वायनाड जिल्ह्यातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे – Top 32 places to visit in Wayanad District

मित्रांनो भारतभ्रमंती या वेबसाईटवर तुम्ही इंग्लिश, हिंदी आणि मराठी भाषेत, भारत देशातील प्रत्येक राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यातील संपूर्ण पर्यटन स्थळे पाहू शकता. आता तुम्ही पाहणार आहात केरळ राज्यातील वायनाड जिल्ह्यातील संपूर्ण पर्यटन स्थळे. केरळमधील वायनाड जिल्हा हा पश्चिम घाटातील हिरव्यागार निसर्गसौंदर्याने नटलेला, मोठ्या प्रमाणात आदिवासी लोकसंख्या आणि सुंदर डोंगराळ प्रदेश असलेला एक प्रमुख जिल्हा आहे. हा जिल्हा समुद्रसपाटीपासून नयनरम्य दख्खन पठाराच्या 700 ते 2100 मीटर उंचीवर आहे व 2,125 चौरस किमी क्षेत्रफळात पसरलेला आहे. आणि केरळमधील हे एकमेव पठार आहे, जिथे हवामान वर्षभर आल्हाददायक असते. पश्चिम घाटात वसलेल्या या जिल्ह्याला ‘केरळचे हिरवे स्वर्ग’ म्हटले जाते, कारण येथे एकूण 37 टक्के वनक्षेत्र आहे. Top 32 places to visit in Wayanad District

1 नोव्हेंबर 1980 रोजी केरळचा बारावा जिल्हा म्हणून वायनाड जिल्हा निर्माण करण्यात आला. व याचे प्रशासकीय केंद्र कल्पेट्टा येथे आहे. या जिल्ह्यात मानंतवाडी, सुलतान बाथेरी आणि व्याथिरी हे तीन तालुके असून, ‘वायल नाडू’ (भाताच्या शेतीची जमीन) यावरून वायनाड हे नाव पडले आहे. येथील अर्थव्यवस्था शेतीवर अवलंबून आहे. येथे चहा, कॉफी, मिरी, वेलची आणि रबर यांसारख्या नगदी पिकांचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन होते. तसेच हा निसर्ग समृद्ध जिल्हा मसाल्यांच्या बागा, घनदाट जंगले, वन्यजीव, एडक्कल गुहा, आणि 6,000 वर्ष जुने शिलालेख, यांसारख्या ऐतिहासिक ठिकाणांसाठी ओळखला जातो.

Top 32 places to visit in Wayanad District

वायनाड जिल्ह्यातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे

1)Thirunelli Shree Mahavishnu Temple-

Top 32 places to visit in Wayanad District

थिरुनेल्ली शिव मंदिर हे केरळच्या वायनाड जिल्ह्यातील, भगवान विष्णूचे प्राचीन आणि पवित्र धार्मिक स्थळ आहे. ब्रह्मगिरी टेकड्यांच्या पायथ्याशी, सुमारे 900 मीटर उंचीवर वसलेले हे मंदिर घनदाट जंगलांनी आणि डोंगररांगांनी वेढलेले आहे. या मंदिरात मुख्य भगवान विष्णूची मूर्ती चतुर्भुज स्वरूपात असून या मंदिराला ‘दक्षिण काशी’ म्हणूनही ओळखले जाते. या मंदिराची स्थापना स्वतः भगवान ब्रह्मदेवांनीकेली होती असे सांगण्यात येते. तसेच येथील पापनासिनी नदीच्या काठावर पितृ तर्पण आणि पूर्वजांच्या विधींसाठी प्रसिद्ध आहे. या नदीत स्नान केल्याने सर्व पापांतून मुक्ती मिळते, अशी भाविकांची श्रद्धा आहे. या मंदिराची वास्तुकला पारंपारिक केरळ शैलीची आहे. मंदिराच्या परिसरात ‘पंचतीर्थम’ तलावाच्या मध्यभागी असलेल्या शिळेवर भगवान विष्णूंच्या पावलांचे ठसे असल्याचे मानले जाते. या मंदिराच्या जवळपास गुन्निका’ हे भगवान शिवाचे एक गुहा मंदिर आहे.

2)Chembra Peak-

चेंब्रा शिखर हे केरळच्या वायनाड जिल्ह्यातील, पश्चिम घाटातील, मेप्पाडी शहराजवळील पर्यटक आणि ट्रेकर्सचे मुख्य आकर्षण आहे. हे शिखर समुद्रसपाटीपासून 2,100 मीटर उंचीवर असून वायनाडमधील सर्वात उंच शिखर (पर्वत) आहे. या शिखराच्या वाटेवर हृदयाच्या आकाराचे नैसर्गिक तलाव आहे, ज्याला ‘हृदय सरोवर’ असेही म्हटले जाते. आणि हे तलाव कधीही सुकत नाही. निलगिरी टेकड्या आणि वेल्लारीमाला यांना लागून असलेले, हे शिखर केरळमधील वायनाड आणि मलप्पुरम जिल्ह्या जवळ आहे.

