कोझिकोड जिल्ह्यातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे – Top 27 places to visit in Kozhikode district

मित्रांनो भारतभ्रमंती या वेबसाईटवर तुम्ही इंग्लिश, हिंदी आणि मराठी भाषेत, भारत देशातील प्रत्येक राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यातील संपूर्ण पर्यटन स्थळे पाहू शकता. आता तुम्ही पाहणार आहात केरळ राज्यातील कोझिकोड जिल्ह्यातील संपूर्ण पर्यटन स्थळे.भारतातील केरळ राज्य हे जगातील सर्वात लोकप्रिय पर्यटन स्थळांपैकी एक आहे. कोझिकोड (पूर्वीचा कालिकत) हा केरळच्या मलबार किनाऱ्यावरील एक प्रमुख ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि व्यापारी जिल्हा आहे, प्राचीन काळापासून हा मसाल्यांच्या व्यापाराचे प्रमुख केंद्र होते, म्हणून याला ‘मसाल्यांचे शहर’ म्हटले जाते. 1498 मध्ये पोर्तुगीज खलाशी ‘वास्को द गामा’ कोझिकोडजवळील काप्पड समुद्रकिनाऱ्यावर उतरल्यामुळे हे एक ऐतिहासिक शहर आहे. Top 27 places to visit in Kozhikode district

तसेच हा जिल्हा (यूनेस्को) मान्यताप्राप्त भारताचे पहिले ‘सिटी ऑफ लिटरेचर’ (साहित्य शहर) असून मध्ययुगीन काळात ‘झामोरिन’ राज्याची राजधानी होता. या जिल्ह्यात IIM कोझिकोड आणि NIT कालिकत या राष्ट्रीय स्तरावरील प्रतिष्ठित शिक्षण संस्था आहेत. पश्चिमेला अरबी समुद्र आणि पूर्वेला वायनाडच्या डोंगररांगा असलेल्या या जिल्ह्यात कोझिकोड, वडकरा, कोइलांडी आणि थामरसेरी असे चार तालुके आहेत. या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात निसर्गरम्य ऐतिहासिक व सांस्कृतिक पर्यटन स्थळे असून हा जिल्हा मलबाडी संस्कृती मल्याळम भाषा आणि ‘कालिकत हलवा’ व बिर्याणीसाठी प्रसिद्ध आहे.

Top 27 places to visit in Kozhikode district

कोझिकोड जिल्ह्यातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे

1)Tali Maha Shiva Kshetram-

Top 27 places to visit in  Kozhikode district

ताली शिव मंदिर हे केरळच्या कोझिकोड शहराच्या मध्यभागी असलेले एक प्राचीन शिव मंदिर आहे. पौराणिक कथेनुसार, या मंदिराच्या गर्भगृहातील ज्योतिर्लिंगाची स्थापना ऋषी परशुरामांनी केली होती.आणि 14 व्या शतकात कालिकतच्या झामोरिन सम्राटने हे मंदिर बांधल्यामुळे झामोरिन घराण्याचे कौटुंबिक मंदिर म्हणूनही ओळखले जाते.नंतर 1964 मध्ये त्याचा जीर्णोद्धार करण्यात आला. या दुमजली मंदिराचे गर्भगृह रथाच्या आकारात बांधलेले असून त्यावर पितळी नक्षीकाम आणि भित्तिचित्रे आहेत. या मंदिर संकुलात शिव आणि पार्वती, श्रीकृष्ण, नरसिंह मूर्ती, गणपती आणि भगवती यांच्या मूर्ती आहेत. दरवर्षी येथे ऑक्टोबर महिन्यात रेवती पट्टाथानम हा सात दिवसाचा कार्यक्रम असतो.

