मंडळी भारत भ्रमंतीमध्ये आज आपण पाहणार आहोत एकाच ठिकाणी उस्मानाबाद / धाराशिव जिल्ह्यातील संपूर्ण पर्यटन स्थळे उस्मानाबाद जिल्हा हा महाराष्ट्र राज्यातील मराठवाडा विभागात येतो. जिल्ह्याचे पूर्वीचे नाव धाराशिव असे होते. हैदराबादचा सातवा निजाम ‘मीर उस्मान अली खान’ याच्या सन्मानार्थ या जिल्ह्याला उस्मानाबाद हे नाव देण्यात आले. समुद्रसपाटीपासून हा जिल्हा 600 मीटर उंचीवर आहे. या जिल्ह्याचा बहुतांश भाग हा खडकाळ असून उर्वरित भाग सपाट आहे.उस्मानाबाद जिल्ह्यातील संपूर्ण पर्यटन स्थळे-Top 18 places visit to in osmanabad District
तसेच या जिल्ह्याचा बराचसा भाग बालाघाटच्या छोट्या पर्वताने वेढलेला आहे. या जिल्ह्यामध्ये आठ तालुके असून येथील वातावरण कोरडे असते. तसेच हा जिल्हा शेळ्यांसाठी ही प्रसिद्ध आहे. उस्मानाबाद शेळी ही महाराष्ट्रात सर्वात उत्कृष्ट मानली जाते. या जिल्ह्यामध्ये अनेक धार्मिक,सांस्कृतिक आणि ऐतिहासिक पर्यटन स्थळे आहेत. तुळजाभवानी ही उस्मानाबाद जिल्ह्याची कुलस्वामिनी आहे. या जिल्ह्यातून मांजरा,तेरणा,बोरी या महत्त्वाच्या नद्या वाहतात.
या जिल्ह्यातील गुलाब जामुन आणि उस्मानाबादी शेळीचे मटण प्रसिद्ध आहे.तसेच ज्वारी, सूर्यफूल, हायब्रीड, ऊस, कापूस, गहू, हरभरा ही या जिल्ह्यातील मुख्य पिके आहेत. या जिल्ह्यातून सोलापूर धुळे हा महत्त्वाचा राष्ट्रीय महामार्ग जातो.
Top 18 places visit to in osmanabad District
उस्मानाबाद जिल्ह्यातील संपूर्ण पर्यटन स्थळे-
1) श्री तुळजाभवानी मंदिर-

Shree Tuljabhavani Temple हे महाराष्ट्रातील उस्मानाबाद जिल्ह्यातील तुळजापूर तालुक्याच्या ठिकाणी असलेले पवित्र, ऐतिहासिक व धार्मिक तीर्थक्षेत्र आहे. हे मंदिर हेमाडपंथी व नागर शैलीत बांधलेले असून श्री तुळजाभवानी माता ही महाराष्ट्राची कुलस्वामिनी आहे. तसेच शिवाजी महाराज यांची भवानी माता कुलस्वामिनी होती. या ठिकाणी ते नेहमी येत असत.
भवानी मातेने छत्रपती शिवाजी महाराजांना भवानी तलवार देऊन स्वराज्य स्थापनेचा आशीर्वाद दिला होता. महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठ पैकी भवानी माता हे एक पूर्ण शक्तिपीठ आहे. आश्विन व चैत्र पौर्णिमेला या ठिकाणी मोठी यात्रा भरते. उस्मानाबाद पासून हे ठिकाण 22 किलोमीटर अंतरावर आहे.
2) सोनारी-

Sonari हे उस्मानाबाद जिल्ह्यातील सीना नदीजवळ परांडा तालुक्यातील एक गाव आहे. या गावातील काळभैरवनाथ मंदिर हे धार्मिक व ऐतिहासिक पर्यटन स्थळ आहे. या ठिकाणी नाथ संप्रदायाचा भैरवनाथ मठ आहे. तसेच या ठिकाणी संत रामदास स्वामींचे शिष्य कल्याण स्वामी यांची समाधी आहे.
सोनारी येथे लोहतीर्थ, नागनिर्झरी तीर्थ, बगनाथ मंदिर, चंद्रप्रभू दिगंबर जैन मंदिर, गढीचे अवशेष, वीरगळ, हे ठिकाणी आहेत. काळभैरवनाथ हे अनेक कुटुंबाचे कुलदैवत आहे.हे ठिकाण उस्मानाबाद पासून ९० किलोमीटर तर परंडा तालुका पासून 15 किलोमीटर अंतरावर आहे.
3) श्री दत्त मंदिर संस्थान-

