कोट्टायम जिल्ह्यातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे- Top 29 places to visit in Kottayam District

भारतभ्रमंती या वेबसाईटवर तुम्ही इंग्लिश, हिंदी आणि मराठी भाषेत, भारत देशातील प्रत्येक राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यातील संपूर्ण पर्यटन स्थळे पाहू शकता. आता तुम्ही पाहणार आहात देवभूमी केरळ राज्यातील कोट्टायम जिल्ह्यातील संपूर्ण पर्यटन स्थळे. कोट्टायम जिल्हा हा साक्षरतेसाठी आणि नैसर्गिक सौंदर्यासाठी प्रसिद्ध आहे. या जिल्ह्याला ‘अक्षरांचे शहर’ ‘रबराची भूमी’ आणि ‘तलावांचा प्रदेश’ अशा विविध नावांनी ओळखले जाते. कोट्टायम ही या जिल्ह्याची प्रशासकीय राजधानी असून या जिल्ह्यात कोट्टायम, चंगनाचेरी, कांजिरपल्ली, मीनाचिल आणि वैकोम हे पाच तालुके आहेत. या जिल्ह्याच्या पूर्वेला उंच आणि भव्य पश्चिम घाट आणि पश्चिमेला वेंबनाड सरोवर आहे. कुट्टनाडची भातशेती यांनी वेढलेले कोट्टायम हे वैशिष्ट्यपूर्ण प्रदेश आहे. येथे विस्तीर्ण खाडीचे प्रदेश, हिरवीगार भातशेती, उंच प्रदेश, टेकड्या आणि डोंगर, विस्तृत रबराचे मळे, शांत बॅकवॉटर आणि अनेक दंतकथांशी संबंधित ठिकाणे आहेत. Top 29 places to visit in Kottayam District

पूर्णपणे साक्षर लोकांमुळे कोट्टायम जिल्ह्याला ‘अक्षरे, दंतकथा, रबर आणि सरोवरांची भूमी’ ही नावे मिळाली आहेत. मल्याळम भाषेतील अनेक प्रसिद्ध वर्तमानपत्रे आणि पुस्तके येथून प्रकाशित होत असल्यामुळे याला साहित्याचे माहेरघर मानले जाते. तसेच कोट्टायम हे भारतातील रबर उत्पादनाचे प्रमुख केंद्र आहे. येथे मोठ्या प्रमाणात रबराच्या बागा आहेत आणि येथे भातशेती, मिरपूड आणि नारळाचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर घेतले जाते.भारत सरकारच्या पर्यावरण आणि वन मंत्रालयाने निवडलेले कोट्टायम हे भारतातील पहिले ‘इको सिटी’ शहर आहे. आणि भारताचे माजी राष्ट्रपती श्री के आर नारायणन हे मूळचे कोट्टायम जिल्ह्यातील आहेत. येथील कुमारकोम हे ठिकाण बॅकवॉटरसाठी जगप्रसिद्ध असून कोट्टायम जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात नैसर्गिक व सांस्कृतिक पर्यटन स्थळे आहेत.

Top 29 places to visit in Kottayam District

कोट्टायम जिल्ह्यातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे

1)Ettumanoor Mahadeva temple-

Top 29 places to visit in Kottayam District

एट्टुमानूर महादेव मंदिर हे केरळच्या कोट्टायम जिल्ह्यातील,एक प्राचीन आणि अत्यंत पूजनीय शिव मंदिर आहे. 16 व्या शतकात बांधलेले हे मंदिर, अद्भुत,द्रविडीयन वास्तुशैली, लाकडी कोरीव काम आणि सुंदर भित्तीचित्रांसाठी प्रसिद्ध आहे. येथील मुख्य देवता भगवान शिव येथे ‘एट्टुमानूरप्पन’ म्हणून ओळखले जातात. या मंदिराचे सर्वात मोठे आकर्षण म्हणजे ‘एझारापोन्नना’ (साडेसात सोन्याचे हत्ती) हे हत्ती त्रावणकोरच्या महाराजांनी अर्पण केले होते. वार्षिक उत्सवादरम्यान हे हत्ती दर्शनासाठी ठेवले जातात. हे हत्ती फणसाच्या झाडाच्या लाकडापासून बनवलेल्या आणि सुमारे 13 किलो सोन्याच्या पत्र्यांनी सजवलेल्या भव्य मूर्ती आहेत. आख्यायिकेनुसार पांडव आणि व्यास ऋषींनी येथे पूजा केली होती. या मंदिराच्या प्रवेशद्वारावर एक मोठा नंदादीप आहे जो शेकडो वर्षांपासून अखंड तेवत आहे. मार्च महिन्यात येथे 10 दिवसांचा अरात्तू उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.

2)Kumarakom-

कुमारकोम हे केरळच्या कोट्टायम जिल्ह्यातील, वेंबनाड सरोवराच्या काठावर वसलेले एक नयनरम्य गाव आहे. हे ठिकाण शांत बॅकवॉटर, खारफुटीची जंगले, पाचूसारखी हिरवीगार भातशेती,नारळाच्या बागा, हाऊसबोट्स, विलोभनीय निसर्ग, पांढऱ्या कमळांनी सजलेले मनमोहक जलमार्ग आणि पक्षी अभयारण्यासाठी प्रसिद्ध आहे. येथील खाडीच्या पाण्यात अनेक बेटे आहेत. कुमारकोम गाव 5166 हेक्टर क्षेत्रात पसरलेले आहे, ज्यापैकी 2413 हेक्टर तलावाचा भाग आणि 1500 हेक्टर भातशेतीने समृद्ध आहे. कुमारकोम हे अद्भुत प्रदेश’ असलेले एक अविश्वसनीय सुंदर नंदनवन आहे. हे ठिकाण कुट्टनाड या वैशिष्ट्यपूर्ण भौगोलिक प्रदेशाचा भाग आहे, जिथे समुद्रसपाटीपेक्षा खाली शेती केली जाते. पर्यटक येथे मासेमारी, आयुर्वेदिक मसाज आणि नौकाविहारचा आनंद घेऊ शकतात.

