भारतभ्रमंती या वेबसाईटवर पहा भारत देशातील प्रत्येक राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यातील पर्यटन स्थळांमध्ये, तामिळनाडू राज्यातील धर्मपुरी जिल्ह्यातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे. धर्मपुरी जिल्हा हा तामिळनाडूच्या उत्तर-पश्चिम भागातील ऐतिहासिक आणि नैसर्गिकदृष्ट्या समृद्ध जिल्हा आहे. तामिळनाडूमध्ये सेलम जिल्ह्याचे विभाजन करून 2 ऑक्टोबर 1965 रोजी हा नवीन जिल्हा तयार करण्यात आला. या जिल्ह्याच्या पूर्वेला तिरुवन्नमलाई आणि विल्लुपुरम, दक्षिणेला सेलम, उत्तरेला कृष्णगिरी हे जिल्हे असून पश्चिमेला कावेरी नदी वाहते. Top 19 places to visit in Dharmapuri District
पूर्वी या जिल्ह्याचे प्राचीन नाव ‘थागडूर’ होते. या जिल्ह्याचा 30% भाग जंगलांनी वेढलेला असून हा जिल्हा अग्रगण्य आंबा उत्पादक प्रदेश आणि रेशीम उद्योग केंद्र म्हणून ओळखला जातो. याशिवाय येथे उत्तम दर्जाच्या क्वार्टझ, मॉलिब्डेनम व काळ्या ग्रॅनाइटची मोठी खनिज संपत्ती आढळते. येथील प्रसिद्ध होगेनक्कल धबधबा ‘भारताचा नायगरा धबधबा’ म्हणून ओळखला जातो. धर्मपुरीला मंदिरे आणि चर्चचे शहर म्हणून ओळखले जाते.
Top 19 places to visit in Dharmapuri District
धर्मपुरी जिल्ह्यातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
1)Sri Theerthagreeswarar Temple, Theerthamalai-





तीर्थमलाई श्री तीर्थगिरीश्वर मंदिर हे तामिळनाडूच्या धर्मपुरी जिल्ह्यातील हरूर तालुक्यातील प्राचीन आणि पवित्र टेकडीवरील शिव मंदिर आहे. ‘तीर्थमलाई’ या तमिळ शब्दाचा अर्थ “पवित्र पाण्याचा डोंगर” असा होतो, येथे खडकातून बारमाही वाहणारे अनेक नैसर्गिक पाण्याचे झरे आहेत. हे मंदिर 1,000 वर्षांपेक्षा प्राचीन असून एका टेकडीवर 1200 फूट उंचीवर वसलेले आहे. येथे भगवान शिव (तीर्थगिरीश्वर) स्वयंभू लिंग रूपात विराजमान आहेत. रामायणातील कथेनुसार, भगवान श्रीरामांनी बाण मारून निर्माण केलेला ‘राम तीर्थम’ हा औषधी गुणांनी युक्त पाण्याचा नैसर्गिक झरा आजही येथे खडकातून अखंड वाहतो. याशिवाय येथे अग्नी, अगस्त्य, कुमार आणि गौरी तीर्थ असे पवित्र पाण्याचे झरे आहेत. महाशिवरात्री आणि मासी महिन्यातील ब्रह्मोत्सवम हे येथील प्रमुख सण आहेत.
Visit our website: allindiajourney.com
2)Hogenakkal Waterfalls-






होगेनक्कल धबधबा हा तामिळनाडूच्या धर्मपुरी जिल्ह्यात कावेरी नदीवर वसलेला प्रसिद्ध आणि नयनरम्य धबधबा आहे. हा धबधबा आपल्या अथांग आणि रौद्र रूपामुळे ‘भारताचा नायगरा फॉल’ म्हणूनही ओळखले जातो. कावेरी नदीचे पाणी उंचावरून खडकांवर वेगाने कोसळताना धुरासारखे तुषार उडतात, म्हणून याला ‘होगेनक्कल’ (धूर निघणारा खडक) असे म्हणतात. येथे बांबूच्या गोल बोटीतून फिरणे आणि स्थानिक तेल मालिश करून औषधी पाण्यात आंघोळ करणे हे पर्यटकांचे मुख्य आकर्षण आहे. खवय्यांसाठी येथे नदीतील माशांचे विविध पदार्थ मिळतात. ऑक्टोबर ते मार्च हा काळ या धबधब्याला भेट देण्यासाठी सर्वोत्तम मानला जातो.
3)Crocodile Park-