Shree Datta Mandir Sansthan हे उस्मानाबाद जिल्ह्यातील रुईभर या ठिकाणी असलेले प्रसिद्ध धार्मिक स्थळ आहे. हे मंदिर काळ्यापाषाणांमध्ये बांधलेले असून मंदिरावरील नक्षीकाम पाहण्यासारखे आहे. या ठिकाणी ध्यानमंदिर, योग साधना व भक्त निवास या सोयी उपलब्ध आहेत. मार्गशीर्ष महिन्यात दत्त जयंतीला या ठिकाणी मोठा उत्सव साजरा केला जातो. उस्मानाबाद पासून हे ठिकाण 15 किलोमीटर अंतरावर आहे.
4) येडेश्वरी देवी मंदिर-

Yedeshwari Temple हे उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील येरमाळा येथील धार्मिक स्थळ आहे. बालाघाट डोंगर रांगेत सुमारे चारशे फूट उंचीवर हे मंदिर असून येडेश्वरी देवीच्या मूर्तीची स्थापना त्रैतायुगात झाल्याचे सांगितले जाते. हे मंदिर हेमाडपंथी स्थापत्य शैलीत बांधलेले असून या ठिकाणी 101 दगडी खांब व दगडी शिळांचा वापर केला आहे. मंदिरापासून पाचशे मीटर अंतरावर देवीच्या स्नानासाठी दत्त कल्लोळ ठिकाण आहे.
महाराष्ट्राची कुलस्वामिनी तुळजाभवानीची येडेश्वरी माता ही धाकटी बहीण आहे असे सांगितले जाते. चैत्र पौर्णिमा आणि श्रावणी पौर्णिमेला वर्षातून दोन वेळा या ठिकाणी यात्रा भरते. नवसाला पावणारे देवी म्हणून या देवीची ख्याती आहे.उस्मानाबाद पासून हे ठिकाण 25 किलोमीटर अंतरावर आहे.
5) हजरत शमशुद्दीन गाजी दर्गा-

hajrat Shamshuddin Gaji Darga हे उस्मानाबाद जिल्ह्यातीलहिंदू मुस्लिम ऐक्याचे धार्मिक पर्यटन स्थळ आहे. अजमेर नंतर दक्षिण भारतातील हा सर्वात मोठा दर्गा याची ओळख आहे. हा दर्गा अध्यात्म आणि एकतेचे प्रतीक मानले जाते.या देवस्थानचे वैशिष्ट्य म्हणजे येथील उरुससाठी हिंदू मुस्लिम बांधव एकत्रितपणे उपस्थित राहतात. उस्मानाबाद बस स्थानकापासून हा दर्गा दोन किलोमीटर अंतरावर आहे.
6) तेर-संत श्री गोरोबा काका मंदिर-

Ter -Shree Goroba Kaka Temple हे उस्मानाबाद जिल्ह्यातील पुरातत्त्वीय उत्खननस्थळ असून प्राचीन संस्कृतिच्या पाऊलखुणा आजही पाहायला भेटतात.प्रसिद्ध संत श्री गोरोबा काका कुंभार यांच्यामुळे तेर हे गाव सर्वाना माहित आहे. या गावांमध्ये गोरोबा काका यांचे जुने राहते घर असून तेरणा नदीच्या काठावर त्यांची समाधी मंदिर आहे.
तर या ठिकाणी नृसिंहाचे जुने मंदिर व गावाच्या माध्यभागी त्रिविक्रमाचे मंदिर आहे.प्राचीन काळी तेर हे ठिकाण तगर या नावाने ओळखले जात होते.उस्मानाबाद पासून हे ठिकाण 20 किलोमीटर अंतरावर आहे.
Visit our website: allindiajourney.com
7)धाराशिव लेणी –

