भारतभ्रमंती या वेबसाईटवर पहा भारत देशातील प्रत्येक राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे. देवभूमी केरळ राज्यातील तिरुवनंतपुरम / त्रिवेंद्रम जिल्ह्यातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे. तिरुवनंतपुरम जिल्हा हा केरळ राज्याची राजधानी आणि सर्वात मोठे शहर आहे. अरबी समुद्राच्या किनाऱ्यावर आणि सह्याद्रीच्या पश्चिम घाटाच्या कुशीत वसलेला हा जिल्हा समृद्ध सांस्कृतिक वारसा, नयनरम्य समुद्रकिनारे आणि ऐतिहासिक वास्तूंसाठी जगभर प्रसिद्ध आहे. तिरुवनंतपुरम या मल्याळम शब्दाचा शाब्दिक अर्थ ‘भगवान अनंत (विष्णू) यांचे शहर’ असा होतो. येथील श्री पद्मनाभस्वामी मंदिर हे जगातील सर्वात श्रीमंत मंदिर असून भगवान विष्णूच्या अनंत शयनम मुद्रेतील मूर्तीसाठी प्रसिद्ध आहे. तसेच येथील वेलयानी झील ही जिल्ह्यातील सर्वात मोठी गोड्या पाण्याची झील असून ओणम सणाच्या वेळी येथे ‘सर्प नौका शर्यत’ आयोजित केली जाते. पर्यटनाच्या दृष्टीने हा जिल्हा अतिशय समृद्ध आहे. Top 21 places to visit in Trivandrum District
येथील अंचुथेगो किल्ला हा एक ऐतिहासिक ब्रिटीश कालीन किल्ला आहे. या जिल्ह्याची मुख्य भाषा मल्याळम असली तरी येथे इंग्रजी आणि तमिळ भाषाही मोठ्या प्रमाणात बोलल्या जातात. आणि येथे केळीच्या पानावर वाढले जाणारे पारंपरिक शाकाहारी जेवण ‘सद्या’ हे येथील विशेष आकर्षण आहे. या जिल्ह्यात अनेक उच्च दर्जाच्या शैक्षणिक संस्था, विक्रम साराभाई अंतराळ केंद्र, भारतीय अंतराळ विज्ञान आणि तंत्रज्ञान संस्था असल्यामुळे या शहराला ‘ज्ञानाचे माहेरघर’ म्हटले जाते. या जिल्ह्यात तिरुवनंतपुरम, नेयट्टिनकारा, नेदुमंगडू, चिरायिन्कीझू, वर्कला आणि कट्टाकडा हे 6 तालुके असून येथे प्रामुख्याने नारळ, काजू, रबर आणि मसाल्यांचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन होते.
Top 21 places to visit in Trivandrum District
तिरुवनंतपुरम / त्रिवेंद्रम जिल्ह्यातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
1)Shree Padmanabhaswamy Temple-


श्री पद्मनाभस्वामी मंदिर हे केरळच्या तिरुवनंतपुरम (त्रिवेंद्रम) जिल्ह्यातील अत्यंत प्राचीन, प्रसिद्ध आणि जगातील सर्वात श्रीमंत मंदिर आहे. हे मंदिर भगवान विष्णूंचे रूप ‘पद्मनाभस्वामी’ यांना समर्पित असून ‘तिरुवनंतपुरम’ या शहराचे नाव ‘श्री अनंत पद्मनाभ’ यांचे नावावरून पडले आहे. तसेच येथील अथांग संपत्ती आणि रहस्यमय तळघरांमुळे ते जगभर प्रसिद्ध आहे. या मंदिरात भगवान विष्णू हे ‘आदि शेषनागावर’ योगनिद्रा मुद्रेमध्ये विराजमान आहेत. आणि विष्णूंच्या नाभीतून एक कमळ उमललेले आहे व त्यावर ब्रह्मदेव बसलेले आहेत आणि त्यांच्या हाताखाली एक शिवलिंग आहे. हे दृश्य ब्रह्मा, विष्णू आणि महेश (शिव) यांच्या एकतेचे प्रतीक मानले जाते. ही मूर्ती सुमारे 18 फूट लांब असून ती नेपाळच्या गंडकी नदीतून आणलेल्या 12,000 पवित्र शालिग्राम शिळांपासून बनवली आहे. या भव्य मूर्तीचे दर्शन घेण्यासाठी भाविकांना मंदिरातील तीन वेगवेगळ्या दारांमधून पाहावे लागते. या मंदिराची रचना द्रविड आणि केतळ शैलीचे सुंदर मिश्रण असून मंदिराचे 7 मजली उंच असलेले पूर्व गोपुरम कोरीव काम आणि भित्तीचित्रांनी नटलेले आहे. तसेच मंदिरातील विशाल कॉरिडॉरवर 365 नक्काशीदार दगडी खांब आहेत. हे मंदिर आठवड्यातील सर्व दिवस पर्यटकांसाठी उघडे असते.
2)Kuthiramalika Palace –

