भारतभ्रमंती या वेबसाईटवर पहा भारत देशातील प्रत्येक राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यातील पर्यटन स्थळांमध्ये, तामिळनाडू राज्यातील चेन्नई जिल्ह्यातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे.चेन्नई जिल्हा हा तामिळनाडू राज्यातील सर्वात लहान व सर्वाधिक लोकसंख्या असलेला जिल्हा असून तामिळनाडू राज्याची राजधानी आहे. सामरिक स्थान आणि आर्थिक महत्त्वामुळे या जिल्ह्याला “दक्षिण भारताचे प्रवेशद्वार” असे म्हटले जाते. चेन्नई जिल्ह्याच्या उत्तरेला आणि पश्चिमेला तिरुवल्लूर जिल्हा, दक्षिण-पश्चिमेला कांचीपुरम जिल्हा, दक्षिणेला चेंगलपट्टू जिल्हा आणि पूर्वेला बंगालचा उपसागर आहे. या जिल्ह्यातून कूम आणि अड्यार या दोन मुख्य नद्या वाहतात. 1798 मध्ये ब्रिटिश काळात ‘मद्रास जिल्हा’ म्हणून महसूल प्रशासनासाठी याची निर्मिती झाली. Top 23 places to visit in Chennai District
आणि 1996 मध्ये तामिळनाडू सरकारने ‘मद्रास’ हे नाव बदलून ‘चेन्नई’ असे केले. या जिल्ह्यात अंबत्तूर, अमिंझीकराई, अयानवरम, इग्मोर, कोळथूर, माधवरम, मधुरावोयल, मामबलम, पेरांबूर, पुरासवलकम, तिरुवोट्टियुर, तोंडयारपेट, आळंदूर, गिंडी, मयलापूर, शोळिंगनल्लूर आणि वेलाचेरी हे 17 तालुके आहेत. आणि हा जिल्हा सर्वांत मोठा सांस्कृतिक, आर्थिक, शैक्षणिक आणि औद्योगिक केंद्र आहे. येथील मरिना बीच हा भारतातील सर्वात लांब आणि जगातील दुसऱ्या क्रमांकाचा मोठा नैसर्गिक समुद्रकिनारा आहे. या जिल्ह्याला ‘डिट्रॉइट ऑफ आशिया’ आणि ‘इंडियाज हेल्थकेअर कॅपिटल’ म्हणूनही ओळखले जाते.
Top 23 places to visit in Chennai District
चेन्नई जिल्ह्यातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
1)Kapaleeswarar Temple-






कपालेश्वर मंदिर हे तामिळनाडूची राजधानी चेन्नई येथील मैलापूर येथील भव्य प्राचीन शिवमंदिर आहे. हे मंदिर द्रविड़ वास्तुकलेचा एक उत्कृष्ट नमुना असून येथे भगवान शिवाची पूजा ‘कपालेश्वर’ रूपात आणि माता पार्वतीची पूजा ‘करपगंबल’ म्हणून केली जाते. या मंदिराचे भव्य गोपुरम 37 मीटर उंच आहे, त्यावर पौराणिक कथांमधील देवी-देवतांच्या अत्यंत रंगीबेरंगी आणि सुंदर मूर्ती कोरलेल्या आहेत. हे मूळ मंदिर 7 व्या शतकात पल्लव राजांनी समुद्रकिनाऱ्याजवळ बांधले होते. परंतु, 16 व्या शतकात पोर्तुगीजांनी ते नष्ट केले. त्यानंतर 17 व्या शतकात विजयनगरच्या राजांच्या काळात स्थानिक लोकांनी सध्याचे मंदिर मैलपूरच्या मध्यभागात पुन्हा बांधले. या मंदिराच्या प्रांगणात आजही ‘पुन्नाई वृक्ष’ पाहायला मिळतो. तसेच मंदिराच्या प्रवेशद्वारासमोर एक विशाल पाण्याचे कुंड (थेप्पाकुलम) असून येथे दरवर्षी प्रसिद्ध ‘फ्लोट फेस्टिव्हल’ (तेप्पोत्सवम) साजरा केला जातो.
Visit our website: allindiajourney.com
2)Cholamandal Artist’s Village-



