मंडळी भारत भ्रमंतीमध्ये आज आपण पाहणार आहोत सोलापूर जिल्ह्यातील संपूर्ण पर्यटन स्थळे सोलापूर जिल्हा हा महाराष्ट्र राज्याच्या दक्षिण भागातील एक ऐतिहासिक व सांस्कृतिक दृष्ट्या महत्त्वाचा जिल्हा आहे. या जिल्ह्यात महाराष्ट्राचे कुलदैवत व दक्षिण काशी म्हणून ओळखले जाणारे पंढरपूर, अक्कलकोट सारखी प्रसिद्ध देवस्थान आहेत. हा जिल्हा 16 गावाने बनलेला आहे म्हणून या जिल्ह्याचे सोलापूर हे नाव पडले आहे. सोलापूर जिल्ह्याला सातारा, सांगली, धाराशिव, पुणे व कर्नाटक राज्याच्या सीमा लाभलेल्या आहेत. या जिल्ह्यात अकरा तालुके असून या जिल्ह्यातल्या टॉवेल व चादरी विशेष लोकप्रिय आहेत. Top 15 places visit to in Solapur District
या जिल्ह्यात भीमा नदी ही प्रमुख नदी असून बोरी, सीना,मान या नद्या वाहतात. शेती उत्पादनामध्ये हा जिल्हा अग्रेसर असून या जिल्ह्यामध्ये ज्वारी,बाजरी,कापूस,ऊस, भुईमुग ही पिके घेतली जातात. या जिल्ह्यात हुतात्म्याचे स्मारक आहे. व माळढोक पक्ष्यांचे अभयारण्य आहे. तसेच सोलापूरचे प्रसिद्ध डॉक्टर द्वारकानाथ कोटणीस यांचा जन्म सोलापूरचा असून त्यांचे सोलापूर मध्ये स्मारक आहे. जपान चीन युद्धामध्ये घायाळ झालेल्या लोकांसाठी डॉक्टर कोटणीस यांनी चीनमध्ये जाऊन चार वर्षे रुग्ण सेवा केली होती.
तसेच लोकशाहीर राम जोशी हे सोलापूर जिल्ह्यातीलच आहेत. व प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक नागराज मंजुळे हे सोलापूर जिल्ह्यातील करमाळा गावचे आहेत. सोलापूर शहर वेगवेगळ्या संस्कृती आणि भाषेचा संगम असल्यामुळे या जिल्ह्यात मराठी, तेलुगू आणि कन्नड भाषा बोलल्या जातात. सोलापूर जिल्ह्यात अनेक धार्मिक, ऐतिहासिक आणि सांस्कृतिक पर्यटन स्थळे आहेत.
Top 15 places visit to in Solapur District
सोलापूर जिल्ह्यातील संपूर्ण पर्यटन स्थळे -part-1
1) श्री क्षेत्र पंढरपूर-

Shree Kshetra Pandharpur हे सोलापूर जिल्ह्यातील संपूर्ण महाराष्ट्राचे आराध्य व कुलदैवत भीमा/ चंद्रभागा नदीच्या काठावर असलेले पवित्र तीर्थक्षेत्र आहे. या ठिकाणी श्री विठ्ठल व रुक्मिणी यांचे मंदिर आहे. पंढरपूर या ठिकाणी बारमाही देशाच्या कानाकोपऱ्यातून असंख्य भक्त विठुरायाच्या दर्शनासाठी येत असतात.व आषाढी आणि कार्तिकी एकादशीला या ठिकाणी मोठी यात्रा भरते त्यावेळी भारताच्या सर्व कानाकोपऱ्यातून तसेच विदेशातूनही या ठिकाणी भक्त मोठ्या प्रमाणावर वारीमध्ये आणि दिंडीमध्ये सहभागी होतात. पंढरपूर हे दक्षिण काशी या नावाने ही ओळखले जाते. तसेच आषाढी कार्तिकी वारीमध्ये राज्यातील विविध ठिकाणाहून संतांच्या पालख्या या ठिकाणी येतात.
या मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वाराला नामदेव पायरी म्हणून ओळखले जाते.याशिवाय पंढरपूर मध्ये अनेक धार्मिक मंदिरे आहेत त्यामध्ये गणेश मंदिर,दत्त मंदिर,गरुड मंदिर,मारुती मंदिर,कान्होपात्रा मंदिर, गोपाळपूर, विष्णुपाद,पुंडलिक मंदिर,नामदेव मंदिर,ज्ञानेश्वर मंदिर,तुकाराम मंदिर,संत कैकाडी महाराज मठ,संत तनपुरे महाराज मठ याशिवाय अनेक धार्मिक मंदिरे आहेत. सोलापूर शहरापासून हे ठिकाण 72 किलोमीटर अंतरावर आहे.
2) अक्कलकोट श्री स्वामी समर्थ-