कुथिरमालिका पॅलेस / पुथेनमालिका पॅलेस हा केरळच्या तिरुवनंतपुरम जिल्ह्यातील, श्री पद्मनाभस्वामी मंदिराजवळील ऐतिहासिक आणि वास्तुकलेचा उत्कृष्ट नमुना असलेला अत्यंत सुंदर दुमजली राजवाडा आहे. पुथेनमालिका पॅलेस म्युझियम म्हणून ओळखला जाणारा हा राजवाडा ब्रिटिशकालीन भारतातील त्रावणकोर संस्थानचे महाराज राजा स्वाति तिरुनाल बालरामा वर्मा यांनी 1840 च्या दशकात बांधला होता. कुथिरमालिका’ म्हणजे “घोड्यांचा राजवाडा” या राजवाड्याच्या मुख्य छताला आधार देणाऱ्या लाकडी बीमवर 122 हसणारे घोडे अत्यंत सुंदररीत्या कोरलेले आहेत. सध्या या राजवाड्याचा काही भाग संग्रहालयात रूपांतरीत केला आहे. त्यामध्ये राजेशाही शस्त्रे, तलवारी आणि भाले, हस्तिदंतापासून बनवलेली सिंहासने, फर्निचर, राजांना मिळालेल्या दुर्मिळ भेटवस्तू आणि जुनी चित्रे, बेल्जियमच्या काचेचे झुंबर आणि स्फटिकाच्या वस्तू, व दुर्मिळ कलाकृती ठेवल्या आहेत. दरवर्षी जानेवारी महिन्यात येथे आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रसिद्ध असलेला ‘स्वाती संगीत उत्सव’ आयोजित केला जातो.
3)Kovalam Beach-


कोवलम बीच हा केरळच्या तिरुवनंतपुरम जिल्ह्यातील, अरबी समुद्राच्या किनाऱ्यावर वसलेला एक आंतरराष्ट्रीय ख्यातीचा अर्धचंद्राकृती समुद्रकिनारा आहे. हा बीच तीन सुंदर अर्धचंद्राकृती समुद्रकिनाऱ्यांसाठी जगभर प्रसिद्ध आहे. पर्यटकांना येथे पोहणे, सूर्यस्नान, स्पा ट्रीटमेंट, पारंपारिक आयुर्वेदिक मसाज आणि वॉटर स्पोर्ट्सचा आनंद घेता येतो. येथील विझिंजम दीपगृहावरून समुद्रकिनाऱ्याचे विहंगम दृश्य दिसते. आणि येथील हवा बीच / इव्हज बीच हा किनारा मासेमारी करणाऱ्या स्थानिक नौकांचे विहंगम दृश्य पाहण्यासाठी, शांत वातावरणासाठी आणि निसर्गरम्य दृश्यांसाठी ओळखला जातो. 1920 च्या दशकात त्रावणकोरच्या राजमाता महाराणी सेथू लक्ष्मी बाई यांनी येथे ‘हॅल्सियन कॅसल’ नावाचे रिसॉर्ट बांधले आहे.
4)Napier Museum-




नेपियर संग्रहालय हे केरळच्या तिरुवनंतपुरम शहराच्या मध्यभागी असलेले कला आणि नैसर्गिक इतिहास संग्रहालय आहे. या संग्रहालयाची स्थापना त्रावणकोरच्या महाराजांनी 1855 मध्ये केली होती. हे संग्रहालय मद्रासचे माजी गव्हर्नर लॉर्ड नेपियर यांच्या नावावरून ओळखले जाते. या संग्रहालयाची वास्तुकला इंडो-सारासेनिक, गॉथिक, केरळ, मुघल आणि चिनी शैलींचे सुंदर मिश्रण आहे. येथे दुर्मिळ कांस्य आणि दगडी शिल्पे, हस्तिदंती कोरीवकाम, प्राचीन दागिने, मंदिरांचे रथ आणि रामायण-महाभारतावर आधारित जावानीज सावलीच्या चामड्याच्या बाहुल्यांचा दुर्मिळ संग्रह आहे. तसेच संग्रहालयाच्या आवारातच देशातील सर्वात जुने त्रिवेंद्रम प्राणीसंग्रहालय आणि श्री चित्रा आर्ट गॅलरी आहे. हे संग्रहालय तिरुवनंतपुरम प्राणीसंग्रहालयाच्या आवारात असून 1857 मध्ये 55 एकर जमिनीवर स्थापन करण्यात आले होते.
Visit our website: allindiajourney.com
5)Neyyar Wildlife Sanctuary-





