मित्रांनो भारत भ्रमंती मध्ये आज आपण पाहणार आहोत यवतमाळ जिल्ह्यातील संपूर्ण पर्यटन स्थळे यवतमाळ जिल्हा हा महाराष्ट्रातील एक महत्त्वाचा व विदर्भातील सर्वात मोठा जिल्हा आहे. पूर्वी या जिल्ह्याला ‘यवती’ म्हणून ओळखले जात होते. ब्रिटिश काळात हा जिल्हा वनी जिल्ह्याचे प्रमुख विभाग होता. 1905 मध्ये वनी चे नाव बदलून यवतमाळ असे ठेवण्यात आले.यवतमाळ जिल्हा हा अमरावती प्रशासकीय विभागात येत असून या जिल्ह्याला वाशिम, अमरावती, वर्धा, चंद्रपूर, तेलंगणा राज्य,नांदेड, व हिंगोली या जिल्ह्यांच्या सीमा लागलेल्या आहेत. तसेच या जिल्ह्यात 16 तालुके आहेत.Top 11 places to visit in Yavatmal District
या जिल्ह्यातील आर्णी येथील उत्खननात बृहदाश्मयुग – मौर्य काळातील वस्ती असल्याचे अवशेष मिळाले आहेत. या जिल्ह्यातून वर्धा,पैनगंगा, निरगुडा, पुस. आडन ,अरुणावती, रामगंगा,बेंबळा या नद्या वाहतात. शेती उत्पादनामध्ये या जिल्ह्यामध्ये ज्वारी, गहू, ऊस, आवळा, तूर, भुईमूग, कापूस, विड्याची पाने ही पिके घेतली जातात. या जिल्ह्यात कापसाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतल्यामुळे या जिल्ह्याला ‘पांढरे सोने’ पिकवणारा जिल्हा म्हणूनही ओळखले जाते.
तसेच या जिल्ह्यातून दगडी कोळसा, चुनखडी,डोलोमाईट ही खनिजे सापडतात. या जिल्ह्यात अनेक ठिकाणी घोंगड्या व सतरंज्या विणण्याचे काम केले जाते. या जिल्ह्यात धरणे अभयारण्य आणि अनेक सांस्कृतिक, धार्मिक व ऐतिहासिक पर्यटन स्थळे आहेत.
Top 11 places to visit in Yavatmal District
यवतमाळ जिल्ह्यातील संपूर्ण पर्यटन स्थळे-
1) कमलेश्वर आणि ओंकारेश्वर महादेव मंदिर-

Kamleshwar ,Omkareshwar Temple हे यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी तालुक्यात दाबडी या ठिकाणी असलेले प्राचीन शिवालय आहे. हे मंदिर हेमाडपंती शैलीत व दगडी बांधकामात बांधलेले आहे. याशिवाय या परिसरात श्रीओंकारेश्वर मंदिर आहे. या ठिकाणी असलेल्या कमलेश्वर मंदिरात 4 फूट उंचीची महादेवाची पिंड आहे. हे मंदिर 1200 वर्षापूर्वीचे असून यादवकालीन असल्याचे सांगितले जाते. येथील ओंकारेश्वर मंदिरात नऊ दगडी खांब आहेत व या मंदिरात एक भव्य शिवलिंग आहे. या दोन्ही मंदिरात भाविक मोठ्या श्रद्धेने दर्शनाला येतात.
2) श्री संत मारोती महाराज-

Shree Sant Maroti Maharaj Temple हे यवतमाळ जिल्ह्यातील घाटंजी शहरातील एक महत्त्वाचे धार्मिक तीर्थस्थळ आहे.हे मंदिर वाघाडी नदीच्या काठावर वसलेले असून या ठिकाणी ब्रह्मलीन संत मारोती महाराजांचे मंदिर आहे. हे मंदिर हेमाडपंथी शैलीत बांधलेले असून या मंदिराचे भव्य दगडी खांब, सूक्ष्म कोरीवकाम आणि उंच शिखर आहे. दरवर्षी जानेवारी-फेब्रुवारीमध्ये ‘श्री संत मारोती महाराज’ यांच्या नावाने ‘आझाद मैदान’ येथे ‘दही हंडी’ साजरी केली जाते. तसेच श्री संत मारोती महाराज हे घाटंजीचे ग्रामदैवत आहे.लाखो भाविक या ठिकाणी महाराजांच्या दर्शनासाठी येतात.
3) केदारेश्वर महादेव मंदिर-