चोलामंडल आर्टिस्ट्स व्हिलेज हे तामिळनाडूच्या चेन्नई जिल्ह्यातील कलाकारांचे एक स्वयंपूर्ण आणि ऐतिहासिक गाव आहे. हे गाव इंजामबक्कम भागात पूर्व कोस्ट रोड जवळ 10 एकर क्षेत्रावर पसरले आहे. या गावाची स्थापना 1966 मध्ये मद्रास स्कूल ऑफ आर्ट्स अँड क्राफ्ट्सचे प्राचार्य के. सी. एस. पणिकर आणि त्यांच्या सहकारी 38 तरुण कलाकारांनी मिळून केली होती. आधुनिक कलेला नवी दिशा देणाऱ्या प्रसिद्ध ‘मद्रास मूव्हमेंट ऑफ आर्ट’ (1950-1980) ची सुरुवात याच चोलामंडल गावातून झाली. हे कलाकारांचे निवासी गाव असून येथे कलाकारांची घरे आणि त्यांचे स्टुडिओ एकत्रच आहेत. येथील आर्ट गॅलरीमध्ये दक्षिण भारतातील प्रसिद्ध कलाकारांची उत्कृष्ट चित्रे आणि शिल्पे पाहायला मिळतात. ‘म्युझियम ऑफ द मद्रास मूव्हमेंट’ मध्ये या चळवळीतील उत्कृष्ट कलाकृतींचा कायमस्वरूपी संग्रह आहे. आणि येथील ‘भारती’ नावाचे एक खुले नाट्यगृह आहे. हे गाव समुद्रकिनाऱ्याजवळ, हिरव्यागार निसर्गरम्य वातावरण असल्याने कलाप्रेमी आणि पर्यटकांसाठी हे एक शांत, प्रेरणादायी ठिकाण आहे.
3)Covelong Beach-



कोवेलॉन्ग बीच हा तामिळनाडूच्या चेन्नई जिल्ह्यातील, अत्यंत सुंदर आणि शांत समुद्रकिनारा आहे. या बीचला ‘कोवलम बीच’ म्हणूनही ओळखले जाते. कोवेलॉन्ग हे भारतातील पहिले ‘सर्फिंग व्हिलेज’ म्हणून प्रसिद्ध आहे. या किनाऱ्यावरील लाटा सर्फिंगसाठी उत्तम मानल्या जातात. येथे अनेक नामवंत सर्फिंग स्कूल आहेत. तसेच या समुद्रकिनाऱ्याच्या एका भागाला प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय ‘ब्लू फ्लॅग’ प्रमाणपत्र मिळाले आहे. येथे स्वच्छ पाणी, सुरक्षित पर्यावरण, जीवरक्षक आणि पर्यटकांसाठी अत्याधुनिक सुविधांमुळे हा चेन्नईतील सर्वात सुरक्षित आणि स्वच्छ समुद्रकिनारा मानला जातो. पर्यटकांना येथे जलक्रीडा, विंडसर्फिंग, जेट स्कीइंग, मोटर बोट राइड आणि मासेमारीच्या बोटी व कोळ्यांची जीवनशैली जवळून अनुभवता येते. आणि सुंदर सूर्योदय पाहण्यासाठी ही उत्तम जागा आहे.
4)Nettukuppam Beach-


नेट्टुकुप्पम हे तामिळनाडूच्या चेन्नई जिल्ह्यातील, शांत व निसर्गरम्य समुद्रकिनारा आहे. हे ठिकाण चेन्नईमधील गर्दीपासून दूर एकांतात वेळ घालवण्यासाठी एक ‘हिडन जेम’ मानले जाते.
नेट्टुकुप्पम येथे एन्नोरची खाडी आणि बंगालचा उपसागर यांचा संगम होतो. नदी आणि समुद्राच्या या संगमामुळे येथील भूप्रदेश अत्यंत सुंदर दिसतो. येथील सर्वात मोठे आकर्षण म्हणजे समुद्रात काही अंतरापर्यंत जाणारा एक सिमेंटचा जुना पूल आहे, जो आता अर्धवट तुटलेल्या अवस्थेत आहे.स्थानिक लोक याला ‘ब्रोकन ब्रिज’ म्हणून ओळखतात.अनेक वर्षांपूर्वी एन्नोर खाडीच्या मुखाशी गाळ काढण्याचे मशीन धरून ठेवण्यासाठी हा पूल बांधण्यात आला होता. पर्यटकांसाठी इथून सूर्योदयाचे अप्रतिम दृश्य ‘व्हेंटेज पॉईंट’, चेन्नई शहराची ‘स्कायलाईन’ दिसते. व फोटोशूट हा एक उत्तम लोकप्रिय ठिकाण आहे.
5)Muttukadu Boat House & Dakshina Chitra-






