल नर्मदा नदीवर 1881 मध्ये अंकलेश्वर आणि भरूच शहराला जोडण्यासाठी ब्रिटिशांनी बांधला आहे. तसेच मुंबईतील
व्यापार आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांना सोयीचे व्हावे म्हणून हा पूल बांधण्यात आला होता.या पुलाला सोनेरी रंग दिला आहे, त्यामुळे या पुलाला ‘गोल्डन ब्रिज’ असे नाव पडले आहे. हा पूल आजही वापरण्याच्या चांगल्या सुस्थितीत आहे.
7) Shree Swaminarayan Mandir –

श्री स्वामीनारायण मंदिर हे गुजरात राज्यातील भरूच जिल्ह्यातील एक धार्मिक तीर्थस्थळ आहे. हे मंदिर BAPS या संस्थेच्या व्यवस्थापनाखाली व प्रशासनाखाली असून या मंदिराचे बांधकाम अत्यंत मनमोहक पद्धतीने केलेले आहे, या मंदिरामध्ये सुंदर कोरीव स्तंभ, भव्य कमानी, आकर्षक बाल्कनी आणि मनमोहक मूर्तीं आहेत.
हे भव्य वास्तुकला असलेले मंदिर 18 एकर वर पसरलेले असून मंदिराच्या सभोवताली दाट हिरवळ आहे. तसेच येथील मंदिराच्या आवारात काही रेस्टॉरंट्स आहेत. या मंदिरासाठी श्री मोतीभाई एम. पटेल यांनी आपली जमीन दिली आहे. हे मंदिर एक उत्तम वास्तुशिल्प असून पर्यटकांसाठी अध्यात्माचे केंद्र आहे.
8)Ninai Waterfall-

निनाई धबधबा हा गुजरात राज्यातील भरूच शहरापासून तीन तासाच्या अंतरावर आहे. हा धबधबा गुजरात मधील सर्व प्रसिद्ध धबधब्यापैकी एक धबधबा आहे. हा धबधबा 30 फूट उंचीवरून कोसळतो. येथील परिसर अत्यंत निसर्ग संपन्न व शांततापूर्ण आहे. भरुचमधील पर्यटनासाठीचे आणि निसर्गाच्या सानिध्यात वेळ घालवण्यासाठी हे एक महत्त्वाचे व उत्तम ठिकाण आहे. या ठिकाणाला पर्यटक मोठ्या प्रमाणात भेट देतात.
9)Narmada Park-


नर्मदा पार्क हे उद्यान गुजरात राज्यातील भरूच जिल्ह्यातील नर्मदा नदीच्या काठावर वसलेले एक प्रसिद्ध पर्यटन स्थळ आहे. या ठिकाणी पर्यटकांसाठी अनेक प्रकारच्या सुविधा करण्यात आलेल्या आहेत, त्यामध्ये खुली लायब्ररी, जलक्रीडा, सामुदायिक कार्यक्रम आणि रात्रीच्या कॅम्पिंगची सोय इ. समावेश आहे. पर्यटन विभागाने हे ठिकाण अधिकृत स्थळ म्हणून नियुक्त केले आहे. हे पार्क मनोरंजनाचे एक उत्साही केंद्र असून समुदायात मनोरंजन आणि सांस्कृतिक सहभागाला प्रोत्साहन देते.
10)Kadia Dungar Buddhist Caves-

कदिया डुंगर लेणी ही गुजरात राज्यातील,भरूच जिल्ह्यातील, झगडिया तालुक्यातील झझपोर गावाजवळ कदिया डुंगर येथे असलेली ऐतिहासिक व प्राचीन लेणी आहेत. या ठिकाणी पहिल्या व दुसऱ्या शतकात डोंगरावर कोरलेल्या सात गुहा आहेत. व एक अखंड (एकपात्री)सिंहस्तंभांचे शिल्प आहे. या गुहा विहार शैलीच्या वास्तूकलेमध्ये बांधण्यात आल्या आहेत. तसेच येथील डोंगराच्या पायथ्याशी एक विटांचा स्तूप आहे. यावरून असे लक्षात येते की या गुहा पहिल्या आणि दुसऱ्या शतकात वापरात होत्या.
11)Stambheshwar Mahadev Temple-

