कुड्डालोर जिल्ह्यातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे- Top 19 places to visit in Cuddalore district

भारतभ्रमंती या वेबसाईटवर पहा भारत देशातील प्रत्येक राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यातील पर्यटन स्थळांमध्ये, तामिळनाडू राज्यातील कुड्डालोर जिल्ह्यातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे. कुड्डालोर जिल्हा हा तमिळनाडू राज्याच्या पूर्व किनारपट्टीवर वसलेला एक ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि औद्योगिकदृष्ट्या महत्त्वाचा जिल्हा आहे. ऊस आणि साखरेच्या प्रचंड उत्पादनामुळे या जिल्ह्याला ‘तमिळनाडूची साखरेची वाटी’ म्हटले जाते. तसेच या जिल्ह्याला सुमारे 68 किमी लांबीची किनारपट्टी लाभली असून, येथे तमिळनाडूतील दुसऱ्या क्रमांकाचा मोठा ‘सिल्वर बीच’ हा समुद्रकिनारा आहे. Top 19 places to visit in Cuddalore district

येथील जागतिक स्तरावर प्रसिद्ध असलेले चिदंबरमचे थिल्लाई नटराज मंदिर आणि भारतातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे ‘पिचावरम खारफुटीचे जंगल’ ही येथील प्रमुख आकर्षणे आहेत. नेवेली येथील लिग्नाइट कोळसा खाणींमुळे हा जिल्हा वीज निर्मितीचे एक मोठे केंद्र बनला आहे. कृषी, मासेमारी आणि कुड्डालोरच्या ‘सिपकॉट’ औद्योगिक संकुलात रासायनिक आणि औषध निर्माण कंपन्यांचे मोठे उद्योगांमुळे जिल्ह्याची अर्थव्यवस्था अत्यंत समृद्ध आहे. या जिल्ह्याला ‘तमिळनाडूची साखरेची वाटी’ म्हणूनही ओळखले जाते.

Table of Contents

Top 19 places to visit in Cuddalore district

कुड्डालोर जिल्ह्यातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे

1)Sri Thillai Natarajar Temple, Chidambaram-

Top 19 places to visit in Cuddalore district

श्री थिल्लई नटराज मंदिर हे तामिळनाडूच्या कुड्डालोर जिल्ह्यातील, भगवान शंकराच्या ‘नटराज’ (तांडव नृत्य) रूपाला समर्पित प्राचीन आणि प्रसिद्ध शिव मंदिर आहे. हे मंदिर दक्षिण भारतातील पवित्र पंचभूत स्थळांमध्ये ‘आकाश’ तत्त्वाचे प्रतीक मानले जाते. 40 ते 50 एकर परिसरात पसरलेल्या या भव्य मंदिराची वास्तुकला चोल राजवंशाच्या काळात प्रामुख्याने आकारास आली असून मंदिराच्या भव्य गोपुरमच्या भिंतींवर शास्त्रीय नृत्य असलेल्या भरतनाट्यमच्या 108 मुद्रा सुंदर रितीने कोरलेल्या आहेत. तसेच येथील मुख्य गाभाऱ्याचे छत सोन्याच्या पत्र्यांनी मढवलेले असून, येथे ईश्वराचे निराकार रूप दर्शवणारे गूढ ‘चिदंबरम रहस्य’ पाहायला मिळते. दरवर्षी महाशिवरात्रीला येथे जागतिक दर्जाचा ‘नृत्यांजली महोत्सव’ आयोजित केला जातो, तेव्हा जगभरातील नर्तक आपली कला सादर करतात.