मुत्तुकडू बोट हाऊस आणि दक्षिणा चित्रा ही तामिळनाडूच्या चेन्नईजवळ ईस्ट कोस्ट रोडवर, एकाच परिसरात असलेली दोन अत्यंत लोकप्रिय पर्यटन स्थळे आहेत. मुत्तुकडू हे चेन्नईमधील एक अतिशय सुंदर आणि शांत बॅकवॉटर ठिकाण आहे. पर्यटकांना येथे विविध प्रकारच्या स्पीड बोट, मोटर बोट, रो बोट, पेडल बोट आणि वॉटर स्कूटर उपलब्ध असतात. आणि सध्या येथे ‘गो तामिळनाडू’ नावाची दुमजली फ्लोटिंग रेस्टॉरंट (पाण्यावर तरंगणारे हॉटेल) सेवा सुरू झाली आहे. दक्षिणा चित्रा मुत्तुकडू बोट हाऊसपासून 2 किमी अंतरावर असलेले हे एक ‘लिव्हिंग हिस्ट्री म्युझियम’ आहे. हे संग्रहालय 10 एकर परिसरात पसरलेले असून येथे दक्षिण भारतातील तामिळनाडू, केरळ, कर्नाटक आणि आंध्र प्रदेश या राज्यातील 18 पारंपारिक घरे हुबेहूब पुनर्रचित करण्यात आली आहेत. तसेच पर्यटक येथे स्वतः मातीची भांडी बनवणे, काच फुंकणे आणि विणकाम या गोष्टी प्रत्यक्ष अनुभवू शकतात. आठवड्याच्या शेवटी येथे दक्षिण भारतीय लोकनृत्ये आणि संगीत सादरीकरण केले जाते. आणि येथील क्राफ्ट बाजारातून तुम्ही हस्तकलेच्या वस्तू खरेदी करू शकता.
6)Arignar Anna Zoological Park-



अरिग्नार अण्णा प्राणीशास्त्र उद्यान (वंदलूर प्राणीसंग्रहालय) हे तामिळनाडूच्या चेन्नई जिल्ह्यातील, भारतातील पहिले सार्वजनिक प्राणीसंग्रहालय आहे. या प्राणीसंग्रहालयाची स्थापना 1855 मध्ये मद्रास (चेन्नई) येथील ‘मद्रास म्युझियम’च्या आवारात डॉ. एडवर्ड बाल्फोर यांच्या प्रयत्नांमुळे झाली. नंतर 1979 मध्ये हे उद्यान वंदलूरच्या राखीव जंगलात हलवण्यात आले. हे उद्यान 1,490 एकर क्षेत्रात पसरलेले असून प्राण्यांना राहण्यासाठी येथे पिंजऱ्यांऐवजी नैसर्गिक अधिवासासारखे विस्तीर्ण मोकळे खंदक तयार करण्यात आले आहेत. या उद्यानात 170 पेक्षा जास्त प्रजातींचे सुमारे 2,300 पेक्षा जास्त प्राणी आणि पक्षी आहेत. त्यामध्ये आशियाई सिंह, पांढरा वाघ, बंगाल टायगर, बिबट्या, बायसन (गवा), हत्ती, जिराफ आणि झेब्रा आहेत. पर्यटकांसाठी येथे विस्तीर्ण पक्षीगृह, फुलपाखरू पार्क, कीटक संग्रहालय, सर्पोद्यान, डायनासोरचे मॉडेल्स आणि लायन सफारी व डियर सफारी चालवली जाते.
7)shree Veeraraghava Swamy Temple-




श्री वीरराघवर स्वामी मंदिर हे तामिळनाडूच्या चेन्नई जिल्ह्यातील, तिरुवल्लूर येथील वैष्णव पंथाचे प्राचीन आणि पवित्र मंदिर आहे. हे मंदिर भगवान विष्णूच्या 108 दिव्य देशम पैकी एक मानले जाते. येथे भगवान विष्णूला ‘वीरराघव पेरुमल’ आणि त्यांच्या पत्नी लक्ष्मी मातेला ‘कनकवल्ली थायर’ (वसुमती) म्हणून पूजले जाते. येथे भगवान विष्णू शेषनागावर शयन मुद्रेत विराजमान असून, भक्तांचे आजार दूर करणारे ‘वैद्य पेरुमल’ म्हणून त्यांना पुजले जाते. 8 व्या शतकातील पल्लव कालीन द्रविड वास्तुकलेचा उत्कृष्ट नमुना असलेल्या या मंदिराला भव्य 7 मजली राजगोपुरम आहे. येथील ‘हृत्यथाभानासिनी’ या पवित्र तलावात स्नान केल्याने मानसिक क्लेश आणि शारीरिक व्याधी नष्ट होतात अशी भाविकांची श्रद्धा आहे. आजारातून मुक्तीसाठी येथे खडे मीठ आणि मिरी अर्पण करण्याची अनोखी परंपरा असून, दर अमावस्येला येथे लाखो भाविक दर्शनासाठी गर्दी करतात.
8)Arulmigu Sri Parthasarathyswamy Temple-



