कोईम्बतूर जिल्ह्यातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे- Top 27 places to visit in Coimbatore District

भारतभ्रमंती या वेबसाईटवर पहा भारत देशातील प्रत्येक राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यातील पर्यटन स्थळांमध्ये, तामिळनाडू राज्यातील कोईम्बतूर जिल्ह्यातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे. कोईम्बतूर जिल्हा हा तामिळनाडू राज्यातील केरळ सीमेजवळ वसलेला 38 जिल्ह्यांपैकी एक महत्त्वाचा आणि प्रगत जिल्हा आहे. नोयाल नदीच्या काठावर वसलेला हा जिल्हा पश्चिम घाटाने वेढलेला असून अनामलाई व निलगिरी पर्वतरांगेच्या पायथ्याशी येतो. कापूस आणि कापड उद्योगातील अग्रेसरतेमुळे या जिल्ह्याला ‘दक्षिण भारताचे मँचेस्टर’ म्हणून ओळखले जाते. Top 27 places to visit in Coimbatore District

तसेच वस्त्रोद्योगासोबतच हा जिल्हा ऑटोमोबाईल सुटे भाग, मोटार पंप, इलेक्ट्रॉनिक उत्पादने व स्टील उत्पादन आणि माहिती तंत्रज्ञान (IT) क्षेत्राचे मोठे केंद्र आहे. त्यामुळे याला ‘मिनी चायना’ असेही म्हटले जाते. तसेच ईशा फाउंडेशनमधील 112 फूट उंच आदियोगी शिव प्रतिमा आणि मरुधमलाई मुरुगन मंदिर ही येथील प्रमुख आकर्षणे आहेत. याशिवाय येथील सिरुवाणी धबधब्याचे पाणी भारतातील सर्वात गोड पाण्यांपैकी एक मानले जाते.

Table of Contents

Top 27 places to visit in Coimbatore District

कोईम्बतूर जिल्ह्यातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे

1)Adiyogi Shiva Bust-

Top 27 places to visit in Coimbatore District

आदियोगी शिव मूर्ती ही तामिळनाडू राज्याच्या कोईम्बतूर जिल्ह्यातील, वेल्लियांगिरी पर्वताच्या पायथ्याशी असलेली जगातील सर्वात मोठी अर्धपुतळा मूर्ती आहे. या भव्य मूर्तीची स्थापना ईशा फाउंडेशनचे संस्थापक सदगुरु जग्गी वासुदेव यांनी केली. योग संस्कृतीतील 112 मार्गांचे प्रतीक म्हणून या मूर्तीची उंची 112 फूट ठेवण्यात आली आहे. आणि पूर्णपणे स्टीलपासून बनवलेल्या या 500 टन वजनाच्या मूर्तीची नोंद जगातील सर्वात मोठी अर्धकृती मूर्ती म्हणून ‘गिनीज बुक’ मध्ये झाली आहे. 24 फेब्रुवारी 2017 रोजी महाशिवरात्रीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते याचे उद्घाटन झाले होते. दररोज संध्याकाळी येथे पर्यटकांसाठी ‘आदियोगी दिव्य दर्शनम’ हा लेझर लाईट शो केला जातो.

2)Dhyanalinga Temple-

ध्यानलिंग मंदिर हे तामिळनाडूच्या कोईम्बतूर जिल्ह्यातील, वेलियनगिरी पर्वताच्या पायथ्याशी असलेले एक अत्यंत शक्तिशाली ऊर्जेचे अद्वितीय ध्यान केंद्र आहे. या ध्यान केंद्राची स्थापना सदगुरु जग्गी वासुदेव यांनी केली होती. ईशा योग केंद्राच्या आवारात असलेल्या या मंदिरामध्ये मानवी शरीरातील साती चक्रे जागृत अवस्थेत स्थिर करण्यात आली आहेत. येथे कोणत्याही प्रकारची धार्मिक पूजा किंवा विधी केला जात नाही, त्यामुळे हे स्थान सर्व धर्मांच्या लोकांसाठी खुले आहे. या ध्यानलिंगात प्रवेश करण्यापूर्वी पुरुषांसाठी ‘सूर्यकुंड’ आणि महिलांसाठी ‘चंद्रकुंड’ ही पवित्र जलकुंडे बनवली आहेत. कोणत्याही खांबाशिवाय केवळ विटांनी बनवलेला याचा भव्य घुमट स्थापत्यशास्त्राचा एक अद्भूत चमत्कार आहे. येथे जवळच प्रसिद्ध 112 फुटी आदियोगी शिव पुतळा आहे.

