कासारगोड जिल्ह्यातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे- Top 29 places to visit in Kasargod District

भारतभ्रमंती या वेबसाईटवर तुम्ही इंग्लिश, हिंदी आणि मराठी भाषेत, भारत देशातील प्रत्येक राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यातील संपूर्ण पर्यटन स्थळे पाहू शकता. आता तुम्ही पाहणार आहात देवभूमी केरळ राज्यातील कासारगोड जिल्ह्यातील संपूर्ण पर्यटन स्थळे. कासारगोड जिल्हा हा केरळ राज्यातील सर्वात उत्तरेकडील जिल्हा आहे. हा जिल्हा नैसर्गिक सौंदर्य, ऐतिहासिक किल्ले, आणि विविध भाषांच्या संगमासाठी ओळखला जातो. येथे प्रामुख्याने मल्याळम, तुळू, कन्नड, मराठी, कोकणी, बेअरी आणि उर्दु अशा सात प्रमुख भाषा बोलल्या जातात. त्यामुळे या जिल्ह्याला ‘सप्त भाषा संगमा भूमी’ असेही म्हटले जाते. 24 मे 1984 रोजी स्थापना झालेल्या या जिल्ह्याचे प्रशासकीय मुख्यालय कासारगोड शहरात आहे. Top 29 places to visit in Kasargod District

आणि 70 किमी लांबीची किनारपट्टी लाभलेल्या या जिल्ह्याच्या पूर्वेला पश्चिम घाट आणि पश्चिमेला अरबी समुद्र आहे. तसेच हा जिल्हा ‘थय्यम’ यक्षगान, पूरक्कली आणि कोलकली या नेत्रदीपक व पारंपारिक लोककला प्रकारासाठी प्रसिद्ध आहे. या जिल्ह्यात कासारगोड, होसदुर्ग, वेल्लारीकुंडू आणि मंजेश्वरम हे चार तालुके असून येथे नारळ, सुपारी आणि काजूचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन होते. आणि हा जिल्हा हातमाग व कॉयर उद्योगांसाठी ओळखला जातो. या जिल्ह्यात ऐतिहासिक किल्ले, नयनरम्य समुद्रकिनारे व बॅकवॉटर, धार्मिक स्थळे आणि निसर्गरम्य हिल स्टेशन्स मोठ्या प्रमाणात आहेत.

Top 29 places to visit in Kasargod District

कासारगोड जिल्ह्यातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे

1)Ananthapura Lake Temple-

Top 29 places to visit in Kasargod District

अनंतपुरा तलाव मंदिर किंवा श्री अनंतपद्मनाभ स्वामी मंदिर हे केरळच्या कासारगोड जिल्ह्यातील, मंजेश्वरम तालुक्यात , अनंतपुरा गावात वसलेले प्राचीन धार्मिक स्थळ आहे. हे मंदिर एका सरोवराच्या मध्यभागी वसलेले असून या मंदिराची स्थापना 9 व्या शतकात झाल्याचे सांगितले जाते. आणि हे मंदिर तिरुवनंतपुरममधील प्रसिद्ध श्री पद्मनाभस्वामी मंदिराचे ‘मूळ स्थान’ मानले जाते. या मंदिरात भगवान विष्णू (अनंत पद्मनाभ) शेषनागावर बसलेल्या अवस्थेत आहेत. व मंदिराच्या छतावर लाकडी कोरीव कामामध्ये भगवान विष्णूच्या ‘दशावतारांचे’ वर्णन केले आहे. येथील वैशिष्ट्य म्हणजे मंदिराच्या तलावात 75 वर्षांपेक्षा जास्त एक ‘शाकाहारी मगर’ (बाबिया) राहत होती, जिला देवतेचे रक्षक मानले जात असे. ती मगर आता जिवंत नाही परंतु हे स्थान या वैशिष्ट्यासाठी प्रसिद्ध आहे.

2)Bekal Fort-

बेकल किल्ला हा केरळच्या कासारगोड जिल्ह्यातील, होसदुर्ग तालुक्यात अरबी समुद्राच्या किनाऱ्यावर वसलेला सागरी किल्ला आहे. हा भव्य किल्ला 40 एकर परिसरात पसरलेला आहे. व त्याच्या अनोख्या ‘की-होल’ (किल्लीच्या छिद्रासारख्या) डिझाइनसाठी प्रसिद्ध आहे. या किल्ल्याचे बांधकाम 17 व्या शतकात शिवप्पा नायक यांनी केल्याचे सांगितले जाते. पुढे हा किल्ला हैदर अली, टिपू सुलतान आणि अखेरीस ब्रिटिशांच्या ताब्यात होता. मजबूत तटबंदी असलेल्या या किल्ल्याचा तीन-चतुर्थांश भाग समुद्राने वेढलेला आहे. आणि किल्ल्यात तोफा ठेवण्याच्या निरीक्षण मनोऱ्यावरून समुद्राचे विहंगम दृश्य दिसते. किल्ल्याच्या प्रवेशद्वाराजवळ एक हनुमान मंदिर आणि टिपू सुलतानच्या काळातील एक जुनी मशीद आहे. मणिरत्नम यांच्या प्रसिद्ध ‘बॉम्बे’ चित्रपटातील ‘तू ही रे’ हे गाणे याच किल्ल्यात चित्रित झाले आहे.

