मित्रांनो भारतभ्रमंतीमध्ये तुम्हाला भारत देशातील प्रत्येक राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यातील संपूर्ण पर्यटन स्थळांची माहिती मिळणार आहे. आता तुम्ही पाहणार आहात केरळ राज्यातील एर्नाकुलम जिल्ह्यातील संपूर्ण पर्यटन स्थळे. एर्नाकुलम जिल्हा हा केरळमधील सर्वाधिक आर्थिक व व्यावसायिकदृष्ट्या प्रगत जिल्हा आहे. त्यामुळे याला ‘केरळची व्यावसायिक राजधानी’ असेही म्हटले जाते. 1958 मध्ये या जिल्ह्याची निर्मित झाली व या जिल्ह्याचे मुख्यालय कक्कानाड येथे आहे. तसेच हा जिल्हा अरबी समुद्राच्या किनाऱ्यावर वसलेला असल्यामुळे याला ‘अरबी समुद्राची राणी’ असेही म्हटले जाते. Top 21 places to visit in Ernakulam District
हा जिल्हा केरळचा आर्थिक कणा असून येथे कोचीन बंदर, कोचीन शिपयार्ड, उच्च न्यायालय,आयटी पार्क आणि अनेक मोठे उद्योग आहेत. याशिवाय येथे पूर्णपणे सौर ऊर्जेवर चालणारे जगातील पहिले ‘कोची (कोचीन) आंतरराष्ट्रीय विमानतळ’ आहे. या जिल्ह्यात 7 तालुके असून येथे मुवट्टुपुझा नदी, थोडुपुझा नदी, कालियार नदी आणि कोथमंगलम नदीच्या संगमाने मुवट्टुपुझा नदी तयार झाली आहे. या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात ऐतिहासिक,नैसर्गिक व सांस्कृतिक पर्यटन स्थळे आहेत.
Top 21 places to visit in Ernakulam District
केरळ राज्यातील एर्नाकुलम जिल्ह्यातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
1)Ernakulam Shiva Temple-


एर्नाकुलम शिव मंदिर हे केरळ राज्यातील एर्नाकुलम शहराच्या मध्यभागी असलेले एक प्राचीन शिवमंदिर आहे.ज्याला ‘एर्नाकुलथप्पन’ मंदिर म्हणूनही ओळखले जाते. या मंदिरातील शिवलिंग हे ‘स्वयंभू’ आहे. व कोचीच्या महाराजांच्या सात शाही मंदिरांपैकी एक आहे. या मंदिराला राजघराण्याकडून आश्रय होता. येथील भगवान शिव पश्चिमेकडे, अरबी समुद्राच्या दिशेने मुख करून गौरी-शंकर रूपात विराजमान आहेत. तसेच आख्यायिकेनुसार महाभारत कालीन अर्जुनाने येथे तपश्चर्या केली होती आणि भगवान शिवाने शिकारी वेशात त्यांना दर्शन दिले आणि ‘पाशुपतास्त्र’ हे दिव्य बाण भेट म्हणून दिले. पारंपरिक केरळ वास्तुकलेच्या शैलीत बांधलेले हे मंदिर 1.2 एकर परिसरात पसरलेले असून 1846 मध्ये दिवाण श्री एडाक्कुन्नी शंकर वॉरियर यांच्या देखरेखीखाली बांधण्यात आले.
2)Mattancherry Palace-


मट्टानचेरी पॅलेस, हा केरळ राज्याच्या एर्नाकुलम जिल्ह्यातील कोची (मट्टानचेरी) येथील ‘डच पॅलेस’ म्हणून ओळखला जाणारा एक ऐतिहासिक राजवाडा, आणि संग्रहालय आहे. हा पॅलेस 1545 मध्ये पोर्तुगीजांनी बांधला होता. व कोचीचे राजा वीर केरळ वर्मा यांना भेट म्हणून दिला. नंतर 1663 मध्ये डच लोकांनी या राजवाड्याचे नूतनीकरण केले. हा राजवाडा पारंपरिक केरळच्या ‘नलुकेट्टू’ व युरोपियन वास्तुशैलीत बांधलेला आहे. या पॅलेसमधील संग्रहालयात कोचीनच्या राजांची पोर्ट्रेट गॅलरी, तैलचित्रे, पालख्या, शस्त्रे, पोशाख व जुनी नाणी, पझायनूर भागवती मंदिर (राजघराण्याची कुलदेवता), शिव आणि कृष्ण यांची मंदिरे आणि सुंदर भित्तिचित्रे आहेत.
3)Jew Synagogue-