Visit our website: allindiajourney.com

3)Perur Pateeswarar Temple-

पेरूर पट्टेश्वरार मंदिर हे तमिळनाडूच्या कोईम्बतूर शहरात नॉयल नदीच्या काठावर प्राचीन शिवमंदिर आहे. या मंदिराची निर्मिती दुसरी शतकात चोल राजा करिकाल चोल याने केली होती, आणि नंतरच्या काळात होयसळ आणि विजयनगर राजांनी भव्य स्वरूप दिले. या मंदिराला ‘मेलाई चिदंबरम’ असेही म्हटले जाते, येथे भगवान शिवाने आनंद तांडव केले होते अशी मान्यता आहे. या मंदिरातील कनक सभा हा सभामंडप आणि तेथील खांबांवर केलेले बारीक दगडी कोरीवकाम द्रविड शिल्पकलेचा एक उत्कृष्ट नमुना आहे. येथील छतावर कोरलेल्या अखंड दगडी साखळ्या आणि परिसरात असलेले पवित्र चिंचेचे झाड भाविकांसाठी मुख्य आकर्षण आहे.

4)Gedee Car Museum-

गेडी कार म्युझियम हे तामिळनाडूच्या कोईम्बतूर जिल्ह्यातील, अत्यंत प्रसिद्ध क्लासिक कार संग्रहालय आहे. प्रसिद्ध संशोधक जी. डी. नायडू यांच्या स्मरणार्थ सुरू करण्यात आलेल्या या संग्रहालयात संपूर्ण जगातील 100 पेक्षा जास्त दुर्मिळ आणि ऐतिहासिक विंटेज कार्सचा संग्रह आहे. येथे सुरुवातीच्या काळातील मोटार कार्सपासून ते ब्रिटन, जर्मनी, जपान, फ्रान्स, स्पेन आणि अमेरिका या देशांमधील विंटेज कार ठेवण्यात आल्या आहेत. व रोल्स रॉयस, फोर्ड आणि फॉक्सवॅगन यांसारख्या दुर्मिळ ब्रँडच्या जुन्या गाड्या उत्तम स्थितीत जतन केल्या आहेत. ऑटोमोबाईल क्षेत्राचा रंजक इतिहास समजून घेण्यासाठी आणि विंटेज गाड्यांचा अद्भुत प्रवास जवळून अनुभवण्यासाठी हे संग्रहालय सर्वोत्तम मानले जाते.

5)Gass Forest Museum-

गॅस फॉरेस्ट म्युझियम हे तामिळनाडूच्या कोईम्बतूर जिल्ह्यातील, आर.एस. पुरम येथील फॉरेस्ट कॉलेज कॅम्पसमध्ये असलेले प्रसिद्ध, प्राचीन व नैसर्गिक वन संग्रहालय आहे. याची स्थापना 15 एप्रिल 1902 रोजी ब्रिटिश अधिकारी हॉरेस आर्किबाल्ड गॅस यांनी केली होती. ब्रिटिश गॉथिक शैलीतील एका सुंदर ऐतिहासिक इमारतीमध्ये असलेल्या या संग्रहालयात 10,000 पेक्षा जास्त दुर्मिळ वस्तू आणि वनसंपदेचे नमुने जतन करण्यात आले आहेत. येथे हुबेहूब जिवंत वाटणारे वन्यप्राणी, 456 वर्षे जुने सागवान लाकूड, दुर्मिळ कीटक, वनस्पती आणि आदिवासींची पारंपरिक शस्त्रे पाहायला मिळतात. तसेच येथे मुख्य हॉलमधील 25 मीटर लांब त्रिमितीय जंगलाचा देखावा हे पर्यटकांसाठी मुख्य आकर्षण आहे. कोईम्बतूरमधील हे संग्रहालय वन अभ्यासक, विद्यार्थी आणि पर्यटकांसाठी एक अत्यंत ज्ञानवर्धक आणि उत्तम पर्यटन स्थळ आहे.

6)Kovai Kutralam / Siruvani Waterfalls-

कोवई कुटरालम / सिरुवानी धबधबा हा तामिळनाडूच्या कोईम्बतूर जिल्ह्यातील, अत्यंत प्रसिद्ध आणि निसर्गरम्य पर्यटन स्थळ आहे. हा धबधबा सिरुवानी नदीवर आहे व शेजारील सिरुवानी धरणाचे पाणी खनिजयुक्त असल्यामुळे या धबधब्याचे पाणी जगातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात चवदार पाणी मानले जाते. हा संपूर्ण परिसर तमिळनाडू वनविभागाच्या अंतर्गत येतो. त्यामुळे येथे नैसर्गिक शांतता आणि सुरक्षितता राखली जाते. या धबधब्यापर्यंत पोहोचण्यासाठी घनदाट जंगलातून 1 किलोमीटरचा ट्रेक करावा लागतो. हे जंगल विविध प्रकारच्या वनस्पती, प्राणी आणि रंगीबेरंगी पक्ष्यांचे आश्रयस्थान आहे.
हा धबधबा पायऱ्यांच्या स्वरूपात खाली कोसळतो. याच्या पायथ्याशी एक नैसर्गिक पाण्याचा तलाव तयार झाला आहे, पर्यटक या तलावात आंघोळ करण्याचा आणि थंड पाण्याचा आनंद घेतात.