तामिळनाडूच्या धर्मपुरी जिल्ह्यात प्रसिद्ध होगेनक्कल धबधब्याजवळ प्रसिद्ध मगर पुनर्वसन केंद्र आहे. या पार्कची स्थापना 1975 मध्ये तामिळनाडू सरकारच्या वन विभागातर्फे मगरींच्या संरक्षणासाठी करण्यात आली. येथे दलदलीत आढळणाऱ्या 300 पेक्षा जास्त मगरींचे पुनर्वसन आणि संगोपन केले जाते. हे केंद्र वन्यजीव संरक्षणाविषयी लोकांमध्ये जागृती निर्माण करण्याचे आणि जखमी मगरींवर उपचार करण्याचे काम करते. पर्यटक येथे जवळून आणि सुरक्षितपणे मगरींच्या विविध प्रजाती पाहू शकतात. होगेनक्कल धबधब्याला भेट देणाऱ्या पर्यटकांसाठी हे आवडीचे आकर्षण आहे.
4)Thoppaiyaru Dam-


थोपपय्यारू धरण हे तामिळनाडूच्या धर्मपुरी जिल्ह्यातील एक महत्त्वाचा निसर्गरम्य जलसाठा आहे. हे धरण सिंचन आणि स्थानिक पाणीपुरवठ्यासाठी वापरले जाते. हे धरण एअरकाड टेकड्यांमधून आणि आजूबाजूच्या परिसरातुन येणाऱ्या पाण्याचा मुख्य साठा आहे. आणि 50 फूट उंची असलेल्या या धरणाची पाणी साठवणूक क्षमता 298.6 दशलक्ष घनफूट इतकी आहे. धर्मपुरी आणि सालेम जिल्ह्याच्या शेतकऱ्यांसाठी हे धरण सिंचन आणि पिण्याच्या पाण्याचा प्रमुख स्त्रोत आहे. चारही बाजूंनी डोंगर आणि घनदाट हिरवाईने वेढलेला हा परिसर पर्यटकांसाठी एक उत्तम वीकेंड स्पॉट मानला जातो. पावसाळ्यानंतर धरणाचा पाणीसाठा वाढल्यावर येथील निसर्गसौंदर्य आणि सूर्यास्ताचे दृश्य पाहण्यासारखे असते.
5)Kottai Kovil (Mallikarjuneswara Temple) Dharmapuri Fort



–
कोट्टई कोविल (मल्लिकार्जुनेश्वर मंदिर) हे तामिळनाडूच्या धर्मपुरी जिल्ह्यातील, 9 व्या शतकातील प्राचीन धार्मिक स्थळ आहे. हे मंदिर ज्या परिसरात आहे त्याला पूर्वी ‘धर्मपुरी किल्ला’ किंवा ‘थगादूर किल्ला’ म्हटले जायचे. हे मंदिर ज्या भागात आहे, तिथे पूर्वी प्रसिद्ध राजे ‘अधियमान’ यांचा ऐतिहासिक किल्ला (थगादूर किल्ला) होता. भगवान शिव आणि देवी पार्वती यांना समर्पित असलेल्या या मंदिराला चोल, पल्लव आणि होयसळ राजघराण्यांनी आश्रय दिला होता. येथील वैशिष्ट्य म्हणजे स्थापत्यकलेचा अद्भूत नमुना असलेला ‘हँगिंग पिलर’ (टांगता खांब), ज्याचा खालचा भाग जमिनीला स्पर्श करत नाही. तसेच या मंदिराच्या भिंतींवर सुंदर कोरीव काम असून, परिसरात एक गुप्त भुयारी मार्ग आणि प्राचीन विष्णू मंदिर आहे. दक्षिण भारतीय वास्तुकलेचा वारसा अनुभवण्यासाठी हे एक उत्तम ठिकाण आहे.
6)Adhiyaman Kottai, Chenraya Perumal Temple-