ज्यू सिनेगॉग, हे केरळच्या एर्नाकुलम जिल्ह्यातील कोची मट्टनचेरी आणि एर्नाकुलम शहरातील ऐतिहासिक यहुदी प्रार्थनास्थळे आहेत. मलबारी किंवा कोचीन ज्यू, केरळमध्ये एक भरभराटीचा व्यापारी समुदाय होता आणि जागतिक मसाल्याच्या व्यापारात त्यांचा मोठा वाटा होता. येथे 1568 मध्ये बांधलेले प्रसिद्ध, सात सिनेगॉगपैकी सक्रिय वापरात असलेले एकमेव ‘परदेसी सिनेगॉग’ आहे. याशिवाय येथे कडवुंभगम आणि थेक्कुंभगम सिनेगॉग आहेत. ही स्थळे भारतीय, युरोपियन आणि ज्यू वास्तुकलेचा सुंदर संगम असून हेरिटेज वॉकसाठी लोकप्रिय आहेत.
4)Fort Kochi-



फोर्ट कोची, हे केरळच्या एर्नाकुलम जिल्ह्यातील ऐतिहासिक शहर, पोर्तुगीज, डच आणि ब्रिटीश वसाहती इमारती आणि सांस्कृतिकदृष्ट्या समृद्ध पर्यटन स्थळ आहे. या ठिकाणी चायनीज फिशिंग नेट, फोर्ट कोची बीच, सांताक्रूझ बेसिलिका, सेंट फ्रान्सिस चर्च, आणि डच पॅलेस (मट्टनचेरी), जुनी वसाहतकालीन घरे, आणि शांत किनारे आहेत. याशिवाय येथील ज्यू टाऊन आणि सिनेगॉग येथे जुन्या वस्तूंच्या खरेदीसाठी आणि ऐतिहासिक ज्यू सिनेगॉग पाहण्यासाठी सुंदर ठिकाण आहे. या ठिकाणी केरळी, चायनीज आणि युरोपियन संस्कृतीची झलक पाहायला मिळते.
5)St. Francis Church-

सेंट फ्रान्सिस चर्च हे केरळच्या एर्नाकुलम जिल्ह्यातील,फोर्ट कोची मधील भारतातील सर्वात जुने युरोपियन चर्च आहे. या चर्चने पोर्तुगीज, डच आणि ब्रिटीश या तीनही वसाहतवादी सत्तांचा काळ पाहिला आहे.व या चर्चचे बांधकाम 1503 मध्ये पोर्तुगीजांनी लाकडापासून बनवलेले होते. नंतर 1506 मध्ये ते दगड आणि विटांनी पुन्हा बांधण्यात आले. या चर्चची वास्तुकला युरोपियन आणि केरळच्या स्थानिक शैलीमध्ये असून चर्चच्या आत हाताने चालवले जाणारे जुने कापडी पंखे आजही पाहायला मिळतात. येथील मुख्य आकर्षण म्हणजे आजही या ठिकाणी प्रसिद्ध पोर्तुगीज खलाशी ‘वास्को द गामा’ यांची मूळ समाधी या चर्चमध्ये जतन केली आहे.
Visit our website: allindiajourney.com
6)Mangalavanam Bird Sanctuary-


मंगळवनम पक्षी अभयारण्य हे केरळच्या एर्नाकुलम जिल्ह्यातील कोची शहराच्या मध्यभागी असलेले पर्यावरणपूरक क्षेत्र आहे. हे अभयारण्य केरळ उच्च न्यायालयाच्या इमारतीच्या मागे, सुमारे 2.74 हेक्टर क्षेत्रावर विस्तारलेले असून येथे कोचीच्या बॅकवॉटरशी कालव्याद्वारे जोडलेले एक उथळ भरती-ओहोटीचे तलाव देखील आहे. हे ठिकाण विविध प्रकारचे स्थानिक व स्थलांतरित पक्षी,वटवाघळे आणि फुलपाखरांचे आश्रयस्थान आहे आणि संरक्षित खारफुटीचे जंगल आहे. त्यामुळे मंगळवनम हे ‘कोचीचे हिरवे फुफ्फुस’ म्हणूनही ओळखले जाते.
7)Hill Palace Museum-


