भारतभ्रमंती या वेबसाईटवर पहा भारत देशातील प्रत्येक राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यातील संपूर्ण पर्यटन स्थळे. देवभूमी केरळ राज्यातील मलप्पुरम जिल्ह्यातील संपूर्ण पर्यटन स्थळे. मलप्पुरम हा केरळ राज्यातील सर्वाधिक लोकसंख्येचा आणि सांस्कृतिकदृष्ट्या समृद्ध जिल्हा आहे. 16 जून 1969 रोजी स्थापन झालेला आणि अरबी समुद्राच्या किनाऱ्यावर असलेला हा जिल्हा ‘टेकड्यांचा प्रदेश’ म्हणून ओळखला जातो. ‘मलप्पुरम’ या शब्दाचा स्थानिक अर्थ ‘टेकड्यांवरील जमीन’ असा होतो. हा जिल्हा निसर्गसौंदर्य, हिरव्यागार टेकड्या, धबधबे, ऐतिहासिक वारसा व शैक्षणिक प्रगती आणि चालियार, कडलुंडी आणि भरतपुझा या नद्यांनी समृद्ध जिल्हा आहे. या जिल्ह्यात एरनाड, पेरिनथलमान्ना, तिरूर, पोन्नानी, एथानी, निलांबूर आणि कोंडोटी हे सात तालुके असून, प्राचीन काळी हे शहर कोझिकोडच्या झामोरिन्सची लष्करी राजधानी होते. Top 27 places to visit in Malappuram District
या जिल्ह्यातील ‘कोडिन्ही’ (जुळ्या मुलांचे गाव) या गावात मोठ्या संख्येने जुळी मुले जन्माला येतात, त्यामुळे हे जागतिक आकर्षणाचे केंद्र बनले आहे. तसेच येथे 2002 मध्ये सुरू झालेला अक्षय प्रकल्प हा केरळच्या ई-गव्हर्नन्स क्रांतीचा पाया आहे. आणि संपूर्ण शहरात मोफत वाय-फाय देणारी मलप्पुरम ही भारतातील पहिली नगरपालिका आहे. येथील मल्याळम ही मुख्य भाषा आहे. आणि अर्थव्यवस्था प्रामुख्याने ‘गल्फ रिमिटन्स’ (परदेशातून येणारा पैसा) आणि शेतीवर अवलंबून आहे. याशिवाय नारळ, सुपारी, रबर, केळी आणि मसाल्यांच्या पदार्थांची लागवड येथे मोठ्या प्रमाणावर होते. या जिल्ह्यात निलांबूर येथील सागवान संग्रहालय आणि जगातील पहिले मानवनिर्मित सागवान लागवड क्षेत्र प्रसिद्ध आहे. मलप्पुरम जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात ऐतिहासिक, सांस्कृतिक व निसर्गरम्य पर्यटन स्थळे आहेत.
Top 27 places to visit in Malappuram District
मलप्पुरम जिल्ह्यातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
1)Neerputhoor Mahadeva Temple-




नीरपुथुर महादेव मंदिर हे केरळच्या मलप्पुरम जिल्ह्यातील,पुथूर गावातील जागृत, रहस्यमय आणि पवित्र शिवमंदिर आहे. हे प्राचीन मंदिर 3,000 वर्ष जुने असून अद्वितीय ‘जलमग्न शिवलिंगासाठी’ प्रसिद्ध आहे. या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे येथील गर्भगृह (श्रीकोविल) वर्षभर पाण्याने भरलेले असते.व येथील स्वयंभू शिवलिंग पूर्णपणे पाण्यात बुडलेले असते. हे पाणी पवित्र गंगा नदीच्या अस्तित्वाचे प्रतीक मानले जाते. हे मंदिर पारंपारिक केरळ शैलीत बांधलेले असून त्याचे गर्भगृह गोलाकार आहे. नलमपालममध्ये पाणी भरलेले असल्याने भाविकांना प्रदक्षिणा घालता येत नाही; त्यांना ‘पट्टुपुरा’ भागातून दर्शन घ्यावे लागते. येथे उन्हाळ्यात किंवा दुष्काळातही गर्भगृहातील पाणी कधीच सुकत नाही, जे विज्ञानासाठी आजही एक रहस्य आहे. हे निसर्गरम्य ठिकाण अध्यात्मिक शांततेसाठी प्रसिद्ध आहे.
2)Kottakkunnu Hill Park-