चेन्नराय पेरुमळ मंदिर हे तामिळनाडूच्या धर्मपुरी जिल्ह्यातील, अधियामान कोट्टई किल्ल्याच्या आवारातील भव्य आणि प्राचीन मंदिर आहे. हे मंदिर भगवान विष्णूंना समर्पित असून, मंदिराच्या गर्भगृहात गर्भगृहात भगवान विष्णू आपल्या दोन्ही पत्नी—श्रीदेवी आणि भूदेवी यांच्यासह उभे (नित्तम) आहेत. या मंदिराचे आकर्षण म्हणजे नैसर्गिक रंगांचा वापर करून येथील महामंडपाच्या छतावर असलेली 18 व्या शतकातील महाभारत, रामायण आणि भगवान कृष्णाचे विश्वरूप दर्शन असलेली भित्तीचित्रे. हे मंदिर 12 व्या शतकात होयसळ राजांनी बांधले आणि पुढे विजयनगर साम्राज्याचे प्रसिद्ध राजे कृष्णदेवराय यांनी याचा विस्तार केला. सध्या हे मंदिर भारतीय पुरातत्व सर्वेक्षण (ASI) विभागाच्या देखरेखीखाली एक राष्ट्रीय स्मारक म्हणून संरक्षित आहे.
7)Adhiyaman Kottai, Dakshina Kasi Kalabhairavar Temple-






दक्षिण काशी कालभैरवर मंदिर तामिळनाडूच्या धर्मपुरी जिल्ह्यातील, अधियामान कोट्टई किल्ल्याच्या आवारातील, 9 व्या शतकातील 1200 वर्षे जुने, भगवान शिवाचे अत्यंत जागृत आणि प्रसिद्ध मंदिर आहे. संगम कालीन राजे अधियामान नेडुमान अंजी यांनी बांधलेल्या या मंदिराला उत्तर काशीनंतरचे सर्वोच्च स्थान असल्याने ‘दक्षिण काशी’ म्हटले जाते. येथील दक्षिणमुखी मुख्य मूर्तीमध्ये एकाच वेळी ‘अष्टभैरव’ समाविष्ट असून, वाहनांमध्ये कुत्र्यासोबत दुर्मिळ ‘नंदी’ आहे. या मंदिराच्या महामंडपाच्या छतावर नवग्रह कोरलेले आहेत, तर परिसरात 27 नक्षत्रांचे प्रतिनिधित्व करणारी विशेष बाग आहे. येथे दर महिन्याला येणाऱ्या कृष्ण पक्ष अष्टमीला भव्य उत्सव चालतो. या ठिकाणी राहू दोष आणि नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी पांढऱ्या भोपळ्याचा किंवा लिंबाचा दिवा लावून 18 प्रदक्षिणा घालण्याची विशेष धार्मिक प्रथा आहे.
8) Thiyagi Subramanya Siva Memorial-


थियागी सुब्रमण्य शिव स्मारक हे तामिळनाडूच्या धर्मपुरी जिल्ह्यातील पापारपट्टी येथील ऐतिहासिक आणि देशभक्तीपर ठिकाण आहे. हे स्मारक मद्रास प्रेसिडेन्सीमधील पहिले राजकीय कैदी आणि प्रखर क्रांतिकारक स्वातंत्र्यसैनिक सुब्रमण्य शिव यांच्या स्मृतीस समर्पित आहे. तामिळनाडू सरकारने उभारलेल्या या स्मारकात त्यांचा भव्य पुतळा आणि त्यांच्या जीवनावरील दुर्मिळ छायाचित्रांचे प्रदर्शन पाहता येते. सुब्रमण्य शिव यांचे स्वप्न असलेल्या ‘भरत माता मंदिराची’ निर्मितीही याच परिसरात करण्यात आली आहे. दरवर्षी 4 ऑक्टोबर रोजी त्यांच्या जयंतीनिमित्त येथे भव्य शासकीय कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. हे ठिकाण इतिहासप्रेमी आणि पर्यटकांसाठी प्रेरणादायी आहे.
9)Mount Carmel Church-