हिल पॅलेस संग्रहालय हे केरळमधील एर्नाकुलम जिल्ह्यातील त्रिपुनिथुरा येथील सर्वात मोठे पुरातत्व संग्रहालय आहे. हा राजवाडा कोचीच्या महाराजाने 1865 मध्ये बांधला होता. सध्या हे एक लोकसंस्कृती व पुरातत्त्व वारसा संग्रहालय असून, पूर्वी कोचीन महाराजांचे प्रशासकीय केंद्र व अधिकृत निवासस्थान होते. या राजवाडा संकुलामध्ये पारंपरिक केरळी वास्तुशैलीत बांधलेल्या एकूण 49 इमारती असून, त्या 52 एकरांच्या विस्तीर्ण परिसरात पसरलेल्या आहेत. येथे पुरातत्त्व संग्रहालय, कोचीच्या महाराजांचा सोन्याचा मुकुट, मोहेंजोदडो आणि हडप्पा वस्तूंचे नमुने, दुर्मिळ औषधी वनस्पतींची बाग,, हरण उद्यान, प्रागैतिहासिक उद्यान तसेच बालउद्यान अशी विविध आकर्षने आहेत.
8)Vallarpadam Church –


वल्लारपदम चर्च किंवा बॅसिलिका ऑफ अवर लेडी ऑफ रॅन्सम हे केरळमधील एर्नाकुलम जिल्ह्यातील एक प्राचीन चर्च आणि प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आहे. हा चर्च कोची शहरातील ‘वल्लारपदम’ या सुंदर बेटावर वेम्बनाड सरोवराच्या मध्यभागी वसलेले आहे. व वल्लारपदमच्या पवित्र मेरीला आणि ‘वल्लारपदथ अम्मा’ साठी प्रसिद्ध आहे. हा चर्च भारतातील सर्वात जुन्या युरोपियन चर्चपैकी एक असून पोर्तुगीज मिशनऱ्यांनी 1524 मध्ये बांधला होता. येथील मेरीची प्रतिमा चमत्कारिक मानली जाते, जिने अनेकदा भक्तांचे प्राण वाचवले आहेत, अशी भक्तांची श्रद्धा आहे. दरवर्षी सप्टेंबरमध्ये येथे ‘वल्लारपदथम्मा’ उत्सव साजरा केला जातो त्यावेळी लाखो भाविक येथे येतात.
9)Willingdon Island-


विलिंग्डन बेट हे केरळच्या एर्नाकुलम जिल्ह्यातील कोची शहरात, भारतातील सर्वात मोठे मानवनिर्मित (कृत्रिम) बेट आहे. 1936 मध्ये वेंबनाड तलावातील माती उपसून हे बेट तयार केले. जे कोची बंदराचा मुख्य भाग व व्यापारासाठी व्यावसायिक आणि औद्योगिक महत्त्वपूर्ण केंद्र आहे. या बेटाचे नाव भारताचे माजी व्हाईसरॉय ‘लॉर्ड विलिंग्डन’ यांच्या नावावरून ठेवण्यात आले आहे. आणि ब्रिटीश अभियंता सर रॉबर्ट ब्रिस्टो यांनी या बेटाची रचना केली आहे. या ठिकाणी कोची बंदर, नौदल तळ आणि सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ फिशरीज टेक्नॉलॉजी आहे. निसर्गरम्य बॅकवॉटर्सने वेढलेले हे बेट पर्यटनासाठी एक लोकप्रिय ठिकाण आहे.
10)Chottanikkara Bhagavathy Temple-