Kedareshwar Mahadev Temple हे यवतमाळ जिल्ह्यातील पुसद तालुक्यातील पांढुर्णा गावात असलेले प्राचीन आणि प्रसिद्ध शिवमंदिर आहे.या केदारेश्वर मंदिराचे प्रवेशद्वार पश्चिमेकडे असून हे मंदिर सुमारे दीड हजार वर्षांपूर्वीचे हेमाडपंती शैलीत बांधलेले आहे. त्यामुळे हे मंदिर इतर शैव मंदिरांपेक्षा वेगळे आहे.या शिवतीर्थाला पश्चिम वाहिनी पैनगंगा नदी प्रदक्षिणा घालून वाहते. हे पांढुर्णाचे पाच लिंगी शिव मंदिर म्हणजे भक्तांची काशी असे म्हटले जाते.
या मंदिरात हरिहर वेद, संक्रांती दीपमाला, श्रावण महिना, शिवरात्री, काशीकर महाराज पुण्यतिथी, गुरुपौर्णिमा इ. धार्मिक विधी पार पाडले जातात. तसेच या मंदिरात दररोज दीडशे लोकांच्या जीवनाची व्यवस्था केली जाते. केदारेश्वर मंदिर हे यवतमाळ जिल्ह्यातील महत्वाचे धार्मिक स्थळ असल्यामुळे या ठिकाणी भाविक मोठ्या संख्येने दर्शनासाठी येतात.
4) पैनगंगा वन्यजीव अभयारण्य-

Painganga Wildlife Santuary हे यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड तालुक्यातील महत्वाचे अभयारण्य आहे. हे अभयारण्य यवतमाळ जिल्हा आणि नांदेड जिल्हा यांना विभागणाऱ्या पैनगंगा नदीच्या दोन्ही बाजूंस आहे. हे अभयारण्य 1996 साली स्थापन करण्यात आले असून ते 325 चौरस क्षेत्रफळात पसरलेले आहे. या अभयारण्याच्या तिन्ही बाजूला पाणी असलेले हे एकमेव अभयारण्य आहे. या अभयारण्यात प्रामुख्याने साग जास्त प्रमाणात आढळते. तसेच या ठिकाणी उदमांजर, खवले मांजर, रानकुत्रा,चौसिंगा, चिंकारा, काळवीट, लांडगा, रानमांजर,वाघ, बिबट्या, अस्वल, रानडुक्कर, सांबर, चितळ यासारखे वन्यजीव प्राणी आढळतात.
आणि शिक्रा, शिखा सर्प गरुड, हेरॉन,अडई, पांढऱ्या मानेचा करकोचा, कूट,कोतवाल,घनवर,जकाना,पाणकावळा, पाणपिपुली, पारवा, भोरी, या पक्षांच्या प्रजाती पहायला भेटतात. याशिवाय या अभयारण्यात सरपटणारे प्राणी, विविध प्रकारच्या गवतामध्ये कुसळी, खस, तिरकडी, पवण्या, मारवेल इ.गवत पाहायला मिळते. तसेच हे अभयारण्य वाघांसाठी एक महत्त्वाचे कॉरिडॉर आहे. पर्यटकांसाठी या अभयारण्यात जंगल सफारीची सोय आहे.
Visit our website: allindiajourney.com
5) शिरपूर किल्ला-