Akkalkot Shree Swami Samarth हे सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट तालुक्यात असलेले व श्री स्वामी समर्थ यांच्या वास्तव्याने पावन झालेले पवित्र तीर्थक्षेत्र आहे.श्री स्वामी समर्थ महाराज हे भगवान दत्तात्रयांचे अवतार असून अक्कलकोट या ठिकाणी त्यांचे भव्य मंदिर आहे. या मंदिराला वटवृक्ष स्वामी मंदिर म्हणूनही ओळखले जाते. स्वामी समर्थांनी अक्कलकोट मध्ये 22 वर्ष वास्तव केले होते त्यामुळे अक्कलकोट हे भक्तांचे अपार श्रद्धा असलेले हे ठिकाण आहे. स्वामी समर्थांनी 1878 मध्ये या ठिकाणी समाधी घेतली.
अक्कलकोट हे कर्नाटक सीमेला लागून असून देशभरातून असंख्य भाविक या ठिकाणी दर्शनाला येतात.त्याचबरोबर भक्तांसाठी या ठिकाणी अन्नछत्र चालवले जाते.स्वामी समर्थांचे जीवनदर्शन घडवणारे एक छोटेसे संग्रहालय या ठिकाणी पाहायला मिळते. त्याचबरोबर अक्कलकोटमध्ये खंडोबा मंदिर, गणपती मंदिर, महादेव मंदिर राजेराजे मठ, शिवपुरी ही धार्मिक स्थळे आहेत. सोलापूर शहरापासून हे ठिकाण 38 किलोमीटर अंतरावर आहे.
3) श्री सिद्धेश्वर मंदिर-

Shree Siddheshwar Temple हे सोलापूर जिल्ह्यातील सोलापूर शहराच्या मध्यावर असलेले सोलापूरचे ग्रामदैवत व धार्मिक आणि सांस्कृतिक स्थळ आहे.लिंगायत धर्माचे महान व्यक्तिमत्व असलेले थोर संत श्री सिद्धरामेश्वर महाराज यांनी या मंदिराची स्थापना केली. या मंदिराच्या तिन्ही बाजूला तलाव असल्यामुळे हे मंदिर बेटासारखे भासते. तसेच या मंदिरात 68 शिवलिंगे असून त्यापैकी एक शिवलिंग ‘अमृत लिंग’ म्हणून ओळखले जाते. दरवर्षी मकर संक्रांतीला या ठिकाणी पंधरा दिवस चालणारी मोठी यात्रा भरते, ज्याला ‘गड्डा यात्रा’ असे म्हटले जाते. या यात्रेमध्ये नंदीध्वजांची पूजा, होम, अक्षता सोहळा असे विविध प्रकारचे धार्मिक विधी केले जातात. या यात्रेला भाविक मोठ्या प्रमाणात दर्शनासाठी येतात. तसेच येथील मंदिर आवारात गणेश, विठोबा आणि रुक्मिणी देवींची मंदिरे आहेत. याशिवाय मुख्य मंदिरात सिद्धेश्वरांची मूर्ती असून चांदीचा मुलामा दिलेली नंदीची मूर्ती आहे.
4) श्री भगवंताचे मंदिर-