Visit our website: allindiajourney.com

3)Maipady Palace-

मैपडी पॅलेस हा केरळच्या कासारगोड जिल्ह्यातील,ग्रामीण भागात वसलेला एक ऐतिहासिक राजवाडा आहे. हा राजवाडा केरळच्या ‘नालुकेट्टू’ स्थापत्यशैलीतील पारंपरिक रचनेनुसार बांधलेली एक दुमजली इमारत आहे. आणि येथील अंगणाच्या असून मध्यभागी ‘तुळसी वृंदावन’ आहे. 400 वर्षापूर्वी कदंब घराण्याचे महाराज श्री राजा मयूर वर्मा यांनी हा राजवाडा बांधला. या राजवाड्यात मुख्य देवता राजराजेश्वरी आणि दुर्गा परमेश्वरी यांची मंदिरे असून,अनेक कमानी असलेली एक लांब व्हरांडा आहे, तसेच अनेक लहान मंदिरे आणि मंदिर तलाव आहे. तसेच या राजवाड्याच्या आवारात नारळ आणि सुपारीची भरपूर झाडे आहेत. दरवर्षी हे राजघराणे नवरात्रीमध्ये राजवाड्याची मुख्य देवता श्री राजराजेश्वरीची नऊ दिवसांचा उत्सव मोठ्या थाटामाटाने साजरा केला जातो आणि सर्व भक्तांना भोजन प्रसाद दिला जातो.

4)Chandragiri Fort-

चंद्रगिरी किल्ला हा केरळच्या कासारगोड जिल्ह्यातील, पायस्विनी नदी (किंवा चंद्रगिरी नदी) आणि अरबी समुद्राच्या संगमाजवळ वसलेला ऐतिहासिक आणि निसर्गरम्य किल्ला आहे. हा किल्ला 17 व्या शतकात केळादी राजवंशातील शिवप्पा नायक यांनी बांधला होता. समुद्रसपाटीपासून हा किल्ला 150 फूट उंचावर असून सात एकर परिसरात पसरलेला आहे. या किल्ल्याचा आकार चौकोनी आहे व तो लॅटराईट (जांभा) दगडांपासून बनवलेला आहे. तसेच किल्ल्यामध्ये तोफा ठेवण्यासाठी 8 गोलाकार बुरुज, जुन्या बराकींचे अवशेष आणि एक भूमिगत बोगदा आहे. पर्यटकांना या किल्ल्यावरून चंद्रगिरी नदी,आजूबाजूच्या नारळाच्या बागा, अरबी समुद्र आणि सूर्यास्ताचे विहंगम दृश्य पाहता येते. व पायस्विनी नदीमध्ये बोटीने फिरण्याची सोय आहे. सध्या हा किल्ला केरळ पुरातत्व विभागाच्या संरक्षणाखाली ‘राज्य संरक्षित स्मारक’ म्हणून घोषित आहे.

5)Kizhur Sree Sastha Temple-

श्री शास्ता मंदिर हे केरळच्या कासारगोड जिल्ह्यातील, कीझूर येथील चंद्रगिरी नदीच्या काठी,चंद्रगिरी किल्ल्याजवळ वसलेले प्राचीन आणि प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आहे. हे मंदिर भगवान शास्ता (अय्यप्पा) यांना समर्पित आहे. आणि या मंदिरात भगवती देवी व भगवान सुब्रमण्यम यांचीही छोटी मंदिरे आहेत. या मंदिराची वास्तुकला पारंपरिक केरळ शैलीतील आहे, व हे मंदिर निसर्गरम्य परिसरात असून, नोव्हेंबर महिन्यातील 16 दिवसांच्या ‘पट्टू उत्सव’ या वार्षिक महोत्सवासाठी ते विशेष ओळखले जाते. त्यावेळी अनेक भाविक या उत्सवात सहभागी होतात.
या मंदिराला ‘उत्तर केरळचे सबरीमाला’ असेही म्हटले जाते. कारण येथे दर्शन घेतल्याने शनिदोष आणि शत्रूभय दूर होते. अशी भाविकांची श्रद्धा आहे.

6)Nileshwaram-

नीलेश्वरम हे केरळच्या कासारगोड जिल्ह्यातील, एक ऐतिहासिक आणि कासारगोड जिल्ह्याची सांस्कृतिक राजधानी असलेले शांत व निसर्गरम्य गाव आहे. तेजस्विनी आणि कव्वयी या दोन नद्यांच्या मध्ये वसलेले हे शहर पवित्र उपवने, नीलेश्वरम राजवाडा, प्राचीन मंदिरे आणि अनेक राजवाडे, सर्पवन, थेय्यम नृत्य आणि खाड्या व समुद्रकिनाऱ्यांचे अनोखे मिश्रण व सुंदर बॅकवॉटरसाठी प्रसिद्ध आहे. पूर्वी हे ठिकाण नीलेश्वर राजांचे निवासस्थान होते, जे 600 वर्षांपूर्वी कोझिकोडमधून येथे स्थलांतरित झाले होते. येथे थेक्के कोविलकोम, किनावूर कोविलकोम आणि कोविलकोम चिरा हे राजवाडे आहेत. व नीलेश्वरम राजवाडा हा ‘नालुकेट्टू’ या पारंपारिक केरळ स्थापत्यशैलीत बांधलेला असून, येथील बाल्कनीवर ठेवलेला सिंहाचा पुतळा हा राजवाड्याचे अधिकृत प्रतीक मानला जातो. हा राजवाडा आता पुरातत्व विभागाचे लोककला केंद्र म्हणून ओळखला जातो. नीलेश्वरम, हे गाव पर्यटक आणि निसर्गप्रेमींसाठी एक स्वर्ग आहे.

