मित्रांनो भारत भ्रमंतीमध्ये आपण भारत देशातील प्रत्येक राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यातील संपूर्ण पर्यटन स्थळे पाहत आहोत आता आपण पाहणार आहोत गुजरात राज्यातील पाटण जिल्ह्यातील संपूर्ण पर्यटन स्थळे,पाटण जिल्ह्याची निर्मिती 1997 ला महेसाणा आणि बनासकांठा या दोन जिल्ह्यांमधून करण्यात आली आहे. पाटण शहर हे सरस्वती नदीच्या काठावर वसलेले एक ऐतिहासिक ठिकाण असून हा जिल्हा गुजरात राज्यातील एक प्राचीन तटबंदी असलेले शहर आहे.आणि पाटण जिल्ह्याचे मुख्यालय आहे. या शहराची स्थापना राजा वनराज चावडा यांनी इ.स. 745 मध्ये केली होती. Top 22 places to visit in Patan District
पूर्वी हे शहर ‘अणहिलवाड’ या नावाने ओळखले जात होते. सोळंकी वंशाची राजधानी म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या या गावात अजूनही जुन्या तटबंदीचे आणि वेशींचे अवशेष पाहायला मिळतात. तसेच या शहरात असणाऱ्या ‘राणीनी वाव’ या पुरातन स्थळाला ‘युनेस्को’च्या जागतिक वारसास्थळांमध्ये समावेश करण्यात आला आहे व सध्या भारतीय चलनात असलेल्या नव्या 100 रुपयांच्या नोटेवर या वावेचं चित्र आहे. तसेच येथील हाताने विणलेल्या व एका साडीसाठी चार ते पाच महिने वेळ लागणाऱ्या पटोला साड्यांसाठी व ‘रण उत्सव’ साठी हे शहर प्रसिद्ध आहे.
पाटण जिल्ह्यात पाटण, चाणस्मा, हरिज, सामी, सिद्धपूर, रादनपूर आणि सांतालपूर हे सात तालुके आहेत. तसेच या शहरात अनेक हिंदू,जैन,मंदिरे मशिदी,दर्गे आणि रौजा आहेत.पाटण हे जैन धर्माचे एक प्रमुख तीर्थक्षेत्र असून या ठिकाणी 100 पेक्षा जास्त जैन मंदिरे आहेत. या जिल्ह्यात शेतीबरोबरच दुग्धव्यवसाय आणि कुक्कुटपालन,टेक्सटाईल आणि सिरेमिक उद्योग,मीठ उत्पादन, खाद्यतेल, डाळ मिल, गुळ उत्पादन, हस्तकला, आणि इतर कुटीर उद्योग केले जातात. पाटण जिल्ह्यात अनेक धार्मिक, ऐतिहासिक आणि सांस्कृतिक पर्यटन स्थळे आहेत.
Top 22 places to visit in Patan District
पाटण जिल्ह्यातील संपूर्ण पर्यटन स्थळे
1)Rani Ki Vav-


राणी कि वाव ‘क्वीनस् स्टेपवेल’ ही गुजरात मधील पाटण जिल्ह्यातील सरस्वती नदीच्या काठावर वसलेली एक अद्वितीय बावडी आहे. ही बावडी इ.स.11 व्या शतकातील राजा भीमदेव पहिला यांच्या स्मरणार्थ बांधण्यात आली होती. या सात मजली विहिरीची (stepwell) वास्तूकला माऱू-गुर्जर या गुंतागुंतीच्या वास्तुशैलीत अत्यंत बारकाईने, उत्कृष्ट आणि अविश्वसनीय पद्धतीने केलेली आहे. या विहिरीमध्ये (stepwell) पायऱ्या, स्तंभ, आणि विविध देवतांच्या सुंदर मुर्त्या आहेत, आणि 500 पेक्षा जास्त प्रमुख शिल्पे आहेत.
ही विहीर 22 जून 2014 रोजी युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समावेश करण्यात आली आहे. तसेच 2016 मध्ये नवी दिल्ली येथे आयोजित केलेल्या इंडोसेन परिषदेत राणी की वावने “भारताचे सर्वात स्वच्छ आयकॉनिक ठिकाण” हा मानाचा किताब जिंकला आहे व पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते या स्मारकाला त्या परिषदेत गौरविण्यात आले आहे.
2) Panchasara Parshvanath Temple-