Visit our website: allindiajourney.com

2)Pichavaram Mangrove Forest-

पिचावरम खारफुटी जंगल हे तामिळनाडूच्या कुड्डालोर जिल्ह्यातील, चिदंबरमजवळ वसलेले, भारतातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे खारफुटीचे जंगल आणि अत्यंत सुंदर व अद्वितीय नैसर्गिक ठिकाण आहे. हे जंगल वेल्लार आणि कोलेरून नद्यांच्या संगमावर 1,478 हेक्टर क्षेत्रावर पसरलेले असून येथे 400 पेक्षा जास्त पाण्याचे अरुंद मार्ग आणि अनेक लहान-मोठी बेटे आहेत, पर्यटकांना येथे दाट झाडीमधून बोट सफारी करण्याचा थरारक अनुभव घेता येतो. हे जंगल बंगालच्या उपसागराच्या लाटा आणि चक्रीवादळांपासून तामिळनाडूच्या किनारपट्टीचे नैसर्गिकरीत्या संरक्षण करते. तसेच tयेथील वैशिष्ट्यपूर्ण वनस्पती, दुर्मिळ पक्षी आणि अद्वितीय जैवविविधतेमुळे हे ठिकाण पर्यटकांचे मुख्य आकर्षण आहे. हे जंगल एक निसर्गाचा अद्भूत चमत्कार मानले जाते आणि ते रामसर स्थळ म्हणूनही घोषित करण्यात आले आहे.

3)Silver Beach-

सिल्व्हर बीच हा तमिळनाडूच्या कुड्डालोर जिल्ह्यातील, निसर्गरम्य आणि लोकप्रिय समुद्रकिनारा आहे. गेडिलाम आणि थेनपेनय्यार नद्यांच्या मुहाजवळ, कोरोमंडल किनारपट्टीवर वसलेला हा समुद्रकिनारा आशियातील दुसरा सर्वात लांब समुद्रकिनारा म्हणून ओळखला जातो. येथील सूर्योदयाचे दृश्य अत्यंत मनमोहक आहे. येथे ‘ब्लू फ्लॅग’ उपक्रम विकसित करण्यात आल्यामुळे हा बीच अत्यंत स्वच्छ असून येथे सुंदर वॉकवे, गार्डन्स आणि आधुनिक सुविधा उपलब्ध आहेत. पर्यटकांसाठी येथे घोडेस्वारी, बोटिंग, वॉटर स्पोर्ट्स आणि मुलांसाठी चिल्ड्रन्स पार्कचे आकर्षण आहे. तसेच या बीचच्या जवळ ब्रिटिशकालीन ऐतिहासिक ‘सेंट डेव्हिड किल्ला’ आहे.

4)Shri Padaleeswarar Temple, Thirupathiripuliyur-

अरुल्मिगु पदालीश्वरर मंदिर हे तमिळनाडूच्या कुड्डालोर जिल्ह्यातील, थिरुपाथिरिपुलियुर येथील प्राचीन शिवमंदिर आहे. हे मंदिर 2000 वर्षे जुने असून शैव परंपरेतील 275 ‘पाडल पेट्रा स्थलम’ पैकी एक मानले जाते. दक्षिण भारतीय द्रविड वास्तुकलेचा उत्कृष्ट नमुना असलेले हे मंदिर पल्लव आणि चोल राजांच्या काळात बांधले गेले. या पवित्र क्षेत्रात भगवान शिव ‘पदालीश्वरर’ आणि देवी पार्वती ‘पेरिया नायकी’ (अरुणथव नायकी) रूपात निवास करतात. प्रसिद्ध शैव संत अप्पर यांना जेव्हा समुद्रात बुडवण्याचा प्रयत्न केला गेला, तेव्हा शिवाच्या कृपेने ते दगडासह तरंगत याच मंदिराच्या किनाऱ्यावर सुखरूप पोहोचले होते. तसेच हे ठिकाण पवित्र ‘पाथिरी’ वृक्षासाठी प्रसिद्ध आहे. धार्मिक मान्यतेनुसार, येथे एक वेळ केलेली पूजा ही काशीमधील 16 वेळच्या पूजेइतकी पुण्य देणारी ठरते. अशी भाविकांची श्रद्धा आहे.