Shree Bhagvant Temple हे सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील अत्यंत प्राचीन व पवित्र तीर्थस्थळ आहे.भगवंत भक्त, श्री अंबरीष राजाच्या रक्षणासाठी साक्षात् श्री विष्णुंनी लक्ष्मीसह ‘भगवंत’ या नावाने येथे अवतार धारण केला आहे.भगवंत व अंबरीष यांचे महात्म्य श्री नारायण गंगाधर कथले यांनी फार पूर्वी त्यांच्या पुस्तकात लिहून ठेवले आहे.पूर्ण भारतामध्ये श्री विष्णुचे हे एकमेव विशाल प्रसिध्द मंदीर भगवंत नावाने बार्शी मध्ये आहे.श्रीक्षेत्र पंढरपूर येथे एकादशी करुन बार्शीला द्वादशी दिवशी श्री भगवंत दर्शन पूजनानंतर उपवास सोडायचा अशी वारकऱ्यांची वर्षानुर्षाची प्रथा आहे.
श्री विठ्ठलाचे दर्शन घेताना वारकरी ‘पुंडलिक वरदा हरि विठ्ठल’ असा जयघोष करतात.तर बार्शीच्या भगवंत नगरीत भक्त ”अंबरीष वरद श्री भगवान” असा जयघोष करतात. हे मंदिर हेमाडपंथी शैलीत बांधलेले असून मंदिराच्या शिखरावर भगवंताने अंबरीषासाठी घेतलेल्या दशावताराची शिल्पे कोरण्यात आली आहेत. भक्तगण या ठिकाणाला मोठ्या प्रमाणात भेट देतात.
Visit our website: allindiajourney.com
5) सोलापूर भुईकोट किल्ला-

Bhuikot Fort हा सोलापूर जिल्ह्यातील महत्वाचे ऐतिहासिक पर्यटन स्थळ आहे. हा किल्ला बाराव्या शतकात बांधला असून किल्ल्याच्या शेजारी सिद्धेश्वर तलाव आहे. आणि या तलावाच्या मध्यभागी सिद्धेश्वराचे मंदिर आहे.दुसरे बाजीराव पेशवे, व सातारचे छत्रपती प्रतापसिंह भोसले हे 1818 मध्ये एक महिना या किल्ल्यावर राहिल्याचे सांगितले जाते. हा किल्ला “सोलापूरचा भुईकोट किल्ला” म्हणूनही ओळखला जातो.
या किल्ल्यावर शहर दरवाजा, हत्ती दरवाजा, खाती दरवाजा,नागबावडी विहीर, तोफा तसेच किल्ल्यामध्ये उध्वस्त झालेले मंदिर आणि इमारतीचे अवशेष पहायला मिळतात. या किल्ल्याचे बांधकाम मजबूत असून हा किल्ला अनेक ऐतिहासिक पराक्रम केलेल्या गोष्टींचा साक्षीदार आहे.सोलापूर शहरापासून दोन किलोमीटर अंतरावर आहे.
6) स्मृती वन-

Smritivan हे सोलापूर जिल्ह्यातील हुतात्मा बागेजवळ व सिद्धेश्वर तलावाच्या परिसरात असलेले एक शांत व निसर्गरम्य पर्यटन स्थळ आहे.स्मृती वन उद्यानामध्ये अनेक प्रकारचे झाडे आहेत. तसेच विविध प्रकारच्या पक्षांचा किलबिलाट पाहायला मिळतो. तसेच या ठिकाणी लहान मुलांसाठी वेगवेगळे प्रकारचे खेळणे स्लाइड्स आणि निसर्ग आणि शांततेचा अनुभव घेणाऱ्यांसाठी सुविधा देण्यात आले आहेत.स्मृती वनाच्या जवळच सिद्धेश्वर तलाव, हुतात्मा बाग आणि इतर पर्यटन स्थळे त्यामुळे या परिसरात नेहमी पर्यटकांची वर्दळ असते.
7) सिद्धेश्वर वनविहार-