पंचसर पार्श्वनाथ मंदिर हे गुजरातमधील पाटण जिल्ह्यातील गुंगदीपती परिसरात असलेले एक प्रसिद्ध श्वेतांबर जैन मंदिर आहे. या ठिकाणी 100 पेक्षा जास्त जैन मंदिरे आहेत. येथील जैन मंदिरांचे उत्कृष्ट घुमट आणि भिंतीवरील अद्वितीय कोरिव काम,संगमरवरी फरशी आणि नाजूक सुंदर दगडी शिल्पे पाहता येतात.हे मंदिर 8 व्या शतकात चावडा राजवंशातील वानरजा चावडा यांनी इ.स. 746 च्या सुमारास बांधले होते. व या मंदिरातील मूर्ती ही मूळ गाव, पंचसर येथून आणण्यात आली होती आणि म्हणून या मंदिराला पंचसर पार्श्वनाथ भगवान असे नाव देण्यात आले.
येथील पंचसर पार्श्वनाथ मंदिर हे 180 फूट लांब आणि 90 फूट रुंद असून या मंदिराचे घुमट, खांब, छत, भिंती, मंडप सुंदर शिल्पांनी मढवलेले आहेत. तसेच येथील मुख्य गर्भगृहात पद्मासन मुद्रेत भगवान पंचसर पार्श्वनाथची पांढऱ्या संगमरवरी मूर्ती आहे. श्री पंचसरा पार्श्वनाथ मंदिर हे जिनालय वनराज विहार म्हणूनही ओळखले जाते.
Visit our website: allindiajourney.com
3)Sahasralinga Talav –


सहस्रलिंग टाकी किंवा सहस्रलिंग तलाव हा गुजरात राज्यातील पाटण जिल्ह्यातील एक प्रसिद्ध मध्ययुगीन कृत्रिम जलाशय आहे. पूर्वी या तलावाला दुर्लभ सरोवर म्हणून ही ओळखले जात होते. हा तलाव चालुक्य सोलंकी राजाच्या राजवटीच्या काळात बांधण्यात आला होता.राजा सिद्धराज जयसिंह यांनी इ.स. 1093 ते 1143 या कालावधीत या तलावाची दुरुस्ती व पुनर्बांधणी केली. सोलंकी काळातील सर्वात मोठ्या तलावांपैकी हा एक तलाव आहे.
येथील शिलालेखामध्ये राजघराण्यातील व्यक्ती तसेच नागरिकांनी केलेल्या सरोवर, विहिरी, तलाव यांच्या बांधकामाचा उल्लेख आढळतो.या तलावाभोवती सोलंकी काळात बांधलेली अनेक लहान मंदिरे आहेत, आणि येथील सर्वात उल्लेखनीय मंदिर म्हणजे सहस्रलिंग महादेव मंदिर, या मंदिराच्या गर्भगृहात शिवलिंग आहे.भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाने हे ठिकाण महत्त्वाचे राष्ट्रीय स्मारक म्हणून संरक्षित केले आहे.
4)Jain Temples Patan-

गुजरात राज्यातील पाटण जिल्ह्यामध्ये 100 पेक्षा जास्त धार्मिक जैन मंदिरे आहेत. ज्यापैकी धांधेरवाडमधील महावीर स्वामी देरासर आणि पंचसर पार्श्वनाथ देरासर खूप प्रसिद्ध आहेत. ही मंदिरे विविध देवतांना समर्पित असून या मंदिरांमध्ये जैन कलेचे आणि संस्कृतीचे दर्शन घडते. येथील मंदिराची वास्तूकला आणि स्थापत्यकला ही पांढऱ्या संगमरवरी दगडांनी बांधलेले आहे.
आणि येथे सुंदर नक्षीकाम केलेले खांब, रंगवलेले छत, उत्कृष्ट घुमट,आणि पवित्र कोरीवकाम केलेले आहे. तसेच येथे असणाऱ्या हेमचंद्राचार्य ज्ञान मंदिर पंचसरा जैन मंदिरात पंचवीस हजार संस्कृत आणि प्राकृत भाषेतील प्राचीन ग्रंथसंपदा आहे.ही मंदिरे जैन धर्मासाठी पवित्र असून भाविक या ठिकाणी मोठ्या प्रमाणात दर्शनासाठी येतात.
5)Patan Fort-

