भारतभ्रमंती या वेबसाईटवर तुम्ही इंग्लिश, हिंदी आणि मराठी भाषेत, भारत देशातील प्रत्येक राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यातील संपूर्ण पर्यटन स्थळे पाहू शकता. आता तुम्ही पाहणार आहात देवभूमी केरळ राज्यातील अलाप्पुझा जिल्ह्यातील संपूर्ण पर्यटन स्थळे. अलाप्पुझा जिल्हा हा केरळमधील सर्वात लहान जिल्हा असून, तो ‘अलेप्पी’ म्हणून ओळखला जातो. हा जिल्हा अत्यंत निसर्गरम्य बॅकवॉटर्स, नद्या, नौका शर्यत, हाऊसबोट क्रूझ, अलाप्पुझा बीच, ऐतिहासिक घाट, कालवे, बॅकवॉटर, समुद्रकिनारे आणि सरोवरांच्या विस्तीर्ण गुंतागुंतीच्या जाळ्यासाठी प्रसिद्ध आणि आकर्षक सागरी किनारी शहर आहे. त्यामुळे याला ‘पूर्वेकडील व्हेनिस’ असे म्हटले जाते. 17 ऑगस्ट 1957 रोजी या जिल्ह्याची स्थापना झाली. Top 21 places to visit in Alappuzha District
अरबी समुद्राच्या किनारपट्टीवर वसलेल्या या जिल्ह्याचा 80 % भाग किनारपट्टीचा असून या जिल्ह्यात चेरथला, अंबालाप्पुझा, कुट्टनाड, कार्तिकाप्पल्ली, चेंगन्नूर, मावेलिकारा हे सहा तालुके आहेत. समुद्राच्या पातळीपेक्षा खाली शेती केली जाणारा हा प्रदेश (कुट्टनाड) ‘केरळचा तांदळाचा कटोरा’ मानला जातो. तसेच हा जिल्हा कोयर उद्योगासाठी प्रसिद्ध आहे. व प्रमुख जागतिक पर्यटन स्थळ आहे. ‘केरळचे भाताचे कोठार’ असलेल्या या नयनरम्य जिल्ह्यात अनेक ऐतिहासिक, अद्भुत सांस्कृतिक, नैसर्गिक व आद्वितीय पर्यटन स्थळे आहेत.
Top 21 places to visit in Alappuzha District
अलाप्पुझा जिल्ह्यातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे केरळ
1)Ambalappuzha Sree Krishna Swamy Temple-


अंबालापुझा श्री कृष्ण स्वामी मंदिर हे केरळच्या अलाप्पुझा जिल्ह्यातील,अम्बालप्पुझा येथील प्राचीन व प्रसिद्ध धार्मिक स्थळ आहे. हे मंदिर 17 व्या शतकात चेंबकासेरी शासक पूरदम थिरुनल देवनारायणन थंपुरन यांनी पारंपारिक केरळ शैलीत बांधले असून मंदिराच्या भिंतींवर भगवान विष्णूच्या दशावतारांची सुंदर भित्तिचित्रे आहेत. तसेच या मंदिरातील भगवान कृष्णाची पूजा ‘पार्थसारथी’ (अर्जुनाचा सारथी) रूपात केली जाते. आणि कृष्णाची ही मूर्ती एका हातात चाबूक आणि दुसऱ्या हातात शंख धारण केलेली आहे. विशेष म्हणजे या मंदिरातील ‘पल्पपायसम’ (गोड दुधाची खीर) हा जगप्रसिद्ध चविष्ट प्रसाद (नैवेद्य) दररोज देवाला अर्पण केला जातो. ‘दक्षिणेची द्वारका’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या मंदिरात दरवर्षी अंबालापुझा मंदिर उत्सव’ (आरत्तू उत्सव) मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.
2) Alleppey Houseboat & Backwaters-