3)Banasura Sagar Dam-

बाणासुरा सागर धरण हे केरळच्या वायनाड जिल्ह्यातील, पडिंजरथरा येथे भारतातील सर्वात मोठे आणि आशियातील दुसरे सर्वात मोठे मातीचे धरण आहे. हे धरण काबिनी नदीची उपनदी असलेल्या करमनाथोडू नदीवर बांधलेले असून धरणाच्या जलाशयात अनेक लहान बेटे आहेत जी पावसाळ्यात खूप सुंदर दिसतात. हे धरण बाणासुरा टेकड्यांनी वेढलेले असून भारतातील पहिला तरंगता सौर ऊर्जा प्रकल्प या धरणात स्थापित करण्यात आला होता. 1979 मध्ये सुरू झालेल्या या धरणाला कुट्टियादी ऑगमेंटेशन मेन मातीचे धरण असेही म्हणतात. या धरणाची उंची 38.5 मीटर आणि लांबी 776 मीटर आहे. पर्यटक येथे निसर्गसौंदर्य, सुंदर पुष्पवाटिका, स्पीड बोटींग आणि ट्रेकिंगचा आनंद घेऊ शकतात.

4)Kuruvadweep-

कुरुवाद्वीप किंवा कुरुवा बेट हे केरळच्या वायनाड जिल्ह्यातील निसर्गप्रेमींसाठी एक नंदनवन आहे. हे बेट वायनाडमधील मनंतवाडी पासून 14 किमी अंतरावरील काबिनी नदीच्या पात्रातील एक 950 एकरांचा संरक्षित नदी त्रिभुज प्रदेश आहे आणि अनेक लहान बेटांचा समूह आहे. हे बेट घनदाट सदाहरित जंगल व बांबूची बेटे, वनांनी वेढलेले निर्जन बेट असून दुर्मिळ औषधी वनस्पती, पक्षी आणि नैसर्गिक शांततेसाठी प्रसिद्ध आहे. पर्यटकांना येथे वन विभागाच्या बोटी आणि बांबूच्या तराफ्यातून पोहोचता येते. जे निसर्गप्रेमींसाठी एक प्रमुख आकर्षण आहे.

Visit our website: allindiajourney.com

5)Soochippara Waterfalls-

सूचीपारा धबधबा हा केरळच्या वायनाड जिल्ह्यातील, वेल्लारीमाला येथील प्रसिद्ध तीन-स्तरीय धबधबा आहे. हा निसर्गरम्य धबधबा ‘सेंटिनेल रॉक वॉटरफॉल’ म्हणूनही ओळखला जातो. 200-मीटर उंचीवरून कोसळणारा हा धबधबा, हिरव्यागार पानझडी आणि सदाहरित घनदाट जंगलांनी वेढलेला आहे. आणि धबधब्याच्या तळाशी एक मोठा नैसर्गिक तलाव तयार झाला आहे. पर्यटक येथे पोहण्याचा, ट्रेकिंग, रॉक क्लाइंबिंग, नैसर्गिक पूल आणि पोहण्याचा आनंद घेऊ शकतात.

6)En ooru Tribal Village Wayanad-

एन ओरू हे केरळच्या वायनाड जिल्ह्यातील, लक्कीडी जवळील पूकोडे येथे एका टेकडीवर, 25 एकर परिसरात पसरलेले पहिले आदिवासी वारसा गाव आहे. मल्याळम भाषेत ‘एन ऊरु’ चा अर्थ “माझे गाव” असा होतो. टेकडीवर असलेल्या या गावात डोंगररांगांचे दृश्य, केरळमधील विविध आदिवासी जमातींची संस्कृती, परंपरा व त्यांची जीवनशैली आणि वास्तुकला जवळून पाहता येते. तसेच या गावात 10 नमुनेदार आदिवासी झोपड्या उभारण्यात आल्या आहेत. आणि येथे आदिवासींनी बनवलेली हस्तशिल्पे, औषधी वनस्पती आणि इतर उत्पादनांची विक्री करणारी स्टॉल्स आहेत. तसेच येथे आदिवासी संगीत आणि नृत्य सादरीकरणासाठी 300 आसनक्षमतेचे एक खुले नाट्यगृह आहे.

7)Edakkal Caves-

एडक्कल लेणी ही केरळच्या वायनाड जिल्ह्यातील, अंबुकुटी टेकड्यांवर, सुमारे 7000 वर्ष जुन्या पाषाणयुगीन लेण्या आहेत. या लेण्या नैसर्गिक गुहा नसून, एका मोठ्या खडकामध्ये दुसरा खडक अडकल्यामुळे तयार झालेली नैसर्गिक दरी आहे. या लेण्या सुलतान बाथेरीपासून जवळच अंबुकुठी माला येथे समुद्रसपाटीपासून 1200 मीटर उंचीवर आहेत. या लेण्यांचा शोध मलबारचे पोलीस अधीक्षक फ्रेड फॉसेट यांनी 1895 मध्ये लावला होता. या लेण्यांमध्ये मानवी अद्वितीय कोरीव चित्रे, आकृत्या, प्राणी वाहनांची चित्रे भिंतींवर कोरलेली आहेत. आणि प्राचीन लिपी आढळते. दक्षिण भारतातील पाषाणयुगीन संस्कृतीचे पुरावे देणारे हे एकमेव ठिकाण आहे.