Visit our website: allindiajourney.com

3)Pathiramanal Island-

पाथीरमनल बेट हे केरळच्या कोट्टायम आणि अलाप्पुझा जिल्ह्यांच्या दरम्यान, वेंबनाड सरोवराच्या मध्यभागी वसलेले एक छोटे, नयनरम्य बेट आहे. ‘पाथीरमनल’ या शब्दाचा मल्याळम भाषेतील अर्थ ‘मध्यरात्रीची वाळू’ असा होतो. हे बेट 10 एकर जागेवर पसरलेले असून दुर्मिळ वनस्पती व घनदाट हिरवाईने वेढलेले आहे. येथे जाण्यासाठी फक्त बोटीचा वापर करावा लागतो. वेंबनाड सरोवराच्या मध्यभागी वसलेल्या या नयनरम्य बेटावर विविध प्रकारचे दुर्मिळ 50 पेक्षा जास्त स्थलांतरित पक्षी आणि 90 पेक्षा जास्त स्थानिक पक्ष्यांच्या प्रजाती आढळतात. पर्यटकांसाठी हे बेट दुर्मिळ वनस्पती आणि पक्षीनिरीक्षणासाठी उत्तम ठिकाण आहे.

4)Ilaveezhapoonchira-

इलावीझापून्चिरा हे केरळच्या कोट्टायम जिल्ह्यातील, मेलुकावू गावात कंजारजवळील एक अत्यंत सुंदर आणि निसर्गरम्य हिल स्टेशन आहे. हिरव्यागार चहाच्या मळ्यांनी आणि दऱ्यांनी वेढलेले हे ठिकाण समुद्रसपाटीपासून 3,200 फूट उंचीवर वसलेले असून येथे मानकुन्नू, कुडायथूरमाला आणि थोनिपारा या तीन जैवविविधतेने बहरलेल्या टेकड्या आहेत. “इला-वीझा-पूनचिरा” म्हणजे ‘फुलांचे तळे’ या नावाचा मल्याळममध्ये अर्थ “ज्या फुलांच्या तलावात पाने पडत नाहीत” असा होतो.पावसाळ्यात येथील दरीमध्ये पाणी साचून एका सुंदर तलाव तयार होतो. आख्यायिकेनुसार महाभारतातील पांचाली (द्रौपदी) या तलावात स्नान करत असे. तिचे सौंदर्य कोणाही देवाला दिसू नये म्हणून इंद्राने फुलांच्या टेकड्यांनी हा तलाव सुरक्षित केला होता. पर्यटकांमध्ये हे ठिकाण ट्रेकिंग, सूर्योदय आणि सूर्यास्ताच्या दृश्यांसाठी प्रसिद्ध आहे.

5)Illikkal Kallu-

इलिक्कल कल्लू हे केरळच्या कोट्टायम जिल्ह्यातील, तेकोय जवळ असलेले एक लोकप्रिय आणि निसर्गरम्य पर्यटन स्थळ आहे. पश्चिम घाटाच्या उंच उतारावर वसलेले, हे एक भव्य आश्चर्यकारक व नैसर्गिक मोनोलिथ (एकाच खडकाचा डोंगर) आहे. इलिक्कल कल्लू हा डोंगर तीन भागांमध्ये विभागलेला आहे.कुडा कल्लू- छत्रीच्या आकाराचा खडक, कूनू कल्लू-कुबड असलेला खडक आणि नरकपालम- कड्याच्या काठावरील एक अरुंद पूल. हे प्रामुख्याने तीन मोठ्या खडकांनी बनलेले आहे. ज्यांचे आकार खूपच वैशिष्ट्यपूर्ण आहेत. समुद्रसपाटीपासून हे ठिकाण 4,000 फूट उंचीवर वसलेले असून येथे ‘नीला कोडुवेली’ नावाची एक दुर्मिळ औषधी वनस्पती उगवते. या निळ्या फुलामध्ये अलौकिक शक्ती असल्याने ते समृद्धी आणते असे मानले जाते. हे ठिकाण, विहंगम दृश्ये, धुक्याने वेढलेले रस्ते आणि थरारक ट्रेकिंगसाठी प्रसिद्ध आहे.

6)Vazhikkadavu-

वाझिक्कडवू हे केरळच्या कोट्टायम जिल्ह्यातील, निसर्गरम्य आणि शांत हिल स्टेशन आहे. हे ठिकाण खडकाळ भूभाग आणि हिरव्यागार वनराईने बहरलेले आहे. येथील तीकोय गावाजवळ मीनाचिल नदीवर वाझिक्कडवू धरण बांधण्यात आले आहे. हे एक ‘काँक्रीट ग्रॅव्हिटी’ प्रकारचे धरण असून इडुक्की जलविद्युत प्रकल्पासाठी याचा उपयोग होतो. तीकोय पंचायती अंतर्गत येणारे हे नयनरम्य हिल स्टेशन खडकाळ भूप्रदेश, मीनाचिल नदी आणि डिसेंबर-जानेवारीमध्ये (हिवाळ्यात) ऑर्किड आणि रानफुले फुलणाऱ्या वन्य फुलांसाठी प्रसिद्ध आहे. पर्यटकांना निसर्गाच्या सानिध्यात वेळ घालवण्यासाठी एक शांत आणि निसर्गरम्य ठिकाण आहे.