Dharashiv Cave ही उस्मानाबाद जिल्ह्यातील बालाघाट डोंगर रांगेत असलेली ऐतिहासिक व पुरातत्वीय लेणी आहेत. या ठिकाणी सात लेण्या असून यांचा संबंध बौद्ध व जैन धर्मीयांशी आहे.जेम्स बर्जेस यांनी 1876 मध्ये या लेण्यांचे वर्णन केलेले आहे. या लेण्यांमध्ये पार्श्वनाथ मूर्ती, पाण्याचे कुंड व 14 निवारागृहे आहेत.
तसेच या लेण्यांसमोर मराठा काळातील शिवमंदिर व बांबल्या मारुती मंदिर आहे. या लेण्या पाहिल्यानंतर प्राचीन काळातील कला व संस्कृतीचा अंदाज येतो. या लेण्या नील व महानिलिया विद्यार्थ्यांनी कोरल्या असल्याचे सांगितले जाते.या लेण्या सातव्या शतकात कोरलेल्या असल्याचे सांगितले जाते. उस्मानाबाद पासून हे ठिकाण सात किलोमीटर अंतरावर आहे.
8) रामलिंग मंदिर-

Ramling Fort हे उस्मानाबाद जिल्ह्यातील बालाघाट पर्वतरांगेच्या कुशीत येडशी या ठिकाणी असलेले ऐतिहासिक व धार्मिक स्थळ आहे. त्या मंदिराचे रचना पारंपारिक दगडामध्ये असून रामलिंग देवस्थान रामलिंगेश्वरम देवाला समर्पित असून ते शिवाचे स्वरूप मानले जाते. मंदिर परिसरात धबधबा असून त्याखाली गुफा आहे. तसेच हा मंदिर परिसर डोंगराळ व घनदाट जंगलांनी वेढलेला आहे. त्यामुळे या ठिकाणी अनेक प्रकारचे वन्यजीव प्राणी आढळून येतात.
म्हणून या ठिकाणाला येडशी रामलिंग घाट वन्यजीव अभयारण्य असे नाव देण्यात आले आहे. तसेच या ठिकाणी जटायूची समाधी आणि सीतेची न्हाणी हे पाहायला मिळते. महाशिवरात्री आणि श्रावण महिन्यात या ठिकाणी यात्रा आणि वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. उस्मानाबाद पासून हे ठिकाण 23 किलोमीटर अंतरावर आहे.
9) परांडा किल्ला-

Paranda Fort हा उस्मानाबाद शरीरातील परांडा या ठिकाणी असलेला भुईकोट किल्ला आहे. हा किल्ला बहामनी सुलतानांचा वजीर महमूद गवान याने पंधराव्या शतकात बांधल्याचे सांगितले जाते. या किल्ल्याला 45 बुरुज असून हा किल्ला दहा एकर मध्ये पसरलेला आहे.हा किल्ला लष्करी वास्तुकला आणि सैन्य-अभियांत्रिकी यासाठी प्रसिद्ध आहे. या किल्ल्यातील प्रसिद्ध ‘मुलुख मैदान तोफ’ मुरार नावाच्या सरदाराने 1632 मध्ये विजापूरला नेली होती.
सध्या या ठिकाणी ‘अजदा पईकर’ नावाची तोफ आहे.तसेच या किल्ल्यामध्ये महादेव मंदिर व नृसिंह मंदिर आणि मशिद आहे. या ठिकाणी असलेली पाच फूट उंच आणि सहा हातांच्या गणेशाची नृत्यमुद्रेतील मूर्ती पाहायला मिळते. किल्ल्यावर अष्टपोनी आकाराची सुंदर विहीर आहे. उस्मानाबाद पासून हे ठिकाण 80 किलोमीटर अंतरावर आहे.
10) नळदुर्ग किल्ला-