माउंट कार्मेल चर्च हे तामिळनाडूच्या धर्मपुरी जिल्ह्यातील बी. पालीपट्ट्या गावाजवळील प्रसिद्ध रोमन कॅथोलिक चर्च आहे. हे चर्च एका निसर्गरम्य टेकडीवर वसलेले असून धर्मपुरी कॅथोलिक धर्मप्रांतातील सर्वात जुन्या चर्चपैकी एक मानले जाते. येथे टेकडीच्या पायथ्यापासून ते शिखरापर्यंत येशू ख्रिस्तांच्या जीवनप्रवासाचे सुंदर पुतळे उभारण्यात आले आहेत. येथे दरवर्षी इस्टर सणानंतर तीन दिवसीय वार्षिक उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या उत्सवादरम्यान येशू ख्रिस्तांच्या जीवनावर आधारित रात्रभर चालणारे विशेष नाटक आणि भव्य रथोत्सव हे मुख्य आकर्षण असते. शांतता आणि अध्यात्माचा अनुभव घेण्यासाठी येथे सर्व धर्मीय भाविक आणि पर्यटक मोठ्या संख्येने भेट देतात.
10)Hanuman Theertham-

हनुमान तीर्थम हे तामिळनाडूच्या धर्मपुरी धर्मपुरी-कृष्णगिरी जिल्ह्यांच्या सीमेजवळ वसलेले पवित्र आणि प्रसिद्ध धार्मिक स्थळ आहे. हे ठिकाण पेन्नार नदीच्या काठावर वसलेले असून, याचा संबंध रामायण काळाशी जोडला जातो. पौराणिक कथेनुसार, भगवान हनुमानाने आणलेल्या गंगाजलाचा कलश येथे ओतल्यामुळे या पवित्र तीर्थाची (झऱ्याची) निर्मिती झाली. येथे मुख्य नदी कोरडी असली तरीही या खडकातून वाहणाऱ्या गोड पाण्याचा झरा कधीही आटत नाही, अशी भाविकांची श्रद्धा आहे. हे ठिकाण प्रसिद्ध तीर्थमलाई शिवमंदिराशी जोडलेले असून, उथंगराईपासून 12 किमी अंतरावर आहे.
11)Vathalmalai Sunrise and Sunset Views Point-






वाथलमलाई सनराइज अँड सनसेट व्ह्यू पॉइंट हे तामिळनाडूच्या धर्मपुरी जिल्ह्यातील मित्तनूलहल्ली परिसरातील निसर्गप्रेमी आणि ट्रेकर्ससाठी एक नयनरम्य हिल स्टेशन आहे. समुद्रसपाटीपासून 3,000 फुटांपेक्षा जास्त उंचीवर असलेल्या या डोंगरावरून अत्यंत सुंदर सूर्योदय आणि सूर्यास्ताचे विहंगम दृश्य पाहायला मिळते. या डोंगर माथ्यावर पोहोचण्यासाठी 25 पेक्षा जास्त थरारक हेअरपिन वळणांच्या नागमोडी घाट रस्त्यावरून प्रवास करावा लागतो, जो बाइक रायडर्ससाठी विशेष आकर्षण आहे. तसेच या डोंगरावर कॉफी आणि मिरीची सुंदर लागवड असून, जवळच एक मुरुगन मंदिर आणि मान्सूनमध्ये वाहणारा धबधबा आहे.
12)Melagiri Hills-

मेलागिरी टेकड्या या तामिळनाडूच्या धर्मपुरी आणि कृष्णगिरी जिल्ह्यांच्या सीमेवर पसरलेल्या पूर्व घाटातील एक सुंदर निसर्गरम्य आणि जैवविविधतेने नटलेले ठिकाण आहे. हे घनदाट वनक्षेत्र प्रसिद्ध होगेनक्कल धबधब्याजवळ असून, येथील ‘गुथरायन’ हे सर्वात उंच शिखर आहे. पूर्व आणि पश्चिम घाटांचा संगम असलेल्या या भागात प्रामुख्याने कोरडी पानझडी आणि सदाहरित जंगले आढळतात. आणि हा संपूर्ण परिसर ‘हत्तींचा देश’ म्हणून ओळखला जातो, कारण येथे बन्नेरघट्टा आणि सत्यमंगलम जंगलांना जोडणारा एक महत्त्वाचा हत्ती कॉरिडॉर आहे. पर्यटकांसाठी येथे ट्रेकिंग व पक्षी निरीक्षणाचे पर्याय उपलब्ध आहेत.
13)Thollakathu / Dolla Kaadhu Waterfalls-


