पथानामथिट्टा जिल्ह्यातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे- 21 places to visit in Pathanamthitta District

भारतभ्रमंती या वेबसाईटवर पहा भारत देशातील प्रत्येक राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यातील संपूर्ण पर्यटन स्थळे. देवभूमी केरळ राज्यातील पथानामथिट्टा जिल्ह्यातील संपूर्ण पर्यटन स्थळे. पठाणमथिट्टा हा दक्षिण केरळमधील एक प्रमुख जिल्हा आहे. आणि ‘केरळची तीर्थक्षेत्र राजधानी’ म्हणून ओळखला जातो. या जिल्ह्याची स्थापना 1 नोव्हेंबर 1982 रोजी झाली असून त्याचे प्रशासकीय केंद्र पठाणमथिट्टा शहरात आहे. या जिल्ह्याच्या पूर्वेस पश्चिम घाट, पश्चिमेस अलाप्पुझा, उत्तरेस कोट्टायम व इडुक्की आणि दक्षिणेस कोल्लम जिल्हे आहेत. 21 places to visit in Pathanamthitta District

तसेच या जिल्ह्यात एकूण तिरुवल्ला, मल्लाप्पल्ली, रन्नी, कोझेनचेरी, अदूर आणि कोन्नी हे 6 तालुके असून या जिल्ह्याचा 50% पेक्षा जास्त भाग घनदाट जंगलांनी व्यापलेला आहे. येथील अर्थव्यवस्था प्रामुख्याने शेतीवर आधारित आहे. व रबर, नारळ आणि मसाल्यांचे पदार्थ हे प्रमुख पिके आहेत.हा जिल्हा मंदिरे, नद्या, जल उत्सव आणि ‘वास्तु विद्या गुरुकुलम’ सारख्या वारसा स्थळांसाठी ओळखला जातो. आणि मन्नाडी येथील केरळ इन्स्टिट्यूट ऑफ फोकलोर अँड फोक आर्ट्स हे स्थानिक संस्कृतीचे जतन करणारे केंद्र आहे.

21 places to visit in Pathanamthitta District

पथानामथिट्टा जिल्ह्यातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे

1) Kaviyoor / Thrikkariyoor Mahadeva Temple-

Top 21 places to visit in Pathanamthitta District

कवियुर महादेव मंदिर किंवा थ्रिक्कवियुर महादेव मंदिर हे केरळच्या पथानामथिट्टा जिल्ह्यातील, तिरुवल्ला शहराजवळ कवियूर येथे मणिमला नदीच्या काठी वसलेले प्राचीन व प्रसिद्ध धार्मिक स्थळ आहे. हे मंदिर 8 व्या शतकातील असून, येथे भगवान शिव आणि माता पार्वती यांची पूजा केली जाते. येथील मूर्तीला ‘थ्रिक्कवियूरप्पन’ असे संबोधले जाते.तसेच मंदिराच्या आवारात हनुमानाचे एक प्रसिद्ध मंदिर आहे. जे पल्लव शैलीतील दुर्मिळ पाषाण कोरीव कामासाठी ओळखले जाते. दरवर्षी येथे थिरुवुत्सवम’ हा वार्षिक उत्सव डिसेंबर/जानेवारी मध्ये 10 दिवस मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. सध्या हे मंदिर पुरातत्व विभागाद्वारे संरक्षित स्मारक म्हणून घोषित करण्यात आले आहे.