कोट्टक्कुन्नू हे केरळच्या मलप्पुरम जिल्ह्यातील, एक लोकप्रिय हिल स्टेशन आहे. येथे कोझिकोडच्या झामोरिन राजांनी बांधलेल्या जुन्या किल्ल्याचे अवशेष आहेत. हे ठिकाण निसर्गसौंदर्य, ऐतिहासिक स्थळे, ॲडव्हेंचर पार्क, वॉटर थीम पार्क यासाठी लोकप्रिय आहे. येथे ललिता कला अकादमीच्या आर्ट गॅलरीत केरळमधील प्रसिद्ध कलाकारांची चित्रे आणि शिल्पे प्रदर्शित केली जातात. आणि जवळच वेट्टाकोरुमाकन आणि शिव मंदिरातील प्राचीन भित्तीचित्रे पाहण्यासारखी आहेत. तसेच हे ठिकाण भारतीय स्वातंत्र्यलढ्यासाठी महत्त्वाचे असून येथेच थोर क्रांतिकारक वरियामकुन्नथ कुंजाहम्मद हाजी यांना ब्रिटिशांनी फाशी दिली होती. या टेकडीवरून परिसराचे विहंगम दृश्य दिसते, त्यामुळे याला ‘मरीन ड्राइव्ह ऑफ मलप्पुरम’ असेही म्हटले जाते.
3)shree pookkottur shiva-vishnu temple edayar pookkattiri –


श्री पुक्कोट्टूर शिव-विष्णू मंदिर हे केरळच्या मलप्पुरम जिल्ह्यातील, पुक्काट्टिरी किंवा एदयर भागातील प्रसिद्ध धार्मिक स्थळ आहे. हे मंदिर निसर्गरम्य परिसरात असून पुक्काट्टीयूर श्री महादेव मंदिर किंवा पुक्कोट्टुमपडम विल्वथ शिव-विष्णू मंदिर म्हणून ओळखले जाते. मंदिराचे बांधकाम पारंपरिक केरळ स्थापत्य शैलीत केलेले असून, येथील शांत आणि अध्यात्मिक वातावरण भाविकांना आकर्षित करते. या मंदिरात भगवान शिव आणि विष्णू या दोन्ही प्रमुख देवतांना समान महत्त्व दिले जाते. मुख्य देवतांशिवाय येथे गणपती, अय्यप्पा, भगवती आणि दक्षिणमूर्ती या उपदेवतांची देखील पूजा केली जाते. हे मंदिर अत्यंत प्राचीन असून त्याचा संबंध महाभारत काळाशी जोडला जातो.
Visit our website: allindiajourney.com
4)Kadalundi Bird Sanctuary-




कडालुंडी पक्षी अभयारण्य हे केरळच्या मलप्पुरम आणि कोझिकोड जिल्ह्यांच्या सीमेवर वसलेले आहे. हे अभयारण्य कडालुंडी नदी अरबी समुद्राला मिळते, त्या खाडीपाशी अनेक लहान बेटांच्या समूहावर पसरलेले आहे. या अभयारण्यास 100 पेक्षा जास्त स्थानिक पक्षांच्या प्रजाती आणि 60 पेक्षा जास्त स्थलांतरित पक्षांच्या प्रजाती आढळतात. त्यामध्ये सँडपायपर, सँड प्लोव्हर, सीगल्स, टर्न आणि सँड ग्रीशँक्स हे पक्षी पाहायला मिळतात.या अभयारण्याजवळ असलेल्या 200 मीटर टेकडीवरून नदीचे आणि समुद्राचे विलोभनीय दृश्य दिसते. पक्षांव्यतिरिक्त येथे विविध प्रकारचे मासे, कासव, खेकडे आणि पाणमांजर ही आढळतात.कडालुंडी-वल्लिकुन्नू हे केरळमधील पहिले ‘कम्युनिटी रिझर्व्ह’ (सामुदायिक राखीव क्षेत्र) म्हणून ओळखले जाते. निसर्गप्रेमींसाठी हे एक उत्तम ठिकाण आहे.
5)Teak Plantation & Museum, Nilambur-



सागवान उद्यान आणि संग्रहालय हे केरळच्या मलप्पुरम जिल्ह्यातील, पश्चिम घाटातील निलगिरी पर्वतरांगेजवळ, चालियार नदीच्या काठावर, निलांबूर येथील जगातील पहिले सागवान संग्रहालय आणि सर्वात जुने सागवान वृक्षारोपण आहे.येथील कोनोलीज प्लॉट हे जगातील सर्वात जुने मानवनिर्मित सागवान वृक्षारोपण आहे. याची स्थापना 1840 च्या दशकात मलबारचे जिल्हाधिकारी एच.व्ही. कोनोली यांनी केली होती. येथे जगातील सर्वात जुने आणि उंच सागवान वृक्ष पाहायला मिळतात. येथील निलांबूर सागवान संग्रहालय हे 1995 मध्ये केरळ वन संशोधन संस्थेने स्थापन केलेले जगातील पहिले एकमेव सागवान संग्रहालय आहे, या संग्रहालयात सागवान वृक्षाचा इतिहास, त्याची शास्त्रीय माहिती आणि सागवान लाकडापासून बनवलेल्या प्राचीन वस्तू व फर्निचरचे प्रदर्शन आहे.निलांबूरचे सागवान एवढे प्रसिद्ध आहे की त्याचा वापर लंडनच्या बकिंगहॅम पॅलेस आणि रोल्स रॉईस गाड्यांमध्येही केला जातो. या ठिकाणी एक फुलपाखरू उद्यान आणि औषधी वनस्पतींचे बोटॅनिकल गार्डन देखील आहे.
6)Nilambur Kovilakam-