थोल्लाकाठू धबधबा हा तामिळनाडूच्या धर्मपुरी जिल्ह्यातील पालाकोड शहराजवळ असलेला एक सुंदर, शांत व निसर्गरम्य धबधबा आहे. याला ‘डोल्ला काडू’ किंवा ‘मिनी होगेनक्कल’ म्हणूनही ओळखले जाते. हा धबधबा अत्तारू नदीच्या प्रवाहामुळे तयार होतो. घनदाट जंगलातून आणि औषधी वनस्पतींच्या परिसरातून वाहून येत असल्यामुळे या धबधब्याचे पाणी आरोग्यासाठी चांगले मानले जाते. या धबधब्या शेजारीच एक प्राचीन व ऐतिहासिक मुरुगन मंदिर आहे. हा एक हंगामी धबधबा असून सप्टेंबर ते ऑक्टोबर या मान्सूनच्या काळात वाहतो.
14)Chinna Thumkal Waterfalls-


चिन्ना ठुमकल धबधबा हा तामिळनाडूच्या धर्मपुरी जिल्ह्यामधील पेन्नागरम जवळील अत्यंत सुंदर आणि छुपा धबधबा आहे. याला ‘चिन्ना ठुमकल नीर विज्ची’ असेही म्हटले जाते. हा निसर्गरम्य धबधबा घनदाट हिरवाई आणि डोंगराळ खडकाळ भागात वसलेला असून पावसाळ्यात आणि पावसाळ्यानंतरच्या काळात पूर्ण वैभवाने वाहतो. हा परिसर खाजगी जमिनीच्या क्षेत्रात येत असल्यामुळे तेथे जाताना स्थानिक नियमांचे पालन करणे आवश्यक ठरते. तसेच धबधब्याच्या आसपासचे खडक निसरडे असल्याने पर्यटकांनी पाण्यात उतरताना विशेष काळजी घेणे गरजेचे आहे.
15)Malaiyur View Point-





मलैयूर व्ह्यू पॉईंट हे तामिळनाडूच्या धर्मपुरी जिल्ह्यातील, पाप्पारापट्टीजवळ वसलेले सुंदर आणि निसर्गरम्य पर्यटन स्थळ आहे. या टेकडीच्या टोकावरून आजूबाजूच्या हिरव्यागार डोंगररांगा आणि दऱ्यांचा अत्यंत विहंगम नजराणा पाहायला मिळतो. तसेच येथील टेकडीवर प्रसिद्ध गोपालस्वामी मंदिर आहे ज्याला ‘लहान तिरुपती’ असेही म्हटले जाते. या टेकडीवरील आल्हाददायक वातावरणामुळे ट्रेकर्स आणि निसर्गप्रेमींसाठी हे एक उत्तम वीकेंड डेस्टिनेशन आहे. पावसाळ्यात येथील निसर्गाचे रूप अधिकच खुलून दिसते. शांतता आणि निसर्गाचा आनंद घेण्यासाठी हे एक उत्तम आणि लोकप्रिय ठिकाण मानले जाते.
16)Muthampatti Shri Anjaneyar Temple-


श्री वीर आंजनेयार मंदिर हे तामिळनाडूच्या धर्मपुरी जिल्ह्यातील, मुत्तम्पट्टी गावाजवळ निसर्गरम्य घनदाट जंगलात वसलेले जागृत हनुमान मंदिर आहे. येथील हनुमानाची 7 फूट उंच भव्य मूर्ती एकाच 70 फूट उंच नैसर्गिक खडकावर कोरलेली आहे. 1960 च्या दशकात या मूर्तीचा शोध लागला, त्यामुळे या मंदिराला ऐतिहासिक महत्त्व आहे. मंदिराच्या अगदी समोरून रेल्वे ट्रॅक जातो व या परिसरात मोठ्या संख्येने वानरांचा वावर असतो. येथे भाविकांसाठी मंगळवार व शनिवार हे दिवस दर्शनासाठी अत्यंत शुभ मानले जातात. निसर्गाच्या सानिध्यात शांतता अनुभवण्यासाठी येथे वर्षभर भाविकांची मोठी गर्दी असते.
17)Adhiyaman Memorial-