2)Kappad Beach-

काप्पड (कप्पाकडवू)बीच हा केरळच्या कोझिकोड जिल्ह्यातील, शांत आणि ऐतिहासिक समुद्रकिनारा आहे. 1498 मध्ये पोर्तुगीज खलाशी ‘वास्को द गामा’ याच किनाऱ्यावर उतरला होता. तेव्हापासून त्याने भारत आणि युरोपमधील सागरी व्यापाराचे एक नवे पर्व सुरू केले. केरळमधील हा बीच स्वच्छता आणि पर्यावरणपूरकतेसाठी आंतरराष्ट्रीय ‘ब्लू फ्लॅग’ प्रमाणपत्र मिळालेला बीच आहे. वास्को द गामा यांच्या स्मृतीप्रित्यर्थ येथे दगडी स्तंभ उभारण्यात आला असून या बीचच्या बाजूला समुद्रात मोठा खडक आहे, जिथून सूर्यास्ताचे सुंदर दृश्य दिसते व येथे खडकावर 800 वर्षे जुने देवीचे मंदिर आहे.

3)Kurumba Devi Temple-

कुरुंबा देवी मंदिर हे केरळच्या कोझिकोड जिल्ह्यातील, काप्पड बीचवरील एक ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळ आहे. हे 800 वर्षे जुने मंदिर समुद्रकिनाऱ्याजवळील खडकाळ भागावर असून कुरुंबा मंदिर किंवा ‘ओरूपोट्टम कावू’ म्हणूनही ओळखले जाते. हे मंदिर स्थानिक मच्छीमार समुदायासाठी अत्यंत श्रद्धेचे ठिकाण आहे. येथील परिसर अत्यंत निसर्गरम्य, शांत वातावरण, नारळाच्या झाडांची रांग, खडकाळ रचना आणि कायाकिंग/बोटिंगसाठी प्रसिद्ध आहे. तसेच येथे वास्को-द-गामाच्या आगमनानिमित्त उभारलेले एक दगडी स्मारक आहे.

4)Beypore-

बेपोर हे केरळच्या कोझिकोड जिल्ह्यातील, चालियार नदीच्या काठावरील एक प्राचीन आणि ऐतिहासिक बंदर आहे. हे ठिकाण 1500 वर्षांहून अधिक जुनी लाकडी जहाजे ‘उरु’ (लाकडी जहाज) बांधणी व मासेमारीसाठी प्रसिद्ध असून येथे पुलीमुट्टू समुद्रात 1 किमी लांबीचा खडकांचा रस्ता आहे जिथून समुद्राचे सुंदर दृश्य दिसते. बेपोर हे केरळमधील दुसरे सर्वात मोठे बंदर असून, मध्ययुगीन काळापासून ते व्यापाराचे केंद्र राहिले आहे. येथे बोटिंग, जहाजांचे यार्ड, फिशिंग हार्बर आणि जवळच कादालुंडी पक्षी अभयारण्य आहे. दरवर्षी डिसेंबर महिन्यात येथे आंतरराष्ट्रीय जल महोत्सव आयोजित केला जातो, ज्यामध्ये नौका शर्यती आणि साहसी जलक्रीडा होतात.

Visit our website: allindiajourney.com

5)Mananchira Square-

मननचिरा स्क्वेअर हे केरळच्या कोझिकोड शहराच्या मध्यभागी असलेले एक ऐतिहासिक नयनरम्य आणि प्रसिद्ध उद्यान आहे. 14 व्या शतकात झामोरिन राजा मान विक्रम याने बनवलेल्या तलावाच्या भोवती हे उद्यान वसलेले असून, येथे हिरवेगार लॉन, शिल्पे, संगीतमय कारंजे, मुक्त-हवाई रंगमंच, कृत्रिम टेकडी, आणि विविध प्रसिद्ध मल्याळम लेखकांचे पुतळे आहेत. हा तलाव 3.49 एकर क्षेत्रावर पसरलेला आयताकृती तलाव असून नैसर्गिक झऱ्याने भरलेला आहे व येथील प्रवेशद्वार आणि इमारतींवर केरळची पारंपारिक वास्तुकला पाहायला मिळते. या उद्यानाच्या जवळ कोझिकोड सार्वजनिक वाचनालय, टाऊन हॉल आणि आर्ट गॅलरी आहे.