5)Veeranam Lake-

वीरनम तलाव (वीरनारायणपुरम सरोवर) हा तमिळनाडूच्या कुड्डालोर जिल्ह्यातील, कट्टुमन्नारकोइलजवळील विस्तीर्ण असा मानवनिर्मित जलाशय आहे. हा तलाव 10 व्या शतकात चोल राजपुत्र राजादित्य यांनी बांधला होता. प्रसिद्ध कादंबरी ‘पोन्नियिन सेल्वन’ च्या सुरुवातीलाच या तलावाच्या भव्यतेचे वर्णन आढळते. या तलावाला प्रामुख्याने कावेरी नदीच्या कोल्लीदम उपनदीतून पाणी मिळते. 14 किमी लांबीच्या या तलावाची एकूण जलसाठवण क्षमता 1.465 TMC एवढी आहे. आणि हा जलाशय कुड्डालोर जिल्ह्यातील सुमारे 40,000 एकर शेतजमिनीला सिंचनासाठी पाणी पुरवतो. याशिवाय, चेन्नई शहराला पिण्याचे पाणी पुरवणारा हा एक मुख्य आणि महत्त्वाचा जलस्त्रोत आहे. निसर्गरम्य वातावरण आणि स्थलांतरित पक्ष्यांमुळे हा तलाव पर्यटकांचे आकर्षण केंद्र आहे.

6)Shri Devanathaswamy Temple, Thiruvanthipuram-

श्री देवनाथस्वामी मंदिर हे तमिळनाडूच्या कुड्डालोर जिल्ह्यातील, तिरुवंतीपुरम गावात, केडीलम नदीच्या काठावर वसलेले भगवान विष्णूंना समर्पित प्राचीन मंदिर आहे. हे मंदिर विष्णूंच्या 108 दिव्य देशम पैकी एक मानले जाते. द्रविडीयन स्थापत्यशैलीत बांधलेल्या या मंदिरात भगवान विष्णू ‘देवनाथस्वामी’ आणि लक्ष्मी माता ‘हेमभुजवल्ली’ रूपात विराजमान आहेत. या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे येथील टेकडीवर भगवान हयग्रीव (ज्ञान आणि बुद्धीचे देव) यांचे दक्षिण भारतातील एकमेव मंदिर आहे. पौराणिक मान्यतेनुसार, येथील देवनाथस्वामी हे तिरुपाती बालाजीचे मोठे बंधू मानले जातात, ज्यामुळे या स्थानाला विशेष धार्मिक महत्त्व आहे. तसेच या मंदिराच्या आवारातील पवित्र ‘शेष तीर्थ’ विहिरीत मीठ आणि मिरी अर्पण केल्याने आजार बरे होतात, अशी भक्तांची श्रद्धा आहे.

7)Shri Bhuvaraha Swamy Temple,Srimushnam-

श्री भूवराह स्वामी मंदिर हे तमिळनाडूच्या कुड्डालोर जिल्ह्यातील, श्रीमुष्णम येथील भगवान विष्णूच्या वराह अवताराला समर्पित प्राचीन मंदिर आहे. हे मंदिर भगवान विष्णूच्या 8 प्रमुख स्वयंभू क्षेत्रांपैकी एक अत्यंत पवित्र स्थान मानले जाते. येथील गर्भगृहातील वराह मूर्ती शालिग्राम दगडापासून बनलेली असून तिचे मुख दक्षिणेकडे व शरीर पश्चिमेकडे आहे. पौराणिक कथेनुसार, हिरण्याक्ष राक्षसाचा वध करून पृथ्वीची सुटका केल्यानंतर भगवान विष्णू येथे प्रकट झाले होते. या मंदिराची भव्य वास्तुकला द्रविडीयन शैलीतील असून, येथील 16 व्या शतकातील नक्षीकाम केलेले रथ-मंडप आणि दगडी वेणीचे शिल्प जगप्रसिद्ध आहे. आणि येथील वार्षिक रथोत्सव हिंदू-मुस्लिम धार्मिक सलोख्याचे एक अनोखे प्रतीक मानला जातो.