7)Shree Madanantheswara Sidhivinayaka/Madhur Temple-

श्री मदननथेश्वर सिद्धिविनायक मंदिर किंवा मधुर मंदिर हे केरळच्या कासारगोड जिल्ह्यातील, एक प्राचीन आणि प्रसिद्ध धार्मिक स्थळ आहे. या मंदिराची रचना केरळ आणि द्रविड शैलीतील वास्तुकलेचा सुंदर नमुना असून ‘गजपृष्ठ’ (हत्तीच्या पाठीसारखी) आहे व त्याला तीन स्तरांचे घुमट आहे.आणि मंदिराचे छत तांब्याच्या पत्र्यांनी मढवलेले आहे. व मंदिराच्या सभामंडपामध्ये रामायण आणि महाभारतातील प्रसंगांचे अत्यंत सुंदर लाकडी कोरीव काम केलेले आहे. सुरुवातीला हे शिवालय होते, परंतु ‘मधुरा’ नावाच्या एका स्त्रीला मिळालेल्या उद्भव मूर्तीमुळे हे गणपती मंदिर म्हणून अधिक प्रसिद्ध झाले. असे सांगितले जाते की टीपू सुलतानने या मंदिराला नष्ट करण्याचा प्रयत्न केला होता, परंतु मंदिराच्या विहिरीतील पाणी प्यायल्यानंतर त्याने आपला निर्णय बदलला. आजही विहिरीवर त्याच्या खंजिराची खूण असल्याचे सांगितले जाते. दरवर्षी येथे गणेश चतुर्थी आणि वार्षिक ‘मधुर बेदी’ (पाच दिवसांचा सोहळा) मोठ्या उत्साहात साजरे केले जातात.

8)Hosdurg Fort-

होसदुर्ग किल्ला हा केरळच्या कासारगोड जिल्ह्यातील, कन्हानगड येथील एक ऐतिहासिक किल्ला आहे. या किल्ल्याला कन्हानगड किल्ला म्हणूनही ओळखले जाते. हा किल्ला 18 व्या शतकात इक्केरीच्या केलाडी नायक घराण्यातील सोमशेखर नायक यांनी बांधला होता. हा किल्ला सुंदर समुद्रकिनारे, नद्या आणि बॅकवॉटर जवळ असून विशिष्ट गोलाकार बुरुजांसाठी प्रसिद्ध आहे. सध्या हा किल्ला काही प्रमाणात भग्नावस्थेत असून त्याच्या विटांच्या उंच भिंती अजूनही पाहायला मिळतात. या किल्ल्याच्या नैऋत्येला 45 लेण्यांसह असलेला प्रसिद्ध नित्यानंद आश्रम आहे. व येथे नायकांनी बांधलेले भगवान शिवाचे ‘पुंकवनम कर्पूरेश्वर मंदिर’ आहे. सध्या किल्ल्याच्या परिसराचा वापर काही सरकारी कार्यालयांसाठी केला जातो.

9)Ranipuram Hills & Ranipuram Wildlife Sanctuary-

राणीपुरम टेकड्या आणि राणीपुरम वन्यजीव अभयारण्य हे केरळच्या कासारगोड जिल्ह्यातील, अत्यंत लोकप्रिय निसर्गरम्य हिल स्टेशन आहे. या ठिकाणाला ‘केरळचे उटी’ म्हणूनही ओळखले जाते. राणीपुरम टेकड्या ह्या घनदाट सदाहरित ‘शोला’ जंगलातून आणि विस्तीर्ण गवताळ प्रदेशातून गेलेल्या 5 किमी लांबीच्या सुंदर ट्रेकिंग मार्गासाठी प्रसिद्ध आहेत. रानीपुरम पूर्वी मदथुमाला म्हणून ओळखले जात असे. पश्चिम घाटातील हे ठिकाण कान्हनगडाच्या पूर्वेला सुमारे 48 किमी. व समुद्रसपाटीपासून 780 मीटर उंचीवर आहे. येथील राणीपुरम वन्यजीव अभयारण्य हे निसर्गप्रेमी आणि ट्रेकर्ससाठी एक आदर्श ठिकाण आहे. या अभयारण्यात हत्ती, बिबट्या, रानडुक्कर, मलबार जायंट स्क्विरल (शेकरू), विविध प्रकारचे पक्षी आणि दुर्मिळ फुलपाखरे पाहायला मिळतात.

10)Arikadi Fort-

अरिकाडी किल्ला किंवा कुंबळा किल्ला हा केरळच्या कासारगोड जिल्ह्यातील, एक ऐतिहासिक किल्ला आहे. हा किल्ला कुंबळा नदी आणि शिरिया नदी यांच्या दरम्यान वसलेला आहे. 1608 मध्ये केलडी नायकांचे राजा वेंकटप्पा नायका यांनी या किल्ल्याचे बांधकाम केले होते. आणि 18 व्या शतकात टीपू सुलतानने या किल्ल्याची तटबंदी अधिक मजबूत केली आणि याचा वापर लष्करी चौकी म्हणून केला. 2015 मध्ये केरळ विद्यापीठाच्या पुरातत्व विभागाने केलेल्या उत्खननात येथे एक भव्य ‘हॉल’ सापडला. व चिनी मातीची भांडी, जुनी नाणी आणि शिशाच्या गोळ्या तयार करण्याचे साचेही आढळून आले आहेत.या किल्ल्याच्या जवळच एक प्राचीन हनुमान मंदिर आहे. तसेच या किल्ल्याला अनेक बुरुज असून तेथून अरबी समुद्राचे सुंदर दृश्य दिसते.