7)Topslip & Anamalai Tiger Reserve-

अनामलाई टायगर रिझर्व्ह हे तामिळनाडूच्या कोईम्बतूर जिल्ह्यातील, पोल्लाची आणि वालपराई तालुक्यांमध्ये, अनामलाई टेकड्यांवर पश्चिम घाटात वसलेले एक निसर्गरम्य आणि समृद्ध व्याघ्र प्रकल्प आहे. आणि त्याचे मुख्य पर्यटन केंद्र टॉपस्लिप हे निसर्गप्रेमी आणि वन्यजीवप्रेमींसाठी एक सुंदर ठिकाण आहे. या अभयारण्याला पूर्वी ‘इंदिरा गांधी वन्यजीव अभयारण्य आणि राष्ट्रीय उद्यान’ म्हणून ओळखले जात होते. 2007 मध्ये याला अधिकृतपणे ‘व्याघ्र प्रकल्प’ म्हणून घोषित करण्यात आले. ब्रिटीश काळात डोंगरावरून लाकडे खाली सरकवली जात असल्यामुळे या ठिकाणाला ‘टॉपस्लिप’ हे नाव पडले. हे अभयारण्य सदाहरित जंगलांनी वेढलेले असून येथे वाघ, आशियाई हत्ती, बिबट्या, गवा आणि नीलगिरी तहर यांसारखे वन्यजीव आढळतात. पर्यटकांसाठी येथे जंगल सफारी, हत्ती कॅम्प आणि गाईडसह ट्रेकिंगची उत्तम सोय उपलब्ध आहे.

8)Monkey waterfalls-

मंकी धबधबा हा तामिळनाडूच्या कोईम्बतूर जिल्ह्यातील, अनैमलाई हिल्स पर्वतरांगेत वसलेला एक अत्यंत लोकप्रिय आणि सुंदर नैसर्गिक धबधबा आहे. हा धबधबा पोल्लाची ते वालपराई दरम्यानच्या घाट रस्त्यावर, अलियार धरणाजवळ असून ‘कवीअरुवी’ या नावाने ही ओळखला जातो. या धबधब्याच्या परिसरात मोठ्या संख्येने माकडे आढळतात, त्यामुळे याला ‘मंकी फॉल्स’ असे नाव पडले आहे. हा धबधबा 60 फूट उंचीवरून खडकाळ पायऱ्यांवरून खाली कोसळतो त्यामुळे याच्या पायथ्याशी पाण्याचा एक नैसर्गिक तलाव तयार झाला आहे. या तलावाच्या अत्यंत स्वच्छ आणि थंड पाण्यात पर्यटक पोहण्याचा आनंद घेतात.

9)Aliyar Dam & Reservoir Park-

आलियार धरण आणि उद्यान हे तामिळनाडूच्या कोईम्बतूर जिल्ह्यात पोल्लाची शहराजवळ, पश्चिम घाटातील अनामलाई पर्वतरांगात वसलेले एक अतिशय सुंदर आणि लोकप्रिय पर्यटन स्थळ आहे. अलियार नदीवर बांधलेल्या या धरणाचे उद्घाटन 1962 मध्ये पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते करण्यात आले होते. हे धरण सिंचन आणि जलविद्युत निर्मितीसाठी अत्यंत महत्त्वाचे असून धरणाच्या पायथ्याशी पर्यटकांसाठी एक सुव्यवस्थित आणि हिरवेगार उद्यान विकसित केले आहे. तसेच येथे पर्यटकांसाठी बोटिंग आणि मत्स्यालयाची उत्तम सोय उपलब्ध आहे. येथून जवळच प्रसिद्ध मंकी धबधबा आहे. हे धरण वालपराईच्या पायथ्याशी असल्यामुळे येथील शांत परिसर आणि सभोवतालच्या निसर्गरम्य दृश्यांमुळे कौटुंबिक सहलीसाठी हे एक उत्तम ठिकाण आहे.

10)Valparai Hill Station-

वालपराई हे तामिळनाडूच्या कोईम्बतूर जिल्ह्यातील, अतिशय सुंदर, निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त हिल स्टेशन आहे. हे ठिकाण पश्चिम घाटाच्या अनामलाई पर्वत रांगेत, समुद्रसपाटीपासून 3,500 फूट उंचीवर असून याला ‘सेव्हन्थ हेवन’ (7 वा स्वर्ग) म्हणूनही ओळखले जाते. वालपराई हे नैसर्गिक शांततेसाठी, अथांग पसरलेल्या चहा-कॉफीच्या बागांसाठी आणि समृद्ध वन्यजीवांसाठी ओळखले जाते.
या ठिकाणी जाण्यासाठी पर्यटकांना 40 रोमांचक हेअरपिन वळणांच्या घाटातून प्रवास करावा लागतो. हे क्षेत्र अथांग पसरलेल्या चहा-कॉफीच्या बागा, दाट धुके आणि अनामलाई व्याघ्र प्रकल्पाच्या समृद्ध वन्यजीवांसाठी प्रसिद्ध आहे. येथे अलियार धरण, मंकी फॉल्स, शोलेयार धरण आणि विहंगम दृश्ये देणारा नल्लामुडी व्ह्यू पॉईंट ही मुख्य आकर्षणे आहेत.