स्तंभेश्वर महादेव मंदिर हे गुजरात राज्यातील भरूच जिल्ह्यातील कवी कंबोई गावात असलेले प्रसिद्ध धार्मिक स्थळ आहे. हे मंदिर समुद्राच्या काठावर असून दिवसातून दोन वेळा सकाळी आणि संध्याकाळी ते समुद्राच्या लाटांनी पूर्णपणे बुडून जाते आणि नंतर पुन्हा दिसते, त्यामुळे या मंदिराला ‘बुडणारे मंदिर’ म्हणूनही ओळखले जाते.या मंदिराबद्दल एक आख्यायिका सांगितली जाते की, तारकासुराचा वध केल्यानंतर, भगवान कार्तिकेयाने येथे शिवलिंगाची स्थापना केली होती.
तसेच स्कंद पुराणातही या मंदिराचा उल्लेख आढळून येतो.स्तंभेश्वर महादेव मंदिराची वास्तुकला ही साध्या पद्धतीची आहे. या अद्भुत मंदिरात चार फूट उंच शिवलिंग असून भरतीच्या वेळी हे मंदिर समुद्रात बुडते आणि भरती ओसरताच बाहेर येते.
12)Narmada Mata Mandir-


नर्मदा माता मंदिर हे गुजरातच्या प्रसिद्ध भरूच जिल्ह्यातील नर्मदा नदीच्या काठावर असलेले एक प्राचीन मंदिर आहे.देवी नर्मदेचे हे मंदिर भक्तांची स्वप्नपूर्ती करणारे एक शक्तिशाली आध्यात्मिक स्थळ आहे. येथे नर्मदा नदीची पूजा केली जाते. मंदिर परिसर शांत आणि रमणीय आहे. हे मंदिर 150 वर्षांपूर्वीचे असून स्थापत्यशास्त्राचा एक उत्तम नमुनाच आहे. या मंदिराची वास्तुकला शुद्ध पांढऱ्या रंगात बनवली आहे.
व या मंदिरातील अनेक शिखरांवर लहान आकाराचे लाल आणि पिवळे झेंडे आहेत. तसेच मंदिराच्या मागील बाजूस एक लहान, तळा आहे. जे नर्मदा नदीचे उगमस्थान मानले जाते.या तळ्यातील पाण्याने अंघोळ केल्यानंतर पापे आणि आजार दूर होतात अशी येथील भाविकांची गाढ श्रद्धा आहे.
13)Dashashwamedh Ghaat-

दशाश्वमेघ घाट हा गुजरात राज्यातील भरूच जिल्ह्यातील नर्मदा नदीच्या काठावर,दांडिया बाजाराजवळ असलेला एक लोकप्रिय व अत्यंत महत्त्वाचा ऐतिहासिक घाट आहे. या ठिकाणी हिंदूंच्या मृत्युनंतर अंत्यसंस्कार केले जातात व हिंदूंच्या अंत्यसंस्काराच्या प्रथा आणि विधी केल्या जातात. आणि नंतर नर्मदा नदीत दिव्य,पवित्र स्नान केले जाते.
या ठिकाणी राजा महाबली यांनी दहा अश्वमेध यज्ञ केले होते अशी आख्यायिका सांगितली जाते. याशिवाय दक्ष राजाने येथे दशाश्वमेध यज्ञ केला होता म्हणून या घाटाला दशाश्वमेध घाट असे नाव देण्यात आले. या घाटावर अंबाजी माता, उमिया माता, नर्मदा माता, कोटीरुद्रेश्वर महादेव आणि वामन यांची प्राचीन मंदिरे आहेत.
14)Shoolpaneshwar Wildlife Sanctuary –