चोट्टानिक्कारा भगवती मंदिर हे केरळच्या एर्नाकुलम जिल्ह्यात कोची शहराच्या दक्षिणेस वसलेले एक प्रसिद्ध आणि जागृत महालक्ष्मी मंदिर आहे. हे मंदिर 10 व्या शतकातील असून, येथे देवीची पूजा सकाळी सरस्वती, दुपारी लक्ष्मी आणि संध्याकाळी दुर्गा अशा तीन रूपात केली जाते. भगवती देवीच्या या मंदिरात मानसिक आणि आध्यात्मिक समस्यांवर उपचार करण्याची शक्ती आहे, अशी भाविकांची गाढ श्रद्धा आहे. येथील मंदिर परिसरात भगवान विष्णू, ब्रह्मा, शिव, गणपती आणि सुब्रमण्यम यांची उप-मंदिरे आहेत. आणि या मंदिरात भगवती माता ही महालक्ष्मीच्या रूपात, श्री नारायणासोबत विराजमान आहे.
11)Bhoothathankettu Dam-



भूतथानकेट्टू धरण हे केरळच्या एर्नाकुलम जिल्ह्यातील ‘पेरियार’ नदीवरील एक निसर्गरम्य धरण आणि राखीव वनक्षेत्र आहे. हा धरण परिसर अत्यंत निसर्ग समृद्ध व एका बाजूने घनदाट जंगलांनी वेढलेला आहे तर दुसऱ्या बाजूला नारळ आणि रबराची झाडे आहेत. येथील घनदाट जंगलात हत्ती व विविध प्रकारचे वन्यजीव आणि पक्षी पाहायला मिळतात. तसेच या धरणाच्या जवळच प्रसिद्ध थट्टेकाड पक्षी अभयारण्यही आहे. भूतथानकेट्टू नावाचा अर्थ ‘भूत धरण’ असा होतो.आख्यायिकेनुसार, हे धरण एका रात्रीत भुतांनी किंवा राक्षसांनी बांधले होते.
पर्यटकांना येथे पेरियार नदीच्या पात्रात निसर्गाचा आनंद घेण्यासाठी बोटिंगची सोय आहे.
12)Paniyeli Poru-



पानियेली पोरु हे केरळच्या एर्नाकुलम जिल्ह्यातील, एक अत्यंत सुंदर,शांत आणि निसर्गरम्य पर्यटन स्थळ आहे. या ठिकाणी पेरियार नदीच्या प्रवाहातील खडकाळ रचनेमुळे एक विलोभनीय दृश्य निर्माण झाले आहे. येथील परिसर घनदाट जंगल, लहान धबधबे, प्रवाहांचे विलोभनीय दृश्य आणि पेरियार नदीच्या खडकाळ पात्रसाठी प्रसिद्ध आहे. मल्याळम भाषेत ‘पोरु’ म्हणजे ‘लढा’. या ठिकाणी पेरियार नदीचा प्रवाह खडकांशी ‘लढतो’ असे भासते, म्हणून याला ‘पानियेली पोरु’ असे म्हटले आहे.
13)Kadamakkudy-




कदमक्कुडी हे केरळच्या एर्नाकुलम जिल्ह्यातील,कोची शहरापासून अवघ्या 15 किलोमीटर अंतरावर 14 लहान बेटांचा एक सुंदर समूह आहे. चित्तथरारक सौंदर्याने भरलेली ही अद्भुत बेटे शांत व नयनरम्य बॅकवॉटर, विस्तीर्ण भातशेती, नारळाच्या बागा मासेमारी, चायनीज फिशिंग नेट्स आणि सूर्यास्ताच्या सुंदर दृश्यांसाठी ओळखली जातात. पर्यटक व निसर्गप्रेमींसाठी शहराच्या गजबजाटापासून दूर असलेले हे एक लोकप्रिय ठिकाण आहे.
14)Kumbalangi Village-



कुंभलंगी गाव हे केरळच्या एर्नाकुलम जिल्ह्यातील, भारत देशातील पहिले मॉडेल पर्यटन गाव आहे. आणि ‘इंटिग्रेटेड टुरिझम व्हिलेज’ व ‘इको-फ्रेंडली’ पर्यटन गाव आहे. या ठिकाणी पर्यटकांना अस्सल ग्रामीण केरळी प्राचीन संस्कृतीचा आणि गावच्या साध्या व समृद्ध जीवनाचे दर्शन घडते. बॅकवॉटर आणि दाट कांदळवनांनी वेढलेल्या या गावात खेकडे आणि कोळंबीसाठी उत्तम प्रजनन स्थळ, नारळ प्रक्रिया,भात आणि मासे यांची एकत्रित शेती व चिनी मासेमारी जाळी पाहायला मिळतात. तसेच येथील पाण्यात ‘बायोल्युमिनेसेन्स’ या नैसर्गिक घटनेमुळे समुद्रातील पाणी चमकते. ज्याला स्थानिक भाषेत ‘कवरू’ म्हणतात.
15)St. George Forane Church-