11)Parappa Wildlife Sanctuary-

परप्पा वन्यजीव अभयारण्य हे केरळच्या कासारगोड जिल्ह्यातील, वेल्लारीकुंडू तालुक्यात परप्पा येथील एक निसर्ग संवर्धन क्षेत्र आहे. हे अभयारण्य 25 चौरस किलोमीटर क्षेत्रात पसरलेले असून, येथे घनदाट सदाहरित जंगले, विविध प्रकारच्या वनस्पती, पक्षी आणि प्राणी आढळतात. यामध्ये सिंहपुच्छ माकड, मलबार महाकाय खार, हत्ती, वाघ, कासव, साळिंदर, रानमांजर, दुर्मिळ वन्यजीव, स्लेंडर लोरिस, मलबार हॉर्नबिल आणि वैविध्यपूर्ण औषधी वनस्पती आढळतात. तसेच या अभयारण्याच्या परिसरातून वाहणाऱ्या नद्या आणि धबधबे पर्यटकांना आकर्षित करतात.पर्यटकांना येथे ट्रेकिंग, पक्षी निरीक्षण आणि निसर्ग छायाचित्रणासाठी हे नंदनवन आहे.

12)Shri Mahalingeshwara Temple, Adoor-

श्री महालिंगेश्वर मंदिर हे केरळच्या कासारगोड जिल्ह्यातील, अडोर येथील अत्यंत प्राचीन शिव मंदिर आहे.आख्यायिकेनुसार, याच ठिकाणी भगवान शिव आणि अर्जुन यांच्यात ‘किरथ युद्ध’ झाले होते. व अर्जुनाने या मंदिराची स्थापना केली होती. नंतर 13 व्या शतकात हे प्राचीन मंदिर पायस्विनी नदीच्या दक्षिण तीरावर स्थलांतरित करण्यात आले. हे मंदिर पारंपरिक केरळ शैलीतील वास्तुकलेचा एक उत्तम नमुना असून मंदिराचे छत तांब्याच्या पत्र्यांनी बनवलेले आहे व त्यावर कोरीव काम केलेले आहे. तसेच या मंदिराच्या भिंतींवर पौराणिक चित्रे कोरलेली आहेत. येथे मुख्य देवता महालिंगेश्वर (शिव) असून, महाविष्णू, गणपती, शास्ता आणि इतर उपदेवतांच्या मूर्तीही आहेत.व येथील नंदीची मूर्ती उभ्या स्थितीत आहे. दरवर्षी महाशिवरात्री येथे मोठ्या उत्साहात साजरी केली जाते.

13)Anandashram, & Nityananda Ashram-

आनंदाश्रम आणि नित्यानंद आश्रम हे केरळच्या कासारगोड जिल्ह्यातील, कन्हानगड येथील अत्यंत शांत व पवित्र आध्यात्मिक केंद्रे आहेत. हे दोन्ही आश्रम एकमेकांपासून साधारणपणे 6 किमी अंतरावर आहेत. येथील आनंदाश्रम हा 1931 मध्ये स्वामी रामदास (पापा रामदास) आणि माता कृष्णाबाई यांनी स्थापना केला होता. हा आश्रम मंजमपल्ली या निसर्गरम्य टेकडीवर आहे.येथे भजन हॉल, ग्रंथालय, आणि 50 पेक्षा जास्त गायी असलेली मोठी गोशाळा आहे. वैश्विक प्रेम आणि मानवतेची सेवा हा या आश्रमाचा मुख्य उद्देश आहे. आणि येथील नित्यानंद आश्रम हा होसदुर्ग किल्ल्याजवळ आहे. हा आश्रम स्वामी नित्यानंद यांनी बांधला होता, जे एक महान योगी आणि संत होते. येथे नित्यानंद स्वामींनी स्वतः एकाच मोठ्या दगडात कोरलेल्या 45 गुहा आहेत, ज्या ध्यानासाठी वापरल्या जातात. तसेच या आश्रमात स्वामींची पंचधातूंची विशाल मूर्ती आहे. या आश्रमापासून जवळच ‘गुरुवनम’ आहे, जिथे स्वामींनी कठोर तपश्चर्या केली होती.

14)Malik Deenar Mosque-

मलिक दीनार मशीद ही केरळच्या कासारगोड जिल्ह्यातील, थलंगारा येथील एक सुफी सुन्नी मशीद आणि दर्गा आहे. या मशिदीची स्थापना इ.स. 642 (हिजरी 22) मध्ये पर्शियन विद्वान आणि प्रवासी मलिक इब्न दीनार यांनी केली होती. व ही भारतातील सर्वात  जुन्या मशिदींपैकी एक आहे. या दोन मजली मशीदीचे बांधकाम केरळ-इस्लामिक पारंपारिक शैलीत केले असून 2018 मध्ये तिचे मोठ्या प्रमाणावर नूतनीकरण करण्यात आले. मलिक इब्न दीनार हे भारतात इस्लामचा प्रसार करण्यासाठी आले होते. या मशिदीच्या आवारात मलिक इब्न दीनार यांची कबर (दरगाह) आहे, जी मुस्लिम भाविकांसाठी अत्यंत पवित्र मानली जाते.