नेय्यर वन्यजीव अभयारण्य हे केरळच्या तिरुवनंतपुरम जिल्ह्यातील, पश्चिम घाटाच्या पायथ्याशी अगस्त्यमलाई टेकड्यांजवळ पसरलेले व जैवविविधतेने बहरलेले अभयारण्यआहे. 128 चौरस किलोमीटर क्षेत्रात पसरलेले हे अभयारण्य अगस्त्यमलाई बायोस्फीअर रिझर्व्हचा एक भाग असून येथे नेय्यर, मुल्लायर आणि कल्लार या तीन नद्यांच्या संगमावर बांधलेले नेय्यर धरण एक उत्तम पिकनिक स्पॉट आहे. तसेच येथील 1977 मध्ये सुरू झालेले मगरींचे पालन केंद्र, वॉच टॉवर, लायन सफारी व हरण पार्क आहेत. या अभयारण्यात हत्ती, निलगिरी तहर, सांबर, अस्वल आणि विविध प्रकारचे साप व पक्षी आढळतात. आणि येथील समुद्रसपाटीपासून 1868 मीटर उंच असलेले अगस्त्यमलाई शिखर ट्रेकर्ससाठी अत्यंत लोकप्रिय आहे.
6)Poovar Backwater-







पूवर बॅकवॉटर हे केरळच्या तिरुवनंतपुरम जिल्ह्यातील, दक्षिण टोकावर वसलेले स्वच्छ समुद्रकिनारे, शांत खाड्या आणि निवांत नौकाविहाराचा एक चित्तथरारक संगम आहे. सोनेरी वाळू असलेला पूवार बीच हे एक छुपे रत्न असून हे ठिकाण नेय्यार नदी अरबी समुद्राला जिथे मिळते तिथे वसलेले आहे. येथे शांत खाड्या, हिरवीगार खारफुटीची वने आणि विविध प्रकारच्या वनस्पती व प्राणी आहेत. पर्यटकांना येथे पक्षी निरीक्षण व खारफुटीच्या दाट जंगलातून, शांत पाण्यातून नौकाविहार करताना किनारपट्टीवरील गावातील जीवनाची झलक पाहायला मिळते. येथे किंगफिशर, रातबगळा, समुद्री बगळा, काळा पाणकावळा आणि विविध प्रकारचे पक्षी असल्यामुळे हे ठिकाण निसर्गप्रेमी आणि छायाचित्रकारांसाठी एक स्वर्ग आहे. राजधानीपासून हे ठिकाण 35 किमी अंतरावर
आहे.
7)Kanakakkunnu Palace Museum-






कनकाकुन्नू पॅलेस हा केरळच्या तिरुवनंतपुरम शहराच्या मध्यभागी एका छोट्या टेकडीवर वसलेला एक ऐतिहासिक आणि अत्यंत सुंदर राजवाडा आहे. या राजवाड्याची निर्मिती 19 व्या शतकात त्रावणकोरचे राजा श्री मूलम थिरुनल महाराज यांनी केली होती आणि याचा वापर त्रावणकोर राजांचे ‘अतिथीगृह’ म्हणून केला जायचा. या राजवाड्याच्या वास्तुकलेत केरळची पारंपरिक शैली आणि गॉथिक व व्हिक्टोरियन वास्तुकलेचा सुरेख संगम पाहायला मिळतो. तसेच येथे सुंदर स्फटिकांचे झुंबर आणि शाही फर्निचरचा उत्कृष्ट संग्रह आहे. या पॅलेसच्या आवारात वनस्पतिशास्त्र विभागाने विकसित केलेले भारतातील पहिले डिजिटल उद्यान असून येथील झाडांवर QR Codes लावण्यात आले आहेत. पर्यटकांनी मोबाईलने ते स्कॅन केल्यास त्या वनस्पतीचे शास्त्रीय नाव, प्रजाती आणि इतर माहिती सहज मिळते. या राजवाड्याच्या परिसरात निशगंधी ओपन-एअर ऑडिटोरियम व सूर्यकंथी ऑडिटोरियम ही दोन मोठी सभागृहे आहेत, जिथे वर्षभर विविध कार्यक्रम होतात. आणि या राजवाड्याच्या जवळच प्रसिद्ध ‘नेपियर म्युझियम’ आणि ‘त्रिवेंद्रम प्राणीसंग्रहालय’ आहे.
8)Thiruvananthapuram / Trivandrum Zoo-