निलांबूर कोविलाकोम हे केरळच्या मलप्पुरम जिल्ह्यातील, चालियार नदीच्या काठावर वसलेले, निलांबूरच्या राजांचे ऐतिहासिक निवासस्थान आहे. कोविलाकोम त्याच्या सुंदर लाकडी कोरीव काम, भित्तीचित्रे आणि पारंपारिक केरळ वास्तुकलेसाठी प्रसिद्ध आहे. येथील प्रसिद्ध सागवान बागांमुळे निसर्गप्रेमींसाठी एक प्रमुख आकर्षण आहे. या इमारती अशा पद्धतीने बांधल्या आहेत की ऋतूंनुसार घरामध्ये मध्यम तापमान राखले जाते. कोविलाकोमच्या परिसरात 200 वर्षांपूर्वी निलांबूर राजांनी बांधलेले वेट्टाक्कोरुमकन मंदिर आहे, या मंदिरात दरवर्षी ‘पाट्टुत्सवाम’ उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. येथील परिसर अतिशय शांत आणि निसर्गरम्य आहे.
7)Nedumkayam Rainforest-




नेदुमकायम वर्षावन हे केरळच्या मलप्पुरम जिल्ह्यातील,निलांबूर जवळील घनदाट आणि जैवविविधतेने नटलेले संरक्षित जंगल आहे. हे निलगिरी बायोस्फीअर रिझर्व्हचा भाग असून, हे जंगल इतके घनदाट आहे की अनेक ठिकाणी दिवसाही सूर्यप्रकाश जमिनीपर्यंत पोहोचत नाही, ज्यामुळे रात्रीसारखा भास होतो. येथील जगातील पहिले जुने सागवान वृक्षारोपण, दुर्मिळ वनस्पती, प्राणी आणि पक्षी आढळतात. यात हत्ती, वाघ, बायसन (गवा), मकाक आणि विविध प्रकारची हरणे दिसतात. तसेच येथील ब्रिटिशकालीन लाकडी विश्रामगृह आणि हत्तींचे शिबिर पर्यटकांचे मुख्य आकर्षण आहेत. आणि विशेष म्हणजे येथे चोलानाईकन या प्राचीन आणि दुर्मिळ आदिवासी जमातीचे वास्तव्य आहे, जे आजही गुहांमध्ये राहतात.
8)Adyanpara Waterfalls-


अड्यानपारा धबधबा हा केरळच्या मलप्पुरम जिल्ह्यातील, निलांबूर तालुक्यातील कुरुंबलांगोडू गावातील अतिशय सुंदर आणि निसर्गरम्य धबधबा आहे. हिरव्यागार घनदाट जंगलांनी वेढलेला हा परिसर पर्यटकांमध्ये ‘पिकनिक स्पॉट’ म्हणून लोकप्रिय आहे. हा धबधबा एका उंच खडकावरून खाली कोसळतो आणि सभोवताली हिरवेगार जंगल व विस्तीर्ण खडक आहेत. या धबधब्याचे पाणी औषधी गुणधर्मांनी समृद्ध आहे. निसर्गप्रेमींसाठी येथे पोहणे व पक्षी निरीक्षणाची सोय आहे. हा एक मोसमी धबधबा असून पावसाळ्यात तो पूर्ण वेगाने प्रवाहित होतो, तर उन्हाळ्यात पाण्याचा प्रवाह कमी असतो.
9)Thirumandhamkunnu Bhagavathy Temple, Angadipuram-


तिरुमंधमकुन्नू भगवती मंदिर हे केरळच्या मलप्पुरम जिल्ह्यातील, अंगडीपुरम गावातील देवी दुर्गेला समर्पित एक पूजनीय धार्मिक स्थळ आहे. हे मंदिर देवी दुर्गा (भद्रकाली) आणि भगवान शिव यांना समर्पित असून ते एका टेकडीवर वसलेले आहे. मध्ययुगीन काळात हे मंदिर वल्लुवनद राजघराण्याचे कुलदैवत होते. आणि हे केरळमधील 108 दुर्गा मंदिरांपैकी एक मानले जाते. या मंदिराची वास्तूकला पारंपारिक केरळ शैलीतील असून त्यामध्ये लाकडी कोरीव काम, गोल गर्भगृह (श्रीकोविल) आणि भव्य मंडप व तांब्याचे छप्पर पाहायला मिळते. तसेच हे मंदिर विवाहातील अडथळे दूर करण्यासाठी केल्या जाणाऱ्या ‘मांगल्य पूजेसाठी’, कालम पट्टू आणि प्राचीन दंतकथांसाठी प्रसिद्ध आहे. येथे एप्रिलमध्ये साजरा होणारा 11 दिवसांचा ‘पूरम’ हा सर्वात मोठा उत्सव आहे. यात हत्तींची भव्य मिरवणूक आणि ‘आरट्टू’ (पवित्र स्नान) विधी प्रमुख असतात.
10) Kottakkal Arya Vaidya Sala –