2)Sabarimala Sree Ayyappa Temple-

शबरीमाला श्री अय्यप्पा मंदिर हे केरळच्या पथानामथिट्टा जिल्ह्यातील, पश्चिम घाटाच्या डोंगररांगांमध्ये वसलेले एक अत्यंत पवित्र, प्रसिद्ध व प्राचीन पर्वतीय तीर्थक्षेत्र आहे. हे मंदिर भगवान अयप्पा (धर्मशास्ता किंवा हरिहरपुत्र) यांना समर्पित असून पेरियार व्याघ्र प्रकल्पाच्या घनदाट जंगलात, समुद्रसपाटीपासून सुमारे 4133 फूट उंचीवर एका टेकडीवर आहे.’शबरीमाला’ या शब्दाचा अर्थ रामायणातील प्रभू रामाची भक्त शबरी हिच्याशी आहे. या मंदिराच्या गाभाऱ्यापर्यंत पोहोचण्यासाठी भाविकांना 18 सुवर्ण पायऱ्या चढून जावे लागते. मंदिराच्या जवळ ‘वावरू नाडा’ हे स्थान आहे, जे भगवान अयप्पांचे मित्र वावर (एक मुस्लिम संत) यांना समर्पित असून हिंदू-मुस्लिम सलोख्याचे प्रतीक मानले जाते. यात्रेला जाण्यापूर्वी भाविकांना 41 दिवसांचे कठोर ‘मंडलम’ व्रत पाळावे लागते, आणि भक्त आपल्या डोक्यावर एक पोटली घेऊन येतात, ज्याला ‘इरुमुडी’ म्हणतात. यात नारळ, तूप आणि इतर पूजेचे साहित्य असते. तसेच मकरविलक्कू आणि मकरज्योती यासाठी मकर संक्रांतीच्या वेळी येथे ‘मकरज्योती’चे दर्शन घेण्यासाठी जगभरातून लाखो भाविक येतात.

3)Gavi-

गवी हे केरळच्या पठाणमथिट्टा जिल्ह्यात वसलेले एक प्रसिद्ध आणि निसर्गरम्य ‘इको-टूरिझम’ प्रकल्प आहे. समुद्रसपाटीपासून 1036 मीटर उंचीवर असलेले हे ठिकाण सह्याद्रीच्या (पश्चिम घाट) रांगांमध्ये लपलेले एक अप्रतिम नंदनवन आहे. हे ठिकाण केरळ वन विकास महामंडळाच्या (KFDC) अंतर्गत येते. आणि ‘पेरियार व्याघ्र प्रकल्पाचा’ भाग असून येथे हत्ती, निलगिरी ताहर आणि सिंहपुच्छ माकड यांसारखे दुर्मिळ प्राणी आढळतात. तसेच पक्षीप्रेमींसाठी हे एक उत्तम ठिकाण आहे. येथे पक्ष्यांच्या 320 पेक्षा जास्त प्रजाती आढळतात. घनदाट सदाहरित जंगलानी वेढलेले हे ठिकाण तलाव, टेकड्या जंगले, वन्यजीव, जलाशय आणि निसर्ग सौंदर्यासाठी प्रसिद्ध आहे व ट्रेकिंग, हिरव्यागार जंगलातून जीप सफारी आणि कॅम्पिंगसाठी उत्तम ठिकाण आहे. मल्याळम चित्रपट ‘ऑर्डिनरी’ चे चित्रीकरण याच ठिकाणी झाले आहे.

4)Heritage village, Aranmula-

अरनमुला हे केरळच्या पथानामथिट्टा जिल्ह्यातील, पंपा नदीच्या काठावर वसलेले एक ऐतिहासिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या समृद्ध वारसा गाव आहे. हे गाव जगप्रसिद्ध धातुचे आरसे (अरनमुला कन्नडी), प्राचीन अरनमुला पार्थसारथी मंदिर, आणि ओणम सणातील बोट शर्यतीसाठी (वल्लमकाली) प्रसिद्ध आहे. येथे अरनमुला कन्नडी हे मिश्रधातूपासून बनवलेले धातूचे आरसे आहेत. आणि याची निर्मिती प्रक्रिया फक्त येथील कारागिरांना माहित आहे. तसेच येथील भगवान श्रीकृष्णाचे पार्थसारथी मंदिर हे अतिशय प्राचीन मंदिर आहे. येथे ओणमच्या वेळी पंपा नदीवर होणारी वार्षिक नौका शर्यत पर्यटकांसाठी मुख्य आकर्षण आहे. तसेच अरनमुलाच्या वास्तुविद्या गुरुकुलममध्ये प्राचीन भारतीय वास्तुकला आणि भित्तीचित्रांचे जतन आणि शिक्षण दिले जाते. आणि हे गाव कथकली नृत्य आणि पारंपारिक कलांसाठीही ओळखले जाते.