तिरुवनंतपुरम / त्रिवेंद्रम प्राणीसंग्रहालय हे केरळच्या तिरुवनंतपुरम शहराच्या मध्यभागी वसलेले भारतातील पहिल्या प्राणिसंग्रहालयांपैकी एक आहे. हे प्राणीशास्त्र उद्यान 55 एकरच्या निसर्गरम्य आणि हिरव्यागार परिसरात पसरले असून याची स्थापना 1859 मध्ये त्रावणकोरचे महाराज उथरम थिरुनाल मार्तंड वर्मा यांच्या काळात झाली. या उद्यानात देश-विदेशातील 100 पेक्षा जास्त प्रजातींचे प्राणी, पक्षी आणि सरपटणारे जीव पाहायला मिळतात. आणि हिंस्त्र प्राण्यांमध्ये रॉयल बंगाल वाघ, आशियाई सिंह, बिबट्या, आशियाई हत्ती, भारतीय गेंडा, निलगिरी लंगूर आणि दुर्मिळ सिंह-पुच्छ मकाक, साप, अजगर आणि प्रसिद्ध अनाकोंडा देखील पाहायला मिळतात. याशिवाय येथे विविध प्रजातींचे विदेशी पक्षी आणि गिधाड पाहायला मिळतात. सध्या हे उद्यान वन्यजीव संवर्धन आणि शैक्षणिक केंद्र बनले असून येथील नैसर्गिक परिसर आणि तलाव पर्यटकांना आकर्षित करतात.
9)Anjengo Fort / Anchuthengu Fort, Light House-



अंजेंगो किल्ला आणि दीपगृह हे केरळच्या तिरुवनंतपुरम जिल्ह्यातील, ऐतिहासिक आणि प्रेक्षणीय ठिकाण आहे. हे ठिकाण अंचुथेंगू या किनारपट्टीच्या गावात वसलेले असून, वर्कला समुद्रकिनाऱ्याजवळ आहे. मल्याळम भाषेत ‘अंचुथेंगू’ म्हणजे ‘पाच नारळांची झाडे’. अंजेंगो किल्ला हा ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने 1695/1699 दरम्यान बांधला होता. इंग्रजांची येथे कायमस्वरूपी व्यापारी वसाहत आणि लष्करी तळ होता. या किल्ल्याच्या परिसरात 1721 मध्ये केरळमधील ब्रिटिश राजवटीविरुद्धचा पहिले यशस्वी प्रसिद्ध ‘अटिंगल बंड’ झाले होते. हा किल्ला चौरस आकाराचा असून त्याच्या चार कोपऱ्यांवर मजबूत बुरुज आहेत. आणि किल्ल्याच्या आवारात एक जुनी ब्रिटिश स्मशानभूमी आहे. या किल्ल्याच्या अगदी जवळच 130 फूट उंचीचा एक भव्य गोल काँक्रीटचा दीपगृह (लाईट हाऊस) आहे. पूर्वीच्या काळात ब्रिटीश जहाजांना मार्ग दाखवण्यासाठी हे एक प्रमुख सिग्नलिंग स्टेशन म्हणून कार्यरत होते. 1988 मध्ये येथे आधुनिक दीपगृहाची स्थापना करण्यात आली आहे. या दीपगृहाच्या वर 250 पायऱ्या चढून गेल्यानंतर अरबी समुद्र, वामनपुरम नदी, अंजेंगो किल्ला आणि आजूबाजूच्या नारळाच्या बागांचे विहंगम दृश्य पाहायला मिळते.
10)Ponmudi Hills –






पोनमुडी हे केरळच्या तिरुवनंतपुरम जिल्ह्यातील, जैवविविधतेने बहरलेले आणि चहाच्या बागांनी वेढलेले नयनरम्य आणि लोकप्रिय थंड हवेचे ठिकाण आहे. हे ठिकाण पश्चिम घाटाच्या पर्वतरांगांमध्ये समुद्रसपाटीपासून सुमारे 1,100 मीटर उंचीवर वसलेले आहे. पोनमुडीचा अर्थ मल्याळम भाषेत ‘सुवर्ण शिखर’ असा होतो. येथील मुख्य आकर्षणे म्हणजे धुक्याची दरी, आणि कल्लार नदीच्या काठावर असलेली गोल्डन व्हॅली, ही शांत प्रवाह, गोल गोटे आणि पोहण्यासाठी सुरक्षित आहे. तसेच येथील खडकाळ भागातून अनेक धबधबे वाहतात त्यापैकी मीनमुट्टी धबधबा हा एक स्वच्छ पाण्याचा नयनरम्य धबधबा आहे. याशिवाय येथील पेप्पारा वन्यजीव अभयारण्य हे वन्यजीव प्रेमींसाठी उत्तम ठिकाण असून येथे विविध प्रकारचे पक्षी, हरीण आणि बिबट्यांचे नैसर्गिक वास्तव्य पाहायला मिळते. पर्यटकांसाठी पोनमुडी हे ट्रेकिंगसाठी एक आदर्श ठिकाण मानले जाते.
11)Akkulam Lake & Tourist Village –