8)Sri Veerattaneswarar Temple, Thiruvathigai-

श्री वीरत्तेश्वरर मंदिर हे तमिळनाडूच्या कुड्डालोर जिल्ह्यातील, पाणरुती शहराजवळ, तिरुवथीगाई येथील प्राचीन शिव मंदिर आहे. हे ठिकाण भगवान शिवाने त्रिपुरासुराचा वध केलेल्या आठ पवित्र ‘अष्ट वीरट्टनम’ स्थळांपैकी एक मानले जाते. या मंदिराची निर्मिती 7 व्या शतकात पल्लव राजा महेंद्रवर्मन प्रथम याने द्रविड वास्तुकलेत केली होती. येथील मुख्य शिवलिंगाला ‘वीरत्तेश्वरर’ आणि देवीला ‘त्रिपुरसुंदरी’ म्हटले जाते. 7 व्या शतकातील प्रसिद्ध नयनमार संत थिरुनावुक्करासर आणि थिरुज्ञानसंबंदर यांनी त्यांच्या ‘तेवारम्’ या पवित्र काव्यात या मंदिराचा गौरव केला आहे. असे सांगितले जाते की, चोल राजा याने तंजावरचे प्रसिद्ध ‘बृहदीश्वर मंदिर’ बांधण्यापूर्वी या मंदिराच्या भव्य संरचनेवरून प्रेरणा घेतली होती. या मंदिरात दर्शन घेतल्याने पोटाचे जुने आजार बरे होतात, अशी भाविकांची श्रद्धा आहे.

9)Fort St. David-

फोर्ट सेंट डेव्हिड हा किल्ला तमिळनाडूच्या कुड्डालोर जिल्ह्यातील, गेडिलम नदी आणि सिल्वर बीचजवळील, ब्रिटिशकालीन ईस्ट इंडिया कंपनीचा ऐतिहासिक किल्ला आहे. 1690 मध्ये छत्रपती राजाराम महाराजांच्या काळात मराठ्यांनी हा किल्ला इंग्रजांना विकला, ज्याचे नाव वेल्सचे संत सेंट डेव्हिड यांच्यावरून ठेवले गेले. 1746 मध्ये फ्रेंचांनी मद्रास जिंकल्यावर हा किल्ला ब्रिटिशांचे मुख्यालय आणि राजधानी बनला. नंतर 1756 मध्ये ब्रिटिश अधिकारी रॉबर्ट क्लाइव्हची या किल्ल्याचा गव्हर्नर पदी नियुक्ती करण्यात आली होती. हा किल्ला अनेक अँग्लो-फ्रेंच संघर्षांचा साक्षीदार राहिला असून 1758 मध्ये फ्रेंचांनी तो उद्ध्वस्त केला होता. सध्या हा किल्ला मोडकळीस आलेल्या अवस्थेत असून, येथील जुने बुरूज आणि वसाहतकालीन अवशेष पर्यटकांना पाहायला मिळतात.

10)Parangipettai / Porto Novo-

परंगीपेट्टाई / पोर्तो नोव्हो हे तमिळनाडूच्या कुड्डालोर जिल्ह्यातील, कोरोमंडल किनारपट्टीवर वसलेले ऐतिहासिक आणि किनारपट्टीचे नगरपंचायत शहर आहे. वेल्लार नदीच्या मुखाशी वसलेल्या या शहराला पोर्तुगीज, मुघल आणि ब्रिटिश राजवटीचा ऐतिहासिक वारसा लाभला आहे. येथे 1781 मध्ये ब्रिटिश आणि म्हैसूरचे शासक हैदर अली यांच्यात ‘पोर्तो नोव्होची प्रसिद्ध लढाई’ झाली होती, इथे डच, पोर्तुगीज आणि ब्रिटिशांच्या काळातील काही ऐतिहासिक खुणा आणि वॉर मेमोरिअल पाहायला मिळते. तसेच 1830 मध्ये भारतातील पहिला लोखंड आणि पोलाद कारखाना याच शहरात स्थापन झाला होता. या ठिकाणी अन्नमलाई विद्यापीठाचे प्रसिद्ध सागरी जीवशास्त्र संशोधन केंद्र आणि एक दीपगृह आहे. सध्या हे शहर हिंदू-मुस्लिम संस्कृतीचा सलोखा, सागरी व्यापारासाठी आणि महत्त्वाचे मासेमारी केंद्र म्हणून ओळखले जाते.