सेंट जॉर्ज सिरो-मालाबार फोरेन चर्च हे केरळच्या एर्नाकुलम जिल्ह्यातील, एडापल्ली येथील भारतातील सर्वात जुन्या रोमन कॅथलिक चर्चपैकी एक आहे. आणि एडप्पल्ली पॅली या नावाने प्रसिद्ध आहे. या चर्चची स्थापना 593 मध्ये झाली असून ते अनेक चमत्कारांसाठी ओळखले जाते. येथील संतांमध्ये सर्पदंश आणि आजार बरे करण्याची शक्ती आहे असे सांगितले जाते. येथील विशेष आकर्षण म्हणजे या चर्चमधील सागवानी लाकडापासून बनवलेली व सोन्याचा मुलामा दिलेली ‘वेदी’ (Altar) ही इटली वरून आणली आहे. दरवर्षी मे महिन्यात येथे ‘एडापल्ली पेरुन्नाल’ हा मोठा उत्सव 9 दिवस साजरा केला जातो.
16)Iringole Bhagavathy/ Kavu Temple –


इरिंगोल कावू भगवती मंदिर हे केरळच्या एर्नाकुलम जिल्ह्यातील, कुन्नाथुनद तालुक्यात पेरुम्बावूरजवळील रायमंगलम गावातील एक प्राचीन आणि पवित्र वनमंदिर आहे. 50 एकर हिरव्यागार घनदाट जंगलात वसलेले हे दुर्गा मातेचे मंदिर 2700 वर्षांपेक्षा जुने असून भगवान परशुरामाने पवित्र केलेले, केरळमधील 108 दुर्गा मंदिरांपैकी एक आहे. या मंदिरात देवी दुर्गा ही सकाळी सरस्वती , दुपारी वनदुर्गा, आणि संध्याकाळी भद्रकाली रूपात विराजमान आहे. आख्यायिकेनुसार कंसाने मारण्याचा प्रयत्न केलेली देवकीची आठवी अपत्य आकाशात उडून गेली आणि ‘इरिन्नोल’ (चमकणारी) म्हणून ओळखली जाऊ लागली, ज्यावरून या ठिकाणाचे नाव ‘इरिंगोल’ पडले.
17)Bolgatty Palace-


बोलगट्टी पॅलेस हा केरळच्या एर्नाकुलम जिल्ह्यातील, बोलगट्टी बेटावरील एक ऐतिहासिक आणि वास्तुशिल्पीय वारसा व डच वास्तुकलेचा एक उत्कृष्ट नमुना आहे. हा राजवाडा 1744 मध्ये डच व्यापाऱ्यांनी बांधला होता. या पॅलेसमध्ये स्विमिंग पूल, 9-होल गोल्फ कोर्स, आयुर्वेदिक केंद्र, भव्य बगीचे आणि वेंबनाड तलावाचा नयनरम्य परिसर आहे. तसेच येथे दररोज कथकली आणि इतर पारंपारिक केरळ सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले जातात. सध्या हा पॅलेस केटीडीसी द्वारे संचालित असून, तो एका प्रीमियम रिसॉर्टमध्ये रूपांतरित झाला आहे.
18)Kerala Folklore Museum-


केरळ लोककला संग्रहालय हे केरळच्या एर्नाकुलम जिल्ह्यातील, कोची (थेवरा) येथील एक अद्वितीय वास्तू आणि दक्षिण भारतीय संस्कृती, कला व वारशाचे जतन करणारे संग्रहालय आहे. याची स्थापना 2009 मध्ये जॉर्ज जे. थालियाथ आणि ॲनी जॉर्ज यांनी केली. हे वेगवेगळ्या वास्तुकला शैलीत बांधलेले तीन मजली वास्तू संग्रहालय असून ते लाकूड, जांभ्या दगडाने बनलेले आहे. येथे 6000 पेक्षा जास्त प्राचीन वस्तू, लोककला प्रकार, आणि संस्कृतीचे प्रदर्शन आहे.यामध्ये पाषाणयुगीन वस्तू, शिल्पे, मुकुट, दागिने, शस्त्रे, शिलालेख, जुनी वाद्ये, नाणी, आणि मुखवटे (विशेषतः थेय्याम) यांचा समावेश आहे.
19)Kalady-