अरुल्मिगु श्री पार्थसारथी स्वामी मंदिर हे तामिळनाडूच्या चेन्नई जिल्ह्यातील, तिरुवल्लिकेनी येथील प्राचीन आणि पवित्र वैष्णव मंदिर आहे. हे मंदिर भगवान विष्णूंचे रूप श्रीकृष्णाला (पार्थसारथी – अर्जुनाचा सारथी) समर्पित असून 8 व्या शतकातील प्राचीन वैष्णव मंदिर आहे. हे विष्णूच्या पवित्र 108 दिव्य देशम मंदिरांपैकी एक आहे व पल्लव राजांनी द्रविड वास्तुकलेत याची निर्मिती केली होती. हे असे एकमेव मंदिर आहे जिथे श्रीकृष्णाला मिशी असलेली मूर्ती आहे. येथील गर्भगृहात श्रीकृष्ण त्यांच्या संपूर्ण परिवारासह विराजमान असून, संपूर्ण संकुलात भगवान विष्णूंची पाच वेगवेगळी रूपे (पार्थसारथी, योग नरसिंह, राम, गजेंद्र वरदराज आणि रंगनाथ) पाहायला मिळतात. मंदिराच्या समोरील तलावाला ‘कैराविनी’ किंवा लिलीचा तलाव म्हटले जाते. या ठिकाणी पूर्वी मोठ्या प्रमाणावर कमळाची फुले उमलत असत. येथे वैकुंठ एकादशी आणि ब्रह्मोत्सव येथे मोठ्या उत्साहात साजरे केले जातात.
9)Ashtalakshmi Temple-




श्री अष्टलक्ष्मी मंदिर हे तामिळनाडूच्या चेन्नई जिल्ह्यातील, बेझंत नगर समुद्रकिनाऱ्याजवळील एक अतिशय प्रसिद्ध मंदिर आहे. हे मंदिर धन आणि समृद्धीची देवी लक्ष्मीच्या आठ रूपांना (अष्टलक्ष्मी) समर्पित आहे. 1976 मध्ये स्थापन झालेल्या या मंदिराची वास्तुकला अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण असून ते चार मजली रचनेत बांधलेले आहे. याची रचना दुरून ‘ॐ’ आकारासारखी दिसते, जिथे पायऱ्यांवरून चढताना आणि उतरताना सर्व आठ रूपांचे दर्शन घेता येते. हे मंदिर बंगालच्या उपसागराच्या किनाऱ्यावर असल्यामुळे येथील वातावरण अत्यंत शांत आणि आध्यात्मिक आहे.
10)Fort St. George-




फोर्ट सेंट जॉर्ज हा तामिळनाडूच्या चेन्नई जिल्ह्यातील, कोरोमंडल किनाऱ्यावरील एक ऐतिहासिक किल्ला आहे. या किल्ल्याची स्थापना 1644 मध्ये ईस्ट इंडिया कंपनीने केली होती. या ऐतिहासिक किल्ल्याच्या उभारणीनंतरच आधुनिक चेन्नई (मद्रास) शहराचा विकास सुरू झाला. सध्या या परिसरात तामिळनाडू सरकारचे सचिवालय आणि विधानसभा कार्यरत आहे. किल्ल्याच्या आत भारतातील सर्वात जुने अँग्लिकन चर्च ‘सेंट मेरी चर्च’ आणि एक प्रसिद्ध संग्रहालय आहे. या संग्रहालयात ब्रिटीश काळातील शस्त्रे, नाणी, पदके, गणवेश आणि चित्रे ठेवली आहेत. आणि भारताला 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वातंत्र्य मिळाल्यानंतर फडकवलेला पहिला तिरंगा ध्वज सुरक्षित ठेवण्यात आला आहे. हा किल्ला चेन्नई फोर्ट रेल्वे स्टेशनजवळ असून, पर्यटक येथील चर्च आणि संग्रहालयाला भेट देऊ शकतात.
11)Government Museum-