कोट्टक्कल आर्य वैद्य शाळा (AVS) ही केरळच्या मलप्पुरम जिल्ह्यातील, जगप्रसिद्ध आयुर्वेदिक संस्था आहे. आयुर्वेदाच्या प्रचार आणि प्रसारासाठी ही संस्था गेल्या 120 वर्षांहून अधिक काळ कार्यरत आहे. या संस्थेची स्थापना 1902 मध्ये परोपकारी वैद्यरत्नम पी. एस. वारियर यांनी केली. ही एक चॅरिटेबल संस्था असून आयुर्वेदाच्या सर्व शाखांमध्ये उपचार, शिक्षण आणि संशोधन करते. येथे आयुर्वेदिक पद्धतींनी पंचकर्म, कर्करोग उपचार आणि इतर विशेष उपचार व संशोधन केले जाते. येथील चॅरिटेबल रुग्णालयात गरीब रुग्णांना मोफत उपचार, औषधे आणि राहण्याची सोय आहे. या संस्थेचे स्वतःचे औषध निर्मिती युनिट असून संपूर्ण भारतात 550 पेक्षा जास्त अधिकृत एजन्सीद्वारे औषधांचे वितरण केले जाते. आणि या संस्थेच्या अंतर्गत आयुर्वेदातील उच्च शिक्षणासाठी ‘वैद्यरत्नम पी. एस. वारियर’ आयुर्वेद कॉलेज चालवले जाते.
11)Padinjarekkara Beach-



पडिंजरेकारा बीच हा केरळच्या मलप्पुरम जिल्ह्यातील, पोन्नई येथे भरत पूझा, थिरूर पूझा आणि अरबी समुद्रच्या संगमावर वसलेला सुंदर आणि शांत समुद्रकिनारा आहे. याला ‘अझीमुघम’ असेही म्हटले जाते. येथे नारळाच्या आणि सुरूच्या झाडांच्या रांगा आहेत. आणि पर्यटकांसाठी येथे वॉटर स्कूटर, स्पीड बोट्स, पॅरामोटरिंग राईड्स आणि क्रूझिंगची सोय उपलब्ध आहे. भरतपुझा आणि तिरूर नद्या अरबी समुद्राला मिळतात, हा देखावा अतिशय विलोभनीय आहे. पक्षी निरीक्षकांसाठी हे उत्तम ठिकाण असून येथे अनेक स्थलांतरित पक्षी पाहायला मिळतात. या समुद्रकिनाऱ्यावर अॅमेनिटी सेंटर, अॅम्फीथिएटर, इको-शॉप्स आणि लहान मुलांसाठी उद्यान उपलब्ध आहे.
12)Arimbra Hills-



अरिंब्रा टेकड्या या केरळच्या मलप्पुरम जिल्ह्यातील, ‘मिनी ऊटी’ म्हणून ओळखले जाणारे निसर्गरम्य लोकप्रिय पर्यटन स्थळ आहे.समुद्रसपाटीपासून या टेकड्यांची उंची 1050 फूट ते 1460 फूट असून हे ठिकाण हिरवेगार परिसर, निसर्गदृश्ये, सूर्योदय/सूर्यास्त आणि एका काचेच्या पुलासाठी प्रसिद्ध आहे. उटीप्रमाणेच येथील हिरवळ, धुक्याची चादर आणि थंड हवेमुळे याला ‘मिनी ऊटी’ म्हणतात. येथील रोमांचक ग्लास ब्रिजवरून खालील दऱ्यांचे आणि निसर्गाचे विहंगम दृश्य दिसते. आणि या टेकडीवर ‘मिस्टी लँड’ ही नैसर्गिक उद्याने आहेत. येथून कोझिकोड विमानतळाची धावपट्टी,अरबी समुद्राची झलक आणि संपूर्ण मलप्पुरम जिल्ह्याचे विलोभनीय दृश्य दिसते. तसेच या परिसरात प्राचीन जैन मंदिरे आणि पुरातन वास्तूंचे अवशेषही पाहायला मिळतात.
13)Kakkadampoyil-



कक्कडमपोयल हे केरळच्या मलप्पुरम आणि कोझिकोड जिल्ह्यांच्या सीमेवर वसलेले एक सुंदर आणि शांत थंड हवेचे ठिकाण आहे. याला ‘मलबारचे ऊटी’ म्हणूनही ओळखले जाते. हे ठिकाण पश्चिम घाटावर 700 ते 2100 फूट उंचीवर असून हे गाव मलप्पुरममधील चिलियार पंचायत आणि कोझिकोडमधील कूडारंजी पंचायत यांच्या दरम्यान विभागलेले आहे. येथील हवामान वर्षभर थंड आणि आल्हाददायक असते. येथे धुक्याने वेढलेले डोंगर, मसाल्यांची बाग आणि पश्चिम घाटातील ट्रेकिंगचे मार्ग, घनदाट जंगले आणि चहाच्या मळे प्रसिद्ध आहेत. तसेच येथील कोझिप्पारा आणि वालमथोड धबधबा हा मुख्य आकर्षणाचा केंद्रबिंदू असून येथे ट्रेकिंग आणि पोहण्यासाठी पर्यटकांची मोठी गर्दी असते.
14)Keralamkundu Waterfalls-