11)Sri Valli Devasena Shiva Subramanya Swamy Temple-

श्री वल्ली देवसेना शिव सुब्रमण्य स्वामी मंदिर हे तमिळनाडूच्या कुड्डालोर जिल्ह्यातील, पनरुटी तालुक्यात, पुदुवंडीपालयम येथील भगवान मुरुगन (कार्तिकेय) यांना समर्पित प्राचीन प्राचीन आणि पवित्र धार्मिक स्थळ आहे. या मंदिराला पुदुवंदिपलायम शिवसुब्रमण्यस्वामी मंदिर किंवा विल्लुदयनपट्टू मुरुगन मंदिर या नावानेही ओळखले जाते. येथे भगवान मुरुगन त्यांच्या दोन्ही पत्नी—माता वल्ली आणि माता देवसेना यांच्यासोबत भव्य 6 मुखे असलेल्या रूपात विराजमान आहेत. पौराणिक कथेनुसार, महान शैव संत तिरुनावुक्करासर यांना राजाने समुद्रात बुडवण्याचा प्रयत्न केला असता, भगवान शिव आणि मुरुगन यांच्या कृपेने ते याच क्षेत्रातील नदीकिनारी सुखरूप बाहेर आले होते. या मंदिरात मुरुगन यांचे शस्त्र ‘वेल’ साठी स्वतंत्र स्थान असून, त्याची पूजा केल्याने आजारांपासून मुक्ती मिळते अशी भाविकांची श्रद्धा आहे. येथे ‘पगुनी उथिरम’ (भगवान मुरुगन यांचा विवाह सोहळा) आणि कंद षष्ठी हे वार्षिक उत्सव अत्यंत उत्साहात साजरे केले जातात.

12)Sri Lakshmi Narasimhaswami Temple, Singirikudi-

श्री लक्ष्मी नरसिंह स्वामी मंदिर हे तमिळनाडूच्या कुड्डालोर जिल्ह्यातील, सिंगरीकुडी गावातील प्रसिद्ध मंदिर आहे. हे मंदिर 1,000 वर्षांपेक्षा जास्त प्राचीन आणि प्रसिद्ध ‘नव-नरसिंह’ क्षेत्रांपैकी एक आहे. या मंदिराच्या मुख्य गर्भगृहात भगवान नरसिंहांची 16 हात असलेली अत्यंत दुर्मिळ उग्र मूर्ती असून, ते हिरण्यकशिपूचा वध करत आहेत. आणि त्यांच्या उग्र रूपाला शांत करण्यासाठी माता लक्ष्मी येथे कनकवल्ली थायार म्हणून मंदिरात विराजमान आहेत. येथे एकाच गर्भगृहात मुख्य मूर्तीसोबत योग नरसिंह आणि बाल नरसिंह यांचे दर्शन घडते. भाविक येथे कर्जमुक्ती, मानसिक तणाव आणि शत्रूबाधेपासून मुक्ती मिळवण्यासाठी प्रार्थना करतात. तसेच येथे पूवरसनकुप्पम आणि परिक्कल या इतर दोन नरसिंह मंदिरांसोबत एकाच दिवसात याचे दर्शन घेण्याची परंपरा आहे.