अलाप्पुझा (अलेप्पी), ‘पूर्वेकडील व्हेनिस’ हे केरळच्या अलाप्पुझा जिल्ह्यातील, बॅकवाटर्स आणि हाऊसबोट पर्यटनासाठी जगातील सर्वात प्रसिद्ध ठिकाण व निसर्गप्रेमींसाठी एक नंदनवन आहे. अरबी समुद्र, बॅकवाटर्स, कालवे आणि नद्यांच्या विशाल जाळ्याने बनलेले हे शहर पर्यटनासाठी अद्भुत ठिकाण आहे. येथील हाऊसबोट्सना स्थानिक भाषेत ‘केट्टुवलम’ म्हणतात. येथे बॅकवाटर्सच्या बाजूला असलेली नारळाची झाडे, हिरवीगार भातशेती आणि केरळचे ग्रामीण जीवन पर्यटकांना पाहायला मिळते. या हाऊसबोटीमध्ये स्वयंपाकघर, बेडरूम, बाल्कनी आणि केरळचे पारंपारिक जेवण या सुविधा आहेत. याशिवाय येथे दरवर्षी नेहरू ट्रॉफी बोट रेस ही प्रसिद्ध ‘स्नेक बोट रेस’ पुन्नामडा तलावावर आयोजित केली जाते.
3)Vembanad Lake-



वेंबनाड तलाव हा केरळच्या अलाप्पुझा जिल्ह्यातील, भारतातील सर्वात लांब आणि केरळ राज्यातील सर्वात मोठे विलोभनीय सरोवर आहे. हा तलाव 96.5 किलोमीटर लांब व 200 चौरस किलोमीटरपेक्षा जास्त क्षेत्रफळात विस्तारलेला असून, अलाप्पुझा, कोट्टायम आणि एर्नाकुलम या तीन जिल्ह्यांमध्ये पसरलेला आहे. हा तलाव गोड्या व खाऱ्या पाण्याचे मिश्रण आहे व हाऊस बोट सफारी आणि नेहरू ट्रॉफी बोट शर्यतीसाठी प्रसिद्ध आहे. तसेच या सरोवरात पातिरामणल, पेरुम्बलम आणि पल्लिपुरम ही छोटी बेटे आहेत. व काठावर कुमारकोम पक्षी अभयारण्य वसलेले आहे. 2002 मध्ये हे ठिकाण आंतरराष्ट्रीय पाणथळ जागा ‘रामसर स्थळ’ म्हणून घोषित करण्यात आले आहे. या तलावात पंबा, अचनकोविल, मणिमाला आणि मीनाचिल या नद्यांचे पाणी येते.पर्यटक येथे हाऊस बोट, नौकाविहार, मासेमारी आणि प्रेक्षणीय स्थळांचे आनंद घेण्यासाठी मोठ्या संख्येने येतात.
4)Kuttanad-



कुट्टनाड हे केरळच्या अलाप्पुझा जिल्ह्यातील,एक अद्वितीय नदी डेल्टा प्रदेश आहे. हे ठिकाण निसर्ग सौंदर्य आणि जगातील अशा मोजक्या प्रसिद्ध ठिकाणांपैकी एक आहे जिथे समुद्रसपाटीपासून खाली सुमारे 4 ते 10 फूट शेती केली जाते. आणि याला ‘केरळचा तांदूळ कटोरा’ म्हणून ओळखले जाते. हा प्रदेश विस्तीर्ण भातशेती, निसर्गरम्य हिरवेगार परिसर, बॅकवॉटर्स, नारळाची झाडे, ग्रामीण जीवनाचे व शेतीचे सुंदर दृश्य, कालवे आणि हाऊसबोट पर्यटनासाठी ओळखला जातो. संयुक्त राष्ट्रांच्या अन्न आणि कृषी संघटनेने कुट्टनाडच्या शेती पद्धतीला ‘जागतिक स्तरावर महत्त्वाचे कृषी वारसा क्षेत्र’ म्हणून घोषित केले आहे. पर्यटक येथे बॅकवॉटर्स आणि हाउसबोट, वेम्बनाड लेकमध्ये पक्षी निरीक्षकांसाठी असलेले पातीरमनल बेट व ग्रामीण जीवनाचे आणि शेतीचे सुंदर दृश्य पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणावर भेट देतात.
Visit our website: allindiajourney.com
5)Alappuzha Beach-