6)Thusharagiri Waterfalls-

तुषारगिरी धबधबा हा केरळच्या कोझिकोड जिल्ह्यातील चालिप्पुझा नदीच्या प्रवाहातून निर्माण झालेला नयनरम्य धबधबा आहे. येथे एरट्टुमुक्कू, मझविल चट्टोम आणि थुम्बीथुल्लुम पारा हे तीन मुख्य धबधबे आहेत. व पश्चिम घाटातून उगम पावणाऱ्या दोन उपनद्यांच्या संगमातून चालीपुझा नदी तयार होते, ज्यावर हे धबधबे आहेत. यातील सर्वात उंच धबधबा ‘थेनपारा’ असून तो सुमारे 75 मीटर उंचीवरून कोसळतो. घनदाट जंगलातून जाणारा हा धबधबा पर्यटकांसाठी नंदनवन आहे. तसेच येथे थन्नी मुथस्सी (आजी वृक्ष) हा 400 वर्ष जुने झाड आहे जे पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र आहे. पर्यटकांना येथे रॉक क्लाइंबिंग आणि निसर्ग पर्यटनाचा आनंद घेता येतो.

7)Kakkayam Dam-

कक्कयम धरण हे केरळमधील कोझिकोड जिल्ह्यातील कूराचुंडू येथील निसर्गरम्य पर्यटन स्थळ आहे. हे धरण कुट्टियाडी नदीवर बांधलेले असून ते ‘कुट्टियाडी जलविद्युत प्रकल्पाचा’ भाग आहे. हा धरण परिसर अत्यंत निसर्गरम्य, दाट जंगले, जैवविविधता, दऱ्या आणि धबधब्यांनी वेढलेला असल्याने या भागाला “केरळचे उटी” असेही म्हटले जाते. तसेच या धरणाच्या जवळच ‘उरक्कुझी धबधबा’ हे पर्यटकांचे मुख्य आकर्षण आहे. हे धरण क्षेत्र मलबार वन्यजीव अभयारण्याचा भाग असल्याने येथे हत्ती, गवा आणि विविध प्रकारचे पक्षी पाहायला मिळतात.

8)Mishqal Mosque-

मिश्कल मशीद ही केरळच्या कोझिकोड जिल्ह्यातील, कुट्टीचिरा येथील 700 वर्ष जुनी ऐतिहासिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या महत्त्वाची मशीद आहे. ही मशिद 14 व्या शतकात नाखुदा मिश्कल या श्रीमंत अरब व्यापाऱ्याने बांधली होती. आणि त्यांच्या नावावरूनच या मशिदीला ‘मिश्कल मशीद’ असे नाव पडले. या 4 मजली मशिदीची वास्तुकाला केरळच्या पारंपारिक शैलीत बांधलेली असून येथे सामान्य मशिदींप्रमाणे मिनार किंवा घुमट नाहीत. या मशिदीत 47 दरवाजे आणि कोरीव काम केलेले 24 लाकडी खांब असून
येथील मुख्य प्रार्थना कक्षात 400 भाविक एकाच वेळी नमाज पठण करू शकतात.

9)Aripara Waterfalls-

अरिप्पारा धबधबा हा केरळच्या कोझिकोड जिल्ह्यातील, थिरुवाम्बडी शहराजवळील अनाकम्पोयल मधील एक नयनरम्य धबधबा आहे. हा धबधबा भव्य इरुवंजी नदीच्या भाग असून, आठ थरांमध्ये खाली पडतो, ज्यामध्ये सुल्लुकल्लू, वट्टक्कुझी, निरन्नापारा, ओलिच्चुचाट्टम, श्वासाक्कुझी आणि नीलक्कयातडाकम यांचा समावेश आहे. अरिप्पारा नावाचा अर्थ “तांदळाचा खडक” असा होतो. हा धबधबा कोझिकोड शहरापासून साधारण 45 किमी अंतरावर असून लोकप्रिय पर्यटन स्थळ आहे.