8)Kuruma, Panam Keni-

पानम केनी म्हणजे ‘पारंपारिक जलस्रोत प्रणाली’ ही केरळच्या वायनाड जिल्ह्यातील, कुरुमा आणि कुरुचिया जमातींनी विकसित केलेला एक पारंपारिक पाणी साठवणूक आणि जल शुद्धीकरण स्त्रोत आहे. हे केनी जमिनीतील नैसर्गिक झऱ्यांवर बांधलेले छोटे, गोलाकार आणि उथळ विहिरीसारखे स्त्रोत असतात. जे ताडाच्या झाडाच्या खोडाचा वापर करून बनवले जातात. कुरुमा समाजासाठी हे पाणी पवित्र ठिकाण असून त्यांच्या जीवनातील प्रत्येक महत्त्वाच्या टप्प्यावर ‘केनी’चे पाणी अनिवार्य असते. त्यामध्ये नवजात बालकाला केनीचे पहिले थेंब पाजले जातात. लग्नानंतर वधूने केनीतून पाणी भरून ते देवघरात ठेवण्याची प्रथा आहे. मृत व्यक्तीच्या निधनानंतर शेवटची अंघोळ घालण्यासाठी याच पाण्याचा वापर केला जातो. तसेच मुख्य सणावेळी केनीची पूजा करून फुले वाहिली जातात. कुरुमा गावांमध्ये पिण्याच्या पाण्यासाठी आजही या पाण्याचा चा वापर केला जातो.

9)Pookode Lake-

पूकोट तलाव हा केरळच्या वायनाड जिल्ह्यातील, सुंदर नैसर्गिक, बारमाही गोड्या पाण्याचे सरोवर आहे. हा तलाव पर्वतांच्या मधोमध असून तलावाच्या आजूबाजूला सदाहरित जंगले आणि असंख्य उंच झाडे आहेत जी तलावाच्या सौंदर्यात भर घालतात. समुद्रसपाटीपासून हा तलाव 770 मीटर उंचीवर आहे. व आकाशातून पाहिल्यास या तलावाचा आकार भारताच्या नकाशासारखा दिसतो. काबिनी नदीची उपनदी असलेली ‘पनामरम’ नदी याच तलावातून उगम पावते. पर्यटकांना येथे बोटिंग आणि येथील मत्स्यालयात विविध प्रकारचे मासे पाहायला मिळतात. तसेच लहान मुलांसाठी पार्क, सायकलिंग, फिश स्पा आणि स्थानिक हस्तकलेच्या वस्तूंची दुकाने येथे उपलब्ध आहेत.

10)Wayanad Wildlife Sanctuary-

वायनाड वन्यजीव अभयारण्य किंवा थोलपेट्टी वन्यजीव अभयारण्य हे केरळच्या वायनाड जिल्ह्यातील, केरळमधील दुसरे सर्वात मोठे अभयारण्य आहे. हे भारतातील सर्वात पर्यावरणीयदृष्ट्या महत्त्वपूर्ण क्षेत्र असून समृद्ध जैवविविधता, सदाहरित घनदाट जंगले, बांबूची वने, टेकड्या आणि वन्यजीव प्राणी व पक्षांसाठी ओळखले जाते. 1973 मध्ये स्थापन झालेले हे अभयारण्य अंदाजे 344.44 चौरस किलोमीटर क्षेत्रफळावर पसरलेले आहे. चार पर्वतरांगा असलेले हे अभयारण्य युनेस्को जागतिक वारसा स्थळाचा भाग असलेल्या निलगिरी बायोस्फिअर रिझर्व्हचा भाग असून हे कर्नाटकच्या बांदीपूर आणि नागरहोल राष्ट्रीय उद्यानांशी, व तामिळनाडूच्या मुदुमलाई वन्यजीव अभयारण्याशी जोडलेले आहे. येथे हत्ती, बंगाल वाघ, भारतीय गौर, हरीण, माकड हे वन्यजीव आणि विविध प्रकारच्या पक्ष्यांच्या दुर्मिळ प्रजाती आहेत. पर्यटकांना येथे जंगल सफारीची सोय आहे.

11) Lakkidi View Point-

लक्कीडी व्ह्यू पॉइंट हे केरळच्या वायनाड जिल्ह्यातील, व्याथिरी जवळील निसर्गरम्य पर्यटन स्थळ आहे. हे ठिकाण समुद्रसपाटीपासून, 700 मीटर उंचीवर असून येथे पश्चिम घाटातील हिरव्यागार डोंगररांगा, खोल दऱ्या, थामरसेरी घाटातील 9 तीव्र वळणे असलेला घाटाचे विहंगम दृश्य दिसते. लक्कीडी या ठिकाणाला वायनाड चे प्रवेशद्वार आणि केरळमधील सर्वाधिक पाऊस पडणाऱ्या ठिकाणांपैकी एक असल्यामुळे याला ‘केरळचे चेरापुंजी’ असेही म्हणतात. येथील हवामान धुक्याने वेढलेले असते. आणि पावसाळ्यात येथील परिसर अक्षरशः मंत्रमुग्ध करणारा असतो. येथून जवळच पुकोडे लेक व आख्यायिकेनुसार एका आदिवासी तरुणाच्या आत्म्याला साखळदंडाने बांधून ठेवलेले ‘चेन ट्री’ हे एक अनोखे झाड आहे.