15)Valiyaparamba Backwaters-

वालियापरंबा बॅकवॉटर हे केरळच्या कासारगोड जिल्ह्यातील, अरबी समुद्र आणि तेजस्विनी नदीच्या संगमावर वसलेले एक अत्यंत निसर्गरम्य आणि शांत पर्यटन स्थळ आहे. या बेटाच्या एका बाजूला अरबी समुद्र आणि दुसऱ्या बाजूला बॅकवॉटर्स आहेत. आणि या बॅकवॉटर्सना तेजस्विनी नदीसह चार प्रमुख नद्यांद्वारे पाणी मिळते. या बेटावर नारळ आणि सुपारीच्या बागा, आणि विविध प्रकारचे पक्षी पाहायला मिळतात. हे बेट केरळमधील सर्वात सुंदर आणि शांत बॅकवॉटर मानले जाते. पर्यटकांना येथे सरकारी बोट सेवा, हाऊस बोट राईड्स, केट्टुवल्लम्स (पारंपारिक बोटी), मासेमारी करणारी गावे, कोइर (काथ्या) प्रक्रिया व भातशेती, बोटिंग आणि मँग्रोव्ह जंगलांचे विहंगम दृश्य पाहायला मिळते.

16)Thaikadappuram Beach-

थैकाडप्पुरम बीच हा केरळच्या कासारगोड जिल्ह्यातील,नीलेश्वरम जवळील एक शांत आणि निसर्गरम्य पर्यटन स्थळ आहे. हा किनारा नैसर्गिक सौंदर्यासाठी आणि दुर्मिळ समुद्री कासवांसाठी प्रसिद्ध आहे. या बीचचे सर्वात मोठे आकर्षण म्हणजे ‘ऑलिव्ह रिडले कासव’ पावसाळ्यात ही दुर्मिळ कासवे अंडी घालण्यासाठी या किनाऱ्यावर येतात. आणि ‘नेथल’ या स्वयंसेवी संस्थेद्वारे येथे कासवांच्या संरक्षणासाठी आणि प्रजननासाठी एक केंद्र चालवले जाते. हा किनारा अरबी समुद्र आणि तेजस्विनी नदी यांच्या मध्ये वसलेला आहे. येथे नदी आणि समुद्राचा सुंदर संगम पाहायला मिळतो. इतर बीचेसच्या तुलनेत येथे कमी गर्दी असल्यामुळे शांततेत वेळ घालवण्यासाठी हे उत्तम ठिकाण आहे. तसेच येथील माडाची झाडे आणि संध्याकाळच्या वेळी सूर्यास्ताचे विलोभनीय दृश्य पर्यटकांमध्ये लोकप्रिय आहे.

17)Kareem’s Forest Park-

करीमचे वन उद्यान हे केरळच्या कासारगोड जिल्ह्यातील, परप्पाजवळ पुलियमकुलम येथील एकमेव मानवनिर्मित जंगल आणि खाजगी अभयारण्य आहे. हे जंगल पी. अब्दुल करीम यांनी 32 एकर उजाड जमिनीचे रूपांतर एका घनदाट जंगलात केले आहे. या इको-टुरिझम उद्यानात 300 पेक्षा जास्त फुलांच्या, वनस्पतींच्या प्रजाती, 1500 विविध दुर्मिळ औषधी वनस्पती आणि 2000 पेक्षा जास्त विविध प्रकारचे वृक्ष आहेत. तसेच येथे अनेक प्रकारचे पक्षी, सरपटणारे प्राणी, छोटे जंगली प्राणी आणि कीटक पाहायला मिळतात. हे ठिकाण केवळ पर्यटन स्थळ नाही, तर शास्त्रज्ञ, संशोधक, आयुर्वेद आणि पर्यावरणाचे विद्यार्थी यांच्यासाठी अभ्यासाचे एक महत्त्वाचे केंद्र आहे.

18)Govinda Pai Memorial –

गोविंदा पै मेमोरियल हे केरळच्या कासारगोड जिल्ह्यातील, मंजेश्वर (होसाबेट्टू) येथील एक महत्त्वाचे सांस्कृतिक केंद्र आहे. गोविंद पै हे प्रसिद्ध कन्नड कवी, समाज सुधारक आणि विद्वान ‘राष्ट्रकवी’ होते. त्यांना मद्रास सरकारने पहिला राष्ट्रकवी हा किताब प्रदान केला होता. गोविंद पै यांचा जन्म 23 मार्च 1983 रोजी मंजेश्वर येथील एका कोकणी गौड सारस्वत ब्राह्मण कुटुंबात झाला होता. आणि ते थिम्मप्पा पै आणि देवकी अम्मा यांचे पुत्र होते. त्यांचे स्मारक मंजेश्वर (होसाबेट्टू) येथे त्यांच्या जन्मस्थानी उभारण्यात आले आहे. व हे ठिकाण ‘गिलिविंडू’ या नावानेही ओळखले जाते, जे त्यांच्या प्रसिद्ध कवितासंग्रहाचे नाव आहे. या स्मारकात गोविंदा पै यांच्या जीवनाशी संबंधित वस्तू, त्यांची हस्तलिखिते आणि दुर्मिळ पुस्तकांचा संग्रह असलेले एक संग्रहालय आहे. तसेच मंजेश्वर येथे 1980 मध्ये स्थापन झालेले गोविंदा पै मेमोरियल गव्हर्नमेंट कॉलेज हे सरकारी महाविद्यालय आहे.