अलाप्पुझा बीच (अलेप्पी बीच) हा केरळच्या अलाप्पुझा जिल्ह्यातील,अरबी समुद्राच्या किनाऱ्यावरील एक अतिशय सुंदर आणि लोकप्रिय बीच आहे. या किनाऱ्यावर समुद्रात लांबपर्यंत जाणारा, 140 वर्षांपेक्षा जास्त जुना, कॅप्टन क्रॉफर्ड यांनी बांधलेला एक ऐतिहासिक घाट आहे. याशिवाय हा किनारा नारळाच्या झाडे, सुवर्ण वाळू आणि प्रसिद्ध नेहरू ट्रॉफी बोट रेससाठी ओळखला जातो. व याला “पूर्वेकडील व्हेनिस” असेही म्हटले जाते. या किनाऱ्याजवळील जुने दीपगृहावरून पर्यटकांना चित्तवेधक सूर्यास्त व समुद्राचे विहंगम दृश्य पाहता येते. येथील विजया बीच पार्क मध्ये लहान मुलांसाठी टॉय ट्रेन, सायकलिंग आणि नौकाविहार या मनोरंजनाच्या सोयी उपलब्ध आहेत.दरवर्षी येथे अलाप्पुझा बीच फेस्टिव्हल आणि वाळू कला महोत्सव मोठ्या उत्साहात साजरे केले जातात.
6)Pathiramanal Island-



पथिरमनल बेट हे केरळच्या अलाप्पुझा जिल्ह्यातील, वेंबनाड सरोवरात वसलेले एक अत्यंत सुंदर आणि शांत बेट आहे. आणि निसर्गप्रेमी व पक्षीनिरीक्षकांसाठी नंदनवन आहे. ‘पथिरमनल’ या मल्याळम शब्दाचा अर्थ ‘मध्यरात्रीची वाळू’ असा होतो. हे बेट वेम्बनाड तलावात घनदाट झाडी आणि चहुबाजूंनी पसरलेल्या बॅकवॉटरने वेढलेले आहे. 10 एकरमध्ये पसरलेले हे हिरवेगार बेट जगभरातील शेकडो दुर्मिळ स्थलांतरित पक्ष्यांसाठी तसेच विविध प्रकारच्या वनस्पती आणि प्राण्यांसाठी एक अभयारण्य आहे. या बेटावर 90 प्रजातींचे पक्षी, 30 प्रजातींचे फुलपाखरे, 160 प्रजातींचे वनस्पती, 55 प्रजातींचे मासे आणि 20 प्रजातींचे कोळी आढळतात. पौराणिक कथेनुसार एका ब्राह्मण भक्ताने (विलवमंगलथु स्वामीआर) स्नान करण्यासाठी जादूने या बेटाची निर्मिती केली होती. हाऊसबोट सफारी दरम्यान हे बेट एक उत्तम पिकनिक स्पॉट म्हणून ओळखले जाते.
7)Alappuzha, R.Block-