12)Valliyoorkkavu Temple-

वल्लियूरक्कवु भगवती मंदिर हे केरळच्या वायनाड जिल्ह्यातील, मानंतवाडी जवळील प्राचीन मंदिर आहे. हे मंदिर 14 व्या शतकातील असून देवी दुर्गा (वन दुर्गाभद्रकाली आणि जल दुर्गा) रूपांना समर्पित आहे. या मंदिरातील देवीची मूर्ती स्वयंभू आहे. आणि स्थानिक आदिवासी जमातींची अत्यंत पूजनीय आहे.या मंदिराचे वास्तुकाला पारंपारिक केरळ शैलीतील असून त्यामध्ये लाकडी कोरीवकाम पाहायला मिळते. दरवर्षी येथे ‘वल्लियूरक्कवु अराट्टू’ हा प्रसिद्ध उत्सव मार्च-एप्रिल महिन्यात 14 दिवस साजरा केला जातो. या काळात आदिवासी लोक पारंपरिक वाद्ये वाजवून ‘कलमेझुथू’ सारख्या कला सादर करतात. हे मंदिर मानंतवाडीपासून 3 किमी अंतरावर आहे.

13)Chain Tree-

चेन ट्री (साखळीचे झाड) हे केरळच्या वायनाड जिल्ह्यातील,लक्कीडी व्ह्यू पॉईंट जवळील एक प्रसिद्ध आणि रहस्यमय पर्यटन स्थळ आहे. हे एक मोठे फिकस प्रजातीचे झाड असून त्यावर एक मोठी लोखंडी साखळी लटकलेली आहे. स्थानिक लोक कथेनुसार 18 व्या शतकात, ब्रिटिश राजवटीत वायनाडच्या घनदाट जंगलातून मार्ग शोधणे कठीण असताना करिंतंदन नावाच्या स्थानिक आदिवासी तरुणाने ब्रिटीश अभियंत्याला या जंगलातून मार्ग दाखवला. या मार्गाचा शोध लावल्याचे सर्व श्रेय स्वतःकडे घेण्यासाठी त्या ब्रिटिश अभियंत्याने करिंतंदनची हत्या केली. करिंतंदनच्या मृत्यूंनतर त्याचा आत्मा त्या परिसरात भटकू लागला, ज्यामुळे तेथे अनेक अपघात होऊ लागले. नंतर एका पुजाऱ्याने मंत्रोच्चार करून त्याच्या आत्म्याला एका साखळीने या झाडाला बांधून ठेवले.या झाडाच्या बाजूला करिंतंदन यांचे मंदिर ही आहे. स्थानिक लोक आणि ट्रक चालक आजही सुरक्षित प्रवासासाठी येथे प्रार्थना करतात.

14)Puliyarmala Jain Temple-

पुलियारमला जैन मंदिर हे केरळच्या वायनाड जिल्ह्यातील, पुलीयरमाला येथील प्राचीन, ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळ आहे. हे मंदिर जैन धर्माचे 14 वे तीर्थंकर अनंतनाथ स्वामी यांना समर्पित असून अनंतनाथ स्वामी मंदिर म्हणूनही ओळखले जाते. या मंदिराची वास्तुकला ग्रॅनाइट दगडांपासून, पारंपरिक द्रविड शैलीत करण्यात आली आहे. व सुंदर कोरीव काम केलेले आहे. टिपू सुलतानने त्याचे दारूगोळा या इमारतीच्या आवारात साठवले होते, म्हणूनच त्याला “टिपू किल्ला” असेही म्हणतात. या मंदिराच्या गाभाऱ्यात भगवान अनंतनाथ यांची उभी प्रतिमा आहे व पितळेपासून बनलेली भगवान महावीरांची मोठी मूर्ती देखील आहे. हे मंदिर एका टेकडीवर असून सभोवताली कॉफीचे मळे आणि निसर्गरम्य परिसर आहे.

15)Phantom Rock-

फँटम रॉक हे केरळच्या वायनाड जिल्ह्यातील, अंबालावायल जवळील एक नैसर्गिककारापुझा धरण व भूवैज्ञानिक आश्चर्य आहे. या ठिकाणी मानवी कवटीच्या आकाराची एक नैसर्गिक आणि दुर्मिळ खडक रचना आहे. हे ठिकाण समुद्रसपाटीपासून सुमारे 2600 फूट उंचीवर असून याचे नाव प्रसिद्ध ‘फँटम’ कॉमिक्सवरून पडले आहे. स्थानिक भाषेत याला ‘चींगेरी माला’ किंवा ‘थलपारा’ असेही म्हणतात. [२५]. हिरव्यागार डोंगररांगांनी वेढलेले हे ठिकाण ट्रेकिंग, निसर्गप्रेमी आणि छायाचित्रकारांसाठी प्रसिद्ध पर्यटन स्थळ आहे या खडकाच्या माथ्यावरून वायनाडच्या हिरव्यागार दऱ्यांचे आणि टेकड्यांचे विहंगम दृश्य पाहायला मिळते. येथून जवळच निसर्गरम्य कारपुझा धरण आहे.