11)Vaidehi Waterfall-

वैदेही धबधबा हा तामिळनाडूच्या कोईम्बतूर शहरापासून 35 किलोमीटर अंतरावर, नरसीपुरम गावाजवळील प्रसिद्ध धबधबा आहे. हा धबधबा बोलुवमपट्टी राखीव जंगलाच्या घनदाट क्षेत्रात येत असल्याने निसर्गप्रेमी आणि ट्रेकर्ससाठी एक अत्यंत लोकप्रिय ठिकाण आहे. या धबधब्याला पूर्वी तमिळ भाषेत “थोलायरा मूर्ती कंडी” असे म्हटले जायचे. तमिळमध्ये ‘थोलायराम’ म्हणजे 900, ‘मूर्ती’ म्हणजे प्रकटीकरण किंवा देव आणि ‘कांडी’ म्हणजे धबधबा. नंतर प्रसिद्ध अभिनेते विजयकांत यांच्या ‘वैदेही काथिरुनथाल’ या जुन्या तमिळ चित्रपटाचे शूटिंग येथे झाल्यानंतर या धबधब्याला ‘वैदेही धबधबा’ हे नाव पडले. सप्टेंबर ते नोव्हेंबर या काळात येथील नैसर्गिक सौंदर्य आणि पाण्याचा प्रवाह पाहण्यासारखा असतो.

12)Sri Subramanyaswamy / Marudhamalai Murugan Temple-

मरुधामलाई मुरुगन / श्री सुब्रमण्यस्वामी मंदिर हे तामिळनाडूच्या कोईम्बतूर जिल्ह्यातील, भगवान मुरुगन (कार्तिकेय) यांना समर्पित प्राचीन डोंगरावरील मंदिर आहे. भगवान मुरुगन यांच्या पवित्र समजल्या जाणाऱ्या सात मंदिरांपैकी या मंदिराला अत्यंत आदराने मुरुगनचे ‘सातवे निवासस्थान’ मानले जाते. हे मंदिर कोईम्बतूर शहरापासून 15 किलोमीटर अंतरावर पश्चिम घाटातील ग्रॅनाईट टेकडीवर वसलेले आहे. 12 व्या शतकातील या प्राचीन मंदिराचा उल्लेख संगम काळातील तमिळ साहित्यातही आढळतो. येथील गर्भगृहात भगवान मुरुगन ‘दंडायुधपाणी’ रूपात विराजमान असून, हे मंदिर पूर्वभिमुख आहे. तसेच मंदिराच्या आवारात ‘पांबाटी सिद्धर गुहा’ आहे, जिथे प्राचीन तमिळ संतांनी तपश्चर्या केली होती. या मंदिरापर्यंत पोहोचण्यासाठी 837 पायऱ्या असून, भाविकांसाठी येथे मिनी बसची सोय आहे. दरवर्षी येथे जानेवारी-फेब्रुवारी महिन्यात ‘थाईपुसम’ सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.

13)Velliangiri Hill Temple-

वेलिंगिरी हिल टेम्पल हे तामिळनाडूच्या कोईम्बतूर जिल्ह्यातील, पश्चिम घाटात वसलेले पवित्र आणि प्रसिद्ध शिवतीर्थ आहे. या ठिकाणाला ‘वेलियांगिरी अंदावर मंदिर’ किंवा ‘दक्षिण कैलास’ म्हणूनही ओळखले जाते. हे मंदिर निलगिरी बायोस्फीअर रिझर्व्हचा भाग असलेल्या पश्चिम घाटातील 7 टेकड्यांच्या पर्वतरांगेत वसलेले असून येथे 7 व्या टेकडीच्या माथ्यावरील नैसर्गिक गुहेत भगवान शिवाचे स्वयंभू पंचलिंग स्थित आहे. येथील मुख्य मंदिरापर्यंत पोहोचण्यासाठी भाविकांना 7 किलोमीटरचा अत्यंत कठीण 7 टेकड्यांचा ट्रेक करावा लागतो. आणि या टेकड्यांवर चढण्याची परवानगी वनविभागातर्फे महाशिवरात्रीच्या काळातच दिली जाते. तसेच येथे 10 ते 50 वर्षे वयोगटातील महिलांना पर्वतावर चढण्यास बंदी आहे, परंतु या टेकडीच्या पायथ्याशी असलेल्या पूंडी मंदिरात ते दर्शन घेऊ शकतात.