Shirpur Fort हा यवतमाळ जिल्ह्यातील वणी तालुक्यातील शिरपूर गावी असलेला एक महत्त्वाचा गिरीदुर्ग किल्ला आहे. तसेच या किल्ल्यावर जाताना डोंगरामध्ये काही गुफा पाहायला मिळतात. हा किल्ला गोंड राजांचे वास्तव्य आणि संरक्षणासाठी बांधला असल्याचे इतिहासात पुरावे आहेत. हा किल्ला डोंगरावर असल्यामुळे ट्रेकिंग प्रेमींसाठी आणि इतिहास प्रेमींसाठी हे एक उत्तम ठिकाण आहे. हा किल्ला बालाघाट डोंगररांगेत असून येथे आदिवासी जमाती मोठ्या प्रमाणावर आढळतात. तसेच शिरपूर या ठिकाणी एक प्रसिद्ध शिवमंदिर आहे. यवतमाळ पासून हा किल्ला 40 किलोमीटर अंतरावर आहे.
6)येळाबारा धबधबा-

Yelabara Waterfall हा यवतमाळ जिल्ह्यातील घाटांगी तालुक्यात येळाबारा गावात निसर्ग समृद्धीने बहरलेला धबधबा आहे. हा धबधबा मध्यम उंचीचा असून मोठ्या प्रमाणात पाण्याच्या वेगाने कोसळतो. त्यावेळी या धबधब्याचे नयनरम्य दृश्य पाहण्याजोगे असते. या धबधब्याचा परिसर डोंगररांगा,निसर्गरम्य आणि हिरवाईने नटलेला आहे. व शांत व प्रदूषण मुक्त आहे. आणि निसर्गप्रेमी या ठिकाणी ट्रेकिंग साठी आणि फोटोग्राफी साठी येतात.येळाबारा धबधबा हा यवतमाळ शहरापासून सुमारे 34 किमी अंतरावर आहे.
7) श्री नृसिंह मंदिर-

Nrusih Temple हे यवतमाळ जिल्ह्यातील घाटंजी तालुक्यात अंजी या गावी असलेले प्राचीन व जागृत देवस्थान आहे.1000 वर्षापूर्वीचे हे मंदिर हेमाडपंथी शैलीत बांधलेले असून ते बाराव्या शतकातील आहे. या मंदिरात श्री नृसिंहाची पुरातन मूर्ती असून मूर्तीच्या हातामध्ये शंख, चक्र, गदा आणि पद्म आहेत आणि मांडीवर हिरण्यकश्यपू आहे. आणि पायाजवळ भक्त प्रल्हाद आणि देवीची मूर्ती कोरलेली आहे.व येथील सभा मंडपात कोरीव नक्षीकाम केलेले सुंदर खांब आहेत.
धनत्रयोदशीच्या दिवशी या ठिकाणी किरणोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो.श्री नृसिंह हे यवतमाळ चे ग्रामदैवत असून वर्षभर या ठिकाणी विविध कार्यक्रम केले जातात. तीर्थक्षेत्राचा क दर्जा असलेल्या या ठिकाणाला वैशाख पौर्णिमेला दहा दिवसाचा नृसिंह जयंती महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होतो. या ठिकाणी आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि विदर्भातून भक्त मोठ्या प्रमाणावर येतात. घाटंजी पासून हे ठिकाण तीन किलोमीटर अंतरावर आहे.
8) श्री संत खटेश्वर महाराज मंदिर-

Shree Sant Khateshwar Maharaj Temple हे यवतमाळ जिल्ह्यातील खटेश्वर गावी असलेले धार्मिक तीर्थस्थळ आहे. या ठिकाणी अपंग आणि लूळ्या पांगळ्या जनावरांची आणि कुत्र्यांची सेवा करण्यासाठी भक्तगण येथे येतात. आणि येथून आपल्या गावी जाताना भूतदयेचा संदेश घेऊन जातात. तसेच या मंदिर परिसरात एक तलाव असून त्यामध्ये मासे व जलचर प्राणी मोठ्या प्रमाणात आहेत.
परंतु महाराजांच्या तत्त्वानुसार या तलावात आजही मासेमारी केली जात नाही. खटेश्वर महाराज स्वतः अपंग आणि अधू जनावरांचे पालन पोषण करत असत. या मंदिराला दूर-दूर वरून भाविक मोठ्या प्रमाणात भेट देतात.
9) जगत मंदिर-