7)Marmala Waterfall-

मारमाला धबधबा हा केरळच्या कोट्टायम जिल्ह्यातील, एराट्टुपेटा जवळील एक सुंदर आणि निसर्गरम्य धबधबा आहे. 60 मीटर (200 फूट) उंचीवरून कोसळणाऱ्या या धबधब्याच्या सभोवताली घनदाट जंगल, चहा-रबराचे मळे आणि हिरवळ आहे. वर्षभर वाहणारा हा धबधबा पावसाळ्यात अधिक वेगाने वाहतो व अप्रतिम भासतो. म्हणूनच याला ‘जंगलाची मोहिनी’ आणि ‘वेस्टर्न घाट्सचा सुप्त खजिना’ असेही म्हटले जाते. या धबधब्यापर्यंत पोहोचण्यासाठी निसर्गरम्य गावामधून, खडकाळ प्रदेशातून थोडे ट्रेकिंग करावे लागते. धबधब्याच्या खाली एक खोल तलाव तयार निर्माण झाला आहे. पुढे हे पाणी टीकोय नदीला जाऊन मिळते. पर्यटक, ट्रेकिंग आणि निसर्गप्रेमींसाठी हे उत्तम ठिकाण आहे.

8)Wembly /Vellappara Waterfalls-

वेम्बली किंवा वेल्लापारा धबधबा हा केरळच्या कोट्टायम आणि इडुक्की जिल्ह्यांच्या सीमेवर वसलेला एक निसर्गरम्य धबधबा आहे. हा धबधबा कोट्टायम जिल्ह्यातील मुंडक्कयम आणि कूटिक्कल जवळ असून या भागातील सर्वात उंच धबधब्यांपैकी एक आहे. याची उंची साधारणपणे 450 फुटांपेक्षा जास्त आहे. हा धबधबा उरुम्बिक्कारा टेकड्यांमधून खडकांवरून खाली पडताना फेसाळलेल्या पांढऱ्याशुभ्र दुधासारखा दिसतो, ज्यामुळे तो अत्यंत आकर्षक वाटतो.पावसाळ्यात तर या धबधब्याचे रूप खूपच विलोभनीय आणि सुंदर दिसते. वेम्बली जंक्शनपासून हा धबधबा 1.5 किमी अंतरावर आहे.

9)Thirunakkara Shree Mahadeva Temple-

थिरुनाक्कारा श्री महादेव मंदिर हे केरळच्या कोट्टायम जिल्ह्यातील,केरळमधील 108 शिवालयांपैकी एक जागृत शिव मंदिर आहे. हे मंदिर कोट्टायम शहराच्या झाडे आणि वनस्पतींनी समृद्ध असलेल्या 4 एकर जागेवर पसरलेले आहे. 16 व्या शतकात थेक्कुमकूरच्या महाराजांनी हे मंदिर बांधले होते. ‘थिरुनाक्करा थेवर’ म्हणून पूजनीय असलेल्या या मुख्य देवतेला थेक्कुमकूरचे राजघराणे आपली ‘परदेवता’ (कुलदैवत) मानत असत. येथील राजा भगवान वडक्कुम्नाथन यांचे परम भक्त असल्यामुळे, कोट्टायममधील हे मंदिर त्रिशूरमधील वडक्कुम्नाथन मंदिराशी मिळतेजुळते आहे. या मंदिराची रचना ही पारंपरिक केरळी वास्तुकलेचा उत्कृष्ट नमुना असून येथे सर्वात मोठे ‘कूथंबलम’ (मंदिराचे नाट्यगृह) आहे. तसेच या मंदिराजवळ भगवान गणेश, सुब्रमण्य आणि अय्यप्पा यांची लहान मंदिरे आहेत. दरवर्षी येथे फल्गुणा उत्सव आणि थुलम हे उत्सव साजरे केले जातात.

10)Poonjar Palace-

पुंजार पॅलेस हा केरळच्या कोट्टायम जिल्ह्यातील, मीनाचिल तालुक्यातील एक ऐतिहासिक आणि भव्य राजवाडा आहे.600 वर्ष जुना असलेला हा राजवाडा पुंजार राजघराण्याच्या शाही वैभवाचे प्रतीक आहे. पांड्य राजांच्या वारशाशी संबंधित असलेल्या या राजवाड्याचे बांधकाम पारंपारिक केरळ शैलीत करण्यात आले असून या ठिकाणी प्राचीन वस्तूंचा मोठा संग्रह आहे, ज्यामध्ये आयुर्वेदिक थोनी जी एका अखंड लाकडी ओंडक्यातून कोरलेला मालिशसाठीचा पलंग, पालखी आणि भव्य झुंबर, शस्त्रास्त्रे आणि दागिन्यांच्या पेट्या आणि प्राचीन हस्तलिखितांचा संग्रह आहे. तसेच या राजवाड्याच्या जवळच मदुराई मीनाक्षी मंदिराची एक सुंदर प्रतिकृती असलेले कोयक्कल धर्म सास्ता मंदिर आहे. व मंदिराच्या भिंतींवर पौराणिक कथांची शिल्पे कोरलेली आहेत. येथे दगडांमध्ये कोरलेले सुंदर दीपस्तंभ हे या ठिकाणचे खास आकर्षण आहे.