14)Arulmigu Munthi Vinayagar Temple, Puliakulam-

श्री मुंथी विनयागर मंदिर हे तामिळनाडूच्या कोईम्बतूर जिल्ह्यातील, पुलियाकुलम येथील भगवान गणेशाचे रूप असलेल्या ‘मुंथी विनायगर’ देवाला समर्पित मंदिर आहे. हे मंदिर आशिया खंडातील सर्वात मोठ्या गणेश मूर्तीसाठी प्रसिद्ध असून या मंदिरातील श्री गणेशाची मूर्ती 19 फूट 10 इंच उंच, 11 फूट 10 इंच रुंद आणि 190 टन वजनाची आहे. आणि ही भव्य मूर्ती एकाच अखंड ग्रॅनाइट खडकापासून 6 वर्षे मेहनत घेऊन कोरण्यात आली आहे. तमिळ भाषेत ‘मुंथी’ म्हणजे ‘प्रथम’, त्यामुळे कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात करताना येथील विनायगराचे दर्शन घेतले जाते. येथे प्रार्थना केल्याने कुंडलीतील कालसर्प दोष आणि जीवनातील सर्व विघ्न दूर होतात, अशी भाविकांची श्रद्धा आहे. विनायगर चतुर्थी (गणेशोत्सव) हा येथील सर्वात मोठा उत्सव असून, त्यावेळी बाप्पाला 50 किलो चंदनाचा लेप लावून भव्य सजावट केली जाते.

15)Shri Eachanari Vinayagar Temple-

श्री इचनारी विनायगर मंदिर हे तामिळनाडूच्या कोईम्बतूर जिल्ह्यातील, प्रसिद्ध गणेश मंदिर आहे. हे मंदिर 16 व्या शतकात बांधले गेले. या मंदिराच्या गर्भगृहात 6 फूट उंच आणि 3 फूट रुंद अशी ग्रॅनाइट पाषाणाची गणेशमूर्ती असून तिला सोन्याचा मुलामा दिला आहे. आख्यायिकेनुसार या मंदिरातील भव्य गणेशमूर्ती मूळची मदुराई येथून 16 व्या शतकात पेरूर पट्टेश्वरन’ मंदिराकडे नेली जात असताना इचनारी या ठिकाणी आल्यावर बैलगाडीची धुरा तुटल्यामुळे भाविकांनी मूर्ती पुढे नेण्याचे खूप प्रयत्न केले, पण ती जागची हलली नाही. या घटनेला ईश्वरी संकेत मानून भगवान गणेशाची मूर्ती येथेच स्थापित करण्यात आली. द्रविडीयन स्थापत्य शैलीत बांधलेल्या या मंदिरात तामिळनाडूतील गणेशाचा पहिला भव्य सुवर्ण रथ असून तो रोज संध्याकाळी मंदिर परिसरात फिरवला जातो. गणेश चतुर्थी हा येथील मुख्य उत्सव आहे.

16)Then Tirupati Tirumala Srivari Ananda Nilayam-

तेन तिरुपती तिरुमला श्रीवारी आनंद निलयम हे तामिळनाडूच्या कोईम्बतूर जिल्ह्यातील, मेट्टुपलयम जवळील जादयनपलयम येथे सिरुमुगाई रोडवर, 1000 फूट उंचीवर एका नैसर्गिक टेकडीवर वसलेले असून भगवान व्यंकटेश्वर आणि पद्मावती थायर यांना समर्पित प्रसिद्ध मंदिर आहे. या मंदिराला ‘तेन तिरुमलै’ किंवा ‘दक्षिण तिरुपती’ म्हणूनही ओळखले जाते. हे मंदिर आंध्र प्रदेशातील प्रसिद्ध तिरुमला तिरुपती बालाजी मंदिराची हुबेहूब प्रतिकृती असल्यामुळे याला ‘मिनी तिरुपती’ म्हणूनही ओळखले जाते. येथील मंदिर परिसर अत्यंत सुंदर निळ्या-हिरव्या निलगिरी पर्वतांमळे सदाहरीत बहरलेला असतो.’केजी ग्रुप ऑफ कंपनीज’ द्वारे चालवले जाणाऱ्या या मंदिरात भाविकांसाठी तिरुपतीसारखेच ‘लाडू’ विकत मिळतात आणि मोफत प्रसादाचे वाटप केले जाते.

17)Arulmigu Koniamman Temple-

अरुल्मिगु कोनिअम्मन मंदिर हे तामिळनाडूच्या कोईम्बतूर शहराच्या मध्यभागी वसलेले प्रसिद्ध मंदिर आहे. हे मंदिर देवी पार्वतीचे एक रूप असलेल्या देवी कोनिअम्मन यांना समर्पित असून, त्यांना कोईम्बतूर शहराची “संरक्षक देवता” मानले जाते. या मंदिराला 600 वर्षांपेक्षा जास्त जुना इतिहास आहे.’कोवन’ नावाच्या राजाने या मंदिराची स्थापना केली होती, त्याच्या नावावरूनच पुढे ‘कोइम्बतूर’ हे नाव पडले. मंदिराच्या गर्भगृहात देवी कोनिअम्मन विराजमान असून मंदिराच्या उजव्या बाजूला नवग्रह त्यांच्या पत्नींसह विराजमान आहेत. तसेच या मंदिराच्या प्रवेशद्वारावर 84 फूट उंच भव्य सात मजली राजगोपुरम आहे जे भाविकांचे मुख्य आकर्षण आहे. दरवर्षी फेब्रुवारी-मार्च महिन्यात येथे ‘कार फेस्टिव्हल’ (भव्य रथायात्रा) अत्यंत उत्साहात साजरा केला जातो, ज्यामध्ये हजारो भाविक सहभागी होतात.