अधियमन मेमोरिअल हे तमिळनाडूच्या धर्मपुरी जिल्ह्यातील, ए. जेट्टीहळ्ळी येथील ऐतिहासिक वारसा असलेले व संगम काळातील प्रसिद्ध राजा ‘अधियमन नेदुमन अंजी’ यांच्या स्मृती आणि योगदानाला समर्पित एक शांत व सुंदर स्मारक आहे. हे स्मारक संगम काळातील प्रसिद्ध, परोपकारी आणि उदार राजा अधियमन (नेदुमन अंजी) यांच्या स्मरणार्थ बांधण्यात आले आहे. प्रसिद्ध तमिळ कवी अवय्यर यांना राजाने दीर्घ आयुष्य लाभावे म्हणून ‘नेल्लीकानी’ (आवळ्याचे दुर्मिळ फळ) भेट दिले होते, ज्याची साक्ष देणारी सुंदर पुतळ्याची कलाकृती येथे आहे. तसेच या परिसरात ऐतिहासिक अधियमन कोट्टई (किल्ला) चे अवशेष आणि स्मारकाजवळ 12 व्या शतकातील प्रसिद्ध ‘चेनराया पेरुमल मंदिर’ आहे.
18)Government Archaeological Site Museum, Dharmapuri-



शासकीय पुरातत्व संग्रहालय हे तमिळनाडूच्या धर्मपुरी जिल्ह्यातील, वैभवशाली ‘तगादूर’ इतिहासाची साक्ष देणारे एक महत्त्वाचे केंद्र आहे. 1979 मध्ये स्थापन झालेल्या या संग्रहालयात नवाश्मयुगापासून ते 17 व्या शतकापर्यंतच्या दुर्मिळ ऐतिहासिक वस्तू जतन केल्या आहेत. येथे प्राचीन शूर वीरांच्या स्मरणार्थ कोरलेले 25 पेक्षा जास्त ‘वीरगळ’ प्रदर्शित करण्यात आले आहेत. याशिवाय मोदूर येथील उत्खननात सापडलेली नवाश्मयुगीन दगडी हत्यारे, मातीची भांडी आणि प्राचीन नाणी येथे पाहायला मिळतात. तसेच चोल आणि विजयनगर कालखंडातील हिंदू, बौद्ध व जैन धर्माच्या सुंदर पाषाण मूर्ती येथे ठेवण्यात आले आहेत. हे संग्रहालय धर्मपुरी बस स्थानकाजवळ असून दर शुक्रवारी बंद असते.
19)Kaveri Amma Deshanatheshwara Temple-


कावेरी अम्मा देशनाथेश्वर मंदिर हे होगेनक्कल येथील पवित्र धार्मिक स्थळ आहे. हे मंदिर भगवान शिव आणि माता कावेरी यांना समर्पित असून होगेनक्कल धबधब्याजवळ वसलेले आहे. कावेरी नदी कर्नाटक राज्यातून तमिळनाडूमध्ये प्रवेश करते, त्याच निसर्गरम्य काठावर हे मंदिर आहे. येथे कावेरी नदीत पवित्र स्नान करून मंदिरात दर्शन घेण्याची भाविकांची जुनी परंपरा आहे. तमिळ महिन्यातील ‘आदि पेरुक्कू’ आणि ‘आदि अमावस्या’ या सणांना येथे दर्शनासाठी आणि पूर्वजांचे श्राद्ध करण्यासाठी हजारो भाविकांची मोठी गर्दी होते.
1)मलैयूर व्ह्यू पॉईंट हे ठिकाण तामिळनाडूच्या कोणत्या जिल्ह्यात आहे?
मलैयूर व्ह्यू पॉईंट हे तामिळनाडूच्या धर्मपुरी जिल्ह्यातील पाप्पारापट्टीजवळ वसलेले एक निसर्गरम्य पर्यटन स्थळ आहे.
2)थियागी सुब्रमण्य शिव स्मारकाचे ऐतिहासिक महत्त्व काय आहे?
थियागी सुब्रमण्य शिव स्मारक हे तामिळनाडूच्या धर्मपुरी जिल्ह्यातील प्रखर क्रांतिकारक, स्वातंत्र्यसैनिक सुब्रमण्य शिव यांच्या स्मृतीस समर्पित स्मारक आहे.
3)होगेनक्कल मगर पुनर्वसन केंद्राची स्थापना कधी व कोणी केली?
होगेनक्कल मगर पुनर्वसन केंद्राची स्थापना 1975 मध्ये तामिळनाडू सरकारच्या वन विभागातर्फे करण्यात आली.