16)Karapuzha Dam-

कारापुझा धरण हे केरळच्या वायनाड जिल्ह्यातील, काक्कावयाल जवळील काबिनी नदीची उपनदी, कारापुझा नदीवरील मातीचे धरण आहे. या धरणाचे बांधकाम 1977 मध्ये सुरू होऊन 2004 मध्ये पूर्ण झाले. हा धरण परिसर अत्यंत निसर्गरम्य, हिरव्यागार टेकड्या, जलाशय आणि छोट्या बेटांनी समृद्ध आहे. पर्यटकांना येथे पक्षी निरीक्षण, नौकाविहार, केरळमधील सर्वात लांब झिपलाईन, रॉक क्लायंबिंग, जायंट स्विंग आणि बंजी ट्रॅम्पोलिन यांसारखे साहसी खेळ खेळता येतात. तसेच येथे मुलांसाठी उद्यान, रोझ गार्डन आणि बटरफ्लाय पार्क आहे. केरळच्या हिरव्यागार आणि नैसर्गिक प्रदेशात असलेले हे धरण पर्यटकांमध्ये लोकप्रिय ठिकाण आहे.

17)Shree Seeta Devi Lava Kusa Temple-

श्री सीता देवी लव कुश मंदिर हे केरळच्या वायनाड जिल्ह्यातील, पुलपल्ली येथील अत्यंत पवित्र आणि दुर्मिळ मंदिर आहे. केरळमधील हे असे एकमेव मंदिर आहे जिथे भगवान रामाचे पुत्र लव आणि कुश यांची पूजा केली जाते. आणि या मंदिरात मुख्य देवता सीता देवी असून त्यांना येथे ‘जदयात अम्मा’ असे म्हटले जाते. जेव्हा रामाने सीतेचा त्याग केला होता तेव्हा सीता देवी याच ठिकाणी ऋषी वाल्मीकींच्या आश्रमात राहिल्या होत्या आणि येथेच लव-कुश यांचा जन्म व संगोपन झाले. ‘पुलपल्ली’ हे नाव ‘पुल’ (गवत/दर्भ) आणि ‘पल्ली’ (बेड) या शब्दांवरून पडले आहे, कारण लव-कुश लहानपणी येथे दर्भावर खेळत असत. 18 व्या शतकात झामोरिनचा राजा पझ्झासी राजा यांनी हे मंदिर बांधले होते. दरवर्षी जानेवारी महिन्यात या मंदिरात मोठा उत्सव साजरा केला जातो.

18)900 kandi eco park-

900 वुड्स वायनाड इको रिसॉर्ट हे केरळच्या वायनाड जिल्ह्यातील, मेप्पडी जवळ असलेले एक अत्यंत निसर्ग समृद्ध आणि साहसी पर्यटन स्थळ आहे. 900 एकर परिसरात पसरलेले हे ठिकाण धुक्यात वेढलेल्या टेकड्या, घनदाट जंगल, उंच झाडे आणि काचेच्या पुलासाठी प्रसिद्ध आहे. येथील सर्वात मोठे आकर्षण म्हणजे डोंगराच्या कड्यावर बांधलेल्या काचेच्या पुलावरून खालील घनदाट जंगल आणि दरीचे विहंगम दृश्य दिसते. याशिवाय येथे कॅम्पिंग, झिपलाईन, जायंट स्विंग आणि स्काय वॉक यांसारख्या खेळांची सोय आहे.900 कांडी याला थोल्लयराम कांडी असेही म्हणतात. मल्याळम भाषेत ‘थोल्लयराम’ म्हणजे 900 आणि ‘कांडी’ म्हणजे जमिनीचा तुकडा म्हणजेच 900 एकर जमीन. घनदाट जंगलात पसरलेले हे ठिकाण ट्रेकिंग आणि निसर्गप्रेमींसाठी नंदनवन आहे.

19)Pakshipathalam Bird Sanctuary-

पक्षीपथलम पक्षी अभयारण्य, हे केरळच्या वायनाड जिल्ह्यातील, निसर्गप्रेमी आणि ट्रेकर्ससाठी एक नंदनवन आहे. हे अभयारण्य वायनाडमधील ब्रह्मगिरी टेकड्यांमध्ये, समुद्रसपाटीपासून 1440 मीटर उंचीवर वसलेले आहे. येथे मलबार ग्रे हॉर्नबिल, कोकिळा, मोर, लाकूडतोडे, नीलगिरी फ्लाय कॅचर आणि अनेक दुर्मिळ स्थलांतरित पक्षी व वन्यजीव प्राणी आढळतात. तसेच येथील ‘मुनिकल’ या प्राचीन नैसर्गिक गुहा पक्ष्यांचे मुख्य निवासस्थान आहेत. या ठिकाणी पोहोचण्यासाठी घनदाट सदाहरित जंगलातून आणि मोठ्या खडकांमधून जावे लागते. याशिवाय हा परिसर विविध प्रकारच्या दुर्मिळ औषधी वनस्पतींचे ठिकाण आहे.