Visit our website: allindiajourney.com

5)Malayalapuzha Devi Temple-

मलयालप्पुझा देवी मंदिर हे केरळच्या पथानामथिट्टा जिल्ह्यातील, प्रसिद्ध आणि शक्तिशाली भद्रकाली मातेचे मंदिर आहे. हे मंदिर 1000 वर्षांपेक्षा जास्त जुने असून येथे देवी भद्रकालीला ‘मलयालप्पुझा अम्मा’ किंवा ‘इदाथट्टिल भगवती’ म्हणून ओळखले जाते. देवीची मुख्य मूर्ती 5.5 फूट उंच असून ती ‘कडू शर्करा योगम’ (औषधी वनस्पती, गूळ आणि मातीचे मिश्रण) पासून तयार करण्यात आली आहे. या मंदिरात भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात अशी या मातेची ख्याती आहे. तसेच या मंदिरात ब्रह्मराक्षस, नागराजा आणि स्वयंभू शिवलिंग आहे, व देवी पार्वती आपल्या मांडीवर बाळ गणपतीला दूध पाजतानाची एक दुर्मिळ मूर्ती आहे. दरवर्षी येथे फेब्रुवारी-मार्च मध्ये वार्षिक 10 दिवसांचा उत्सव आणि ‘विनायक चतुर्थी’, ‘नवरात्री’ हे सण मोठ्या उत्साहात साजरे होतात.

6)Charalkunnu Hill Station-

चरलकुन्नू,हिल स्टेशन हे केरळच्या पथानामथिट्टा जिल्ह्यातील, रन्नी जवळील एक निसर्गरम्य हिल स्टेशन आहे. हे ठिकाण ट्रेकिंग ट्रेल्स, पिकनिक स्पॉट्स आणि हिरवाईने नटलेल्या लँडस्केपमध्ये आरामदायी निवासस्थान व जिल्ह्यातील एकमेव हिल स्टेशन आहे. येथील टेकडीवरून पंपा नदी, सखल भाग, सूर्योदय आणि सूर्यास्ताचे दृश्य, पक्ष निरीक्षण, घनदाट सदाबहार जंगले आणि गावांचे विहंगम दृश्य दिसते. येथे ‘चारल माउंट कॅम्प हाऊस’ असून ते ख्रिश्चन एज्युकेशन सेंटरद्वारे चालवले जाते. तसेच येथे पायथ्याशी असलेल्या एका लहान चॅपलमध्ये उन्हाळ्यात छतावरून पडणाऱ्या प्रकाशामुळे जमिनीवर येशू ख्रिस्ताच्या चेहऱ्याचे प्रतिबिंब दिसते. येथे जवळच कुंभवुरुथी आणि पेरुंथेनारुवी धबधबा, आरुविक्कुझी धबधबा हे सुंदर धबधबे आहेत. आहे आणि कोझेनचेरी हे शहर 5 किमी अंतरावर आहे.

7)Pandalam Palace-

पंडालम महाल हा केरळच्या पथानामथिट्टा जिल्ह्यातील, अचकोविल नदीच्या तीरावरील भगवान अय्यप्पा यांचे बालपणीचे निवासस्थान आहे. आहे. आणि हे ठिकाण सबरीमाला यात्रेकरूंसाठी अत्यंत पवित्र आहे. हा महाल पारंपरिक केरळ वास्तुकलेचा उत्तम नमुना असून पंडालम राजवंशाचे निवासस्थान म्हणून ओळखला जातो. पंडालम राजघराणे हे मदुराईच्या पांड्य राजांचे वंशज मानले जातात. भगवान अय्यप्पांनी आपले बालपण या महालात व्यतीत केले होते. सबरीमाला तीर्थयात्रेदरम्यान, मकरविलक्कू सणावेळी भगवान अय्यप्पांचे पवित्र सोन्याचे दागिने (थिरुवाभरणम) या महालातून भव्य मिरवणुकीने पंडालमपासून सबरीमाला मंदिरापर्यंत नेले जातात. तसेच या महाल परिसरात अचकोविल नदीकाठी ‘वलियाकोइक्कल मंदिर’ आहे, जे पंडालम राजवंशाचे कौटुंबिक मंदिर होते.