11)Mannanam-

मन्ननम हे केरळच्या कोट्टायम जिल्ह्यातील, एक ऐतिहासिक आणि धार्मिक पर्यटन स्थळ आहे. हिरवळ आणि खाड्यांनी भरलेले हे सुंदर ठिकाण सेंट कुरियाकोस एलियास चावरा यांच्या कार्यासाठी आणि आध्यात्मिक वारशासाठी ओळखले जाते. येथे सेंट जोसेफ मठ, चावरा कुरियाकोस एलियास यांचे स्मारक असून पहिली कॅथोलिक संस्कृत शाळा 1846 मध्ये आणि सेंट जोसेफ मोनेस्ट्री हे चर्च 1831 मध्ये सेंट चावरा यांनी स्थापन केले होते. आणि मन्ननमच्या टेकडीवर असलेले सेंट चावरा पिलग्रिम सेंटर हे एक शांत आणि आध्यात्मिक केंद्र व सेंट चावरा यांचे निवासस्थान आता संग्रहालयात रूपांतरित करण्यात आले आहे. येथील चावरा आर्ट म्युझियममध्ये, चर्चचा इतिहास, जुन्या वस्तू, हस्तलिखिते आणि सेंट चावरा यांच्या वस्तू पाहायला मिळतात. तसेच मन्ननम येथे केरळमधील पहिले खाजगी मुद्रणालय व पहिले मल्याळम दैनिक ‘दीपिका’ 1887 मध्ये सुरू झाले होते. मन्ननममधील पेन्नार कालव्यातून पर्यटकांना बोटीने बॅकवॉटरचा आनंद घेता येतो.

12)St Mary’s Forane Church, Bharananganam-

सेंट मेरी फोरेन चर्च, हे केरळच्या कोट्टायम जिल्ह्यातील, भरणांगनम येथील मीनाचिल नदीच्या काठावर वसलेले महत्त्वाचे ख्रिश्चन तीर्थक्षेत्र आहे. हे चर्च सेंट अल्फोन्सा यांच्या समाधीसाठी जगप्रसिद्ध असून या ठिकाणाला ‘अनाकल्लू पल्ली’ असेही म्हटले जाते. संत म्हणून मान्यता मिळालेल्या भारतीय वंशाच्या पहिल्या महिला, संत अल्फोन्सा यांचे पार्थिव अवशेष येथील चॅपलमध्ये जतन केलेले आहेत. त्यांना 12 ऑक्टोबर 2008 रोजी व्हॅटिकनमध्ये पोप बेनेडिक्ट सोळावे यांनी संत म्हणून घोषित केले. या चर्चच्या आवारात एक संग्रहालय आहे, जिथे सेंट अल्फोन्सा यांच्या वापरातील वस्तू आहेत,ज्यामध्ये त्यांची पुस्तके, पलंग, छत्री इत्यादी जतन करून ठेवल्या आहेत. दरवर्षी 28 जुलै रोजी सेंट अल्फोन्सा यांची पुण्यतिथी मोठ्या उत्साहात साजरी केली जाते,तेव्हा जगभरातून हजारो भाविक येथे येतात.

13)Thiruvarppu Krishna Temple-

तिरुवरप्पू श्रीकृष्ण मंदिर हे केरळच्या कोट्टायम जिल्ह्यातील, मीनाचिल नदीच्या काठी वसलेले, 1500 वर्षे जुने आणि अत्यंत जागृत देवस्थान आहे. या मंदिरातील कृष्णाची मूर्ती कंसवध केल्यानंतरच्या क्रोधीत आणि भुकेलेल्या रूपातील आहे. अशी श्रद्धा आहे की, जर नैवेद्य दाखवण्यास थोडाही उशीर झाला, तर ही मूर्ती हळूहळू बारीक (दुबली) होऊ लागते. त्यामुळे येथे दिवसातून 10 वेळा कृष्णाला ‘भोग’ किंवा नैवेद्य अर्पण केला जातो. आणि हे मंदिर 24 तासांपैकी फक्त 2 मिनिटांसाठी बंद असते. तसेच मंदिराचे कुलूप उघडण्यास काही सेकंद जरी उशीर झाला तरी देवाला भूक लागेल, या भीतीने पुजाऱ्याला चावीसोबत एक कुऱ्हाड दिली जाते. उशीर झाल्यास कुलूप तोडून आत जाण्याची परवानगी असते.इतर मंदिरे सूर्य किंवा चंद्रग्रहणाच्या वेळी बंद असतात, परंतु हे मंदिर कधीही बंद केले जात नाही, कारण देवाला भूक लागते असे मानले जाते.

14)Shree krishna Swami Temple Bharanangam-

श्री कृष्ण स्वामी मंदिर हे केरळच्या कोट्टायम जिल्ह्यातील, भरणांगनम येथील मीनाचिल नदीच्या तीरावर वसलेले एक प्राचीन आणि पवित्र मंदिर आहे. या मंदिराला ‘दक्षिण गुरुवयूर’ म्हणूनही ओळखले जाते. हे मंदिर निसर्गरम्य हिरवळीने आणि रबरच्या बागांनी वेढलेले असून याची स्थापना पांडवांनी केल्याचे सांगितले जाते. येथे भगवान श्रीकृष्ण चतुर्बाहू रूपात (गुरुवायूरसारखे) विराजमान आहेत. याशिवाय येथे शास्ता (अय्यप्पा), गणपती, भगवती आणि नागराज यांच्याही मूर्ती आहेत. या मंदिराच्या बलिकलपुराजवळ अष्टदिक्पालकांचे लाकडी कोरीव काम अत्यंत सुंदर पद्धतीने केलेले आहे. आणि 300 वर्षांपेक्षा जास्त जुना तेल दिवा (आलविलक्कू) आहे, ज्याची सावली जमिनीवर पडत नाही असे मानले जाते. दरवर्षी जानेवारी-फेब्रुवारी मध्ये येथे 8 दिवसांचा मोठा उत्सव साजरा केला जातो.