अक्कुलम तलाव आणि टुरिस्ट व्हिलेज हे केरळच्या तिरुवनंतपुरम जिल्ह्यातील एक अत्यंत प्रसिद्ध आणि शांत पिकनिक स्पॉट आहे. येथील अक्कुलम तलाव हा एक सुंदर आणि विस्तीर्ण वेम्बनाड तलावाचाच एक भाग आहे, जिथे पर्यटकांना शांत बॅकवॉटरचा आनंद घेता येतो. आणि या तलावाच्या काठावर सुमारे 8 हेक्टर क्षेत्रावर अक्कुलम हे सुंदर गाव आणि बागा पसरलेल्या आहेत. येथे ‘अक्कुलम बोट क्लब’ तर्फे पर्यटकांना स्पीड बोट, पेडल बोट आणि रोईंग बोटिंगचा आनंद घेता येतो. तसेच येथे चिल्ड्रन्स पार्क, 80 मीटर लांबीचा काचेचा पूल भारण्यात आला आहे. संध्याकाळच्या वेळी पर्यटकांच्या मनोरंजनासाठी येथे संगीतमय कारंजे आणि सुंदर प्रकाशयोजना पाहायला मिळते. आणि या ठिकाणापासून जवळच आशियातील सर्वात मोठ्या मॉल्सपैकी एक असलेला प्रसिद्ध लुलु मॉल आहे.
12)Magic Planet-




मॅजिक प्लॅनेट हे केरळच्या तिरुवनंतपुरम जिल्ह्यातील, कझाकुटम येथील जगातील पहिले जादूवर आधारित थीम पार्क आहे. हे पार्क किन्फ्रा फिल्म आणि व्हिडिओ पार्क परिसरात उभारण्यात आले आहे. येथे भारतातील लुप्त होत चाललेली पारंपारिक रस्त्यावरील जादू आणि सर्कस कलांचे जतन करणे हा या पार्कचा मुख्य उद्देश आहे. येथे रस्त्यावरील जादूगार “इंडियन मँगो मिस्ट्री” सारखे जुने लोकप्रिय चमत्कार लाइव्ह सादर करतात. आणि सर्कस कॅसल येथे अंगावर काटा आणणारे थरारक ऍक्रोबॅटिक्स स्टंट्स आणि विविध कला सादर केल्या जातात. येथील “डिफरंट आर्ट सेंटर’ मध्ये विशेष दिव्यांग मुले स्वतः जादू, नृत्य, संगीत आणि नाटक सादर करतात. दिवसभर येथे लहान-मोठे विविध शोज सुरू असल्यामुळे पर्यटकांचे सतत मनोरंजन होते. तसेच येथे जादूच्या मागे नेमकी काय ट्रिक्स असतात, हे जाणून घेण्यासाठी आणि काही युक्त्या स्वतः करून पाहता येतात.
13)Peppara Wildlife Sanctuary-






पेप्पारा वन्यजीव अभयारण्य हे केरळच्या तिरुवनंतपुरम जिल्ह्यातील, समृद्ध जैवविविधतेने नटलेले संरक्षित वनक्षेत्र आहे. या अभयारण्याची स्थापना 1983 मध्ये झाली. व येथील करमना नदीवर बांधण्यात आलेल्या पेप्पारा धरणाच्या पाणलोट क्षेत्राचे पर्यावरणीय महत्त्व लक्षात घेऊन या परिसराला अभयारण्य घोषित करण्यात आले. हे अभयारण्य 53 चौरस किलोमीटर क्षेत्रात पसरलेले असून पोनमुडी हिल स्टेशनच्या वाटेवर आहे. येथे उष्णकटिबंधीय सदाहरित जंगले, निम-सदाहरित जंगले, ओलसर मिश्र पानझडी जंगले आणि दलदलीची जंगले आहेत. तसेच हे अभयारण्य विविध प्रकारच्या प्राण्यांचे आणि पक्ष्यांचे सुरक्षित निवासस्थान असून येथे पक्ष्यांच्या 233 पेक्षा जास्त प्रजाती, सरपटणाऱ्या प्राण्यांच्या 46 प्रजातींची नोंद झाली आहे. वन्यजीवांमध्ये येथे आशियाई हत्ती, बिबट्या, वाघ, सांबर, आळशी अस्वल, निलगिरी लंगूर आणि दुर्मिळ सिंहाच्या शेपटीचा मकाक आढळतो. येथील करमना नदीवर बांधलेले पेप्पारा धरण, चेम्मुनजीमोट्टाई हे 1717 मीटर सर्वात उंच शिखर आणि या अभयारण्याजवळ असलेला वाझवानथोल धबधबा हे पर्यटकांचे मुख्य आकर्षण आहे.
14)Veli Tourist Village-