10)Pazhassi Raja Archaeological Museum-

पझस्सीराजा पुरातत्व संग्रहालय हे केरळच्या कोझिकोड जिल्ह्यातील, पूर्व टेकडीवरील प्रसिद्ध ऐतिहासिक संग्रहालय आहे. हे संग्रहालय 1812 मध्ये बांधलेल्या ‘ईस्ट हिल बंगला’ या इमारतीत असून ब्रिटीश ईस्ट इंडिया कंपनीविरुद्ध गनिमी काव्याने लढा दिलेल्या राजा वर्मा पझसी यांच्या स्मरणार्थ हे नाव देण्यात आले आहे. येथे प्राचीन नाणी, महापाषाण युगातील अवशेष छत्री दगड, दफन कुंभांचे अवशेष, प्राचीन शस्त्रे आणि ब्रॉन्जच्या मूर्ती व भित्तीचित्रे आहेत. तसेच या संग्रहालयाला लागूनच असलेल्या आर्ट गॅलरीत राजा रवी वर्मा यांची उत्कृष्ट चित्रे आहेत. या संग्रहालयाच्या शेजारीच भारताचे माजी संरक्षण मंत्री व्ही. के. कृष्ण मेनन यांना समर्पित एक संग्रहालय आहे.

11)Kadalundi Bird Sanctuary-

कडलुंडी पक्षी अभयारण्य हे केरळच्या कोझिकोड जिल्ह्यातील, कडलुंडी नदी आणि अरबी समुद्राच्या संगमावर वसलेले आणि लहान बेटांच्या समूहात पसरलेले नयनरम्य नंदनवन आहे. डोंगरांनी वेढलेल्या या अभयारण्यात 60 पेक्षा जास्त स्थलांतरित पक्षी आणि 100 हून अधिक स्थानिक पक्ष्यांच्या प्रजाती आढळतात. त्यामध्ये गल्स, टर्न्स, सँडपायपर, रेड आणि ग्रीनशँक, किंगफिशर आणि मलबार हॉर्नबिल यांचा समावेश आहे. याशिवाय येथील खारफुटीची वने, बोट सफारीआणि शांत जलाशय पर्यटकांना आकर्षित करतात.

12)Sarovaram Bio Park-

सरोवराम बायो पार्क हे केरळच्या कोझिकोड जिल्ह्यातील, कोट्टोली येथील पर्यावरणीय, निसर्गरम्य उद्यान आहे. हे उद्यान 200 एकर परिसरात पसरलेले असून कॅनोली कालव्याला लागून आहे. या पाणथळ उद्यानात खारफुटीच्या 7 प्रजाती आणि विविध प्रकारच्या वनस्पती आढळतात. पक्षीप्रेमींसाठी हे एक नंदनवन असून येथे फुलपाखरू आणि ऑटर पार्क, किंगफिशर, बगळे आणि विविध स्थलांतरित पक्ष्यांसह सुमारे 70 पेक्षा जास्त पक्ष्यांच्या प्रजातींची आहेत. पर्यटकांसाठी येथे नौकाविहार, खुले नाट्यगृह आणि संगीतमय कारंजे आहे.

13)Regional Science Centre And Planetarium –

प्रादेशिक विज्ञान केंद्र आणि तारांगण हे केरळच्या कोझिकोड जिल्ह्यातील, जाफरखान कॉलनीमधील विज्ञानप्रेमी आणि विद्यार्थ्यांसाठी एक प्रमुख आकर्षण आहे. या विज्ञान केंद्राची स्थापना 1997 मध्ये झाली असून येथे अंतराळ आणि ग्रहतार्‍यांची माहिती देणारे अत्याधुनिक ‘कार्ल झिस’ 250 आसनक्षमता असलेले तारांगण, 3डी थिएटर आणि विज्ञान गॅलरींद्वारे अंतराळ व विज्ञानाची माहिती देते. कॅलिकट प्लॅनेटेरियम हे नॅशनल कौन्सिल ऑफ सायन्स म्युझियमच्या अंतर्गत कार्य आणि विज्ञानाचा प्रसार करते. तसेच या विज्ञान केंद्रातील प्रदर्शनात ‘हाऊ थिंग्स वर्क’, ‘हॉल ऑफ टेक्सटाईल’ आणि ‘फन सायन्स’ या गॅलरी व बाहेरील भागात एक मोठे विज्ञान उद्यान, मत्स्यालय आणि कीटकशास्त्र विभाग आहे.