पाटण किल्ला हा गुजरात मधील पाटण जिल्ह्यातील एका टेकडीवर वसलेला, ऐतिहासिक व सांस्कृतिक दृष्ट्या महत्त्वाचा असलेला एक भव्य पाटण किल्ला आहे. हा किल्ला ‘राणी की वावचा किल्ला’ म्हणूनही ओळखला जातो.हा किल्ला 11 व्या शतकात चौलुक्य राजवंशाच्या काळात बांधण्यात आला असून मध्ययुगीन भारताच्या समृद्ध वारशाचे प्रतीक आहे.
हा किल्ला भक्कम तटबंदी, भव्य प्रवेशद्वार आणि गुंतागुंतीच्या राजवाड्यांसाठी प्रसिद्ध आहे. तसेच या किल्ल्याच्या संकुलात बुरुज, तटबंदी, अंगण आणि निवासी परिसर अशा अनेक रचना आहेत. व येथील मुख्य प्रवेशद्वारावर अलंकृत कोरीवकाम, गुंतागुंतीचे जाळीकाम आणि संरक्षणात्मक यंत्रणा आहे. हा किल्ला पाटणच्या शासकांसाठी एक मोक्याची लष्करी चौकी आणि शाही निवासस्थान म्हणून महत्वाचा होता.
6)Trikam Barot Ni Vav-

त्रिकम बारोट नि वाव ही गुजरात मधील पाटण जिल्ह्यातील समृद्ध अशी पायरी विहीर आहे. ही विहीर 11 व्या शतकात सोलंकी राजवंशाच्या राजवटीत बांधण्यात आली. या समृद्ध विहिरीचे बांधकाम अत्यंत गुंतागुंतीचे डिझाइन केलेले आहे. या विहिरीतील अलंकृत खांब गुजराती कारागिरीच्या वैशिष्ट्यपूर्ण विस्तृत आकृत्यांनी सजवलेले आहे. येथे जलाशयाकडे जाणाऱ्या उतरत्या पायऱ्या आहे,
आणि या वावच्या भिंती देवता, आकाशीय प्राणी आणि पौराणिक कथा दर्शविणाऱ्या शिल्पांच्या फलकांनी सजवलेल्या आहेत, त्यामुळे त्या काळातील सांस्कृतिक आणि धार्मिक नीतिमत्ता समजते. हे सर्व पाहिल्यानंतर त्या वेळचे प्राचीन अभियंते आणि कारागिरांच्या कौशल्याचे कल्पना येते. ही वाव एक महत्त्वाची जलव्यवस्थापन प्रणालीआहे, ज्यामुळे स्थानिकांना कोरड्या महिन्यांत भूजलाचा वापर करता येत होता.
7)Regional Science Museum-