13)Sri Palvannanathar Temple, Tirukazhipalai-

पालवन्ननाथर मंदिर तिरुक्काझिप्पलाई, हे तमिळनाडूच्या कुड्डालोर जिल्ह्यातील, शिवपुरीजवळील प्राचीन शिवमंदिर आहे. हे मंदिर 7 व्या शतकातील ‘तेवारम’ ग्रंथात उल्लेख असलेले शैव संप्रदायातील 275 पाडळ पेत्रा स्थलम पैकी एक मानले जाते. येथील मुख्य आकर्षण म्हणजे नैसर्गिक फिकट पांढऱ्या रंगाचे स्वयंभू शिवलिंग आहे, ज्याला ‘पालवन्ननाथर’ म्हणतात. हे मंदिर नदीच्या पुरात वाहून गेल्यानंतर मूर्ती सुरक्षितपणे शिवपुरी येथे स्थलांतरित करण्यात आल्या. येथील शिवलिंगाच्या मागे भगवान शिव-पार्वतीची सुंदर विवाह मुद्रेतील मूर्ती आहे. आणि येथे पाठीमागे वाहन (कुत्रा) नसलेली काशीच्या धर्तीवरील ‘कालाभैरव’ मूर्ती विशेष पूजनीय आहे. या मंदिरात दुधाचा अभिषेक केल्याने आजार बरे होतात अशी भाविकांची श्रद्धा आहे.

14)Thillai Kali Amman Temple-

थिल्लई काली अम्मन मंदिर हे भारतातील तामिळनाडूच्या कुड्डालोर जिल्ह्यातील चिदंबरम शहरात असलेले एक जागृत मंदिर आहे. पौराणिक कथेनुसार, भगवान शिव आणि देवी पार्वती यांच्यात झालेल्या नृत्य स्पर्धेत पराभूत झाल्यानंतर क्रोधीत झालेल्या देवीने येथे ‘उग्र काली’चे रूप धारण केले होते, ज्यांना नंतर ब्रह्मदेवांनी शांत केले. आणि हे मंदिर 13 व्या शतकात चोल/काडव वंशातील राजा कोप्परुनजिंगन याने बांधले होते. मंदिराच्या गर्भगृहात देवीची दोन रूपे आहेत, एक पूर्वेकडे तोंड करून असलेली अत्यंत उग्र ‘थिल्लई काली’ आणि दुसरी पश्चिमेकडे तोंड करून असलेली चार मुखांची अत्यंत शांत ‘ब्रह्मा चामुंडेश्वरी’. या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे येथे भगवान दक्षिणामूर्ती स्त्री रूपात विराजमान आहेत. हे मंदिर प्रसिद्ध चिदंबरम नटराज मंदिराच्या उत्तर गोपुरापासून 1 किलोमीटर अंतरावर आहे.

15)Arulmigu Virudhambikai Udanurai Virudhagirishvarar Temple-

अरुल्मिगु विरुद्धांबिकाई उदनुराई विरुधागिरीश्वरार मंदिर हे तमिळनाडूच्या कुड्डालोर जिल्ह्यातील विरुधाचलम शहरातील प्राचीन शिवमंदिर आहे. या मंदिराला पाझमलाई नाधर मंदिर किंवा थिरु मुदुकुंद्रम म्हणूनही ओळखले जाते. मणिमुथर नदीच्या उत्तर तीरावर वसलेले हे मंदिर 2,000 वर्षे, प्राचीन असून शैव संप्रदायात ‘वृद्ध काशी’ म्हणून ओळखले जाते. येथे मृत्यू पश्चात थेट मोक्ष मिळतो अशी भाविकांची श्रद्धा आहे. चोल साम्राज्यातील राणी सेंबियन महादेवी यांनी या मंदिराचे दगडी बांधकाम केले होते. या मंदिराच्या रचनेत ‘5’ या अंकाचे विशेष महत्त्व असून येथे 5 गोपुरम, 5 अंगण, 5 रथ आणि 5 नंदि पाहायला मिळतात. तसेच मंदिराच्या आवारात 1,700 वर्षे जुने पवित्र ‘वन्नी वृक्ष’ (शमीचे झाड) आणि जमिनीच्या खाली 18 पायऱ्या उतरून जावे लागणारे अनोखे ‘आळाथू विनायकर’ (भूगर्भातील गणपती) मंदिर आहे. दरवर्षी मार्च महिन्यात येथे ‘मासी मघम’ (ब्रह्मोत्सव) साजरा केला जातो.