14)Vadakara-

वडकरा हे केरळच्या कोझिकोड जिल्ह्यातील, एक ऐतिहासिक किनारपट्टीवरील शहर आहे. हे शहर मलबारमधील कलरीपयट्टू या युद्धकलेचे केंद्र असून प्रसिद्ध मार्शल आर्ट योद्धा थाचोली ओथेनन याचे जन्मस्थान आहे. येथील लोकनारकावू हे प्रसिद्ध मंदिर ‘वडक्कन पाट्टुकल’ मधील वीरांशी संबंधित असून दुर्गा देवीला समर्पित आहे. तसेच येथील मूरद नदी आणि अरबीसमुद्राच्या संगमावरील ‘वडाकरा सँड बँक्स’ हे प्रेक्षणीय ठिकाण आहे. याशिवाय कोट्टक्कल येथे कुंजाली मरक्कर (सागरी प्रमुख) यांचे स्मारक व संग्रहालय आहे, जिथे प्राचीन शस्त्रे पाहायला मिळतात.

15)CVN Kalari Sangam-

सीव्हीएन कलारी संगम हे केरळच्या कोझिकोड जिल्ह्यातील, नडक्कावू भागातील प्राचीन युद्धकला ‘कलारीपयट्टू’ मर्मा चिकित्सा, स्वसंरक्षण आणि पारंपारिक उपचारांचे एक जगप्रसिद्ध केंद्र आहे. या संस्थेची स्थापना 1950 मध्ये स्व. के. नारायणन गुरुक्कल यांनी केली होती. येथे कलारीपयट्टूच्या चारही टप्प्यांचे (मेथारी, कोलथारी, अंकथारी आणि वेरुमकाई) प्रशिक्षण दिले जाते. हे केंद्र केवळ मार्शल आर्ट्ससाठीच नाही, तर पारंपारिक उपचारांसाठीही प्रसिद्ध आहे. येथे हाडांचे विकार, मज्जातंतूंच्या समस्या आणि स्नायूंच्या वेदनांवर मर्म चिकित्सा आणि आयुर्वेदिक तेलाने केली जाणारी मालिश (उझिचिल) दिली जाते. येथे रुग्णांसाठी ‘आयुष आयुर्वेद आश्रम’ सुविधा आहे.

16)Palayadu Nada-

पलायडू गाव हे केरळच्या कोझिकोड जिल्ह्यातील, निसर्गसौंदर्याने नटलेले एक सुंदर ठिकाण आहे. येथील शांत वातावरण, नारळाच्या बागा, हिरवीगार झाडे, पारंपरिक केरळ संस्कृती आणि मलबार प्रदेशातील पारंपारिक निसर्गसौंदर्य येथे पाहायला मिळते. तसेच पलायडूपासून जवळच असलेला, कोलावी बीच हा शांत वातावरण आणि मँग्रोव्हजसाठी प्रसिद्ध आहे. आणि काडलूर पॉइंट लाइटहाऊस हे समुद्रकिनाऱ्यावरील एक ऐतिहासिक आणि नयनरम्य ठिकाण आहे.पर्यटकांना सहलीसाठी ‘अकलापुझा बॅकवॉटर’ येथे निसर्गाच्या सानिध्यात शांत ठिकाणी नौकाविहाराचा आनंद घेता येतो.

17)Mel Pazhani Murugan Temple-

मेल पझानी मुरुगन मंदिर हे केरळच्या कोझिकोड जिल्ह्यातील, मयिलादुमकुन्नू येथील टेकडीवर असलेले भगवान मुरुगन यांचे पवित्र आणि शांत ठिकाण आहे. या मंदिराची स्थापना सद्गुरु श्री शरावण बाबा यांच्या प्रेरणेने झाली असून हे मंदिर तामिळनाडूतील पलानी मंदिराच्या धर्तीवर पश्चिमेकडे तोंड करून आहे. या मंदिरात मुख्य देवता श्री ज्ञान धंडायुथापानी (ज्ञानदंडा) स्वरूपात विराजमान आहेत. भगवान मुरुगन सोबतच, येथे शिव आणि गणेशाची मंदिरे आहेत. या मंदिरात थाईपूसम, स्कंद षष्ठी, महाशिवरात्री, विशू आणि श्री मुरुगन जयंती साजरे केले जातात.