क्षेत्रीय विज्ञान संग्रहालय हे गुजरात मधील पाटण जिल्ह्यातील समालपाटी, चोरमारपूरा या ठिकाणी आहे. हे ठिकाण सायन्स शिक्षणाला प्रसारित करण्यासाठी एक आकर्षक केंद्र आहे. या सायन्स सेंटरचा प्रकल्प 10 एकर क्षेत्रफळावर उभारण्यात आला असून, यासाठी ₹100 कोटी खर्च करण्यात आला आहे. या सायन्स सेंटर मध्ये विज्ञान व तंत्रज्ञानाचा विकास आणि त्याचा उपयोग जीवनमान सुधारण्यासाठी कसा केला जातो हे प्रदर्शित केले जाते.येथे प्रदर्शन, परिसंवाद, लोकप्रिय व्याख्याने, विज्ञान शिबिरे,
कार्यशाळा आणि मुलांमध्ये उत्सुकता जागवणारे कार्यक्रम आयोजित केले जातात.या ठिकाणी डायनोसॉर पार्क + 5D थिएटर, मानव आणि प्राण्यांच्या उत्क्रांतीचे स्पष्टीकरण, आनुवंशिक माहितीसह,आधुनिक शेती तंत्रज्ञान आणि हायड्रोपोनिक्सची माहिती, प्रकाश विज्ञान आणि प्रयोगांसाठी उपकरणे,संडायल क्लॉक, सिंचन प्रणाली, रेनवॉटर हार्व्हेस्टिंग, सोलर प्लांट, वैज्ञानिक मनोरंजन इत्यादीची माहिती मिळते.राणी की वावापासून हे ठिकाण दहा किलोमीटर अंतरावर आहे.
8)Patan Patola Heritage Museum-



पाटण पटोला हेरिटेज म्युझियम हे गुजरात मधील पाटण जिल्ह्यातील पटोला रेशीम वीनकामाची एक समृद्ध परंपरा आहे.पाटणमध्ये शतकानुशतके चालत आलेली पटोला रेशीम विणण्याची ही उत्कृष्ट कला आहे. या ठिकाणी पटोला साड्यांचे विणकाम हे अत्यंत गुंतागुंतीचे डबल इकट डिझाइन आणि आकर्षक रंगसंगतीसाठी उत्कृष्ट कारागीराद्वारे केले जाते.
या संग्रहालयात प्राचीन कलेचा पिढ्यान्पिढ्यांचा पाटोला साड्यांचा अद्भुत संग्रह आहे.येथे विविध प्रकारच्या पाटोला साड्या पारंपरिक तंत्रज्ञानाचा वापर करून आणि कारागिरांच्या कुटुंबाच्या वारशाने दिलेल्या कौशल्यातून हाताने विणल्या आहेत.या संग्रहालयात पाटोला साडी विणण्याच्या बारकाईच्या प्रक्रियेची माहिती दिली जात
9)Bindu Sarovar-

बिंदू सरोवर हे गुजरात मधील पाटण जिल्ह्यातील सिद्धपूरमध्ये पवित्र सरस्वती नदीच्या काठावर वसलेले पवित्र ठिकाण आहे. हे सरोवर धार्मिक, सामाजिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाच्या आहे, त्यामुळे वर्षभर येथे लाखो भाविक येत असतात. या तलावात भगवान महाविष्णूचे अश्रू पडल्याची लोकांची श्रद्धा आहे. त्यामुळे या सरोवराला बिंदू सरोवर किंवा थेंबाचे सरोवर म्हटले जाते.
बिंदू सरोवर, हे ‘मातृ गया क्षेत्र’ म्हणूनही ओळखले जाते.हिंदू धर्मातील पाच पवित्र सरोवर पैकी हे एक सरोवर आहे. असे सांगितले जाते की भगवान परशुराम यांनी बिंदू सरोवर येथे आपल्या आईचे पिंडदान केले होते. तेव्हापासून बिंदू सरोवर संपूर्ण भारतात मातृ श्राद्ध किंवा मातृगया म्हणून लोकप्रिय झाले आहे. बिंदू सरोवरा भोवती अनेक प्राचीन मंदिरे आहेत.
10)Rudra Mahalaya-

रुद्र महालया मंदिर हे गुजरात मधील पाटण जिल्ह्यातील सिद्धपूर येथे ऐतिहासिकदृष्ट्या श्रीस्थळ म्हणून ओळखले जाणारे एक उध्वस्त मंदिर संकुल आहे.येथील मंदिराचे बांधकाम मूलराजाने इसवी सन 943 मध्ये सुरू केले होते,आणि सोलंकी राजवंशाचे शासक सिद्धराज जयसिंह यांनी 1140 मध्ये पूर्ण केले. नंतर अल्लाउद्दीन खिलजीने ही मंदिरे उध्वस्त केली ,
आणि नंतर अहमद शाह पहिला याने 1410 ते 1444 मध्ये या मंदिराची विटंबना केली आणि मंदिरे मोठ्या प्रमाणात पाडली व याचा काही भाग शहराच्या जामी मशिदीत रूपांतरित केला.रुद्र महालया मंदिर , हे रुद्रमल म्हणूनही ओळखले जाते.
11) Shankheshwar Jain Temple-