आर-ब्लॉक हे केरळच्या अलाप्पुझा जिल्ह्यातील, कुट्टनाड प्रदेशातील एक वैशिष्ट्यपूर्ण ठिकाण आहे. आर ब्लॉक हा कुट्टानाड ‘केरळचा तांदळाचा कटोरा’ च्या बॅकवॉटरमधून खोदून काढलेला 1,400 एकर आकाराचा आर ब्लॉक कायल एक मोठा भाग आहे. येथे समुद्रसपाटीच्या खाली 10 फूट शेती केली जाते त्यामुळे हे जगातील काही मोजक्या ठिकाणांपैकी एक आहे. येथे बॅकवॉटरचा भाग अडवून आणि सभोवताली तटबंदी उभारून ही जमीन शेतीसाठी तयार करण्यात आली आहे. या कृषी तंत्रज्ञानामुळे या भागाची तुलना नेदरलँड्समधील ‘डाइक्स’ शी केली जाते.पर्यटक येथे हाऊस बोट मधून निळ्या पाण्याचे नयनरम्य दृश्य, विविध प्रकारचे स्थलांतरित पक्षी, विस्तीर्ण भातशेती आणि सभोवतालचे कालवे व क्रूझचा आनंद घेऊ शकतात.
8)Krishnapuram Palace-

कृष्णपुरम पॅलेस हा केरळच्या अलाप्पुझा (अलेप्पी) जिल्ह्यातील कायमकुलम येथील एक ऐतिहासिक राजवाडा आणि संग्रहालय आहे. हा राजवाडा 18 व्या शतकात त्रावणकोर राज्याचे अनिझम थिरुनल मार्तंड वर्मा यांनी बांधला होता. या राजवाड्याची स्थापत्य कला ही गॅबल छप्पर अरुंद कॉरिडॉर आणि सुप्त खिडक्या असलेल्या वैशिष्ट्यपूर्ण केरळ शैलीत केलेली आहे. येथील विशेष आकर्षण म्हणजे ‘गजेंद्रमोक्षम भित्तीचित्र’ हे केरळमधील सर्वात मोठे 154 चौरस फूट एकल भित्तीचित्र असून यात हत्तींच्या राजाला (गजेंद्र) भगवान विष्णूने वाचवल्याची पौराणिक कथा चित्रित केली आहे. सध्या या राजवाड्याचे रूपांतर संग्रहालयात करण्यात आले आहे व येथे प्राचीन शिल्पे, पुरातन नाणी, ऐतिहासिक अवशेष, कांस्य मूर्ती, चित्रे आणि त्रावणकोर राजांची तलवार (‘कायमकुलम वाल’) प्रदर्शनासाठी ठेवली आहेत. आणि राजवाड्याच्या आवारात दुर्मिळ बुद्ध मूर्ती जतन करण्यात आली आहे.
9)Karumadikuttan-

करुमाडीकुट्टन हे केरळच्या अलाप्पुझा जिल्ह्यातील अंबलाप्पुझा शहराजवळील करुमाडी गावात पुन्नमदा तलावाच्या काठावर वसलेले एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आहे. या ठिकाणी भगवान बुद्धाची बसलेल्या अवस्थेत तीन फूट उंच काळ्या रंगाची ग्रॅनाईट मूर्ती आहे. या मूर्तीचा अर्धा डावा भाग तुटलेला आहे. 1930 च्या दशकात ब्रिटिश अभियंता सर रॉबर्ट ब्रिस्टो यांनी ही मूर्ती शोधून काढली. व ही मूर्ती 9 ते 14 व्या शतकातील असल्याचे सांगितले जाते. करुमाडीकुट्टन हे नाव “करुमाडीचा मुलगा” या अर्थाने पडले आहे. सध्या हे ठिकाण केरळच्या पुरातत्व विभागाच्या आणि भारतीय पुरातत्व सर्वेक्षण (ASI) यांच्या संरक्षणाखाली असून बौद्ध धर्माच्या प्रसाराचा एक साक्षीदार आहे. 1965 मध्ये दलाई लामा यांनीही या स्थळाला भेट दिली होती. पर्यटक या शांत व धार्मिक ठिकाणाला हाऊसबोटमधून भेट देतात.
10)Chettikulangara Shree Bhagavathi temple-