18)Vellarimala-

वेल्लारी माला हे केरळच्या कोझिकोड जिल्ह्यातील, तिरुवांबडी येथील गिर्यारोहण आणि निसर्गरम्य पर्यटन स्थळ आहे.पश्चिम घाटातील हे ठिकाण एक निसर्गरम्य पर्वतरांग असून याला ‘कॅम्प्स हम्प माउंटेन्स’ म्हणूनही ओळखले जाते. या पर्वतरांगेतील सर्वात उंच शिखर वावुल माला असून त्याची उंची 2,339 मीटर आहे. येथून चालियार नदीची उपनदी कांजिरापुझा या खडकाळ प्रदेशातून वाहते, त्यामुळे येथे अनेक सुंदर धबधबे आणि झरे तयार झाले आहेत. त्यातीलच ‘ओलिचुचट्टम’ हा एक अत्यंत सुंदर व प्रसिद्ध धबधबा आहे. निसर्गप्रेमी आणि गिर्यारोहण साठी हे लोकप्रिय ठिकाण आहे.

19)Peruvannamuzhi Dam-

पेरुवन्नामुझी धरण हे केरळच्या कोझिकोड जिल्ह्यातील, चक्किट्टापारा येथे कुट्टियाडी नदीवर बांधलेले एक निसर्ग संपन्न धरण आहे. हे धरण 1973 मध्ये कार्यान्वित झाले असून मलबार वन्यजीव अभयारण्याचा भाग आहे. या धरणाचा वापर कोझिकोड, क्विलँडी आणि वडाकरा या भागांच्या सिंचनासाठी आणि पिण्याच्या पाण्यासाठी केला जातो. येथे स्पीड बोटिंग, निर्जन बेटे, पक्षी अभयारण्य, मगर प्रजनन केंद्र, स्मारक थोट्टम (उद्यान) ही प्रमुख आकर्षणे आहेत. याशिवाय येथे मोठ्या प्रमाणात जैवविविधता, वनस्पती आणि प्राणी आढळून येतात.

20)Matri Dei Cathedral-

मातृ देई कॅथेड्रल हे केरळच्या कोझिकोड जिल्ह्यातील, मलबार प्रदेशातील प्राचीन चर्च आहे. हा चर्च ‘मदर ऑफ गॉड चर्च’ आणि स्थानिक भाषेत वालिया पल्ली म्हणूनही ओळखला जातो. 1513 AD मध्ये झामोरिनच्या परवानगीने पोर्तुगीजांनी हे चर्च बांधले. इटालियन वास्तुविशारदांनी रचना केलेले हे कॅथेड्रल ‘रोमन’ आणि ‘गॉथिक’ स्थापत्यशैलीचे एक उत्तम उदाहरण आहे. या चर्चमध्ये सेंट मेरीचे 200 वर्षे जुने पोर्ट्रेट आहे. आणि चर्चच्या परिसरात एक स्मशानभूमी असून तिथे पहिले कॅथोलिक मिशनरी पेड्रो डी कोविल्हा यांची समाधी आहे. व येथे ग्रॅनाइटवर कोरलेला एक प्राचीन पोर्तुगीज शिलालेख असलेला दगडी क्रॉस आहे.

21)Sargaalaya Kerala Arts and Crafts Village-

सरगालय केरळ कला आणि हस्तकला गाव हे केरळच्या कोझिकोड जिल्ह्यातील, इरिंगल येथील एक अद्वितीय पर्यटन स्थळ आहे. हे गाव वाटकारा जवळ, मूरद नदीच्या तीरावर 20 एकर परिसरात पसरलेले असून याचे उद्घाटन 19 फेब्रुवारी 2011 रोजी करण्यात आले. येथे 60 पेक्षा जास्त स्टॉल्सवर कारागिरांनी बनवलेल्या मातीकाम, बांबू हस्तकला, विणकाम, लाकूड, दोरखंड कोरीवकाम आणि काथ्यापासून बनवलेल्या वस्तूंचे प्रदर्शन आहे. पर्यटकांसाठी येथे नौकाविहार हस्तकला संग्रहालय आणि कार्यशाळांची सोय आहे. दरवर्षी येथे ‘आंतरराष्ट्रीय कला आणि हस्तकला महोत्सव’आयोजित केला जातो.