15) Aymanam village-

आयमनम हे हे केरळच्या कोट्टायम जिल्ह्यातील, एक निसर्गरम्य आणि सांस्कृतिकदृष्ट्या समृद्ध गाव आहे. हे गाव अरुंधती रॉय यांच्या प्रसिद्ध ‘द गॉड ऑफ स्मॉल थिंग्स’ या कादंबरीमुळे जागतिक स्तरावर चर्चेत आले. येथे पारंपारिक केरळची नृत्यकला ‘कथकली’ आणि ‘कलारीपयट्टू’ ही मार्शल आर्ट आजही जपली जाते. या गावाच्या एका बाजूला मीनाचिल नदी आणि दुसऱ्या बाजूला वेंबनाड सरोवर आहे. तसेच बॅकवॉटर, भातशेती आणि नारळाच्या बागांनी नटलेले हे गाव पर्यटकांना आकर्षित करते. आयमनमला ‘मॉडेल रिस्पॉन्सिबल टुरिझम व्हिलेज’ म्हणून घोषित करण्यात आले आहे. या ठिकाणी परिप्पु महादेव मंदिर, पांडवम श्री धर्मसंस्था मंदिर आणि कुडामलूर येथील सेंट मेरी चर्च ही प्रसिद्ध धार्मिक स्थळे आहेत.

16)Thazhathangady Juma Masjid-

थाझथांगडी जुमा मशीद ही केरळच्या कोट्टायम जिल्ह्यातील, मीनाचिल नदीच्या काठी वसलेली प्राचीन मशिद आहे. ही मशीद पारंपारिक केरळ स्थापत्य शैलीत बांधलेले असून भव्य लाकडी कोरीव कामासाठी प्रसिद्ध आहे. ही मशीद सुमारे 1,000 वर्षांहून अधिक जुनी आहे आणि केरळमध्ये इस्लामचा प्रसार करणारे मलिक दिनार यांचे चिरंजीव हबीब दिनार यांनी बांधली होती. या मशिदीची रचना पारंपारिक केरळच्या मंदिरांसारखी आहे. यात घुमट किंवा मिनार नाहीत.मशिदीचे छत, खांब आणि खिडक्यांवर अतिशय सुंदर लाकडी कोरीव काम केलेले आहे. यात ‘थचु शास्त्र’ या पारंपारिक सुतारकाम कलेचा वापर करण्यात आला आहे. याशिवाय येथे अखंड दगडातून कोरलेली पाण्याची मोठी टाकी आणि ‘निल खडीकारम’ हे अंगणात एक जुने सूर्यप्रकाश घड्याळ आजही पाहायला मिळते.

17)Bay Island Driftwood Museum-

बे आयलंड ड्रिफ्टवुड म्युझियम हे केरळच्या कोट्टायम जिल्ह्यातील, कुमारकोम येथील एक अनोखे कला संग्रहालय आहे. या संग्रहालयात समुद्रकिनारी वाहून आलेल्या,अंदमान आणि निकोबार बेटांच्या किनाऱ्यांवरून गोळा केलेल्या लाकडाच्या तुकड्यांपासून बनवलेल्या कलात्मक शिल्पे प्रदर्शित करण्यात आली आहेत. त्यामध्ये प्राणी, पक्षी आणि विविध आकारांचे सुंदर शिल्पे पाहायला मिळतात. या संग्रहालयाची स्थापना निवृत्त शिक्षिका राजी पुननूस यांनी केली आहे. त्यांनी समुद्राच्या लाटांमुळे किनाऱ्यावर वाहून आलेले लाकडाचे तुकडे, मुळे आणि फांद्या गोळा करून त्यांना कलात्मक आकार दिले आहेत. या संग्रहालयाची नोंद लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्स, इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स आणि यूआरएफ बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये करण्यात आली आहे.

18)Mathrumala Devi Temple-

मथरुमाला देवी मंदिर हे केरळच्या कोट्टायम जिल्ह्यातील,कुरुप्पाडा येथील ‘दक्षिण कुडाचाद्री’ म्हणून ओळखले जाणारे एक शांत टेकडीवरील मंदिर आहे.हे मंदिर राजराजेश्वरी देवीला समर्पित आहे. मथरुमाला टेकडीचा परिसर ‘अंबाझथुंकल कार्था’ यांच्या ताब्यात होता. 1749 मध्ये राजा मार्तंड वर्मा यांनी हा भाग काबीज करून वेनाड साम्राज्याला जोडला होता. हे मंदिर टेकडीवर असल्यामुळे येथील वातावरण आल्हाददायक आहे. निसर्गप्रेमी आणि ट्रेकिंगची आवड असणाऱ्यांसाठी हे एक उत्तम ठिकाण आहे. या टेकडीवरून आसपासच्या परिसराचे विहंगम दृश्य दिसते.