19)Mallam Shree Durgaparameshwari Temple-

मल्ल श्री दुर्गा परमेश्वरी मंदिर हे केरळच्या कासारगोड जिल्ह्यातील बोविकाना जवळील मुलियार गावातील एक अत्यंत पवित्र आणि प्राचीन मंदिर आहे. येथील मंदिर परिसर निसर्गरम्य असून या मंदिराची प्रमुख देवता माता दुर्गा परमेश्वरी आहे. हे मंदिर शेकडो वर्षे जुने आहे. विशेष म्हणजे, या मंदिराचे बांधकाम महाराष्ट्रातील कराडे ब्राह्मणांनी केले असून त्यांनी आजही याचे जतन केले आहे. आणि हे मंदिर ‘मल्ल क्षत्रियांनी’ दान केलेल्या जमिनीवर उभारण्यात आले आहे. हे मंदिर तीन बाजूंनी टेकड्यांनी आणि एका बाजूने ‘मधुवाहिनी’ नदीने वेढलेले असून येथे भक्तांना दररोज मोफत जेवण दिले जाते.
या मंदिरात नवरात्री, कार्तिका हुन्निमे, वसंतोत्सव आणि कलभ हे सण उत्साहात साजरे केले जातात.

20)Our Lady of Sorrows Church-

आवर लेडी ऑफ सॉरोज चर्च हे केरळच्या कासारगोड जिल्ह्यातील, सर्वात जुना रोमन कॅथोलिक चर्च आहे. हा चर्च 1890 मध्ये बांधला व याला ‘बेला चर्च’ म्हणून ओळखले जाते. या चर्चचे बांधकाम अत्यंत सुंदर ‘गॉथिक’ स्थापत्य शैलीमध्ये केलेले आहे. व अलीकडेच त्याचे नूतनीकरण करण्यात आले आहे.या चर्चमध्ये कोकणी, मल्याळम आणि कन्नड या विविध भाषांमध्ये प्रार्थना सेवा चालतात, कारण हा परिसर कर्नाटक आणि केरळच्या सीमेवर आहे. या कॅथोलिक चर्चचे व्यवस्थापन आता मंगळूर धर्मप्रांताद्वारे केले जाते. या चर्चमध्ये कोणतीही आधुनिक सजावट नाही व चर्चच्या आवारात पवित्र गुहा आहेत ज्यापैकी एका गुहेतील पवित्र तलावाचे पाणी कधीही आटत नाही. आणि हे चर्च मदर मेरीच्या चमत्कारिक मूर्तीसाठी प्रसिद्ध आहे.डिसेंबर महिन्यात येथे वार्षिक उत्सव आयोजित केला जातो.

21)Cheruvathur-

चेरुवथूर हे केरळच्या कासारगोड जिल्ह्यातील, पायस्विनी नदीच्या काठावर व बेकल बीच आणि नीलेश्वर बीच या सुंदर समुद्रकिनाऱ्यांच्या जवळ वसलेले एक निसर्गरम्य शहर आहे. हे ठिकाण प्रसिद्ध कवी महाकवी कुट्टमठ यांचे जन्मस्थान आहे. त्यांनी संगीत नाटक, कविता आणि विविध साहित्यिक रचनांमध्ये मोठे योगदान दिले आहे. त्यांच्या गौरवार्थ या शहराचे नाव कागदोपत्री ‘कुट्टमठ नगर’ असे बदलण्यात आले आहे. येथे ‘वीरमाला हिल्स’ ऐतिहासिक डच किल्ल्याचे अवशेष, ‘कव्वायी’ आणि वालीयपारंबा या बेटांजवळील बॅकवॉटर्स आणि पयस्विनी नदीचा किनारा आणि सभोवतालची हिरवळ ही लोकप्रिय पर्यटन स्थळे आहेत. याशिवाय चेरुवथूर येथे कुट्टामठ भगवती मंदिर, पूंमलाई भगवती मंदिर,श्री सुब्रमण्य स्वामी मंदिर, श्री गोपालकृष्ण मंदिर आणि मीनकुलम श्री कृष्ण मंदिर ही धार्मिक ठिकाणी आहेत. येथील पूंमलाई भगवती मंदिरात पारंपारिक ‘थैय्यम’ उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. तसेच हे ठिकाण हातमाग उद्योगासाठीही प्रसिद्ध आहे.