गव्हर्नमेंट म्युझियम कॉम्प्लेक्स हे तामिळनाडूच्या चेन्नई जिल्ह्यातील, 1851’मध्ये स्थापन झालेले भारतातील दुसरे सर्वात जुने संग्रहालय आहे, हे संग्रहालय एग्मोर परिसरात 16.25 एकर क्षेत्रात पसरलेले आहे. इंडो-सारासेनिक वास्तुकलेचा उत्कृष्ट नमुना असलेल्या या संकुलात 6 मुख्य इमारती आणि 46 गॅलरी समाविष्ट आहेत. येथील कांस्य दालनात चोल आणि पल्लव कालखंडातील आशियातील सर्वात मोठा भव्य मूर्तींचा संग्रह पाहायला मिळतो. याशिवाय संकुलात राष्ट्रीय कलादालन राजा रविवर्मा यांची चित्रे,पुरातत्व वस्तू, ऐतिहासिक म्युझियम थिएटर आणि प्रसिद्ध कोनेमारा पब्लिक लायब्ररी आहे. तसेच मुले आणि विद्यार्थ्यांसाठी येथे बाल संग्रहालय आणि मानवी इतिहास, पुरातत्वशास्त्र, व नाणकशास्त्राचे स्वतंत्र कक्ष आहेत.
12)Valluvar Kottam-




वल्लुवर कोट्टम हे तामिळनाडूची राजधानी चेन्नई येथील एक प्रसिद्ध आणि ऐतिहासिक स्मारक आहे. हे स्मारक महान शास्त्रीय तामिळ कवी आणि तत्त्वज्ञ संत तिरुवल्लुवर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आणि त्यांच्या सन्मानार्थ 1976 मध्ये बांधण्यात आले संत तिरुवल्लुवर यांनी प्रसिद्ध ‘थिरुक्कुरल’ या महाकाव्याची रचना केली होती. या स्मारकाची रचना तिरुवारूर येथील प्रसिद्ध मंदिराच्या रथासारखी 128 फूट उंच असून, यासाठी सुमारे 3,000 ग्रॅनाइट दगड वापरले आहेत. या रथाच्या आत संत तिरुवल्लुवर यांचा भव्य पुतळा स्थापित करण्यात आला आहे. आणि स्मारकाच्या आवारातील भिंतींवर त्यांनी लिहिलेल्या ‘थिरुक्कुरल’ महाकाव्याचे सर्व 1,330 श्लोक कोरलेले आहेत. तसेच येथे 4,000 लोकांची क्षमता असलेले आशियातील एक मोठे खांब नसलेले सभागृह आहे.
13)Santhome Cathedral Basilica-

सॅन्थोम कॅथेड्रल बॅसिलिका हे तामिळनाडूच्या चेन्नई जिल्ह्यातील, मायलापूर येथील एक ऐतिहासिक आणि अत्यंत पवित्र रोमन कॅथोलिक चर्च आहे. येशू ख्रिस्तांच्या 12 प्रमुखांपैकी एक असलेले सेंट थॉमस यांच्या समाधीवर बांधल्या गेलेल्या जगातील मोजक्या तीन चर्चपैकी हे एक आहे. हे भव्य चर्च निओ-गोथिक वास्तुकला शैलीत पांढऱ्या रंगात बांधले असून, याची उंच शिखरे तब्बल 155 फूट आहेत. 16 व्या शतकात पोर्तुगीजांनी याचे बांधकाम केले आणि 19 व्या शतकात ब्रिटिशांनी याचे नूतनीकरण केले. चर्चच्या तळघरात सेंट थॉमस यांची मूळ समाधी असून आवारात एक ऐतिहासिक संग्रहालय आहे. 1956 मध्ये पोप पियस यांनी या चर्चला ‘मायनर बॅसिलिका’ चा दर्जा दिला आणि 2006 मध्ये कॅथोलिक बिशप कॉन्फरन्सने याला ‘राष्ट्रीय तीर्थक्षेत्र’ हणून घोषित केले. मरिना बीचजवळ असलेले हे शांत आणि सुंदर ठिकाण आहे.
14)Guindy National Park-




गिंडी राष्ट्रीय उद्यान हे तामिळनाडू राज्यातील चेन्नई जिल्ह्याच्या मध्यभागी वसलेले एक प्रमुख राष्ट्रीय उद्यान आहे. हे भारतातील 8 वे सर्वात लहान राष्ट्रीय उद्यान असून फक्त 2.70 चौरस किलोमीटर क्षेत्रफळात पसरलेले आहे. हे उद्यान चेन्नई शहराचे ‘हिरवे फुफ्फुस’ म्हणून ओळखले जाते. येथे कोरडी सदाहरित झुडपे आणि काटेरी जंगले आढळतात, ज्यामध्ये वनस्पतींच्या 350 पेक्षा जास्त प्रजाती आहेत. याशिवाय येथे कोल्हे, मुंगूस, कोळी आणि फुलपाखरांच्या 60 पेक्षा जास्त प्रजाती आढळतात. तसेच येथे दुर्मिळ काळवीट, ठिपकेदार हरणे, आणि पक्ष्यांच्या 130 पेक्षा जास्त प्रजाती मुक्तपणे वावरतात. या उद्यानाच्या आवारातच प्रसिद्ध स्नेक पार्क आणि मुलांसाठी चिल्ड्रन्स पार्क असून, सध्या येथे भव्य पक्षीगृह सुरू करण्यात आले आहे. हे उद्यान दर मंगळवारी बंद असते.
15)Chennai Aquarium-