22)Kallai River-

कल्लई नदी ही केरळच्या कोझिकोड जिल्ह्यातील, ऐतिहासिक आणि व्यापारी दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाची नदी आहे. केरळमधील ही सर्वात लहान नदी असून पश्चिम घाटातील चेरीक्कुलाथूर येथून 45 मीटर उंचीवरून उगम पावते. ही नदी चेरुकुलथूर, कोवूर आणि ओलावन्ना या भागांतून वाहत जाऊन अरबी समुद्राला मिळते. 20 व्या शतकाच्या सुरुवातीला कल्लई हे आशियातील लाकूड व्यापाराचे केंद्र होते. व जपाननंतर हे जगातील दुसरे सर्वात मोठे लाकूड यार्ड होते. येथील जंगलातील सागवान आणि रोझवूड कल्लई नदीवाटे कोझिकोड बंदरापर्यंत नेले जात असे आणि लाकडाचे ओंडके नदीच्या खाऱ्या पाण्यात अनेक महिने भिजवून ठेवले जात, ज्यामुळे लाकूड अधिक मजबूत होत असे. येथे ब्रिटिश कालीन कल्लई लोखंडी पूल, कडलुंडी पक्षी अभयारण्य आहे. पर्यटक या नदीत नौकाविहाराचा आनंद घेऊ शकतात.

23)Ethnological Museum -Kirtads –

किर्तड्स वांशिक संग्रहालय हे केरळच्या कोझिकोड जिल्ह्यातील, आदिवासी संस्कृती आणि इतिहासाचा एक महत्त्वाचा वारसा आहे. हे संग्रहालय 1973 मध्ये स्थापन झाले असून ‘केरळ इन्स्टिट्यूट फॉर रिसर्च ट्रेनिंग अँड डेव्हलपमेंट स्टडीज ऑफ शेड्युल्ड कास्ट्स अँड शेड्युल्ड ट्राइब्स’ (KIRTADS) या संस्थेचा एक भाग आहे. या संग्रहालयात सुमारे 2,500 पेक्षा जास्त वस्तूंचा संग्रह आहे. त्यामध्ये आदिवासी जमातींच्या लाकडाच्या काठ्या, शिकार, विविध प्रकारचे बाण, सापळे, साठवणुकीची टोपली, वाद्ये, मोजमापाची भांडी, दागिने, हस्तकला, जाळी, लाकडी कोरीव काम, घरगुती भांडी, पारंपरिक दागिने आणि पोशाख आहेत. याशिवाय, या संग्रहालयात चोलनैकन, कादर, पणियन, वेट्टाकुरुमन, कुरुंबर, मुथुवन जमातींच्या पारंपारिक घरांचे मॉडेल बांधण्यात आले आहेत. या संग्रहालयाचा उद्देश आदिवासी समुदायांची जीवनशैली, परंपरा आणि तंत्रज्ञान जतन करणे हा आहे.

24)Lokanarkavu Temple-

लोकनार्कवू मंदिर हे केरळच्या कोझिकोड जिल्ह्यातील, वडाकरा शहराजवळ मेमुंडा येथील धार्मिक स्थळ आहे. 1500 वर्षा जुने असलेले हे मंदिर देवी दुर्गा (भगवती) ला समर्पित असून या मंदिर परिसरात भगवान शिव आणि विष्णू यांची मंदिरे आहेत. हे मंदिर केरळच्या प्रसिद्ध मार्शल आर्ट्स ‘कलरीपयट्टू’ साठी ओळखले जाते. आणि केरळचे महान योद्धा तचोली ओथेनन यांचे हे आराध्य दैवत होते. आजही अनेक कलरीपयट्टू सराव सुरू करण्यापूर्वी या देवीचा आशीर्वाद घेतात. येथे देवी भगवतीला’लोकनार्काविलम्मा’ म्हटले जाते. दरवर्षी येथे 41 दिवसांचा मोठा उत्सव साजरा केला जातो.