8)Konni-

कोन्नी हे केरळच्या पथानामथिट्टा जिल्ह्यातील,अचेनकोविल नदीच्या काठावर वसलेले, निसर्गरम्य शहर आणि हत्ती प्रशिक्षण केंद्रासाठी प्रसिद्ध ठिकाण आहे. अचेनकोविल नदीच्या काठावर वसलेले हे ठिकाण, घनदाट जंगले, आनाकूडू (लाकडी पिंजरे) आणि रोमांचक सफारीसाठी पर्यटकांचे आकर्षण आहे. येथे हत्तींना ठेवण्यासाठी ‘आनाकूडू’ नावाचे लाकडाचे प्रचंड मोठे पिंजरे आहेत. कोन्नीमध्ये 1810 पासून रानटी हत्तींना नियंत्रित आणि प्रशिक्षित केले जाते. तसेच येथील जवळच असलेले अडावी इको-टूरिझम हे ठिकाण ‘कोरावकल राफ्टिंग’ (गोलाकार नौका विहार) साठी प्रसिद्ध आहे. कल्लर नदी पात्रात घनदाट जंगलातून हे राफ्टिंग केले जाते. तसेच कोन्नी हे मसाल्याच्या बागांनी (लवंग आणि मिरी) आणि रबरच्या लागवडीने वेढलेले आहे. निसर्गप्रेमींसाठी येथे ट्रेकिंग आणि सफारीचे अनेक पर्याय असून कोन्नीला ‘आनकूदिंते नाडू’ (हत्तींच्या पिंजऱ्यांची भूमी) आणि केरळची ‘चिरापुंजी’ म्हटले जाते. कारण येथे भरपूर पाऊस पडतो.

9)Perunthenaruvi Waterfalls-

पेरुंथेनारुवी धबधबा हा केरळच्या पथानामथिट्टा जिल्ह्यातील,रन्नी तालुक्यातील वेचूचिरा येथे पंबा नदीवरील एक विलोभनीय नैसर्गिक धबधबा आहे. ‘पेरुंथेनारुवी’ या शब्दाचा मल्याळम भाषेतील अर्थ “मधाचा मोठा प्रवाह” असा होतो. हा धबधबा त्याच्या उंचीपेक्षा रुंदीसाठी अधिक ओळखला जातो. व 100 फूट खोल दरीत खडकाळ वाटेवरून खाली कोसळतो. हा धबधबा घनदाट जंगलाने वेढलेल्या पश्चिम घाटाच्या कुशीत आणि सबरीमालाच्या दाट वनक्षेत्रात वसलेला आहे, ज्यामुळे येथील वातावरण अत्यंत शांत आणि हिरवेगार असते. तसेच पेरुथेनारुवी परिसरात सबरीमलाच्या जंगलातून येणारे दोन मुख्य धबधबे आहेत, 300 फूट उंचीचा ‘पणमकुदंथा’ आणि 200 फूट उंचीचा ‘पडिवथिल’ धबधबा आहे.पर्यटक येथे ट्रेकिंग, पक्षीनिरीक्षण आणि निसर्गभ्रमंतीचा आनंद घेऊ शकतात.

10) Kaviyoor Rock Cut Temple/ Thrikkakkudi Cave Temple-

कवियूर खडक मंदिर (थ्रिक्कक्कुडी गुहा मंदिर) हे केरळच्या पथानामथिट्टा जिल्ह्यातील, तिरुवल्लाजवळ मणिमाला नदीच्या तीरावर कवियूर गावात वसलेले प्राचीन आणि पुरातत्वदृष्ट्या महत्त्वाचे शिव मंदिर आहे. 8 व्या शतकातील हे गुहा मंदिर एकाच अवाढव्य खडकावर कोरलेले असून, पल्लव स्थापत्यशैलीचे उत्तम उदाहरण मानले जाते. हे गुहा मंदिर पश्चिमाभिमुख असून यात मध्यवर्ती गर्भगृह, अर्धमंडप आणि खांब असलेला दर्शनी भाग आहे. गुहेची रुंदी 19 फूट 8 इंच आणि उंची 8 फूट 6 इंच आहे. या मंदिरात शिवलिंगाच्या रूपात भगवान शिव (त्रिकवियूरप्पन) आहेत. जे गर्भगृहात एकाच खडकातून कोरलेले सुमारे 3 फूट उंचीचे शिवलिंग आहे. व मंदिराच्या भिंतींवर भगवान गणपती, महर्षी आणि द्वारपाल यांची आकर्षक शिल्पे कोरलेली आहेत.हे मंदिर पुरातत्व विभागाद्वारे संरक्षित स्मारक आहे व कवियूर महादेव मंदिर संकुलातच एक प्रसिद्ध हनुमान मंदिर आहे.