शंखेश्वर जैन मंदिर हे गुजरातमधील पाटण जिल्ह्यातील शंखेश्वर शहराच्या मध्यभागी असलेले तीर्थंकर भगवान पार्श्वनाथचे पवित्र तीर्थस्थळ आहे.येथील पार्श्वनाथ भगवानांची मूर्ती अतिशय प्राचीन असून आजही जमिनीपासून वर हवेत तरंगत आहे, हे तेथील पुजारी मूर्तीखालील एका बाजूने कापड टाकून दुसऱ्या बाजूला कापड काढून दाखवतात.
हे मंदिर गुजरातमधील महान, पवित्र आणि दिव्य अशा जैन धर्मातील धार्मिक स्थळांपैकी एक असून जैन धर्माच्या अनुयायांसाठी एक महत्त्वाचे तीर्थस्थान आहे.या ठिकाणी सर्व जैन बांधव मोठ्या भक्तीभावाने दर्शन आणि पूजेसाठी येतात.येथील भगवानांच्या अभिषेकाचे पाणी अत्यंत दिव्य असून आजही अनेक रोगांवर उपचारक ठरते अशी लोकांची गाढ श्रद्धा आहे.
12)Patan Patola-

पाटोला साडी ही गुजरात मधील पाटण जिल्ह्यातील दुप्पट इकत तंत्राने विणलेली साडी असून ती रेशमी धाग्यांपासून तयार केली जाते.पाटोला विणकाम ही एक अत्यंत जपून ठेवलेली कला आहे. ही साडी तयार करण्यासाठी उभे आणि आडवे दोरे अंतिम कापडावरील नक्षीप्रमाणे रंगविण्यासाठी आधी बांधले जातात. नंतर गुंतागुंतीच्या नक्षी व डिझाईन्स तयार केल्या जातात आणि प्रत्येक धाग्याला स्वतंत्रपणे रंगवून मगच त्यांना एकत्र विणले जाते.
त्यामुळे ही एक साडी तयार करण्यासाठी सहा महिने ते एक वर्ष एवढा कालावधी लागतो. तसेच ह्या साड्या अतिशय महाग असतात त्यामुळे पूर्वी फक्त राजघराण्यातील व श्रीमंत घराण्यातील स्त्रिया या साड्या परिधान करीत असत. आजही या साड्या जगभर लोकप्रिय आहेत. तसेच गुजरात मधील सुरतमध्ये व्हेल्वेट पाटोला शैली तयार केली जाते. या सुंदर, अप्रतिम साड्या गुजरातमधील पाटण जिल्ह्यात विणल्या जातात.
13)Khan Sarovar-

खान सरोवर, हे गुजरात राज्यातील पाटण जिल्ह्यात दक्षिण दरवाजाच्या पलीकडे असलेले एक प्राचीन जलाशय व महत्त्वाचे ऐतिहासिक ठिकाण आहे.11 व्या शतकात चालुक्य शासक सिद्धराज जयसिंह यांनी हे जलाशय जलसंधारणासाठी आणि पाटण शहराला पाण्याची सोय करण्यासाठी बांधले होते. त्यानंतर गुजरातचे राज्यपाल मिर्झा अझीझ कोका यांनी 1589 मध्ये इथे पाडलेल्या इमारतींचे दगड वापरून हे टाके बांधले.
हे टाके 1228 लांब आणि 1273 रुंदीचे चौकोनी आकाराचे मोठे पाण्याचे टाके आहे.आणि त्यामध्ये हिंदू शिल्पकलेचे खांब व तलावाच्या चारही बाजूंनी दगडी पायऱ्या व बांधकाम केलेले आहे.पाटणमधील हे जलाशय म्हणजे अर्ध-शुष्क प्रदेशात नाविन्यपूर्ण जल व्यवस्थापनाचे उत्तम उदाहरण आहे.
14)Hemachandracharya Jain Gnan Mandir-