चेट्टीकुलंगरा श्री भगवती मंदिर हे केरळच्या अलाप्पुझा जिल्ह्यातील,मावेलिक्करा तालुक्यात असलेले प्राचीन मंदिर आहे. 1200 वर्षांपेक्षा जास्त जुना इतिहास असलेल्या या मंदिरात देवी भगवतीची (भद्रकाली) पूजा केली जाते. आणि हे मंदिर ‘चेट्टीकुलंगरा भरणी’ उत्सवासाठी व ‘केट्टुकझचा’ या भव्य रथांच्या मिरवणुकीसाठी जगभरात प्रसिद्ध आहे. विशेष म्हणजे, येथे देवीचे दिवसातून तीन रूपांत पूजन केले जाते सकाळी महासरस्वती, दुपारी महालक्ष्मी आणि संध्याकाळी महाकाली. कुंभभरणम हा उत्सव (मल्याळम महिना कुंभम मध्ये) येथे मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो, ज्यामध्ये ‘केट्टुकझचा’ मिरवणुकीत भव्य रथ आणि अश्व-बैल प्रतिमा आकर्षणाचे केंद्र असतात.
11)Pullukulangara Ayyappa Temple-

पुल्लुकुलंगारा अय्यप्पा (श्री धर्म संस्था) मंदिर हे केरळच्या अलाप्पुझा जिल्ह्यातील कंदल्लूर जवळील प्राचीन आणि प्रसिद्ध मंदिर आहे. हे मंदिर 1000 वर्ष जुने असून कंदल्लूर येथील गवताने (पुल्लू) भरलेल्या तलावाच्या (कुलम) काठी (करा) मूर्ती सापडल्यामुळे या ठिकाणाला ‘पुल्लुकुलंगारा’ असे नाव पडले आहे. हे मंदिर कायमकुलमच्या राजाने बांधल्याचे सांगितले जाते. दरवर्षी येथे फेब्रुवारी महिन्यात 10 दिवसांचा ‘थिरू’ हा वार्षिक उत्सव असतो ज्यामध्ये ध्वजारोहण, वेलाकाली- उत्सवाच्या काळात सादर केला जाणारा एक पारंपरिक युद्धकला नृत्य प्रकार आणि अन्नादान आयोजित केले जाते. तसेच येथे ‘मंडल चिरप्पू महोत्सव’ हा डिसेंबर मध्ये 41 दिवस साजरा केला जातो.
12)Mullakkal Rajarajeswari Temple-



मुल्लक्कल राजराजेश्वरी मंदिर हे केरळच्या अलाप्पुझा जिल्ह्यातील,पवित्र आणि प्राचीन मंदिर आहे. 500 वर्ष जुन्या असलेल्या या मंदिरात देवी राजराजेश्वरीची पूजा केली जाते. हे मंदिर पारंपरिक केरळ शैलीत बांधले असून या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे येथील ‘श्रीकोविल’ (गर्भगृह) उघड्या छताचे असल्यामुळे भाविक आकाशाखाली उभे राहून देवीची पूजा करतात. लोककथेनुसार, चेम्बकासेरीचे राजा देवनारायण यांनी या मंदिराची स्थापना केली होती. आणि देवी एका चमेलीच्या बागेत (मल्लिका/मुल्ला) प्रकट झाली होती, म्हणून याला ‘मुल्लक्कल’ मंदिर असे नाव पडले. मुख्य देवते व्यतिरिक्त येथे भगवान हनुमान, गणेश, कृष्ण, अय्यप्पा आणि नागराजा यांची ही छोटी मंदिरे आहेत. दरवर्षी या मंदिरात ‘थैपूया कावडी उत्सव’ व डिसेंबरमध्ये ‘मुल्लक्कल चिराप्पू’ हा 41 दिवसांचा उत्सव साजरा केला जातो.
13)St. Mary’s Forane Church-