11)Kallooppara Bhagavathy Temple-

कल्लूपरा श्री भगवती टेंपल हे केरळच्या पथानामथिट्टा जिल्ह्यातील, प्राचीन आणि प्रसिद्ध धार्मिक स्थळ आहे. हे मंदिर 1000 वर्षांपेक्षा जास्त जुने असून येथे देवी भगवती (भद्रकाली) ‘शांत स्वरूपिणी’ रूपात विराजमान आहे, ज्यामुळे तिला ‘अभीष्ट वरदायिनी’ (इच्छा पूर्ण करणारी) मानले जाते. या मंदिराचे बांधकाम पारंपारिक केरळ स्थापत्य शैलीत करण्यात आले आहे. व हे मंदिर एकेकाळी एडपल्ली राजघराण्याच्या अखत्यारीत होते. या मंदिरातील ‘कार्यक्रमकुंभ भरणी’ हा सर्वात महत्त्वाचा वार्षिक उत्सव आहे, जो फेब्रुवारी-मार्च मध्ये दोन दिवस साजरा केला जातो. तसेच येथे पडयानी उत्सवादरम्यान ‘पडयानी’ हा पारंपरिक विधी आणि लोककला सादर केली जाते. मंगळवार आणि शुक्रवार या दिवशी भाविक देवीच्या पूजेसाठी मोठ्या प्रमाणात या मंदिरात येतात.

12)Pandalam Mahadeva Temple-

पंडलम महादेव मंदिर हे केरळच्या पथानामथिट्टा जिल्ह्यातील,पंडालम येथे थोट्टाकोनम आणि मुलंपुझा गावांच्या मध्ये, आचनकोविल नदीच्या काठी वसलेले, प्राचीन शिव मंदिर आहे. येथे भगवान शिव पार्वतीसोबत ‘प्रसन्न’ मुद्रा मध्ये विराजमान आहेत. भगवान परशुरामाने या मंदिरातील मुख्य मूर्तीची स्थापना केली होती. असे सांगितले जाते. आणि हे मंदिर ऋषी खरा मुनी यांनी पवित्र केलेल्या 108 शिव मंदिरांपैकी एक आहे. या मंदिराचा ईशान्येकडील भाग नदीने व्यापलेला असल्याने याला ‘मुक्कल वट्टम’ असेही म्हणतात. हे मंदिर पारंपारिक केरळ शैलीतील वास्तुकलेचा एक सुंदर नमुना आहे. व मंदिरात गणपती, भगवान अयप्पा, नागराज, भगवान सुब्रमण्यम आणि महायक्षी अम्मा यांच्याही मूर्ती आहेत. महाशिवरात्री हा येथील मोठा उत्सव आहे. आणि “केतुकळचा’ हा 10 दिवसांचा उत्सव दरवर्षी नोव्हेंबर-डिसेंबर मध्ये साजरा केला जातो.

13)Karackal Pechi Amman Kovil-

करक्कल पेची अम्मान मंदिर हे केरळच्या पथानामथिट्टा जिल्ह्यातील, तिरुवल्ला जवळील पेरिंगारा येथील प्रसिद्ध धार्मिक स्थळ आहे. हे मंदिर देवी पेची अम्मान म्हणजे माँ कालीचे एक रूप मानले जाते. हे मंदिर करक्कल स्वामीपालम रोडवर असून स्थानिक भाविकांचे श्रद्धास्थान आहे. या मंदिरात ‘अम्मान कोडा महोत्सवम’ हा सर्वात महत्त्वाचा उत्सव मार्च-एप्रिल मध्ये मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. याशिवाय प्रतिष्ठा वर्धापन दिन व नवरात्री हे उत्सव साजरे होतात.