तामिळनाडूच्या चेन्नई जिल्ह्यात जलचर सृष्टी आणि सागरी जीवन अनुभवण्यासाठी अतिशय प्रसिद्ध ठिकाणे आहेत. चेन्नईमधील व्हीजीपी मरीन किंगडम हे भारतातील पहिले व सर्वात मोठे 70 मीटर लांबीचे वॉक-थ्रू अंडरवॉटर टनेल (बोगदा) अॅक्वेरियम आहे, जिथे शार्क आणि 250 पेक्षा जास्त प्रजातींचे जलचर जवळून पाहता येतात. मरिना बीचवर 1909 मध्ये स्थापन झालेले गव्हर्नमेंट मरीन अॅक्वेरियम हे देशातील सर्वात जुने सरकारी अॅक्वेरियम असून, येथे विविध सागरी माशांचे प्रदर्शन आहे. हायकोर्ट परिसराजवळ असलेले चेन्नई पब्लिक अॅक्वेरियम हे कमी वेळेत 100 पेक्षा जास्त वेगवेगळ्या जलचरांच्या प्रजाती पाहण्यासाठी उत्तम आणि माहितीपूर्ण ठिकाण आहे. तसेच, चेन्नईमधील कोळथूर फिश मार्केट ही आशियातील सर्वात मोठ्या रंगीत माशांच्या बाजारपेठांपैकी एक असून, येथे रंगीबेरंगी मासे आणि अॅक्वेरियमचे साहित्य स्वस्त दरात मिळते.
16)Chennai Rail Museum-





चेन्नई रेल म्युझियम हे तामिळनाडूच्या चेन्नई जिल्ह्यातील पेरांबूर आणि विल्लिवाक्कम परिसराजवळील प्रसिद्ध आणि ऐतिहासिक रेल्वे संग्रहालय आहे. 6.25 एकर क्षेत्रफळात पसरलेल्या या संग्रहालयाची स्थापना 16 एप्रिल 2002 रोजी झाली असून, याचे व्यवस्थापन इंटिग्रल कोच फॅक्टरी द्वारे केले जाते. येथे ब्रिटिश राजवटीतील वाफेची जुनी विंटेज इंजिने आणि ऐतिहासिक रेल्वे डबे खुल्या आवारात मांडण्यात आले आहेत. तसेच या संग्रहालयातील इनडोअर गॅलरीत धावणाऱ्या ट्रेन्सची लहान मॉडेल्स, रेल्वेचे जुने नकाशे आणि दुर्मिळ छायाचित्रे पाहायला मिळतात. लहान मुलांसाठी येथील ‘टॉय ट्रेन राईड’ हे सर्वात मोठे आकर्षण असून, एका खऱ्या रेल्वे कोचमध्ये सुरू केलेले ‘चेन्नई एक्सप्रेस’ रेस्टॉरंट पर्यटकांना जेवणाचा अनोखा अनुभव देते.
17)Theosophical Society, Adyar-





थिओसॉफिकल सोसायटी, अड्यार हे तामिळनाडूच्या चेन्नई जिल्ह्यातील, अड्यार नदीच्या किनाऱ्यावर वसलेले एक जगप्रसिद्ध आणि ऐतिहासिक केंद्र आहे. 1875 मध्ये मॅडम ब्लाव्हत्स्की आणि कर्नल ऑलकॉट यांनी न्यू यॉर्कमध्ये स्थापन केलेल्या या संस्थेचे मुख्यालय 1882 मध्ये चेन्नई येथे स्थलांतरित करण्यात आले. 250 एकरच्या निसर्गरम्य परिसरात पसरलेली ही संस्था जात, धर्म आणि लिंगभेदाशिवाय जागतिक बंधुभाव वाढवण्याचे काम करते. येथील 450 वर्षे जुना महाकाय वटवृक्ष आणि विविध धर्मांची प्रार्थनास्थळे जागतिक एकतेचे प्रतीक आहेत. तसेच, येथील ‘अड्यार ग्रंथालयात’ प्राचीन व दुर्मिळ हस्तलिखितांचा अमूल्य साठा आहे. हे ठिकाण शांतता, अध्यात्म, निसर्ग सौंदर्य आणि जागतिक बंधुभाव यासाठी ओळखले जाते.
18)Semmozhi Poonga-