वेली टुरिस्ट व्हिलेज हे केरळच्या तिरुवनंतपुरम जिल्ह्यातील, वेली तलाव आणि अरबी समुद्राच्या संगमावर वसलेले एक अतिशय सुंदर, निसर्गरम्य आणि शांत पिकनिक स्पॉट आहे. येथील वेली तलावावर बांधलेला फ्लोटिंग ब्रिज (तरंगता पूल) पर्यटकांना थेट वेली बीचवर घेऊन जातो. तसेच, येथे तलावात तरंगणारे फ्लोटिंग कॅफेमध्ये पारंपरिक केरळी खाद्यपदार्थ आणि सी-फूडची चव घेता येते. वेली तलावाच्या शांत पाण्यात पर्यटक स्पीड बोट, पेडल बोट, रो बोट आणि सफारी बोटिंगचा आनंद घेतात. तसेच येथे भारतातील पहिली सौरऊर्जेवर चालणारी मिनिएचर ट्रेन, चिल्ड्रन्स पार्क व बाग आहे. या उद्यानात विख्यात शिल्पकार कानाई कुन्हीरामन यांनी घडवलेले विशाल शंखाचे शिल्प आणि इतर दगडी शिल्पे पाहण्यासारखी आहेत.
15)Shree Chitra Art Gallery-





श्री चित्रा आर्ट गॅलरी ही केरळच्या तिरुवनंतपुरम जिल्ह्यातील, एक प्रसिद्ध आणि ऐतिहासिक कलादालन आहे. या गॅलरीची स्थापना 1935 मध्ये त्रावणकोरचे महाराजा श्री चिथिरा थिरुनल बलराम वर्मा यांनी केली होती. आणि गॅलरीचे डिझाइन व चित्रांचे संकलन विद्वान डॉ. जे. एच. कझिन्स यांनी केले होते. या गॅलरीमध्ये राजा रवि वर्मा यांच्या मूळ चित्रांचा संग्रह व जगप्रसिद्ध तेलचित्रे जसे की ‘शकुंतला’ आणि ‘दमयंती व स्वान’ येथे पाहायला मिळतात. याशिवाय या गॅलरीत सुमारे 1,100 पेक्षा जास्त दुर्मिळ चित्रे, राजा रविवर्मा, स्वेतलोवा आणि निकोलस रोरीच यांची मूळ चित्रे, मुघल, राजपूत, तंजावर, राजस्थानी आणि बंगाल स्कूल ऑफ आर्ट्समधील उत्कृष्ट लघुचित्रे येथे आहेत. चीन, जपान, तिबेट (थांगका चित्रे) आणि बाली (इंडोनेशिया) येथील पारंपारिक चित्रांचा अनोखा संग्रह आहे. ही गॅलरी नेपियर म्युझियम आणि प्राणीसंग्रहालयाच्या आवारात आहे.
16)Attukal Bhagavathy Temple-



अट्टुकल भगवती मंदिर हे केरळच्या तिरुवनंतपुरम जिल्ह्यातील, प्रसिद्ध आणि जागृत देवस्थान आहे. हे मंदिर देवी भद्रकाली (कन्नकी) ला समर्पित असून, ‘महिलांचे शबरीमला’ म्हणून ओळखले जाते. या मंदिरातील मुख्य देवता भद्रकाली वेताळावर आरूढ असून येथे देवीची पूजा महासरस्वती, महालक्ष्मी आणि महाकाली/दुर्गा (शक्ती) अशा तीन रूपांमध्ये केली जाते. पौराणिक कथेनुसार, ही देवी तमिळ महाकाव्य ‘सिलाप्पतीकरम’ मधील न्यायप्रिय नायिका कन्नगीचा अवतार मानली जाते. या मंदिराची रचना केरळ आणि तमिळ वास्तुकलेचे उत्कृष्ट मिश्रण असून मंदिराच्या प्रवेशद्वारावर कन्नकीच्या जीवनातील कथा आणि भगवान विष्णूचे दशावतार सुंदरपणे कोरलेले आहेत. येथील ‘अट्टुकल पोंगला’ हा मंदिराचा 10 दिवसांचा वार्षिक उत्सव असून या उत्सवाच्या नवव्या दिवशी, कोट्यवधी स्त्रिया महिला एकत्र येऊन मातीच्या भांड्यात देवीसाठी ‘पोंगला’ (तांदूळ, गूळ आणि तूप यापासून बनवलेला गोड भात) तयार करतात. धार्मिक कार्यासाठी एकत्र येण्याचा हा जगातील सर्वात मोठा मेळावा ठरला असून याची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स मध्ये झाली आहे.
17)Vellayani Lake-