14)Mannadi-

मन्नाडी हे केरळच्या पथानामथिट्टा जिल्ह्यातील, अडूर जवळील एक महत्त्वाचे ऐतिहासिक गाव आहे. हे गाव त्रावणकोरचे माजी प्रधानमंत्री (दलवा) आणि महान स्वातंत्र्यसेनानी वेलू थम्पी दलावा यांच्या बलिदानासाठी ओळखले जाते. ब्रिटिशांच्या तावडीत सापडू नये म्हणून त्यांनी मन्नाडी येथील जुन्या भगवती मंदिरात स्वतःचे प्राण अर्पण केले होते. येथे वेलू थम्पी दलावांच्या स्मृतीप्रत्यर्थ एक भव्य संग्रहालय आणि सांस्कृतिक संकुल उभारले आहे. यात जुन्या काळातील शस्त्रे, ऐतिहासिक दस्तऐवज आणि दलावांचा पुतळा आहे. याशिवाय मन्नाडी येथे देवी भगवतीचे प्राचीन मंदिर आहे. जे ‘उच्छा बली’ या उत्सवासाठी प्रसिद्ध आहे. तसेच मन्नाडी हे ‘मुदियेट्टू’ या युनेस्कोच्या वारसा यादीत समावेश असलेल्या केरळच्या पारंपारिक विधीप्रधान लोककलेसाठी ओळखले जाते.

15)Omallur Shree Rakthakanda Swamy Temple –

ओमल्लूर हे केरळच्या पथानामथिट्टा जिल्ह्यातील, सांस्कृतिक आणि धार्मिक शहर आहे. येथे श्री रक्तकंठ स्वामी मंदिर हे 8 व्या शतकातील भगवान अय्यप्पा यांना समर्पित मंदिर आहे.सबरीमाला यात्रेच्या मार्गावर हे एक महत्त्वाचे ‘इदथावलम’ (विश्रांतीचे ठिकाण) मानले जाते.या मंदिरात दगडापासून बनवलेले नादस्वरम आणि दगडी साखळी ही दुर्मिळ शिल्पकला पाहायला मिळते.येथे मल्याळम महिना ‘मेडम’मध्ये 10 दिवसांचा वार्षिक उत्सवामध्ये 10 पेक्षा जास्त हत्तींची मिरवणूक असते. याशिवाय ओमल्लूरमधील मार्च-एप्रिल मध्ये आयोजित केला जाणारा ‘वायल वनिभम’ हा सर्वात प्रसिद्ध वार्षिक शेती आणि जनावरांचा मेळा आहे. तसेच ओमल्लूर मध्ये मंजानीक्करा दयारा हे ख्रिश्चन धर्मीयांचे प्रसिद्ध तीर्थक्षेत्र असून येथे ‘इग्नेशियस एलियास तिसरे’ यांची समाधी आहे. दरवर्षी फेब्रुवारी महिन्यात येथे मोठ्या संख्येने भाविक येतात.

16)Kodumon Chilanthi Ambalam Temple –

कोडुमोन चिलांथी अंबाळम मंदिर हे केरळच्या पथानामथिट्टा जिल्ह्यातील, कोडुमोन गावातील 1500 वर्षांपेक्षा जास्त जुने प्रसिद्ध धार्मिक स्थळ आहे. हे मंदिर पल्लियारा श्री भगवती मंदिर (वनदुर्गा किंवा महालक्ष्मीचे रूप) या नावानेही ओळखले जाते. आणि हे मंदिर कोळी आणि इतर कीटक चावल्यामुळे होणाऱ्या विषबाधेवर आणि त्वचारोगांवर उपचारासाठी जगातील एकमेव प्रसिद्ध मंदिर आहे. येथे चिलांथी (कोळी) देवतेची पूजा केली जाते. येथे मूर्तीऐवजी पंचलौहापासून बनवलेला आरसा पूजला जातो. या मंदिराच्या आवारातील ‘चिलांथिकिनार’ या विहिरीच्या पाण्याने स्नान करणे आणि मंदिरात मिळणारी पवित्र राख (भस्म) लावल्याने कोळी चावल्याचे परिणाम 7 दिवसांत बरे होतात, अशी भक्तांची श्रद्धा आहे. तसेच कोडुमोन हे ठिकाण 9 व्या शतकातील प्रसिद्ध संस्कृत पंडित शक्तीभद्र यांचे जन्मस्थान आहे. या मंदिरात जानेवारी-फेब्रुवारी मध्ये ‘मकरम चंद्रपोंगला’ हा महिलांद्वारे सण साजरा केला जातो.