हेमचंद्राचार्य जैन ज्ञान मंदिर हे गुजरात मधील पाटण जिल्ह्यातील प्राचीन जैन धर्मग्रंथांचा अद्वितीय खजिना असलेले संग्रहालय आहे. या ज्ञान मंदिराची वास्तुरचना आधुनिक आणि पारंपरिक शैलीत असून,या ज्ञान मंदिरात असंख्य प्राचीन ताडपत्री हस्तलिखिते आणि धार्मिक ग्रंथ सांभाळून ठेवण्यात आहेत. हे ज्ञान मंदिर आचार्य हेमचंद्र यांच्या नावे आहे.
आचार्य हेमचंद्र हे चालुक्य राजवटीत एक विख्यात विद्वान, कवी आणि बहुगुणी व्यक्तिमत्त्व होते. त्यांनी जैन साहित्य, व्याकरण, तत्त्वज्ञान आणि काव्य क्षेत्रात मोठे योगदान दिले आहे. त्यामुळे जैन धर्माच्या वर्षानुवर्षाच्या विद्वत्तापूर्ण परंपरेचे रक्षण झाले आहे. हे मंदिर जैन अध्ययनासाठी एक महत्त्वपूर्ण सजीव व सांस्कृतिक केंद्र आहे.या ग्रंथालयातील वातावरण शांत असल्यामुळे वाचकांसाठी आणि संशोधनासाठी फायद्याचे ठरते.
15)Shree Chudel Mataji Temple Kungher-

श्री चूडेल माता मंदिर हे गुजरात मधील पाटण जिल्ह्यात कुंघेर या ठिकाणी असलेले पवित्र सुप्रसिद्ध तीर्थक्षेत्र आहे.भारत देशात विविध देवतांना समर्पित हजारो मंदिरे आहेत परंतु ‘चुडेल’ (चेटकीण) ला समर्पित असलेले हे अद्वितीय व एकमेव मंदिर आहे. कुंघेर गाव हे महाशक्ती देवी श्री चूडेल माता यांच्या पवित्र स्थानामुळे प्रसिद्ध आहे. तसेच हे मंदिर येथील उच्च न्यायालय आहे .
कारण येथील लोक चेटकीण देवीकडून न्याय मागतात. ही माता विशाल, भव्य स्वरूपात जीवंत ज्योती म्हणून प्रकट आहे, व कलियुगातील आद्यशक्ती म्हणून ओळखली जाते. चूडेल मातेच्या या मंदिरावर गावकऱ्यांची खूप श्रद्धा असून हे मंदिर येथील लाखो भक्तांचे श्रद्धास्थान आहे.
16)Shree Veer megha maya mandir –

वीर मेघमाया मंदिर हे गुजरात मधील पाटण जिल्ह्यात एका टेकडीवरील मंदिर आहे.वीर मेघमाया हे 12 व्या शतकात धोलका जवळील राणोडा गावात एका दलित वणकर कुटुंबात, जन्मले होते. त्यावेळी पाटणमध्ये तीन वर्षे पाऊसच न पडल्यामुळे लोकांमध्ये पाण्याची अवस्था खूप वाईट होती. तेव्हा राजा सिध्दराज जयसिंह यांनी सहस्रलिंग सरोवर तयार केले, पण त्याचा काही उपयोग झाला नाही. त्यावेळी एका ज्योतिषाने सांगितले की, जेव्हा 32 सद्गुणांनी संपन्न असणारा माणूस सरोवरात स्वतःचा बलिदान करील,तेंव्हाच पाणी मिळेल.
वीर मेघमाया यांनी हे करुण,धाडसी पाऊल उचलले आणि आपल्या प्राणांची आहुती देऊन लोकांना पाणी मिळवून दिले.2020 साली गुजरात सरकारने वीर मेघमाया स्मारक परिसराचा विकास करण्यासाठी ₹3 कोटींचे अनुदान मंजूर करून या मंदिराचे पुनर्निर्माण, स्मृति भवन, रिसर्च सेंटर, लायब्ररी विकसित केले. तसेच डाक विभागाने 31 डिसेंबर 2024 रोजी वीर मेघमाया यांना आदर आणि स्मरणार्थ श्रद्धांजली म्हणून 5 मूर्त्याचा स्मारक स्टँप जारी केला.हे मंदिर वीर मेघमाया यांच्या त्यागाचे प्रतीक आहे.
17)Bohra Vad-