18)ISKCON Sri Jagannath Temple, Peelamedu-

‘इस्कॉन – श्री जगन्नाथ मंदिर’ हे तामिळनाडूच्या कोईम्बतूर जिल्ह्यातील, पीलामेडू भागातील प्रसिद्ध कोडिशिया ट्रेड फेअर कॉम्प्लेक्स रोडजवळील आध्यात्मिक आणि सांस्कृतिक केंद्र आहे. हे मंदिर ‘श्री जगन्नाथ मंदिर’ म्हणून ओळखले जाते. या मंदिरात भगवान जगन्नाथ, बलदेव आणि देवी सुभद्रा यांच्या सुंदर लाकडी मूर्ती विराजमान आहेत. सध्या या मंदिर परिसरात इस्कॉनतर्फे एक भव्य नवीन मंदिर (कोवई चंद्र प्रकल्प) बांधले जात आहे. 2025 मध्ये या नवीन मंदिराच्या मुख्य शिखरावर 1 टन वजनाचे विशाल ‘श्री सुदर्शन चक्र’ स्थापित करण्यात आले आहे. या मंदिर परिसरात गायींच्या सेवेसाठी एक सुंदर ‘गोलोक गोशाळा’ आहे. दर रविवारी येथे सत्संग, महाप्रसाद वितरण आणि मुलांसाठी ‘भक्ती वृक्ष’ सारखे आध्यात्मिक कार्यक्रम आयोजित केले जातात.

19)Sidhapudur Sree Ayyappan Temple-

सिधापुदूर श्री अय्यप्पन मंदिर हे तामिळनाडूच्या कोईम्बतूर जिल्ह्यातील, प्रसिद्ध आणि पवित्र धार्मिक स्थळ आहे. या मंदिराची रचना आणि पूजा पद्धती हुबेहूब केरळच्या प्रसिद्ध सबरीमाला मंदिरासारखी असल्याने याला ‘दुसरे सबरीमाला’ म्हणूनही ओळखले जाते. या मंदिराचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे येथील 1972 मध्ये सोन्याने मढवलेला सोन्याचा ध्वजस्तंभ, मंदिराचे दरवाजे व कळसही सोन्याने मढवलेले आहेत. तामिळनाडूमध्ये सोन्याचा ध्वजस्तंभ असलेले हे एकमेव अय्यप्पन मंदिर आहे. या मंदिरात भगवान मणिकंदन, गणेश, शिव, भगवती (दुर्गा), श्री गुरुवायुरप्पन (विष्णू), भगवान मुरुगन आणि नवग्रहांची उप-मंदिरे आहेत. दरवर्षी नोव्हेंबर ते जानेवारी दरम्यान मंडला पूजा आणि मकरविलक्कू उत्सव येथे अत्यंत उत्साहात साजरे केले जातात.

20)Tamil Nadu Agricultural University (TNAU) Botanical Garden-

तामिळनाडू कृषी विद्यापीठ (TNAU) बॉटनिकल गार्डन हे कोईम्बतूर शहराच्या मध्यवर्ती भागातील प्रसिद्ध आणि शांत पर्यटन स्थळ आहे. हे उद्यान 47.5 एकर परिसरात पसरलेले असून निसर्गप्रेमी, वनस्पतीशास्त्राचे विद्यार्थी आणि पर्यटकांसाठी शैक्षणिक आणि मनोरंजनाचे केंद्र आहे. येथे स्थानिक आणि विदेशी वनस्पतींच्या 800 पेक्षा जास्त प्रजाती जतन करण्यात आल्या असून, अभ्यासासाठी झाडांवर वैज्ञानिक नावांचे QR Codes लावण्यात आले आहेत. या उद्यानात औषधी वनस्पती, सुगंधी वनस्पती, मेझ गार्डन, ऐतिहासिक TNAU इन्सेक्ट म्युझियम (कीटक संग्रहालय) आणि लहान मुलांसाठी खेळण्याची जागा उपलब्ध आहे. आणि वनस्पती खरेदीसाठी नर्सरी आहे. दरवर्षी जानेवारी-फेब्रुवारी महिन्यात येथे भव्य ‘फ्लॉवर शो’ आयोजित केला जातो.