17)Muloor Smarakam-

मुलूर स्मारकम हे केरळच्या पथानामथिट्टा जिल्ह्यातील, एलावुमथिट्टा गावातील प्रसिद्ध समाजसुधारक आणि कवी मुलूर एस. पद्मनाभ पणिकर (1869-1931) यांना समर्पित एक ऐतिहासिक स्मारक आहे. हे ठिकाण कवी मुलूर एस. पद्मनाभ पणिकर यांचे निवासस्थान होते. 1989 मध्ये केरळ सरकारने या घराचे स्मारकात रूपांतर केले. मुलूर यांनी आपल्या घराचे नाव त्यांचे मित्र केरळ वर्मा वलियाकोयी थंपुरन यांच्या सन्मानार्थ ‘केरल वर्मा सौधम’ असे ठेवले होते. ते एक प्रख्यात कवी आणि समाजसुधारक होते. त्यांना त्यांच्या विनोदी कवितांसाठी ‘सरसकवी’ ही पदवी बहाल करण्यात आली होती. आणि त्यांच्या ‘कवि-रामायणम’ या रचनेने ‘मंदिर प्रवेश घोषणे’साठी प्रेरणा दिली होती. या स्मारकात कवी मुलूर यांच्या वैयक्तिक वस्तू आणि साहित्याचे जतन केले आहे. आणि येथे श्री नारायण गुरू यांच्याशी संबंधित वस्तूही आहेत.

18)Kadammanitta Devi Temple | Padayani Festival –

कदममणित्ता हे केरळच्या पथानामथिट्टा जिल्ह्यातील, एक निसर्गरम्य आणि सांस्कृतिकदृष्ट्या समृद्ध गाव आहे. हे गाव प्रसिद्ध कवी कदममणित्ता रामकृष्णन आणि पारंपारिक ‘पदयानी’ या लोककलेसाठी ओळखले जाते. येथील कदममणित्ता देवी मंदिर हे देवी भद्रकाली (महाभैरवी) ची मुख्य मूर्ती असून शिव आणि कृष्णाची स्वतंत्र मंदिरे आहेत.येथे पदयानी उत्सव हा 10 दिवसांचा वार्षिक उत्सव मे महिन्यात साजरा होतो. यात सुपारीच्या झाडाच्या पानांपासून बनवलेले अवाढव्य मुखवटे (कोलम) घालून कलाकार पारंपारिक वाद्यांच्या तालावर नृत्य करतात. आणि 7 व्या दिवशी होणारा ‘वलिया पदयानी’ हा या उत्सवाचा मुख्य भाग असतो. कदममणित्ता हे गाव टेकड्यांनी वेढलेले असून येथे शांत आणि नैसर्गिक वातावरण आहे. आणि येथे जवळच प्रसिद्ध कुडिलुकुझी धबधबा आहे.

19)Niranam,St. Mary’s Orthodox Syrian Church-

सेंट मेरी ऑर्थोडॉक्स सीरियन चर्च हे केरळच्या पथानामथिट्टा जिल्ह्यातील, तिरुवल्ला जवळ असलेले निरनाम चर्च हे जगातील सर्वात जुन्या चर्चांपैकी एक आहे. निरनाम हे एक अत्यंत ऐतिहासिक आणि धार्मिक महत्त्व असलेले गाव आहे. हे गाव पंबा आणि मणिमाला नद्यांच्या संगमावर वसलेले आहे. येथील चर्चची स्थापना येशू ख्रिस्ताचे 12 शिष्यांपैकी एक असलेल्या सेंट थॉमस यांनी इ.स. 54 मध्ये केली. आणि सेंट थॉमस यांनी केरळमध्ये स्थापन केलेल्या ‘एझारा पल्लीकल’ (साडेसात चर्चेस) पैकी हे एक महत्त्वाचे चर्च आहे. या चर्चमध्ये सेंट थॉमस यांचे पवित्र अवशेष जतन केले आहेत. या चर्चची वास्तुकला प्राचीन भारतीय आणि सीरियन शैलीचे मिश्रण आहे. चर्चच्या प्रवेशद्वारापाशी एक मोठा ग्रॅनाइटचा क्रॉस आहे, ज्याच्या पायथ्याशी हिंदू मंदिर शैलीतील कोरीव काम पाहायला मिळते. तसेच या चर्चमध्ये 5 वेदी आहेत, ज्यातील मुख्य वेदी सेंट मेरी (मदर मेरी) यांच्या नावाने आहे.