वेल्लयानी तलाव हा केरळच्या तिरुवनंतपुरम जिल्ह्यातील, आणि केरळमधील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे गोड्या पाण्याचे सरोवर आहे. हा तलाव ‘वेल्लयानी कायल’ म्हणूनही ओळखला जातो. हे सरोवर सुमारे 7.5 चौरस किमी क्षेत्रावर पसरलेले असून या भागातील पिण्याच्या पाण्याचा आणि शेतीच्या सिंचनाचा हा एक मुख्य स्त्रोत आहे. या तलावाचे पाणी अतिशय शांत आहे. व सरोवराच्या पृष्ठभागावर मोठ्या प्रमाणात उमललेली गुलाबी कमळाची फुले हे येथील प्रमुख आकर्षण आहे. पर्यटकांना या तलावामध्ये बोटिंगने शांत पाण्यातून फिरताना सभोवतालच्या हिरवळीचा आनंद घेता येतो. आणि तलावाशेजारील पंचकारी-वेल्ल्यानी पाणथळ जागा पक्षीप्रेमींसाठी नंदनवन आहे. ओणम सणादरम्यान या तलावामध्ये प्रसिद्ध ‘स्नेक बोट रेस’ आयोजित केली जाते.
18)Aruvikkara Dam-


अरुविक्कारा धरण हे केरळच्या तिरुवनंतपुरम जिल्ह्यातील, अरुविक्कारा येथे करमना नदीच्या काठावर बांधलेले प्रसिद्ध आणि निसर्गरम्य ठिकाण आहे. या धरणाचा उपयोग सिंचन आणि तिरुवनंतपुरम शहराला पिण्याच्या पाण्याचा पुरवठासाठी केला जातो. हे एक गुरुत्वाकर्षण आणि दगडी पद्धतीचे धरण असून याचे बांधकाम 1972 मध्ये पूर्ण झाले. या धरणाच्या जवळ एका खडकावर प्राचीन दुर्गा मंदिर आहे व मंदिराच्या शेजारून वाहणाऱ्या ओढ्यामध्ये मोठ्या संख्येने मासे आढळतात. येथील माशांना पवित्र मानले जाते. या धरणाच्या जलाशयामध्ये पर्यटकांसाठी नौकाविहाराची सोय असून आजूबाजूला असलेल्या घनदाट हिरवाईमुळे हे ठिकाण पर्यटकांना आकर्षित करते. तसेच धरणाच्या परिसरात एक सुंदर बाग आणि कृत्रिम धबधबा आहे.
19)Kowdiar Palace-


कोवडियार पॅलेस हा केरळच्या तिरुवनंतपुरम जिल्ह्यातील, त्रावणकोर राजघराण्याचे अधिकृत निवासस्थान आहे. हा राजवाडा 1934 मध्ये त्रावणकोरचे राजे श्री चित्रा थिरुनल बलराम वर्मा यांनी त्यांच्या बहिणीच्या (महाराणी कार्तिक थिरुनल लक्ष्मीबाई) आणि लेफ्टनंट कर्नल जी.व्ही. राजा यांच्या विवाहाच्या निमित्ताने हा राजवाडा बांधला होता. या राजवाड्याची वास्तूकला अत्यंत भव्य व सुंदर आहे. आजही त्रावणकोर राजघराण्याचे वंशज या राजवाड्यात राहतात, हा राजवाडा पारंपारिक केरळ आणि द्रविड स्थापत्य शैलीचे एक उत्कृष्ट मिश्रण असून त्यामध्ये लाकडाचा मोठ्या प्रमाणावर वापर करण्यात आला आहे. या तीन मजली राजवाड्यात 150 खोल्या व राजवाड्याच्या इमारतीवर 6 भव्य शिखरे आहेत. तसेच, या वास्तूमध्ये त्या काळातील लाकडापासून बनवलेली एक ऐतिहासिक लिफ्ट आहे.आणि राजवाड्याच्या परिसरात सुंदर बागा आणि विस्तीर्ण हिरवळ आहे.
20)Pazhavangadi Shree Maha Ganapathy Temple-