20)Ponkuzhi Sree Rama Temple-

पोंकुझी श्री राम मंदिर हे केरळच्या वायनाड जिल्ह्यातील, बाथेरी-म्हैसूर रस्त्यावर पोंकुझी नदीच्या काठावरील प्रभू श्रीरामाचे पवित्र धार्मिक स्थळ आहे. अख्यायिकेनुसार प्रभू रामांनी सीतेचा त्याग केल्यानंतर लक्ष्मण त्यांना या घनदाट जंगलात सोडून गेले होते. मंदिरा शेजारीच एक नैसर्गिक तलाव आहे. आणि हा तलाव माता सीतेच्या डोळ्यांतील अश्रूंमुळे निर्माण झाला होता असे सांगितले जाते. या मंदिरात प्रभू श्रीराम, माता सीता, लक्ष्मण आणि हनुमान यांच्या मूर्ती आहेत. आणि येथे गणपती, अयप्पा आणि भगवान श्रीकृष्णाची छोटी मंदिरे आहेत. या मंदिराचे बांधकाम पारंपरिक केरळ शैलीत केले असून मंदिर परिसर गर्द झाडीने वेढलेला आहे. दरवर्षी येथे ध्वजारोहण किंवा कोडिएट्टमसह उत्सव आयोजित केला जातो जो तीरा विधीसाठी प्रसिद्ध आहे. तसेच वावू किंवा अमावस्येच्या दिवशी कार्कीदक वावू बली आणि पितृ तर्पणम साजरा केला जातो.

21)Attamala View Point-

अट्टामाला व्ह्यू पॉइंट हे केरळच्या वायनाड जिल्ह्यातील, कल्पेट्टाजवळील निसर्ग प्रेमी आणि ट्रेकिंगसाठी एक नयनरम्य आणि शांत ठिकाण आहे. हे ठिकाण घनदाट जंगल व चहाच्या बागांनी वेढलेले असून समुद्रसपाटीपासून सुमारे 858 मीटर उंचीवर आहे. येथून चहाचे मळे आणि पश्चिम घाटातील टेकड्यांचे 360 डिग्री विहंगम दृश्य दिसते. तसेच या व्ह्यू पॉइंटजवळ एक ‘डिजिटल’ ग्लास ब्रिज आहे, जो पर्यटकांमध्ये खूप लोकप्रिय आहे. तसेच, इथून दिसणारा सूर्योदय आणि सूर्यास्तचा नजारा अत्यंत विलोभनीय आहे.अट्टामला व्ह्यू पॉइंट हे ठिकाण सूचिप्पारा धबधब्यापासून थोड्या अंतरावर आहे.

22)Banasura Hill-

बाणासुरा टेकडी ही केरळच्या वायनाड जिल्ह्यातील, पश्चिम घाटातील, पदिंजरथरा येथील उंच आणि निसर्गरम्य शिखर आहे. हे शिखर समुद्रसपाटीपासून सुमारे 2,073 मीटर उंचीवर आहे. चेंब्रा शिखरानंतर हे वायनाडमधील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वोच्च शिखर मानले जाते.पौराणिक कथेनुसार, बाणासुरा राक्षसाने येथे तपश्चर्या केली होती, त्याच्या नावावरून बाणासुरा टेकडी हे नाव पडले आहे. येथे घनदाट जंगले, गवताळ प्रदेश, निसर्गरम्य परिसर,धबधबे आणि या शिखरावरून बाणासुरा सागर धरणाचे विहंगम दृश्य पाहायला मिळते. जैवविविधतेने नटलेला हा भाग दुर्मिळ औषधी वनस्पती आणि वन्यजीवांसाठी ओळखला जातो. तसेच हे ठिकाण ट्रेकिंग आणि निसर्गप्रेमींसाठी अत्यंत लोकप्रिय आहे.

23)Thamarassery Churam-

थामरासेरी चुरम ही केरळमधील कोझिकोड आणि वायनाड जिल्ह्यांना जोडणारी पश्चिम घाटातील एक प्रसिद्ध आणि निसर्गरम्य पर्वतीय खिंड आहे. हा घाट 14 किमी लांब असून एडिवरमपासून सुरू होऊन सुमारे 800 मीटर उंचीवरील लक्कीडी येथे संपतो. येथील व्ह्यूपॉइंटवरून घाट रस्ता आणि हिरवाईचे विहंगम दृश्य दिसते या घाटात 9 आव्हानात्मक हेअरपिन वळणे आहेत. जेथून जाताना प्रत्येक खिंडीतून दऱ्या आणि टेकड्यांचे अद्वितीय दृश्य दिसते. थामरासेरी चुरममधून प्रवास करणे हे रोमांचकारी अनुभव देणारे आहे, येथे घनदाट जंगले, कोसळणारे धबधबे, खळखळ वाहणारे ओढे यांचे विहंगम दृश्य पाहायला मिळते. पर्यटकांमध्ये एक लोकप्रिय ठिकाण आहे.

24)Varambetta Mosque-

वरामबेट्टा मशीद ही केरळच्या वायनाड जिल्ह्यातील, एक ऐतिहासिक मशीद आहे. ही मशीद सुमारे 300 वर्षांपूर्वीची असून वायनाड जिल्ह्यातील सर्वात जुनी मशीद मानली जाते. या मशिदीचे बांधकाम 18 व्या शतकात एका सुफी संताच्या स्मरणार्थ करण्यात आले होते. या मशिदीचे बांधकाम पारंपरिक केरळ शैलीत आणि इस्लामिक वास्तुकलेचा संगम आहे. येथे सर्व जाती धर्माचा लोकांना प्रवेश मिळतो. त्यामुळे हे एक सामाजिक सलोख्याचे ठिकाण आहे. ही मशीद कल्पेट्टा शहरापासून 15 किमी अंतरावर आणि निसर्गरम्य बाणासुर सागर धरणाजवळ पडिंजराथरा येथे आहे.