Siddheshwar Vanvihar हे सोलापूर जिल्ह्यातील विजापूर रोडवर असलेले एक महत्त्वाचे पर्यटन स्थळ आहे. या वनविहारात विविध प्रकारचे वृक्ष, वेली आणि पक्षी पाहायला मिळतात. तसेच वनविहाराला भेट देऊन निसर्गाचा आनंद घेता येतो. या वनविहारात पक्षी निरीक्षण मनोरा बसविण्यात आला असून या ठिकाणी मोर, तित्तिर, होला याशिवाय अनेक पक्षांचे निरीक्षण करता येते.हे वनविहार म्हणजे सोलापूर शहरासाठी एक महत्त्वाचे ऑक्सीजन केंद्रच आहे. येथील निसर्गरम्य, शांत,सुंदर वातावरण पर्यटकांसाठी व पक्षी आणि वनस्पती अभ्यासकांसाठी एक उत्तम ठिकाण आहे. या वनविहाराच्या जवळ सिद्धेश्वर मंदिर, भुईकोट किल्ला ही ठिकाणी आहेत.
8) डॉ. द्वारकानाथ कोटणीस स्मारक-

Dr.Dwarkanath Kotnis Smarak हे सोलापूर जिल्ह्यातील त्यांच्या जन्मस्थळाजवळ असलेले एक आंतरराष्ट्रीय स्मारक आहे.डॉ. द्वारकानाथ कोटणीस यांचा जन्म सोलापूर शहरातील लक्ष्मी-विष्णू गिरणीच्या कर्मचारी निवासात 10 ऑक्टोबर 1910 रोजी झाला होता.डॉ. कोटणीस यांनी 1938 च्या चीन-जपान युद्धात चीनला वैद्यकीय मदत पुरवण्यात महत्त्वाची कामगिरी केली होती.त्यांच्या कार्यामुळे चीनमध्ये त्यांचा खूप आदर करतात व त्यांना देवदूत मानतात.त्यांच्या कार्यामुळे त्यांना चीन-भारत मैत्रीचे प्रतीक असे संबोधले जाते.
सध्या हे आंतरराष्ट्रीय स्मारक सोलापूर महानगरपालिकेने सुशोभित करून विकसित केले आहे.या स्मारकात एक छोटे प्रेक्षागृह आणि चीनी भाषा केंद्र असून विद्यार्थी या ठिकाणी चीनी भाषेचा अभ्यास करतात.
9) संत दामाजी पंत-

Sant Damaji Pant हे सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा शहरातील पंधराव्या शतकातील एक आध्यात्मिक व थोर संत होते. त्यांचा जन्म शेतकरी कुटुंबात झाला होता परंतु ते अत्यंत हुशार असल्यामुळे त्यांना वेगवेगळी पदे मिळाली.बिदरच्या बहामनी राजाच्या दरबारी ते मंगळवेढ्याचे महसूल अधिकारी होते. 1300 ते 1382 हा त्यांच्या अस्तित्वाचा कालखंड समजला जातो.तसेच ते वारकरी पंथाचे विठोबा देवाचे निस्सीम भक्त होते. 1376 साली पडलेल्या भीषण दुष्काळामध्ये दामाजीपंतांनी त्यांच्याकडे असलेली धान्याचे कोठारे लोकांसाठी खुली केली होती.
त्यांच्या या उदार कार्याबद्दल 1376 च्या दुष्काळाला दख्खन प्रदेशात “दामाजी पंतांचा दुष्काळ” असे म्हटले जाते. मंगळवेढा या ठिकाणी एक एकर 19 गुंठे मध्ये त्यांचे समाधी मंदिर आहे व ‘संत दामाजी संस्था’ आहे. या ठिकाणी दररोज दोनशे ते अडीचशे लोकांना जेवण दिले जाते. तसेच चैत्र आषाढी कार्तिकी आणि माघ वारीला येणाऱ्या लोकांसाठी दोन मजली इमारत बांधण्यात आली आहे.
सोलापूर पासून हे ठिकाण पंचावन्न किलोमीटर अंतरावर आहे.
10) उजनी धरण –