केरलमकुंडू धबधबा हा केरळच्या मलप्पुरम जिल्ह्यातील, करुवरक्कुंडू गावातील निसर्गरम्य परिसरातील प्रसिद्ध धबधबा आहे. पश्चिम घाटाच्या कुशीत, वसलेला हा धबधबा समुद्रसपाटीपासून 1500 फूट उंचीवर आहे. हा धबधबा सायलेंट व्हॅली नॅशनल पार्कच्या बफर झोनमध्ये येतो, त्यामुळे येथे समृद्ध जैवविविधता पाहायला मिळते. या धबधब्याच्या पाण्यामध्ये अनेक औषधी गुणधर्म आहेत, कारण हे पाणी पश्चिम घाटातील औषधी वनस्पतींमधून वाहून येते. हा धबधबा 150 फूट उंचीवरून कोसळतो व धबधब्याच्या पायथ्याशी असलेल्या नैसर्गिक तलावात पर्यटक पोहण्याचा आनंद घेतात. येथील परिसर घनदाट जंगल, समृद्ध जैवविविधता व शांत वातावरणाने बहरलेला आहे.
15)Thirunavaya Navamukunda Temple-


थिरुनावया नवमुकुंद मंदिर हे केरळच्या मलप्पुरम जिल्ह्यातील, भरतपुझा नदीच्या काठावरील भगवान विष्णूंना समर्पित असलेले एक अत्यंत प्राचीन मंदिर आहे. हे मंदिर 1300 वर्षांपेक्षा जास्त जुने असून 108 दिव्य देशमपैकी एक मानले जाते. या मंदिराची वास्तूकला पारंपरिक केरळ शैलीतील असून मंदिराच्या भिंती व छतावर रामायण आणि महाभारतातील कथा सुंदर पद्धतीने लाकडी कोरीव कामांमध्ये दिसून येतात. या मंदिरात विष्णू देवांची ‘नवमुकुंद’ स्वरूपात पूजा केली जाते. येथील मूर्तीचे वैशिष्ट्य म्हणजे तिचा फक्त गुडघ्यापासून वरचा भाग दिसतो, तर उर्वरित भाग जमिनीत गाडलेला आहे असे मानले जाते. हे मंदिर पूर्वजांना श्रद्धांजली वाहण्यासाठी बलि तर्पण/श्राद्ध पूजेसाठी अत्यंत पवित्र मानले जाते. येथील ‘मामंकम’ हा ऐतिहासिक उत्सव दर 12 वर्षांनी एकदा ‘साजरा केला जात असे, जो 28 दिवस चालत असे. आजही येथे 10 दिवसांचा वार्षिक उत्सव एप्रिल महिन्यात साजरा होतो. येथे भरतपुझा नदीच्या एका बाजूला नवमुकुंद (विष्णू) मंदिर आहे, तर दुसऱ्या बाजूला ब्रह्मा आणि शिवाचे मंदिर आहे, ज्यामुळे याला ‘त्रिमूर्ती संगम’ म्हटले जाते.
16)Garudan kavu Temple-




गरुडन कावू मंदिर हे केरळच्या मलप्पुरम जिल्ह्यातील,विष्णूचे वाहन गरुडाला समर्पित असलेले भारतातील एकमेव मोठे मंदिर आहे. हे मंदिर 1800 वर्षांपेक्षा जास्त जुने असून या मंदिरात गरुडाची प्रतिमा ‘अर्धा गरुड आणि अर्धा मनुष्य’अशा रूपात आहे. तसेच येथे भगवान विष्णूच्या कूर्मावताराची (कासव) प्रतिमा देखील आहे. येथील भगवान गरुडाची पूजा केल्याने त्वचारोग, विषबाधा आणि शारीरिक आजारांपासून मुक्ती मिळते, असा भाविकांचा विश्वास आहे. या मंदिराच्या आवारात सोन्याचा मुलामा दिलेल्या लहान सापांच्या मूर्ती स्थापित केल्या आहेत. आणि येथे ‘मंडलकलम’ (नोव्हेंबर-डिसेंबर) दरम्यानचे 41 दिवस खूप महत्त्वाचे असतात. हे मंदिर टिपू सुलतानच्या काळात उद्ध्वस्त झाले होते, परंतु नंतर स्थानिक भाविकांनी त्याची पुनर्बांधणी केली.
17)Sree Kadampuzha Bhagavathy Temple –