शूलपानेश्वर वन्यजीव अभयारण्य हे गुजरात राज्यातील भरूच जिल्ह्यातील नर्मदा नदीच्या दक्षिणेस व सातपुडा पर्वतरांगांमध्ये असलेले एक संरक्षित क्षेत्र आहे. हे अभयारण्य 607.70 चौरस किमी क्षेत्रावर विस्तारलेले असून हे अभयारण्य ‘दुमखल अभयारण्य’ म्हणूनही ओळखले जाते. सध्या हे अभयारण्य ‘शूलपानेश्वर अभयारण्य’ म्हणून ओळखले जाते. नदीकाठी वसलेल्या या अभयारण्यात कोरडे पानझडी वृक्ष आणि सागवान वृक्षाचा काही भाग आहे.डोंगराळ प्रदेश आणि हिरवळीच्या पानझडी जंगलांनी वेढलेल्या हे अभयारण्य विविध प्रकारच्या वनस्पती, पक्षी, जलचर प्राणी, सरपटणारे प्राणी आणि वन्यजीव प्राण्यांचे आश्रयस्थान आहे.
या ठिकाणी राजपिपळा वृक्ष, तिमरू, अरिठा आणि बांबूसारख्या 575 फुलांच्या प्रजाती आढळून येतात. 1982 मध्ये या अभयारण्याला संरक्षित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले आहे. हे अभयारण्य विशेषता: अस्वलांच्या संरक्षणासाठी तयार केले गेले होते. याशिवाय समृद्ध जैवविविधतेने नटलेल्या या विस्तीर्ण अभयारण्यात बिबट्या, स्लॉथ बेअर, खवलेयुक्त अँटिटर,भुंकणारे हरण, चार शिंगे असलेला काळवीट, राक्षस खार,अजगर यासारखे दुर्मिळ वन्यजीव प्राणी पाहायला मिळतात.हे अभयारण्य म्हणजे एक लपलेले रत्नच आहे.
15)Gayatri Mata Temple-

गायत्री माता मंदिर हे गुजरात राज्यातील भरूच जिल्ह्यातील पवित्र नर्मदेच्या काठावर झाडेश्वर, संस्कार बंगलो या ठिकाणी असलेले धार्मिक तीर्थक्षेत्र आहे.गायत्री मंदिर हे ‘अलखधाम’ म्हणूनही ओळखले जाते. निसर्ग समृद्धीने परिपूर्ण असलेले हे तीर्थक्षेत्र भरूच जिल्ह्यातील सर्वात शांत व पवित्र ठिकाणांपैकी एक आहे.
देवी गायत्री मातेच्या या मंदिरातून भाविकांना नर्मदा नदीचे आणि नर्मदा नदीवरील नव्याने बांधलेल्या केबल पुलाचे नयनरम्य दृश्य पाहता येते. तसेच येथील नर्मदा परिक्रमा भवनात नर्मदा परिक्रमा करणाऱ्या भाविकांची राहण्याची सोय आहे. याशिवाय या ठिकाणी भाविक गायत्री यज्ञ, पूजा,विधी करू शकतात. दरवर्षी जानेवारीमध्ये दहा दिवसाच्या नर्मदा उत्सवावेळी भाविक या मंदिराला भेट देतात.
16) Shree Munisuvrat swami Jain Temple-