19)Discs & Machines – Sunny’s Gramophone Museum-

डिस्क अँड मशिन्स – सनीज ग्रामोफोन म्युझियम अँड रेकॉर्ड्स आर्काइव्ह हे केरळच्या कोट्टायम जिल्ह्यातील, सनी मॅथ्यू यांचे खाजगी आणि अद्वितीय ग्रामोफोन संग्रहालय आहे. 2015 मध्ये सुरू झालेले, हे भारतातील संग्रहालय केरळ वन विकास महामंडळाचे सेवानिवृत्त अधिकारी श्री. सनी मॅथ्यू यांनी त्यांच्या तीन दशकांच्या परिश्रमातून उभारले आहे. या संग्रहालयात दुर्मिळ ग्रामोफोन रेकॉर्ड्स आणि मशिन्सचे सुमारे 10,00,000 पेक्षा जास्त रेकॉर्ड त्यामध्ये शेलॅक,विनाइल, कागद आणि ॲल्युमिनियमपासून बनवलेल्या रेकॉर्ड्सचा समावेश आहे.आणि 260+ ग्रामोफोन फोनोग्राफ, रेकॉर्ड प्लेयर्स, वायर रेकॉर्डर्स आणि टेप रेकॉर्डर्स प्रदर्शित केले आहेत. याशिवाय येथे 1895 सालापासूनची दुर्मिळ ऐतिहासिक मुद्रणे उपलब्ध आहेत. यामध्ये रवींद्रनाथ टागोर यांनी गायलेले राष्ट्रगीत, महात्मा गांधींची भाषणे आणि 1902 मधील भारतातील पहिले व्यावसायिक मुद्रण अशा गोष्टींचा समावेश आहे. तसेच येथे जुन्या कार, मोटारसायकली, रेडिओ, जुने टेलिफोन, शिलाई मशीन्स आणि लाकडी कलाकृती पाहायला मिळतात.

20)Mango Meadows Agricultural Theme Park-

मँगो मेडोज हे केरळच्या कोट्टायम जिल्ह्यातील,अयमकुडी कडूथुरुथी, येथील जगातील पहिले कृषी थीम पार्क आहे. 30 एकरात पसरलेल्या या उद्यानात निसर्ग, सेंद्रिय शेती आणि मनोरंजन यांचा अनोखा संगम पाहायला मिळतो. या ठिकाणी 4500 पेक्षा जास्त वनस्पती, त्यामध्ये 1900 औषधी वनस्पती, 700 प्रकारची फळझाडे आणि विविध फुलांच्या प्रजाती आहेत. तसेच येथे प्रत्येक जन्म-ताऱ्याशी (नक्षत्र) संबंधित वृक्षांचे एक विशेष ‘नक्षत्रवलय’ ठिकाण आहे. येथे निवासासाठी आलिशान कॉटेज, व्हॉटर व्हिला, ट्री हाऊस (एरुमाडम), केव्ह रिसॉर्ट आणि विविध मनोरंजक उपक्रम उपलब्ध आहेत. पर्यटक येथे नौकाविहार, मासे पकडणे, तिरंदाजी, गो-कार्टिंग, नेमबाजी, सायकलिंग, कुंभारकाम आणि काथ्या काम याचा आनंद घेऊ शकतात. याशिवाय येथे 12 डी थिएटर, व्ह्यू टॉवर आणि लहान मुलांसाठी स्वतंत्र चिल्ड्रन्स पार्क आहे.

21)Mozart Art Gallery-

मोझार्ट आर्ट गॅलरी (आर्ट कॅसल) ही केरळच्या कोट्टायम जिल्ह्यातील, आयमनम गावातील कलाप्रेमींसाठी एक खास खाजगी आर्ट गॅलरी आहे. ही गॅलरी प्रसिद्ध कलाकार श्री. एम. सोमू यांची असून ती त्यांच्या स्वतःच्या घराच्या आवारात आहे.येथे केरळच्या पारंपारिक वस्तू, समकालीन आणि शास्त्रीय चित्रांचा सुंदर संग्रह, आणि सोमू यांनी ॲक्रेलिक, ऑइल (तैलचित्र) चारकोल, पेन्सिल आणि वॉटर कलरचा वापर करून साकारलेली चित्रे प्रदर्शित केली आहेत. आणि या गॅलरीतील काही कलाकृती अरुंधती रॉय यांच्या प्रसिद्ध पुस्तक ‘द गॉड ऑफ स्मॉल थिंग्स’ या थीमवर आधारित आहेत. कलाप्रेमींसाठी ही एक खास खाजगी आर्ट गॅलरी असून या गॅलरीत विद्यार्थ्यांना कलेचे प्रशिक्षण दिले जाते.

22)Clay Art Cafe-

क्ले आर्ट कॅफे हे केरळच्या कोट्टायम जिल्ह्यातील, केके रोडवर वसलेले एक आकर्षक वैशिष्ट्यपूर्ण आर्ट गॅलरी आर्ट गॅलरी आणि कॅफेचे मिश्रण आहे. ही इमारत मातीची असून, बांबूच्या छताचा वापर करून पारंपारिक पद्धतीने बांधलेले आहे. येथे चित्रांचा आणि कलाकृतींचा उत्कृष्ट संग्रह आहे. आणि मागणीनुसार, येथे थेट मातीकाम (क्ले मॉडेलिंग) पाहता येते. येथे कॉफी, चहा, कॅपुचिनो, लाटे, एस्प्रेसो आणि विविध प्रकारचे चहा, स्वादिष्ट मिल्कशेक हे पदार्थ मिळतात. आणि कॉफीसाठी प्रसिद्ध असलेल्या या कॅफेमध्ये स्थानिक कलाकृती आणि चित्रे ही विकली जातात. हे ठिकाण शांत आणि आरामदायक असून प्रवासादरम्यान विश्रांती घेण्यासाठी उत्तम आहे.