श्री कदमपुझा भगवती मंदिर हे केरळच्या मलप्पुरम जिल्ह्यातील, कदमपुझा येथील देवी पार्वतीच्या ‘किरात’ (शिकारी) रूपाला समर्पित एक अत्यंत शक्तिशाली आणि प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आहे. हे मंदिर 1900 वर्षा जुने असून या मंदिरात देवीची कोणतीही मूर्ती नाही. या मूर्तीविरहित मंदिरात देवी एका खड्ड्यात अदृश्य झाली होती, तिथेच देवीचे वास्तव्य मानले जाते आणि फुलांच्या पाकळ्यांनी पवित्र खड्डा पूर्णपणे झाकून देवीची दररोज पूजा केली जाते. ‘मुत्तरुक्कल’ हा येथील आयुष्यातील अडथळे दूर करण्यासाठी नारळ फोडून केला जाणारा विधी खूप लोकप्रिय आहे. 8 व्या शतकात आदि शंकराचार्यांनी या मंदिराची स्थापना केली होती असे सांगण्यात येते. देवीसोबत येथे भगवान गणेशाचे अस्तित्व असल्याचेही मानले जाते. आणि येथे भगवान शास्ता व सर्प देवतांसाठी उप-मंदिरे आहेत. व मंदिराच्या जवळ ‘मदंबियारकावू’ हे वेगळे शिवमंदिर आहे.
18)Pazhayangadi Mosque –


पझायंगडी मशीद ही केरळच्या मलप्पुरम जिल्ह्यातील, कोंडोट्टी येथील प्रसिद्ध मुस्लिम तीर्थक्षेत्र आहे. ही मशीद 500 वर्ष जुनी आहे व ‘कोंडोट्टी मशीद’ या नावानेही ओळखली जाते. ही मशीद निसर्गरम्य डोंगराळ भागात पारंपारिक मुघल स्थापत्यशैलीमध्ये, पांढऱ्या संगमरवरी दगडात बांधलेली आहे. आणि भव्य पांढरा घुमट व क्लिष्ट कोरीव काम हे या मशिदीचे मुख्य वैशिष्ट्य आहे. पर्शियातील मुस्लिम संत मोहम्मद शाह (कोंडोट्टी थांगल) यांच्या स्मृतीप्रित्यर्थ ही मशीद बांधली आहे. दरवर्षी ‘कोंडोट्टी नेरचा’ किंवा ‘वालिया नेरचा’ हा उत्सव दरवर्षी फेब्रुवारी किंवा मार्च महिन्यात आठवडाभर चालणारा मोठा उत्सव साजरा केला जातो. या काळात येथे अनेक सांस्कृतिक कार्यक्रम केले जातात.
19)Thunchan Parambu –


थुंचन पारंबू हे केरळच्या मलप्पुरम जिल्ह्यातील, तिरूर येथील आधुनिक मल्याळम भाषेचे जनक थुंचथू रामानुजन एझुथाचन यांचे जन्मस्थान व स्मारक आहे. हे ठिकाण महत्त्वाचे सांस्कृतिक आणि शैक्षणिक केंद्र असून मल्याळम साहित्याचे पवित्र तीर्थक्षेत्र मानले जाते. दरवर्षी विजयादशमीच्या दिवशी येथे मोठ्या प्रमाणावर ‘विद्यारंभम’ हा विधी पार पडतो. त्यावेळी केरळमधील हजारो पालक आपल्या मुलांच्या शिक्षणाची सुरुवात करण्यासाठी येथे येतात. येथे कांजीराचे झाडाखाली बसून एझुथाचन साहित्य लिहीत असत असे सांगण्यात येते. येथील संग्रहालयात एझुथाचन यांनी वापरलेली जुनी लोखंडी लेखणी आणि ताडपत्रावरील हस्तलिखिते आहेत. व येथील ग्रंथालयात सुमारे 15,000 पेक्षा जास्त पुस्तके आहेत. दरवर्षी फेब्रुवारी महिन्यात येथे ‘थुंचन उत्सव’ साजरा केला जातो.
20) Edathupuram Poonthanam Sree Krishna Temple & Poonthanam Illam-




एडथुपुरम पूनथानम श्रीकृष्ण मंदिर हे केरळच्या मलप्पुरम जिल्ह्यातील, पेरिंथलमन्ना जवळील अंगदीपुरम येथील प्रसिद्ध आध्यात्मिक स्थळ आहे. हे ठिकाण महान भक्तकवी पूनथानम नंबुद्री यांच्या भक्तीशी जोडलेले आहे. कवी पूनथानम वृद्ध झाले आणि त्यांना गुरुवायूरला चालत जाणे कठीण झाले, तेव्हा भगवान श्रीकृष्णाने (गुरुवायूरप्पन) त्यांच्यासमोर प्रकट होऊन त्यांच्यासोबत राहण्याचे आश्वासन दिले. भगवान श्रीकृष्णा व्यतिरिक्त या मंदिरात गणपती, शास्त्र, दुर्गा आणि नाग देवतांच्या मूर्ती आहेत. या मंदिराच्या जवळच सुप्रसिद्ध मल्याळम कवी आणि कृष्णभक्त ‘पूंथानम नंबूथिरी’ यांचे ऐतिहासिक पारंपरिक निवासस्थान आहे. ज्याला ‘पूनथानम इल्लम’ म्हटले जाते. त्यांचे ‘ज्ञानप्पना’ (ज्ञान का गीत) हे प्रसिद्ध महाकाव्य प्रसिद्ध आहे. त्यांच्या स्मृती जपणाऱ्या या वास्तूची देखभाल आता गुरुवायूर देवस्वमद्वारे केली जाते. येथे मार्च महिन्यात ‘पूनथानम दिन’ हा दिवस साजरा केला जातो.
21)Mampuram Maqam-