25)Koottamundu Glass Temple-

कुट्टमुंडू काचेचे मंदिर हे केरळच्या वायनाड जिल्ह्यातील, वेल्लारीमाला येथील हिरव्यागार टेकडीवरील जैन धर्मियांचे तीर्थक्षेत्र आहे.या मंदिराच्या आतील भिंतींवर हजारो आरसे (काच) बसवलेले आहेत.त्यामुळे याला काच मंदिर किंवा कन्नडी क्षेत्रम म्हटले जाते. हे मंदिर जैन धर्माचे 23 वे तीर्थंकर पार्श्वनाथ स्वामी यांना समर्पित असून जैन भाविकांसाठी महत्वाचे तीर्थक्षेत्र आहे. या मंदिराचे मुख्य आकर्षण म्हणजे येथे आतील भिंतींवर असलेल्या हजारो आरशांमध्ये गाभाऱ्यातील पार्श्वनाथ स्वामी आणि पद्मावती देवी यांच्या मूर्तींची असंख्य प्रतिबिंबं दिसतात, ज्यामुळे एक अतिशय सुंदर दृश्य तयार होते. हे मंदिर वायनाड जिल्ह्यातील कल्पेट्टापासून सुमारे 22 किमी अंतरावर वेल्लारीमाला टेकड्यांच्या निसर्गरम्य व शांत ठिकाणी आहे.

26)Sree Manikavu Mahashiv Temple –

श्री माणिकवू महाशिव मंदिर हे केरळच्या वायनाड जिल्ह्यातील मीनांगडी जवळील चूथुपारा येथील अत्यंत पवित्र धार्मिक स्थळ आहे. हे मंदिर 6,000 वर्षे जुने असून या मंदिरातील शिवलिंग स्वयंभू आहे. घनदाट जंगल आणि नैसर्गिक हिरवळीच्या कुशीत वसलेल्या या मंदिरात, शिवलींगावर वर्षभर सतत नैसर्गिक जलधारा वाहते ज्याला गंगा नदीचा प्रवाह मानले जाते. आणि हे एक आश्चर्यच समजले जाते. हा मंदिर परिसर 30 एकर पेक्षा जास्त निसर्गरम्य, वनस्पती आणि जैवविविधतेने नटलेल्या देवराई मध्ये आहे. प्राचीन काळी अनेक ऋषी-मुनींनी येथे तपश्चर्या केली होती, म्हणून या भागाला ‘मणीकवू’ असे नाव पडले आहे.

27)Thrissilery Shiva Temple-

थ्रिसिलरी शिव मंदिर हे केरळच्या वायनाड जिल्ह्यातील, माणंथवाडी जवळ असलेले एक अत्यंत प्राचीन आणि पवित्र शिव मंदिर आहे. हे मंदिर 1000 वर्षांपेक्षा जास्त जुने असून या मंदिरातील शिवलिंग हे स्वयंभू आहे. या मंदिराची वास्तूकला केरळ शैलीतील असून येथील परिसर अत्यंत निसर्गरम्य आहे. असे सांगितले जाते की थिरुनेल्ली येथे महाविष्णू मंदिरात केलेले पितृ तर्पण विधी थ्रिसिलरी मंदिरात दर्शन घेतल्याशिवाय पूर्ण होत नाहीत. तसेच या मंदिर परिसरात पाण्याच्या कुंडाच्या मध्यभागी ‘जल दुर्गा’ देवीचे एक छोटे मंदिर आहे, ज्याचे पाणी कधीच वाटत नाही. येथे भगवान शिवाला ‘नेविलक्कू’ ( तुपाचा दिवा) अर्पण करण्याची परंपरा आहे. दरवर्षी येथे महाशिवरात्री आणि ऑक्टोबर महिन्यातील ‘पुथारी’ सण साजरा केला जातो.

28)Begur Wildlife Sanctuary-

बेगुर वन्यजीव अभयारण्य हे केरळच्या वायनाड जिल्ह्यातील,मनंथवडी जवळ पश्चिम घाटाच्या कुशीत वसलेले एक निसर्गरम्य ठिकाण आहे. हे अभयारण्य घनदाट सदाहरित जंगलांनी वेढलेले एक प्रमुख जैवविविधता ठिकाण आहे. हे ठिकाण निलगिरी बायोस्फीअर रिझर्व्हचा भाग आहे व समुद्रसपाटीपासून 700 ते 1400 मीटर उंचीवर स्थित आहे. येथे मोठ्या प्रमाणात हत्तींचे कळप, वाघ, हरीण, रानगवे, रानडुक्कर आणि विविध विविध प्रकारचे पक्षी आढळून येतात. निर्सगप्रेमी आणि ट्रेकिंग प्रेमींसाठी हे एक उत्तम ठिकाण असून, या जंगलात दुर्मिळ औषधी वनस्पती आणि मोठी सागवान झाडे आहेत.