बोहरा वड हे गुजराती मध्ये पाटण जिल्ह्यात सिद्धपुर या ठिकाणी श्रीमंत मुस्लिम दाऊदी बोहरा समाजाने 19 आणि २० व्या शतकात बांधलेल्या व्हिक्टोरियन शैलीतील अत्यंत सुंदर व अद्वितीय अशा हवेली (मोठे वाडे) आहेत. या ठिकाणी या समाजाच्या शंभर पेक्षा जास्त हवेली आहेत. या हवेली (मोठे वाडे) व्हिक्टोरियन स्थापत्यशास्त्रात व युरोपियन शैलीत बांधलेले आहेत.या वाड्यांमध्ये युरोपियन रंगाची झलक दिसून येते.
येथील ‘बोहरा वाड’मधून फिरताना संध्याकाळी दिव्यांच्या रोषणाईने भरलेल्या युकेमधून फिरण्याचा आभास होतो.या हवेलीचे बांधकाम लाकडातील गुंतागुंतीचे आणि दर्शनी भागातील विविधता व सौंदर्यात्मक पद्धतीने समृद्ध आहे. ‘बोहरा हवेली’ या डिकेन्सन कादंबरीतील एक जुनाट दृश्य दर्शवतात.हे वाडे पर्यटकांचे आवडते आकर्षण असून इतिहासप्रेमी आणि वास्तुकला आवडणाऱ्यांसाठी हे एक उत्कृष्ट ठिकाण आहे.
18) kalika Mata Temple, Patan-

कालिका माता मंदिर हे गुजरात मधील पाटण जिल्ह्यातसरस्वती नदीच्या काठावर जुन्या पाटणच्या किल्ल्याच्या भिंतीच्या प्रवेशद्वारावर असलेले धार्मिक, अत्यंत पूजनीय आणि ऐतिहासिक मंदिर आहे.हे मंदिर अंदाजे 1000 वर्षापेक्षा जास्त जुने असून, सोलंकी राजघराण्याच्या सिद्धराज जयसिंह यांनी बांधले आहे.
कालिका माता ही पाटण नगराचे रक्षण करणारी शक्ती देवी मानली जाते. या ठिकाणी कालिका देवीची सुंदर मूर्ती सिंहवाहिनी देवीच्या रूपात असून देवीचा फक्त चेहरा दिसतो. हे मंदिर रानी-नी-वाव मार्गावर, पाटण किल्ल्याच्या भिंतीजवळ आहे.
19)Muhammad Ali Tower-

मोहम्मदअली टॉवर हे गुजरात मधील पाटण जिल्ह्यातील सिद्धपूर येथील एक जुना घड्याळ टॉवर आहे.हा टॉवर ‘शेख शराफली टॉवर’ म्हणूनही ओळखला जातो. हा टॉवर ब्रिटीश वसाहती स्थापत्य शैलीत बांधलेला, 60 फूट उंच असून त्याच्या चारही बाजूंना युरोपमधून आयात केलेली घड्याळे आहेत. आणि वरती शाही मुकुट आहे. या टॉवर बद्दल अशी माहिती आहे की मोहम्मदअल्ली हे सिद्धपूर येथील दाऊदी बोहरा व्यापारी होते आणि त्यांच्याकडे अबिसिनिया /इथिओपिया येथील जीएम मोहम्मदअल्ली अँड कंपनी होती.
1914 मध्ये, त्यांच्या मुलीच्या लग्नानिमित्त त्यांनी सिद्धपूरला तीन महिने रोषणाई केली.व त्यावेळी लग्नाच्या मिरवणुकीसाठी हत्तीच्या प्रवेशासाठी शहराचा देवडी दरवाजा पाडण्यात आला होता. आणि पाडलेल्या दरवाजाची नुकसानाची भरपाई म्हणून आत्ताचे,3.8 दशलक्ष रुपये खर्च करून हे घड्याळ टॉवर उभारण्यात आले.एप्रिल 1915 रोजी राजकुमार जयसिंगराव सयाजीराव गायकवाड यांच्या हस्ते या टॉवरचे उद्घाटन झाले.
20)Shristhal Sangrahalay-