25)shree Valayanad Devi Temple-

श्री वलयानाद देवी मंदिर हे केरळच्या कोझिकोड जिल्ह्यातील, 14 व्या शतकातील एक प्राचीन आणि जागृत शक्तिपीठ आहे. झामोरिन राजांची कुलदेवता असलेल्या या मंदिरात देवी भद्रकाली (दुर्गा) रूपात विराजमान आहे. या मंदिरातील पूजा विधी इतर मंदिरांपेक्षा वेगळे आहेत. येथे पूजेसाठी ‘काश्मिरी पद्धतीचा’ वापर केला जातो आणि ‘साक्तेय’ विधींनुसार पूजा केली जाते. हे मंदिर पारंपारिक द्रविडीयन शैलीत असून त्याचे प्रवेशद्वार उत्तर दिशेला आहे. व यात चार भव्य गोपुरे आहेत. आणि मंदिराच्या गाभाऱ्यातील श्रीचक्र हे या मंदिराचे मुख्य आकर्षण आहे. मुख्य देवीसोबतच येथे भगवान शिव, अय्यप्पा, गणपती आणि सप्तमातृका यांचीही मंदिरे आहेत.

26)Deepanjali Lamp Museum-

दीपांजली लॅम्प म्युझियम हे केरळच्या कोझिकोड जिल्ह्यातील,पुथियांगडी येथील दिव्यांचे दुर्मिळ व अनोखे संग्रहालय आहे. माजी दीपगृह रक्षक आयसीआर प्रसाद यांच्या मालकीचे हे खाजगी संग्रहालय आहे. या संग्रहालयात 18 व्या शतकापासूनचे 1,000 पेक्षा जास्त विविध पुरातन व दुर्मिळ दिवे पाहायला मिळतात. त्यामध्ये पितळी दिवे, प्राचीन विक लॅम्प्स, गॅस लॅम्प्स, बैलगाडीचे दिवे आणि जगभरातील शेकडो दुर्मिळ दिवे पाहायला मिळतात. आणि प्रसाद सर स्वतः पर्यटकांना प्रत्येक दिव्याचा इतिहास आणि वैज्ञानिक कारणे समजावून सांगतात.

27)Anakkampoyil-

अनक्कमपोइल हे केरळच्या कोझिकोड जिल्ह्यातील, थिरुवाम्बडी शहराजवळील एक निसर्गरम्य, शांत डोंगरी गाव आहे. हे गाव वेल्लारीमाला पर्वतरांगांच्या पायथ्याशी वसलेले असून हे ठिकाण ‘ऑफबीट’ पर्यटनासाठी ओळखले जाते. येथे घनदाट जंगले, वाहते झरे आणि धबधबे आहेत. येथील मुख्य आकर्षण म्हणजे अरिपारा धबधबा आणि वावुल माला हे 2339 मीटर उंच असलेले कोझिकोड जिल्ह्यातील हे सर्वोच्च शिखर आहे. पश्चिम घाटाच्या कुशीत वसलेले हे गाव इरुवानजीपुझा नदीचे पात्र आणि अद्भुत निसर्ग सौंदर्याने बहरलेले आहे.

Visit the travel blog

1) कोझिकोड (कालिकत) जिल्हा कशासाठी प्रसिद्ध आहे?

कोझिकोड (कालिकत) जिल्हा हा केरळच्या मलबार किनाऱ्यावर वसलेले एक आकर्षक किनारी शहर आणि बॅकवॉटरपैकी एक म्हणून प्रसिद्ध आहे.


2) कोझिकोड जिल्ह्यातील पझानी मुरुगन मंदिर कशासाठी प्रसिद्ध आहे?

मेल पझानी मुरुगन मंदिर हे केरळमधील कोझिकोड येथील भगवान मुरुगन यांचे 500 वर्षा जुने, आध्यात्मिक आणि सांस्कृतिक महत्त्वासाठी प्रसिद्ध मंदिर आहे.


3)कल्लई नदी कोणत्या जिल्ह्यात आहे?

कल्लई नदी केरळच्या कोझिकोड जिल्ह्यातील लाकडाच्या व्यवसायांसाठी प्रसिद्ध नदी आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
Scroll to Top