16)Vadalur Sathya Gana Sabai –

वडालूर सत्य ज्ञान सभा हे तामिळनाडूतील कुड्डालोर जिल्ह्यातील वडालूर शहरातील अत्यंत पवित्र आणि अद्वितीय आध्यात्मिक केंद्र आहे. महान तमिळ संत कवी श्री रामलिंग स्वामीगल ( वल्लालार) यांनी 1872 मध्ये या सभेची स्थापना केली. ही जागा ‘हॉल ऑफ ट्रू नॉलेज’ म्हणूनही प्रसिद्ध आहे. ही सत्य ज्ञान सभा मूर्तीपूजा न करता केवळ अखंड दिव्य ज्योतीच्या (प्रकाशाच्या) उपासनेसाठी प्रसिद्ध आहे. येथे मानवी मनातील अज्ञान आणि माया दर्शवणारे 7 रंगीत पडदे बाजूला सारून पवित्र ज्योतीचे दर्शन घडवले जाते. सर्व जाती-धर्मांच्या लोकांसाठी खुली असलेली ही वास्तू विशिष्ट अष्टकोनी आकारात बांधलेली आहे. या परिसरातील सत्य धर्म शाला येथे 1867 मध्ये पेटवलेली अन्न शिजवण्याची भट्टी आजही चालू असून, दररोज हजारो गरिबांना येथे मोफत अन्न दिले जाते. तमिळ महिन्यातील ‘थाई पूसम’ या मुख्य उत्सवाला येथे लाखो भाविकांची गर्दी होते.

17)Melakadambur Amirthakadeswarar Temple-

मेळाई कदंबूर अमृतकडेश्वर मंदिर हे तमिळनाडूच्या कुड्डालोर जिल्ह्यातील, मेला कदंबूर (तिरुक्कडंबूर) या गावातील चोल कालीन पवित्र शिवमंदिर आहे. 900 वर्षांपेक्षा जास्त जुने असलेले हे मंदिर अद्भुत स्थापत्यकलेसाठी आणि रथाच्या आकाराच्या संरचनेसाठी जगप्रसिद्ध आहे. या मंदिराचे गर्भगृह हुबेहूब एका भव्य दगडी रथाच्या आकारात कोरलेले असून, दोन घोडे हा रथ ओढत असल्याचे दृश्य दगडात जिवंत केले आहे. पौराणिक कथेनुसार येथील स्वयंभू शिवलिंग समुद्रमंथनातील अमृताच्या थेंबापासून प्रकट झाले आहे. प्रसिद्ध तमिळ संत अप्पार आणि सुंदरर यांच्या पवित्र ‘तेवारम’ काव्यात या मंदिराचा गौरव करण्यात आला आहे. या मंदिराच्या भिंतींवर रामायण आणि 63 नायनमार संतांच्या जीवनावरील सूक्ष्म शिल्पे कोरलेली आहेत. दरवर्षी मार्च-एप्रिल महिन्यात येथे सूर्यकिरणे थेट शिवलिंगावर पडण्याचा अद्भुत खगोलीय चमत्कार पाहायला मिळतो. हे मंदिर चिदंबरम शहरापासून 30 किलोमीटर अंतरावर काट्टुमन्नाइरकोइल जवळ आहे.