23)Vaikom Mahadeva Temple-

वैकोम महादेव मंदिर हे केरळच्या कोट्टायम जिल्ह्यातील,भगवान शिवाचे प्राचीन आणि पवित्र मंदिर आहे.येथील शिवलिंग त्रेतायुगातील असल्याचे मानले जाते. हे मंदिर पारंपारिक केरळ शैलीत बांधलेले असून त्याचे ‘श्रीकोविल’ (गर्भगृह) बाहेरून अंडाकृती आकाराचे आहे, जे केरळमध्ये इतरत्र कुठेही आढळत नाही. आणि मुख्य गर्भगृहात काळ्या दगडाचे सहा फूट उंच शिवलिंग आहे. तसेच येथे वैकोम महादेव मंदिर, एट्टुमनूर शिव मंदिर आणि कडूथुरुथी थालियिल महादेव मंदिर ही तीन शक्तिशाली मंदिरे मानली जातात,आणि एकाच दिवसात या तिन्ही मंदिरांचे दर्शन घेतल्यास सर्व इच्छा पूर्ण होतात, अशी भाविकांची श्रद्धा आहे. या मंदिरात डिसेंबर महिन्यातील वैकोम अष्टमी आणि महाशिवरात्री हे सण मोठ्या उत्साहात साजरे केले जातात.

24)Thangalpara-

थंगलपारा हे केरळच्या कोट्टायम जिल्ह्यामध्ये वाघमोन जवळील एक प्रसिद्ध मुस्लिम तीर्थक्षेत्र आणि निसर्गरम्य पर्यटन स्थळ आहे. हे ठिकाण अफगाणिस्तानातील सुफी संत हजरत शेख फरीदुद्दीन यांचा दर्गा म्हणून प्रसिद्ध असून हे संत सुमारे 800 वर्षांपूर्वी या टेकडीवर राहत होते. या टेकडीच्या माथ्यावर एक विशाल गोलाकार खडक आहे. आख्यायिकेनुसार हा खडक पूर्वी एक छोटा दगड होता जो संत त्यांचे पान कुटण्यासाठी वापरत असत आणि त्यांच्या मृत्यूनंतर तो आकाराने मोठा झाला.समुद्रसपाटीपासून हे ठिकाण 2,500 मीटर उंचीवर असून येथून वाघमोन शहर आणि सभोवतालच्या परिसराचे विहंगम दृश्य दिसते. तसेच येथे एक प्राचीन गुहा देखील पाहायला मिळते.दरवर्षी एप्रिल महिन्यात येथे ‘उरूस’ हा उत्सव साजरा केला जातो.

25)Malliyoor Sree MahaGanapati Temple –

श्री मल्लियूर महागणपती मंदिर हे केरळच्या कोट्टायम जिल्ह्यातील, अत्यंत जागृत आणि पवित्र गणेश मंदिर आहे. या मंदिराला ‘केरळचे सिद्धिविनायक’ म्हणूनही ओळखले जाते.येथील मुख्य देवता वैष्णव गणपती असून येथील गणपतीची मूर्ती इतर मंदिरांपेक्षा वेगळी आहे. येथे गणपतीच्या डाव्या मांडीवर बालकृष्ण बसलेला आहे. हे रूप वैष्णव आणि शैव पंथांच्या एकतेचे प्रतीक मानले जाते. या मूर्तीच्या हातात कुऱ्हाड, दोरी, शिंग आणि लाडू असून सोंडेच्या टोकावर लिंबू आहे. तसेच या मंदिरात भगवती, अयप्पा, नागराज, यक्षी आणि ब्रह्मराक्षस या उपदेवतांचीही पूजा केली जाते. हे मंदिर पेरुमल राजांच्या काळापासून अस्तित्वात असल्याचे मानले जाते.दरवर्षी मार्च-एप्रिलमध्ये 8 दिवसांचा ‘तिरुवुत्सवम’ साजरा केला जातो. आणि विनायक चतुर्थी व शंकरन नंबुद्री यांची जयंतीही साजरी केली जाते.

26)Sri Kumaranalloor Devi Temple-

श्री कुमारनल्लूर देवी मंदिर हे केरळच्या कोट्टायम जिल्ह्यातील,अत्यंत प्राचीन मंदिर आहे. पौराणिक पुराव्यांनुसार हे मंदिर 2400 वर्षांहून जुने आहे. या मंदिरातील भगवती देवीला (कात्यायनी) भाविक मदुराई मीनाक्षीचे रूप मानतात. मंदिराची वास्तूकला अत्यंत सुंदर असून येथील गर्भगृह आणि नालंबलम यांची रचना ‘श्रीचक्र’ या दुर्मिळ शैलीत केलेली आहे. हे मंदिर भगवान परशुराम यांनी स्थापित केलेल्या 32 ग्रामांपैकी एक आहे. असे सांगण्यात येते. तृकार्थिका हा या मंदिराचा महत्त्वाचा उत्सव असून तो डिसेंबर मध्ये 10 दिवस साजरा केला जातो. याशिवाय येथे नवरात्री, मीना पूरम, विशू आणि शिवरात्री हे सण उत्साहात साजरे होतात.