सेम्मोझी पूंगा हे तामिळनाडूच्या चेन्नई जिल्ह्यातील तेनामपेट येथील सुंदर आणि प्रसिद्ध बॉटनिकल गार्डन (वनस्पति उद्यान) आहे. तमिळ भाषेत ‘सेम्मोझी पूंगा’ म्हणजे “अभिजात भाषा उद्यान” 20 एकर जागेवर पसरलेले हे उद्यान नोव्हेंबर 2010 मध्ये जुन्या वुडलँड्स ड्राईव्ह-इन हॉटेलच्या जागेवर सुरू करण्यात आले. येथे 500 पेक्षा जास्त वनस्पतींच्या प्रजाती पाहायला मिळतात, ज्यामध्ये चीन आणि थायलंडमधून आणलेल्या विदेशी झाडांचा समावेश आहे. या उद्यानात 100 वर्षांपेक्षा जुनी जतन केलेली झाडे, बोन्साय, औषधी वनस्पती आणि रॉक गार्डन यांसारखी आकर्षक ठिकाणे आहेत. कॅथेड्रल रोडवर असलेले हे उद्यान चेन्नईच्या गजबजलेल्या शहरामध्ये निसर्गाच्या सानिध्यात शांत वेळ घालवण्यासाठी एक उत्तम आणि लोकप्रिय ठिकाण आहे.
19)Vivekananda House and Museum –



विवेकानंदा हाऊस आणि संग्रहालय हे तामिळनाडूच्या चेन्नई जिल्ह्यातील मरीना बीच जवळील ऐतिहासिक आणि आध्यात्मिक स्मारक आहे. याला तमिळ भाषेत ‘विवेकानंदर इल्लम’ असे म्हटले जाते. हे ठिकाण स्वामी विवेकानंदांच्या स्मृती आणि भारतीय संस्कृतीचे दर्शन घडवणारे एक आधुनिक संग्रहालय म्हणून ओळखले जाते. पूर्वी या ठिकाणाला ‘आइस हाऊस’ म्हटले जायचे. अमेरिकेतून आणलेला बर्फ साठवण्यासाठी 1842 मध्ये बांधण्यात आलेल्या या वास्तूला फेब्रुवारी 1897 मध्ये स्वामी विवेकानंदांच्या 9 दिवसांच्या वास्तव्यामुळे ऐतिहासिक महत्त्व प्राप्त झाले. सध्या येथे रामकृष्ण मठाद्वारे एक अत्याधुनिक ‘स्मार्ट म्युझियम’ चालवले जाते, जिथे स्वामी विवेकानंदांचा मूळ ध्यान कक्ष आणि चित्रदालन आहे. पर्यटकांसाठी येथे अत्याधुनिक 3D, 4D आणि व्हर्च्युअल रिअॅलिटी तंत्रज्ञानाच्या माध्यमातून स्वामीजींच्या जीवनावर आधारित लघुपट दाखवले जातात.
20)Kalikambal Temple-




कालिकांबल मंदिर हे तमिळनाडूची राजधानी चेन्नई येथील जॉर्ज टाउन परिसरातील थंबू चेट्टी स्ट्रीटवर असलेले एक प्राचीन मंदिर आहे. हे मंदिर देवी कालिकांबल (कामाक्षीचे रूप) आणि भगवान कामदेश्वर (शिव) यांना समर्पित आहे. 3 ऑक्टोबर 1677 रोजी छत्रपती शिवाजी महाराजांनी या मंदिराला भेट देऊन देवीची पूजा केली होती. त्यामुळे या मंदिराचा मराठा इतिहास आणि छत्रपती शिवाजी महाराजांशी संबंध असल्याने महाराष्ट्रातील लोकांसाठी हे विशेष आदराचे स्थान आहे. तसेच तमिळ कवी सुब्रमण्यम भारती यांनी देवीच्या स्तुतीसाठी प्रसिद्ध “यादुमागी निंद्राय काली” या काव्याची रचना केली होती. द्रविड स्थापत्य शैलीमध्ये बांधलेल्या या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे, येथील पवित्र विधींसाठी समुद्राच्या पाण्याचा वापर केला जातो. आणि मंदिराचे पवित्र झाड (स्थळ वृक्ष) हे आंब्याचे झाड आहे.
21)Vadapalani murugan / Andavar Temple-