सेंट मेरी फोरेन चर्च हा केरळच्या अलाप्पुझा जिल्ह्यातील, पंबा नदीच्या काठावर वसलेले सर्वात जुन्या ख्रिश्चन चर्चांपैकी एक आहे. हा चर्च ‘चंपाकुलम कल्लूरकाडू मार्थ मरियम बॅसिलिका’ म्हणूनही ओळखला जातो. सायरो-मलबार कॅथोलिक पंथाचे हे चर्च सीरियन चर्चचे ‘मदर चर्च’ मानले जाते. या चर्चची स्थापना इसवी सन 427 मध्ये झाल्याचे सांगितले जाते. या चर्चची वास्तुकला भव्य असून त्यामध्ये पोर्तुगीज संस्कृतीचा प्रभाव दिसून येतो. तसेच चर्चच्या आवारात एक प्राचीन दगडी क्रॉस आहे. दरवर्षी ऑक्टोबर महिन्यात येथे वार्षिक मेजवानी साजरी केली जाते. आणि 19 मार्चला सेंट जोसेफ यांचा उत्सव साजरा होतो.
14)International Coir Museum-


आंतरराष्ट्रीय कॉयर संग्रहालय हे केरळच्या अलाप्पुझा जिल्ह्यातील, कलावूर येथील जगातील पहिले आणि एकमेव कॉयर (नारळाच्या काथ्यापासून बनवलेल्या वस्तू) संग्रहालय आहे. याची स्थापना 27 मे 2014 रोजी करण्यात आली असून हे संग्रहालय भारत सरकारच्या कॉयर बोर्डाच्या अंतर्गत कार्यरत आहे. येथे नारळाच्या काथ्यापासून तयार केलेल्या विविध वस्तूंचे प्रदर्शन केले आहे, ज्यामध्ये चटया, दोरखंड, कार्पेट्स, हस्तकला वस्तू आणि काथ्यापासून बनवलेले फर्निचरही पाहायला मिळते. तसेच या संग्रहालयात केरळमधील 19 व्या शतकापासूनच्या कॉयर उद्योगाचा इतिहास, चित्रांच्या आणि मॉडेल्सच्या माध्यमातून मांडला आहे. पर्यटकांना येथे नारळाच्या शेंडीपासून फायबर काढणे ते अंतिम उत्पादन तयार करण्यापर्यंतची संपूर्ण प्रक्रिया पाहायला मिळते.
15)Nehru Trophy Boat Race-


नेहरू ट्रॉफी बोट रेस ही केरळच्या अलाप्पुझा (अलेप्पी) जिल्ह्यातील, पुन्नमदा तलावावर होणारी एक प्रतिष्ठित वार्षिक नौका शर्यत आहे. ही शर्यत दरवर्षी पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या सन्मानार्थ ऑगस्टच्या दुसऱ्या शनिवारी आयोजित केली जाते. त्यावेळी 100 पेक्षा जास्त ‘चुंदन वल्लम’ (साप बोटी) ढोल-ताशांच्या गजरात वेगाने चालवल्या जातात.1952 मध्ये भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी या भागाला भेट दिली होती. व त्यांनी स्वतः एक रौप्य ट्रॉफी भेट दिली होती. तेव्हापासून या स्पर्धेला ‘नेहरू ट्रॉफी’ असे नाव पडले. स्नेक बोट व्यतिरिक्त येथे ‘चुरुलन’, ‘इरुत्तू कुठी’, ‘वेप्पू’ आणि ‘ओडी’ यांसारख्या विविध प्रकारच्या बोटींच्या स्पर्धाही होतात.
16)Mannarasala Sree Nagaraja Temple-