श्री मुनिसुव्रत स्वामी जैन मंदिर हे गुजरात राज्यातील भरूच जिल्ह्यातील पवित्र नर्मदा नदीच्या काठावर असलेले जैन समुदायाचे एक प्रमुख धार्मिक तीर्थक्षेत्र आहे. या ठिकाणी कमळाच्या आसनात बसलेल्या काळ्या रंगाच्या श्री मुनिसुव्रत स्वामी यांची मूर्ती आहे. भगवान मुनिसुव्रत स्वामी हे जैन धर्माचे विसावे तीर्थंकर आहेत त्यांनी अश्वमेघ यज्ञासाठी तयार केलेल्या अश्व – घोड्याला प्रतिबोध – अशाप्रकारचे आध्यात्मिक ज्ञान दिले होते.
म्हणून हे मंदिर अश्वबोध मंदिर म्हणूनही ओळखले जाते. सिंहलद्वीपचा राजा सिंघल यांची राजकन्या सुदर्शना हिने नवकार मंत्र ऐकल्यानंतर या मंदिराचा जीर्णोद्धार केला होता आणि तिला मागील जन्मी गरुडाच्या रूपात असताना शिकार्याने बाणाने कसे मारले याबद्दल सांगितले होते.यानंतर मंदिराचे नाव शकुनिका विहार किंवा समाधी विहार असे ठेवण्यात आले.
17) Matariya Talav-

मातारिया तलाव हे गुजरात राज्यातील भरूच जिल्ह्यातील शक्तिनाथ क्रॉस रोडजवळ असलेले एक प्रेक्षणीय ठिकाण आहे. शहराच्या मध्यभागी असलेल्या या तलावाजवळ जलक्रीडा, उद्याने आणि बागा असून हा तलाव शांत आणि नयनरम्य आहे. हिरवळिने बहरलेल्या या तलावाभोवती दोन किलोमीटर लांब पायवाट आहे, त्यामुळे जॉगिंग आणि फिटनेस करणाऱ्यांसाठी हे एक उत्तम ठिकाण आहे.
हिरव्यागार बागांनी आणि पायवाटांनी वेढलेला हा तलाव विश्रांती आणि मनोरंजनाचे एक लोकप्रिय ठिकाण आहे. हा तलाव परिसर “माय लिव्हेबल भरूच” प्रकल्पाचा एक भाग असून येथे फूड कोर्ट आणि मुक्त रंगमंचासारख्या अतिरिक्त सोयी-सुविधा आहेत.
18) kabirvad-


कबीरवड हे गुजरात राज्यातील भरूच जिल्ह्यातील नर्मदा नदीच्या मध्यभागी एका लहान बेटावर वसलेले एक वडाचे झाड आहे. हे एक ऐतिहासिक ठिकाण असून येथे 15 व्या शतकातील गूढ कवी संत कबीर यांनी बराच काळ या वटवृक्षाखाली ध्यान व साधनेत घालवला होता. या ठिकाणी संत कबीर यांचे मंदिर आहे. हा वटवृक्ष तीन किलोमीटर क्षेत्रात पसरलेला आहे व एवढा मोठा आहे की त्याच्या छायेखाली 7000 लोक आरामात बसू शकतात.
जीव आणि तत्व या दोन ब्राह्मण भावंडांनी खरा संत शोधण्यासाठी त्यांच्या अंगणात वटवृक्षाची एक वाळलेली फांदी लावली आणि ती फांदी कोण हिरवी करेल तो खरा संत असेल असे सांगितले. संत कबीरांनी या फांदीला हात लावताच ती हिरवीगार झाली. त्यामुळे संत कबीरांबद्दल लोकांमध्ये अपार श्रद्धा निर्माण झाली.भरूच जिल्ह्यातील हे ठिकाण एक धार्मिक व लोकप्रिय पर्यटन स्थळ आहे.
19)Bharuch Fort-