श्रीस्थळ संग्रहालय हे गुजरात मधील पाटण जिल्ह्यातील सिद्धपूर येथील बिंदू सरोवराजवळील एक संग्रहालय आहे. हे संग्रहालय 2017 मध्ये उघडण्यात आले अ सून ‘सिद्धपूर संग्रहालय’ किंवा बिंदू सरोवर संग्रहालय म्हणूनही ओळखले जाते. धार्मिक आणि ऐतिहासिक दृष्ट्या महत्वाच्या असलेल्या या संग्रहालयात या प्रदेशाचा इतिहास आणि समाज सादर करणाऱ्या तीन गॅलरी आहेत.
2012 मध्ये शिलान्यास यांनी या संग्रहालयाची रचना केली होती. व 10 जून 2017 मध्ये गुजरात राज्याचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी या संग्रहालयाचे उद्घाटन केले. हे संग्रहालय बिंदू सरोवर परिसरात असल्याने, सातत्य सादर करण्यासाठी संग्रहालय त्याच्या अक्षावर आधारित बांधले गेले आहे. आणि येथील गॅलरीत एक नवीन कर्णरेषा जोडली आहे.
21)Shree Karandiya VeerDada Temple-

श्री करंडिया वीर दादा मंदिर हे गुजरात मधील पाटण जिल्ह्यातील राणी की वाव या ठिकाणाच्या जवळपास असलेले एक अत्यंत धार्मिक तीर्थस्थळ आहे. हे मंदिर सुंदर, शांततापूर्ण व रम्य ठिकाणी असून भाविकांची दृढ श्रद्धा असलेले ठिकाण आहे. या मंदिरात भक्तांना एक शांत व आध्यात्मिक अनुभव येतो. त्यामुळे पर्यटकांचे हे आकर्षणाचे ठिकाण आहे.
22)Shree Padmnabh Bhagwan Temple –

श्री पद्मनाभ भगवान मंदिर हे गुजरात मधील पाटण जिल्ह्यातील पद्मनाभ रोड येथील एक अनोखे प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आहे.या मंदिराचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे येथेमूर्तीऐवजी मातीमध्ये देवाची पूजा केली जाते. या मंदिरातील मूर्ती पाच ते सात नैसर्गिक घटकांनी बनलेली व मातीपासून तयार केली जाते. या ऐतिहासिक व अद्वितीय मंदिरात मूर्तींच्या ऐवजी देवांची पूजा मातीच्या स्वरूपात केली जाते. आणि येथे सर्व हिंदू देवतांचा वास आहे असे मानले जाते.
1) पाटण जिल्ह्यातील राणी कि वाव ही अद्वितीय बावडी कोणत्या नदीच्या काठावर आहे?
पाटण जिल्ह्यातील राणी कि वाव ही अद्वितीय बावडी सरस्वती नदीच्या काठावर वसलेली एक अद्वितीय बावडी आहे.
2) पाटण जिल्ह्यातील श्रीस्थळ संग्रहालय हे कोणत्या ठिकाणी आहे?
पाटण जिल्ह्यातील श्रीस्थळ संग्रहालय हे सिद्धपूर येथील बिंदू सरोवराजवळील एक संग्रहालय आहे.
3) पाटण जिल्ह्यातील श्री चूडेल माता मंदिर हे कोणत्या ठिकाणी आहे ?
पाटण जिल्ह्यातील श्री चूडेल माता मंदिर हे कुंघेर या ठिकाणी असलेले पवित्र सुप्रसिद्ध तीर्थक्षेत्र आहे.