22)Edneer Mutt-

एडनीर मठ हा केरळच्या कासारगोड जिल्ह्यातील, मधवाहिनी नदीच्या काठावर वसलेले एक प्राचीन, आध्यात्मिक व सांस्कृतिक केंद्र आहे. हे ठिकाण 400 वर्षांपेक्षा जास्त जुने असून, आदि शंकराचार्यांचे शिष्य तोटकाचार्य यांच्या परंपरेशी जोडलेले आहे. या मठात मुख्य देवता दक्षिणामूर्ती आणि गोपाळकृष्ण आहेत. हे मठ हिंदू तत्वज्ञानाच्या ‘अद्वैत वेदांत’ शाखेचे आणि ‘स्मार्त भागवत’ परंपरेचे पालन करते. या मठाचे माजी प्रमुख स्व. स्वामी केशवानंद भारती हे सर्वोच्च न्यायालयातील ऐतिहासिक ‘मूलभूत संरचना सिद्धांता’शी या मठाचे प्रमुख होते. हे मठ शिक्षण आणि कलेचे महत्त्वाचे केंद्र असून येथे उच्च प्राथमिक शाळा आणि हायस्कूलची स्थापना केली आहे.आणि या मठामध्ये संगीत, कला आणि साहित्याला प्रोत्साहन दिले जाते. या मठाच्या जवळच ‘दैव कुंतिपाला चामुंडी’चे मंदिर आहे, ज्यांना मठाचे रक्षक मानले जाते. एडनीर मठ हे कासारगोडमधील सर्वात पूजनीय ठिकाण असून या मठाला केरळ आणि शेजारील राज्यांमधून मोठ्या संख्येने भाविक भेट देतात.

23)Nellikunnu Muhyaddin Juma Masjid-

नेल्लिकुनू मुहियुद्दीन जुमा मशीद ही केरळच्या कासारगोड जिल्ह्यातील, एक सुन्नी शुक्रवार मशीद आणि दर्गा आहे. या मशिदीत संत थंगल उप्पपा यांची कबर आहे. जे कासारगोडमधील एक महत्त्वाचे तीर्थक्षेत्र आणि धार्मिक एकतेचे केंद्र मानले जाते. या शांत आणि निसर्गरम्य परिसरातील मशिदीची वास्तूकला केरळच्या पारंपारिक शैलीत आहे. ही मशीद मुहिद्दीन अब्दुल कादिर जिलानी यांना समर्पित असून येथे थंगल उप्पापा उरूस हा उत्सव दर दोन वर्षांनी दुल् हिज्जा महिन्यात साजरा केला जातो. तसेच येथे नोव्हेंबर महिन्यात एक आठवडाभर चालणारा ‘नेर्चा’ उत्सव आयोजित केला जातो. त्यावेळी मोठ्या संख्येने भाविक येतात.

24)Trikkannad Tryambakeshwara Temple-

त्रिक्कन्नड त्र्यंबकेश्वर मंदिर हे केरळच्या कासारगोड जिल्ह्यातील, अरबी समुद्राच्या किनाऱ्यावर वसलेले भगवान शंकराचे अत्यंत प्राचीन आणि पवित्र मंदिर आहे.मलबार भागातील या शिव मंदिराचे मुख पश्चिमेकडे (समुद्राकडे) असून या मंदिराला ‘दक्षिण काशी’ म्हणूनही ओळखले जाते. व येथे ‘कर्किडका वावू बली’ (पितृ तर्पण) विधीसाठी हे ठिकाण खूप प्रसिद्ध आहे. या मंदिरापासून साधारण 2 किमी अंतरावर पांडयन कल्लू हा समुद्राच्या लाटांमध्ये उभा असलेला एक प्रचंड मोठा खडक आहे. आख्यायिकेनुसार पांड्य राजाने समुद्रावाटे या मंदिरावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता. तेव्हा भगवान शंकराने त्यांच्या जहाजाला आग लावून त्याचे खडकात रूपांतर केले, त्याला आज ‘पांडयन कल्लू’ म्हटले जाते. एप्रिलमध्ये येथे वार्षिक उत्सव साजरा केला जातो.

25)Mallikarjuna Temple-

मल्लिकार्जुन मंदिर हे केरळच्या कासारगोड जिल्ह्यातील, भगवान शिवाला समर्पित असलेले एक प्राचीन मंदिर आहे. हे मंदिर 16 व्या शतकात बांधल्याचे सांगितले जाते.व याला ‘दक्षिणेची काशी’ म्हणूनही ओळखले जाते. मंदिराची वास्तुकला केरळ आणि कर्नाटक शैलींचे मिश्रण असून, त्यात गुंतागुंतीचे कोरीवकाम आणि शिल्पे आढळतात. इक्केरी राजांनी त्यांच्यासोबत कर्नाटकातून आलेल्या सैनिकांच्या पूजेसाठी हे मंदिर बांधले होते असे सांगण्यात येते.आणि आख्यायिकेनुसार, मंदिरातील शिवलंगाची स्थापना महाभारतातील पांडव पुत्र अर्जुन यांनी केली होती. या मंदिराच्या दक्षिण बाजूला कुंबाला नदी वाहते. या मंदिरात दरवर्षी एप्रिल महिन्यात पाच दिवस चालणारा वार्षिक उत्सव साजरा केला जातो. त्यावेळी प्रसिद्ध ‘यक्षगान’ ही लोककला सादर केली जाते. आणि भाविकांना ‘पायसम’ (खीर) प्रसाद म्हणून दिले जाते.