Jagat Temple हे यवतमाळ जिल्ह्यातील उमरसरा परिसरात असलेले एक धार्मिक महत्वाचे तीर्थस्थळ आहे. 1976 साली बांधलेले हे मंदिर भगवान विष्णूचे असून या मंदिराचे बांधकाम संगमरवरी दगडांनी बनवलेले आहे.आणि या मंदिराच्या भिंतींवर सुंदर काचेच्या तुकड्यांची सजावट केलेली आहे.या मंदिराच्या आत आणि बाहेरील सजावट खूप सुंदर असल्यामुळे हे ठिकाण पर्यटकांचे आकर्षक पर्यटन स्थळ बनले आहे. या मंदिरामध्ये श्रीकृष्ण–राधे, श्रीविश्णू आणि श्रीराम–सीता यांच्या पवित्र मूर्तीं आहेत. भाविक या मंदिरात मोठ्या प्रमाणात दर्शनाला येतात.
10) संकट मोचन हनुमान मंदिर-

Hanuman Temple हे यवतमाळ जिल्ह्यातील ढुमणापूर या ठिकाणी असलेले प्राचीन, धार्मिक व जागृत तीर्थस्थळ आहे. हे मंदिर 4000 वर्षे जुने असल्याचे स्थानिक लोक सांगतात. तसेच या मंदिरात एक स्वयंभू शिवलिंग आहे. परंतु या शिवलिंगाच्या उत्पत्तीपूर्वीचे हनुमान मंदिर आहे. येथील हनुमान मंदिराचे बांधकाम हे फिरोजाबादचे महाराजा शिवनारायण शर्मा यांनी केले होते. हे मंदिर निसर्गरम्य परिसरात असून भाविक नियमितपणे इथे येत असतात. विशेषता हनुमानजयंती, शनिवार, मंगळवार या वेळेस मंदिरात विविध कार्यक्रम केले जातात. हे मंदिर म्हणजे ढुमणापूरच्या लोकांना वरदानच आहे.
11)जीनातील गणपती मंदिर –

Jinatil Ganpati Temple हे यवतमाळ जिल्ह्यातील धामणगाव रोड जवळ असलेले एक प्रसिद्ध व जागृत देवस्थान आहे. हे मंदिर दहा हजार चौरस फुटाच्या क्षेत्रात बांधलेले असून येथील मंदिर परिसर वेगवेगळ्या फुल झाडांनी सुशोभित करण्यात आला आहे. तसेच या मंदिर परिसरात एक छोटासा बगीचा आहे. ज्यामध्ये गणपतीला आवडणाऱ्या जास्वंद, शमी, मंदार आणि विविध प्रकारची झाडे लावण्यात आले आहेत. 1902 साली धामणगाव येथील भागचंद शेठ यांनी या गणेशाची स्थापना केली.
या मंदिरातील गणेशाची मूर्ती उजव्या सोंडेचे असून अडीच फूट उंच आणि दीड फूट रुंद आहे. या मंदिरात संकष्टी गणेश जयंतीवेळी विविध कार्यक्रम केले जातात. या मंदिरात भाविक मोठ्या प्रमाणात दर्शनाला येतात.
1)जीनातील गणपती मंदिराची स्थापना कोणत्या साली करण्यात आली ?
जीनातील गणपती मंदिराची स्थापना 1902 साली करण्यात आली.
2) यवतमाळ जिल्ह्यातील जगत मंदिर कोणत्या देवाला समर्पित आहे ?
यवतमाळ जिल्ह्यातील जगत मंदिर विष्णु भगवान देवाला समर्पित आहे .
3) यवतमाळ जिल्ह्यातील पैनगंगा अभयारण्य कोणत्या तालुक्यात आहे ?
यवतमाळ जिल्ह्यातील पैनगंगा अभयारण्य उमरखेड तालुक्यात आहे .