Ujani Dam किंवा भीमा सिंचन प्रकल्प हे सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील उजनी गावाजवळ भीमा नदीवर बांधलेले एक महत्वाचे व चिनाकृती गुरुत्व धरण आहे. विशेष म्हणजे या धरणात पाऊस पडला नाही तरी हे धरण 100% भरते कारण पुणे जिल्ह्याच्या पश्चिमेकडे पडणाऱ्या पावसाने हे धरण भरते.या धरणाची एकूण पाणी साठवण क्षमता 117 टीएमसी एवढी असून या धरणाला ‘यशवंत सागर’ म्हणूनही ओळखले जाते. 1980 मध्ये बांधलेले हे धरण एक भूवैज्ञानिक आश्चर्य असून या धरणाचा उपयोग सिंचन, पिण्यासाठी पाणी, मत्स्यपालन आणि जलविद्युत निर्मितीसाठी केला जातो.उजनी धरण म्हणजे सोलापूर, पुणे आणि अहमदनगर जिल्ह्यांसाठी एक महत्त्वाचे जलस्त्रोत आहे. धरण परिसर निसर्गरम्य असल्यामुळे पर्यटकांचे ते आकर्षणाचे ठिकाण आहे.
11) धर्मवीर संभाजी तलाव-

Dharmavir Sambhaji Lake हे सोलापूर जिल्ह्यातील सोलापूर शहरात मोतीबाग जवळ असलेले एक ऐतिहासिक तलाव आहे. पूर्वी धोबी लोक या ठिकाणी कपडे धुत असत म्हणून या तलावाला धोबी तलाव आणि कंबर तलाव म्हणूनही ओळखले जाते. हा तलाव ब्रिटिश काळात बांधलेला आहे. परंतु सध्या तलावामध्ये जलपर्णी वाढल्यामुळे प्रदूषण निर्माण झाले आहे. सोलापूरकरांसाठी हे एक महत्त्वाचे ठिकाण असून नागरिक या ठिकाणी फिरण्यासाठी येतात.
12) हिप्परगा तलावा-

Hipparga Lake हे सोलापूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे तलाव आहे. या तलावातून संपूर्ण सोलापूर शहराला पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जातो. ब्रिटिश काळात 1871 मध्ये हा तलाव बांधण्यात आला. हिवाळ्यात या ठिकाणी अनेक स्थलांतरित पक्षी येतात.हा तलाव निसर्गरम्य परिसरात असल्यामुळे पर्यटकांची या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी असते. सोलापूर शहरापासून थोड्या अंतरावर हा तलाव आहे.
13) श्री कमला भवानी देवी मंदिर-

Shree Kamla Bhavani Devi Temple हे सोलापूर जिल्ह्यातील करमाळा शहरात हेमाडपंती शैलीत बांधलेले धार्मिक तीर्थस्थळ आहे. हे मंदिर श्री राव राजे निंबाळकर यांनी 1727 मध्ये बांधले असून या मंदिरात 96 या संख्येला विशेष महत्त्व आहे. कारण या मंदिरा समोरच्या विहिरीला 96 पायऱ्या आहेत. मंदिरात 96 ओवऱ्या आहेत. मंदिरात एकूण 96 खांब आहेत. तर मंदिरातील छतावर 96 चित्र रेखाटले आहेत.करमाळ्याच्या या कमला देवी मंदिराला तुळजापूरच्या तुळजा भवानीचे दुसरे पीठ मानले जाते. दरवर्षी कार्तिक पौर्णिमेला या ठिकाणी यात्रा भरते. सोलापूर पासून हे ठिकाण 135 किलोमीटर अंतरावर आहे.
14) हरिहरेश्वर मंदिर-