Naldurg Fort हा उस्मानाबाद जिल्ह्यातील बेसॉल्टच्या उंच सखल डोंगरावर बांधलेला मिश्र दुर्ग आहे. हा किल्ला नळदुर्ग आणि रणमंडळ असा जोड किल्ला आहे. या किल्ल्याची तटबंदी शंभर बुरुजांनी जोडलेली भक्कम असून नर-मादी धबधबा हे येथील मुख्य आकर्षण आहे. तसेच या ठिकाणी फारसी शिलालेख असलेला पाणी महाल पाहायला मिळतो.
तसेच पर्यटकांसाठी या ठिकाणी बॅडमिंटन, बास्केटबॉल, फुटबॉल, क्रिकेट, वॉल क्लायम्बिंग सँड बाईक राईड इ. सुविधा पुरविण्यात आले आहेत. उस्मानाबाद पासून हे ठिकाणे 46 किलोमीटर अंतरावर आहे.
11)रामलिंग अप्पा लामतुरे संग्रहालय-

Ramlingappa Lamture Museum हे ऐतिहासिक संग्रहालय उस्मानाबाद जिल्ह्यातील तेर या गावामध्ये आहे.तेर गावचे रहिवासी रामलिंगअप्पा खंडप्पा लामतुरे आणि त्यांचा मुलगा भागवतप्पा रामलिंगअप्पा लामतुरे यांनी 1961 मध्ये या संग्रहालयाची स्थापना केली. नंतर त्यांनी ते शासनाला दिले. नंतर शासनाने 1967 मध्ये पुन्हा सुरू केले. व या संग्रहालयाला रामलिंग अप्पा लामतुरे संग्रहालय असे नाव देण्यात आले.या ठिकाणी विविध प्रकारच्या प्राचीन वस्तू आहेत.
यामध्ये मातीच्या वस्तू, खापरे, मणी, दगडांच्या मूर्ती, शंखांच्या वस्तू हस्तिदंताच्या वस्तू, शाडूच्या मुर्ती,आणि हाडांच्या वस्तू इ. समावेश आहे. पर्यटक या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर भेट देतात. हे पाहिल्यानंतर तेरच्या इतिहासाची आपल्याला माहिती मिळते.
12) हातलाई देवीचे मंदिर-

Hatlai Devi Temple हे उस्मानाबाद जिल्ह्यातील उस्मानाबाद तालुक्यात बालाघाट पर्वत रांगेत असलेले व भगवती नदीच्या काठावर असलेले धार्मिक पर्यटन स्थळ आहे. या ठिकाणाला वन्यजीव अभयारण्य म्हणून मी ओळखले जाते. या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे की या मंदिराला छत किंवा कळस नाही कारण येथील लोकांच्या म्हणण्यानुसार मंदिराला छत लावले तर ते आपोआप निघून पडते.
त्यामुळे या मंदिराला कोणतेही छत किंवा कळस नाही. हे मंदिर निसर्गरम्य ठिकाणी असल्यामुळे पर्यटकांची या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर गर्दी असते.
13) संत गरीबनाथ मठ-

Sant Garibnath Math हे उस्मानाबाद जिल्ह्यातील परंडा तालुक्यातील गरीब नाथ या ठिकाणी असलेले प्रसिद्ध धार्मिक आणि सांस्कृतिक पर्यटन स्थळ आहे. या ठिकाणी गरीब नाथ महाराजांची समाधी आहे.श्री गरीबनाथ हे प्रसिद्ध संत होते त्यांच्या प्रति लोकांमध्ये खूप गाढ श्रद्धा आहे. दरवर्षी या ठिकाणी विविध कार्यक्रमाचे आयोजन केले जाते.
14) मांजरा धरण-

Manjra Dam हे उस्मानाबाद जिल्ह्यातील मांजरा नदीवर बांधलेले मराठवाड्यातील एक प्रमुख महत्वाचे धरण आहे. हे धरण 1980 मध्ये बांधले गेले. या धरणातून उस्मानाबाद लातूर आणि बीड जिल्ह्याला पाणीपुरवठा केला जातो. या धरणाची पाणी साठवण क्षमता 224.09 एवढी आहे.
तसेच महासांगवी, पाटोदा, पांढरेवाडी, चौसाळा, पारगाव या ठिकाणी पाऊस पडल्यानंतर धरणाच्या पाण्याची पातळी मोठ्या प्रमाणात वाढते. या धरणातून 72 गावांना पाणीपुरवठा केला जातो. व शेतीच्या सिंचनासाठी ही या धरणाचा पाण्याचा उपयोग केला जातो. धाराशिव पासून हे धरण 60 किलोमीटर अंतरावर आहे.
15) घाटशिला मंदिर-