20)Shree Vallabha Temple-

श्री वल्लभ मंदिर हे केरळच्या पथानामथिट्टा जिल्ह्यातील, तिरुवल्ला येथील मणिमाला नदीच्या काठावर वसलेले भगवान विष्णूंचे प्राचीन मंदिर आहे. हे मंदिर 400 वर्षांपेक्षा जास्त जुने असून वैष्णव परंपरेतील 108 दिव्य देशम (पवित्र स्थाने) पैकी एक आहे. येथे भगवान विष्णू ‘श्री वल्लभ’ या रूपात विराजमान आहेत. या मंदिरात भगवान विष्णूची 8 फूट उंचीची भव्य पाषाणमूर्ती आहे. व मंदिराच्या समोर एक भव्य 54 फूट उंच गरुडस्तंभ (ध्वजस्तंभ) आहे. या मंदिराची स्थापत्यशैली केरळच्या पारंपारिक शैलीत बांधलेले असून त्यावर सुंदर लाकडी कोरीवकाम आणि रामायण-महाभारतातील कथा दर्शवणारी भित्तिचित्रे आहेत. येथे भाविकांची अशी श्रद्धा आहे की येथील देवतेला कथकली नृत्य अत्यंत प्रिय आहे, त्यामुळे श्री वल्लभाला येथे दररोज रात्री कथकली नृत्य सादर केले जाते. तसेच या मंदिरात एप्रिलमध्ये होणाऱ्या वल्लभ कविल उत्सवात देवाला 12,000 केळ्यांचे घड अर्पण करण्याची अनोखी प्रथा आहे.

21)Sree Vadakkumnathan Subhramanya Swami Temple, Thumpamon-

श्री वडक्कुनाथन सुब्रमण्य स्वामी मंदिर हे केरळच्या पठाणमथिट्टा जिल्ह्यातील, पांडलम जवळील अत्यंत प्राचीन मंदिर आहे. हे मंदिर पठाणमथिट्टा जिल्ह्यातील दोन प्रमुख सुब्रमण्य स्वामी मंदिरांपैकी एक असून या मंदिराचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे येथे दोन श्रीकोविल (गर्भगृह) आहेत. आणि दोन्ही गोलाकार (वट्टा) आकाराचे आहेत. येथे पहिले श्रीकोविल हे वडक्कुनाथन (भगवान मुरुगाचे योद्धा रूप) यांना समर्पित असून भाविक त्यांना भगवान शिव किंवा विष्णूचे रूप मानतात. दुसरे श्रीकोविल हे बालमुरुगन (भगवान मुरुगाचे बाल रूप) यांना समर्पित आहे. असे सांगितले जाते की, ‘आश्चर्यचूडामणी’ नाटकाचे लेखक शक्तीभद्र यांनी या मंदिरातील बालमुरुगाची पूजा केली होती. या मंदिरात ‘उत्तराडा महोत्सवाम’ हा वार्षिक उत्सव मार्च-एप्रिल मध्ये साजरा केला जातो. याशिवाय महाशिवरात्री, थाईपूयम, विशू आणि ओणम हे सण येथे मोठ्या उत्साहात साजरे केले जातात.

Visit the travel blog

1)शबरीमला ठिकाण केरळमधील कोणत्या जिल्ह्यात आहे?

शबरीमाला ठिकाण हे केरळ राज्यातील पठाणमथिट्टा जिल्ह्याच्या पेरुनाड गावात, रन्नी तालुक्यामध्ये वसलेली एक टेकडी आहे.


2)पथानामथिट्टा जिल्ह्यातील ओमल्लूर हे ठिकाण कशासाठी प्रसिद्ध आहे?

ओमल्लूर हे ‘वायल वनिभम’साठी प्रसिद्ध आहे, जो ऑक्टोबर महिन्यात आयोजित केला जाणारा एक वार्षिक शेती मेळा आहे.


3)पठाणमथिट्टा जिल्ह्यातील वास्तुविद्या गुरुकुलम ही संस्था कशासाठी प्रसिद्ध आहे?

वास्तुविद्या गुरुकुलम संस्था ही 17 नोव्हेंबर 1993 मध्ये स्थापित झाली असून प्राचीन भारतीय वास्तुकला आणि भित्तिचित्रांसाठी एक अद्वितीय संस्था आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
Scroll to Top