Harihareshwar Temple हे सोलापूर जिल्ह्यातील भीमा व सीना नदीच्या संगमावर हत्तरसंग-कुडाळ या निसर्गरम्य ठिकाणी असलेले प्राचीन, ऐतिहासिक व पवित्र तीर्थक्षेत्र आहे. हे चालुक्यकालीन मंदिर बाराव्या शतकात बांधलेले असून मंदिरामध्ये शिव आणि विष्णू यांचे मिश्रण असलेले मंदिर आहे. या मंदिरात “बहुमुखी शिवलिंगम” असून विष्णू आणि शिव यांच्या एकत्रित स्वरूपातील हरिहर देवता आहे.या वैशिष्ट्यपूर्ण लिंगाची उंची 1.99 मीटर परिघ 4 मीटर आणि वजन 4000 किलो आहे. शिव आणि विष्णू यांचे एकत्रित पूजा होणारे हे मंदिर काही मोजक्या मंदिरा पैकी एक आहे. हे मंदिर सिमेंट आणि वाळूचा वापर न करता बांधण्यात आलेले आहे.
15) श्री कपिल सिद्ध मल्लिकार्जुन मंदिर-

Shree Kapilsiddha Mallikarjun Temple हे सोलापूर जिल्ह्यातील बाळीवेस येथे असलेले ऐतिहासिक व धार्मिक मंदिर आहे. पूर्वी हे मंदिर सोलापूरच्या भुईकोट किल्ल्यामध्ये होते. सुरक्षेच्या कारणास्तव नंतर ते बाळीवेस या ठिकाणी हलविण्यात आले. हे मंदिर प्राचीन असून सोलापूरचे भाविक पूर्वी या किल्ल्यातील उदध्वस्त देवस्थानाचे दर्शन घेत होते.असे सांगितले जाते. हे मंदिर पूर्वाभिमुख दगडी बांधकामात बांधलेली आहे.श्री सिद्धरामेश्वरांनी सोलापूरला ‘अभिनव श्रीशैल’ म्हणून प्रसिद्ध केले होते. त्यांनी या श्री मल्लिकार्जुनाचे सुंदर मंदिर बांधले.
या मंदिरातील गाभाऱ्यात श्री उमाक्षेत्रेश्वर लिंग, मारुती, नागदेवता यांच्या मूर्ती आहेत. तसेच या मंदिरात वेगवेगळे उत्सव साजरे केले जात असून महाशिवरात्रीला या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी असते. सोलापूर बस स्थानकापासून हे ठिकाण एक किलोमीटर अंतरावर आहे.
1) सोलापूर जिल्ह्यातील हरिहरेश्वर मंदिर हे कोणत्या नदीच्या संगमावर आहे?
हरिहरेश्वर मंदिर हे सोलापूर जिल्ह्यातील भीमा व सीना नदीच्या संगमावर आहे.
2)सोलापूर जिल्ह्यातील श्री क्षेत्र पंढरपूर कोणत्या नदीच्या काठावर आहे?
सोलापूर जिल्ह्यातील श्री क्षेत्र पंढरपूर भीमा/ चंद्रभागा नदीच्या काठावर आहे.
3) सोलापूर जिल्ह्यातील संत दामाजी पंत कोणत्या शतकातील संत होते?
सोलापूर जिल्ह्यातील संत दामाजी पंत हे मंगळवेढा शहरातील पंधराव्या शतकातील एक आध्यात्मिक व थोर संत होते.