Ghatshila Temple हे उस्मानाबाद जिल्ह्यातील तुळजापूर तालुक्यातील घाटावरच्या एका मोठ्या खडकावर असलेले प्राचीन व धार्मिक तीर्थस्थळ आहे. हे स्थळ मध्ययुगीन काळातील असून भग्न खडकावर आहे.पुराण कथेनुसार राम आणि लक्ष्मण सीतेच्या शोधात निघाले असताना भवानी मातेने याच शिळेवरून राम व लक्ष्मण यांना दर्शन दिले यामुळे या ठिकाणाला ‘घाटशीला’ हे नाव पडले. हा मंदिर परिसर निसर्गरम्य व सुंदर आहे.
16)कल्लोळ तीर्थ-

Kallol Tirth हे उस्मानाबाद जिल्ह्यातील तुळजापूर या ठिकाणी असलेले पवित्र तीर्थक्षेत्र आहे. कल्लोळ म्हणजे बऱ्याच ठिकाणच्या पाण्याचा एकत्र येऊन झालेला आवाज या ठिकाणी असणाऱ्या जलकुंडात गंगा–यमुना–सरस्वतीसह हिमालय, सह्याद्री, विंध्य, माळ्याद्री या नद्या सामिल झाल्या, त्यामुळे येथे ‘कल्लोल’ म्हणजेच ‘ध्वनि’ निर्माण झाला.
चौदाव्या शतकात यादव राजाने हे जलकुंड बांधले. येथील मंदिर परिसरात यज्ञकुंड, गोमुख तीर्थ, कल्लोळ तीर्थ इतर तीर्थ पाहायला मिळतात. येथील जलकुंडात स्नान केल्याने सर्व पापे धुतली जातात अशी भाविकांची श्रद्धा आहे.
17) तेरणा धरण-

Terna Dam हे महाराष्ट्रातील उस्मानाबाद जिल्ह्यातीलमाकणी गावाजवळ तेरणा नदीवर बांधलेले एक महत्त्वपूर्ण धरण आहे.
या धरणाची पाणी साठवण क्षमता 121 दशलक्ष घनमीटर असून धरणाची उंची 19.70 मीटर एवढी आहे.या धरणातून लातूर आणि उस्मानाबाद जिल्ह्याला पाणीपुरवठा केला जातो. तसेच या धरणाद्वारे 43 गावांना आणि शेतीच्या सिंचनासाठी पाणीपुरवठा केला जातो.
18)सीना-कोळेगाव धरण –

Sina kolegaon Dam हे उस्मानाबाद जिल्ह्यातील सीना नदीवर बांधलेले सर्वात मोठे धरण आहे. या धरणाची पाणी साठवण क्षमता 5.30 टीएमसी एवढी आहे. या धरणामुळे परांडा आणि करमाळा तालुक्यातील 10200 हेक्टर शेतीचे क्षेत्र सिंचनाखाली आलेले आहे. या धरणामुळे सीना नदीचे पाणी व्यवस्थापन सुधारले आहे. तसेच या धरणामुळे सीना नदीच्या खोऱ्यातील लोकांना मोठ्या प्रमाणात फायदा झालेला आहे. हे धरण दुष्काळी भागात असल्यामुळे या ठिकाणच्या लोकांना हे महत्त्वपूर्ण धरण आहे.
1)हातलाई देवीचे मंदिर हे उस्मानाबाद जिल्ह्यातील कोणत्या नदीच्या काठावर आहे ?
हातलाई देवीचे मंदिर हे उस्मानाबाद जिल्ह्यातील भगवती नदीच्या काठावर आहे .
2)
नळदुर्ग किल्ला हा उस्मानाबाद जिल्ह्यातील कोणत्या डोंगरावर बांधलेला दुर्ग आहे?
नळदुर्ग किल्ला हा उस्मानाबाद जिल्ह्यातील बेसॉल्टच्या उंच सखल डोंगरावर बांधलेला मिश्र दुर्ग आहे.
3)तेर या ठिकाणी कोणाची समाधी आहे ?
तेर या ठिकाणी संत श्री गोरोबा काका कुंभार यांची समाधी आहे.