मम्पुरम मकाम हे केरळच्या मलप्पुरम जिल्ह्यातील, तिरुरंगडी तालुक्यात कडलुंडी नदीच्या काठावरील मुस्लिम तीर्थक्षेत्र आहे. ही वास्तू केरळच्या पारंपारिक केरळ- इस्लामिक शैलीत बांधलेली असून घुमटाचे सौंदर्य अप्रतिम आहे. हे मकाम आध्यात्मिक नेते आणि समाजसुधारक सैय्यद अलवी तन्गल आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांचे स्मारक (दरगाह) आहे. हे ठिकाण ‘मप्पिला लहाला’ (1921 चा मालाबार उठाव) च्या इतिहासाशी संबंधित असून 18 व्या शतकात मलबारमध्ये आलेल्या सैय्यद अलवी तन्गल यांनी ब्रिटिश वसाहतवादाविरुद्ध झालेल्या मप्पिला विद्रोहात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती.दरवर्षी मोहरम महिन्यात येथे ‘मम्पुरम नेरचा’ किंवा ‘उरूस’ उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.
22)Shree Ayyappa Temple, Chamravattam-



श्री अय्यप्पा मंदिर हे केरळच्या मलप्पुरम जिल्ह्यातील तिरूर जवळ चमरावट्टोममधील भरतपुझा नदीच्या काठावर निसर्गरम्य वातावरणात वसलेले अत्यंत प्राचीन आणि पवित्र धार्मिक स्थळ आहे. हे मंदिर भरतपुझा नदीच्या मधोमध असलेल्या एका बेटासारख्या जागेवर असून 108 शास्ता मंदिरांपैकी एक मानले जाते. येथे भगवान अय्यप्पा पश्चिमाभिमुख मूर्ती रूपात पत्नी पूर्णा आणि पुष्कला यांच्यासह विराजमान आहेत. याशिवाय मंदिरात गणपती, देवी दुर्गा, भद्रकाली आणि भगवान शिव यांचीही लहान मंदिरे आहेत. मंदिराच्या भिंती काळ्या दगडांनी बांधलेल्या आहेत आणि उंबरठ्यावर सोन्याचा मुलामा आहे. तसेच कासवाच्या पाठीवर पाच थरांचा एक मोठा तेलाचा दिवा हे येथील आकर्षण आहे. या मंदिराची स्थापना ऋषी परशुरामांनी केली असल्याचे आणि नंतर शबरी ऋषींनी ती पुन्हा शोधल्याचे मानले जाते. दरवर्षी येथे मकरम (जानेवारी-फेब्रुवारी) महिन्यात ‘प्रतिष्ठा दिनम’ साजरा होतो.
23)DFO Bungalow-



डीएफओ बंगला हा केरळच्या मलप्पुरम जिल्ह्यातील, निलंबूर येथील प्राचीन बंगला आहे. हा बंगला 1929 च्या सुमारास ब्रिटिशांच्या काळात ‘निलंबूर कोविलकोम’ द्वारे तत्कालीन जिल्हा वन अधिकारी (DFO) यांच्या निवासासाठी बांधण्यात आला होता. निलांबूरच्या सदाहरित जंगलात वसलेला हा बंगला पर्यटकांना शांतता, निसर्ग आणि वसाहतकालीन वास्तुकलेचा अनुभव देतो. येथील महोगनीच्या जंगलातून गेलेला ‘स्कायवॉक’ पर्यटकांमध्ये अत्यंत लोकप्रिय आहे. या बंगल्याजवळच प्रसिद्ध साग संग्रहालय, अड्यानपारा धबधबा आणि कननोली प्लॉट्स ही पर्यटन स्थळे आहेत. निसर्गप्रेमी आणि छायाचित्रकारांसाठी हे एक उत्तम ठिकाण आहे.
24)Valiya Juma Masjid-

वालिया जुमा मस्जिद ही केरळच्या मलप्पुरम जिल्ह्यातील, पोन्नानी येथील शुक्रवारची मशीद आहे. ही मस्जिद ‘पोन्नानी वालिया जुमथ पल्ली’ या नावानेही ओळखली जाते. आणि धार्मिक व शैक्षणिक महत्त्वामुळे “मलबारचा छोटा मक्का” असेही म्हटले जाते. या मशिदीचे बांधकाम पारंपारिक केरळ शैलीत, 16 व्या शतकाच्या सुरुवातीस 1510 मध्ये मुस्लिम अध्यात्मिक नेते शेख झैरुद्दीन मखदूम यांनी केले होते. शेख झैरुद्दीन मखदूम यांनी मलबारमधील इस्लामिक संस्कृती आणि साहित्यात मोठे योगदान दिले आहे. ही मशीद शतकानुशतके इस्लामिक शिक्षणाचे प्रमुख केंद्र राहिली असून येथे दक्षिण भारत, श्रीलंका, इंडोनेशिया आणि मलेशियातील विद्यार्थी शिक्षणासाठी येत असत. येथे 500 वर्षे जुना एक तेल दिवा आहे, ज्याच्या भोवती बसून विद्यार्थी शिक्षण घेत असत. मशिदीच्या परिसरात ऐतिहासिक कबरी आणि एक जुनी तलवार आहे.
25)Biyyam Kayal-