पझवांगडी श्री महागणपती मंदिर हे केरळच्या तिरुवनंतपुरम जिल्ह्यातील, प्रसिद्ध आणि लोकप्रिय गणेश मंदिर आहे. हे मंदिर ‘ईस्ट फोर्ट’ भागात श्री पद्मनाभस्वामी मंदिराच्या जवळ आहे. व येथील मुख्य मूर्ती काळ्या पाषाणाची असून, गणेशाचा उजवा पाय दुमडून बसलेल्या मुद्रेत आहे. या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे या मंदिराची देखभाल आणि व्यवस्थापन भारतीय लष्कराच्या मद्रास रेजिमेंटद्वारे केले जाते. या मंदिराच्या वास्तुकलेमध्ये आणि भिंतींवर भगवान गणेशाची 32 विविध रूपे शिल्पांच्या माध्यमातून अतिशय सुंदरपणे कोरलेली आहेत. व मंदिराचे बांधकाम पारंपारिक केरळ स्थापत्यशैलीत केले असून, त्यात लाकूड, दगड आणि सुंदर चित्रांचा वापर करण्यात आला आहे. गणपतीशिवाय या मंदिरात देवी दुर्गा, भगवान धर्मशास्ता (अयप्पा), नागराज आणि ब्रह्मराक्षस यांच्याही मूर्ती आहेत. या मंदिरात नारळ फोडणे हा प्रसाद आणि नवस मानला जातो. आणि गणपतीचा आवडीचा मोदक आणि वडामाला देवाला अर्पण केली जाते.
21)Vizhinjam Rock-cut Cave Temple-

विझिंजम रॉक-कट गुहा शिव मंदिर हे केरळच्या तिरुवनंतपुरम जिल्ह्यातील, प्राचीन आणि ऐतिहासिक मंदिर आहे. 8 व्या शतकातील हे गुहा मंदिर एकाच अखंड ग्रॅनाइट खडकात कोरलेले असून प्राचीन दक्षिण भारतीय वास्तुकलेचा एक उत्कृष्ट नमुना आहे. दक्षिण केरळवर राज्य करणाऱ्या ‘आय’ राजवंशाच्या कारकिर्दीत या गुहेची निर्मिती झाली. त्यावेळी विझिंजम ही आय राजांची राजधानी होती. 1965 पासून हे मंदिर भारतीय पुरातत्व सर्वेक्षण अंतर्गत एक केंद्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित करण्यात आले आहे. या मंदिराची वास्तुकला द्रविड आणि पल्लव/पांड्य कालीन स्थापत्यकलेचा उत्तम नमुना आहे. गुहेच्या आतील गर्भगृहात भगवान शिवाचे ‘विनाधारा दक्षिणामूर्ती’ रूपातील शिल्प बसलेल्या मुद्रेत कोरलेले आहे. तसेच गुहेच्या बाहेरील भिंतींवर देवादिकांची सुंदर पण अपूर्ण शिल्पे पाहायला मिळतात. आणि डावीकडे भगवान शिव धनुष्यबाण हातात घेतलेले ‘त्रिपुरांतक’ रूप कोरलेले आहे, ज्यांच्या डाव्या पायाखाली राक्षस दर्शवला आहे. या मंदिरापासून जवळच कोवलम समुद्रकिनारा विझिंजम सागरी मत्स्यालय आणि आंतरराष्ट्रीय बंदर आहे.
1)नेय्यार वन्यजीव अभयारण्य कशासाठी प्रसिद्ध आहे?
नेय्यार वन्यजीव अभयारण्य हे सस्तन प्राणी, पक्षी, सरपटणारे प्राणी आणि उभयचर प्राण्यांच्या अनेक प्रजातींचे निवासस्थान व वन्यजीव प्रेमींसाठी एक स्वर्ग आहे.
2)करिक्काकोम श्री चामुंडी देवी मंदिर हे कशामुळे प्रसिद्ध आहे?
केरळमधील करिक्काकोम श्री चामुंडी देवी मंदिरात देवी चामुंडीची श्री चामुंडी, रक्तचामुंडी आणि बालचामुंडी अशा तीन रूपांमध्ये पूजा केली जाते.
3)तिरुवनंतपुरम जिल्ह्यातील, नेपियर संग्रहालयाचे वैशिष्ट्य काय आहे?
नेपियर संग्रहालयात पुरातत्वीय आणि ऐतिहासिक कलाकृती, कांस्य मूर्ती, प्राचीन दागिने, जावानीज छायानाट्याच्या चामड्याच्या बाहुल्यांच्या संग्रह, एक मंदिराचा रथ आणि हस्तिदंती कोरीवकाम यांचा दुर्मिळ संग्रह आहे.