29)Banasuramala, Meenmutty Waterfalls-


मीनमुट्टी धबधबा हा केरळच्या वायनाड जिल्ह्यातील, पदिंजरथरा येथील सर्वात उंच व केरळ राज्यातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा धबधबा आहे. बाणासुरा सागर धरणाजवळील हा धबधबा 1000 फूट उंचीवरून तीन वेगवेगळ्या स्तरांमधून खाली कोसळतो. हा धबधबा परिसर अत्यंत घनदाट जंगलाचा असून येथे पोहोचण्यासाठी जंगल, चहाचे मळे आणि खडकाळ भागातून सुमारे 2 किमीचा थरारक ट्रेक करावा लागतो. हे ठिकाण पश्चिम घाटातील एक सुंदर इको-टुरिझम डेस्टिनेशन आहे. निसर्गप्रेमी आणि साहसी ट्रेकिंग साठी हे एक उत्तम ठिकाण आहे.

30)Wayanad Heritage Museum-

वायनाड हेरिटेज म्युझियम हे केरळच्या वायनाड जिल्ह्यातील, सुलतान बथरी येथील अंबालावायल मध्ये असलेले केरळमधील सर्वात मोठे आणि महत्त्वाचे पुरातत्व संग्रहालय आहे. जे अंबालावायल हेरिटेज म्युझियम म्हणूनही ओळखले जाते. या संग्रहालयात चार विभाग आहेत, त्यामध्ये ‘वीरस्मृती’ येथे विविध प्रकारचे ‘वीरगळ’ पाहायला मिळतात. ‘गोत्रस्मृती’ या दालनात आदिवासी जीवनाशी त्यांचे दागिने, शिकारीची हत्यारे आणि मासे पकडण्याचे सापळे आहेत. ‘देवस्मृती’ येथे 12 व्या शतकातील पाषाण मूर्ती, टेराकोटाच्या आकृत्या आणि मलबार प्रदेशातील उत्खननात सापडलेल्या पुरातन वस्तू आहेत. आणि येथील जीवनस्मृती दालनात आदिवासींची घरगुती भांडी आणि संगीत वाद्य आहेत. तसेच येथील मल्टीमीडिया थिएटरमध्ये पर्यटकांना माहितीपट दाखवले जातात. या संग्रहालयापासून एडक्कल लेणी 5 किमी अंतरावर आहेत.

31)Assumption Forane Church-

असम्प्शन फोरेन चर्च हे केरळच्या वायनाड जिल्ह्यातील, सुलतान बाथेरी येथील एक ऐतिहासिक आणि शांत रोमन कॅथोलिक चर्च आहे. या चर्चची स्थापना इसवी सन 1900 मध्ये झाली असून हे चर्च धन्य व्हर्जिन मेरीला समर्पित आहे. हा ‘सिरो-मलबार’ कॅथोलिक चर्च आहे व मनंतवाडी धर्मप्रांताच्या अंतर्गत येतो. या चर्चची वास्तुकला आधुनिक आणि भव्य असून येथील परिसर अत्यंत शांत, अध्यात्मिक व नैसर्गिक सौंदर्याने वेढलेला आहे. तसेच या चर्च परिसरात असम्प्शन हायस्कूल आणि हॉस्पिटल या शैक्षणिक व आरोग्य संस्था आहेत. हे ठिकाण सुलतान बथेरी येथे राष्ट्रीय महामार्ग(NH 766) वर स्थित आहे.

32)⁦Rippon Tea Factory-

रिपन टी फॅक्टरी ही केरळच्या वायनाड जिल्ह्यातील,मेप्पडी शहराजवळील एक प्रसिद्ध पर्यटन स्थळ आहे. हे ठिकाण समुद्रसपाटीपासून साधारणपणे 2000 मीटर उंचीवर असून सुमारे 443 हेक्टर परिसरात पसरलेली आहे. हा चहाचा कारखाना केरळमधील सर्वात जुन्या चहाच्या मळ्यांपैकी एक आहे व 18 व्या शतकात ब्रिटिशांनी बांधला होता. पर्यटकांना येथे हिरव्या चहाच्या पानांपासून ते पॅकेजिंगपर्यंतची संपूर्ण प्रक्रिया जवळून पाहता येते. आणि ताज्या चहाचा आस्वाद घेता येतो. तसेच येथे 1930 मध्ये बांधलेला एक जुना ब्रिटिशकालीन ‘रिपन हेरिटेज बंगला’ आहे. जो आता रिसॉर्ट म्हणून वापरला जातो. पर्यटकांसाठी हे मुक्कामाचे एक उत्तम ठिकाण आहे.

Visit the travel blog

1) वायनाड जिल्ह्यातील कुरुवद्वीप (कुरुवा बेट)कुठे आहे?

वायनाड जिल्ह्यातील कुरुवद्वीप (कुरुवा बेट) हे काबिनी नदीच्या मध्यभागी 950 एकरांवर पसरलेले, समृद्ध बेटांचा समूह आहे.


2)वायनाड जिल्ह्यातील एडक्कल लेण्यांचा इतिहास काय आहे?

वायनाड जिल्ह्यातील एडक्कल लेण्या 7,000 वर्ष जुन्या पाषाणयुगापासून अस्तित्वात असलेल्या लेण्या आहेत.


3) वायनाड वन्यजीव अभयारण्य कोणत्या राज्यात आहे?

वायनाड अभयारण्य हे केरळ राज्यातील वायनाड जिल्ह्यात, पश्चिम घाटाच्या दक्षिण भागात आहे. याला मुथांगा वन्यजीव अभयारण्य असेही म्हणतात आणि त्याची स्थापना 1973 मध्ये झाली आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
Scroll to Top