भरूच किल्ला हा गुजरात मधील भरूच जिल्ह्यातील नर्मदा नदीच्या तीरावर, टेकडीवर असलेला एक ऐतिहासिक किल्ला आहे. हा किल्ला दिवाण लल्लुभाई यांनी इ.स. 1791 मध्ये बांधला.त्यामुळे या किल्ल्याला “लल्लुभाई हवेली” या नावानेही ओळखले जाते. या किल्ल्याच्या समोरच्या लाकडी भागावर सुंदर, कोरीव काम व नक्षीकाम केलेले आहे. व येथील दुसऱ्या मजल्यावर एक लहान खोली आहे, ज्यामध्ये मॅचलॉक बंदुका ठेवले आहेत. तसेच या किल्ल्यात भूमिगत मार्गही आहेत.
या किल्ल्यामध्ये जिल्हाधिकारी कार्यालय, दिवाणी न्यायालय, जुनी डच फॅक्टरी, एक चर्च, व्हिक्टोरिया घड्याळ टॉवर आणि इतर इमारती आहेत. व या किल्ल्याच्या जवळपास जुनी डच समाधीस्थळे आणि पारशींचे ‘टॉवर ऑफ सायलेंस’ आहेत. या किल्ल्यावरून नर्मदा नदीचे विहंगम दृश्य पाहायला मिळते. या किल्ल्याचे बांधकाम अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण असून येथील अप्रतिम लाकडी कोरीवकाम पर्यटकांना मंत्रमुग्ध करते.
20) Raichand Deepchand Library-

रायचंद दीपचंद ग्रंथालय हे गुजरातमधील भरूच जिल्ह्यातील कोट पारशीवाड, या ठिकाणी भारतातील सर्वात जुन्या ग्रंथालयांपैकी एक ग्रंथालय आहे. हे ग्रंथालय लाकूड आणि इतर साहित्याने बनवलेल एक वास्तुकला नमुना आहे. या ग्रंथालयाची स्थापना 1858 साली झाली असून. हे या ग्रंथालयात 2,00,000 पुस्तके आणि दुर्मिळ हस्तलिखिते आहेत.रॉयचंद दीपचंद हे सुरतचे व्यापारी आणि दसा ओसवाल जैन होते. त्यांनी या ग्रंथालयाची स्थापना 1858 मध्ये केली.रायचंद दीपचंद ग्रंथालय हे गुजरात मधील सर्वात जुने ग्रंथालय आहे.
21) Jami Masjid-

जामा मशीद हे गुजरात मधील भरूच जिल्ह्यातील भरूच किल्ल्याच्या टेकडीवर असलेली एक शुक्रवारची मशीद आहे. ही मशीद 14 व्या शतकात पूर्वीच्या जैन आणि हिंदू मंदिराच्या अवशेषांचा वापर करून बांधलेली असून या मशिदीमध्ये तीन मोठे घुमट, दहा लहान घुमट आणि 48 खांब आहेत. या मशिदीच्या अंगणात प्रवेशद्वार आणि पश्चिमेला एक प्रार्थना कक्ष आहे.
आणि येथील प्रार्थना कक्ष तीन कप्प्यांमध्ये विभागलेला असून येथे उघड्या खांबांचा व्हरांडा आहे. तसेच या मशिदीला टोकदार कमानी आणि इस्लामिक आकृतिबंध आहेत. भरूच जिल्ह्यातील ही मशीद एक महत्त्वाचे राष्ट्रीय स्मारक आहे.
22) Siddhi Vinayak Temple-

श्री सिद्धी विनायक मंदिर हे गुजरात मधील भरूच जिल्ह्यातील मक्तमपूर या ठिकाणी असलेले भगवान गणेशाचे प्राचीन सिद्धी विनायक मंदिर आहे. या मंदिरातील सिद्धिविनायकावर भाविकांची गाठ श्रद्धा आहे. या मंदिरात सिद्धिविनायक आणि दोन्ही बाजूला रिद्धी सिद्धी च्या मूर्ती आहेत. या मंदिराचे महत्त्व मुंबईतील सिद्धी विनायक मंदिराइतकेच आहे. या ठिकाणी गणेश चतुर्थी, मंगळवार आणि मासिक चतुर्थीला, भक्तगण मोठ्या श्रद्धेने येतात.
23) Shree Vishnu Ayyappa Temple-