27)Panachikkadu Dakshina Mookambika Temple-

पणचिक्कडू दक्षिणा मूकांबिका मंदिर हे केरळच्या कोट्टायम जिल्ह्यातील, पनाचिक्कडू गावातील सरस्वती देवीचे प्राचीन आणि पवित्र तीर्थक्षेत्र आहे. या मंदिराला “दक्षिणेची मूकांबिका” म्हणून ओळखले जाते. या मंदिरात देवी सरस्वतीची मूर्ती एका तलावात वेलींनी वेढलेली असून देवीच्या पायापाशी एक नैसर्गिक पाण्याचा झरा अखंड वाहत असतो, जो उन्हाळ्यातही कधीच आटत नाही. हे सरस्वती मंदिर म्हणून प्रसिद्ध असले, तरी या मंदिराचे मुख्य दैवत भगवान विष्णू आहेत, ज्यांची स्थापना सरस्वती देवीच्या खूप आधी झाली होती. या मंदिरात गणपती, शिव, सास्ता (अयप्पा), यक्षी आणि ब्रह्मराक्षस यांच्याही मूर्ती आहेत. तसेच या मंदिरात लहान मुलांच्या अक्षराभ्यासासाठी सरस्वती पूजा आणि ‘विद्यरंभम’ सोहळा आयोजित केला जातो. आणि मुलांची बुद्धिमत्ता वाढवण्यासाठी मंदिरात ‘सारस्वत मंत्राने’ अभिमंत्रित केलेले तूप प्रसाद म्हणून दिले जाते.

28)Vennimala Sri Ramalakshman Temple-

वेन्निमाला श्री राम लक्ष्मण मंदिर हे केरळच्या कोट्टायम जिल्ह्यातील, पुथुपल्ली गावातील प्राचीन मंदिर आहे.वेन्निमाला हे टेकड्यांचे गाव आहे, हे मंदिर 1500 फूट उंच टेकडीवरअसून 1000 वर्षे जुने आहे. हा परिसर अत्यंत निसर्गरम्य व रबर बागांनी वेढलेला आहे. आख्यायिकेनुसार त्रेतायुगात भगवान राम आणि लक्ष्मण यांनी वनवासादरम्यान या ठिकाणी भेट दिली होती. व लक्ष्मणाने येथे ऋषींना त्रास देणाऱ्या असुरांचा वध केला, त्यामुळे हे ठिकाण ‘विजयद्रि’ असे नाव पडले, ज्याचे रूपांतर नंतर वेन्निमाला (मल्याळम भाषेत) असे झाले. पश्चिमाभिमुख असलेले हे मंदिर केरळ शैलीतील वास्तुकलेसाठी प्रसिद्ध आहे. व दक्षिण अयोध्या’ म्हणूनही ओळखले जाते. हे मंदिर प्राचीन केरळचा सम्राट चेरमान पेरुमल याने बांधले असल्याचे सांगितले जाते. या मंदिरात मुख्य मूर्ती लक्ष्मणाची असली तरी, श्री रामालाही समान महत्त्व दिले जाते.

29)Nadukani Hills-

नदुकाणी हिल्स हे केरळच्या कोट्टायम जिल्ह्यातील, अत्यंत सुंदर आणि निसर्गरम्य थंड हवेचे ठिकाण आहे. हे ठिकाण समुद्रसपाटीपासून 3,000 फूट उंचीवर आहे व येथून मुवट्टुपुझा नदी, जंगलातून जाणारे ट्रेकिंगचे मार्ग, मूलमट्टम गाव आणि मलंकारा जलाशयाचे विलोभनीय दृश्य, व उत्तरेकडील डोंगररांगां आणि पश्चिम घाटाचे विहंगम दृश्य दिसते. येथे राज्य वीज मंडळाने बांधलेली ‘नदुकाणी पॅव्हेलियन’ ही दोन मजली वास्तू पर्यटकांसाठी एक सुरक्षित व्ह्यू-पॉईंट म्हणून काम करते, जिथून परिसराचे ‘बर्ड्स आय व्ह्यू’ घेता येतो. हे ठिकाण वन्यजीव अभयारण्याजवळ असल्याने येथे हत्ती, सांबर, विविध प्रकारचे पक्षी, वनस्पती आणि प्राणी पाहायला मिळतात.येथील वातावरण नेहमी थंड आणि आल्हाददायक असल्यामुळे निसर्गप्रेमी आणि ट्रेकर्ससाठी हे एक उत्तम ठिकाण आहे.

Visit the travel blog

1)कोट्टायम जिल्हा कशासाठी प्रसिद्ध आहे?

कोट्टायम जिल्हा हा दीपिका आणि मल्याळ मनोरमा ही मल्याळम वृत्तपत्रे, रबरची लागवड, बॅकवॉटर्स आणि कोट्टायम हे “अक्षरांचे शहर” म्हणून प्रसिद्ध आहे.

2) कोट्टायम जिल्ह्यातील तिरुनाक्करा मंदिराचा इतिहास काय आहे?

तिरुनाक्करा महादेव मंदिर हे कोट्टायम मधील 500 वर्षांपूर्वी थेक्कुमकुरच्या महाराजांनी बांधलेले केरळमधील 108 पूजनीय शिवालयांपैकी एक आहे.

3)कोट्टायम जिल्ह्यातील श्री कुमारनल्लूर देवी मंदिराचा इतिहास काय आहे?

श्री कुमारनल्लूर देवी मंदिर हे 2,400 वर्ष प्राचीन व केरळमधील 108 प्रसिद्ध देवी मंदिरांपैकी एक आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
Scroll to Top