26)Shree Chakrapani MahaVishnu Temple –

श्री चक्रपाणी मंदिर हे केरळच्या कासारगोड जिल्ह्यातील, त्रिकारीपूर येथील भगवान विष्णूला समर्पित एक प्राचीन आणि ऐतिहासिक मंदिर आहे. या मंदिरात ‘चक्रपाणी’ स्वरूपात भगवान विष्णू हातात सुदर्शन चक्र धारण केलेल्या रूपात विराजमान आहेत. व गर्भगृहातील ही भगवान विष्णूची मूर्ती 6 फूट उंच असून तिला चार हात आहेत. आख्यायिकेनुसार या मंदिराची स्थापना भगवान परशुरामांनी केली होती. व मंदिरातील तमिळ शिलालेखानुसार, मल्याळम वर्ष 410 (इ.स.1235) मध्ये या मंदिराची पुनर्बांधणी करण्यात आली होती. तसेच अशी कथा सांगितली जाते की महाविष्णूंनी हत्तीचा राजा गजेंद्र याला याच मंदिराच्या ‘थामरक्कुलम’ (कमळ तलाव) मध्ये मोक्ष दिला होता. या मंदिराची वास्तूकला पारंपरिक केरळ शैलीत केलेली असून मंदिराचा मुख्य उत्सव ‘महोत्सवम्’ हा एप्रिल मध्ये 8 दिवस साजरा केला जातो.


27)Pottippala Waterfalls-

पोट्टिप्पला धबधबा हा केरळच्या कासारगोड जिल्ह्यातील, पाैका जवळील बलदुका येथील निसर्गरम्य परिसरातील सुंदर धबधबा आहे. निसर्गप्रेमी आणि ट्रेकिंगची आवड असलेल्या लोकांसाठी एक उत्तम ठिकाण मानले जाते. पावसाळ्यात या धबधब्याचे सौंदर्य अधिकच खुलते आणि पाण्याचा प्रवाह वाढतो. धबधब्याच्या आजूबाजूचा परिसर हिरवागार असून येथील हवामान अत्यंत आल्हाददायक आहे. या धबधब्यापर्यंत पोहोचण्यासाठी पर्यटकांना थोडा ट्रेकिंग करावा लागतो. या धबधब्यापासून जवळच बेकल बीच पार्क, अझीथाला बीच, राणीपुरम व्ह्यू पॉइंट, एरिन्हीपुझा पूल, पोसाडी गुंपे, थैकडाप्पुरम बीच आणि मंजनपोथीकुन्नू ही पर्यटन स्थळे आहेत.

28)Koovapara Natural Cave-

कूवापारा नैसर्गिक गुहा या केरळच्या कासारगोड जिल्ह्यातील, भीमानडी जवळील प्रसिद्ध नैसर्गिक गुहा आहे. ही गुहा पूर्णपणे नैसर्गिक असून येथे आतून चालण्याचा अनुभव अतिशय रोमांचक असतो. या गुहेची लांबी साधारणपणे 76 मीटर आहे. व गुहेमध्ये वटवाघळे व नैसर्गिक पाण्याचे स्रोत पाहायला मिळतात. हे ठिकाण बेकल रिसॉर्ट्स डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन च्या अंतर्गत येते. ही जांभ्या दगडांची गुहा जमिनीच्या खाली साधारण 30 फूट खोल आहे आणि आतमध्ये पसरलेली आहे. BRDC ने गुहेच्या आत पायऱ्या आणि जाण्या-येण्याचा मार्ग सुलभ केला आहे.

29)Srimath Anantheshwar Temple, Manjeshwar-

श्रीमद् अनंतेश्वर मंदिर हे केरळच्या कासारगोड जिल्ह्यातील,मंदिर उत्तर केरळच्या टोकावर, मंजेश्वर नदीच्या काठी वसलेले गौड सारस्वत ब्राह्मण समुदायाचे प्राचीन मंदिर आहे. या मंदिरात श्रीमद् अनंतेश्वर, भगवान शिव आणि शेष नाग/अनंत यांचे एकत्रित स्वरूप असून ते स्वयंभू आहे. तसेच येथे मुख्य गाभाऱ्यात भगवान भद्र नरसिंह आणि सुब्रमण्य यांच्या मूर्ती आहेत. हे मंदिर 8 व्या शतकातील असून हे ‘मंजुला क्षेत्र’ किंवा ’18 पेठे मंदिर’ म्हणून ओळखले जाते. हे मंदिर नागपूजेसाठी प्रसिद्ध आहे. व येथे अश्लेषा बली, सर्प संस्कार आणि नागप्रतिष्ठा हे विधी केले जातात. दरवर्षी येथे डिसेंबर महिन्यात ‘षष्टी महोत्सव’ हा उत्सव साजरा केला जातो.

Visit the travel blog

1) कासारगोड जिल्ह्याच्या सात भाषा कोणत्या आहेत?

कासारगोड जिल्ह्यात बेरी, कन्नड, कोकणी, तुळू, मल्याळम, मराठी आणि उर्दू या भाषा बोलतात. त्यामुळे या जिल्ह्याला ‘सप्त भाषा संगमा भूमी’, म्हणून ओळखले जाते.


2)वलियापरंबा हे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे?

वलियापरंबा हे केरळ राज्यातील कासारगोड जिल्ह्यातील चेरुवथुर येथे अरबी समुद्र आणि वलियापरंबा खाडीने वेढलेले एक छोटे बेट व लोकप्रिय पर्यटन स्थळ आहे.


3) कासारगोड जिल्ह्यातील एडनीर मठाचे महत्व काय आहे?

एडनीर मठ हे मधवाहिनी नदीच्या काठावर वसलेले, 400 वर्षांपेक्षा जास्त जुने एक प्राचीन, आध्यात्मिक व सांस्कृतिक केंद्र आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
Scroll to Top