श्री विष्णू अयप्पा मंदिर हे गुजरात मधील भरूच जिल्ह्यातील झाडेश्वर रोड, या ठिकाणी असलेले भगवान विष्णू आणि अय्यप्पा स्वामी यांचे मंदिर आहे. या मंदिराचे व्यवस्थापन भरूचमध्ये राहणाऱ्या केरळ समुदायाद्वारे केले जाते. दरवर्षी डिसेंबरमध्ये, भगवान अयप्पाची पारंपारिक पद्धतीने “मंडलमासम” ही धार्मिक भव्य मिरवणूक काढली जाते.
त्यावेळी पर्यटक आणि भक्त आनंदाने या सोहळ्यात सहभागी होतात. हे मंदिर भरूच जिल्ह्यातील एक महत्वाचे धार्मिक स्थळ असून ते भरूच शहराच्या पूर्वेकडे आहे. येथील मंदिर परिसर अत्यंत शांत व आध्यात्मिक आहे.
24) Shri Shukleshwar Mahadev Temple-

श्री शुक्लेश्वर महादेव मंदिर हे गुजरात मधील भरूच जिल्ह्यातील नर्मदा नदीच्या काठावर शुक्लतीर्थ या ठिकाणी असलेले प्रसिद्ध शिवमंदिर आहे.शुक्लतीर्थ या ठिकाणी अनेक प्राचीन मंदिरे आहेत, त्यापैकी हे एक प्रसिद्ध मंदिर आहे. हे मंदिर नर्मदा परिक्रमेचा एक महत्त्वाचा भाग आहे,कार्तिक पौर्णिमेला येथे मोठी यात्रा भरते त्यावेळी भाविक मोठ्या संख्येने त्यांच्या पूर्वजांच्या आणि स्वतःच्या मुक्तीसाठी या ठिकाणी येतात. दंतकथेनुसार, शिव देवता चाणक्य यांच्या भक्तीने प्रसन्न होऊन त्यांना मोक्षाचा मार्ग दाखवला.
शिवांनी चाणक्यांना सांगितले की, त्यांनी नर्मदा नदीत असलेल्या काळ्या नौकेत, काळी गाय घेऊन व काळे वस्त्र परिधान करून प्रवास सुरू कर ज्या ठिकाणी काळा रंग पांढऱ्यात परिवर्तित होईल, तेच मोक्षस्थान असेल. आणि परिवर्तन घडलेले हेच ते शुक्लतीर्थ ठिकाण आहे. भरूच शहरापासून हे ठिकाण बारा किलोमीटर अंतरावर आहे.
25)Shitala Mata Temple-

शितला माता मंदिर हे गुजरात राज्यातील भरूच जिल्ह्यातील झाडेश्वर या ठिकाणी पवित्र नर्मदा नदीच्या काठावर असलेले जागृत धार्मिक स्थळ आहे.शितला मातेचे हे मंदिर भरूच मधील एकमेव मंदिर आहे. नर्मदा नदीच्या काठावर असलेल्या मंदिर संकुलामध्ये भगवान महादेव, काशी विश्वनाथ मंदिर, शीतला माता मंदिर आणि नर्मदा नदीचा घाट पाहायला मिळतो. श्रावण महिन्यात भाविक या ठिकाणी मोठ्या प्रमाणात येतात.
1) भरूच जिल्ह्यातील दशाश्वमेघ घाट हा कोणत्या ठिकाणी आहे ?
भरूच जिल्ह्यातील दशाश्वमेघ घाट हा नर्मदा नदीच्या काठावर,दांडिया बाजाराजवळ आहे .
2) भरूच जिल्ह्यातील गोल्डन ब्रिज हा कोणत्या साली बांधण्यात आला .
भरूच जिल्ह्यातील गोल्डन ब्रिज हा 1881 साली बांधण्यात आला .
3) भरूच जिल्ह्यातील श्री सिद्धी विनायक मंदिर कोणत्या ठिकाणी आहे ?
भरूच जिल्ह्यातील श्री सिद्धी विनायक मंदिर मक्तमपूर या ठिकाणी आहे.