मन्नारसाला श्री नागराज मंदिर हे केरळच्या अलाप्पुझा जिल्ह्यातील, हरिपादजवळील घनदाट जंगलात वसलेले नागराजाचे प्राचीन आणि पवित्र तीर्थक्षेत्र आहे. भगवान परशुरामांनी स्थापना केलेले हे मंदिर नागराजाला (शिवस्वरूप) समर्पित आहे. येथे सापांच्या 30,000 पेक्षा जास्त मूर्ती आहेत. आणि या मंदिरातील वैशिष्ट्य म्हणजे येथे एक महिला पुजारी (‘मन्नारसाला अम्मा’) पूजा करतात. तसेच येथे संततीप्राप्तीसाठी जोडपे विशेष पूजा करण्यासाठी येतात आणि इच्छा पूर्ण झाल्यावर नागाच्या मूर्ती अर्पण करतात. या मंदिरातील हळदीचा प्रसाद अत्यंत गुणकारी मानला जातो. हे मंदिर जगातील सर्वात प्रसिद्ध आणि प्राचीन सर्प मंदिरांपैकी एक आहे.
17)Pandavan Para-


पांडवन पारा हे केरळच्या अलाप्पुझा जिल्ह्यातील, चेंगन्नूर शहराजवळील प्रसिद्ध पौराणिक आणि निसर्गरम्य पर्यटन स्थळ आहे. महाभारत काळात पाच पांडव, वनवासादरम्यान या ठिकाणी वास्तव्यास होते, म्हणूनच या ठिकाणाला ‘पांडवन पारा’ असे नाव पडले.आणि या पांडवन पाराच्या समोर काही अंतरावर ‘नूतवन पारा’ नावाचा खडक आहे. ज्याचा संबंध कौरवांशी जोडलेला आहे. येथील टेकडीवर भगवान श्रीकृष्णाचे एक प्राचीन मंदिर आहे. तसेच येथे बेडकाच्या आकाराचा ‘थावलापारा’ आणि वाद्याच्या आकाराचा ‘मद्दलापारा’ असे विशेष आकाराचे खडक पाहायला मिळतात. या टेकडीवरून चेंगन्नूर शहर आणि निसर्गरम्य परिसराचे विहंगम दृश्य दिसते. हे ठिकाण ट्रेकिंग आणि निसर्गप्रेमींसाठी लोकप्रिय आहे.
18)Kumarakodi-


कुमारकोडी हे केरळच्या अलाप्पुझा जिल्ह्यातील, पल्लना येथील ऐतिहासिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या महत्त्वाचे ठिकाण आहे. हे ठिकाण आधुनिक मल्याळम कवी आणि समाजसुधारक महाकवी कुमारनासन यांचे स्मारक, समाधी आणि पुतळ्यासाठी प्रसिद्ध आहे. त्यांना ‘मल्याळम साहित्यातील पी.बी. शेली’ म्हणून ओळखले जाते. 16 जानेवारी 1924 रोजी कोल्लमहून अलाप्पुझाला जाणारी ‘रिडीमर’ ही बोट पल्लाना नदीत उलटल्याने कुमारनासन यांचा मृत्यू झाला. आणि त्यांच्या मृत्यू झालेल्या ठिकाणी समाधी बांधण्यात आली व त्या जागेला ‘कुमारकोडी’ असे नाव देण्यात आले. हे शांत व प्रेक्षणीय ठिकाण निसर्गरम्य बॅकवॉटर्स च्या काठावर आहे.
19)Revi Karuna Karan Memorial Museum-



रेवी करुणा करण मेमोरियल म्युझियम हे केरळच्या अलाप्पुझा जिल्ह्यातील, एक खाजगी संग्रहालय आहे. जे प्रसिद्ध कॉयर उद्योगपती रेवी करुणा करण यांच्या स्मृतीप्रित्यर्थ त्यांच्या पत्नी बेटी करुणा करण यांनी 2006 मध्ये बांधले आहे. या संग्रहालयात हस्तिदंताच्या अत्यंत दुर्मिळ वस्तू, 200 चौरस फुटांचे वनस्पतीच्या रंगापासून बनवलेले एक मोठे भित्तीचित्र, तंजोर पेंटिंग्स, चिनी मातीची भांडी, जुन्या काळातील एक 1948 मॉडेलची ‘ब्युइक’ गाडी, जेड आणि क्रिस्टलचा भव्य संग्रह आहे. आणि येथे केरळच्या हिंदू, ख्रिश्चन, मुस्लिम, बौद्ध या चारही धर्मांचे प्रतिनिधीत्व करणारी दालने आहेत.
20)Kidangamparambu Sree Bhuvaneswari Temple-