21)Arulmigu Anuvavi Subramanyasamy Temple, Periyathadagam-

अनुवावी श्री सुब्रमण्य स्वामी मंदिर हे तामिळनाडूच्या कोईम्बतूर जिल्ह्यातील पेरिया थडागम येथील घनदाट वनक्षेत्रात असलेले प्राचीन आणि पवित्र मंदिर आहे. हे मंदिर भगवान मुरुगन (सुब्रमण्य स्वामी) यांना समर्पित असून ते मारुथमलाई टेकड्यांच्या उत्तरेकडील उतारावर आहे. आख्यायिकेनुसार रामायण काळात संजीवनी आणताना हनुमानजींची तहान भागवण्यासाठी मुरुगन यांनी आपल्या ‘वेल’ने (भाला) येथे पाण्याचा अखंड झरा निर्माण केला होता, अशी पौराणिक कथा आहे. ‘हनु’ (हनुमान) आणि ‘वावी’ (पाण्याचा स्रोत) यावरूनच या मंदिराचे नाव ‘अनुवावी’ पडले. या टेकडीवर वर्षभर पाणी असणारा एक पवित्र नैसर्गिक पाण्याचा कुंड आहे. या मंदिरापर्यंत पोहोचण्यासाठी भाविकांना 550 पायऱ्या चढाव्या लागतात.

22)Shree Parshwanath Jain Derasar-

श्री पार्श्वनाथ जैन देरासर हे तामिळनाडूच्या कोईम्बतूर जिल्ह्यातील, आर. एस. पुरम येथील अत्यंत पवित्र आणि प्रसिद्ध जैन मंदिर आहे. तामिळनाडू राज्यातील जैन बांधवांसाठी हे एक प्रमुख धार्मिक आणि आध्यात्मिक केंद्र आहे. हे मंदिर जैन धर्मातील 23 वे तीर्थंकर भगवान पार्श्वनाथ यांना समर्पित असून, येथे त्यांची मूर्ती स्थापित केली आहे. पांढऱ्या संगमरवरी दगडातील आकर्षक कोरीव काम आणि पारंपारिक जैन स्थापत्यशैली हे या मंदिराचे मुख्य वैशिष्ट्य आहे. या मंदिरातील वातावरण अत्यंत शांत, स्वच्छ आणि ध्यानधारणेसाठी उत्तम आहे. पर्युषण पर्व आणि महावीर जयंती यांसारख्या जैन सणांच्या वेळी येथे भव्य धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.

23)Kasthuri Sreenivasan Art Gallery and Textile Museum-

कस्तुरी श्रीनिवासन आर्ट गॅलरी आणि टेक्स्टाईल म्युझियम हे तामिळनाडूच्या कोईम्बतूर जिल्ह्यातील, अविनाशी रोडवरील प्रसिद्ध आणि माहितीपूर्ण सांस्कृतिक केंद्र आहे. हे केंद्र कापड उद्योगाचा इतिहास आणि विविध प्रकारच्या कलाकृतींचे अप्रतिम प्रदर्शन घडवते. हे केंद्र एकूण 17 खोल्यांमध्ये विभागलेले असून येथे कला आणि वस्त्रोद्योगाचा अद्भुत इतिहास पाहायला मिळतो. या टेक्स्टाईल म्युझियममध्ये इजिप्शियन काळापासूनचे विणकाम प्रकार आणि 1,000 वर्षे जुना दुर्मिळ कापडाचा तुकडा जतन करण्यात आला आहे. तर येथील आर्ट गॅलरीमध्ये सुंदर तंजोर पेंटिंग्ज, दक्षिण भारतीय कांस्य मूर्ती आणि जागतिक दर्जाच्या कलाकृतींच्या प्रतिकृती मांडल्या आहेत. कोइम्बतूर विमानतळापासून 1 किमी अंतरावर असलेल्या या संग्रहालयाला भेट देण्यासाठी कोणतेही प्रवेश शुल्क नाही.

24)Bethesda Prayer Centre-

बेथेस्डा प्रार्थना केंद्र हे तामिळनाडूच्या कोइम्बतूर जिल्ह्यातील, कारुण्या नगर येथे सिरुवाणी टेकड्यांच्या पायथ्याशी वसलेले एक प्रसिद्ध, निसर्गरम्य आणि शांत आध्यात्मिक व पर्यटन स्थळ आहे. या केंद्राची स्थापना ‘जीझस कॉल्स’ मंत्रालयाचे डॉ. डी.जी.एस. दिनकरन आणि डॉ. पॉल दिनकरन यांनी 10 ऑक्टोबर 1993 रोजी केली होती. हे केंद्र 10.5 एकर निसर्गरम्य परिसरात पसरलेले आहे. या केंद्रात येशू ख्रिस्तांच्या जीवनावर आधारित सात पवित्र थांबे, ध्यान करण्यासाठी भव्य डोम चॅपल आणि श्रद्धेचा प्रतीक असलेला ‘बेथेस्डा पूल’ ही मुख्य आकर्षणे आहेत. मनःशांती आणि प्रार्थनेसाठी येथे दररोज देश-विदेशातून हजारो भाविक आणि पर्यटक भेट देतात.