बिय्यम कायल हे केरळच्या मलप्पुरम जिल्ह्यातील, पोन्नानी जवळ असलेले निसर्गरम्य व सुंदर बॅकवॉटर सरोवर आहे.नारळाच्या झाडांनी वेढलेले हे ठिकाण पर्यटकांमध्ये अत्यंत लोकप्रिय आहे. DTPC मलप्पुरम कडून येथे स्पीड बोट, वॉटर स्कूटर, कयाकिंग आणि कॅनोइंग अशा जलक्रीडांच्या सुविधा पुरवल्या जातात. दरवर्षी ओणम सणादरम्यान येथे भव्य बोट शर्यतींचे आयोजन केले जाते. या स्पर्धेत महिला नौकाचालक देखील मोठ्या उत्साहाने सहभागी होतात. तसेच या तलावावरील हँगिंग ब्रिज पर्यटकांच्या आकर्षणाचे प्रमुख केंद्र आहे.
26) Alathiyoor Sri Hanuman Kavu Temple-


अलाथियूर श्री हनुमान कावू मंदिर, हे केरळच्या मलप्पुरम जिल्ह्यातील, प्राचीन व पवित्र धार्मिक स्थळ आहे. हे मंदिर प्रामुख्याने भगवान रामाला समर्पित असून, येथे हनुमानाची विशिष्ट ‘दासा’ रूपात पूजा केली जाते. या मंदिरातील हनुमानाची मूर्ती 3000 वर्षांपूर्वी सप्तर्षींपैकी एक असलेल्या वसिष्ठ ऋषींनी स्थापित केली होती. येथे हनुमान श्रीरामांचे शब्द ऐकण्यासाठी थोडे डावीकडे झुकलेल्या स्थितीत आहेत. असे मानले जाते की, श्रीराम हनुमानाला सीतेचा शोध घेण्यासाठी महत्त्वाचे संकेत शब्द सांगत होते. या मंदिरात एक ग्रॅनाइटचा चौथरा आहे जो समुद्राचे प्रतीक मानला जातो. भाविक या चौथरावरून उडी मारतात, जे हनुमानाच्या लंकेत मारलेल्या उडीचे प्रतीक आहे. असे केल्याने दुःख दूर होतात आणि मनोकामना पूर्ण होतात अशी भाविकांची श्रद्धा आहे. या मंदिराचा ‘अवल’ (पोहे) हा प्रसाद भाविकांमध्ये अत्यंत लोकप्रिय आहे.
27)Cherumb Eco Tourism Village-



चेरुम्ब इको टुरिझम व्हिलेज हे केरळच्या मलप्पुरम जिल्ह्यातील, निलंबूरजवळील कारुवरकुन्डू येथील ओलिप्पुझा नदीच्या काठावर वसलेले एक निसर्गरम्य पर्यटन स्थळ आहे. या ठिकाणी नदीवरील सुंदर पूल, दोन्ही बाजूंना असलेले गार्डन्स, लहान मुलांसाठी खेळाचे मैदान आणि हिरवळ हे येथील मुख्य आकर्षण आहे. तसेच नदीत बोटिंग करण्याची सोय आहे. येथील आकर्षक झुलत्या पुलावरून सभोवतारच्या निसर्गाचे विहंगम दृश्य पाहता येते. हे ठिकाण हिरवेगार डोंगर, नदी आणि शांत वातावरणाने वेढलेले असल्याने निसर्गप्रेमी व पर्यटनासाठी हे एक उत्तम ठिकाण आहे.
1)कडालुंडी पक्षी अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे?
कडलुंडी पक्षी अभयारण्य केरळ राज्यातील कोझिकोडपासून 19 किमी अंतरावर मलप्पुरम जिल्ह्यात वसलेले आहे.
2)कोट्टक्कल आर्य वैद्य शाळेचे संस्थापक कोण आहेत?
कोट्टक्कल आर्य वैद्य शाळेचे संस्थापक वैद्यरत्नम पी. शंकुन्नी वेरियर हे आयुर्वेदिक चिकित्सक आणि संस्थापक म्हणून सुप्रसिद्ध आहेत.
3)कक्कडम्पोयिल हे ठिकाण कोणत्या गावात आहे?
कक्कडमपोयल हे केरळमधील मलप्पुरम आणि कोझिकोड जिल्ह्यांच्या सीमेवर वसलेले एक सुंदर आणि शांत थंड हवेचे ठिकाण आहे. याला ‘मलबारचे ऊटी’ म्हणूनही ओळखले जाते.