कलाडी हे केरळच्या एर्नाकुलम जिल्ह्यातील,पेरियार नदीच्या काठावर वसलेले एक पवित्र तीर्थक्षेत्र आहे. हे ठिकाण 9 व्या शतकातील महान तत्त्वज्ञानी आदि शंकराचार्यांचे जन्मस्थान आहे. या ठिकाणी आदि शंकर कीर्ती स्तंभ नावाचा,शंकराचार्यांच्या जीवनावर आधारित 9 मजली टॉवर आहे जो कांची कामकोटी पीठाने बांधला आहे. येथे शृंगेरी मठाद्वारे संचलित आदि शंकराचार्य जन्मभूमी क्षेत्र हे मुख्य मंदिर असून शंकराचार्य आणि शारदा देवी यांची मंदिरे आहेत. याशिवाय येथे रामकृष्ण अद्वैत आश्रम, मगरींचा घाट आणि श्री शंकराचार्य संस्कृत विद्यापीठ आहे.
20)Areekkal Waterfalls-

अरेक्कल धबधबा हा केरळच्या एर्नाकुलम जिल्ह्यातील,पिरावोम जवळ, एक नयनरम्य पर्यटन स्थळ आहे. या धबधब्याचा परिसर रबर बागा आणि घनदाट जंगलाने वेढलेला असून हा धबधबा, मन्नतूर हिल्समधून उगम पावतो आणि सुमारे 100 फूट उंचीवरून तीन स्तरांमध्ये खाली कोसळतो. आश्चर्य म्हणजे हा धबधबा बारमाही वाहतो आणि येथील वातावरण अत्यंत शांत आणि आल्हाददायक आहे. निसर्गप्रेमी आणि साहसी लोकांसाठी हे एक लोकप्रिय ठिकाण आहे. तसेच या धबधब्याच्या जवळच कोचरीक्कल लेणी आहेत.
21)Cherai Beach-


चेराई बीच हा केरळच्या एर्नाकुलम जिल्ह्यातील, कोची शहराच्या वायपिन बेटावरील एक लोकप्रिय, निसर्गरम्य आणि स्वच्छ समुद्रकिनारा आहे. हा बीच 15 किमी लांब आहे.आणि येथील किनारा सुवर्ण वाळू, नारळाच्या बागा, बॅकवॉटर आणि अरबी समुद्राच्या संगमासाठी प्रसिद्ध आहे. येथील समुद्राच्या लाटा शांत आणि उथळ असल्याने पोहण्यासाठी अत्यंत सुरक्षित मानला जातो.पर्यटकांना येथे वॉटर स्पोर्ट्स, सर्फिंग आणि सनबाथिंगचा आनंद घेता येतो आणि मधून मधून डॉल्फिन माशाचे दर्शन ही घडते.
1)केरळमधील पहिले पर्यटन गाव कोणते आहे?
केरळमधील ‘कुंभलंगी’ हे भारतातील पहिले इको-टुरिझम गाव आहे.
2)कोची येथील सेंट जॉर्ज चर्चचा इतिहास काय आहे?
कोची येथील सेंट जॉर्ज चर्चची स्थापना 593 मध्ये झाली व पहिल्या शतकात थॉमस द अपोस्टलने स्थापन केलेल्या सात चर्चनंतर, हे केरळमधील सर्वात जुन्या चर्चपैकी एक व मार्थ मरियम (व्हर्जिन मेरी) ला समर्पित होते.
3) केरळच्या कोची शहरातील मानवनिर्मित विलिंग्डन बेटाची रचना कोणी केली आहे?
केरळच्या कोची शहरातील मानवनिर्मित विलिंग्डन बेटाची रचना ब्रिटीश अभियंता सर रॉबर्ट ब्रिस्टो यांनी केली आहे.