वडापलानी मुरुगन मंदिर हे हे तामिळनाडूच्या चेन्नई जिल्ह्यातील, भगवान शिव-पार्वतींचे सुपुत्र भगवान मुरुगन (कार्तिकेय) यांना समर्पित मंदिर आहे. 19 व्या शतकात भक्त अण्णास्वामी नायकर यांनी एका छोट्या झोपडीतून सुरू केलेल्या या मंदिराचे आज एका भव्य वास्तूमध्ये रूपांतर झाले आहे. या मंदिराच्या प्रवेशद्वारावर 140 फूट उंच राजगोपुरम असून, येथील मुरुगन यांच्या मुख्य मूर्तीच्या पायात पादत्राणे (चप्पल) असणे हे या मंदिराचे मुख्य वैशिष्ट्य मानले जाते. तसेच या मंदिराची रचना तमिळनाडूतील प्रसिद्ध ‘पलानी मंदिरासारखीच’ असल्याने याला ‘वडापलानी’ (उत्तर पलानी) असे म्हटले जाते. हे मंदिर चेन्नईमध्ये विवाह सोहळ्यांसाठी अत्यंत शुभ व लोकप्रिय केंद्र मानले जाते.
22)Vishwaroopa Adhivyadhihara Sri Bhaktha Anjaneya Swamy Temple-


विश्वरूप अधिव्याधीहर श्री भक्त आंजनेय स्वामी मंदिर हे तामिळनाडूच्या चेन्नई जिल्ह्यातील नांगनल्लूर येथील जागृत हनुमान मंदिर आहे. हे मंदिर एकाच अखंड पाषाणातून कोरलेल्या 32 फूट उंच भव्य हनुमान मूर्तीसाठी प्रसिद्ध असून ‘अधिव्याधीहर’ म्हणजे शारीरिक आजार आणि मानसिक त्रास दूर करणारे देव, अशी भाविकांची येथे श्रद्धा आहे. कांची मठाच्या पूज्य स्वामीजींच्या मार्गदर्शनाखाली 1989 मध्ये येथे हनुमानाची मूर्ती स्थापना करण्यात आली. या मंदिरात हनुमंतांसोबतच प्रभू श्रीराम-सीता आणि भगवान श्रीकृष्ण यांचीही सुंदर उप-मंदिरे आहेत. या मंदिरात हनुमानजींना ‘वडा मालाई’ (उडीद वड्यांची माळ) अर्पण करण्याची आणि दर शनिवारी महाप्रसादाची मोठी परंपरा आहे.
23)Shree Jagannath Temple, Kanathur-



श्री जगन्नाथ मंदिर हे तामिळनाडूच्या चेन्नई जिल्ह्यातील, कनाथूर येथील ईस्ट कोस्ट रोड जवळ, बंगालच्या उपसागराच्या किनाऱ्यावर वसलेले पवित्र धार्मिक स्थळ आहे. आणि हे मंदिर ओडिशामधील सुप्रसिद्ध पुरी जगन्नाथ मंदिराची हुबेहूब प्रतिकृती आहे. हे सुंदर मंदिर कलिंग (ओडिशा) वास्तुशैलीमध्ये बांधण्यात आले असून येथील भगवान जगन्नाथ, बलराम आणि सुभद्रा यांच्या मूर्ती कडुनिंबाच्या लाकडापासून बनवल्या आहेत. येथे दरवर्षी जून-जुलै महिन्यात पुरीप्रमाणेच भव्य रथयात्रा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. तामिळनाडूमध्ये ओडिशाच्या संस्कृतीचे दर्शन घडवणारे हे एक प्रमुख आणि पवित्र धार्मिक स्थळ आहे.
1)वडापलानी मुरुगन मंदिर तामिळनाडूतील कोणत्या जिल्ह्यात आहे?
वडापलानी मुरुगन मंदिर तामिळनाडूच्या चेन्नई जिल्ह्यात भगवान मुरुगन (कार्तिकेय) यांना मंदिर समर्पित आहे.
2)चेन्नई रेल म्युझियम कुठे आहे आणि त्याची स्थापना कधी झाली?
चेन्नई रेल म्युझियम तामिळनाडूच्या चेन्नई जिल्ह्यातील पेरांबूर आणि विल्लिवाक्कम परिसराजवळ आहे. याची स्थापना 2002 मध्ये झाली.
3)वल्लुवर कोट्टम हे स्मारक कधी बांधण्यात आले?
वल्लुवर कोट्टम हे स्मारक तामिळ कवी संत तिरुवल्लुवर यांच्या सन्मानार्थ 1976 मध्ये बांधण्यात आले.