25)Anaimalai-

अनीमलाई हे तामिळनाडूच्या कोइम्बतूर जिल्ह्यातील, पश्चिम घाटात वसलेले एक प्रसिद्ध आणि निसर्गरम्य पर्यटन स्थळ आहे. ‘अनाई’ म्हणजे हत्ती आणि ‘मलाई’ म्हणजे पर्वत, त्यामुळे याला ‘एलिफंट पर्वत’ असेही म्हटले जाते. या पर्वतरांगेतील ‘अनाईमुडी’ हे 2,695 मीटर उंचीचे शिखर दक्षिण भारतातील सर्वात उंच शिखर असून येथील अनामलाई व्याघ्र प्रकल्प आणि ‘टॉपस्लिप’ हे ठिकाण वन्यजीव सफारी व ट्रेकिंगसाठी अत्यंत लोकप्रिय आहे. तसेच येथील प्रसिद्ध मासानी अम्मन मंदिर हे भाविकांचे मोठे श्रद्धास्थान असून अलियार नदीच्या काठी वसलेले आहे. पर्यटकांना येथे अलियार धरण, सुंदर उद्याने आणि ‘मंकी फॉल्स’ सारखे नयनरम्य धबधबे पाहता येतात. याशिवाय येथील डोंगराळ भागात मोठ्या प्रमाणावर चहा, कॉफी, मसाल्यांचे पदार्थ आणि सागवान-चंदनाची जंगले आढळतात.

26)Arulmigu Karamadai Shri Ranganathar Swamy / Aranganathasamy Temple-

श्री रंगनाथर स्वामी / अरंगनाथस्वामी मंदिर हे तामिळनाडूच्या कोईमतूर जिल्ह्यातील, प्रसिद्ध धार्मिक स्थळ आहे. हे मंदिर 1000 वर्षांपेक्षा जुने असून येथील भगवान विष्णूंची मुख्य मूर्ती स्वयंभू आहे. इतर विष्णू मंदिरांप्रमाणे येथे देव निद्रिस्त अवस्थेत नसून, एका चौकोनी दगडात केवळ त्यांचा दिव्य चेहऱ्याचा भाग दिसतो. चोळ राजे, विजयनगरचे नायक आणि मैसूरच्या वाडियार राजांनी या मंदिराचा विस्तार केला आहे. येथे भाविकांना आशीर्वाद देण्यासाठी इतर वैष्णव मंदिरांप्रमाणे ‘शठारी’ न ठेवता श्रीरामाचे ‘रामबाण’ डोक्यावर ठेवण्याची एक अतिशय वेगळी आणि विशेष प्रथा आहे.

27)Sholayar Dam-

शोलैयार धरण हे तामिळनाडूच्या कोईमतूर जिल्ह्यातील, वालपराई हिल स्टेशनजवळ अनाइमलाई टेकड्यांमध्ये असलेले महत्त्वाचे आणि नयनरम्य धरण आहे. हे धरण चालकुडी नदीच्या प्रवाहावर बांधले असून ते परंबीकुलम अलियार प्रकल्पाचा महत्त्वाचा भाग आहे. 66 मीटर उंचीचे हे धरण तामिळनाडूतील सर्वात उंच धरण असून या धरणाच्या पाण्याचा वापर जलविद्युत निर्मिती आणि सिंचनासाठी मोठ्या प्रमाणावर केला जातो. येथे आजूबाजूला असलेल्या चहाच्या विस्तीर्ण बागा आणि घनदाट जंगलांमुळे हा परिसर पर्यटनासाठी अत्यंत नयनरम्य आहे. तसेच हे धरण अनाइमलाई टायगर रिझर्व्हच्या जवळ असल्याने येथे समृद्ध वन्यजीव पाहायला मिळतात.

Visit the travel blog

1)तामिळनाडू राज्यातील सर्वात उंच शिखर कोणते आहे?

तामिळनाडूच्या कोइम्बतूर जिल्ह्यातील पश्चिम घाटात अनीमलाई पर्वतरांगेत वसलेले सर्वात उंच शिखर अनाईमुडी (उंची 2,659 मीटर) हे आहे.

2)TNAU बॉटनिकल गार्डनमध्ये वनस्पतींच्या किती प्रजाती जतन करण्यात आल्या आहेत?

TNAU बॉटनिकल गार्डनमध्ये वनस्पतींच्या 800 पेक्षा जास्त प्रजाती आहेत.

3)श्री इचनारी विनायगर मंदिरातील गणेशमूर्ती किती फूट उंच आहे?

श्री इचनारी विनायगर मंदिरातील गणेशमूर्ती 6 फूट उंच आहे.

1)तामिळनाडू राज्यातील सर्वात उंच शिखर कोणते आहे?
तामिळनाडूच्या कोइम्बतूर जिल्ह्यातील पश्चिम घाटात अनीमलाई पर्वतरांगेत वसलेले सर्वात उंच शिखर अनाईमुडी (उंची 2,659 मीटर) हे आहे.
2)TNAU बॉटनिकल गार्डनमध्ये वनस्पतींच्या किती प्रजाती जतन करण्यात आल्या आहेत?
TNAU बॉटनिकल गार्डनमध्ये वनस्पतींच्या 800 पेक्षा जास्त प्रजाती आहेत.
3)श्री इचनारी विनायगर मंदिरातील गणेशमूर्ती किती फूट उंच आहे?
श्री इचनारी विनायगर मंदिरातील गणेशमूर्ती 6 फूट उंच आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
Scroll to Top