18)Periyanayagi Madha Shrine-

पेरियानयागी मधा चर्च हे तमिळनाडूच्या कुड्डालोर जिल्ह्यातील, कोननकुप्पम गावात, येशू ख्रिस्ताची माता ‘सेंट मेरी’ यांना समर्पित प्रसिद्ध आणि रोमन कॅथलिक चर्च आहे. या चर्चची स्थापना 1720 च्या सुमारास इटालियन मिशनरी आणि तमिळ भाषेचे महान विद्वान फादर कॉन्स्टंटईन बेस्की (वीरमामुनिवर) यांनी केली होती. येथे मनिलाहून मागवलेली माता मेरीची भव्य मूर्ती, ज्यामध्ये त्यांनी तमिळ पेहराव (साडी) परिधान केला आहे. स्थानिक श्रद्धेनुसार, एका अपत्यहीन व्यक्तीला माता मेरीने स्वप्नात दर्शन दिले आणि तिथे तिची स्थापना केल्यावर त्यांना अपत्यप्राप्ती झाली. हे चर्च धार्मिक सलोख्याचे प्रतीक मानले जाते, येथे हिंदू, मुस्लिम आणि ख्रिश्चन सर्व धर्मांचे भाविक एकत्र येतात. दरवर्षी येथे 14 जानेवारी 23 जानेवारी या काळात चर्चचा भव्य 10 दिवसीय वार्षिक उत्सव साजरा केला जातो.

19)Arulmigu Kolanjiappar Temple-

अरुल्मिगु कोलांजीअप्पर मंदिर हे तमिळनाडूच्या कुड्डालोर जिल्ह्यातील, विरुधाचलम जवळील मानवलनाल्लूर गावातील भगवान मुरुगन (कार्तिकेय) यांचे प्रसिद्ध आणि प्राचीन मंदिर आहे. या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे येथे देवाची कोणतीही पारंपरिक मूर्ती नसून, त्यांची पूजा 3 फूट उंच स्वयंभू दगडी वेदीच्या रूपात केली जाते. येथे भक्तांनी आपल्या समस्या कागदावर लिहून देवाच्या भाल्याला (वेल) बांधल्यास 90 दिवसांत संकटे दूर होतात, अशी भाविकांची श्रद्धा आहे. आठव्या शतकातील प्रसिद्ध शैव संत सुंदरर यांच्या आख्यायिकेमुळे या मंदिराला विशेष ऐतिहासिक महत्त्व प्राप्त झाले आहे. द्रविडीयन स्थापत्यशैलीत बांधलेल्या या मंदिरात ‘पांगुनी उठीराम’ आणि ‘आदि कृतीका’ हे उत्सव मोठ्या उत्साहात साजरे केले जातात.

Visit the travel blog

1)तामिळनाडूच्या कुड्डालोर जिल्ह्यातील ‘वृद्ध काशी’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या 2,000 वर्षे प्राचीन शिवमंदिराचे नाव काय आहे?

कुड्डालोर जिल्ह्यातील ‘वृद्ध काशी’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या प्राचीन शिवमंदिराचे नाव अरुल्मिगु विरुद्धांबिकाई उदनुराई विरुधागिरीश्वरार मंदिर आहे.

2)भरतनाट्यमच्या 108 मुद्रा आणि गूढ ‘चिदंबरम रहस्य’ यासाठी प्रसिद्ध असलेले तामिळनाडूतील ‘आकाश’ तत्त्वाचे मंदिर कोणते?

श्री थिल्लई नटराज मंदिर (चिदंबरम).

3)कुड्डालोर जिल्ह्यातील 10 व्या शतकात बांधलेला प्रसिद्ध मानवनिर्मित जलाशय कोणता आहे?

कुड्डालोर जिल्ह्यातील 10 व्या शतकात बांधलेला, चोल राजवंशाचा ऐतिहासिक वारसा असलेला आणि ‘पोन्नियिन सेल्वन’ कादंबरीत उल्लेखलेला वीरनम तलाव हा मानवनिर्मित जलाशय आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
Scroll to Top