किदंगमपरंबू श्री भुवनेश्वरी मंदिर हे केरळच्या अलाप्पुझा जिल्ह्यातील, थाथामपल्ली भागात असलेले एक प्राचीन आणि जागृत मंदिर आहे. हे मंदिर देवी भुवनेश्वरीला समर्पित असून तिला ‘भक्तदासी’ (भक्तांची दासी) म्हणूनही ओळखले जाते. या मंदिराची वास्तूकला भव्य राजगोपुरासाठी प्रसिद्ध आहे, ज्याची रचना मदुराईच्या मीनाक्षी मंदिरासारखी किंवा तिरुवनंतपुरमच्या श्री पद्मनाभस्वामी मंदिरासारखी वाटते. आणि मंदिराच्या आवारात श्रीकृष्णाच्या कथा सांगणारी शिल्पे आहेत. दरवर्षी येथे डिसेंबर मधील कार्तिका सणाच्या वेळी मंदिराच्या भिंतींवरील दगडी दिवे प्रज्वलित केले जातात. आणि ‘कूथंबलम्’ हा पारंपारिक कलाप्रकार स्टेजवर सादर केला. जातो.
21)Mararikulam Shree Mahadev Temple-



मारारीकुलम श्री महादेव मंदिर हे केरळच्या अलाप्पुझा जिल्ह्यातील, मरारी बीचजवळ असलेले प्राचीन आणि पवित्र शिव मंदिर आहे. हे मंदिर एक हजार वर्षे जुने असून मंदिराची वास्तूकला पारंपारिक केरळ शैलीत केली आहे. आणि त्यामध्ये कौलारू छत, भिंतींवरील पौराणिक चित्रे, लाकडी कोरीव काम आणि सोन्याचे दरवाजे आहेत. येथे भगवान शिव आणि माता पार्वती समोरासमोर विराजमान आहेत. व विल्लीमंगलम स्वामींनी हे मंदिर बांधले होते असे सांगण्यात येते. दरवर्षी येथे महाशिवरात्री, नवरात्री आणि तिरुवाथिरा हे उत्सव मोठ्या उत्साहात साजरे केले जातात.
1) अलाप्पुझा जिल्ह्यातील वेम्बनाड तलाव कशासाठी प्रसिद्ध आहे?
वेम्बनाड तलाव हा भारतातील सर्वात मोठ्या आणि भव्य तलावांपैकी एक असून बॅकवॉटर डेस्टिनेशन, निसर्गरम्य बोटिंग, मासेमारी, प्रेक्षणीय स्थळे आणि ओणम दरम्यान साप बोट शर्यतीसाठी प्रसिद्ध आहे.
2)अलाप्पुझा जिल्ह्यातील चेट्टीकुलंगरा मंदिराचे महत्त्व काय आहे?
चेट्टीकुलंगरा भगवती मंदिर हे 1200 वर्षा जुने असून भरणी उत्सवासाठी प्रसिद्ध आहे.
3)अलाप्पुझा जिल्ह्यातील अंबालापुझा मंदिर कशासाठी प्रसिद्ध आहे?
अंबालापुझा मंदिर हे दर 12 वर्षांनी वेलान्स (जादूगार) द्वारे सादर केलेल्या पल्लीपान सादरीकरणासाठी प्रसिद्ध आहे.


